एकापेक्षा एक! एकातून अनेक!

रेडवुड सिटी

यु-ट्युबवर बरेच वेळा मी स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहात असतो. किती पदार्थ ! नव-नविन पदार्थ, माहित असलेल्या मिठाईचेही वेगवेगळे प्रकार, नेहमीचे पदार्थही किती वेगवेगळ्या रुपात येतात! थक्क होतो.
आपल्या घरीही आपण एका कणकेचीच(गव्हाच्या पिठाची) किती रूपे पाहतो, आणि किती विविध चवींचाआनंद घेतो! कोणतेही पिठ न मिसळता केलेली मुलभूत पोळी, पुऱ्या, त्या पुऱ्यांचेही पाकातल्या पुऱ्या, पाकातले चिरोटे ह्या गोड प्रकारांच्या बरोबरच आणखीही काही प्रकार जसे पाणी पुरी, तिखट-मिठाच्या पुऱ्या.बरं त्या तिखट मिठाच्या चवीला जर आणखी बढती द्यायची असली तर तिंबताना त्यात थोडे आंबट ताक घालायचे! बढतीच्या मजेबरोबर स्वादाचा बोनसही मिळतो. मेथीच्या, थोडे जिरे घालून केलेल्या पुऱ्यांचा झणकारा औरच. तशा नको असतील तर ताज्या मेथीच्या किंवा पालकाच्या पुऱ्याही मजा आणतात. ह्या पुऱ्यांना तसेच साध्या पुऱ्यांनाही वाळकाची कोशिंबीर किंवा नेहमीची कांदा-टोमॅटोच्या कोशिंबिरीची साथ असेल तर जवाब नाही.’टाॅप टेन’ गाणीही त्यापुढे बेसूर वाटतात. इतकेच काय साध्या पुऱ्यांबरोबर बटाट्याची भाजी नसेल तर त्यांना पुऱ्या म्हणत नाहीत! आणि त्यातच बरोबरीने श्रीखंड किंवा तुपाने थबथलेला,वेलदोडे खिसमिस तर असणारच, पण भरीला तुपात तळलेल्या पिकल्या केळ्यांच्या चकत्याही असलेला शिरा असेल तर मग ती जेवणाच्या वर्ल्ड कपची फायनलच! प्रत्येक घास त्या जल्लोषातच खाल्ला जातो!


पुरी-भाजी वरून आठवण झाली. बहुतेक सगळ्याच हाॅटेलात पुरीभाजी मिळत असे.पण शारदा स्टोअरवरून बक्षी ब्रदर्स कडे जाताना वाटेत टांगा स्टॅंडसमोरच तुषार हाॅटेल होते. रस्यावरच प्रवेशदार होते; त्यातून जरा आत जावे लागे. तिथे मिळणारी पुरीभाजी सालंकृत असे. मोठी प्लेट.फिकट गुलाबी- बदामी रंगाच्या फुगलेल्या पुऱ्या. बटाट्याची भाजी. भाजी बटाट्याची का,हा अडाणी प्रश्न विचारू नका. पुऱ्यांबरोबरची भाजी ही बटाट्याचीच असते हे समस्त बटाट्यांनाही माहित आहे. डाव्या बाजूला लालपिवळ्या तेलाचा किंचित ओघळ असलेले कैरीचे लालभडक लोणचे आणि वाळकाची कोशिंबिर.आणखी काय पाहिजे!


कणकेचा एक अवलिया अवतार म्हणजे आमटीतली फळं! तुपाची धार घालून ओरपून, मिटक्या मारून खाल्यानंतर पातेल्यात आमटी शिल्लक आहे की फळं हे शेरलाॅक होम्सच्या बापालाही न उलगडणारे रहस्य कायम राहते! “हेल्दि ”राहण्यासाठी फळं खा न खा पण ही फळं खाताना आणि खाल्ल्यावर साक्षात अमृताचे फळ जरी कुणी पुढे ठेवले तरी त्याकडे कुणी ढुंकुनही पाहणार नाही!

कणकेच्या पोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे दुधात तिंबून केलेल्या दशम्या; बहुधा ही दशमी रात्री केली जाते.घरातील वडील वयस्कर मंडळी ह्या दशम्यांचे खास गिऱ्हाईक.खरे फॅन! पण आपणही जेव्हा त्या खातो त्यावेळी दशम्यांच्या सात्विक चवीमुळे होणाऱ्या आनंदात आदरही मिसळलेला असतो!
थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी झाऱ्यावरच्या पोपया किंवा गाखर, दामट्या खाल्या नाहीत तर आपण लहान होतो की नव्हतो अशी रास्त शंका येते. थेट शेगडीवरच्या निखाऱ्यांवरच त्या गाखर/पोपई-दामट्या ठेवलेल्या झाऱ्याकडे पाहात,”झाली? झाली? “ विचारत, चांगली भाजल्याची तीन चार गालबोटं लागलेली ती पोपयी झाऱा आपटून ताटलीत पडली की जीव भांड्यात पडायचा.भराभ्भर व्हायच्या की पटापट ताटलीत पडायच्या. तुपाचा ठिपका टाकून फिरवला की ती पोपयी खुसखुशीत लागायची. तूप नसले तरी लोणच्याच्या खाराचे गंधही तिला तितकेच चविष्ट करायचे!


रविवारची दुपारची किंवा एखाद्या रात्रीची आमची जेवणं संपत आलेलीअसतात. आणि एक चमत्कार घडतो. परातीतले,पोळ्यांना लावण्याचे उरलेले पीठ किंवा भाकरीचे पिठ आणि तिथेच थोडीफार राहिलेल्या कणकेची नक्षीही त्यात कधी मिसळली गेली आणि हिंग मीठ कधी पडले हे समजायच्या आत पातळ केलेले ते लच्छीदार पीठ तव्यावर ओतले गेलेही! हे फक्त मोठ्याने चर्रर्र आवाज यायचा तेव्हा समजायचे! मग आता कोण हात धुवायला उठतो हो? आता तो तवा लोखंडी-तवा राहिलेला नसतो तर त्या ओतलेल्या पीठाचे ‘धिरडे’ नावाचे सोने करणारा परिस झाला असतो! हे फक्त त्या आयत्या वेळच्या धिरड्याचा रुपाया येवढा का होईना ज्याने गरम गरम घास खाल्लाय त्यालाच माहित असते.
बरं गव्हाच्या पीठाचे हे प्रकरण इथेच थांबत नाही गव्हाचाच, पिठा ऐवजी रवा मैदा झाला की त्यांचीही किती रूपे चाखायला मिळतात. शिरा,गुळाचा सांजा, रव्याचे लाडू, वड्या,उपमा, उप्पीट हे झाले आपले नेहमीचे. त्यांच्या गोडाच्या आवृत्याही असंख्य! गोड पोळ्यांचेही, पुरणपोळी, गुळाची पोळी, गुळाच्या सांज्याची किंवाशिऱ्याची पोळी,उसाच्या रसाची पोळी! अबब किती ते प्रकार! शंकरपाळ्यांचे प्रकार सांगायचे राहिलेच. गव्हाची खीर(हुग्गी)आणि त्याच कणकेचे लाडू कोण विसरेल?

स्वल्पविरामासारख्या गव्हले/ गव्हल्या,सहाणेवर झर्रकन वळवून केलेल्या प्रश्नचिन्हासारख्या मालत्या,तर दोन डब्यांवर ठेवलेल्या आडव्या काठीवर वाळत घातलेला दीर्घायुषी शेवयांचा संभार,तसेच टिकली येव्हढ्या पोह्यासारख्या नकुल्या,हे कसबी कलाकार सणासुदीच्या पंगतीना रंगत तर आणतातच पण लग्ना-मुंजीत हे रुखवत सजवून ते करणाऱ्यांच्या कौतुकांतही भर घालतात.

एका गव्हाच्या पीठाच्या पदार्थांची ही यादी अर्धवटच आहे. ती पुरी करण्याला किती दिवस जातील हे कुणी सांगू शकत नाही.

हे झाले एका गव्हाचे रामायण. तेही पूर्ण नाहीच. त्या पिठाची मिठाईतील रूपांतरे राहिलीच आहेत अजून. गव्हासारखीच ज्वारी,बाजरी,नाचणी,तांदूळ,भगर राजगिरा अशी किती तरी धान्यं रांगेत वाट पहात उभी आहेत.बरं,हरभऱ्याची डाळ, तुर-मुग,उडीद-मसूर ह्या डाळी व कडधान्ये, शेंगादाणे ही मंडळीही ताटकळत थांबली आहेतच. इतकेच काय पापड,सांडगे,वडे थापड्या,कुरडया आणि काय आणि किती! पण नाइलाज आहे.ही कधीही पूर्ण न होणाऱ्या,अव्याहत ज्ञानकोषासारखी, न संपणारी गोष्ट आहे.पण कुठेतरी ती थांबवली पाहिजे.

अन्नपदार्थ अनंत आहेत.त्याच्या विश्वाचा पसारा त्याहून अमर्याद आहे. एका दाण्यातून जिथे शेकडो दाण्यांनी भरलेली असंख्य कणसे डोलत असतात, तिथे एकातून अनेक हे फक्त ‘एकोSहं बहुस्याम’ अशी इच्छा झालेल्या परब्रम्हालाच लागू नाही; तर आमच्या रोजच्या आयुष्यातील,जेवणातल्या अन्नपदार्थांना ते जास्त लागू आहे. म्हणूनच न दिसणाऱ्या परब्रम्हापेक्षा आम्हाला आमचे रोजचे आयुष्य प्रसन्न आणि रंगीबेरंगी करणारे स्वादिष्ट-चविष्ट, खमंग-चटकदार,गोड,मधुर आणि तृप्त करणारे ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’च पुरे आहे. ते आमचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *