रेडवुड सिटी
पंधराव्या श्लोकाच्या अखेरीस क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही पुरुषापेक्षाही श्रेष्ठ अशा उत्तम पुरुषाची ओळख पुढच्या श्लोकात आहे असे म्हटले होते. तो श्लोक आता वाचायला घेऊ या.
उत्तम: पुरुषस्त्वन्य: परमात्मेत्युदाहृत:।
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर:।।१७।।
क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांहून वेगळा आणि उत्तम असा हा पुरुष आहे. त्याला परमात्मा म्हणतात. हा त्रैलोक्यात भरलेला आहे. तो अव्यय( कधीही कमी न होणारा म्हणजेच परिपूर्ण, नित्य) हा ईश्वर तिन्ही लोकांचे पोषण करतो. ।।१७।।
ह्या श्लोकात हा उत्तम पुरुष क्षराक्षरापेक्षा निराळा आहे याचे दोन तीन विशेष सांगितले आहेत. ते म्हणजे हा सर्वत्र भरलेला आहे. तो आहे. आणि आहे तसाच आहे. त्याचा व्यय होत नाही. शाश्वत आहे. तो सर्व विश्वाचा पोषक आहे.
आपण ह्या परमात्म्याची महत्ता आतापर्यंतच्या सर्व अध्यायातून जाणून घेतली आहे. ती त्याच्या महत्वाच्या वैशिष्ठ्यातून माहिती करून घेतली आहेत. ह्या श्लोकातही त्यातील तीन वैशिष्ठ्ये आली आहेत.
परमात्म्याचे ‘ एकोऽहं बहुस्याम’ या स्फुरणातून हे (स्फुरण हीच मूळ प्रकृति) अव्यक्त/ परा प्रकृतीत साम्यावस्थेत-समवाय- असलेल्या पृथ्वि आप तेज वायु आकाश आणि मन बुद्धि अहंकार हया आठही भागातून (अपरा प्रकृति होउन) जड भूतमात्र नाना रुपनामात्मक भूतांची टाकसाळ उघडली. ही जड सृष्टी निर्माण झाली. उत्पत्ति संहाराचे चक्र सुरु झाले. पण अंती सर्व काही पुन्हा या अव्यक्तात (साम्यावस्थेतच) लीन होतात. हे ढोबळ मानाने लक्षात ठेवले म्हणजे क्षर व अक्षर पुरूष समजायला सोपे होते. कारण अपरा व परा प्रकृतींची लक्षणेच त्यांच्यात आहेत. मग पुरुष असे का म्हटले तर ह्या अध्यायात तत्वज्ञानच सांगायचे असल्यामुळे वेदान्ती सर्वांमध्ये चैतन्य पाहतात. त्यामुळे इथे क्षरपुरुष व अक्षर पुरुष असे म्हटले आहे.( ही नावे सुद्धा अपरा प्रकृति व परा प्रकृतींच्या लक्षणांवरूनच दिली आहेत. हे आतापर्यंतच्या १६ श्लोकांवरून विशेषत: १६ व्या श्लोकाद्वारे ध्यानात आलेआहे.) परमात्मा नावाचा पुरुषोत्तम श्रेष्ठ आहे हे लगेच लक्षात येते.
परमात्मा नावाच्या उत्तम पुरुषाचे क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व कसे आहे हे विविध मुद्द्यांवरूनआणखी स्पष्ट होईल. विपरित ज्ञानाच्या- म्हणजे खोट्यालाच खरे भासवणारे (सर्प-दोरी न्याय) जे ज्ञान- त्याच्या जागृति आणि स्वप्न ह्या दोन अवस्था ज्या अज्ञानत्वात लुप्त होतात आणि जेव्हा ज्ञान होते तेव्हा हे अज्ञान त्या ज्ञानात लोपते .पण अंती ज्ञानही जिथे लीन होते, तो पुरुषोत्तम होय. ( आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्ञानही लुप्त होते. कारण आत्मज्ञानी त्या परमात्म्याशीच एकरूप झालेला असतो.)
ज्ञानेश्वर माऊली हेच उपमा दृष्टांतातून पटवून देतात.
पै ग्रासूनि आपुली मर्यादा। एक करीत नदीनदां।
उठी क्लपांती उदावादा। एकार्णवाचा।।५३३।।
तैसे स्वप्न ना सुषुप्ती। ना जागरची गोठी आथी।
जैसी गिळीली दिवोराती। प्रळय तेजें।।५३४।।
ऐसे आथि जे काही। ते तो उत्तम पुरुष पाही।
जे परमात्मा इहीं। बोलिजे नामी ।।५३६।।
नदी नद्या सर्व आपल्यात सामावून घेऊन त्या सर्व तोआपणच होऊन अमर्याद होतो. आणि कल्पांतात तर ह्या प्रळयात सर्वांचा विलय होऊन सर्वत्र एकच एक महाप्रळय सागर होतो; प्रळयाग्नीचे सर्वग्रासक महातेज दिवसरात्र सर्वच गिळून टाकते तसे इथे स्वप्न ना सुषुप्ति इतकेच काय जागृताचीही गोष्ट नाही. आत्मज्ञान्यांना ह्याचे ज्ञान, साक्षात्कार झाल्यावर त्यांच्या स्थितीचे, तिथे ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ही त्रिपुटीही राहात नाही असे वर्णन केले जाते. म्हणजे ते सर्व काही ज्यात लीन होते, असे जे काही आहे, त्या उत्तम पुरुषाला परमात्मा म्हणून ओळखले जाते! मग आहे- नाहीअसे काहीच कळत नाही म्हणजेच सर्व द्वैताद्वैतही ज्यात लोप पावते असा जो स्वयंसिद्ध आहे तो उत्तम पुरुष म्हणजेच परमात्मा. ह्याला कोणतेही अभिधान देता येत नाही. आपल्या आकलनासाठी ह्या अध्यायाच्या आतापर्यंतच्या संदर्भात थोडक्यात सांगायचे तर तो व्यक्त-अव्यक्ताच्याही पलीकडे आहे.
केवळ जीवात्म्याच्या सापेक्षतेतून त्याला परमात्मा म्हणायचे.तो अनिर्वाच्य आहे हेच खरे.त्याचे ज्ञान करून त्याचा प्रत्यक्षानुभव घेणे ही खरी साधना होय.
त्याची प्राप्ती करून घेण्याच्या उपासना मार्गांचे विवेचन गीतेने आतापर्यंतच्या सर्व अध्यायात केले आहे.
ध्यानयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या चारी आत्मज्ञान करूनघेण्याच्या मार्गांची चर्चा मागील सर्व अध्यायातून झाली आहे. त्यातून ह्या तारी मार्गांचा समन्वय साधला आहे. सामान्यांसाठी प्रपंचातून वेळ काढून, निष्ठापूर्वक श्रवण, भजन, कीर्तन, नामस्मरण, ह्यातून भगवंताशी सतत अनुसंधानात राहणे व शक्य असल्यास संतांच्या ग्रंथांचा अभ्यास, हे करावे. निष्ठा तळमळ वाढत जाईल तशी पुढची पायरी चढण्याची तयारी होईल. असा परमार्थाचा सोपान चढत राहणे हे आपल्या हाती आहे. ह्याने कल्याणच साधेल असे संत स्ंगतात.
ह्या अध्यायात केवळ तत्वज्ञानाचीच चर्चा आहे. परमात्मा सर्वत्र आहे, त्याचे अमरत्व, जीवात्मा हा त्याचाच अंश आहे, सर्वांमध्ये तोच कसा भरून आहे, तो (इतर कुणाकडूनही) प्रकाशित होणारा नाही तर तोच सर्व प्रकाशक आहे, तो नियम्य नसून तोच त्रैलोक्याचा नियामक आहे गोष्टी ह्या अध्यायात आल्या अाहेत. अशा पुरुषोत्तमाला कोण भजणार नाही? जे ह्याचे हे स्वरूप जाणून घेण्यास केवळ उत्सुक नसून आतुर आहेत, ह्याला प्राप्त करून घेण्याची तीव्र तळमळ आहे असे पारमार्थिक ह्यालाच भजतात.
पंधरावा अध्याय हा गीतेच्या शिकवणुकीचे सार असलेल्या तत्वज्ञानाचा मानला जातो. त्या दृष्टीनेही सोळावा आणि सतरावा हे दोन्ही श्लोक महत्वाचे वाटतात.
ह्या अध्यायात परमात्मा हा सगुण- निर्गुण, व्यक्त-अव्यक्त ह्यांच्याही पलीकडे आहे हे स्पष्ट केले आहे. तो प्रकाश देणाऱ्यांचाही प्रकाशक आहे. दिसत नाही म्हणून तो नाही असे अजिबात नाही. तो सर्वात आहे, पण तो दृश्य नाही. फुलातील सुगंध डोळ्यांना दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाही असे म्हणतो का? परमात्मा हा चराचरात प्राणीमात्रांत भरलेला आहे.पण तो दिसण्यापेक्षा अनुभवण्याचा विषय आहे. तो कसा अनुभवायचा त्या साठी गीतेने चार मार्गांचा परमार्थाचा प्रवास सांगितला आहे. ते चार मार्ग पुन्हा सांगण्याती आवश्यकता नाही. त्या त्या मार्गाचा अधिकारी होऊन हा परमेश्वर अनुभवता येतो हे गीतेने स्ंगितले आहे.
आपल्या नामदेवांनी, जनाबाईंनी, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी, एकनाथ, तुकाराम रामदास आणि इतर अनेक मराठी संतमहात्म्यांनी याची आपल्याला शपथपुर्वक खात्री दिली आहे.
हा विचार बाळगून आपण ह्यानंतरचे श्लोक अभ्यासूया.