पंगतीची रंगत-संगत

साग्र-संगीत चारी ठाव स्वैपाक भुकेला चेतवत होता
डावी उजवी बाजू सजलेले ताट भरगच्च भरले होते रांगोळीच्या मखरात ते विराजमानही झाले होते

खमंग पदार्थ पक्वान्नांचा मधुर सुवास दरवळत होता
उदबत्तीचा सुगंधही त्या घाईगर्दीत मिसळत होता
चटण्या रायती कोशिंबिरी कुरड्या पापड भजी वडे सांडगे लोणची कोरसमुळे सारे संगीत साग्र होते

आमटी पंचामृत एकूण लिज्जत वाढवत होत्या
खीर शेवया गव्हल्या माधुरी सर्वांना वाटत होत्या
सुवर्णरस वरणाचा आंबेमोहरावर ओघळत होता
सुगंध लोणकढ तुपाचा पंगतभर पसरला होता
वाफेसह मसाले भात भरभर वाढला जात होता
नारळाचा चव तुपाधारेने सुखावला होता
आमटी कटाची आपली सलगी पुरणपोळीशी वाढवत होती

चवड केशरी जिलब्यांची रचली कधी समजत नव्हती मठ्ठ्याची वाटी काठोकाठ लगबगीने भरत होती
ताटात गुलाबी गोल पुऱ्या परीसारख्या उतरत होत्या
वाटी भरल्या श्रीखंडाला गुदगुल्या करत हसवत होत्या लच्छीदार बासुंदीत चारोळ्या आरामात तरंगत होत्या
तुपात झिरपल्या पुरणपोळीपुढे सारी दुनिया फिकी होती मऊसूत गोडी त्या घासाला स्वर्गातही तोड नव्हती

गेल्या घटका आस्वादात मग आग्रहाच्या फैरी झडू लागल्या
“घ्या! घ्या! वाढा वाढा! आणखी वाढा” मैत्रीच्या लढती सुरु झाल्या
हसण्या ओरड्यात “पुरे!पुरे! नको आता फार झाले”
सगळे आवाज घासांमध्येच विरघळून गेले
सुग्रास रंग पंगतीचा चढत वाढत चढतच राहिला
मारा तो आग्रहाचा होता तसाच चालू राहिला

जेवण झाले… सगळेजण तृप्त झाले
पाने विड्यांची रंगू लागली … तक्क्यावरचे डोळेही हळू हळू मिटू लागले…
….तृप्त होऊन कधी झोपले
त्यांनाही ते नाही समजले…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *