बेलमाॅन्ट
संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, एकनाथ तुकाराम ही नावे त्यांची चरित्रकथा, त्यांच्या जीवनातील काही घटना कुणाला माहित नाहीत? बहुतेकांना माहित आहेत. पण बरीच संत मंडळी अशी आहेत की त्यापैकी काहींची आपणास नावे किंवा प्रसंग घटना बहुतेकांना माहित नसण्याची शक्यता आहे. तर अशा काही संतांच्या मांदियाळीतील, गर्दीतील काही संतांच्या गोष्टी आपण ऐकू या. अशा गर्दीतल्या किती संतांविषयी सांगणे मला जमेल ते मला आज सांगता येणार नाही. पण सुरुवात तरी करायला काय हरकत आहे? खरंय की नाही?
आपले बहुतेक सर्व मराठी संत हे विठ्ठलाचे भक्त आहेत. वारकरी पंथाचे म्हणजेच भागवत आहेत. पण असाही एक भक्त पंढरपुरातच,तेही संत नामदेवांच्या काळातच,होऊन गेला ; तो रुक्मिणीचा भक्त होता. त्याचे नाव भागवत होते पण तो परिसा भागवत म्हणूनच ओळखला जातो.
भागवत रुक्मिणी देवीचा मोठा एकनिष्ठ भक्त होता. रोज पांडुरंगाच्या देवळात जाऊन तेथील देवी रुक्मिणीची तो मनापासून पूजाअर्चा करीत असे. त्यानंतर ध्यानस्थ होऊन तिचेच तो ध्यानचिंतन करत बसे. मग भजन करून नैवेद्य दाखवून घरी येई. घरी आले की संसारप्रपंचातील रोजचे व्यवहार चालू होत असत. भागवत मनापासून दिवसभर ‘उठता बसता खाता पिता’ रुक्मिणी मातेचे स्मरण करण्याचा प्रयत्न करत असे. ते चालूही असेल पण प्रपंचाच्या रहाटगाडग्यात अडकल्याने ते एकचित्ताने होत नाही ह्याची त्याला जाणीव होती. म्हणून तो मनात खंत करीत असे.
असाच एकदा भागवत रुक्मिणीपुढे तल्लीन होऊन ध्यानस्मरण करत बसला असता रुक्मिणीने त्याला दर्शन देऊन त्याच्यबावर कृपा केली. इथेच न थांबता ती भागवताला म्हणाली, “ भागवता बाळा तुझी काही इच्छा असेल तर सांग. आपल्याला आई रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन झाले ह्या परमानंदात असलेला भक्त भागवत म्हणाला,”आई! तुझी भक्ति अखंडित करता यावी ह्या शिवाय माझं तुझ्यापाशी दुसरे काय मागणे असणार? “ रुक्मिणीने ते ऐकून घेतले. पण भक्ताच्या मनातले त्याच्या दैवताशिवाय कोण चांगले जाणू शकते? शिवाय रुक्मिणीकांत पांडुरंगापेक्षा जगाचे व्यवहार कशावर चालतात ह्याचे तिला पूर्ण ज्ञान होते. तिथल्या वास्तवाची तिला चांगली माहिती होती. तिने भागवताला एक परिस दिला. “ आता तुझ्या भक्तीआराधनेत, भजन-पूजनात व्यत्यय नाही ना येणार?असे हसत हसत म्हणाली.
आई रुक्मिणीने आपल्याला प्रत्यक्ष दर्शन दिले ह्या परमानंदात असलेल्या भागवताला देवीने परीसही दिला ह्याचा व्यावहारिक आनंदही दुप्पट झाला!
भागवताने घरी आल्यावर हर्षभरित होऊन देवळात घडलेली हकीकत आपली बायको कमळजेला सांगितली. परिस दाखवला.एका सुईला तो लावून तिचे सोने झाल्याचे पाहून दोघांचाही आनंद पोटात मावेना! भागवत निष्ठावान भक्त होता तरी त्याचे पाय जमिनीवर होते. तो बायकोला आणि स्वत:लाही सावध करत म्हणाला,”आपल्या जवळ परिस आहे हे कुणालाही कळता कामा नये. कुणापाशीही बोलू नकोस. आपण पंढरपुरी राहतो आहोत हे विसरु नकोस. इथे आणि आसपास संतसज्जनांची वस्ती आहे. त्यांना जर समजले की भागवताने रखुमाईला मागून काय मागितले तर परिस! बरं मी न मागता देवीने दिला म्हटले तरी देवी रखुमाईने सुद्धा देऊन दिले काय तर परिस! असे ते माझ्या आईलाही बोल लावतील. त्यापेक्षा गरीबासारखे गप्प बसलेले किती बरे! “
भागवताचा दिनक्रम चालू होता. नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहाने जास्त निश्चिंततेने चालला होता.त्याने परिस एकदम पहारीला लावला नाही. टाचणीलाच लावला. बाहेर वावरताना भागवताचा वेष पूर्वीचाच पण मुद्रा जरा दीनवाणी आणि वागण्यातील वृत्तीही उदास दिसू लागली. घरात सुग्रास जेवण पण बाहेर आपण कदान्न खातो असा चेहरा घेऊन वावर. तरीही, घरात रोज चांगले चुंगले, गोडा धोडाचे, दुधा तुपाचे भोजन होत असे. त्याची देहावर येणारी कांती कशी लपवली जाईल! तरी अनेक पंढरपुरकर त्या कांतीला भक्तीचे तेज मानीत. तेही खरे असणार. पण चांगल्या अन्नाचाही तो परिणाम असणारच.
भागवत हा विरक्ती दाखवत होता. काही प्रमाणात त्याच्या भक्तीचे ते फळ असेलही. पण समाजातले सज्ञान परीक्षक जन होते त्यांना भागवताला काही तरी घबाड लाभले असावे हे त्यांना जाणवत होते. जसे वक्त्याला श्रोत्यांच्या चेहऱ्यावरून आपले व्याख्यान त्यांना समजले, आवडले का ते कंटाळवाणे रटाळ होतेय हे लक्षात येते; दिव्यात तेल आणि वात आहे का नाही हे प्रकाशच सांगतो तसे चतुर, जाणत्या जनांना भागवताची विरक्ति, उदासीन वृत्ती खरी नाही असे वाटत होते.
भागवताची बायको नेहमी प्रमाणे एकदा चंद्रभागेवरून पाणी घेऊन निघाली असता तिला संत नामदेवाची पत्नी राजाई भेटली. कमळजाला पाहताच राजाई म्हणाली,” ही मी आलेच घागर भरून. मी येईतो थांब.दोघी मिळून जाऊ.” राजाई पाणी घेऊन आली. दोघी चालू लागल्या. बोलू लागल्या. मध्येच थांबायच्या. राजाईचे लुगडे साधेच. तसेच खाणेपिणेही बेताचेच. ती रोड झाली होती.अशक्त दिसत होती. राजाईकडे निरखून पाहात कमळजा म्हणाली,” राजाई कसं चाललंय तुझं? बरं आहे ना?खरं सांग. शेजारीण मैत्रिणीपाशी काही लपवायला नको. लपतही नाही.” “अगं लपवायचं काय आहे? सांगण्यासारखं वेगळं काही नाही. आमचे हे पांडुरंगाच्या भजनभक्तीतच रंगलेले. त्यातच गुंगलेले. धंदा व्यवसायाकडे पाहिजे तेव्हढे लक्ष नाही. चाललंय आमचं रुटुखुटू!”नामदेवाची राजाई म्हणाली तशी कमळजा जरा उत्साहानेच सांगू लागली,” “ ह्यांनी रुक्मिणीची भक्ति केली. आमचं बरे चाललेय बघ.”दोघी पुढे निघाल्या. चालता चालता कमळजा सांगू लागली,” अगं भावजींना म्हणावे ज्या झाडाला ना फूल ना फळ लागत नाही त्याला पाणी घालून व्यर्थ का शिणावे? विहिरीसी न लागता जीवन। व्यर्थच उकरायाचा शीण। तेवी प्रसन्न न होता रुक्मिणीरमण। कासया करावे आराधन।। अगं जो सोयरा लग्नमुंजीतही आहेर देत नाही त्याला कोणी कधी बोलावते का? पंढरीनाथाचे इतके भजन करूनही जो आपल्या भक्ताची साधी रोजची पोटापाण्याची चिंता सोडवत नाही त्याची भक्ती का करावी? ती काय कामाची? “इतके कमळजा राजाईला बोलली तरी तिला राजाईबद्दल प्रेम होते.,कमळजाचे घर आले. ती राजाईला म्हणाली, “आत ये, जरा थांब.” कमळजा आत जाऊन परिस घेऊन आली. “माझ्या नवऱ्याने रखुमाईची अनन्यभावाने भक्ती केली. ती माऊली प्रसन्न झाली. तिने आम्हाला हा परिस दिला”हा परिस घे. तुझी गरज भागव. लागलीच मला परत आणून दे. काहीही झाले तरी परिस मला द्यायला विसरू नकोस. माझी तुला विनवणी आहे ही. येव्हढे चुकवु नकोस. आपल्या दोघींच्याही नवऱ्यांना यातले काही समजू न देता सगळे लवकरझाले पाहिजे. कसेही कर पण परिस आणून दे.”
राजाई हरखून गेली होती. घरी आली. घरातल्या सुया कातऱ्या किल्ल्याना परिस लावून सोन्याच्या केल्या. त्यातलेच किडुक मिडुक सोनं घेऊन सोनाराकडे गेली. सोने देऊन द्रव्य घेतले. राजाई, गोणाई, कमळजा काय सर्व बायकाच. राजाई पहिल्यांदा वाण्याकडे गेली. संसाराला लागणारे धान्यधुन्य. पिठ मिठ, तेल तिखट, गूळ पोहे, खारिक खोबरे, हिंग जिरे खडीसाखर बत्तासे सर्व काही घेतले.
नामदेवासाठी धोतर अंगरखा, मोठे पागोटे; मुलांसाठी कापड चोपड, जनीसाठी लुगडे खण आणि सर्वात शेवटी स्वत:साठी अगदी बेताची जरीच्या काठा पदराचे साधेच लुगडे आणि खण घेऊन घरी आली. चारी ठाव स्वैपाक केला. भांडी कुंडी रचून मांडणीवर ठेवली. केरवारे आटपुन नवे लुगडे नेसून नामदेवाची वाट पाहू लागली.
दोन प्रहरी नामदेव आले. जेवायला बसण्यापूर्वी स्वैपाक, धान्य,गूळ खारका खोबऱ्यांनी भरलेले डबे वगैरे पाहून आणि सर्व नवऱ्यांप्रमाणे सगळ्यात शेवटी राजाई आणि तिच्या नव्या लुगड्याकडे पाहून त्यानी विचारले,” ही सगळी इतकी सामुग्री कशी आली घरात?” राजाई काही बोलेना ना काही सांगेना. मग इकडून तिकडे वळणे घेत बोलू लागली. नामदेव म्हणाले,” खरे काय ते स्पष्ट सांग.नाहीतर मी जेवणार नाही.” राजाई रडवा चेहरा करून रुक्मिणीने आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन भागवताला परिस दिला. कमळजाने मैत्रिण म्हणून आपल्याला गरज भागवण्यापुरता तो दिला.कुणालाही, तुम्हालाही आणि भागवतभाऊंनाही ह्यातले काही कळू न देता झाले पाहिजे अशी सर्व हकीकत सुगतवार सांगितली. हे इतके सांगूनही फारसे बिघडणार नव्हते. पण आधीच रडवेला झालेला चेहरा आता केव्हाही रडू कोसळेस असा होतसा ती नामदेवाला म्णाली,”तुम्ही विठ्ठलाची लहानपणापासून इतकी भक्ती करता; त्याचे दिवसरात्र भजन कीर्तन करता पण घरात खायला ल्यायला पुरेसे नसते; मग त्या पांडुरंगाची भक्ती काय कामाची? असे तिने जेव्हा विचारले तेव्हा सगळे गाडे बिघडले आणि घसरले!
नामदेव शांत खरे पण आता थोडे रागानेच उत्तरले,” विठा नारायणाची आई,आपल्याला विठ्ठलाची भक्ती पुरेशी आहे. त्याची भक्ती करता येणे,करणे हीच त्याची आपल्यावर कृपा आहे.ही असली किमया काय कामाची? मला तो परिस बघू दे.”राजाईने भीत भीत तो परिस नामदेवा हाती सोपवला. नामदेव तसाच उठला आणि चंद्रभागेकडे निघाला. तिथे जाऊन त्याने तो परिस नदीत भिरकावून दिला!
नामदेवाच्या मागोमाग राजाई रडत ओरडत,” अहो तो परिस मला कमळजेला दिला पाहिजे. मला द्या तो. नाहीतर तिला शिक्षा भोगायला लागेल. माझ्यामुळे कमळजेला किती त्रास भोगायला लागेल हो! अशी रडत भेकत विनवणी करीत चालली होती.पण नामदेव पार पुढे गेले होते.
नदीकाठी नामदेव पांडुरंगापुढे आपल्याला दोष देत बसले होते. नामदेवांच्या लहानपणापासूनच्या सवयीप्रमाणे आताही ते विठ्ठलाशी बोलत होते. “पांडुरंगा !विठ्ठला,मायबापा!अरे तू मला ह्या मोहा्च्या उपाधीत कसे पाडलेस रे! राजाई झाली तरी ती म्हणजे मीच ना? आम्ही दोघे वेगळे नाहीत पांडुरंगा.तिला मोह झाला असे कसे म्हणू विठ्ठला ! पाणी आणि त्यावरच्या लाटा वेगळ्या असतात का? सूर्य, प्रकाश,आणि किरणे ही वेगळी कशी विठ्ठला? मोह मलाच झाला. ह्या उपाधीत मीच सापडलो ह्यातून मला बाहेर काढ.” असे म्हणत ्सताना तो येई हो विठ्ठले माझे माऊली ये असा धावा करत, उन्हाची तिरिप चुकवण्यासाठी, ‘निढळावरती ठेवूनी कर’, ‘झळकतो का गगनी पितांबर’ हे मोठ्या आशेने पाहू लागला. नामदेवाचे पांडुरंगाशी संभाषण चालू होते.
कमळजेच्या घरी दुसरेच रामायण घडत होते. परिसा भागवतही घरी आला होता. आल्यावर देवपूजेला बसला. अलिकडे लागलेल्या सवयीमुळे देव संबळीतून काढताना त्याला आपला’प्राण’परीस हाताला लागला नाही; डोळ्यांना दिसला नाही.”बाहेर काढला होता का? कशासाठी काढला? कुठे ठेवला?” असे एकापाठोपाठ एक प्रश्न कमळजेला विचारू लागला.कमळजा गोंधळली.पण अखेर तिने आपण तो परिस नामदेवाच्या राजाईला दिला. ती आता लगेच येईलच. आणून देईल.असेसांगितले. ते ऐकून परिसा भागवत कमळजेवर चिडूनम्हणू लागले ,”अगं तो परिस आहे परिस! चिलिम पेटवायची गारगोटी नाही ती. काय समजलीस? रोज चूल पेटती ठेवून गोड खाऊ घालणारी अन्नपूर्णाआहे ती? , “माझे आई! ती राजाई येण्याची वाट पहात बसणार का? तूच ताबडतोब जा आणि घेऊन ये आपला परिस.”
कमळजा धावत पळत राजाईकडे आली. राजाई रडत असलेली पाहून तिच्यापोटात धस्स झाले. राजाईला तिने का रडतेस असे विचारल्यावर तिने नामदेव परिस घेऊन चंद्रभागे तीरी गेला असे म्हटल्यावर कमळजाही छाती पिटीत रडू लागली.
दोघीही रडत रडत नदीकडे निघाल्या. दोन भक्तांच्या बायका रडत भेकत निघाल्या हे पाहून आजूबाजूचे, शेजारी पाजारीसगळे त्यांच्या मागू नदीकडे निघाले. हा हां म्हणता “ परिसा भागवताचा परिस नामदेव घेऊन नदीकडे गेलाय!” नामदेवाने परिसा भागवताचा परिस हाडपला!” “नामदेव परिस कमरेला बाधून चंद्रभागेवर भजन करतोय.” ह्याच्याही पुढे “नामदेव भागवताचा परिस घेऊन पंढरपुरांतून पळून गेला!” अशा नाना तऱ्हेच्या बातम्या अफवा पसरल्या.हे ऐकून परिसा भागवतही लगोलग चंद्रभागेच्या तीरी आला.
काठावर नामदेव शांतपणे विठ्ठल भावात दंग होऊन बसले होते. त्यांना पाहिल्या बरोबर नामदेवाकडे बोट रोखून, मधून लोकांकडे पाहात भागवत म्हणाला,” नामदेवा! हे बरे नाही केलेस.माझा परिस चोरून घेतोस आणि इथे येऊन विठ्ठल भक्ती करतोस.अरे बगळाही इतक्या ढोंगीपणाने ध्यान करणार नाही. मुकाट्याने माझा परिस मला दे.” पहिल्यांदा नामदेव काहीच बोलला नाही. पण रीतीप्रमाणे लोक आपल्याला वाटते ते बोलू लागली.
काही जण,” बघा बघा! संत म्हणवणारे कसे भोंदू असतात !त्या परिसा भागवताचा परिस हाडपलाय आणि आता भजनाचे नाटक चाललेय!” तर दुसरे काही,” अरे हा भागवत तरी कसला! हा स्वत:ला हीन दीन दाखवत
पडलेला चेहरा घेऊन वागत होता. पण बघा आता! परिस असल्यामुळे सोने करून रोज पंचपक्वान्नांचे जेवण हदडित होता. अहो पाहा पाहा! त्याच्या चेहऱ्यावरची तुकतुकी चमक पाहा.” “ नुसते फाटके धोतर आणि अंगावर मळका पंचा पांघरला की माणूस गरीब दिसेल पण गरीब होत नाही. आता परिस गेल्यावर नामदेवावर चोरीचा आळ घेतोय.व्वाह!” तर काही नामदेवाला दोष देऊ लागले. दुसरे आणखी काही जन,” अहो आपण सामान्य माणसं. भक्ती परमार्थ काय समजतो आपल्याला? ही स्वत:ला संत म्हणवून मिरवणाऱ्यांची कामे.आपल्याला नक्की काय माहित असणार आहे? पण एक विठ्ठलाचा लाडका भक्त म्हणवणारा आणि दुसरा रुक्मिणीचा नि:सीम सेवक म्हणवणारी ही देवाची दोन माणसे चार चौघात आरोप प्रत्यारोप करताहेतह्याचा अर्थ दोघांतही काही तरी बरेवाईट असणार !”
नामदेव शांत पण ठामपणे म्हणाला,”परिस माझ्या काय कामाचा? मी तो नदीत फेकून दिला!”त्यावर परिसा पटकन म्हणाला,” तुमच्या कामाचा नव्हता तर माझा मला परत करायचा!”लोक हो हो म्हणू लागले. नामदेव त्यावर उत्तरला, “ भागवता, तुम्ही स्वत:ला विरक्त, संसारात उदास म्हणून दाखवत,व्यवहार करीत होता. तुम्हाला तरी तो कशाला हवा? मी चोरून माझ्यापाशी ठेवला नाही. नदीत फेकून दिला.पाहा नदीत;शोधा. “ “अरे वा! फेकणार तुम्ही आणि शोधायचा आम्ही? तोही ह्या चंद्रभागेच्या तळातल्या वाळूरेतीत? नामदेवा तू टाकलास तूच शोधून काढ.”
हे ऐकून नामदेवांनी चंद्रभागेत मोठी बुडी घेतली. काही वेळाने ते वर आले ते ओंजळभर वाळू घेऊन. ते परिसाला म्हणाले,” परिसा भागवता, ह्यातला तुझा परिस कोणता तो घे!” भागवत कपाळाला हात लावून बोलला,” नामदेवा चंद्रभागेच्या ह्या वाळू गोट्यात कुठे माझा परिस असणार?” पण आता उत्साह संचारलेल्या एकदोघांनी लगेच जाऊन सुया टाचण्या आडकित्ते आणले. नामदेवाच्या ओंजळीतल्या वाळूरेतीला लावून पाहू लागले तर कशालाही ती वस्तु लावा सोन्याची झाली. सगळ्या वस्तु सोन्याच्या झाल्या! वाळूचे सोने झाले! लोकांमधून ओSSSह असा मोठा उदगार उमटला!
नामदेव आपली वाळूने भरलेली ओंजळ पुढे करीत प्रेमळपणे म्हणाले, “परिसा हेघे तुझे परिस!” परिसा भागवत ओशाळला. खाली मान घालून गप्प झाला. नामदेवांना हात जोडून म्हणाला, “नामदेवमहाराजा, रुक्मिणीमातेने दिलेल्या एका परिसाने फुगलो होतो. आज तुमचा हातच परिस आहे हे मलाच काय सर्वांनाच पटले आहे. तुमचा हा कृपेचा हात ज्याला लागेल त्याच्या आयुष्याचे सोने होईल! आपल्या कृपेचा हा वरदहस्त माझ्या मस्तकी असू द्या म्हणजे सर्व काही भरून पावलो!”
संतकवि महिपतीबुवांचा परिसा म्हणतो, “तुमचे चरण लागती जेथे। सकळ ऐश्वर्य ओळंगे तेथे। आता परिस नलगे माते।अभय हस्ताते चिंतितो।।”
( महिपतीबुवांनी ओव्यांतून सांगितलेल्या कथेतील मध्यवर्ती कल्पनेवर आधारित)