दे दान सुटे गिरान!

Redwood City, CA

चार पाच दिवसापासून मी ग्रहणाच्या वातावरणात आहे. सुरवात टेड-टाॅक्सवर डेव्हिड बेराॅननेसांगितलेला, खग्रास ग्रहणा संबंधातील त्याचा अद्वितीय अनुभव ऐकत होतो. त्याने अखेरीस सगळ्यांनाच कळकळीने सांगितले की खग्रास ग्रहण पाहण्याची संधी चुकवू नका. आयुष्यात एकदा तरी पाहाच.

योगोयोग असा की ह्या २१ तारखेलाच इथे सूर्याचे खग्रास ग्रहण मोठ्या टापूच्या प्रदेशात दिसणार वअसल्याचे
जाहीर झाले होते.  पण येथील  बे-एरियात मात्र खग्रास दिसणार नाही हे आधीच जाहीर झाले होते.तरीही लहान थोर, सर्व लोकांमध्ये उत्साह संचारला होता. ग्रहण पाहण्याचे चष्मेही कधी संपले ते अनेकांना कळले नाही. तरीही आम्ही डगमगलो नाही. पाहायचे. म्हणजे पाहायचे.संन्याशाच्या लग्नाची शेंडीपासून तयारी सुरु झाली. अर्थात काचा काळ्या करण्यापासून! नेहमीप्रमाणे मी एक काच चांगली पाहून धुरकट करताना फोडली! असो. काचा काळ्या झाल्या.

मी,सोनिया, अनुजा आणि तेजश्रीने घरातून,  त्यांच्या खोलीतून, मागच्या अंगणातून, ग्रहण पाहिले. पूर्वी बनवत होतो तसेच घरी धुराने काळ्या केलेल्या काचांतून ग्रहण पाहिले.

खंडग्रासच दिसणार होते. माझ्या ढोबळ गणिती दृष्टीतून चांगले ७५/. टक्के होते!  छान स्पष्ट दिसले.

मी घरातून, बाहेर जाऊनही पाहिले. बाहेर थांबलोही. एकही पक्षी दिसत नव्हता. ग्रहणाच्या काळात आणि नंतरही काही क्षण, एकही म्हणजे एकही पान हलत नव्हते. संध्याकाळचा भास होता. पण अंधारून आलेले वाटत नव्हते. पण जेव्हढे काही किंचित ऊन पडले होते, तेही अगदी मलूल होऊन पडले होते! सगळा भाग पिवळसर काळसर गाॅगलमधून दिसावा तसा दिसत होता. मी डोळे चोळून पुन्हा पुन्हा पाहिले तरी तसेच दिसत होते.

लहानपणी सोलापूरला काहीग्रहणे, अशा काचेतून पाहिली. औरंगाबादलाही ग्रहण पाहिले. ग्रहण दिसले दिसले असे फक्त म्हणत होतो, इतकेच. बरेच वेळा तर दिसणार नाही हे माहितही असायचे. पण त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे ग्रहणाच्या आधी, पर्वकाळात,काहीही करायचे नाही हा नियम सगळे पाळत. जुन्या पठडींच्या घरात मोठी माणसे जप वगैरे करत.आमच्याघरी तो प्रकार फारसा नव्हता. ग्रहणाच्याआधी आणि ग्रहण सुटल्यानंतर आंघोळी करीत. आम्ही मुले मात्र ग्रहण सुटल्यावरच  करत असू. काय ती गडबड ! ग्रहण काळातले घरातील सर्व म्हणजे सर्व पाणी ओतून द्यायचे! ‘मुन्शिपालटी’ लगेच ताजे पाणी सोडायची! आम्हाला आश्चर्य वाटायचे. येव्हढा अवाढव्य हिप्परग्याचा सर्व तलाव ह्यांनी कधी रिकामा केला ? त्याहीपेक्षा तो प्रचंड तलाव लगेच कोणत्या ताज्या पाण्यांनी भरलाही! अजूनही हे कोडे सुटत नाही.

पाणी ओतून देण्याची जेव्हढी गडबड त्यापेक्षा आंघोळी आटपून ताजे पाणी भरण्याची त्याहून मोठी धडपड!
ग्रहण सुटल्याबरोबर “द्यें दाSSन य्यैं सुट्ये/सुट्ट्यैं गिराSSsन ” अशा निरनिराळ्या आवाजातील आणि निरनिराळ्या घराण्याच्या सुरातील आवाजांचा एकच गदारोळ सुरू व्हायचा! ती गरीब माणसे एकामागून एक अशी घरोघरी यायची. त्यांना कपडे, जुने पत्र्याचे डबे,लोखंडी खिळे,मोडलेले लोखंडी चिमटे, कुठे हिरवी काळी पडलेली, चेपलेली तांब्याच्या लहान सहान वस्तु , धान्य, पैसे देण्याची सगळ्या गल्लीत लगबग सुरू व्हायची.पण जास्त करून कपडे, धान्य पैसे दिले जायचे. पण हे सर्व घेत असतानाही त्यांचे य्यैं द्यैं दाSSन चालूच असायचे. पण खूष व्हायची मंडळी!

हे होईतो चहाचे आधणही शेगड्या स्टोव्ह वर ठेवायची प्रत्येक घरांत धांदल उडायची! ती एक आवडती गडबड असे सगळ्या घरांत.

शाळा आहे की नाही हे आम्ही पोरंच नव्हे तर घरांतले आई-वडीलही विसरले असायचे! ती सगळ्यात मोठी मजा असायची आम्हाला ग्रहणाची! त्यातही ‘दिसणारे’ ग्रहण असले तर जास्तच विसरणे व्हायचे!
मोठे झालो आणि आमच्या ह्या आनंदाला मात्र ग्रहण लागले! खग्रास!

आजचे ग्रहण पाहिले. फार समाधान वाटले. ७५/. टक्के म्हणजे जवळ जवळ खग्रासच पाहिले !

पण लहानपणच्या ग्रहणाची गोष्टच निराळी. ग्रहणाला महत्व कमी.न कळत शाळेला सुट्टी मिळायची हा ग्रहणाचा महत्वाचा भाग होता आमच्या साठी!

ते लागण्यापूर्वीची आदल्या दिवसापासूनची ‘हे नाही ते नाही करायचे’ ची यादी गेली ते बरे झाले. ग्रहण म्हणजे काजळीने रंगवलेल्या काचा हीच खरी ओळख-ती गंमतही नाही; घराघरातील सगळ्यांची आपणही ‘सुटल्याच्या’समाधानाची ती धांदल,गडबड,नाही. ते हंडे, पातेली,बादल्यांचे आवाजही गेले. त्यातच लगोलग देS दाSन सुटे गिराSSन  असे मोठमोठ्याने ओरडत गल्ली बोळातून हातातील कपडे, कापडाची चिरगुटी सावरत, खाकेतली गाठोडी संभाळत जोरात धावत सुटणारी माणसे गेली;  त्या खणखणीत आरोळ्या ऐकल्या की का कुणास ठाऊक पण कुठून तरी, “गोंद्या आलाSरेSs”या गणेश खिंडीतल्या क्रांतिकारी आरोळीची आठवण क्षणापुरती तरी जागी व्हायची. ग्रहण म्हटले की त्याचा हा सगळा धमामाच डोळ्यासमोर येतो. ऐकूही येतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *