
माझ्यासारख्या अनेकांना हळहळ वाटेल असा दिवस. आठवणींनी हुरहुर लागेल. एकामागोमाग एक आठवणी येत राहतील. असा हा दिवस असेल!
काय होणार त्या दिवशी? कुणाच्या अध्यात ना मध्यात येणारी, कुणालाही कसलाही अडथळा न आणणारी , वर्षो न् वर्षे उन पाऊस थंडी वाऱ्यात निमुटपणे उभी असणारी ही पोस्टाची लोखंडाची किंवा बीडाची भक्कम तांबडी उभी पेटी, पोस्ट खाते काढून टाकणार आहे. तिची उचलबांगडी होणार आहे, अशी आताच WhatsApp वरून पुढे पुढे सरकत आलेली बातमी वाचली. आणि अरेरे! असं का व्हावं हा प्रश्न पडला.
अगोदर म्हटल्याप्रमाणे ह्या उभ्या गोल तांबड्या पोस्टाच्या पेटीला कोणी कधी धडकला, पडला असे ऐकल्याचे , गावातल्या संध्याकाळच्या लहानशा वर्तमानपत्रातही वाचल्याचे आठवत नाही. उलट कुण्या दमल्या भागलेल्याला टेकून,तिच्या खांद्यावर हात ठेवून, तिचा आधार घेता येत असे. एखाद्याला रात्री ‘जास्तच’ झाली तर तिच्या पाठीला टेकून घसरत खाली पडता येत असे! क्वचित कधी रस्त्यावरची एक दोन हाडतहुडत कुत्री एक पाय वर करून तिला मानवंदना देऊन पुढे जात!
अशा आमच्या ह्या नित्योपयोगी पोस्टाच्या उभ्या पेटीला, पोस्ट खात्याने आडवे करण्याचे ठरवले हे ऐकल्यापासून तिच्या आठवणी पुन्हाजाग्या झाल्या.
कायम तिथे असुनही नसल्यासारखी ही बुटक्या स्तंभासारखी पेटी कित्येकांच्या कित्येक गोष्टी आपल्या पोटात ठेवून घेत असे.व्यंकटेस्तोत्रातील दोन चरण सांगतात,” पुत्राचे सहस्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद। “ ह्यामध्ये बदल करून ही पत्रांची मायपेटीअनेकांच्या दशसहस्र भावनांची सहस्र पत्रे रोज आपल्या पोटात साठवून ठेवी. ठरल्यावेळी पोस्टमनच्सा भल्या मोठ्या थैलीत रिकामी करी.
लहानपणी दुपारच्या तीन- चार वाजता वारदाच्या कोर्टातलीअजून महानगरपालिका आली नव्हती तिथे) ही पोस्टाची पेटी उघडायला पोस्टमन येई त्यावेळी आम्ही लहान पोरे गुडघे वाकवून किंचित ओणवे होवून “आता काय होणार?” ह्या उत्सुकते माना पुढे करीत पाहात राहू. पोस्टमन पेटीच्या पोटाचे कुलुप उघडायला लागला की मनांत “ अरे, उघड लवकर रे बाबा” म्हणत असू. आणि ते लहानसे ,’स्वर्गाचे दार’ उघडण्या आधीच , “तिळा दार उघड”, “ खुल जा सिमसिम्” हे मंत्र प्रत्येक जण मनात घोकत आता कोणता खजिना बाहेर येणार ह्याची उत्कंठतेने वाटपाहात असू!
एक आण्याच्या पोस्ट कार्डापासून ते पोस्टाचेच तिकीटाचा उठावदार शिक्का असलेली पाकिटे, विकत घेतलेली आणि त्यावर पोस्टाची तिकिटे चिकटवलेली चौकोनी, लांबट फिकट निळसर रंगाची बदामी रंगाची पाकिटे, कोर्टाच्या आवारात असल्यामुळे कोर्टाती सरकारी शिक्के असलेली लांब ब्राऊन रंगाची पाकिटे. डाव्या कोपऱ्यात वकीलांची नावे छापलेली पाकीटे, त्यात कुणाला नोटीसा पाठवलेल्या असतील ; कुणाला माहित! नंतर अंतर्देशीय पत्रेही आली. वारदाची चाळ व आजूबाजूच्या चाळीतील लोकांची पत्रे; त्यात कधी एक दोन गुलाबी पाकिटेही असत. आमचा रसिक पोस्टमन ती पाकिटे थोडावेळ हातात घेऊन चेहऱ्यावर दिसेल न दिसेल असे हसुन आमच्याकडे पाहात इतर पत्रांसारखे भराभर दोन्ही हातांनी थैलीत न ढकलता, सावकाश आपल्या मोठ्या थैलीत ठेवत असे.
अनेक गावा शहरातील ह्या तांबड्या पोस्टाच्या पेटीतून कुणी कुणी काय काय लिहून पत्रे टाकली असतील. “ मुलीची कुंडली जुळते आहे” इथपासून ते “आम्ही ह्या तारखेला मुलगी पाहायला येत आहोत,” तर लग्नाच्या केशरी रंगात छापलेल्या व वर गणपतीचे चित्र असलेल्या निमंत्रण पत्रिकांची पाकिटेही किती आनंदाने मुलीच्या वडिलांनी किंवा भावांनी टाकली असतील!
त्या पेटीने “ बाळ बाळंतीण सुखरूप आहेत “अशी पेढे/ बर्फी वाटायला लावणाऱी पत्रेही पोटात ठेवून दुपारी पोस्टमनच्या थैलीच्या हवाली केली असतील. तर कार्डावर “श्री” न लिहिलेली “ कळवण्यास अत्यंत….” अशी शोककारी दुःखकारी पत्रेही तिने पोटात घेतली असतील. तर नोकरीसाठी केलेले प्रमाणपत्रांच्या प्रतींसह तरुणांनी मोठ्या अपेक्षेने पाठवलेले अर्जही असतील. आणि शिकला सवरला असला तरी त्या मुलाने अर्जाचे ते पाकीट पेटीची झडप वर करून टाकतांना व टाकल्यानंतर “उभा क्षणभरी” होऊन मनात पेटीला नमस्कार करीत “ इन्टरव्ह्यूचा कॅाल येऊ दे “! अशी नक्कीच विनवणी केली असणार. मी करत होतो म्हणून हे लिहू शकतो. तर तिकडून कधी “ तुमची निवड झाली असून ह्या ता.ला रुजू व्हावे” अशी आनंदाने उड्या मारायला लावणारी पत्रेही तिकडच्या पेटीने सांभाळून घेतली असतील!
किती तरुण तरुणींच्या हृदयांची धडधड, भेटीची, मीलनाची उत्सुकता,पुस्तकात वाचलेल्या नायक नायिकेच्या अशाच पत्रांतील काव्यमधुर वाक्येही उचलून ती तारकाफुले एकमेकांना पाठवली असतील! जोडीला सिनेमातील गाण्यांची एखादी ओळही रंगत वाढवत असतील. आणि आमच्या ह्या तांबड्या पोस्टाच्या पेटीनेही ती पत्रे तितक्याच हळुवारपणे आपल्या ढिगाऱ्यावर अलगद झेलली असतील!
दोन्ही बाजूंच्या वकीलांच्या नोटीसांचीही देवाणघेवाण ह्या पेटीमार्फतच होत असेल.परीक्षेचे निकाल जरी शाळा- कॅालेजातून, वर्तमानपत्रातून मिळत असे तरी काकांनी, थोरल्या भावाबहिणींनी केलेल्या कौतुकाची व लिहिलेल्या त्या पत्रातूनच एखादी पाच- दहा रुपयांची नोटही गुपचुप पाठवली असणार!
अशा अनेक भावभावनांचे आविष्कार रोज ह्या पेटीने पाहिले असणार . पण सुखदुःखे समेकृत्वा अशा स्थितप्रज्ञ वृत्ती असलेली पोस्टाची तांबडी पेटी खरोखर लोकोपयोगी होती ! ह्या रस्त्यावर उभ्या असलेल्या पेट्यांची धाकटी भावंडे सुद्धा लहान मोठ्या रस्त्यावरील विजेच्या किंवा टेलिफोनच्या खांबाला जाड तारेने तर काही ठिकाणी लोखंडी पट्ट्यांच्या ब्रॅकेटसने लावून ठेवलेल्या असत. आमच्या हायस्कूलच्या पोर्चच्या मोठ्या दगडी आणि देखण्या खांबालाही अशी पेटी होती.
काही काही भागात ह्या उभ्या असलेल्या पेटीत मात्र पत्रांबरोबरच इतरही काही पडत असे. आमच्या बरोबरीची काही खारबेळी पोरं अशा गमती करीत. “ अबे लच्छ्याने काल काय क्येलं त्ये माहित हाय का ब्येऽ ? त्येनी साला काल शाईची दौतच खाली केला बेऽ पोस्टाच्या पेटीत!” सगळेजण अस्सं केलं त्यांनं? चला बे त्या पेटीकडे. पोस्टमन यायची वेळ झालीच हाये की“ असे म्हणत सगळे, पण कोणी जायला तयार नसे.
पोस्टमन बिचारा काय करणार? त्याच्या हातात होते तेच त्याने केले. आठ दिवस फिरकलाच तो तिकडे. आठाचे दहा बारा दिवस होऊन गेल्यावर कोणी चार-पाच सज्जन हेडपोस्टात जाऊन त्यांनी साहेबाला सांगितले. साहेबांनी शाईने बरबटलेली कार्डे पाकिटे दाखवली. ते पाहिल्यावर काय बोलणार? .“तुमच्या भागातल्याच मुलांचे काम आहे.. म्हणून आम्ही पोस्टमन पाठवला नव्हता.” त्या लोकांनी सांगितले “पुन्हा असे होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो.” मग एक दोन दिवसांनी सुरळीत झाले. पोरांपैकीच कुणीतरी लच्छ्याचे नाव सांगितले असणार. त्याच्या बाबांनी त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे लच्छ्याच्या थोबाडात दोन चार झणझणीत लगावल्या. हेसुद्धा आम्हाला त्याच खबऱ्या पोरानेच त्याची भर घालून समग्र वर्णन करीत “ त्याच्या बापानं असं दणकं देऊन ठोकून काढलं लच्छ्याला! त्ये चड्डीतच … की बे!” सांगितले. आणि खरंच लच्छ्या तीन दिवस आमच्यात आलाच नाही!
पेटीत पत्र टाकल्यावर काही पोक्त , म्हातारे गृहस्थ पेटीच्या पाठीवर तर कुणी दोन्ही बाजूंवर हाताने मोठ्याने थोपटत. हे पाहिल्यावर आम्ही चार सहा पोरांनी एकदा विचारलेच त्यांना,” तुम्ही असे दोनदा तीनदा थोपटता का पेटीला?” त्यावर आम्हाला उत्तर ऐकायला मिळे,” मुलांनो! पत्र टाकल्यावर ते पेटीच्या पोटात गेले पाहिजे की. मध्येच तिच्या घशात अडकले तर?” हे ऐकल्यावर आम्हाला ते पटत नसे किंवा समजतही नसेल. पण आता लक्षात येते की कोणत्याही गोष्टीला मानवी रूप भावना देऊन तिला सजीव करण्याची ही आपली सवय आहे!
पेट्यांची सहज काही ठळक ठिकाणे लक्षात आली. प्रभात टॅाकीज जवळच्या पोलिस चौकी समोरची तांबडी मोठी उभी पेटी , सरस्वतीच्या देवळाजवळील चौंडेअण्णांच्या सायकलच्या दुकानासमोरील खांबावरची पोस्टाची पेटी , कोथरुडच्या पोस्टाच्या खिडकी बाहेरची लहान “ स्थानिक पत्रांसाठी”ची एक दुसरी “मुंबई “ साठी लिहिलेली अशा दोन पेट्या लटकलेल्या असत. आणि समोरच्या उघड्या जागेतील उभी पेटी,तर दादरला मावशीकडे गेल्यावर रोज दिसणाऱ्या रानडे रोडवरील किंवा राममारुती रोड ओलांडल्यावर बेबी बिस्किट मार्टच्या आसपास असणारी, तशीच शिवसेना (त्यावेळी ती नव्हती) भवनाच्या समोरील पेटी अशा ह्या लोकोपयोगी पेट्या डोळ्यांसमोर येतात. आज त्या, त्या ठिकाणी असतील का नाही हे माहीत नाही. पण ह्या पेट्यांत तसेच आमच्या गावच्या चौपाडच्या पोस्टातल्या भिंतीलाच एक मोठी खाच असलेली व पत्रे पोस्टाच्या खोलीत घसरत घेऊन जाणारी भिंतीतली अंगचीच पेटी, तर स्टेशन समोरच्या मुख्य पोस्टाच्या बाहेरील नेहमीपेक्षा जरा मोठी वाटणारी पेटी …. प्रत्येक गावातल्या अशा पेट्या आपल्या सर्वांच्या कामाला सहजपणे येत. कसलाही गवगवा नाही की सजावटही नाही. स्तब्ध राहात आपले काम चोख करणारी ही पेटी.तिच्यावर पेटी उघडण्याची वेळ लिहिलेली लहानशी पाटी छातीवर बिल्ला असावा तशी त्या पेटीवर असे. काही पेट्या दिवसांतून दोन वेळा उघडल्या जात. . एकदा उघडल्या नंतर पोस्टमन थैली सायकलला लावण्याआधी तीच लहान पट्टी उलटी करून नंतर केव्हा उघडणार ती बाजू दाखवायचा.
ह्या सर्व गोष्टींची आठवण झाली; ह्याचे कारण WhatsApp वरून आलेली एक सप्टेंबर पासून तांबडी पोस्टाची पेटी बंद होणार ही दुःखद बातमी.
चला! सरकार दुसरी काही तरी सोय करेल असे म्हणत गप्प झालो.
दुसरे दिवशी माझ्या मुलाने सांगितले की ही बातमी खरी नाही. पोस्ट खात्याने खुलासा केला की “ह्या पोस्टाच्या पेट्या बंद होणार नाहीत. सोशल मीडिया वरून चुकीची माहिती पसरवली आहे. १ सप्टेंबर पासून रजिस्टर्ड पत्रे व स्पीड पोस्ट ह्या सेवा एकत्रित होणार आहेत.”
हुऽऽश्श! बरे झाऽले ! वाईट बातम्या खोट्या ठरत नाहीत असे म्हटले जाते. पण हळहळ वाटावी अशी ही बातमी खोटी निघाली ह्याचा फार आनंद झाला. आपल्या सर्वांच्या उपयोगी पडणारी पोस्टाची ही १८१ वर्षांची परंपरा असलेली दीर्घायुषी तांबडी पोस्टाची पेटी चिरंजीवी राहील हे कळल्यावर आपल्या पोटा बरोबरच पोस्टाच्या पेटीच्या पोटातही आनंद मावेनासा झालाय!
