रेडवुड सिटी
एखादा ‘ राॅक स्टार’ गायक आपल्या आयुष्याविषयी काही लिहेल किंवा लिहू शकेल अशी त्याच्या चाहत्यांचीही फारशी अपेक्षा नसते. बरे त्याने लिहिले तरी त्यात काय असणार असे विशेष? त्याच्याविषयी किंवा ‘बॅंड ‘मधील सहकाऱ्यांविषयी किस्से, एकमेकांची, प्रतिस्पर्ध्यांची उणीदुणी, त्याच्याविषयी प्रसारात असलेल्या गप्पा, अफवा यांचे खुलासे किंवा समर्थन; त्यातच मालमसाला घालून फोडणी दिलेल्या एखाद- दुसऱ्या गाण्यांची किंवा गाजलेल्या कार्यक्रमाच्या आठवणी. असेच काही असणार. हे सरासरी गृहित असते.
ब्रुस डिकिन्सनने लिहिले तरी ते असेच काही असणार असे समजण्याची चूक करु नका.
Iron Maiden ह्या ८०-९०च्या दशकातील जागतिक कीर्तिच्या गान-वाद्यवृंदाचा ब्रुस हा मुख्य गायक. रंगभूमीच्या ह्या कडेपासून ते त्या टोकापर्यंत सतत एखाद्या खेळाडूसारखा हा वावरतो. मध्येच ढांगा टाकीत, लांब उड्या, उंच उड्या मारतो. त्याच्या आवाजाची जात आॅपेरा गायकासारखी आहे. वर पर्यंत आवाज चढवतो. प्रेक्षकानांही तो मधून मधून, “माझ्यासाठी तुम्हीही आवाज चढवा; आणखी,आणखी वर!” असे आवाहन करत असतो. चाहतेच ते! दाद देणारच. आपल्या गाण्यांनी, आवाजाने श्रोत्या-प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या ब्रिटिश ‘राॅक स्टार ‘ने नुकतेच What Does This Button Do ? हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे.
ब्रुस हा प्रख्यात ब्रिटिश जगप्रसिद्ध गायक आहे इतकी ओळखही पुरेशी आहे. माणसाला काही मर्यादा असतात हे सर्वांनाच माहित आहे.तशीच चतुरस्त्रतेलाही मर्यादा असतात असा आपला सार्थ समज आहे. पण संगीताच्या क्षेत्रात ‘ ब्रुस ब्रुस ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वत: डिकिन्सनला अशा मर्यादा असतील ते माहितही नसावे!
ब्रुस हा गायक आहे. जोडीने गिटार वादनही आलेच. तो गीतकारही आहे. संगीतही तोच देतो. १९८०मध्ये सॅमसन्स बॅंड मधून त्याची कारकीर्द सुरू झाली. पण एका वर्षातच तो तिथून बाहेर पडला. Iron Maiden मध्ये आला. इथून त्याची चढती कमान सुरू झाली. किर्ती होऊ लागली,नावही झाले. हे एक झाले. पण त्याने बीबीसीसारख्या नामवंत संस्थेसाठी २००२ ते २०१० पर्यंत स्वत: चे संगीताचे कार्यक्रमबीबीसी म्युझिक६ वर केले. दूरदर्शनवर Documentaries पेश केल्या. त्यापैकी काहींचे लेखन-निवेदन त्यानेच केले आहे. डिस्कव्हरी चॅनलने हवाई-शास्त्राचा (विमाने व तत्सम वाहने) यांचा इतिहास या विषयावर एक मालिका केली. त्यात ब्रुस डिकिन्सनचा महत्वाचा सहभाग होता. त्यामध्ये त्याची Flying Heavy Metal ही film ही दाखवली होती. ही मालिका इंग्लंडमध्ये डिस्कव्हरी टर्बो या वाहिनीवरही प्रसारित झाली होती. म्हणजे तो दूरदर्शनवरचा स्टार आणि कार्यक्रमांचा प्रसारकही( broadcaster)आहे.
ब्रुस डिकिन्सनने टीव्हीसाठी काही लेखन केले आहेच. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही की त्याने पुस्तकेही लिहिली आहेत! त्याचे पहिले पुस्तकThe Adventures of Lord Iffy Boctrace हे पुस्तक चांगले गाजले. त्याच्या पहिल्याच धडाक्यात ४०,०००प्रति खपल्यावर त्याच्या प्रकाशकाने – Sidgwic &Jackson- ह्या कादंबरीचा पुढचा भाग लगेच लिहायला सांगितला. ब्रुसनेही लगेच The Missionary Position लिहून दिली! ब्रुसने,ज्युलियन डाॅयल (हा दिग्दर्शकही आहे) बरोबर Chemical Wedding ही कादंबरी लिहिली. त्यावर सिनेमाही काढला. त्याची पटकथाही ह्या दोघांची आहे. आणखी एक पुस्तक त्याच्या ‘बॅंड’ संबंधित असावे, Iron Maiden – A Matter of Life and Death हे पुस्तकही त्याने व त्याच्या सहकाऱ्याने मिळून लिहिले आहे.या काळातील दुर्मिळ वैशिष्ठ्य हे की तो आपले सर्व लिखाण आजही हातानेच लिहितो! अे-४च्या वह्याच्या वह्या भरून टाकतो.
ब्रुस डिकिन्सन हा बिअरचा चाहता आहे. त्यातूनच त्याने आपल्या चोखंदळ आवडीनिवडीतून एका बिअरची निर्मिती केली. प्रख्यात बिअर उत्पादक Robinson ह्यांच्या मद्यार्कशालेतील Marlyn Weeks हा तज्ञ व ब्रुस यांनी मिळून Trooper नावाची बिअर निर्माण केली. तशीच बेल्जियमची अशी खास व प्रसिद्ध चवीची बिअर त्याने Hallowed नावाने इंग्लंडमध्य् तयार केली. ट्रूपरची ४० देशात पहिल्याच वर्षी २५ लाख पिंटसची विक्री झाली होती!
डिस्कव्हरी चॅनलने हवाईप्रगतीचा इतिहास या मालिकेत ब्रुसचा जो लघुपट दाखवला त्यामागेही इतिहास आहे. ब्रुस डिकिन्सन हा वैमानिक आहे. तो काही काळ Astraeus Airlinesमध्ये वैमानिक होता. त्याच कंपनीत तो नंतर marketing Director ही होता. त्या कंपनीच्या एका ७४७-बोईंग विमानातून आपल्या बॅंडच्या सहकाऱ्यांना व कंपनीचे सर्व सामान,वाद्यांसकट, नेण्यासाठी त्याने आवश्यक बदल करून घेतले.त्या विमानातून त्यांच्या Iron Maiden चे जागतिक दौरे सुरुझाले. ह्या सर्व दौऱ्यात मुख्य गायक ब्रुस हाच मुख्य वैमानिकही होता! आपल्या विमानाचे नाव त्याने Ed Force Oneअसे ठेवले होते. त्या दौऱ्यापैकी बोस्नियातील सॅराजोव्ह ते इजिप्तच्या प्रवासाची ती फिल्म आहे. त्यावेळी त्या भागात युद्धाचेच वातावरण होते.
Astraeus बंद पडल्यावर त्याने स्वत:ची, Cardiff Aviation नावाची विमानांची देखभाल करण्याची कंपनी काढली. त्या कंपनीत ४०ते ६० लोक काम करत. ब्रुस डिकिन्सनने वैमानिक म्हणून फार महत्वाच्या कामगिऱ्या पाडल्या आहेत. इंग्लंडच्या सैनिकांना आणि ब्रिटिश हवाई दलाचा वैमानिकांना अफगाणिस्तानातून सरक्षित आणण्याची कामगिरीही त्याने२००८ साली वैमानिक म्हणून पार पाडली आहे. २००६ मध्ये लिबिया आणि हेझबुलाह व इझ्रायलच्या लढाईमुळे लेबनाॅनमध्ये अडकून पडलेल्या २०० ब्रिटीश नागरिकांनाही त्याने विमानातून सुरक्षित परत आणले आहे. तसेच इंग्लंडचे XL Airways चे विमान इजिप्तमध्ये पडले! त्यातील १८० प्रवाशांनाही ब्रुस डिकिन्सननेच परत आणले. इंग्लंडचे लिव्हरपूल व रेंजर्स या दोन फुटबाॅल संघाना त्याने २०१०मध्ये इटलीतील सामन्यासाठी व २००७ मध्ये रेंजर्सच्या संघाला इझ्रायलमध्ये नेले होते. दोन्ही वेळेस ब्रुसच वैमानिक होता. त्याहीपेक्षा महत्वाची कामगिरी म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील हवाई लढाईच्या प्रात्यक्षिकांत एक लढाऊ विमान ब्रुसच चालवत होता. ते महायुद्धातील हवाई लढायांची पुनर्नाट्यनिर्मिती होती. त्यामध्ये राॅयल एअर फोर्सची लढाऊ विमाने सहभागी होती. त्यांच्यात ब्रुस डिकिन्सनला भाग घेण्याचा सन्मान मिळाला होता!
ब्रुस डिकिन्सन उत्तम तलवारबाजी -fencing-करतो. ब्रिटनमध्ये त्याने सातवा क्रमांक पटकावला होता.ह्या आवडीपोटीच त्याने तलवारबजीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याच्या निर्मितीचा उद्योग सुरु केला त्याची उत्पादने Duellistनावाने ओळखली जातात. तलवारबाजीकडे वळण्याचे महत्वाचे कारण सांगताना तो म्हणाला,”हा खेळ तुमची बुद्धी तलवारी सारखीच टोकदार आणि धारदार ठेवते. मन व शरीर त्या पात्यासारखेच लवलवते ठेवते. आणि मला हा खेळ आवडतो! ”
ब्रुस डिकिन्सनची अर्थातच उद्योजक अशीही ओळख आहे. त्या मुळे त्याला ठिकठिकाणी भाषणे देण्यासाठीही आमंत्रणे असतात. ठळक उदाहरणे द्यायची तर २०१२ मध्ये क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, लंडन येथे तर २०१३ Connect2Buisness स्टाॅकहोम येथे, तर २०१५ मध्ये युरोपच्या Aviation Week’s च्या काॅन्फरन्समध्ये आणि मुंबईत २०१५साली त्याला Blog Now and Live Foreverमध्ये Key Speakerम्हणुन बोलावले होते. वर सांगितलेल्या ठिकाणीही तो बीज-वक्ता म्हणूनच आमंत्रित होता.
एकाच माणसाची किती रूपे किती व्यक्तिमत्वे! सप्तरंगी की शतरंगी म्हणावे ; अष्टपैलू,की शतपैलू; चौफेरी, चतुरस्त्र, चौपदरी का अष्टपदरी अशा कोणत्या शब्दांत ह्या माणसाला वर्णावे हा प्रश्न पडतो की नाही? कोणत्याही विशेषणांच्या आवाक्यात न येणारे हे व्यक्तिमत्व आहे.
परवा, दोन नोव्हेंबरला हा सॅनफ्रान्सिस्कोला आला आहे.गाण्याच्या कार्यक्रमासाठी पण त्याचबरोबर त्याच्या आत्मचरित्राच्या विक्रीवाढीसाठीही. जवळच असलेल्या मेन्लो पार्क या गावातील केपलर या दुकानात तो २तारखेलाच सही करून पुस्तके देणार होता. पण त्या अगोदर त्याचे भाषणही होणार होते. या कार्यक्रमाला १५डाॅलर ते ५० डाॅरची तिकीटे होती! हा कार्यक्रम कमी उत्पन्नाच्या गटातील मुलांची वांड.मयीन, वाचनाची, लिहिण्याची आवड वाढावी, प्रत्यक्ष उत्तेजन देण्यासाठी आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी होता.
चतुरस्त्र,अष्टपैलू,हरहुन्नरी याशिवाय आणखीही कोणत्या विशेषणांनी–या नामवंत गायक,गीतकार, संगीतकार, टीव्ही कलाकार, निवेदक, टीव्हीवर प्रश्नमंजुषा,संगीताचे असे विविध कार्यक्रम करणारा, निवेदक, कथा पटकथा लेखक, लेखक, वैमानिक, उद्योजक, वक्ता, बिअर उत्पादक, तलवारबाजीत निपुण, इंग्लंडतर्फे तलवारबाजीत आॅलिंपिक संघात निवड झालेला अशा,–ब्रुस डिकिन्सनचे वर्णन कुणाला करता येईल का याची शंकाच आहे!
त्याच्या पुस्तकाचा कार्यक्रम सिलिकाॅन व्हॅलीच्या मेन्लो पार्क गावात असूनही सर्व तिकीटे अगोदरच संपली कशी या प्रश्नावर ब्रुस म्हणाला,” रॅप आणि कंट्री संगीताच्या ललाटेच्या जमान्यातही Iron Maiden सारख्या hard metal bandच्या कार्यक्रमाला आजही सगळीकडे गर्दी लोटते. माहिती तंत्रज्ञांचे गाव असले तरी संगीत कुणाला आवडत नाही? १५ वयाच्या मुलांपासून ते पन्नाशीतल्या CEOपर्यंत माझे चाहते आहेत.”
काही दिवसांपूर्वी इथल्या मोठ्या वर्तमानपत्राने त्याची टेलिफोन वरून मुलाखत घेतली होती. त्याला विचारले की ” अजून ५९ वर्षेही झाली नाहीत तरी एकदम आत्मचरित्र का लिहायला घेतले. तो म्हणाला,” हीच योग्य वेळ आहे. पहिल्यापासून मला प्रत्येक काम, गोष्ट भराभर, कमीतकमी वेळेत आणि वेळच्या वेळी झाली पाहिजे असे वाटत असते. तसे मी करतोही.नुकताच माझा घशा,मानेचा कॅन्सर बरा झाल्याचा निर्वाळा डाॅक्टरांनी दिला. पहा बरे, गंभीर गोष्टीचा शेवटही आनंदाचा झाला. मग लिहिता लिहिता माझे आत्मचरित्रही याच आनंदाच्या टप्याशी आले हे किती छान झाले!”