Memories – 2

मॅरिएटा

पुढे चालू …..

ती. अण्णांविषयी खूप आठवणी आहेत. रविवारी , सणासुदीच्या सुट्टीच्या दिवशी आमची दुपारची जेवणे म्हणजे खऱ्या अर्थांनी “काव्य-शास्त्र- विनोद” ह्यांनी रसभरित व्हायची. अण्णा कधी कधी त्यांच्या फर्ग्युसन कॅालेजच्या गोष्टी सांगत. त्यातल्या दोन तर आम्हा सर्वांच्याच-शैला अमलाच्यासुद्धा- लक्षात राहिलेल्या आहेत. त्या गप्पांमध्ये आम्हा सर्व भावंडाचा सहभाग असे. त्यामुळे जेवण तर लांबत असेच. पण जेवण संपल्यावरही पाटावर बसून गप्पा रंगतच असत. सगळ्यांचे हात कोरडे झाले असत. ओट्यावर आई शांतपणे बसलेली असे. कुणाच्या तरी लक्षात येई.” अरे अजून आईचे जेवण व्हायचेय की!” अण्णा मग लगेच उठत. मागोमाग आम्हीही. जेवणापेक्षा ह्या गप्पांच्या पंगतीच रंगत असत.

अण्णांनी फर्ग्युसन कॅालेजमध्ये असतांना गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी “ वसतिगृहात” ही प्रहसनात्मक एकांकिका लिहिली होती. ती पाहायला प्रमुख पाहुणे “केसरी” चे संपादक व साहित्यसम्राट न.चि. केळकर ह्यांना आमंत्रण देण्यासाठी अण्णा व इतर पदाधिकारी विद्यार्थी गेले त्यांच्याकडे. अगोदर नाही नाही म्हणत होते. पण तरुणांचा हिरमोड होऊ नये म्हणून अखेर ते तयार झाले. पण एका अटीवर- “ मी फक्त दहा मिनिटेच थांबेन”. अण्णा व इतरांनी ते मान्य केले.

त्या विनोदी नाटिकेचा प्रयोग अर्थातच फर्ग्युसनच्या ॲम्फी थिएटरमध्ये होता. गॅदरिंगचे अध्यक्ष न.चि. केळकर आले. दहा मिनिटासाठीच येईन म्हणणारे साहित्यसम्राट व लो. टिळकांच्या प्रख्यात केसरीचे संपादक, विद्यार्थ्यांच्या गडगडाटी हसण्यात सामील होऊन नाटिका प्रहसन पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत थांबले होते. अण्णांना स्वतःचा अभिमान का वाटणार नाही?

मराठी कवितेला नविन वेगळे वळण देणाऱ्या रविकिरण मंडळाचे अध्यक्ष कविवर्य डॅा. माधवराव पटवर्घन उर्फ माघव ज्युलियन हे होते. ( “प्रेमस्वरूप आई,” “मराठी असे आमुची मायबोली, “ “ … वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हां कां पडे? कवितांचे कर्ते) ते एकदा अण्णांना बरोबर घेऊन रविकिरण मंजळाच्या सभेला गेले. तिथे असलेल्या सर्व प्रसिद्ध कवींशी – कवि यशवंत, कवि गिरीश( नाटककार वसंत कानेटकरांचे वडील) व इतरही – त्यांनी अण्णांची ओळख ,” हे माझे तरुण कविमित्र…” अशी करून दिली. अण्णा पुढे सांगत ही खरी मोठ्या मनाची माणसे ! दुर्मिळ आहेत! “ ह्यामुळे कवि गिरीश व यशवंत ( आई म्हणोनि कोणी ह्या अविस्मरणीय कवितेचे जनक) अणांचे चांगले मित्र झाले. त्यावेळी अण्णा, आबासाहेब ती. बाबा वगैरे रिठ्याच्या वाड्यांत राहत होते . तिथे बरेच वेळा कवि गिरीश त्यांच्या घरी मुक्कामाला असत.त्या वेळी ते आपल्या जुन्या, नवीन कविता म्हणून दाखवीत. ते कविता कशा म्हणत ह्याची नक्कलही अण्णा “गेले तुझ्यावर मन जडून राऽमा गेले…” असे साभिनय करीत!

“प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा —“ हे महाराष्ट्र गीत लिहिणारे, तसेच “ सुदाम्याचे पोहे” ह्यासारखे अप्रतिम विनोदी पुस्तक लिहिणारे, नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यावेळच्या साहित्यिकात मोठे प्रस्थ होते. स्वतः प्रतिभाशाली नाटककार व विनोदी लेखक नाटककार आणि कवि राम गणेश गडकरी, श्री.कृ . कोल्हटकारांना गुरू मानीत. तर सांगायचे असे की, आमच्या ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक मुंबई पुणे व इतरत्र गाजत होते. अण्णांची व श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली. कधी कोल्हटकर अण्णांना आपल्याबरोबर निमंत्रित ठिकाणी घेऊन जात. तिथे गेल्यावर कोल्हटकर अर्थातच तक्के लोड असलेल्या गादीवर बसत. अण्णा नम्रपणे त्यांच्या बाजूल पण जरा खाली सतरंजीवर बसत. ते पाहिल्यावर स्वतः कोल्हटकर मोठ्याने आपल्या शेजारी गादीवर थाप मारत म्हणत,” अहो कामतकर इथे या. इथे बसा. अहो तुम्ही आम्ही नाटककार आहोत. असे इकडे या.” म्हणत अण्णांना आपल्या शेजारी बसवून घेत. ती. अण्णा त्यांचा मोठेपणा सांगण्यासाठी नव्हे तर वर माधव ज्युलियन संबंधात ते म्हणाले तसे ,” अशी खऱ्या मोठ्या मनाची उदारवृत्तीची माणसे दुर्मिळ!” हे पटवून देण्यासाठी सांगत. श्री.कृ कोल्हटकरांचे सुपुत्र प्रभाकर कोल्हटकर आमच्या घरी एकदा आले होते.

आमच्या हायस्कूलच्या दिवसात महाराष्ट्रात दोन वक्तृत्व स्पर्धा प्रतिष्ठेच्या होत्या. पुण्याची रानडे वक्तृत्व स्पर्धा आणि बेळगावचीही रानडे स्पर्धा. आम्ही हायस्कूल मध्ये नुकतेच गेलो होतो. आमच्या वर्गात स्पर्धक मुले मुली स्पर्धेच्या तयारी साठी ती भाषणे आम्हापुढे करीत. नंतर कळले की काही वर्षे आमचे ती. अण्णा ही भाषणे लिहीत. त्यांनी तयार करून दिलेल्या भाषणांनी व त्या मुलींच्या वक्क्तृत्व कलेने दोन वर्षे – वनमाला किंवा शरयू चितळे व विदुला लळित ह्या त्या दोन मुली!- ह्यांनी दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. पुढे मग आमच्याच हायस्कूल मध्ये शिक्षक असलेले माझे चुलत भाऊ गो. रा. कामतकर हे भाषणे लिहित. एके वर्षी आमच्या श्यामने दोन्ही स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने बेळगावची रानडे स्पर्धा जिंकून ती गाजवली!

ती अण्णांना अनेक लेखक आपली पुस्तके भेट म्हणून पाठवत असत. मग त्यामध्ये सोलापुरला आमच्याच कॅालेजात प्राध्यापक असलेले कवि डॅा. वि. म. कुळकर्णीचे ‘कमळवेल’ हा काव्यसंग्रह, चरित्रकार व ती. अण्णांचे सहाध्यायी मित्र गं. दे.खानोलकरांचे “ माधव ज्युलियन यांचे चरित्र , य. गो. नित्सुरे यांचे त्या काळी वेगळ्या विषयावरचे “कुमारांचा सोबती, सुप्रसिद्ध कथालेखक वि. स. सुखटणकर ह्यांनी त्यांचे “ टॅालस्टॅायच्या बोधकथा” , तसेच अण्णांचे मित्र प्रख्यात लेखक य. गो. जोशी ( वहिनींच्या बांगड्या फेम) ह्यांची पुस्तकेही ; आणखी स्थानिक लेखकांची पुस्तकेही ! किती तरी!

ती. अण्णांचा ज्योतिषाचाही चांगला अभ्यास होता. विशेषतः कुंडलीचे ज्ञान. त्यानंतर हस्त सामुद्रिक. हा वारसा आमच्या ती वासुनानाने चालवला. पण पुढे त्याने सांगण्याचे थांबवले. ते जेव्हा दिल्लीला कोर्टाच्या केससाठी गेले होते त्या प्रवासात त्यांच्या ज्योतिषाच्या अभ्यासाला चांगलेच यश मिळाले. त्यानंतर, त्यांना प्रवासात भेटलेल्या व ज्यांचे त्यांनी भविष्य सांगितले असेल त्या प्रवाशांची एक दोन वर्षे तरी पत्रे येत होती.

अण्णांना रेल्वेच्या केसेस मुळे हैद्राबाद सिकंदराबाद तसेच दिल्ली येथे प्रवास करण्याची मोठी संधी मिळाली. आम्हाला आठवते ते जेव्हा दिल्लीहून येत तेव्हा आठवणीने आग्र्याचा पेठा घेऊन येत असत.

प्रवासावरून आठवले . सोलापुरच्या श्रीयोगी अरविंद मंडळाच्या मंडळींची कलकत्ता गया काशी वगैरे ठिकाणी जाण्याच्या यात्रेत ती. अण्णा व योगिनी प. पू. मावशी ह्यासुद्धा होत्या. कलकत्याला अर्थातच ते रामकृष्ण परमहंसांच्या दक्षिणेश्वर येथील मंदिरात वगैरे जाऊन आलेच. गयेलाही गेले . बोधीवृक्षही पाहिला असणार. पण प्रवासानंतर एक दोन वर्षांनी ते मला म्हणाले की गयेला मी माझे स्वतःचे श्राद्धही करून घेतले. केले. थोडावेळ मी अवाकच झालो. ते म्हणाले की ही फार पूर्वींपासून चालत आलेली प्रथा आहे. गयेला गेले की अनेकजण असे करतात. मग आपण गेल्यानंतर कुणी श्राद्ध करो न करो. तो प्रश्न राहात नाही.

ती. अण्णा गेल्यानंतर त्यांच्या जुन्या आणि हयात असलेल्या कुणाला कळवायचे त्यासाठी मी, वासुनाना,श्याम, अण्णांना आलेली पत्रे पाहात होतो. त्यामध्ये कोण कोण असावेत? नागपुरचे प्रसिद्ध साहित्यिक व त्यांच्याच तरुण भारतचे संपादक ग. त्र्यं माडखोलकर, , श्री. कृ. कोल्हटकर, प्रभाकर कोल्हटकर, कोठीवाले, खांडेकर, दिल्लीला क्युरेटर पदावर असलेले मुंबईचे श्री दिघे , कवि गिरीश, खानोलकर, सुखठणकर, समीक्षक टीकाकार श्री. श्रीकेक्षी ( म्हणजेच श्री. के. क्षीरसागर), चिं.वि. जोशी, संत साहित्याचे अभ्यासक व प्रेमबोध ह्या मासिकाचे संपादक पंढरपुरचे भा. पं. बहिरट, वगैरे. आज ह्या नावांचे कुणाला फारसे महत्व वाटणार नाही. पण ही मंडळी आपापल्या परीने सर्वांना माहितीची व प्रसिद्ध होती.

आणखीही पुष्कळ आठवणी आहेत. लिहायच्या आहेत. आपल्या सगळ्यांनाच ती. अण्णा त्यासाठी प्रेरणा देतील ह्यात शंका नाही. आज फार वाईट वाटते ते एका गोष्टीचे ; ती. सौ. ताई , ती. सौ. माई, ती. वासुनाना , श्याम, नंदू,चंदू,मालू नाहीत आपल्यांत. त्यांनी ती. अण्णांच्या, त्यांच्या ह्याहून जास्त मोलाच्या आठवणी सांगितल्या असत्या!

आमची शैला व अमला ह्यांच्यापाशीही ती. अण्णांच्या आठवणींच्या अत्तराच्या खूप कुप्या भरलेल्या असणार. त्या दोघीही छान भर घालतील.

ती. आई आणि अण्णांनी, आम्हा भावंडांना कुणालाही कधी अरे अभ्यास करा , केला की नाही वगैरे सांगितले नाही. विचारलेही नाही. किंवा वळण लावले वगैरे काही नाही. त्यांचे वागणे बोलणे, रोजचे आचरणच न कळत आम्हाला काही शिकवत गेले असावे. आम्हीच काय आमच्या मुलाबाळांनीही त्यांना पुस्तके वाचतानाच जास्त पाहिले असेल! बहुधा आम्हालाही त्यामुळे न कळत वाचनाची आवड निर्माण झाली असावी.

ती. अण्णांच्या साहित्यिक प्रतिभेचा वारसा चि. चंदूला लाभला. तो त्याने आणखीनच जोमाने यशस्वीरीत्या पुढे नेला. आज मेधाची नेहा व चि. नंदूचा अभिजित ही तोच वारसा पुढे नेत आहेत.

ती. अणांनी स्वतंत्र व्यवसाय, उत्तम, नेकीचे, गरीबाचे वकील अशी ख्याती मिळवून चांगला केला. तोच स्वतंत्र व्यवसायाचा वारसा आपल्या नंदूने डॅाक्टर होऊन पुढे चालवला.मेधानेही वकील होऊन ती तो पुढे नेत आहे.

आपला श्याम ती. अण्णांचे श्राद्ध त्याच्या अखेरीपर्यंत, निष्ठापूर्वक व प्रेमाने, शास्त्रोक्त विधिवत् करीत असे. सुरुवातीची काही वर्षे मीही करीत होतो. पण आता खंड पडला . आज ती. अण्णांचा तिथीप्रमाणे श्राद्धाचा दिवस आहे. मी त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्यांची श्रद्धापूर्वक आठवण करीत आहे.

ती. प.पू. अण्णा ( आणि अर्थातच ती. आई तुझेसुद्घा) आम्हा सर्वां सर्वांना तुमचे आशीर्वाद सतत लाभोत ! ती. अण्णा! तुमचे गुणसंकीर्तन करण्याची संधी व पात्रता आम्हाला लाभू दे.

7 thoughts on “Memories – 2

  1. Sadashiv Kamatkar Post author

    From Prafulla Kamatkar

    सदूकाका !! जगदीश दादा जल्दी आणि ज्योत्स्ना वहिनीने अतिशय सुरेख शब्दात लिहिले आहे . मी आपला त्याला दुजोरा देतो ! अतिशय छान व वाचत च रहावे असे वाटत होते . सहसा एवढा मोठ्ठ फॉरवर्ड वाचलं जात नाही . पण ती . अण्णा हे शब्द वाचले व न थांबता अधाशासारखे वाचून काढले . काका तुम्ही तुमच्या सवडीने दगदग न करता ह्या आठवणी लिहून काढाव्यात ही विनंती !! कारण ह्या अमूल्य आठवणी सांगणारी फारच थोडी माणसे अवतीभोवती आहेत . त्या आठवणी विस्मृतीत जाऊ नयेत एवढीच अपेक्षा ! जगदीश दादा व जल्दीच्या वरील उत्तरानंतर मी, नाही म्हणता म्हणता माझी ठिगळं चिकटवलीच . क्षमस्व !

  2. Sadashiv Kamatkar Post author

    From Baba
    प्रफुल्ल, प्रयत्न करीन. जाता जाता सहज आताच आठवण झाली, ती संजूच्या संदर्भात आहे. ही आठवण मला तुझे बाबा- आमच्या श्यामने सांगितली होती. माझ्या कंच्या मीटिंगसाठी मी मुंबईला येत असे. त्यावेळी माझा तुमच्याकडे मुक्काम असे. एकदा श्याम म्हणाला आमच्या संजूचे पद्मलोचन हे नाव ती. अण्णांनी ठेवले. सुचवले. ( त्या वेळी ती. अण्णा हयात होते.) संजूचे डोळे पाहिल्यावर ते लगेच उद्गारले,” अरे ! ह्याचे डोळे कमळासारखे आहेत. पद्मलोचनच ! “ मगपदमलोचन हेच त्याचे नाव ठेवले.”
    असो.

  3. Sadashiv Kamatkar Post author

    From Jaldi Kamatkar

    सदूकाका, कित्ती सुंदर, ओघवतं, तरल लिहिता तुम्ही.. अरेच्या संपलं का? अशी हुरहूर लागतेय शेवटी..
    मी अगदी तुमच्या खुमासदार शैलीतच वाचायचा प्रयत्न केला, तुमचा आवाज, ती लय माझ्या कानात साठवून आहे आणि हा पूर्ण लेख तसाच “ऐकलाय” मी
    काका, तुमचे हे लिखाण सुद्धा youtube वर तुमच्या आवाजात पोस्ट कराल plz?

    हा लेख वाचताना परत एकदा “कामतकर” असल्याचा अभिमान डोकं वर काढतो.. ह्या लेखात तुमचे ती. अण्णा व आज्जी वरचे प्रेम तर दिसून येतेच पण तुमच्या सगळ्या भावंडांवरची माया ही प्रकर्षाने जाणवते (बाबांचा उल्लेख सुखावून जातोय, खूप धन्यवाद )

    मला दुर्दैवाने ती. अण्णांचा सहवास लाभला नाही पण तुमच्या लेखाने, सगळ्यांच्या सांगण्याने किंवा ती. श्यामकाकांनी ही मागे एकदा न. चि. केळकरांची आठवण लिहून पाठवली होती त्यामुळे त्यांचे भले मोठे वलय असलेले (काल्पनिक) चित्र माझ्या मनात तयार झालेय – आणि त्याला आजीच्या घरातल्या हॉल मध्ये त्यांच्या वकिली कोटातल्या फोटोमुळे हसरी च छटा आहे. आजीसारखी कणखर, स्वाभिमानी, स्वावलंबी आणि स्वतःचा आब राखून जगलेली स्त्री मी आजतागायत पहिली नाहीये, तिच्या बद्दल त्यामुळे मनात खूप आदर आहे

    सदूकाका, आम्ही खरावाब नशीबवान आहोत की आम्हांला तुमचं हे लिखाण वाचायला मिळते! परत एकदा मनापासून धन्यवाद!

    स्मिताताई, हे share केल्याबद्दल Thanku

  4. Sadashiv Kamatkar Post author

    From Jagadish Kamatkar:
    ि. प.पू.आजी आणि ति.प.पू.अण्णा यांना सा.न. तसेच ति.सदुकाकांनाही सा.न.
    ति.सदुकाकांनी या आठवणी लिहून आम्हाला अमूल्य असा ठेवा दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत, आम्ही हा मौल्यवान ठेवा काळजीपूर्वक जतन करू , आचरणात आणण्याचा प्रयत्न करू.काही प्रमाणात मीही या आठवणी प्रत्यक्ष लहानपणी अनुभवल्या आहेत. विशेषतः आपल्याकडे कवीवर्य कुंजविहारी येत असत. तसेच ति.अण्णा त्यांच्या ऑफिसमधून अशीलांसाठी चहा आणण्यास सांगण्यासाठी ति.आजीला हाक मारण्याऐवजी ति.नानांना जी हाक मारत ती अजूनही माझ्या कानात साठवून आहे. तसेच आपल्या बंगल्यात बाहेरच्या खोलीत नृसिंह जयंतीच्या दिवशी श्रीवासुदेवभटजींसह पाच ब्राह्मणांची अण्णा आजी आणि उपस्थित लेकीसूना पाद्यपूजा करीत इ. खूप संस्मरणीय संस्कारक्षम आचरण अनुभवले आहे – आम्हांला तेवढे जमत नाही हे तितकेच खरे वा आम्ही तेवढा प्रामाणिक प्रयत्न करत नसू.
    ति.अण्णांचा गाढा व्यासंग , वाचन अभ्यास त्यादरम्यान त्यांना आवश्यक अशी निराश शांतता राखण्यासाठी ति.आजीची आम्हां बालगोपाळांना दंगामस्ती आवाज करू नका करू नका हे सांगण्याची परिश्रमपूर्वक धडपड आणि त्यामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी आपसुक आदर आणि त्यांचा दरारा मनात घर करून आहे.

  5. Sadashiv Kamatkar Post author

    From Shobha Kamatkar:
    ती.सदूमामा..
    नेहमीप्रमाणेच सुंदर, ओघवतं, वाहातं, सहज सुंदरशैलीतलं पिक्चरस्क्यू लेखन… आजीचा स्वयंपाकघरातला तो ओटा.. आजोबा एका ठराविक पाटावर ठराविक जागी बसायचे.. बाकीचे काही जण उभेच असायचे..
    अमलाचं भगवद्गीता पाठांतर..आजोबांचे ते संस्कृत, अस्खलित उच्चार..आणि त्याबरहुकूम अमलाचे बिनचूक उच्चारण..
    (तेव्हा ऐकलेला १२ वा अध्याय माझा अजूनही ब-यापैकी पाठ आहे)..
    ते सगळं डोळ्यासमोरून तरळून गेलं..
    आठवणींच्या सूरपारंब्यांचा खेळ…. हा शब्दही तुझाच आहे..
    प्रत्येकाच्या मनातला एक छोटासा कोपरा तरी सोलापुरातल्या घराच्या आठवणीने भरलेला/ भारलेला आहे..
    या दोन्ही लेखांमुळे त्या कोपऱ्याचा एक हसता, खेळता,बागडता, हॉल झाला…

  6. Sadashiv Kamatkar Post author

    From Suneeta Kamatkar
    कै. ती अण्णा भावपूर्ण नमस्कार . ती अण्णाआईंच्या असंख्य आठवणी आहेत. आमचे आदर्श, प्रेरणा स्थान आहेत . दहामुलाबरोबरच आम्हा पाचही सुनांना प्रेमळ स्वभावाने कुटुंबात सामावून घेतले. बाहेरून आलेल्या आम्ही पाचीजणी घरात ,कामतकरांच्या कुटुंबात काकू आई प्रेमळ सहवासात कधी मिसळून गेलो कळले नाही. शिस्त , मर्यादा ,प्रेमाने आपलेपणाने एकत्र धरून ठेवणारे आईअण्णा त्यांच्या आठवणी मनात साठल्या आहेत.

    नातंवडे येणार म्हणून दोघे आतुरतेने अधीर होऊन वाट पहायचे. नातवंडे आलीकी आजोबा घरातला पाट मागच्या अंगणात उभा करून क्रिकेट खेळायचे दुपारी कधी बुध्दीबळ खेळायचे,त्यावेळी त्यांचा आनंद पहाण्यासारखा असायचा. आणि आजी प्रत्येक नातवंडाच्या आवडीचा पदार्थ करण्यात मग्न व्हायच्या. असे कौतुक करणारे फार थोड्यांच्या नशिबात असतात. ते आम्हा सुनांशी फारसे बोलत नसत. नातवंडांना सांगायचे तुमच्या आईला सांग” चहाची जेवायची वेळ झाली चहा कर पान घे “वगैरे. एकदा आईने अनारशाचे पीठ करून ठेवले होते. त्या बाहेर गेल्या होत्या. अण्णांना अनारसे खावेसे वाटले मला सगळी तयारी करायला सांगितली अनारश्याचे पीठ , खसखस काढायला सांगितले मला थापून द्यायला सांगितले व स्वतःत्यांनी ओट्यावर बसून तळले . घरातल्या हजर सर्वानी खाल्ले. पण पी संपले व अण्णांना गोड खाऊ दिले म्हणून आईंचा राग…! एक गोड आठवण . गोरेगावला आले असताना संध्याकाळी बाहेरच्या खोलीत ह्यांची वाट पहात बसले असताना त्यांच्या नाटकातली पदे हळु गुणगुण बसले होते आवाज छान होता .तेव्हा कळले. अशा असंख्य आठवणी आज यानिमित्ताने आठवल्या.

    संजूने आजोबाआजीबद्दल आठवण पाठवली त्याच्या लहानपणी आजोबा सोलापूरहून गोरेगावला पहाटे आले की बाबांच्या नावाने हाक मारायचे. आम्ही आजोबा आले म्हणून उठायचे .असेच एकदा आलेआम्ही मुले डोळे चोळत उठलो.त्यांना भेटलो .त्यांनी मला खिशातून निळे शिश असलेली निळी पेन्सिल दिली मला खूप आनंद झाला मी ती बरेच वर्ष जपून ठेवली होती. वकीली कामात ते बहुधा वापरत होते. आजी नातवंडांचे लाड करायची. प्रफुल्लला प्रभू म्हणायची.

  7. Sadashiv Kamatkar Post author

    From Amla Jamadagni:

    डॉ तगारे म्हणून सोलापुरात होते .ते विविध प्रकारच्या स्पर्धा भरवायचे. त्यात दरवर्षी गीतेचा एक असा अध्याय असे . अण्णा माझ्याकडून पाठ करून घेत असत. अर्थ सांगुन हावभाव कसे प्रकट करायचे ते सांगत. प्रत्येक श्लोकाचा फक्त अर्थ नाही तर भावार्थही समजुन सांगत.सकाळी रोज स्पर्धा होईपर्यंत प्रॅक्टिस करून घेत . स्पर्धेसाठी शैला चंदू नंदू आमच्या शाळेत माझ्याबरोबर येत असत. परीक्षक कुठे बसले आहेत हे पाहून शैला मला मी श्लोक म्हणताना कुठे कुठल्या angle मध्ये उभे रहायचे हे सुद्धा सांगायची. की ज्या योगे परीक्षकांना नीट दिसेल व ऐकायला येईल . अशा तऱ्हेने स्पर्धा पार पडायची . आणि कधीपण पहिले बक्षीस मिळायचे म्हणजे मिळायचे .व अण्णांच्या परिश्रमांना ’ his daughter’s voice ’ (his master’s voice . ) म्हणतात ना तसे .

    अजुन एक….मी इयत्ता ९वीत होते.

    एकदा B.E d लेसन आमच्या वर्गात चालला होता. व नेहमीप्रमाणे मी आणि माझ्या मैत्रिणी वेडे वाकडे प्रश्न विचारून त्या विद्यार्थी शिक्षकेचा लेसन पाडण्यात मग्न होतो. Observation करणाऱ्या प्रोफेसर मॅडम च्या हे लक्षात आले. व त्यांनी क्रमाने आमच्यापैकी एकेकीला उठवून प्रश्नांचा भडिमार केला. व एखादा एखादा प्रश्न विचारून प्रत्येकीला नामोहरम केलं. माझी टर्न आल्यावर त्या म्हणाल्या थांब !तू चुकत नाहीस तो पर्यंत तुला प्रश्न विचारतच राहणार आहे.” काय करणार? विचारा चालेल “म्हणलं. एकही प्रश्न पुस्तकाला नव्हता. शेवटी त्या कंटाळल्या . विद्यार्थी शिक्षकेला सांगितले हे बघ एवढ्या तयारीने यायला हवे. मग मला त्यांनी विचारलेतू हे एवढे कुठे वाचलेस ?मी म्हणले माझे वडिलच मला सांगतात .मग मला नाव विचारले. नाव सांगितले. त्या अण्णांना ओळखत होत्या .व अण्णांचे नाव ऐकल्यावर त्या परत त्यांच्या विद्यार्थिनीला म्हणाल्या , एवढे वाचन तुला होणार नाही. कारण हिच्या वडिलांचे dhyaneshvarivar प्रभुत्व आहे. त्यामुळे हिला हे सर्व घरातल्या वातावरणातून माहिती झाले आहे. अशा तऱ्हेने मी. अण्णांचे ऐकल्यामुळे सुटले .आणि पुढचा लेसन पाडण्यास मोकळी झाले……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *