रेडवुड सिटी ता.१५ डिसेंबर २०१७
काल १४ डिसेंबर रोजी गदिमांच्या सुनेने त्यांच्या अखेरच्या दिवसाची साद्यंत हकीकत लिहिलेला हृदयस्पर्शी लेख वाचल्यावर ‘फार मोठा माणूस’ हेच मी मनात म्हणालो.त्याच वेळी चंदूने त्याची गदिमांशी झालेल्या भेटीची हकीकत, किती उत्साहाने सांगितली होती, तिचीही आठवण झाली.
गदिमा विधानपरिषेदेत सभासद होते. तिथे चंदूची आणि त्यांची भेट झाली. चंदूने त्यांना आपली ‘पावसांच्या थेंबांची वाजंत्री पानापानांवर वाजते’ही कविता वाचून दाखवली. ती ऐकल्यावर ते प्रसिद्ध कवियत्री शांताबाई शेळकेंना हाक मारून म्हणाले, “अहो इकडे बघा, काय सुंदर कविता लिहिलिय ह्याने” , असे म्हणून कवितेतील दोन तीन ओळीही त्यांनीस्वत: वाचून दाखवल्या त्यांना!
गदिमांची रसिकता आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उमदेपणाची जाणीव होते!
ह्यावरून मला आमच्या ती. अण्णांची आठवण झाली. तेही त्यावेळचे प्रख्यात साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककारआणि महाराष्ट्र-गीताचे कवि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि मराठी कवितेला रोमॅंटिसिझमचे वळण देणारे रविकिरण मंडळाचे अध्वर्यु, संस्थापक कविवर्य माघव ज्युलियन( प्रेमस्वरुप आई, वाघ बच्छे फाकडे भ्रांत तुम्हा का पडे असे विचारुन मराठी माणसाला पुन्हा जागवणारे, मराठी असे आमुची मायबोली… तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू असे मायमराठील वचन देणारे कविश्रेष्ठ) यांच्या आठवणी अण्णा सांगत.
अण्णा काॅलेजात असताना-फर्ग्युसन,लाॅ काॅलेज-त्यांच्या कविता मासिक मनोरंजन यशवंत मध्ये येत असाव्यात. प्रा. डाॅ माधवराव पटवर्धन म्हणजेच कवि माधव ज्युलियन,रविकिरण मंडळात इतरांना अण्णांची ओळख करून देताना “आमचे तरुण कविमित्र” असाच उल्लेख करीत असे अण्णा सांगत. रविकिरण मंडळातील कवि गिरीश, यशवंत आणि ग. त्र्यं माडखोलकर यांची आणि अण्णांची चांगली ओळख होती.
ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक व “तीन शहाणे”हे चांगले प्रसिद्धीला आले होते.त्यामुळे त्यांची आणि श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली असावी. नाटक मंडळींत किंवा इतर मोठ्या लोकांकडे जातांना काही वेळेला ते अण्णांनाही बरोबर घेऊन जात. तिथे ते स्वत: गादीवर तक्क्याला टेकून आरामात बसत.अण्णा त्यांचा मान राखून सतरंजीवर बसत. लगेच कोल्हटकर गादीवर हात थापटत अण्णांना म्हणायचे,” अहो कामतकर, इकडे या, अहो आपण नाटककार आहोत, इथे बसा ,”असेम्हणत ते त्याच्या शेजारी अण्णांना बसवून घेत,
ह्या आठवणी सांगताना अण्णा म्हणायचे, ह्या लोकांचा केवळ माझ्यावरचा लोभच नाही तर तितकाच त्यांच्या मनाचा मोठेपणाही होता!”
अण्णा फर्ग्युसनमध्ये असताना त्यांनी ‘वसतीगृहात’ नावाचे विनोदी प्रहसन लिहिले होते. त्याचे आमंत्रण स्वीकारताना साहित्यसम्राट न.चि. केळकरांनी स्पष्ट केले होते की मी फार तर दहा मिनिटासाठी येईन. प्रयोगाला ते आले. फर्ग्युसनचे ॲम्फी थिएटर गच्च भरले होते. न. चि. केळकरआले. प्रयोगाच्या सुरवातीपासूनच हशा टाळ्या सुरु झाल्या. पुढे पुढ तर मुलांनी थिएटर डोक्यावर घेतले. साहित्यसम्राट प्रयोग संपेपर्यंत थांबले होते हे सांगायला नको. प्रयोगाच्या अखेरीस केलेल्या भाषणात त्यांनी,”मी निमंत्रण स्वीकारताना फक्त दहा मिनिटेच थांबेन हे स्पष्ट केले होते पण प्रयोग पाहायला लागलो आणिवगैरे ….” ह्याचा आवर्जून उल्लेख केला व प्रहसानाच्या लेखकाची प्रशंसाही केली! केसरीचे संपादक, नाटककार, इतिहासकार, व महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या व्यक्तींकडून कौतुक होणे ही काॅलेजमधील तरुणाला किती अभिमानास्पद असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो.
अण्णा ही आठवणसांगत ती माझ्या जन्मापूर्वीची आहे.मला वाटते त्यावेळेस वासुनानाचाही जन्म झाला नसेल. अण्णा आबासाहेब ती.बाबा वगैरे रिठ्याच्या वाडायात राहात होते. हा वाडा शुभराय महाराजांच्या मठाच्याही पुढे शनीचे देऊळ, गद्रेंच्या वाड्याच्या जवळपास आहे. आता तिथे रिठ्याची झाडे आहेत की नाहीत कुणास ठाऊक.
रविकिरण मंडळाच्या सप्तर्षींपैकी व महाराष्ट्रातही लोकप्रिय असलेले कवि गिरीश यांचे अापल्याकडे येणे होत असे. कवि गिरीश म्हणजे ‘ रायगडाला जाग येते, वेड्याचे घर उन्हात, सूर्याची पिलेअशा नाटकांचे लेखक वसंत कानेटकरांचे वडील. कवि गिरीश सांगलीच्या विलिंग्डन काॅलेजात प्राध्यापक होते. ते आले की काव्यशास्त्रविनोदाला साहजिकच बहर येई.गिरीश त्यांच्या कविता म्हणत असत. ते खऱ्या अर्थाने काव्यगायन असे. ते कविता चालीवर छान म्हणत, असे अण्णा सांगत. कधी तरी अण्णा गिरीशांची नक्कल करत ” गेले तुझ्यावर जडून, रामा मन गेले तुझ्यावर जडून” ‘ ही शूर्पणखा रामाला आपले प्रेम उघड करून सांगतेय ती कविता म्हणत. गिरीशांची ही कविता सर्व रसिक गुणगुणत असत! पुढे ह्या कवितेच्याच चालीवर अनेक कविता झाल्या. त्या कवितांची चाल/वृत्त दर्शवताना कवि ‘चाल- गेले तुझ्यावर मन जडून’ असाच उल्लेख करत!
आचार्य अत्रे आमच्या घरी आले तेव्हा बरेच लोक जमले होते. आचार्य अत्रे घरात येण्याआधी लोकांनी नारळ ओवाळून तो फोडला! त्यांचा मोठा आदर केला. ही आठवण आई-अण्णा दोघेही सांगत. ही हकीकत मी नुकताच जन्मलो त्यावेळची, म्हणूनही त्या संदर्भात आई सांगत असावी.
गडकरी किंवा आचार्य अत्रे यांच्या इतके चिं. वि जोशी गडगडाटी हसवत नसतील. पण ते वाचकांना हसवत ठेवीत हे नि:संशय! आमच्याउन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांच्यामुळे सतत हसण्यात गेल्या. सुट्टी कधी उन्हाळ्याची वाटतच नसे! चिमणराव, गुंड्याभाऊ आणि त्यांचा आवडता सोटा, चिमणरावांची मुलं मोरु राघू आणि मैना, बाजाची पेटी आणि आपल्या पोपटाच्या पिंजऱ्यासहितआलेली व पेटी वाजवत वाजवत नाट्यगीते म्हणणाऱ्या स्वैपाकीण काकू , तसेच चि.विं चे ओसाडवाडीचे देव; भली मोठी लोखंडी ट्रंक भरून चिमणरावांसाठी ‘ इस्टेट ‘ ठेवणारे त्यांचे दत्तक वडील कोण विसरेल? तर हे प्रख्यात विनोदी लेखक चिं. वि. जोशीही आमच्या घरी अण्णांना भेटायला येत असत.उन्हाळ्याच्या सुट्टीत ते येत.एक दोन रविवारी त्यांचे येणे होत असेल. आम्हाला विनोदी लेखक म्हणजे सारखे हसणारे, हसवणारेअसतात असे वाटायचे. पण चिं.वि.जोशी शांत आणि गंभीर मुद्रेचे होते. अण्णांचे आणि त्यांचे बोलणे चालू असे. आम्ही मध्येच मधल्या खोलीतून डोकावून पाहून जात असू.
सोलापूरला १९४१/४२ साली मराठी साहित्य संमेलन झाले त्याचे वि. स. खांडेकर हे अध्यक्ष होते. त्या आघीपासून नाटककार कवि लेखक म्हणून साहित्यवर्तुळात अण्णांची ओळख होती.त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णा असतील अशी बऱ्याच जणांची अपेक्षा होती. त्यामध्ये खांडेकरही असावेत. पण ते पद अण्णांना मिळाले नाही. तेअसो. पुढे जेव्हा वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषिकचा सर्वोच्च सन्मान लाभला तेव्हा होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण पत्र अण्णांना आले होते. सोलापुरात फक्त एकट्या अण्णांनाच हे आमंत्रण होते ! ह्याचा मात्र अणांना अभिमान वाटला, आणि खांडेकरांनी आठवण ठेवली याचा आनंदही ते व्यक्त करीत.
तर अण्णांमुळे आमच्या घरचे वातावरण असे साहित्यिक असायचे !