वारीला पुन्हा एकदा जायचे असे गेली दहा वर्षे म्हणत असतो. पण जमत नाही. तशी मागच्या दोन तीन वर्षात एक-दोन तुकड्या तुकड्यांच्या वाऱ्या झाल्या तेव्हढ्याच.
काल पुण्यात पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा देवळात ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज मुक्कामाला होते. निदान त्याच्या पादुकांचे तरी दर्शन घ्यावे म्हणून जुन्या पु्ण्यात गेलो.
बस मधून जातानांच वारकरी दिसत होते. काही बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसलेले. तर दुकानांच्या समोरील मोकळ्या जागेत जशी जागा मिळेल तिथे अनेकजण दाटीवाटीने आरामात होते. पुण्याच्या मुक्कामात घेऊ असे ठरवून आलेले वारकरी घोळक्याने चालले होते.
प्लास्टिकची इरली, चपला, बूट,बांगड्या,कानातले डूल, माळा,करदोडे, गोफ, नाड्या, टोप्या, सदरे,कपडे, खजूर राजगिऱ्याचे लाडू, वड्या, आलेपाक,डाळे चुरमुरे, माळा, टाळ, फुगे,खेळणी, आणि काय काय आणि किती सांगावे! इतकेच काय शहरात कधी रस्त्यावर न दिसणारी न्हावी मंडळीही आपल्या आयुधानिशी वारकऱ्यांना टवटवीत करीत होती, ह्या गडबडीतच लोकांनी पादुकांच्या दर्शनासाठी लावलेल्या रांगा वळणे घेत वाढतच होत्या.ही रांग इथे संपली म्हणून उभा राहिलो तर “माऊली मागं मागं” ऐकत ऐकत मी मागे जाऊ लागलो तर माझ्या मागचे हे “मागे मागेचे”पालुपद संपेचना! मी जिथून निघालो होतो त्या बस स्टाॅपपाशीच परत आलो!
अनुभवी लोकांनी ह्याचे कारण सांगितले. आदल्या रात्री जोरदार पाऊस झाला होता. तेव्हा पालख्व्या गावात आल्या आल्या दर्शनाला येणारी ती सगळी गर्दी आज आली होती. दिंड्यांबरोबरच आता जवळपासच्या उपनगरातून वारीला जाणारे हजारो वारकरीही येतच होते.
टाळ मृदुंगाचे दणदणीतआवाज नव्हते. पण आपल्या वाद्यांची वारकरी देखभाल करत होते. टाळांचा आवाज मधून मधून यायचा. मृदुंगावर बोटेही अधून मधून टण टण् उमटत होती. हे सर्व बेतानेच चालले होते.पण कोपऱ्या कोपऱ्या वरची तरुण युवा मंडळं लाऊडस्पीकरवरून भाविकांचे स्वागत करत होते. काही तरुण मंडळी भक्तांना वारकरी बंधू-भगिनींना प्रसाद घेण्याचा आग्रह करत होते. त्या जोडीनेच “रांगेने या, रांगेने या असे ओरडतही होते.
गंध लावणारे तर बरेच म्हणजे बरेच होते. मलाच तीन चार वेळातरी गंधखुणांचे शिक्के लावून घ्यायला लागले! डोक्यावर काॅऊंटी कॅप आणि कपाळावर हे वारीचे रजिस्टर्ड पोष्टाच्या गंधाचे शिक्के! बरेच जण येता जाता माझ्याकडे “ काय सुंदर त्ये ध्येनं” पुटपुटत बघत जात. बरं ते पुसण्याची सोय नाही. कपाळ रिकामे दिसले की ती
‘U-ट्युब’ उमटलीच भाळी!मी भाविक झालो तरी चिल्लर-मोड किती बाळगणार!
वारीला जायला मिळणार नाही हे नक्की असले तरी जुन्या पुण्यात निवडुंग्या विठोबा आणि पालखी/ पासोड्या विठोबाच्या राज्यात आल्यावर वारीच्या कपडेपटात,रंगपटात, ग्रीनरुममध्ये आल्यासारखे वाटत होते. नाही वारी तरी,तीन चार तास वारीच्या प्रत्यक्ष प्रयोगाची संपूर्ण रंगीत तालीम जुन्या पुण्याच्या भव्य स्टेजवर पाहिल्याचे समाधान मिळाले.
ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि तुकोबारायाच्या दोन्ही पादुकांचे दर्शन काही झाले नाही. पंढरपुरला जाऊनही लाखो वारकरी कळसालाच हात जोडून परत येतात तसे बाहेर ठेवलेल्या रिकाम्या पालख्यांनाच हात लावून रिकाम्या हाताने परत निघालो. मंडईत दगडूशेठ-दत्ताच्या देवळाच्या बाजूला लहान मोठी हलवायांची दुकानं आहेत.जिलबीचे ‘खंबीर’ (भिजवलेले तयार पीठ-Readymix),चहा,मिठाई मिळणाऱ्या दुकानात बसलो.@एक प्लेट गरम जिलबी खाल्ली. मस्त आणि स्वस्तही. चहासुद्धा प्यालो. तोही अप्रतिम! लक्ष्मीरोडवर गेलो.तिथे वारकऱ्यांप्रमाणे मीही खरेदी करु लागलो.
शनिपारावर बस पकडली. कारण बाजीराव रोडचा काही भाग आणि मंडईकडे येणारे रस्ते तुडुंब रहदारीमुळे वाहनांसाठी बंद केले होते काही वेळ. बसेस येत नव्हत्या. डेक्कनवर आलो आणि कोथरुड डेपोची बस पकडून घरी आलो. बराच वेळ गेला होता.पादुकांच्या दर्शनला जाऊन आल्याच्या गंधाच्या खुणा पुसट झाल्या होत्या. त्यामुळे माझ्याकडे संशयास्पद भाविक म्हणूनही कुणी पाहिले नाही.
आषाढी वारी संपतच आली. आणि मी वारीच्या सुरवातीच्या दिवसाच्या फेरफटक्याचे वर्णन अगदी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ च्या थाटात लिहितोय!