चुनाभट्टी /शीव
आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत किंवा धान्यही भरून ठेवत नाहीत.एप्रिल लागणार म्हटले किंवा पाडवा झाल्यावर वर्षाचा गहू, ज्वारी आणण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यामघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, तो सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळत असेल.किंवा अकोल्याला काली मूंछ तांदूळ मिळतही असेल. तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.
प्रपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत. गव्हा-ज्वारीची शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं,अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा.
त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेत पाळले जात होते.
उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपला अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकतफिरायचे. प्रत्येकाचे रुमाल बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे बाळा जो जो रे, स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी, चिमणी पाखरं,माहेरची साडी हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे “शोककारी दु:खकारी” होऊन पाचकिलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत. त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल, आणली मड्डम अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छल्लम छ्ल्लम नको, किंचित कुरळ्या, खळ पडलेल्या गालांची, काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घे ”म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.
जसे वर्षाचे धान्य डाळी तिखट मीठ भरणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!
हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!