रेडवुड सिटी
शेक्सपिअर किती प्रख्यात आहे हे सांगायला नको. त्याची म्हटली जाणारी, तो शेक्सपिअर असावा अशी व त्याच्या चेहऱ्याशी काहीसे साम्य असलेली तीनच चित्रे उपलब्ध आहेत. आपण शेक्सपिअरचे फोटो, चित्र् पाहतो ती सर्व या तीन चित्रांवरून काढलेली असतात. त्या तीन चित्रांपैकी दोन चित्रे अगदी सामान्य चित्रकारांनी काढलेली आहेत. तिसरे चित्र व्यक्तिचित्र ( ‘पोर्ट्रेट’) म्हणता येईल असे आहे. पण तेही शेक्सपिअरचे नसून दुसऱ्या कोणाचे असावे असेही म्हटले जाते.
एका विरोधीभासाची गंमत बघा. शेक्सपिअरचे म्हणून स्ंगितलेले चित्र पाहिले की हा शेक्सपिअर म्हून ओळखतो. पण तो प्रत्यक्षात कसा दिसत होता हे आजही निश्चितपणे कुणालाही माहित नाही. मग शेक्सपिअर असा दिसत होता हे कसे समजायचे? तर त्यासाठी आपल्याला थोडाफार आधार मिळतो तो त्याच्या स्ट्रॅटफर्ड-अपाॅन-एव्हन Stratford -upon-Avon गावाच्या चर्चमधील त्याच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून ! हा पुतळाही काही विशेष शिल्पाकृति आहे असे नाही. पण त्याच्या गावातील शेक्सपिअरला प्रत्यक्ष ओळखणाऱ्या लोकांनी तो मान्य केला आहे. त्या पुतळ्यासारखा शेक्सपिअर दिसत होता इतके आपण समजून घ्यायचे.
शेक्सपिअरचे व्यक्तिविशेष कसे होते; त्याचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी, त्याची नेहमीची जाण्यायेण्याची ठिकाणे, त्याचे जवळचे मित्र कोण, बायकामुलांशी संबंध कसे होते, कुटंबातील वातावरण कसे होते,त्याचा पुस्तकांचा संग्रह असेल तर कोणती पुस्तके त्याच्या आवडीची, गप्पांचे विषय काय असायचे ह्याचीही माहिती कुठेही मिळत नाही. थोडक्यात त्याच्या खाजगी आयुष्याची माहिती उपलब्ध नाही!
आपली नाटके, सुनीते(sonnets), कविता यातून पन्नास लाख शब्दांचे अजरामर वाड़मय भांडार जगासाठी मागे ठेवून गेलेल्या स्वत: शेक्सपिअरच्या हस्ताक्षरातील मजकूर किती आढळतो? फक्त चौदा शब्दांचा ! शेक्सपिअरच्या हस्ताक्षरातील हे चौदा शब्द मिळतात तेही त्याच्या मृत्युपत्राच्या पानांवर वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या त्याच्या सह्यांच्या रुपाने ! ह्या सहा सह्या व by me हे दोन शब्द असे एकूण चौदा शब्द त्याने लिहिलेले आहेत. त्याने केलेल्या सहा सह्यांतील एकही सही दुसऱ्या सहीसारखी नाही.कोणतीही सही एकसारखी नाही. “Willm Shaksp.”, “ William Shakespe ,” “ Wm Shakpe,” “ William Shakspere ,” Willim Shakspere,” आणि “William Shakespeare ,” . आज रूढ असलेला त्याच्या नावाच्या स्पेलिंग मधील एकही सही नाही. पण समाजसंशोधक आणि भाषा संशोधकांच्या मते त्याकाळी स्पेलिंगच्या अचूकतेबद्दल आग्रह नव्हता. अनेक शब्द अनेक लोक निरनिराळ्या पद्धतीने लिहित असत. त्यावेळची कागदपत्रे, पुस्तकेही ह्याची साक्ष देतात.
शेक्सपिअरचा स्वभाव-आवडीनिवडी-मित्रमंडळी या वैयक्तिक बाबींविषयी काहीही माहिती मिळत नाही अशी खंत व्यक्त केली जाते असे म्हटले आहे. पण सोळाव्या- सतराव्या शतकातील अनेक मोठ्या लोकांविषयीही असेच घडल्याचे दिसते.
केवळ नाटककारांच्या बाबतीत म्हणायचे तर त्याकाळी शेक्सपिअरपेक्षा काकणभर जास्तच प्रसिद्ध असलेला थाॅमस डेकर हा आघाडीचा नाटककार, पण त्याच्याविषयीही तो लंडनमध्ये जन्मला; त्याने भरपूर लेखन केले; आयुष्यात बहुतेक कर्जातच बुडालेला असायचा इतकीच माहिती हाती लागते. तसाच बेन जाॅन्सन. हाही शेक्सपिअरपेक्षा प्रसिद्ध नाटककार. राजदरबारी मान्यता पावलेला. पण त्याचे जन्मसाल, जन्मठिकाण ह्याची माहिती कुठेही आढळत नाही. त्याचे आई वडील, त्याला किती मुलंबाळं होती ही माहिती आजही अज्ञातच आहे. त्यामानाने शेक्सपिअरविषयी थोडेफार का होईना तपशील उपलब्ध आहेत. पण तो थोर, जगप्रसिदध नाटककार, इंग्रजी भाषा समृद्ध करणारा साहित्यिक अशी कीर्ति कित्येक शतके गाजत असलेला आहे. हे विचारात घेतले तर त्यामानाने तो अज्ञातच आहे असे म्हणावे लागते.
शेक्सपिअरकालीन बऱ्याच प्रख्यात लोकांचे जन्मसाल , जन्मठिकाण यांच्या नोंदी आढळत नाहीत. तशीच लोकप्रिय नाटकांच्या लेखकांची नावेही कित्येक वर्षे गायब होती. लोकांना त्या नाटकांचे लेखक कोण त्याचा पत्ता नसे. त्या काळचे Arden of Faversham हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले हे माहित नाही. थाॅमस किडचे The Spanish Tragedy हेसुद्धा त्याकाळचे लोकप्रिय नाटक. पण त्या नाटकाचा लेखक किड (Kyd) आहे हे साहित्य, नाट्य ह्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या कोणत्या तरी कागदपत्रात दुसऱ्याच संदर्भात The Spanish Tragedyचा लेखक थाॅमस किड अशी नोंद आढळली. पण तो दस्तऐवजही पुन्हा दोनशे वर्षे सापडत नव्हता ! हे समजल्यावर शेक्सपिअरची त्याच्या नाटकांव्यतिरिक्त दुसरी काही थोडी तरी माहिती हाती लागते याचेच समाधान वाटते.
शेक्सपिअरचा जन्म २३एप्रिल १५६४ साली स्ट्रॅटफर्ड-अपाॅन – एव्हन या गावात झाला. ही नोंद त्या गावच्या नगरपालिकेच्या दप्तरात आढळत नाही. पण स्ट्रॅटफर्डच्या चर्चमध्ये विल्यम शेक्सपिअरचा बाप्तिस्मा २६ एप्रिल रोजी झाल्याची नोंद आहे. त्या काळी प्लेग देवी वगैरे रोगांच्या साथी सारख्या येत असत त्यामुळे बाप्तिस्मा विधी मूल जन्मल्यानंतर लगेच तीनदिवसांनी करीत. ह्यावरून शेक्सपिअरची २३ एप्रिल ही जन्मतारीख
मान्य झाली आहे.
शेक्सपिअर ज्या सालात जन्मला त्याच वर्षी प्लेगही आला. त्या भयंकर साथीत स्टॅटफर्डमध्येच दोनशे लोक मृत्युमुखी पडले. इंग्लंडमधील मुलांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतियांश मुले मरण पावली. शेक्सपिअरच्या शेजाऱ्याचीच चार मुले प्लेगने वारली. एका अर्थी, शेक्सपिअरची थोरवी,पराक्रम, त्याने हॅम्लेट, आॅथेल्लो, मॅक्बेथ, किंग लिअर,अशी जगभर अाजही प्रयोग होणारी नाटके लिहिली ह्यात नसून, तो लहानगा विल्यम प्लेगच्या भयंकर संहारातही जिवंत राहिला ह्यात आहे. ही त्याची आपल्यासाठी मोठी कामगिरी !
शेक्सपिअरच्या वडिलांचे नाव जाॅन आणि आईचे नाव मेरी. जाॅन शेक्सपिअर गावातील एक प्रतिष्ठित होता. गावाच्या कारभारात-नगरपरिषदेत- तो सहभागी होता. नगरपरिषदेचील सभासदांचा पाठिंबा आणि गावच्या लोकांशीही चांगले संबंध ठेवून असल्यामुळे तो वजनमापे आणि किंमती यांचा तपासणी अधिकाऱ्याच्या पदापासून वर चढत नगराध्यक्षही झाला.
शेक्सपिअरची आई एका मोठ्या घराण्याच्या लांबच्या नात्यातली होती. शेक्सपिअरला तीन भाऊ व चार बहिणी होत्या. बहिणींपैकी एकटी जोन्स ही वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत जगली. बाकीच्या तिघीजणी मात्र लवकर गेल्या. भावांपैकी फक्त विल्यम शेक्सपिअरच विवाहित होता. त्याच्या गिलबर्ट नावाच्या भावाचे शिवणकामास लागणाऱ्या वस्तूंचे दुकान होते. रिचर्ड हा चाळिशी गाठण्या आधीच गेला. सर्वांत धाकटा एडवर्ड. हा लंडनमध्येच नट म्हणून काम करत होता. तो नट म्हणून किती प्रसिद्ध होता का नाही किंवा तो कोणत्या नाटक मंडळीत होता ह्याची काहीच माहिती हाती लागत नाही. पण दु:खाची गोष्ट म्हणजे हा फार अकाली अगदी तरुणपणी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी वारला!
शेक्सपिअरचे स्ट्रॅटफर्ड गाव त्याच्या आजूबाजूच्या अनेक गावांपेक्षा चांगले होते. चांगले म्हणायचे कारण ते गाव चांगली बाजारपेठ होती. आठवड्याचा बाजार तिथेच भरत असे. आजूबाजूच्या गावातील मेंढ्यांची लोकर व कातडे भरपूर येई. त्यामुळे स्ट्रॅटफर्डला लोकरीवर व मेंढ्यांच्या व इतर जनावरांच्याही कातड्यावर प्रक्रिया करण्याचा व त्यापासून अनेक वस्तु बनविण्याचा उद्योग होता. शेक्सपिअरच्या वडलांचाही तो चांगला व्यवसाय होता. ते कातडी हातमोजे बनवण्यात वाकबगार होते.ह्या मोठ्या उलाढलींमुळे स्ट्रॅटफर्ड गाव समृद्ध होते. विशेष म्हणजे तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा पगार इतर गावांतील शाळांच्या मुख्याध्यापकांपेक्षा खूपच जास्त होता.
शेक्सपिअरचे शिक्षण गावातील राजा सहावा एडवर्ड शाळेत झाले. त्यावेळच्या रीतीप्रमाणे विल्यम वयाच्या सातव्या आठव्या वर्षी शाळेत दाखल झाला. आणि रीतीप्रमाणे साधारणत: १५-१६ व्या वर्षापर्यंत त्याचे शिक्षण संपले.
शाळेत मुख्यत: अभिजात भाषाच म्हणजे ग्रीक आणि लॅटिन शिकवल्या जात होत्या.[ह्या काळात आपल्याकडेही संस्कृत पाठशाळाच असत.] “Thank you for your letter “ हे वाक्य लॅटिनमध्ये १५० निरविराळ्या पद्धतीने लिहायचे व म्हणायचे हाही एक अभ्यासाचा धडा असायचा. ह्याचेच आधुनिक काळात, एखादा शब्द लिहिण्यात किंवा पाढा चुकला तर तो शब्द, पाढा दहा वेळा लिहिण्याच्या शिक्षेत रुपांतर झालेलअसावे!
शेक्सपिअरची नाटककारात गणना होऊ लागली तेव्हा इतर साहित्यिकांनी, विद्वान किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांनी त्याच्या लॅटिनच्या ज्ञानाविषयी, लॅटिन येते का अशी शंका व्यक्त केली होती. वरील माहिती- जरी त्याचे शिक्षण केंब्रिज आॅक्सफर्ड सारख्या ठिकाणी झाले नसले तरी सर्वसाधारणपणे व्हावे तितके नक्कीच झाले होते, हे त्यांच्या टीकेला उत्तर आहे.
शेक्सपिअरचे लग्न अॅन हॅथवे हिच्याशी १५८२ साली झाले. ॲन शेक्सपिअरपेक्षा आठ वर्षांनी मोठी होती. तिचे माहेर शाॅटरी हे गाव स्ट्रॅटफर्डपासून खूपच जवळ म्हणजे एका मैलावरच होते. शेक्सपिअरला तीन मुले होती. थोरली मुलगी. तिचे नाव सुझॅनSusanna. ही १५८३ साली जन्मली. दोन वर्षांनी एक जुळे झाले. त्यातल्या मुलीचे नाव ज्युडिथ आणि मुलाचे नाव होते हॅम्नेट. दोन्ही मुली दीर्घायुषी होत्या. थोरली सुझॅना वयाच्या सहासष्ठाव्या वर्षी वारली. धाकट्या ज्युडिथला
सत्त्याहत्तर वर्षाचे दीर्घायुष्य लाभले. पण तिचा संसार मात्र सुखाचा झाला नाही. शेक्सपिअरला त्याच्या नाटकांमुळे मान प्रसिद्धी आणि पैसाही मिळाला होता. गावात त्याच्या कुटुंबाला प्रतिष्ठा होती.पण ज्युडिथने गावातल्याच अगदी सामान्य माणसाशी लग्न केले होते. सामान्य असणे हा काही कुणाचा अपराध नाही पण तो चारित्र्यानेही अति सामान्याहूनही खाली होता. त्याला बायकांच्या बाबतीतच एक दोन वेळा पोलिस कोठडीची काही काळ हवाही खावी लागली होती. थोरल्या सुझानला एलिझाबेथ नावाची मुलगी होती. ती १६७० साला पर्यंत हयात होती. हिची दोन लग्ने झाली. तिला मूलबाळ नव्हते. ज्युडिथला तीन मुले होती. त्यापैकी दोन मुली होत्या. व एका मुलाचे नाव तिने शेक्सपिअर ठेवले होते. दुर्दैवाने तिची ही तिन्ही मुलं ज्युडिथच्या अगोदरच वारली ! बरे तिघांनाही एकही अपत्य नव्हते. शेक्सपिअरचा एकुलता एक मुलगा हॅम्नेट बिचारा वयाच्या अकराव्या वर्षीच वारला.शेक्सपिअरच्या दोन्ही मुलींचीही मुले वारली. त्यांची मुलेबाळेही फार जगली नाहीत. त्यानुळे शेक्सपिअरच्या मागे त्याच्या वंशातला कोणीही राहिला नाही !
शेक्सपिअरची आर्थिक स्थिती चांगली होती. ह्याचे एक कारण तो व्यवहारी होता.खार्चिक नव्हता.त्याच्या लंडनमधील वास्तव्यात त्याची कीर्ती झाली होती. तो नाटककार कवि म्हणून ओळखला जात होता. त्याच बरोबर नट, नाटक कंपनीत भागीदारही होता. नाटकांच्या चलतीचा काळ होता. लोकांनी आपल्या नाटकांना गर्दी करावी म्हणून नाटक कंपन्या जवळ जवळ रोज नविन नाटके रंगभूमीवर आणायचे. त्यासाठी कंपनीजवळ नाटकेही भरपूर हवी असत. जरी कंपन्यांचे आपापले नाटककार ठरलेले असत तरी त्यासाठी दोन तीन नाटककार हाताशी हवे असत. शेक्सपिअरने बेन जाॅन्सन व इतर लेखकांच्या नाटकातही कामे केली ह्याचे कारण ती सहकाऱ्याची नाटके असत.
कंपनीत नट,नाटककार आणि भागीदार ह्या तिहेरी भूमिकेतून त्याची प्राप्ति चांगली होती. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात शेक्सपिअरची श्रीमंतात गणना व्हावी इतका तो सधन झाला. त्या काळात दर्जेदार नाटककाराला एका नाटकाचे दहा पौड मिळत.पण त्याच्या इतकाच यशस्वी असलेल्या जाॅन बेन्सनसारख्या लेखकाला आयुष्यभरात त्याच्या सर्व नाटकांचे मिळून फार तर दोनशे पौड मिळाले असतील. शेक्सपिअरच्या चढत्या कमानीच्या दिवसात त्याचे वार्षिक उत्पन्न दोनशे पौडांपासून सातशे पौड असावे असे संशोधकांचा अंदाज आहे.
येव्हढे चांगले उत्पन्न आणि त्यातच शेक्सपिअरचा खर्च करण्यात हात फार आखडता होता. चिक्कू म्हटले तरी चालण्यासारखे आहे. पण पैशाची गुंतवणुक करण्यात तो हुषार होता. त्यामुळे त्याने आपल्या गावात स्वत:चे मोठे घर घेतले. दर वर्षी चांगले उत्पन्न मिळवून देणारी एक शेतजमीनही घेतली. शिवाय घरासमोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक लहानसा मोकळा प्लाॅटही घेऊन ठेवला होता.
शेक्सपिअरने आपल्या मृत्युपत्रात एका बहिणीला, दोन्ही मुलींना, मित्रांना, रोख रकमा दिल्या व एका बहिणीला घर दिले. हे बहुतेक सर्व लोक करतात तसे शेक्सपिअरनेही केले. पण त्यातही त्याने आपला हात आखडता घेण्याचे वैशिष्ठ्य दाखवलेच आहे. इतक्या वर्षाचे आपले दोन सहकारी आणि मित्र जे त्याच्याच कंपनीत नट होते व शेक्सपिअरसारखेच भागीदारही होते त्यांना ह्याने फक्त दोन दोन पौड दिले!
आपल्या मुलींना त्याने १५०, १५० पौड ठेवले. आजच्या पौडाच्या किमतीने ही रक्कम नक्कीच मोठी आहे.पण त्या व्यतिरिक्त काही दिले नाही. आपली बहिण जोनला त्याने वडलोपार्जित घर दिले पण ती हयात असेपर्यंतच व नाममात्र भाड्याने ते दिले. पण आपल्या बायकोला शेक्सपिअरने काय दिले ह्याबद्दल त्याच्यावर टीका होते.
त्या काळच्या कायद्याप्रमाणे तिला इस्टेटीचा एक तृतियांश वाटा मिळणार होताच. पण शेक्सपिअरने स्वत:हून आपल्या इच्छेने आपल्या बायकोला आणखी काय दिले? तर”दुसरा उत्तम पलंग !” हे तिला देण्याची आठवणही शेक्सपिअरला मृत्युपत्राच्या अखेरी अखेरीस झाल्याचे दिसते !
ज्याने प्रेम, प्रेमकविता, प्रियकर प्रेयसी, पतिपत्नीच्या प्रेमासंबंधी भरभरून लिहिले, रोमिओ ज्युलियेट यांच्या अमर प्रेमकहाणीचे जगप्रसिद्ध नाटक लिहिले त्या जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरला कायद्याने तिच्या हक्काचे जे मिळणार त्याव्यतिरिक्त आपणहून “ दुसऱ्या उत्तम पलंगा”शिवाय त्याच्या स्वत:च्या आवडीची किंवा तिला प्रिय असणारी एखादी वस्तु दागिना द्यावासा वाटला नाही? किंवा तिच्या मनातील आवडीच्या गोष्टीसाठी रोख रक्कम देऊ केली नाही? शेक्सपिअरच्या बऱ्याच तज्ञांनी ह्यासाठी शेक्सपिअरवर ठपका ठेवला आहे, त्यात काही वावगे नाही. पण दुसऱ्या काही संशोधकांना “दुसरा उत्तम पलंग” ही साधी किंवा हलक्या तऱ्हेची वस्तु वाटत नाही. सामाजिक पद्धतीप्रमाणे किंवा विचारसरणीनुसार ज्याला “Second Best Bed “ म्हटले जाते त्याला भावनिक महत्व आहे. रिवाज असा आहे की घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या खोलीतील पलंग हा सर्वात उत्तम असा असतो. ती खोलीही चांगल्या प्रतीच्या वस्तूंनी सजवली असते. स्वत:च्या खोलीतील पलंगही चांगलाच असतो. पण त्यात हलका,भारी, सुंदर ह्यापेक्षा लग्न झाल्यापासून तो पतिपत्नीचाच खास पलंग होतो. त्यावरच त्यांनी आपल्या संसाराच्या स्वप्नांचे, आयुष्याच्या सर्व सुख दु:खाचे,आनंदाचे,काळजीचे अशा सर्व भावनांचे दिवस अनुभवत संसार केला असतो. प्रपंचाच्या दिवसाची सुरवात आणि रात्रीच्या स्वप्नांचा प्रारंभ तिथेच झालेला असतो. त्यामुळे शेक्सपिअरने तसे मृत्युपत्रात व्यक्त केले त्यात गैर नाही. त्याने बायकोला दुर्लक्षित केले असे नाही, असे त्याची बाजू घेणाऱ्यांचे मत आहे. पण शेक्सपिअरवर ह्याबद्दल टीका करणाऱ्यांना ह्या युक्तिवादात तथ्य वाटत नाही. इतर अनेकजण असे करतात पण त्याचबरोबर बायकोला म्हणून आणखी काही विशेषही ठेवतात. भले ते नाटककार,कवि नसतीलही. शेक्सपिअरच्या मृत्युपत्रातील हे कलम चर्चेचे झाले होते म्हणून इतक्या विस्ताराने त्यावर लिहिले.
ह्यामागे खरे महत्वाचे कारण म्हणजे विल्यम शेक्सपिअर व्यक्ति,त्याचे त्याच्या बायकोशी संबंध कसे होते,तो माणूस म्हणून कसा होता ह्यावर प्रकाश टाकणारे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शेक्सपिअरवर चारशे वर्षे अभ्यास चालू आहे. आजही त्याची नाटके इतर वाड•मय व व्यक्ति शेक्सपिअर ह्यावर संशोधन विचार विमर्ष होतच आहे. इतक्या वर्षांच्या ह्या काळात शेक्सपिअरचा उल्लेख असलेली शंभर एक कागदपत्रे मिळतात. पण ती बहुतेक सरकारी कचेऱ्यातील नोंदी, शेक्सपिअरवर कर भरणा केला नाही त्याच्या नोटीसा, खरेदी-विक्रीच्या व्यवहारिक नोंदी, कर भरल्याच्या पावत्या हीच जास्त आहेत. ह्यावरून शेक्सपिअरचे व्यवहार समजतील पण तो नवरा, वडील, मित्र, शेजारी म्हणून कसा होता, त्याच्या आठवणी अशी काहीही माहिती आजही कुठे मिळत नाही. त्याच्या नाटकातील काही संवाद, प्रसंग ह्यावरून त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यातूनही आपल्याला शेक्सपिअरची माणूस ही ओळख होत नाही.नाही म्हणायला त्याचा अवघ्या अकरा वर्षाचा मुलगा हॅम्नेट गेल्याचे दु:ख, त्या दु:खाचे हुंदके त्याने त्याच वर्षी लिहिलेल्या King John नाटकातील आईच्या हृदयस्पर्शी, काव्यमय स्वगतातून उमटलेले जाणवतात. नाटकातली आई काॅन्स्टन्स आपल्या मेलेल्या राजपुत्राच्या दु:खाने व्याकुळ होऊन खोलीतल्या प्रत्येक
वस्तूतून तो तिला डोळ्यांसमोर दिसतो ते करुणरम्य स्वगत वाचण्या-ऐकण्यासारखे आहे:ते वाचताना कवि गोविंदाग्रजांची (राम गणेश गडकरी) अतिशय शोकविव्हळ करणारी राजहंस माझा निजला ह्या कवितेची, तिच्यातील आईच्या दु:खाची आठवण येईल.
त्या स्वगतातील काही भाग उदघृत करतो:-
Grief fills the room of my absent child,
Lies in his bed, walks up and down with me,
Puts on his pretty looks, repeats his words,
Remembers me of all his gracious parts,
Stuffs out his vacant garments with his form…..
शेक्सपिअरच्या कंपनीतले त्याचे दोन सह भागीदार व सहकारी नट आणि मित्र जाॅन हेमिंग्स ( John Hemminges )आणि हेनरी काॅन्डेल यांनी शेक्सपिअरच्या मृत्युनंतर त्याच्या अठरा नाटकांचा एक संग्रह प्रसिद्ध केला. त्या दोघांच्या चिकाटी आणि मेहनतीमुळे आपल्याला शेक्सपिअरची नाटके छापील स्वरुपात पाहायला मिळतात. हे दोघेही शेक्सपिअरच्या अखेरपर्यंत त्याच्या कंपनीत होते. त्यामुळे प्रयोगासाठी केलेली टिपणे, शेक्सपिअरच्या नाटकांची हस्तलिखिते, प्राॅम्पटरच्या (पार्श्वपाठक) वह्या, नटांना दिलेले त्यांचे संवाद, व ह्यापूर्वी त्याच्या नाटकांची छापलेली पण भरमसाठ चुका असलेली पुस्तके, त्या प्रति शुद्ध करून दोघांनी केलेल्या छपाईला द्यायच्या प्रति असे अनेक सोपस्कार पार पाडून त्या दोघांनी शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह First Folio ह्या नावाने ओळखला जाणारा संग्रह प्रसिद्ध केला. या संग्रहाचे चांगले स्वागत झाले असावे. बऱ्याच वर्षानंतर का होईना त्या संग्रहाची दुसरी आवृत्ती १६३२ साली प्रसिद्ध झाली. पण तिसरी आणि चवथी आवृत्ती प्रकाशित व्हायला १६६३ व १६८५ साल उजडावे लागले!
पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या दोघांनी जमवलेल्या वर लिहिलेल्या शेकस्पिअरच्या हस्ताक्षरातील सर्व लिखाण आणि इतर सामग्रीही ह्यापैकी आज काहीही उपलब्ध नाही. तसेच आतापर्यंत सांगितलेल्या शेक्सपिअरच्या सहा सह्याशिवाय त्याच्या हस्ताक्षरातील काहीही उपलब्ध नाही.तसेच त्याच्या वाचनात असलेली लंडन व स्ट्रॅटफर्डच्या घरातली पुस्तके, त्यांनी नाटकाचे लिहिलेले कच्चे आराखडे,टिपणे इतर कविता वगैरे लिखाण, पत्रव्यवहार, किंवा त्याच्या मालमत्तेची सविस्तर यादी, अशी ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे साहित्य जतन करण्यासाठी त्याच्या मृत्युनंतर लंडनला पाठवले असणार. पण १६६६ सालच्या लंडनमधील प्रचंड आगीच्या तांडवात ती सर्व जळून खाक झाली असावीत असे म्हटले जाते.
त्याच्या गावातील पुतळा आणि त्याची म्हणून ओळखली जाणारी तीन चित्रे ह्यावरून शेक्सपिअर ह्या जगप्रसिद्ध आणि प्रतिभाशाली नाटककाराची माहिती होते. आजही त्याच्या नाटकांच्या होणाऱ्या प्रयोगामुळे सर्व जग शेक्सपिअरला ओळखते. सर्व जग शेक्सपिअरला ओळखते पण माणूस शेक्सपिअर कसा होता हे कुणालाच माहित नाही. शेक्सपिअर तसा अज्ञातच आहे !