जेम्स थर्बर

रेडवूड सिटी

जेम्स थर्बर १८९४ – १९६१

आपल्यासाठी सध्या, जेम्स थर्बरची पहिली ओळख म्हणजे आपण ज्याचे पुस्तक वाचतो आहोत त्या चार्ल्स व्हान डॉरेनचा तो मित्र. दोघेही कनेटिकटचे .

जेम्स हा सगळ्यांसाठी ‘ जिमी ‘ होता. ओहायो राज्यातल्या कोलंबस मध्ये तो १८९४ साली जन्माला. ओहायो राज्य विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले; आणि आपल्याकडे बंगाली सिनेमातला किंवा मराठी सिनेमातला नायक बी.ए. झाल्यावर मी कोलकाता जाणार, किंवा मराठी सिनेमातला नायक मी मुबईला जाणार असे म्हणत सोलापूर किंवाऔरंगाबाद सोडून मुंबईला येतो तसा थर्बरही न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला. तेथे लेखक आणि चित्रकार म्हणून आपल्या आयुष्याची त्याने सुरवात केली. थोड्याच दिवसात हॅरॉल्ड रॉसने नव्याने सुरु केलेल्या न्यूयॉर्कर मासिकाचा तो संपादक झाला. इथे असतानाच त्याने E.B. White (अतिशय वाचकप्रिय आणि गाजलेल्या Charlot’s Web, Stuart Little या पुस्तकांचा प्रख्यात लेखक ) ह्या दुसऱ्या उत्तम लेखकाला आपल्याकडे ओढून आणले. त्याने आणि व्हाईटने दोघांनी पुस्तकेही लिहिली. आणि त्याचबरोबर थर्बरने आपली अतिशय बोलकी आणि सुंदर अर्कचित्रेही काढायचा सपाट लावला. न्यूयॉर्कर मासिकाची तेव्हापासून दर्जेदार व्यंगचित्रांसाठी ख्याती आहे. आणि मीसुद्धा आजही न्यूयॉर्कर व्यंगचित्रांसाठी वाचतो. आजची काही चित्रेही एकदम हटके असतात . ते असो. पण अनेक साहित्यिकांना प्रसिद्धीच्या झोतात आणले ते थर्बर ज्याचा संपादक होता त्या न्यूयॉर्करने .

जेम्स थर्बरने तिथे पुष्कळ गोष्टी लिहिल्या. अनेक कथांचा त्याकाळी खूप गाजावाजाही झाला. विशेषतः त्याच्या Fables for our Time या कथासंग्रहातील कथा अतिशय चांगल्या आहेत. त्याची सर्वात गाजलेली आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे Secret Life of Waltre Mitty ! हा मिट्टी भिडस्त, थोडासा घाबरट म्हणावा असा , नेहमी आपल्या बायकोच्या दबावाखाली, तिच्या मुठीत असलेला गृहस्थ. बायकोच्या त्रासाला कंटाळला असेल पण तिच्याविरुद्ध एक शब्द बोलत नसे. पण ह्या स्थितीतून म्हणा अगर अशा स्थतीमुळे, तो नेहमी आपल्या कल्पना विश्वात रमलेला असे.त्याच्या मनात क्षणोक्षणी भिन्नाट कल्पना येत असत. मोटार चालवताना जास्त ड्रायव्हिंग मागच्या सीटवर बसलेली बायकोच करायची. सारख्या सूचना देऊन भंडावून सोडायची. पण हा आपला त्याच्या कल्पनेत मशगुल. हा सर्जन व्हायचा. मोठे अवघड ऑपरेशन करत असायचा तर कधी महायुद्धात लढाऊ विमानाचा नंबर एकचा वैमानिक व्हायचा. अफलातून पराक्रम करतो. ह्या कथेवर सिनेमे निघाले. रेडिओवर नाटयप्रसारणही झाले. जुन्या सिनेमात विनोदी नट डॅनी के याने काम केले होते.विशेष म्हणजे ही कथा कनेटिकट मधील वॉटरबरी मध्ये घडते. पण गोष्ट वाचण्यात जास्त मजा आहे, असे बहुतेकांचे म्हणणे आहे. मराठीतील सबकुछ पु.ल. असलेला ‘ गुळाचा गणपती ‘ हा वॉल्टर मिट्टीचा मराठी अवतार होता. पण पु.ल.च्यामुळे अस्सल मराठी झाला होता.
थर्बरने ब्रॉडवेवर यशस्वी ठरलेले Male Animal हे नाटकही लिहिले. त्याची एक आठवण चार्ल्स व्हॅन डॉरेन सांगतो.
” कनेटिकट मध्ये या नाटकाचा प्रयोग झाला. त्या प्रयोगात डॉरेनने मुख्य भूमिका वठवली होती. समोर प्रेक्षकांत खुद्द जिमी आणि त्याची बायको हेलेन पहिल्या रांगेत होते. प्रयोग संपल्यावर जेम्स थर्बरने जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि ह्या नाटकाचा इतका सुंदर प्रयोग दुसरीकडे कुठे मी पहिला नाही अशी स्तुतीही केली ! ते काही इतके खरे नव्हते. पण ते ऐकून मला आनंदही झाला !”
पुढे पुढे थर्बर फार चिडचिडा झाला. जगावर संतापल्यासारखे वागायचा. न्यूयॉर्करने त्याच्या कथा छापणे बंद केले होते. कारण अर्थातच त्या पूर्वी इतक्या चांगल्या नव्हत्या. पण ह्या पाठीमागचे खरे कारण थर्बर हळू हळू आंधळा होत चालला होता आणि आता तर तो ठार आंधळा झाला. त्याचे आयुष्य बायकोच्या मदतीने चालायचे. पण तीही आजारी असायची. एकूण जगण्यातली रया गेलीय असेच झाले.
त्याच्या मृत्यूपूर्वी दोन आठवडे त्याचा मित्र डॉरेन त्याला भेटला. तो सांगतो,” त्याला भेटलो. निरोप घेतला. पण गप्पा फारशा झाल्या नाहीत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *