त्या सगळ्यांत ते फार लहान आणि अगदी अशक्त पिल्लू होते. अशक्त म्हणजे अशक्त. दुसरा शब्द नव्हता त्याच्यासाठी.आपल्या पायांवरही धड उभे राहू शकत नव्हते. एका कोपऱ्यात बिचकून उभे असल्यासारखे होते. “हूं, तू नाही ते घेणार ते. मी तुला त्याचीच ही चार भावंडे दाखवतो. ती बघ. कशी उड्या मारताहेत!” बिल मला जवळकीच्या नात्याने म्हणाला.
पण माझी नजर त्याच्यावरून हलत नव्हती. त्याचा चेरा मलूल होता. तेही माझ्याकडे पाहात होते.मी आणखी जवळ गेलो. चेहऱ्यावर गोडवा होता त्याच्या. ” त्याचे नाव काय आहे?” मी बिलला विचारले. “हे बघ जॉनी, बिल सुस्कारा टाकून म्हणाला,”मी तुझ्या वडिलांचा चांगला मित्र आहे. तुलाही माहित आहे. मी म्हणेन हे पिल्लू घेऊ नकोस. त्यापेक्षा दुसरे कोणतेही घे. ती सशक्त आणि उत्तम आहेत. आवडेल ते घे. मला नाही वाटत हे फार दिवस काढेल म्हणून” म्हणजे माझ्यासारखेच आहे की. मीही जगतो का वाचतो असेच सगळ्यांना परवा परवापर्यंत वाटत होते.मी मनात माझ्याशी म्हणत होतो.
मागच्या वर्षी मी तेरा वर्षाचा झालो. मला ल्युकेमिआ झाल्याचे स्पष्ट झाले. सगळ्यांनी माझी आशा सोडून दिली होती. पण मी त्यातून बाहेर आलो. पण किती अशक्त आणि बारीक झालो मी. तेव्हढ्यात ते पिल्लू माझ्या जवळ येऊन माझा हात चाटू लागले ते मला समजलेही नाही. मोठ्या आशेने ते माझ्याकडे बघत होते.
“अर्, काय करतेय हे पिल्लू? तला मी कधीही कुणापाशी जवळ गेलेले पाहिले नाही. आणि आज तर लाडात येऊन तुझा हात चाटायला लागलेय!” बिल आश्चर्याने बोलत होता. तोच पुढे म्हणाला “मला वाटते त्याला तू आवडला आहेस.” “आमच्या दोघात काहीतरी साम्य दिसले असेल.” मी म्हणालो. आम्ही दोघेही बारिकराव, खारिकराव! मी हे मोठ्याने कसे म्हणेन?
“त्याचे नाव काय आही?” मी पुन्हा बिलला विचारले. “मिरॅकल,” बिल खिन्नपणे म्हणाला.”कारण अजूनही ते जिवंत आहे! जन्मल्यावर सुरवातीला बरेच दिवस हे पिल्लू फर आजारी होते.” “मी हेच पिल्लू घेणार.”मी जाहीर केल्याप्रमाणे म्हणालो. बिलने मोठ्या मायेने आणि कळजीपोटी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटले,” जॉनी, मला तुला दुखवावेसे वाटत नाही आणि तुला द्:खी झालेले मला पाहवणार नाही. तू त्याला घरी नेलेस आणि मिरॅकल गेला तर ! नुकताच तू फार मोठ्या जीवावरच्या संकटातून बाहेर पडला आहेस. आणि तुला लळा लावून मिरॅकल गेला तर? माझं ऐक. खरेच दुसरे कोणतेही घे तू ! ”
पण मिरॅकलला घेऊनच मी घरी आलो.
काही वर्षे गेल्यावर बाह्य रूप किती फसवे असते ते मिरॅकलने सिद्ध केले. जातिवंत पैदाशीचा असल्यामुळे त्याचा बांधाही भरला. माझ्यासारखाच चिवट पण जास्त काटक झाला. आम्ही एकमेकांपासून, कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्यायचे ते शिकलो. मिरॅकल आणि मी एक अभेद्य जोडी झालो होतो. मेनमधल्या एका लहानशा गावातल्या रस्त्यावरून तो मला शाळेत सोडवायला यायचा. पुन्हा घरी परतायचा. संध्याकाळी बरोबर पाचच्या ठोक्याला तो शाळेच्या फाटकापाशी माझी वाट पहात उभा असे. त्याच्याबरोबर घरी येतानाचा आनंद औरच असे.”
मी अणि मिरॅकल कायमचे जानी दोस्त झालो होतो. दिवस काही थांबत नसतात. मला कॉलेजच्या शिक्षणासाठी बोस्टनला जावे लागणार होते. तिथल्या प्रख्यात युनिव्हर्सिटीत मला शिष्यवृत्ती मिळाली होती. चांगले कॉलेज मिळाले, शिष्यवृत्ती मिळाली याचा आनंद होता पण मिरॅकलला सोडून जावे लागणार ह्याचेही दु:ख होते. वसतीगृहात पाळीव प्राण्यांना बरोबर राहण्याची परवानगी नव्हती. काय करणार? मिरॅकल मला सोडून कसा राहिल याची मला काळजी वाटत होती. मीसुद्धा त्याच्याशिवाय राहीन का असेही मला आतून वाटत होते. पण आई वडिलांनी आणि घरातल्या सगळ्यांनी “अरे, तू इकडे प्रत्येक मोठ्या सुट्ट्टीत येशीलच. त्या वेळी तू आणि मिरॅकल सतत बरोबरच राहणार की. ह्यासाठी शिक्षण सोडणार का?” असे सांगून माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
मी बोस्टनला जाण्यासाठी निघालो. आई वडिलांना,बहिण भावंडाना सोडून जाणे जीवावर येत होते आणि त्याही पेक्षा मिरॅकलला सोडून जाताना डोळ्यातले पाणी खळत नव्हते.
कॉलेज सुरू झाले. मी रमू लागलो. पण मिरॅकलची आठवण येतच होती. आणि एके दिवशी आईने ती बातमी सांगितली. ती ऐकल्यावर माझ्या तोंडून शब्द फुटेना. मिरॅकल नाहीसा झाला होता. मी गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी तो घरातून बाहेर पडला तो घरी परत आलाच नाही. घरच्यांनी सगळीकडे दिवसरात्र शोधले. रोज निरनिराळ्या दिशेने एकेकजण जात असे. पण मिरॅकल काही दिसला नाही. गावातले लोकही शोधाशोध करत होते पण कुणालाही तो आढळला नाही. मी रोज घरी फोन करून विचारायचो मिरॅकल सापडला का? घरी आला का? पण प्रत्येक वेळी आए बाबा भाऊ रडवेले होउन “नाही” म्हणत. गावतलया लोकांपैकी कुणालाही तो गावात किंवा आजुबाजूच्या गावात दिसला नाही. माझा भाऊ बहिण कितीतरी दिवस शाळेत संध्याकाळी पाच वाजता जाऊन उभे राहात. पण मिरॅकल तिथेही कधी आला नाही. शेवटी आई फोनवरून म्हणाली “जॉनी , मन घट्ट करायला हवे. मिरॅकल या जगात नसेलही.” मी मनात म्हणत असे, अरे माझ्या मित्रा आपण कायमचे एकत्र राहू असे मी म्हणत असे. आणि तू असा मध्येच मला सोडून गेलास? खोलीतल्या माझ्या मित्रालाही मिरॅकल आणि मी एकमेकाला किती जीव लावून होतो ते माहित
होते. माझा घरी फोन झाला की तोही मिरॅकलची चौकशी करायचा पण माझा पडलेला चेहरा पाहिला की पुढे बोलायचा नाही.
तरीही मी रोज घरी फोन करत असे. आई बाबा म्हणायचे,” अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस. अशी संधी तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मन शांत ठेव.” ते तरी मला दुसरे काय सांगणार? मित्र मला त्यांच्या बरोबर खेळायला, सहलीला ओढून नेत असत. मन रमायचे. पण मिरॅकल काही मनातून आणि डोळ्यांपुढून जात नव्हता.
मी आता घरी फोन करणेच बंद करून टाकले. घरचा येत असे. पण मी मिरॅकलची चौकशी करत नव्हतो. नाताळच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी गेल्यावर मात्र मी मिरॅकलला शोधायला बाहेर पडे. गावातल्या लोकांना निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. पण ते माझ्यावर चिडता नसत. म्हणत, किती महिने झाले आम्ही त्याला इथे पाहिले नाही. आई म्हणायची,”जॉनी वस्तुस्थितीला सामोरे गेले पाहिजे. मिरॅकल ह्या जगात नसणार.” मी काहीच बोलत नसे.
एक वर्ष उलटले. मी आणि माझा मित्र अंथरुणार पडून गप्पा मारत होतो . बोलता बोलता ” अरे आवाज कसला येतोय?” असे माझा मित्र म्हणाला.मी म्हणालो,” कसला आवाज? मला नाही ऐकू आला.” “दरवाज्यावर ओरखडल्यासारखे वाटले. ऐक, येतोय?” मी ताडकन उठलो. दरवाज्याकडे पळालो. दरवाजा उघडल्याबरोबर त्याने माझ्या छातीवर पाय टेकवून तो माझे गाल चाटायला लागला!
कूं कूं करत तो माझ्याकडेसारखा बघत राहिला. मी खाली वाकून त्याच्यासमोर बसलो. तो माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे पाहात राहिलो. पहिल्या दिवशी जसा तो मलूल चेहऱ्याने अजीजीने प्रेमाने माझ्याकडे पाहात होता तसेच आजही पाहात होता. माझ्या डोळ्यातले पाणी संपेना. तो आपले शेपूट सारखा हलवीत होता. माझे हात चाटत होता.
काय दुर्दशा झाली होती त्याची. सगळे अंग खरचटलेले, रक्ताने माखलेले. अंगावरची केसाची मखमल नाहीशी झालेली. हाडे बरगड्या वर आलेल्या. मिरॅकलचा नुसता सापळा राहिला होता. पण मिरॅकल परत आला होता !
माझ्या मित्राने विचारले, “वर्षापूर्वी मेनमध्ये हरवलेला हा तुझा कुत्रा? तो कसा असेल? मेनपासून शेकडो मैल,इतक्या दूरवरच्या बोस्टनला कसा पोचला तो? बोस्टनमध्येही त्याला आपले कॉलेज ही खोली कशी सापडली? कसं शक्य आहे हे?” “काहीही शक्य असते”मी पुटपुटलो. ” अरे, हा चमत्कार म्हणायचा की काय?”
मी मिरॅकलला थोपटत म्हणालो,” ‘हा चमत्कार’ आहे.”
[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]
khup chhan..dolyat pani aale..
Thanks Jaladi for your appreciative response.
Miracle indeed! Very heartening…