लोकलमध्ये गर्दी होती. तरीही आपल्या पुढच्या पाच सहा रांगांच्या पलीकडे एक पुरुष आणि बाई एकमेकांशी भांडताहेत, वादावादी चालली आहे हे टॉमी हॉइटने पाहिले. असेल त्यांच्यातली किरकोळ बोलाचाली म्हणून इतर अनेक प्रवाशांप्रमाणे त्यानेही दुर्लक्ष केले. पण नंतर त्याला ती बाई त्या माणसाला जोराजोरात ढकलते आहे आणि तो माणूस तिच्या गळ्याला धरून ओढतोय, बाईचा आवाजही वाढला आहे हे पाहिल्यावर मात्र टॉमीला राहवेना.
तो लोकांना बाजूला सारत तिकडे जाऊ लागला. तो माणूस त्या तरुणीच्या गळ्यातली साखळीओढतोय हिसडा मारतोय हे पाहिल्या बरोबर तो लोकांना धक्के मारत, बाजूला ढकलत पुढे गेला.
सगळे प्रवासी गारठून थिजून गेल्यासारखे बसले होते. एकही हरीचा लाल पुढे आला नव्हता. टॉमी मात्र बाईच्या मदतीला धावून चालला होता. ती बाई अजूनही त्या पुरुषाशी झगडत होती. “मी तो बदमाश साखळी घेऊन पळून जाण्या अगोदर तिथे पोचले पाहिजे” तो मनात म्हणत पुढे सरकत होता. टॉमी जवळ जवळ पोचलाच होता पण तेव्हढ्यात त्या बदमाशाने साखळी खेचून काढली होती. गाडी स्टेशनवर पोचली.फलाटावर उडी मारून तो माणूस पळालाही. “धावा! पकडा त्याला! माझी साखळी घेऊन तो पळाला! पकडा धावा! असे ती तरुणी ओरडायला लागली. टॉमीने त्या तरुणीकडे पाहिले. सुंदर होती. सोनेरी केसाची निळसर डोळ्यांची ती तरुणी सुंदर होती. मुलगी सुंदर, आणि तिच्या केसामुळे आणि निळसर डोळ्यांमुळे कुणाच्या लक्षात राहणार नाही? तरुण टॉमी तरी तिला कसा विसरणार होता? टॉमी दरवाजातून उडी मारत त्या चोराचा पाठलाग करू लागला. टॉमीने शेवटी त्या चोराला गाठलेच. त्याच्या हातातली साखळी ओढून घेतली. पण त्या गडबडीत तो चोर निसटून जोरात पळाला. आणि गर्दीत दिसेनासा झाला.”निदान त्या मुलीची साखळी तरी परत मिळाली.’ टॉमीने स्वत:चे समाधान केले.
टॉमी स्वप्नात असल्यासारखा विचार करत होता. मी विजयी मुद्रेने हसत तिची साखळी दिल्यावर ती काय म्हणेल? कशी बघेल माझ्याकडे? पण तो लागलीच भानावर आला. तो गाडीकडे जायला निघाला. ती गाडी निघूनही गेली होती. ” मी त्या चोराचा पाठलाग करत होतो तरीही कुणी गाडी थांबवली नाही? लोकांनी मी उडी मारली,पाठलाग करत होतो ते पाहिले नसावे? त्या मुलीलाही माहित नव्हते की मी तीची साखळी परत मिळवण्याच्या धडपडीत होतो? शक्य आहे कुणालाच माहित नसावे.”हेच विचार त्याच्या मनात होते. एक नक्की, मुलीला खूष करून आपले “इम्प्रेशन”मारावे म्हणून काही त्याने आपला जीव धोक्यात घतला नव्हता. त्या वेळेस अशा लुटारूना पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले पाहिजे, त्याला अगोदर पकडले पाहिजे ह्याच विचाराने त्याने ह्यात उडी घेतली होती.
टॉमी एकदम निरुत्साही झाला. मी धाडस दाखवले, माझा जीव धोक्यात घातला त्याची कुणालाही खबर नव्हती ह्याचे त्याला आश्चर्य वाटत होते. “आता पुढे काय करायचे?” ह्या विचारात तो होता. जर त्या मुलीने मला उडी मारून त्या चोराचा पाठलाग करतोय हे पाहिले असेल किंवा कुणी तिला सांगितले असेल तर ती माझे आभार मानायला इथेच येईल. काय झाले कसे पकडले त्या चोराला, विचारायला येईल. हा विचार करून तो वाट पाहत थांबला. एक तास होउन गेला तरी ती आली नाही. त्याची खात्री झाली की त्या मुलीला मध्ये रामायण काय घडले त्याची काही कल्पना नसणार. आपले धाडस, शौर्य, कारणी लागले नाहीअशी खंत करत तो निघाला. “ह्या साखळीचे मी काय करू? पोलिसांना देऊ? पण तिला आपली साखळी मिळाली आहे हे जर माहित नाही तर ती पोलिसाकडे जाईल कशाला? नाही हे काही खरे नाही..” टॉमीच्या मनात विचारचक्र चालू होते. त्याने ती साखळी आपल्याजवळच ठेवली.
जेव्हा केव्हा ती साखळी त्याच्या हाताला लागे तेव्हा तो चित्रपट ‘फ्लॅश बॅकने’ डोळ्यांसमोर चालू व्हायचा ! पण फार तर सहा सात महिने चालले. नंतर तो आपला पराक्रम विसरल्यासारखा झाला. पण तीन वर्षे उलटून गेली तरी त्याच्या दिलाची ‘डिंग डाँग’ ‘सपनो की राणी’ त्याच्या मनातली चांदणी मात्र विसरू शकला नव्हता. गेल्या तीन वर्षात त्याला ती कुठेही दिसली नाही !
तो मॅनहॅटनच्या मधल्या भागातील एका बारमध्ये गेलाअसता बारच्या उंच स्टुलावर ती बसलेली दिसली. तिच्या जवळ जाऊन त्याने एकदम लोकल गाडीतल्या त्या घटनेची अगदी थोडक्यात आठवण करून दिली. आणि नाट्यपूर्ण पद्धतीने तिची साखळी तिच्यासमोर धरली. ती डोळे विस्फारून आश्चर्याने पाहू लागली. साखळी हातात घेत ती त्याचे आभार कसे मानावेत ते न सुचून आपल्या निळसर डोळ्यांनी टक लावून त्याच्याकडे पाहात राहिली .
क्षणभराने ती म्हणाली “ही साखळी म्हणजे माझा जीव की प्राण आहे.त्यामुळेच मी त्याला ती काढू देत नव्हते. आकांताने भांडत होते. बाकीचे सर्व सोडून दिले तरी ही साखळी माझ्या आजीची आहे. तिने ती मला कौतुकाने दिली होती… माझ्या आजीची ही आठवण आहे.” असे म्हणत तिने ती साखळी आपल्या डोळ्यांना लावून तिचा मुका घेत गळ्यात घातली.
तिने त्यानंतर सगळी हकिकत सांगितली त्यावरून त्या स्टेशनच्या फलाटावर त्याने केलेला तर्कच खरा ठरला. गाडीतल्या लोकांना आणि तिलाही त्याने केव्हा उडी मारून चोराचा पाठलाग सुरू केला काही दिसले नव्हते,माहित नव्हते !.
तिने त्याच्याकडे डोळे किंचित झुकवून, “तुला मी काय देऊ म्हणजे तुझी मी उतराई होईन?” असे विचारल्यावर ” आज तर भेटायचेच पण त्यानंतरही रोज भेटायचे. बस्स, इतकेच पुरे मला!”
हे ऐकून दोघेही खळखळून हसले.
त्यांचे लग्न होउन पाच वर्षे झाली आहेत. न्यूयॉर्कच्या एका रेडीओ स्टेशनवर व्हॅलेंटाइन डे निमित्त झालेल्या कर्यक्रमात टॉमीने त्यांची प्रेमकहाणी सांगितली. योगायोगाची ही हकिकत सांगताना तो म्हणाला ,”तिला तिची साखळी मिळाली पण ‘रत्न’ मलाच मिळाले” !
[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]