हाके राव

शीव

“दोन इसम पाच रुपये! ते मागचे मामा त्यांचे अडीच घ्या! साहेबांचे साडे चार! “ हाक्के हाॅटेल मधल्या वेटरचे आवाज चालू होते.वडा,वडापाव, मिसळीच्या प्लेटी भराभर ठेवल्या जात होत्या हाक्केभाऊ टेबला मधून फेरी मारत बारकाईने पाहात होते. “अरे, सुभ्या, तीन नंबरला पाणी दे ना”असे थोड्या जरबेनेच सांगत होते. नेहमीच्या गिऱ्हाईकांशी दोन शब्द बोलून परत गल्ल्याकडेल येत होते.
आमच्या गावचा हाक्के वडा प्रख्यात होता.
नगरपालिकेचे गाव होते. महापालिका होण्याला अजून काही वर्षे लागणार होती.
शहर म्हटले की हाॅटेले, ऱेस्टाॅरंट आलीच. रेस्टाॅरंट बरोबरीने आमच्या शहरातही चहाच्या गाड्या, टपऱ्या होत्या. प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेली पत्र्याची हाॅटेले होती. हाकेचे रेस्टाॅरंटही बेताचेच आणि बेताच्या मध्यम भागात होते.
हाक्केला शहरातले अनेकजण ओळखत होते. पण निरनिराळ्या नावाने ओळखत होते. काहीजण हाकेराव म्हणत. काही हाके भाऊ,हाक्के दादा म्हणून आवाज देत. काही हाक्केभाय् म्हणत हसून मान झुकवत. हाके हाक्के एकच होता. पण सगळे त्याला त्यांच्या त्यांच्या नावानेओळखत होते.
हाकेच्या बेतशीर हाॅटेलात नेहमीचे पदार्थही मिळत असत. चहा फुल-हाप, स्पेशलही होता. पण तिन्ही चहासाठी काचेचा ग्लास एकच होता. काना एव्हढा लहान नव्हता, पंजा एव्हढा उंच नव्हता, मुठी इतका मध्यम होता. ताटल्या चमचे स्टेनलेसचे होते. हाक्केचा राव-दादा, भाऊ -भाय् होण्यापूर्वी, ‘ए हाक्के’म्हणणाऱ्या गिऱ्हाईकांना मात्र त्याच्या हाॅटेलातल्या ताटल्या चमचे जर्मलचे होते तेही आजआठवत असते.

हाकेचा प्रसिद्ध वडा इतर हाॅटेलांसारखाच होता तरी तो त्याचाच वडा म्हणून का ओळखला जातो ते शहरातल्या अनेक लोकांना समजत नसे. तसे पाहिले तर स्वत: हाक्के भाई,भाऊ-दादा-रावांला सुद्धा लगेच लक्षात येत नाही.

मी,एकदा हाक्केच्या वाॅर्डाचे आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगरपालिकेच्या प्रकरणांसाठी कोर्टात वकीलांना भेटायला गेलो होतो. वाटेत हाक्केचे हाॅटेल दिसले. नगरसेवक म्हणाले, चला आलोच आहोत तर तुमची हाक्केभाऊंशी ओळख करून देतो.

आम्ही हाॅटेलात आलो नसू तेव्हढ्यात स्वत: हाक्केराव पुढे येऊन नगरसेवकाला व आम्हाला नमस्कार करत आला. त्याच्या गल्ल्याच्या कांऊंटर जवळचे टेबल- खुर्च्या मुलगा साफ करेपर्यंत रेंगाळलो आणि हाक्केने आम्हाला टेबलाकडे नेले. टेबला भोवती गल्ल्यावर विझून गेलेल्या उदबत्तीचा सुवास रेंगाळत होता. आमच्यासाठी वडा पाव आला. आम्ही सगळेच नको म्हणालो. पण नगरसेवकाने घेतला आणि हळूच नगराध्यक्षांना म्हणाला,” घ्या साहेब. हाक्केभाऊला वाईट वाटेल.” हाक्केने हे काहीच ऐकले नव्हते. मग मलाही तो खावा लागला. त्याच्या सुरवातीच्या वड्यासारखाच होता. गरम होता, तेलावर वाफवलेल्या मिरच्यांबरोबर तो चांगला लागला. चहा झाल्यावर आम्ही सर्व निघालो. “तुमच्या वड्याचे एव्हढे स्पेशल काय आहे हो ?” असे नगराध्यक्षांनी विचारल्यावर हाके म्हणाले, “ मी काय सांगणार ? बरीच वर्षे करतोय तसाच अजूनही होतोय.इतकंच साहेब.” असे हाक्केभाऊ म्हणाला.

आम्हाला गाडीपर्यंत पोचवायला हाकेभाऊ आला होता. माझ्याकडे पाहात म्हणाला,” काय रे..काय ..हो, बरेच दिवसात आला नाहीस— आला नाहीत?” “काम वाढलंय. राहायलाही जरा लांब गेलो आहे. पण येत जाईन मधून मधून.” हे मी जरा अडखळतच म्हणत होतो.

गाडीत बसल्यावर नगरसेवकांनी हाक्केभाऊ तुम्हाला कसे ओळखतो असे विचारलेच. लोक म्हणजे मतदार व ते नगरसेवकाला जास्त ओळखतात हे गणित जाणणाऱ्या नगरसेवकांनी विचारल्यावर मी त्यांना जे सांगितले तेच तुम्हालाही सांगतो-
काॅलेजपासून मी त्याला ओळखतो. अगोदर लहान गाडी, मग टपरी आणि आता हे बेताचे का असेना हाॅटेल. काॅलेजला जाता येता मी हक्केच्या टपरीवर येत असे. थोडक्यात वारंवार येत असे.मी येत असे तेव्हा कोणी ना कोणी एक दोघे गरीब माणसे वडापाव खाऊन पाणी पिऊन जाताना,”हाकेदादा येतो. लै बरं वाटलं बघं, पोट कसं गार झालं”म्हणत जात असत. पैशे हाक्के मागत नसे,ती माणसे देत नसत. एकदा विचारु का नको असे ठरवत मी त्याला विचारले,”ही अशी माणसं रोज येतात का?” “ हां येतात.” हे केव्हा पासून चाललं आहे?” “अरे माझी हातगाडी होती तेव्हापासून.” तो सहज नेहमीच्या आवाजातच बोलत होता. काही वेळा मी चहा वडा काही घेत नसे. थोडावेळ गप्पा मारून जात असे. त्यातच जून जुलै महिन्यात त्याच्या टपरीत थोड्या पाटी पेन्सिली वह्या दिसल्या. मी काही विचारले नाही. पण सात आठ दिवसांत ते सामान सगळे संपले होते. मी समजलो.

हे ऐकल्यावर नगरसेवक आणि नगराध्यक्ष गप्प बसले होते. विचारात पडलेले दिसले. आठ दिवसांनी त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावून घेतले. नगरसेवकही होते. अध्यक्ष म्हणाले , “ तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं की हाक्के हे काम बरीच वर्षे करतोय. आपण त्याच्या करता काही करावे असे वाटतंय.” मी म्हणालो,” नगरपालिकेने काही करायचे म्हटले तर सभा, ठराव,पैसा, मंजुरी आणि शिवाय एकट्या हाक्केलाच का दुसऱ्यांनाही का नको असे फाटे फुटणार.हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.” त्यावर ते गप्प बसले. थोड्या वेळाने म्हणाले,”मीही विचार करतोय त्यावर. पण तुम्ही त्याच्याशी बोला ह्यावर; एकदम काही सांगू नका. त्याला काय वाटते ते महत्वाचे आहे.” “ मी म्हणालो, “ बरोबर आहे तुमचे. पण थोडा वेळ लागेल.” ते म्हणाले, “हरकत नाही.”
काही दिवसांनी मी हाक्केच्या हाॅटेलात गेलो. मी एकटा हे पाहून त्याला बरे वाटलेले दिसले. नेहमी प्रमाणे पूर्वीच्या दिवसांची भराभर उजळणी झाली.,मी सहज इतकेच विचारले,”हाक्केराव, अजून चालू आहे का?” “ ते कसं बंद पडेल? गरीबी चालूच असते!” आता महागाई वाढत चाललीय. जास्त लोक गरीब होत आहेत असं वाटतेय.”मी म्हणालो,”तू एकटा पुरा पडशील?” छ्या:काय बोलतोस! “ अरे तुला माहित आहे तेव्हाही माझ्या डोक्यात कधी हे आलं नाही. अरे मी केव्हढा आणि गरीबी केव्हढीऽ!”
पुन्हा आठ दिवसांनी गेलो. त्याला म्हणालो की,”आम्ही तुला त्या वडापावाचे पैसे दिले तर चालतील का?”
हाके विचारात पडला. “माझ्या हाॅटेलात बिल तिकिटावर लिहून देत नाही आम्ही. पोरं ओरडून सांगतेत.तुम्हाला पावती बिलं लागणार. कुठून देणार? तुम्ही स्वत: देणार का म्युनसिपालटी देणार आहे? रोजचे रोज देणार का महिन्याला ?” हाकेला मी तिथेच सर्व सांगू शकलो असतो. पण म्हटले थोडा वेळ घ्यावा.
आमच्या तिघा चौघांत बरीच भवति न भवति होऊन तूर्तास रोजचे रोज द्यावेत म्हणजे किरकोळ खर्चात रक्कम टाकता येईल. हाकेच्या माणसाने मला किंवा नगरसेवकाला भेटावे. व हाकेचा कागद दाखवून पैसे घेऊन जावेत ठरले. मी हाक्केभाऊला तसे सांगितले. तो म्हणाला, “मुलगा दुसरे दिवशी सकाळी येईल. कारण रात्री अकरा पर्यंत हाॅटेल बंद होते.”

सुरळीत सुरु झाले.माझ्या आणि हिशेबनीसाच्या एक गोष्ट लक्षात आली. सर्वसाधारणपणे रोज पाच सहा वडापावचे बिल येई. कधी बिलच नसे.तर आठदहा दिवसांतून एकदम दहा बारा वडापावचे पैसे द्यावे लागत. महिन्यानी हाक्केदादाला बोलावले. तो आला. नगराध्यक्षाचे दालन, गुबगुबीत खुर्च्या काचेखाली हिरव्या फ्लॅनलचा टेबल क्लाॅथ असलेले मोठे टेबल वगैरे पाहून सुरवातीला तो बिचकला असणार. पण थोडे हवापाण्याचे बोलणे झाल्यावर त्याला नगरसेवकांनी, आम्हाला पडलेला प्रश्न विचारला.त्यावर हाकेभाऊ म्हणाला, “साहेब, गरीब झाला तरी त्याला रोज फुकट खायला गोड वाटत नाही. दोन वेळचे पोट अर्धवट भरले आणि दुसरे दिवशीचा सकाळच्या चहा बटेर पुरते मिळाले तरी ते येत नाहीत. तुमची गरीबीची रेघ का काय म्हणता ती मला समजत नाही. पण मी पाच सात रुपयापासूनचे दिवस पाहातोय; आता वीस पंचवीस मिळाले की माणसे येत नाहीत. म्हणून कधी दोन चार तर कधी सहासात तर मध्येच एखादा दिवस आठ- दहा जण येतात.”
ह्या अधिकृत अनधिकृत योजनेला सहा महिने झाले. पुन्हा आम्ही हिशेबनीस आणि हिशेब तपासनीसासह सगळे हाक्केदादाकडे गेलो. मुद्दामच रात्री गेलो. काही तरी उपाय करावा लागणारच होता. सर्वांच्या सरळपणा आणि प्रामाणिकपणावर चाललेली ही हाकेभाऊच्या धर्मार्थ कामाला आमची निम्मी मदत चालली होती. मदत निम्मीच करा हेसुद्धा हाकेभाऊनेच सांगितले होते. पण काही चांगले ठोस व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटत होते. त्यातूनच बोलता बोलता ‘वडा पाव, पाव-मिसळ’ योजना का काढू नये? हा विचार पुढे आला. आमच्यापैकी बहुतेकांचे म्हणणे असे की हे नगरपालिकेचे काम नाही. हाक्केभायने सुचवले,” अहो सब्शिडी म्हणा की ग्रॅन्ट द्या कुणाला. चालव म्हणावे.” लगेच आम्ही सर्वजण एकसुरात म्हणालो, दादा, तुम्हीच चालू करा. आम्ही देऊ ! बघा! केव्हा करता सुरू?” “साहेबांनो, जागा पाहण्यापासून सुरुवात आहे. रोजचे पोट हातावर असणाऱ्यांच्या सोयीचे ठिकाण पाहिजे.” पण नक्की झाले.
एकदिड महिन्यात हाकेदादाचा निरोप आला. जागा ठरली. तुम्ही पाहायला इथे इथे या. आम्ही गेलो. आम्ही कोण हो नाही म्हणणार? पाण्याचा नळ द्या साहेब तेव्हढा.” इतकेच तो म्हणाला. तेही काम झाले. चांगल्या पत्र्याच्या मंडपात वडा वडापाव आणि मिसळ पाव केंद्र सुरु झाले. सर्व साधारण गिऱ्हाईकालाही प्रवेश होता. पण त्यांना नेहमीच्या दराने पदार्थ मिळत.पहिल्या दिवशी सर्वांनाच कोणताही पदार्थ मोफत होता. नगराध्यक्ष म्हणाले, “हे ठिकाण गरीबाच्या उपयोगी पडावे ह्यासाठी आहे. त्यांनी यावे. पण केंद्राची भरभराट होवो असे मात्र मी म्हणणार नाही. अडीअडचणी वेळी काही तरी आधार असावा ह्या साठी हे केंद्र हाक्केदादांनी काढले आहे.”
दोन महिन्यात आणखी केंद्र दुसऱ्या भागात काढले. हाकेची दोन्ही मुले ती सांभाळू लागली. हाकेदादा दर दिवशी एकदा एका केंद्रावर जाऊन यायचा.

दिवस जात होते. केंद्रावर आता सर्वसाधारण गिऱ्हाईकांचीही ये जा वाढू लागली. गल्ल्यात भर पडू लागली.केंद्रावर तसेच पहिल्या हाॅटेलमध्ये अजूनही गरीब मजूर कामगार येत असत. हाकेदादाला तोंडभरून आशिर्वाद देऊन, कोणी शुक्रिया जी करून जात असत.

नगरपालिकेची महापालिका झाली. आजूबाजूची गावे सामील झाली. शहर वाढू लागले. हाकेदादांनी आपल्याच हाॅटेलातील चार पोरांना दोन हातगाड्या आणि थोडे पैसे देऊन वाढलेल्या वस्तीत गाड्या चालवायला दिल्या. त्यांना स्वतंत्र व्यवसाय दिला. तेच मालक! एक म्हणाला, दादा, मी चायनीजची गाडी काढणार तर दुसरा म्हणाला,आम्ही सॅन्डविचची! हाकेराव म्हणाला,” बरोब्बर! काही तरी नवीन करा.”
हाकेरावच्या मदतीला त्याची बीकाॅम शिकलेली काॅन्प्युटरचा कोर्स केलेली मुलगी अर्धा दिवस हाॅटेल चालवू लागली. हाकेरावला दोन्ही केंद्राकडे जायला मिळू लागले. मुलगी अर्धा दिवस टॅलीचे शिक्षण घेत होती. यथावकाश तेही पूर्ण झाले. केंद्रावर दोन्ही मुलांनी माणसे चांगली तयार केली होती. महापालिका झाल्यामुळे आजूबाजूच्या सरहद्दीवरचे गरीबही येऊ लागले. आधीच्या गरीबांच्या गर्दीत नविन गरीब आले.

महापालिकेने गरीबांच्या उपयोगाची आणखी दोन केंद्रे काढली. शिकलेली पण बेकार दोन चार तरुण मुले ती चालवू लागली. महापालिकेने हाकेरावला चारी केंद्रावर मानधनावर देखरेख करून चांगली घडी बसवण्याचे काम दिले. ते काम पाहू लागला.पहिल्या हाॅटेलवर तोंडभर आशिर्वाद देणाऱ्यांचीही वाढ होऊ लागली. हाकेभाऊंनी पूर्वी प्रमाणेच आपली प्रथा चालू ठेवली होती.मुलीला पूर्णवेळ नोकरी लागली. हाकेदादाची तारांबळ होऊ लागली. पण विश्वासू नोकर व दोन्ही मुलांची मदत ह्यामुळे सर्व निर्धास्त चालले होते.

दिवस वर्षे सरत होती. हाके थकला होता. महापालिकेत मला किंचित बढती मिळाली होती. मी कधी मुद्दाम वेळ काढून हाकेभाऊंना भेटत असे. आठवणींना उजाळा देऊन झाले की म्हणायचा,” बघ तुझ्या समोर किती घडून गेले. आपल्याला चांगले दिवस लवकर आले.”

हाकेराव थकले होते. मुला मुलींचे संसारही चांगले चालले होते. आलेला माणूस जाणार ह्या न्यायाने कुणाचा हाके भाऊ-हाकेदादा-हाकेराव- हाक्केभाई गेले. अंत्यात्रेला अनेक लोक होते. हार जाड जूड नव्हते. माळा म्हणाव्या तसे होते. वर वर जात चाललेल्या गरीब रेषे खालची हाकेभाऊ-दादाची मंडळी खूप होती. ते लोक आपले डोळे पुशीत चालत होते. अंत्ययात्रा वेगळी होती.

काही विद्यार्थी विद्यार्थिनी वही पुस्तके कंपास पेट्या छातीशी धरून चालले होते.कुणी क्रिकेटची बॅट, हाॅकीची स्टिक बंदुकी सारखी खांद्यावर घेऊन चालत होती; काही पोरं पेन्सिली, बाॅलपेन फूटपट्ट्या घेऊन आली होती. बऱ्याच आयाबापड्याच्या कडेवरच्या आणि बोट धरलेल्या मुलांच्या हातात खेळणी होती.थोड्या मुली नविन ड्रेस घालून आल्या होत्या. शाळेतली काही पोरं दोन पुड्यांचे मधल्या सुट्टीचे डबे मधूनच कपाळाला लावून हुमसत होती. पदवीचे झगे घातलेले दोन तीन तरूण आपले ओघळणारे डोळे,चेहरे लपवत होते. ही गर्दी वेगळी होती.

चिरायु होवो, अमर रहे असे कापडी फलक नव्हते. बॅन्ड नव्हता, टाळ मृदुंगही नव्हते. तीन हलगीवाले वाजवण्याचा प्रयत्न करीत होते. पण आवाज निघत नव्हता. अंत्ययात्रेत कृतज्ञतेचे हुंदके होते.ही गर्दी तशी वेगळीच होती!
हाकेभाऊची अंत्ययात्रा पाहिली आणि आम्हा सर्वांचे, ‘हाक्केरावसाठी आपण कितीऽ केल्याचे’ अहंकाराचे तरंगते फुगे हवेतच फुटले.

स्मशानभूमीत कोणी भाषणे करू शकले नाहीत. जमलेल्यांच्या मनात संभाषणे चालू होती
स्मशानातून परतताना हिशेबनीस व हिशेब तपासनीसांनी हाकेरावची एक गोष्ट सांगितल्यावर तर आमच्या सर्वांचा उरला सुरला गर्वही गायब झाला. ते म्हणाले,
“ हाक्केदादांनी मानधनही कधी घेतले नाही!”

अखेरीच्या दिवसात मी जेव्हा हाकेभाऊला अजूनही त्याच्याकडे गरीब बऱ्याच संख्येने येतात; तुम्ही त्यांच्यासाठी कायमचे करत आलात, असे म्हटल्यावर हाकेराव थोडा वेळ गप्पच होते. मग म्हणाले, “ करता येईल तेव्हढं करायचे. काही करायचे असे ठरवून कधी केले नाही. ती माणसे दोन तीन तास तरी त्यांची भूक विसरत होते.दुसरं काय !”

पद्मश्री,नगरभूषण सारख्या पदव्या हाकेसारख्या माणसाच्या वाटेला जात नाहीत. त्या पदव्यांपेक्षा फार मोठ्या ‘हाकेराव, भाऊ, दादा, हाकेभाय’ ह्या पदकांच्या माळा त्याला जास्त शोभत होत्या.

हाकेभाऊ गेल्यानंतर काही दिवसांनी मी,माजी नगराध्यक्ष,आणि ते नगरसेवक बोलत होतो. मी नगराध्यक्षांना म्हणालो, “ पहिल्या भेटीत तुम्ही हाकेरावना त्यांच्या बटाटे वड्याचे वैशिष्ठ्य काय विचारले होते, आठवतेय ना?” ते लगेच उत्तरले,” हो हो आणि त्यांचे उत्तरही आठवते! “ हाकेराव म्हणाले होते की ते पूर्वी जसा करत तसाच आजही तो बनतो, इतकेच.”
आम्ही सगळे थोडा वेळ गप्पच होतो. हळू हळू आमच्या लक्षात आले की हाक्के वड्याची प्रसिद्धी त्याच्या चवीमुळे नव्हती; ते बनवणाऱ्या माणसामुळे होती! ‘सामान्यांसाठी सामान्यांचा’ हाकेराव सामान्य होता!
‘सामान्यांच्या सामान्य’ हाक्केभाऊनी गावाने देऊ केलेले मानधनही घेतले नव्हते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *