माझ्या शिनिमाच्या गावाकडील ह्या गोष्टी साधारणत:१९४५ते १९५७ ह्या काळातील आहेत.
‘शांतता पाळा’ किंवा ‘ शांत रहा’ ही पाटी पडद्यावर स्थिरावली की थिएटरमध्ये शांतता पसरे. न्यूज रिव्ह्यू सुद्धा शांतपणे बघत. पं नेहरु किंवा सरदार पटेल बातमीत दिसले की लोक टाळ्या वाजवत. मुले, तरूण पोरे,अखेरीस क्रिकेटच्या मॅचची मग ती रणजी असो की टेस्ट असो मोठ्या उत्सुकतेने व “वारे पठ्ठे! बाॅन्ड्री हाणली!” किंवा कुणाची ताडकन् दांडी उडाली की हेच ‘हंपायर’ होत बोटे वर नाचवत ‘आउट; आउट’ अशी जिवंत दाद देत! पण खेळाची बातमी फार थोडा वेळ असणार ही चुटपुट असतानाच आता ‘पिच्चर’ सुरु होणार ह्याचाही आनंद होई!
पिक्चर सुरु झाला! प्रभात असेल तर बहुतेक वेळा प्रभातची तुतारी वाजायला सुरुवात झाली की टाळ्यांचा कडकडाट! चित्रा टाॅकीज असेल तर राजकमलची, कमळात उभी असलेली,जलतरंगाच्या मधुर संगीतावर एक कमनीय स्त्री ओंजळीतून फुले टाकताना दिसली की जोरात टाळ्या पडत. चित्रमंदिर, छाया अथवा कलामंदिर असेल तर महेबुब प्राॅडक्शन्स चा कणीस असलेले विळाकोयता दिसला आणि त्याच बरोबर ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता, वही होता है जो मंझुरे खुदा होता है ‘ हे आमच्या गावचे प्रेक्षक केवळ ऐकतच नसत तर त्याच्याबरोबर म्हणतही असत! तसेच भागवत मध्ये राजकपूरचा सिनेमा सुरु होण्या अगोदर भरदार व्यक्तिमत्वाचे पृथ्वीराज कपूर शंकराच्या पिंडीवर फुले वाहताना गंभीर आवाजात ‘ॐनम:शंभवाय, शंकराय … नम: शिवाय , नमो नम:नमो म्हणायला लागले की आमचे प्रेक्षकही एक एक मंत्र म्हणत शेवटी त्याच्यासारखाच आवाज काढत नम:नमो मंत्र म्हणत थेटरचा ‘गाभारा’ भरून टाकत! मीना टाॅकीज असेल तर जेमीनीची दोन बाळे गोल फिरत बिगुल वाजवताना दिसली की आता भव्य दिव्य पाहायला मिळणार ह्या खात्रीने टाळ्या वाजवत.
इथेच सहभाग थांबत नसे तर शांताराम बापूंचा सिनेमा असेल तर त्यांच्या कल्पक टायटल्सलाही टाळी पडे. संत सावता माळ्याच्या कथेवरील ‘भक्तीचा मळा’ च्या सुरवातीलाच विहिरीतून तुडुंब भरलेल्या मोटेतले पाणी रतनबाव मध्ये लोटू लागले की लोट पुढे येताच त्यावर भक्तीचा मळा ही अक्षरे नाचू लागत की पुन्हा टाळ्या पडत.
शिनेमाच्या गावचा अभिमानही बरेच वेळा स्पष्ट प्रकट होई. चित्रा टाॅकीजमध्ये ‘डाॅ. कोटणीस की अमर कहानी’ सुरवातीच्या दृश्यातच जेव्हा त्यांच्या घरचा टांगेवाला विचारतो,” क्या आप शोलापूर में डाक्तरी नही करोगे?” डाॅ. कोटणीस उत्तर देताना “ नही मै शोलापूरमें डाॅक्टरी नही करूंगा!”” ह्या संवादात शोलापूर नाव आले की लोक टाळ्यांचा कडकडाट करून चित्रा टाॅकीज दुमदुमून टाकीत. तीच गोष्ट ‘लोकशाहीर रामजोशी’च्या नामावलीनंतर ‘सोलापूर शके १७०७’ हा फलक झळकला की सगळे प्रेक्षक तो मोठ्याने वाचत व टाळ्या कडाडू लागत!
प्रत्यक्ष सिनेमा सुरु झाल्यावर थेटर शांत असे. अेक दोन दृश्ये शांततेत जात. पण ‘पतंगा’सिनेमात निगार आणि याकूबचे ‘ओ दिलवाले दिलको लगाना अच्छा है पर कभी कभी’हे गाणे सुरु झाल्यावर निगारची ओळ संपल्यावर याकूबला “पर कभी कभी” म्हणावे लागायचे नाही. प्रेक्षकच”पर कभी कभी” कोरसने म्हणत. आरपार मधील ‘कभीआर कभी पार पार लागा तीर-ए-नजर’ म्हणत डोक्यावर पाटी घेतलेली कुमकुम (त्यावेळी ती एक्स्ट्रा होती!)दिसली किंवा ‘ये लो मैं हारी पिया’ हे श्यामाच्या अदाकारीतले गाणे, किंवा ‘मैं आवारा हूॅं’ हे गाणे सुरु झाले की राजकपूरला एकदोन ओळीच म्हणाव्या लागत. नंतरचे गाणे राजकपूरचे किंवा मुकेशचे राहिलेलेच नसे! प्रेक्षकांनी त्यातील ‘ट्यूॅंऽ डिरुरु’ ह्या म्युझिकसह कधीच म्हणायला सुरवात केलेली असे! ‘नागीन’मधले जादूगर सैया छोड मेरी…’ ह्या गाण्यातले ‘हो गयी आधी रात अब घर जाने दो’ ह्या विनवणीवजा ओळीला लगेच “मग आता कुठे जाते? राहून जा इथेच” असे ‘जादूगर सैया प्रदिपकुमार’ ऐवजी आमचे प्रेक्षकच वैजयंतीमालेला रोज आग्रह करीत!
आमच्या शिनिमाच्या गावचे दर्दी प्रेक्षक कोरसही गात असत. मग ते राजकपूरच्या बरसात मधील ‘तक नी ना धिन्न’ असो अगर आनंदमठ मधील ‘वंदे मातरम वंदेमातरम’ असो (सक्ती नव्हती तरी!) मनापासून साथ देत. कोरस नुसता ‘हमिंग’ असले तरी प्रेक्षक तोंड मिटून ‘हुॅं हाहाआआ’ असे त्या कोरस बरोबर आवाज काढत.’एक थी लडकी’ मधील ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रख्खा दा’ गाण्याला तर संपूर्ण थेटराची ठेक्यात साथ मिळेच पण काही प्रेक्षक उभे राहून ‘आज कल की नारीयाॅं ‘ ओळ सुरु झाली की त्याप्रमाणे हातवारे करत कडवे म्हणायचे! सिनेमा तर करमणूक करत असेच पण लोक स्वत: त्यात सामील होऊन आपली आणखी करमणूक करून घेत!
महंमद रफीच्या गाण्यांना तर प्रत्येक टाॅकीजमध्ये सामुहिक साथ मिळे. बऱ्याच गाण्यांत रफीचा आवाज खूप उंच चढतो.आवाज चढवण्यात रफीचा हात कोण धरू शकेल? प्रत्येक कडव्याच्या अखेरीस तार सप्तकात जायचा आणि शेवटच्या कडव्यात तर तीव्र तार सप्तकातच चढायचा. ‘ओ दुनियाके रखवाले’ ह्या गाण्याच्या पहिल्या कडव्याच्या ‘अब तो नीऽर बहाऽऽलेऽऽऽ पाशी चढायचा तेव्हा ते शेवटच्या ‘महल उदास गलीयाॅं सुऽनी’ सुरु झाले की जणू वाट पाहात असलेले आमच्या सिनेमाचे गाववाले ‘मंदिर बनता फिर गिर जाता’ पासून सरसावून खुर्चीच्या कडेपाशी येत येत ‘ओ दुनियाकेऽऽरखवालेऽऽऽ रखवाऽऽलेऽऽऽ रखवालेऽऽऽऽऽह्या अखेरच्या ओळीला तर महंमद रफीला,आपले आवाज एकवटून,तार सप्तकाचा हिमालय सर करण्यास मदत करीत! इतक्या चढलेल्या त्या आवाजाला जागा मिळावी म्हणून थिएटरचे छप्परही त्यावेळी वर जात असे!
महंमद रफीची तर अशी अनेक गाणी आहेत. त्या प्रत्येक गाण्यांत आमचे दर्दी रसिक त्याला आपल्या आवाजांची साथ देऊन तीव्र तार सप्तक गाठण्यासाठी त्याच्या मदतीला धावून गेले आहेत! आमच्यातल्या साध्या सिनेभोळ्या रसिकांना महमद रफीला दुसऱ्या गावातील थेटरात आवाजाची इतकी उंची गाठता येईल का ह्याची काळजी पडलेली असे!!
सिनेमातली हिराॅईन पडद्यावर असली की सर्व रसिक तिच्या प्रत्येक डौलदार हालचालीत गुंतून जात. त्यामुळे आपापसातल्या बडबडीला आळा बसे.हिरोबरच्या तिच्या दृश्यात थेटरातला प्रत्येकजण हिरो होऊन तिच्याबरोबर काम करू लागे. त्यात गाणे आले की मग विचारू नका. हिरोला बाजूला सारून तेच संवाद म्हणत. हिराॅईन बिचारी एक. तिच्यावर जान कुर्बान करणारे तिला व्हिलनपासून सोडवणारे, तिच्याशी झाडामागून लपंडाव खेळणारे, तिच्याबरोबर नावेत बसणारे, थेटरातला प्रत्येक हिरो पुढे असायचा. गाणे म्हणायचे. थिएटर पुन्हा मुकेश, रफी,तलत महंमद,मन्ना डेने भरून जायचे! किती सिनेमांची नावे घ्यायची! ‘प्यार की जीत’ मधली सगळीच गाणी हिट होती. किंबहुना त्यावेळच्या बहुसंख्य सिनेमातील गाणी हिटच असत. मग तो ‘दिल्लगी, दर्द, दीदीर असो की अंदाज, बावरे नैन, नागीन, अनारकली, अलबेला, नास्तिक,पतंगा,बरसात,आवारा, जाल,बाजी, आरपार, बैजूबावरा, कवि, बडी बहेन, शहनाई सरगम ‘ असो सर्वच सिनेमा गाण्यांमुळेही गाजलेले असत.
प्यार की जीत मध्ये महंमद रफी ‘एक दिलके टुकडे हजार हुए कोई यहा गिरा कोई वहा गिरा’ हे गाणे आमच्या गावचे लोक पहिले पाच सात आठवडे मनापासून ऐकत. नंतर मग हे गाणे सुरु झाले की आमच्या प्रेक्षकांच्या वाणीची रसवंती सुरु व्हायची! “ अबे तुझ्या बाजूला पडला बघ एक तुकडा उचल!” अबे तिकडे तीन चार पडलेत की रे ! गोळा करा बे सगळे तुकडे!” वगैरे सुरु व्हायचे! तर बडी बहेन मधले ‘छुप छुप खडे हो जरूर कोई बात है.. ….’ ही ओळ सुरु होण्यापूर्वी एक दोन सेकंद जी पेटी वाजवली आहे त्यावर प्रेक्षक शिट्या मारून आपल्या पसंतीची पावती लगेच द्यायचे. तर ‘भोली सुरत दिल छोटे नाम बडे…’ हे गाणे सुरू झाले की मा. भगवान बरोबर बरेचसे थेटरही ती सोपी पावले टाकत नाचायचे!!
आमच्या ‘शिनिमाच्या’गावातील थेटरांइतकी ‘सामाजिक रसिकतेची समरसता’ दुसरीकडे पाहायला मिळाली नाही.
काही वर्षांनंतर दुसऱ्या गावांत ‘देख कबीरा रोया’ प्यासा’ बरसात की रात’ ‘किंवा दिल ही तो है’ ‘ जिस देशमें गंगा बहती है’ असे सिनेमा पाहताना ‘माझ्या शिनेमाच्या गावा’ची आठवण यायची!
प्यासा पाहाताना जाॅनी वाॅकरच्या ‘चंपीऽऽतेऽल मालिऽऽश’ गाण्यात कोरस नसला तरी माझ्या शिनिमाच्या गावातील प्रेक्षकांनी नक्कीच कोरस म्हटला असणार हे दिसायचे! तसेच शेवटचे गाणे ‘ये महेलों ये ताजों ये तख्तों की दुनिया’ हे गंभीर गाणे सुरू झाल्यावर पडद्यावरील सिनेमाच्या सभागृहामधील प्रेक्षक प्रथम चमकून नंतर कुतुहलाने माना वळवून हळूच उठून उभे राहतात त्या सीनला, तसे आमच्या शिनिमाच्या गावचे प्रेक्षकही मागे मशिनच्या प्रकाशाकडे बघून नंतर पडद्याकडे पाहात उठून उभे राहिलेले डोळ्यासमोर यायचे! शेवटी महंमद रफी जेव्हा जीव ओतून आवाज चढवत चढवत ‘जला दो जला दो ये दुनिया” म्हणायला लागला की आमच्या गावातले प्रेक्षकच त्याच्या मदतीला आपला आवाज मिसळवून गेले असणार ह्याची मला तिथेही खात्री होती!
‘देख कबीरा रोया’ मध्ये ‘ कौन आया मेरे मनके द्वारे’ ह्या गाण्यात अनुपकुमार जरूरीपेक्षा जास्त हावभाव करतोय हे लक्षात येते. त्यावेळेस ‘अबे माहित है बे तू अशोक कुमार किशोर कुमारचा भाऊ आहे त्ये; जरा सबुरीने घे” असे ‘माझ्या शिनेमाच्या गावचे’ लोक नक्कीच म्हणाले असतील असे राहून राहून वाटायचे!
तसेच ‘ जिस देश में गंगा बहती है’मध्ये ‘होठोपे सच्चाई होती है जहा दिलमें सफाई होती है’ ह्या ओळीला राजकपूर त्या लाजऱ्या लहान मुलीला कडेवर घेतो तेव्हा आणि पुढे ‘महेमाॅं हमारा होता है वो जानसे प्यारा होता है’ आणि ‘जादाकी लालच नही थोऽडेमें गुजारा होता है’ ह्या ओळ्यांना नक्कीच कडाडून टाळ्या पडल्या असणार हेही नक्की! त्याबरोबरच त्या ओळीही सर्वांनी राजकपूर बरोबर म्हणलेल्या ऐकू येत होत्या!
पण माझ्या शिनेमाच्या गावातील प्रेक्षक फक्त सिनेमातील गाण्या संगीताला ठेका धरून टाळ्या देण्या इतपतच रसिक नव्हते तर सिनेमातील इतर चांगल्या गोष्टींनाही ………..