काय लहर आली कुणास ठाउक ! पण एका लहान मुलाच्या मनात आपण देवाला भेटून यावे असे आले.
मुलाने आपल्या बॅकपॅकमध्ये दोन दिवसाचे कपडे भरले. आणि मधल्या सुट्टीतल्या खाण्याचा डबा भरून घेतला. पाण्याची बाटलीही घेतली. सवयीप्रमाणे कॅप उलटी घालून, “आई जाऊन येतो “ म्हणत दरवाजा धाडकन ओढून निघालाही.
खूप चालून झाले. मुलगा दमला. एका पार्कमध्ये बसला. घोटभर पाणी प्याला. माथ्यावरचा सुर्य थोडा ढळला होता . त्याने आपला डबा काढला. आईने दिलेल्या पोळीच्या भरलेल्या सुरळ्या खायला लागला. तितक्यात त्याला जवळच बसलेली एक बाई दिसली. त्याच्या आईपेक्षा मोठी होती. ती मुलाकडे ‘हा छोटासा मुलगा काय करतोय्’ हे हसून पाहात होती. मुलाला तिचे हसणे इतके आवडले की त्याने तिला जवळ जाऊन आपल्या पोळीचा घास दिला. तो तिने न खळखळ करता सहज घेतला. खाल्ला. आणि ती मुलाकडे पाहात हसली. मुलाला आनंद झाला. त्याने तिला आणखी एक पोळी दिली. तीही तिने न बोलता घेतली, खाल्ली आणि ती पुन्हा हसली. तिचे हसणे पुन्हा पुन्हा पाहायला मिळावे म्हणून तो मुलगा एक घास खाऊन दुसरा घास तिला देई . प्रत्येक घासाला तिचे हसणे त्याला पाहायला मिळे. दोघांचे बोलणे मात्र काही झाले नाही. मुलगा आणि ती बाई आपल्यातच जणू दंग होती.
बराच वेळ झाला. सुर्य मावळतीला आला. उशीर झाला असे मनाशीच म्हणत मुलगा उठला. डबा बॅगेत टाकला. निघाला. दह पंधरा पावले पुढे गेला असेल. त्याने मागे वळून पाहिले. बाई तिथेच होती. मुलगा पळत तिच्याकडे गेला. तिला त्याने आनंदाने मिठी मारली. बाईसुध्दा त्याच्याकडे हसत पाहात त्याचा मुका घेत हसत पाहू लागली.
मुलगा घरी पोहचेपर्यंत अंधार होऊ लागला होता. मुलाने बेल वाजवली. दरवाजा आईनेच उघडला. इतके दूरवर चालत जाऊनही मुलाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून तिने विचारले,” अरे ! काय झाले आज तुला? इतका मजेत दिसतोस ते!
“आई आज मला एक बाई भेटली. तिचे हसणे इतके सुंदर आणि गोड होते म्हणून सांगू! काय सांगू! मी इतके सुरेख छान हसणे कधी पाहिलेच नव्हते. हो, खरंच सांगतो आई!” आणि ते हसणे व तो हसरा चेहरा पाहाण्यात पुन्हा रमला.
बाईने दरवाजा उघडल्यावर सर्वात मोठा मुलगा म्हणाला,” आई आज काही विशेष झाले का? नेहमीच्या पार्कमध्येच गेली होतीस ना? किती प्रसन्न दिसतोय तुझा चेहरा आज! फिरून आल्यावर इतकी आनंदी पाहिली नव्हती तुला!
“अरे आज फार मोठी गंमत झाली. आज मला देव भेटला! खरेच! देव भेटला मला. पण देव इतका लहान असेल अशी माझी कल्पना नव्हती ! अरे त्याच्या बरोबर डबा पार्टीही केली मी!” सोफ्यावर बसत ती म्हणाली. पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर तिला तो मुलगा दिसू लागला.
१९ मार्च २०२१ युट्युबवरील एका स्थळावर वाचलेल्या अति लघु बोधकथेवर आधारित.अशाच किंवा ह्याच कथेवर एक short film ही आहे असे वाचले.