आम्ही मुले स्वतंत्रपणे आणि काही वेळा आमच्या काकांच्या आणि वडिलांबरोबरही बॅडमिन्टन, रिंगटेनिस खेळत असू. बॅडमिन्टनसाठी लागणाऱ्या रॅकेटस मोजक्या होत्या. त्यामुळे आळीपाळीने खेळणे ओघानेच आले. बॅडमिंन्टनचा उत्साह संपला की त्याच मोठ्या अंगणात बॅट- बाॅल खेळत असू.
सुरवातीला सिद्धेश्वरच्या जत्रेत मिळणाऱ्या बॅटी होत्या. खऱ्या बॅटीशी किंचित सारखेपणा असायचा. तोही फक्त आकारात. ती बॅट म्हणजे बॅटीच्या आकाराची केवळ फळी होती. पण त्याकडे आमचे लक्ष नसे. रबरी चेंडू आणि ती बॅट म्हणजे आमचा बॅट बाॅल; म्हणजेच क्रिकेट खेळणे असे. रबरी बॅाल (टेनिसचा नव्हे) हरवायचा किंवा बॅटीचा मार खाऊन फुटायचा. जशी बॅट तसाच बाॅल. समान दर्जाचे. रबरी बाॅल फुटला की श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरच्या जत्रेतून लाकडी बाॅल आणायचो. टिकाऊ आणि टाळक्यात, कपाळाला लागला की किती कडक आणि दणकट तेही समजायचे. त्यामुळे तो बाॅल अडवण्याचा, कॅच पकडण्याचा आमच्यापैकी कुणीही प्रयत्न करीत नसे. असल्या हिरोगिरीच्या वाटेला जात नसू.
खऱ्या बॅटी बॅाल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कुकरेजाचे दुकान ! हे दुकान म्हणजे क्रिकेटच्या बॅटी बॅाल आणि फुटबॅाल हॅाकी आणि इतरही सर्व खेळांच्या साहित्याचे दुकान, -भांडारच! त्यावेळी संपूर्ण शहरात असे एकच दुकान होते. गावातल्या सगळ्या शाळा कॅालेजांची, खेळाच्या सामानाची खरेदी इथूनच होत असे. कुकरेजा कं.चे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची मानाची ढाल कुकरेजांनी ठेवली होती. कुकरेजा शिल्ड जिंकण्यासाठी सर्व हायस्कुलांत दरवर्षी अटीतटीची लढाई असायची. विशेषतः आमची शाळा, न्यु हायस्कूल आणि ॲन्ग्लो उर्दु ह्यांच्यात.
आम्हाला कुकरेजा आणि कं.चे दुकान आणखी एका कारणाने माहितीचे होते. बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्त करायला तिथे जात असू. दुकानात एक अत्यंत कुशल आणि कसबी कारागीर होता. हा कारागिर अगदीशिडशिडा. आणि मालक कुकरेजा ( हे गृहस्थ, मालक कुकरेजाच होते का कोणी व्यवथापक होते हे माहित नाही. पण आम्हाला ते मालकच वाटत.) जाडे होते. ह्या दोघांना पाहिले की लॅारेल हार्डीची आठवण यायची. त्यांचा वेष ठरलेला असे. जाड कापडाचा ढगळ पायजमा आणि त्यावर कधी अर्ध्या बाह्यांचा रंगीत, कधी पांढरा शर्ट. केस पांढरट. भांग साधा पाडलेला . पण व्यवसथित विसकटलेले. त्यांचा कारागीर उंच आणि शिडशिडीत. पंजाबी लुंगी, वर पैरणीसारखा अर्ध्या बाह्यांचा चोकटीचा सदरा किंवा बनियन. डोक्यावर फेटा नसे पण मध्यभागी केसांचा बुचडा बांधलेला असे. सदा कामात गढलेला. बॅडमिन्टनच्या रॅकेटस ची जाळी घट्ट विणत बसलेला दिसे तर कधी क्रिकेटच्या बॅटला तळाशी चांभारी दोऱ्यासारखी ट्वाईन काटेकोरपणे गुंडाळत असे. त्यासाठी तो बॅट, मागे- पुढे- -बाजुला सरकवता येईल असा, जमीनीवर ठेवलेल्या साचात ठेवायचा. ट्वाईन बॅटला ज्या ठिकाणी गुंडाळायची तिथे ब्रशने सरस लावायचा. मग ट्वाईनचे एक टोक तिथे घट्ट चिकटवून ठेवायचा. त्यानंतर साचा हळू हळू फिरवायला लागे. आणि ट्वाईन इकडे तिकडे न भरकटू देता बरोबर एकाखाली एक अगदी सरळ रेषेत जवळ आणत आपोआाप तो गुंडाळत असे. ही पट्टी झाली की तीन चार बोटांचे अंतर ठेवून त्यावर सरसाचा ब्रश फिरवून झाला की दुसऱ्या पट्टीसाठी ट्वाईन गुंडाळणे सुरू. अशा तऱ्हेने तो ट्वाईनच्या दोन पण बहुतेक बॅटीना तीन पट्ट्या लावायचा.
आम्ही आमचे काका आबासाहेबांच्याबरोबर बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्तीसाठी कुकरेजाकडे घेऊन जायचो. रॅकेटची जाळी सैल झाली असेल तर दोन तीन दिवसांनी या म्हणायचा. कधी मधली एखाद दुसरी तार तुटली असेल तर तो अर्ध्या तासात सुंदर विणून द्यायचा. जाळी पुन्हा पहिल्या सारखी दिसायची. एखाद्या तारेची वेलांटी फ्रेम मधून सैल झालेली दिसल्यावर तो काय करायचा माहित नाही. पण खालच्या बाजूने, वरच्या बाजूने दोन तारा तो अशा काही खाली वर ताणत असे. आणि तळहातावर ती रॅकेट मारत असे त्यावेळी “तंन्नन” असा झंकारणारा आवाज ऐकायला मजा येई. जाळी आता पक्की झाली ह्याची खात्री होई.
असेच एकदा आम्हाला आमचे वडील अचानक कुकरेजा मध्ये क्रिकेटची बॅट घ्यायला घेऊन गेले. तेव्हाचा आनंद काय वर्णावा. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळायला जाणाऱ्या बॅटसमनला किंवा बॅालरला काय वाटत असेल ह्याची काही कल्पना नव्हती. पण शाळेच्या टीम मधून न्यू हायस्कूल किंवा ॲंग्लो उर्दु विरुद्ध पार्कच्या मैदानावर खेळायला जाताना बॅट्समन किंवा गोलंदाजाला काय वाटत असेल तोच आनंद, तीच धाकधुक, तसाच उत्साह आम्हालाही आला होता.
खरी क्रिकेटची बॅट! आणि तो चमकणारा, पॅालिशने चकाकणाऱ्या लाल रंगाचा लेदर बॅाल! तो बॅाल हातात घ्यायला मिळाला, नव्हे ह्या बॅटने व बॅालने आता बॅटबॅाल न खेळता ‘ क्रिकेट ‘ खेळणार हाच विचार वारंवार आम्हा तिघाही भावांच्या मनात येत होता. आमच्यासाखे भाग्यवान आम्हीच!
दुकानात आम्ही तीन चार बॅटी स्टाईलमध्ये धरून बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून पाहिल्या. तिघांनाही बॅट व्यवस्थित धरता येईल अशी एकमेव बॅट मिळणे शक्य नव्हते. त्यातून कुकरेजानीच मार्ग काढला. आमच्याकडे पाहात त्यांनी एक दोन प्रसिद्ध ‘नॅान्जर’च्या बॅटी ( बॅटीना खेळाडूच्या शरीरयष्टी म्हणण्यपेक्षा उंची ध्यानात घेऊन नंबर दिलेला असे. ५,६ ७ वगैरे.) पाहून त्यातली त्यांनी योग्य त्या नंबरची बॅट दिली. oiling करून झाल्यावर बॅट घेऊन जा असे त्यांनी सांगितले. स्टम्पस? कमीत कमी तीन तरी लागायचे पण बजेटमध्ये स्टम्प बसत नव्हते त्यामुळे बॅालिंग न करता उडवले आम्ही ते !
भरपूर खेळलो आम्ही त्या बॅटने. गल्लीतल्या मॅचेस मध्ये नवीन होती तोपर्यंत आमची बॅट हिरॅाईन होती. एकदा बॅटीचे हॅन्डलच सैल झाले. कुकरेजा कडे गेलो. बिनफेट्याचा तो कसबी शीख कारागीर यायचा होता. कुकरेजाशेठनी बॅट पाहिली. थोडा वेळ थांबा म्हणाले. थोड्या वेळाने तो शीख कारागीर येताना पाहिला. बिचारा एका पायाने लंगडा होता ते आम्हाला समजले. एका पायाच्या चौड्यांने चालायचा. त्या पायाची टाच टेकतच नव्हती. उंच होता मुळात त्यात एक पाय नेहमीसारखा टाकायचा पण तो दुसरा पाय चौड्यावर चालण्यामुळे दर पावला गणिक तो एका बाजूने जास्त उंच व्हायचा.
त्याने बॅटीकडे नुसती नजर टाकली. काही न बोलता, सैल झालेल्या हॅन्डलच्या पाचरात जिथे अंतर होते तिथे सरस भरला आणि त्या साच्यात बॅट ठेवली. व हॅन्डलचे पाचर जिथे खुपसले होते त्या बॅटीच्या दोन्ही भागांना त्याने रबरी हातोड्याने योग्य तेव्हढ्याच शक्तीने हळू हळू ठोकू लागला. “ठीक हो गयी है. पण ट्वाईन लावली तर बरेच दिवस टिकेल.” पैशाचा अंदाज घेतला. परवडेल वाटल्यावरून हो म्हणालो. त्याची ती आखीव रेखीव पण तितकीच दोरा बळकट गुंडाळण्याची कामगिरी ओणवे होऊन पाहात राहीलो. बॅट हातात दिली त्यांनी. पुन्हा बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून मुद्दाम हॅन्डलवर जोर देत जमिनीवर बॅटीने टक टक करत बॅटिंग करून पाहिली. बॅट नविन झाली ह्या खुषीत आलो घरी !
बॅटीचा दोस्त लाल चेंडूची मात्र रया जाऊ लागली. पण दुसरा लेदर बॅाल घेणे शक्य नव्हते. त्या ऐवजी खेळण्याच्या इतर मोठ्या दुकानात सीझन बॅाल नावाचा एक बॅाल मिळायचा. तो स्वस्त व बरेच दिवस टिकत असे. पण नडगीवर किंवा हॅन्डल धरलेल्या दोन्ही हातांना लागला की ठो ठो करण्याची वेळ यायची. पण असल्या किरकोळ कारणांनी कुणी क्रिकेट खेळणे थांबवते का?
बॅटीच्या हॅन्डलला रबरी कव्हर बसवताना पाहणे हा सुद्धा एक नेत्रसुभग सोहळा असायचा. कुकरेजाचा हा वाकबगार कलावंत-कारागीर तुम्हाला पाहिजे ते कव्हर ( ‘परवडणे’ हा आमचा परवलीचा शब्द असायचा.) निवडा म्हणायचा. बॅट नवीन घेताना जे कव्हर असे ते फुकट असे. कारण बॅटीसह ते गृहप्रवेश करायचे. त्याची गुणवत्ता तितकीच. नवीन घेणे बरेच दिवस लांबणीवर टाकायचो आम्ही. पण बदलायची वेळ टळून गेली. उघड्या हॅन्डलने खेळून हात खरचटू लागले. टोलाच नाही चेंडू नुसता तटवला तरी हाताला झिणझिण्या यायच्या. आता मात्र तसे नवीन कव्हर बसवणे आणि हॅन्डल पक्के करून घेण्यासाठी गेलो.
चांगले रबरी काटेरी ठिपकेदार कव्हर ज्यामुळे पकड छान यायची खेळताना तसे घ्यावे असे पहिल्यांदा वाटायचे पण किंमत ऐकल्यावर मग “हे केव्हढ्याला, ते केव्हढ्याला” करत एक परवडणारे( पुन्हा तो परवलीचा शब्द आलाच) कव्हर नक्की करत असू.
आता इथून त्या शीखाची कामगिरी सुरू. पहिल्यांदा तो ते कव्हर दोन्ही बाजूंनी ओढून ताणून पाहात असे. बॅटीच्या हॅन्डलला पांढरी पावडर लागायची. तीच पावडर रबरी कव्हरमध्येही जायची. कव्हर चांगले चोळले जाई. त्यानंतर तो ते कव्हर आत खुपसताखुपसता मध्ये पावडर हाताला लावायचा, रबरी कव्हर मध्यम लांबीचे करी. उघडे तोंड हॅन्डलच्या डोक्यावर घट्ट दाबून ठेवल्या सारखे करतो ना करतो तोच कव्हरची वर राहिलेली बाजू सरसर करीत खाली आणत जाई! बॅटीचे दोन्ही खांदे बेताने झाकले जातील इतके ते कव्हर खाली न्यायचा. थोडा भाग अजून वर दिसत असे तो भाग खाली सरकवत सरकवत हॅन्डलच्या कपाळपट्टीला खाली वळवत गुंडाळून टाके. वारे पठ्ठे ! एका झटक्यात, हवेत हात फिरवून बंद मुठीतला रुपया प्रेक्षकांना दाखवणाऱा कुकरेजाच्या दुकानातील हा आमचा लंगडा कलाकार जादूगारच होता आमच्यासाठी !
ढगळ मापाचा वाढत्या अंगाचा अभ्रा असला तरी तो उशीला घालण्यासाठी अर्धा तास झटापट करणारे आम्ही. आम्हाला तो कसबी शीख जादूगार वाटला तर आश्चर्य नाही.