पुणे
घ्या आता! कैरीची चटणीही पाककृति झाली! कशाला केव्हा महत्व येईल ते सांगता येत नाही. कैरीचीच का कोणतीही चटणी कुणालाही करता येते. त्यासाठी साहित्य, कृति, लागणारा वेळ, त्यातल्या वजनमापांचा पसारा आणि घोळ आणि येव्हढ्या साहित्यात किती जण खातील ( आणि ती खाल्ल्या नंतर ICU मध्येच भेटतील), हासगळा प्रपंच करायला कुणी सांगितलं होतं ह्यांना किंवा हिला? अरे, रोज कोण गावजेवण घालतंय काय इथं? आं?
सगळी कथा सांगून झाल्यावर वर पुन्हा ओलं खोबरं आवडत नसेल तर साधे म्हणजे नेहमीचे म्हणजे वाळलेले म्हणजेच सुके खोबरेही चालेल इतके खुलासेवार सांगतात. साखरे ऐवजी गूळ सुद्धा हरकत नाही. तो नसलातर खांडसरी साखर आणि तीही नसली तर खडी साखर घ्यावी. पण देवळात देतात ती डिझायईनर्स खडीसाखर नको; म्हणजेच जाड मोरस साखरे सारख्या दिसणाऱ्या, अंगठीतल्या चौकोनी खड्यासारखी दिसणारी नको तर साधारणत: मिरवणुकीत,मोर्च्यावर, किंवा मैत्रीपूर्ण लढतीत दगडफेक करण्यासाठीही वापरता येतील असे खडे गोटे असणारी खडी साखर घ्यावी. पण तो खडा एकदम दण्णकन चटणीत काय कोणत्याच पाककृतीत टाकू नये. तो घरात खलबत्ता असल्यास व तो कशाला म्हणतात ते माहित असल्यास त्या खलबत्त्यात कुटून मग घालावी. मिक्सरमधूनही फोडता येते पण साधारणत: त्यासाठी चारपाच शेजारणींचे मिक्सर अगोदरच मागून घ्यावेत. चालेल त्यांनी नाके मुरडली तरी. कारण ते चारपाच मिक्सर त्या खडासाखरेने एकदम ‘खडाSSर्डम स्टाप् ‘ करत तोडून मोडून फोडले तरी आपला मिक्सर सुरक्षित राहतो हे न विसरता त्यांच्या नाक मुरडण्याकडे निगरगट्टपणे दुर्लक्ष करावे. व निगरगट्टपणा तुम्हाला काही बाहेरून आणावा लागत नाही. तो तुमच्याकडे जन्मजातच असतो. म्हणूनच तुम्ही त्यांना “ Sorry हं “हे किती गोड अभिनय करून म्हणायचे त्याचा सराव करायला सुरवात करा.(इंग्रजी किSSत्ती कि्त्ती उपयोगी आहेनां?) तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्याही चालतील. पण त्या लवंगी असल्या तर बेतानेच घ्या. मध्यम तिखट असतील तर मध्यम संख्येनेच(?) घ्या! अगदीच आळणी असतील तर मुठी दोन मुठी घ्याव्यात.परवा एकीने तिखटाच्या गोड मिरच्या किती घ्याव्यात असे त्या पाककर्तीला विचारले होते!!
तसेच हे तिखट, हिरव्या मिरच्या आवडत नसतील त्यांनी तांबड्या मिरच्या वापरायलाही हरकत नाही अशी सवलतही दिली जाते. पण पुन्हा त्या शक्यतो बेडगीच्या किंवा नंदुरबार-दोंडाईचे इथल्या असाव्यात अशा प्रेमळ दमबाजीच्या अटी असतातच. आणि त्या नसतील तर मग मेक्सिकन वापरायची स्वदेशी परवानगीही दिली जाते. पण कदापी ढब्बू मिरची घेऊ नये. कारण चटणीचा उद्देशच नाहीसा होतो, हेही सांगतात.
ह्या पर्यायांमध्ये तेलाची तर फार मोठी भूमिका असते. आता आता तेलाचे दोन तीनच प्रकार होते. खायचे आणि दिव्याचे. ऐपतदार असेल तर डोक्याला लावायचे. इतक्या तेलांत पिढ्या न् पिढ्या जात असत, जगत असत. आता अपरिहार्य आहे म्हणून अनेक प्रकार आले हे खरे. पण पाकृतीत हे बहुतेक सगळे दिले जातात. शुद्धिकरण केलेले, घाण्याचे पण त्यातही पुन्हा बैलाच्या घाण्याचे. त्यातील व्याकरण किंवा गणित जाणणारे पुन्हा “बैलाचे व लाकडी घाण्याचेच” वापरावे असे पर्याय कटाक्षाने देतात. त्यापाठोपाठ नेहमीचे शेंगदाण्याचे, हृदयविकाराच्या खवय्यांसाठी करडीच्या तेलाचा पर्याय हरकत नाही अशी परवानगी दिली जाते. आता संपर्क, सहवास वाढल्यामुळे सरसों का तेल, शुद्ध नारळाचे तेल अशी अखिल भारतीय तेलेही सुचवली जातात. तीही कर्नाटकी कडबूच्या किंवा उकडीच्या मोदकांच्या पाककृतीत! मोहरीच्या( सरसोंका तेल) तेलातील पुरणाचे कडबू किंवा उकडीचे मोदक ही किती चित्तथरारक पाककृती असेल ह्या कल्पनेनेच भीतीचा काटा उभाराहतो! एका नव प्रायोगिक पाककर्तीने शेवयाच्या खिरीला सरसों की तेलातील लसणाची फोडणी सुचवली होती. व नेहमीच्या हिंगा एैवजी हिरा हिंगच घ्यावा पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगितले होते. नंतर बातमी आली होती की ही कृति तिने तिच्या “सास भी बहुत खाती थी“ ह्या सिरियल मधील सासूला खाऊ घातली होती ! सिरियल बंद पडलीच पण ही पाककृति सध्या तुफान व्हायरल झाली आहे.
हे झाले साखर-गुळ, तिखट-हिरव्या मिरच्या, तेले या द्वंद्व समासांचे. असेच त्यातील प्रत्येक घटकाला म्हणजे शेंगदाण्यांऐवजी तीळ, कारळांऐवजी जवसही, चिंचेऐवजी आवडत असेल तर आमसूल आणि पुढे पुढे तर ह्याच चालीवर गोड पाककृतीत, काळ्या मनुका ऐवजी बेदाणे त्याऐवजी खिसमिसही चालेल, खसखस नसेल तर राजगिरा, जायफळ नसेल तर जर्दाळू (आतल्या बीया सकट?), बदाम नसतील तर शेंगादाणे ; हाच पर्याय काजूसाठीही असतो. बडिशेपे ऐवजी जिरे, बरं ते नसतील तर शहाजिरे, विड्याची पाने नसतील तर वडाचीही चालतील, खारिक नसेल तर खजूर, सुके अंजीर नसतील तर वांगीही(!) पण ती चांगली जांभळी बघून व जमल्यास वाळवून घ्यावीत( मग पदार्थ केव्हा करायचा होSs!) हे माना वेळावत किंवा तो डोक्यावरची मापाची नसलेली पांढरी ‘जिरेटोपी’ हलवत सुचवतात. परवा तर मक्याच्या चिवड्याच्या पाककृतीत मक्याचे पोहे नसतील तर अंड्याची टरफले घ्यायला हरकत नाही असे म्हटले. पण त्याच बरोबर ती टरफले गावरानी कोंबडीच्या अंड्याची असावीत किंवा ती नसतील तर बदकांची किंवा बदामी रंगाच्या अंड्याची घ्यावीत असे सुचवले होते! शाकाहाऱ्यांसाठी, शाकाहारी अंड्याची टरफले हे ओघाने आलेच.
अरे, आम्हाला काय पाहिजे असेल ते आमचे आम्हाला नीट सुखाने चार घास खाऊ द्या की रे बाबांनो!
बरं,पण त्या कैरीच्या चटणीचे काय झाले?