आमचा ‘ पासिंग शो ‘

बेलमाँट

बहुसंख्य लहान मुलांना मुलींना काही तरी गोळा करण्याचा , जमवण्याचा , जमवून ते जपून ठेवण्याची हौस छंद आवड -काही नाव द्या- असते . मला आणि माझ्या बरोबरीच्या काही सवंगड्यांना सुरुवातीला काचेच्या,सिमेन्ट सारख्या टणक, लहान मोठ्या गोट्या जमवण्याची आवड होती. गोट्या खेळत असल्यामुळे ती जोपासणेही सहज होत असे. मोठ्या गोटीला, गोटी कसे म्हणायचे, गोटूलाच म्हणावे लागेल, अशा गोट्या ढंपर म्हणून ओळखल्या जायच्या. काचेच्या गोट्यांतही विविध रंगासोबतच त्यांच्या पोटात नक्षीही असे. पोटात, अंतरात नक्षी खेळत असलेल्या पारदर्शी गोट्यांना तितक्याच सुंदर नावाने म्हणजे ‘बुलबुल’ म्हणून त्याओळखले जायचे .

गोट्यांनंतर काड्याच्या पेटीचे छाप जमवणे सुरू केले. काड्याच्या पेट्या घरोघरी असायच्या. किराणा दुकानदार. पानपट्टीवाले संख्येने किती तरी असत. त्या प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या छापांच्या काड्यापेट्यांची बंडले असत.

छाप जमवण्यास सुरुवात झाल्यावर दोस्तांशी गप्पा मारत जात असलो तरी प्रत्येकाचे लक्ष चारी बाजूना बारकाईने असे. काही जण गप्पांत रमले की, मला नाही तर त्याला रिकामी काड्यापेटी किंवा चिरडली गेलेली काड्यापेटी दिसली की कशाचेही भान न राहता त्या काड्यापेटींवर झडप घालायला झेपावत असू. एकदम दोन्ही मिळणे फार कठिण. एक जरी मिळाली तरी लढाई जिंकल्याचा आनंद असायचा. मग तुला कोणता छाप मिळाला ह्याची चर्चा. “हाऽत्तीच्या! घोडा छापच की” म्हणत तो किंवा मी ती काड्याची पेटी पुन्हा फेकून देत असू. कारण हा घोडा छाप सर्रास सापडत असे. पत्त्याच्या पानाचा छाप, किंवा नुसता एकच किलवर आणि इस्पिक छाप मिळाले की काही तरी मिळाले असे वाटे. अदला बदलीत किंचित वरचढ ठरणारे हे छाप असत. तांबड्या रंगाचा आडवा चौकटच्या एक्क्याचा छाप असलेली काडीपेटी सापडली की तो दिवस सोन्याच व्हायचा आम्हा दोस्त मंडळीचा.

एकेकटे फिरताना, भाजी आणायला संध्याकाळी फाटकावर जाताना, रविवारी गावातल्या मुख्य भाजीबाजारात जातांना किंवा, आई किंवा काकूंबरोबर देवळात जाताना, ह्या छापांची आणि तशीच अगदी वेगळ्या नेहमीच न मिळणाऱ्या छापांची कमाई होत असे!

कधी कधी आमची ही हौस- छंद-आवड अगदी व्यसनाची पातळी गाठायची. कुणी दोघे- तिघे अगर एकटा माणूस सिग्रेट विडी ओढताना दिसले किंवा आता ‘तो/ ते विडी सिग्रेट शिलगावणार ‘ असा अंदाज आला की आशाळभूतपणे तो किंवा त्यांच्यातले एक दोघे तरी रिकामी काडीपेटी केव्हा फेकतील ह्याची वाट पाहात उभे असू. सहज दोस्त उभे आहेत किंवा कोणी एकटा असला तर, कुणाची वाट पाहातोय अशी ॲक्शन करत उभे राहायचो. नशिब जोरावर असेल तर दोन काड्याच्या पेट्या खाली पडलेल्या दिसायच्या. दिसल्या की त्याच सहजतेने ती काड्याची पेटी उचलून पुढे सटकायचे. घोडा छाप निघाली की चिडून ती पायाखाली चिरडून पुढे जायचो; कुणी विडी सिग्रेट ओढतेय का ते पाहात ! हा तपश्चर्येचाच काळ होता आमच्यासारख्या ‘ एका ध्येयाने पछाडलेल्या ‘ ‘ एकच श्वास एकच ध्यास ‘ घेतलेल्या पोरांचा. काड्यापेटींचे वेग वेगळे भारी वाटणारे छाप जमा करणाऱी छंदोमय झालेली मुले आम्हीच ! आमच्यासारखी आणखीही पुष्कळ असतील.

प्रत्येकाकडे दुर्मिळ, सहज न मिळणारे काड्या पेटींचे एक दोन छाप तरी नक्कीच असत. त्यांची अदला बदल देवाण घेवाण सहसा होत नसे. प्रत्येकासाठी ते छाप Trophy च असत. माझ्याकडे आणि धाकट्या भावाकडेही अशी मौल्यवान रत्ने होती. एका काड्यापेटीच्या वर संत तुकारामांचा छाप होता . त्याची छपाई व चित्रही सुंदर! दुसरा एक छाप टारझनचा होता. त्यालाही तोड नव्हती. सुरवातीला दुर्मिळ असणारा पण नंतर काही महिन्यांत तो तितकासा वैशिष्ठ्यपूर्ण न राहिलेला म्हणजे जंगलातून झेप घेतलेला वाघ व झाडावर बंदूक रोखून बसलेला शिकारी. पिवळसर व हिरव्या रंगाचे मिश्रण त्या छापात होते. काडीपेटी ती अशी कितीशी मोठी ? त्यावर हे चित्र छापणे सुद्धा फार अवघड आहे असे त्या वयातही वाटायचे. दुसरा एक छाप होता, समई छाप. किंचित गडद तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर पितळेची चकचकीत समई, चारपाच तेवणाऱ्या ज्योती आणि त्यांच्या भोवती पिवळ्या प्रकाशाते वलय. आमच्या भाषेत- येकदम मस्त! असेच उदगार संत तुकाराम महाराजांचा छाप पाहिल्य्वर सगळ्या पोरांच्या तोंडून बाहेर पडत. फक्त” येकदम मस्त हाय ब्ये!” ही भर पडायची.

गोट्यांच्या मागोमाग काड्यांच्या पेटीचे छाप जमवण्याचा नाद लागला व तोही संपला. काड्यापेटीची सखीसोबती सिग्रेटच्या पाकिटांच्या मागे लागलो. त्यावेळी बिडी सिग्रेट पिणे म्हणत जरी त्यात ओढण्याची क्रिया असली तरी पिणे हेच क्रियापद प्रचलित होते.

ह्या दोन्ही नादासाठी रस्ते धुंडाळणे हे समान कर्तव्य होते. ते इमान इतबारे पार पाडत असू. त्यासाठी शाळेच्या सुट्टीची वाट पाहण्याची गरज नव्हती. काड्यापेटीचे छाप असोत की सिग्रेटची पाकिटे, शाळा सुद्धा आमच्या संशोधनाचे केंन्द्र होते. मोरे मास्तर, पवार मास्तर, हे ह्या दोन्हींसाठी भरवशाचे .

काड्याच्या पेटीत जशी घोडाछाप सार्वत्रिक होती तशी सिग्रेटीत दोन ब्रॅन्ड लोकप्रिय होते. चहात जसा कडक चाय पिणारे तसे सिग्रेटमध्ये लई कडक चार मिनार होती ! त्यानंतर सर्वाना सहज सहन होणारी म्हणजे पीला हत्ती किंवा पिवळा हत्ती. ही पाकिटे जमवायला कौशल्याची हुन्नरीची आवश्यकता नव्हती. कुठेही गेलो आणि पाहिले तरी सहज ह्या दोन्ही छापांची पाकिटे मुबलक मिळायची. त्यानंतर बर्कले व त्याही नंतर कॅपस्टन हे दोन प्रतिष्ठित छाप होते. सर्वात वरिष्ठ म्हणजे गोल्ड फ्लेक्स सिगरेट. तिला सिग्रेट- शिग्रेट म्हणण्याचे धाडस कुणी करत नसे. ती लोकसंबोधने जनतेच्या जिव्हाळ्याचे जे दोन ब्रॅन्ड चार मिनार आणि पिवळ्या हत्तींसाठी राखीव होती ! कारण ते सर्वसामान्य कामगारांना, कारकुनांना आणि हेडक्लार्कना परवडणारे होते.

छाप कोणताही असो सर्व सिग्रेटींची पाकीटे दहाची असत. नंतर काही काळांनी काही ब्रॅन्डनीं वीसचीही पाकिटे आणली ती दोन्हीही गुण्या गोविंदाने पानपट्टीच्या टपऱ्यांत एकमेकाशेजारी बसत. तसेच बर्कले, कॅपस्टन, आणि गोल्ड फ्लेक्स ह्यांचे पन्नास सिगरेटींचे टिन असत. इस्त्रीच्या कपड्यातील, गॅागल लावलेले तरूण कधीतरी रुबाबात हातात हा टिन तिरपा धरून जाताना जिसत. पण अशी शान मोजके मोटरवाले होते त्यांना जास्त शोभून दिसे. गोल्ड फ्लेकस शिवाय ते दुसऱ्या सिगरेटीचा झुरकाही घेत नसावेत. पण चार मिनारवाले ह्या सर्वांना तुच्छ समजत. बायकी शिग्रेटी पिणारे म्हणत त्यांना.

ही पाकिटे जमा करायचोच पण कधी सटीसहीमाहीला कॅमल किंवा अबदुल्ला नावाचे एखादे पाकीट मिळे ! ही वार्ता सिग्रेटची पाकिटे जमवणाऱ्या आमच्या सारख्या नादिष्ट मुलांच्या गोटांत वाऱ्यासारखी पसरे! दुध पिणाऱ्या गणतीचे दर्शन घ्यायला पुढे येणाऱ्या नंतरच्या काळात धावपळ झली नसेल तितकी पळापळी केली असेल पोरांनी! हे कधी न ऐकलेले ना पाहिलेली छापाची पाकिटे कशी दिसतात इतके पाहायला मिळाले तरी धन्य वाटायचे.

पण दुर्मिळ असल्यामुळे व कसलीही माहिती नसल्यामुळे लहानशा ओढ्याला अचानक आलेल्या पुराचा लोंढा जसा लगेच ओसरतो तशी आमची उत्सुकताही ओसरायची ! ओळखीची माणसेच बरी हाच सनातन नियम पटायचा.

हे चार मिनार, पिवळा हत्ती, कॅपस्टन वगैरे जमा करण्याच्या मोसमातच एक वेगळा ब्रॅन्ड त्याच्या अत्यंत अनोळखी नावा मुळे, पाकिटाच्या रंगसंगतीमुळे व त्यावर असणाऱ्या स्टायलिश माणसाचा फोटो आणि त्याच्या तितक्याच स्टायलिश हॅट मुळे त्या पाकिटाची किंमत ( मूल्य वगैरे शब्द कुणाला माहित?! आणि म्हणता येणार होते!) आमच्या अदलाबदलीच्या मार्केटमध्ये वधारली! ज्यांच्याकडे ही पाकिटे होती ते मोटारीतून गोल्डफ्लेकसचा टिन घेऊन उतरणाऱ्या रुबाबदार श्रीमंताप्रमाणे आव आणीत आमच्यात वावरत !

पण ह्या सिग्रेटचे नावही सुंदर आहे . ‘ पासिंग शो ‘ वा! सिगरेटचे झुरके घेण्याला इतके काव्यमयच नव्हेतर वास्तवही म्हणता येईल नाव आहे. ‘ घटकाभरचा खेळ, घटकाभर करमणुक, क्षणभराचा विरंगुळा!’ ‘फार नाही, दोन घटका मजेत घालवा’ ‘दोन घटका लगेच सरतील,’ त्यावेळी हे अर्थ माहित नव्हते. नाव सोपे आणि निराळे होते. हे समजत होते. ते नाव लक्षात राहण्याचे त्यातील सहजता हेही कारण असेल.

काड्यापेट्यांचे छाप, सिगरेटची पाकिटे जमवणे हा खेळही होता आणि नाद होता. छंद आवड हौस हे शब्दही आम्हाला कधी आमच्या वाटेवर भेटले नाहीत. त्यामुळे नाद होता म्हणणेच योग्य. बरं ह्या वस्तु अखेर शब्दशः टाकाऊच. बरीच माणसे, मुलं छाप पाकिटे गोळा जमवतात हे पाहून ते कौतुकाने आपणहून रिकामी काडेपेटी किंवा रिकामे सिगरेटचे पाकीट देत. काहीजण तर एकच शिल्लक असली तर ती खिशात ठेवून सिगरेटचे पाकिट देत.

गोट्या जमवणे थांबले, मग काड्यापेटींचे छाप जमवण्यामागे लागलो. तेही बंद कधी झाले त्याचा पत्ता नाही आणि सिगरेटची पाकिटे जमवता जमवता तोही नाद कसा आणि कुठे संपला तेही समजले नाही.

हा खेळ अखेर ‘पासिंग शो’ च होता!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *