मार्क हेल्परीन

रेडवूड सिटी

मार्क हेल्परीन १९४७ –

मार्क हेल्परीन न्यूयॉर्क मध्ये १९४७ साली जन्मला. काही वर्षे त्याची तिथेच गेली. पण त्यानंतर बरीच वर्षे तो वेस्ट इंडिज मध्ये होता. तो हावर्ड कॉलेजमध्ये शिकला आणि नंतर हार्वर्ड स्कुल ऑफ आर्टस् आणि सायन्समध्ये त्याने पदवी घेतली. त्याचे पदव्युत्तर शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. काही वर्षे ब्रिटिश मर्चंट नेव्ही मध्ये काम केले. तर इझराईलच्या लष्करात आणि हवाईदलातही बरीच वर्षे त्याने काढली.
हेल्परिनच्या लिखाणाची सुरवात तो विद्यार्थी असल्यापासूनच झाली होती. तो विशीत असताना त्याच्या कथा न्यूयॉर्कर सारख्या प्रख्यात आणि प्रतिष्ठित मासिकात छापून येत असत ! तो अजून तिशीत असेल नसेल तेव्हा त्याचे नावाजलेले Winter’s Tale हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ह्या पुस्तकाने त्याचा खुपच बोलबाला झाला. त्याचे हे सर्वोत्कृष्ट पुस्तक मानले जाते.
विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील न्यूयॉर्क मधील जीवनाचे अति अद्भुत वाटेल असे चित्र यात रंगवले आहे. त्या पुस्तकातील एक घटना लक्षात राहण्यासारखी आहे. सेरोटोगाहून आगगाडी निघाली असते. पाच दिवस बर्फ इतके पडते की सांगता सोय नाही. संपूर्ण
आगगाडी बर्फात बुडते ! इतकी बर्फवृष्टी कधी झाली नव्हती . गाडीतील प्रवासी डब्यातच शेकोट्या पेटवतात . त्यासाठी डब्याच्या लाकडी फळ्या आणि जे काही लाकडी असेल ते तोडून फोडून शेकोट्या पेटवत ठेवण्याची धडपड करीत असतात . बरोबर असलेल्या सामानाचा काय उपयोग म्हणून तेही जळत बसतात ! खायला काही नसते. मग पिण्यासाठी तरी काय असणार ! कसेही करून अंगातली धुगधुगी पेटती ठेवण्यासाठी जे असेल आणि जे दिसेल ते जाळत असतात. अनेक लोक गारठुन आणि उपासमारीने मरतात .
कुठल्यातरी खेडेगावातले लोक प्रवाशांना मदत करण्यासाठी बर्फावरील पंचवीस घसरगाड्या भरून अन्न , लोकरीचे गरम कपडे पांघरुणे, बर्फातले बूट, बर्फावरून घसरत उतरण्याच्या आधार काठ्या बरेच असे काही साहित्य घेऊन निघतात. बर्फात बुडालेली ती आगगाडी सापडायलासुद्धा त्यांना काही दिवस लागतात. पण शेवटी ती सापडते.
आपली या संकटातून सोडवण्यासाठी कोणी धावून येईल याची सुतराम कल्पना त्यांना नसते. अचानक हे लोक इतके सर्व सामान घेऊन आले याचे त्यांना आश्चर्य वाटते. आपले भाग्य म्हणत ते भराभर उबदार कपडे घालू लागतात. काही जण खायला लागतात. ज्यांना बर्फावरून घसरत जाणे माहित असते ते त्या skiing च्या काठ्या घेऊन निघतात. ज्यांना ते येत नसते त्यांना तो खेळ शिकून घ्यायलाच लागतो.
मुळात ही कथा अद्भुत आणि पराकोटीची काल्पनिक असल्याने ते प्रवासी यातूनही वाचतात. यथावकाश त्यांचे नेहमीचे आयुष्य सुरु होते. पण ते आता पहिले राहिले नसतात. आयुष्याविषयीच्या त्यांच्या कल्पना, विचारात मोठा बदल होतो. ह्या पुस्तकात आपल्याला थक्क करणाऱ्या अनेक घटना आहेत. नेहमीप्रमाणे सुष्ट आणि दुष्ट ह्यांच्यातील संघर्ष आहे. पुस्तक अद्भुत, थरारक आणि त्यामुळे उत्कंठावर्धक आहे. १९९०च्या दशकात ते गाजले आणि आजही Winter’s Tale हे हेलप्रिनचे उत्कृष्ट पुस्तक मानले जाते.
पण लेखक चार्ल्स व्हान डॉरेनला मात्र हेलप्रिची A Soldier of Great War ही कादंबरी जास्त आवडली.
हेल्प्रिनचे युद्धातील अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे. हेल्प्रिन युद्धातील त्याच्या चार वर्षाचे अनुभव अलेझान्द्रो च्या तोंडून सांगतो. हा अलेझान्द्रो म्हातारा झाला आहे. आपले अनुभव एका तरुणाला सांगतोय. दोघे पन्नास मैलावर असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी चालत निघाले आहेत. दोघांनाही लवकर पोचण्याची ओढ लागली आहे. दोघांचीही कारणे निराळी आहेत.त्याच्या हृदयाची प्रत्येक धडधड आणि श्वासोस्वास जिची आठवण आहे तिच्या भेटीची ओढ तरुणाला आहे तर म्हाताऱ्या अलेझान्द्रोला अखेरच्या झोपेचे ठिकाण गाठण्याची !
वाटेत म्हातारा अलेझान्द्रो युद्धातल्या आठवणी सांगत असतो. त्यावेळच्या भयंकर भीषण आणि भयानक प्रसंगा बरोबर अविस्मरणीय अशी सुखद घटना म्हणजे त्याला लष्करी इस्पितळात भेटलेली त्याच्या काळजाचा तुकडाच झालेली नर्स एड्रियनची भेट ! आणि अर्थातच त्यांचे प्रेम. ती आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही असे त्याला वाटत असते. तो तसे म्हणतोही. पण पुढे तोच सांगतो ,”Giorgionचे La Tempesta हे चित्र पहिले नसते तर मी एड्रियानाला कायमचा मुकलो असेच माझे मन सांगत होते.”
असे काय होते आणि आहे त्या चित्रात ? हे पाहण्यासाठी आणि म्हाताऱ्या अलेझान्द्रोनी नंतर म्हटलेल्या वाक्याचा अनुभव घेण्यासाठी स्वतः Charles Van Doren ते चित्र पाहायला पॅरिसला गेला ! तो म्हणतो,” ते चित्र पाहिल्यावर अलेझान्द्रो -म्हणजेच कादंबरीकार हेल्प्रिन – त्या तरुण मुलाला ” It is the meaning of History !” का म्हणतो ते समजले! तो आपल्याला पुढे असेही सांगतो हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचले पाहिजे आणि ते चित्रही (इतरांनी नंतर नक्कल केलेलं असले तरीही चालेल.) पहायाला हवे. मग वाचकांना हेल्प्रिन आपल्या मनात कोणत्या आठवणी,विचार जागृत करू इच्छितोय ते उमजेल. तो वाचकांना पुन्हा पुन्हा हे पुस्तक आणि Giorgionचे La Tempesta चित्र पहा असे आग्रहाने शिफारस करतो.
हे वाचल्यावर लेखक Charles Van Doren ह्या पुस्तकाने फार भारावून गेलाय इतके मात्र कळते.
मार्क हेलेप्रिनला अनेक मानसन्मान मिळाले. तो अमेरिकन आणि इझ्रायल या दोन्ही देशांचा सल्लागार म्हणून निरनिराळ्या पदांवर त्याने बरेच वेळाकाम केले आहे. चांगली गोष्ट म्हणजे आजही तो आपल्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *