रेडवुड सिटी
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तम: ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित: पुरुषोतम: ।।१८।।
मी क्षराच्याही पलीकडचा आणि अक्षरपुरुषाहूनही उत्तम पुरुष आहे. ह्या लोकीच्या सर्व व्यवहारात आणि वेदांमध्येही मी पुरुषोत्तम म्हणून प्रख्यात आहे. ।।१८।।
मी क्षर आणि अक्षरपुरुषापेक्षाही केवळ वेगळा नसून वेदोपनिषदातील संज्ञा वापरायची तर क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांहूनही निरुपाधिक असलेला उर्ध्वतमच आहे. म्हणजे आकलन होण्यासाठी कठिण आहे.ह्या आणि इतर लोकींच्या सर्व पुरुषांहून मी श्रेष्ठ आहे हे तर निराळे सांगायला नको.
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविदभजति मां सर्वभावेन भारत ।।१८ ।।
ज्याने सर्व मोह दूर सारून माझी उपासना केली व मला जाणून घेतले तो ज्ञानी होऊन सद्भावपूर्वक मलाच भजतो.।।१८।।
ह्या श्लोकात ज्ञान झालेला ज्ञानसाधक भक्त सर्वत्र सच्चिदानंदालाच पाहतो, मी ब्रम्हरुप झालो असेही त्याला ज्ञान होते. तरीही तो संपूर्णपणे परब्रम्ह रूपात लीन झाला, त्याचे द्वैताचे भान पूर्णपणे लोपले असे म्हणता येत नाही. महत्वाचा जो भाग ‘मद्रूप’ होण्यास अजून किंचित का होईना राहिले आहे. जसे सूर्योदयाची चाहूल लागली आहे. आकाशात झुंजुमंजूचे रंग आले आहेत, केवळ सुर्योदयाचाच अवकाश आहे, अशी त्या साधकाची स्थिती आहे. त्यासाठी ज्ञानोत्तर भक्तीची आवश्यकता सांगितली व मोहाचा इतकाही अंश नको असे म्हटले आहे. असे सर्व मोह दूर सारून (इथे ‘मला आत्मज्ञान झाले’ हा अहंभावाचा मोह) भक्ती करणारा ‘मद्रुप’ होतो असे भगवंत म्हणतात.
त्या मद्रुप ज्ञानी भक्ताचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली
…….। मज पुरुषोत्तमाते धनंजया।
जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे।।५५९।।
मला ज्ञानसुर्याच्या प्रकाशाने जाणल्यावर सगळे जग तो एकरुपाने पाहतो. सर्वांभूती परमेश्वरच पाहतो. मनात द्वैत भावनेचा अंशही नसतो. असे झाले की तोही मीच होतो. आकाशाने आकाशाला मिठीत घ्यावे तसे.
ह्या श्लोकात मोह दूर सारून असे का म्हटले तर सर्व वासनांचा त्याग हा खरा संन्यास. ह्या अध्यायात विरक्ति वैराग्य दृढ व्हावे असे म्हटले आहे. त्याचाच हा पुनरोच्चार आहे. तसेच पुढच्या अध्यायात आसुरी संपत्तीचे वर्णन येणार आहे. आसुरी संपत्ती म्हणजे मोहांचा खजिनाच. त्याचे हे सुतोवाच असावे. मोहांचा त्याग केल्याशिवाय परमार्थात प्रवेश नाही!
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।
एतदबुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ।।२० ।।
हे अर्जुना हे गुह्यातले गूढतम शास्त्र मी तुला सांगितले. हे नीट समजून घेतल्याने मनुष्य बुद्ध म्हणजे बुद्धिवान, जाणता आणि कृतकृत्य होईल.।।२०।।
भगवान म्हणतात, अशा तऱ्हेने क्षराक्षर पुरुषांना बाजूस सारून जो मी पुरुषोत्तम त्याची भक्ति करून तू मद्रूप हो.
हा श्लोक पंधराव्या अध्यायाचा फलश्रुतीचा आहे.
ह्या अध्यायात गीतेच्या तत्वज्ञानाचे सार आहे. त्यामुळे समारोप करताना ते गीतेचेही वैशिष्ठ्य सांगतात.
सावचि बोलाचे नव्हे हे शास्त्र।पै संसारु जिणेते हे शस्त्र।
आत्मा अवतरविते मंत्रे। अक्षरे इये ।।५७०।।
हे गीता शास्त्र केवळ बोलण्या वाचण्याचा उपदेश नाही. त्यात सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसार जिंकण्याचे शस्त्रच आहे.( म्हणजे, गीतेत सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसारातील अडीअडचणी, संकटांवर मात करता येईल.) गीतेतील अक्षर न् अक्षर आत्म्याचे दर्शन घडवून देणारे मंत्रच आहेत.।।५७०।
माणसाने आपली चौकस बुद्धि, जिज्ञासा जर नेहमी जागृत ठेवली तर आपले ज्ञान वाढत राहते आणि ताजेही राहते. हा ज्ञानमार्गच आहे. आपली कामे लक्ष लावून मनलावून केली, आवडीचे न आवडणारे असा भेद न करता प्रत्येक काम आवडीचेच समजून ते आवडीने (Love’s Labour) ,आणि निस्वार्थीपणे केले ; आणि ते मलाच नव्हे तर सगळ्यांच्याच उपयोगी व्हावे ह्या भावनेने करणे, तर हा कर्मयोगच होईल; व्यवहारात अनावश्यक अहंकार न दाखवता, नम्रतेने बोलणे चालणे केले, (पण तेहीअनाठायी न होऊ देता) तर ते भक्तीमार्गाचेच एक रूप होईल.
परि हे बोलो काय गीता। जे हे माझी उन्मेषलता।
जाणे तो समस्ता। मोहा मुके।। ५८३।।
सेविली अमृत सरिता। रोग दवडूनि पंडुसुता।
अमरपणा उचितां। देऊनि घाली।।५८४।।
तैसी गीता हे जाणितलिया। काय विस्मयो मोह जावया।
परी आत्मज्ञानाने आपणपयां। मिळिजे येथ।।५८५।।
फार काय सांगू पार्था ! माझी ही ज्ञानलता गीता जो जाणून घेईल तो सर्वप्रकारच्या मोहातून मुक्त होईल व मद्रुप होऊन मला पावेल. माझ्या गीतारुपी अमृताचे जो सेवन करील तो फक्त रोगमुक्तच न होता अमरत्व पावेल. मग गीता यथार्थ जाणून घेतल्यावर त्याचा मोह दूर होईल ह्यात नवल नाही. तो आत्मज्ञानी होऊन मलाच येऊन मिळेल! ।।५८३-५८५।।
आचार्य विनोबा यांनी केलेल्या, पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या,पुरुषोत्तम योगाचे थोडक्यात आणि अचूक वर्णनाने आपण समारोप करू या. विनोबा म्हणतात, मत्सर अहंकार वगैरे दोषरहित बुद्धीने केलेल्या साधनेने,आत्मज्ञान प्राप्त होण्यात सर्वच कर्मांची समाप्ति होते.( काही करण्याचे राहात नाही). म्हणून ह्याला परमपुरुषार्थ म्हणतात. “आत्मज्ञानाची पूर्णावस्था म्हणजे पुरुषोत्तम योग !”
।। गुरुमहाराज की जय!।।