पुरावा

पुणे जिल्ह्यात तळेगाव आणि त्याच्या परिसरात बटाट्याचे पीक घेतात. सर्वच शेतकऱ्यांची जमीन फार नसते. गरीबाची तर वाटण्या होत होत अर्धा पाऊण एकरापर्यंत आलेली असते.
शेतमजुराचा कसातरी शेतकरी झालेल्या म्हादबाचाही असाच तुकडा होता. तो आणि बायको ‘आवडीने भावे’
बटाटा लावत. नंतर मुलगा मोठा झाल्यावर तोही शेतीचा तुकडा नांगरायला मदत करत असे. म्हादबा आणि बायको विशेषत: त्याची बायको फार उत्साहाने बटाट्याची लागवड करीत असे. असे पोटापुरते बरे चालले होते.

म्हादबाची बायको गेली. म्हादबा आणि मुलगा दोघेच राहिले. पण नांगरणी पेरणी चालूच होती. म्हादबा म्हातारा झाला होता. कसेतरी बटाट्याचे काम रेटत होता. पण यंदा मात्र म्हादबाला काय करावे ते सुचेना.

बटाट्याचे डोळे पेरायची वेळ आली. पण म्हादबाच्या नांगरणीलाच पत्ता नव्हता. थकला होता. काय करावे ह्या विचारात पडला. आता पोरगा जवळ पाहिजे होता असे त्याला फार वाटू लागले. मुलाने मदत केली असती.पण ….

….पण म्हादबाच्या मुलाला तीन चार महिन्यापूर्वी गावच्या वरच्या वस्तीतल्या कुणीतरी खोटानाटा आळ घालून पोलिसात तक्रार करून तुरुंगात बसवले होते. गरीबाला न्याय म्हणून तारखावर तारखाच मिळतात. जामिनावर सोडवायला जामिनदार तर लागतोच शिवाय पैसा. म्हादबाने पैका नाही दातावर मारायला म्हणून वकील वगैरे काहीच दिला नाही.फौजदार हाच त्याचा न्यायाधीश. तोच त्यालामाहित होता.फौजदारापुढे गयावया करून दीनवाणेपणे हात जोडून “साहेब त्याने काय बी क्येलं न्हऊ; सोडा लेकाला”असं पहिल्या तीन चार हेलपाट्यात विनवण्या केल्या. प्रत्येक वेळी फौजदारसाहेब गुरगुरत,मुठीची छडी फिरवत, टेबलावर आपटत,” म्हाताऱ्या पुरावा सापडत नाही म्हणून ते बेनं इथच आहे. पुरावा मिळू दे मग आर्थर रोडलाच जाईल तो. बघच तू” असे बोलून म्हादबाला धुडकून लावायचा. म्हादबाने पुढे जिल्ह्याच्या ठाण्यातही जाणे सोडून दिले. पैसा आणि तब्येत दोन्ही खालावलेलीच होती.

म्हादबा सुन्न होऊन बसला.शेवटी शेजाऱ्याला हाक मारली. त्याने म्हादबाच्या खांद्यात हात घालून उठवले. म्हादबाने पत्र्याच्या डब्यातून एक दोन चुरगाळलेल्या नोटा, काही नाणी घेतली. शेजाऱ्याने हात धरून म्हादबाला हमरस्त्याच्या फाट्यावर सोडले. शेजारी थोडा वेळ थांबला. पण नंतर निघून गेला. वाट बघितल्यावर,बघितल्यावर सहा शीटाची रिक्षा चौदा पॅसिंजर घेऊन आली. म्हादबाला पाहिल्यावर थांबली. म्हादबाला रिक्षापर्यंत त्यातल्याच एकाने आणले.आता बसायचे कुठे ह्या पेक्षा कुठल्या सळईला धरून अर्धे ढुंगण कुठ्ल्या पत्र्याच्या कडेला की कुणाच्या गुढघ्याला टेकायचे हा विचार करायलाही वेळ न देता फक्त म्हादबा कसाबसा लटकला ते पाहून रिक्षा निघालीही होती!

म्हादबा जिल्ह्याच्या तुरुगांत गेला. बाहेरच्या दरवाजापासून जो दिसेल त्याला, पोराला भेटायचे कुठे, कसे भेटायचे विचारत होता. कोण ऐकतेय? पण अखेर कुणाला तरी ऐकू गेले. तास दीड तास झाल्यावर म्हादबाची व पोराची भेट झाली. पोराच्या जवळ दोन जेलचे पोलिस होते. म्हादबा पोरालाम्हणाला, “पोरा मी थकलो रे. तुझी आई बटाटे लई सुगतीने लावायची रे. पर अजून नांगरटच झाली नाही. मी असा. तू इथं जेलात. घरी असतास तर तूच नांगरलं असतस. बटाटेही तूच लावले असतेस.पण आता कुणाला तरी मदतीला बोलावून नांगरून घेईन. काय करणार?”

ते ऐकून पोरगा गप्प बसला. बोलेना. म्हादबा पाहात होता त्याच्याकडे. पोरगा ते ऐकून गांगरल्या सारखा झालाय. तोंडावरून हात फिरवित पोराने तोंड बाजूला फिरवले. ते पाहून पोलिस जरा जवळ आले. बाहेर म्हादबाच्या बाजूलाही ठाण्याचा पोलिस होता. पोराने म्हाताऱ्याला जवळ येण्यास खुणावले.म्हादबाला कळेना की शेताची नांगरणी करायची ऐकल्यावर पोरगा घाबरल्या सारखा का झाला !
मुलगा मग थोड्या हळू आवाजात बेड्याचे हात जोडून बापाला म्हणाला,” तात्या, तसलं कायी कराचं न्हाई.काही झालं तरी नांगरायचा नाही तुकडा. कुणालाही बोलवू नको.सांगून ठिवतो. अरं तात्या तू नांगरलंस तुकडा तर मी लपवलेले पाच सहा गावठी कट्टे सापडतील की रं माझ्या बाबा!”
म्हादबाचा विश्वासच बसेना. तोंड आ करून, डोळे फाडून हे आपलंच पोरगं बोलतेय का असं, पोराकडे बघत राहिला. कपाळावर हात मारून बाहेर पडला.

पुन्हा तशाच सहा आसनी रिक्षात ‘तिरपांगडे आसन’ करत फाट्यावर आला. हातापायातली सगळी शक्ती गेली होती. म्हादबाचा चेहरा वीज पडून काळाठिक्कर पडावा तसा झाला होता. घरी तो कसा आला, घरी कुणी आणून सोडले काही त्याला समजत नव्हते. रांजणातलं पाणी घटा घटा प्यायला. गिपचिप पडून राहिला.

दुसरे दिवशी पहाटेच पोलिसांची जाळ्या लावलेली मोठी निळी मोटार आली. भराभर तीन चार पोलिस व काही मजूर उतरले. म्हादबावर मोठ्याने ओरडून नंतर एक लाथ घालून त्याला उठवले. नांगर कुठाय असे काही विचारत नांगर कुदळी फावडी घेऊन म्हादबाच्या तुकड्याची चिरफाड सुरु झाली. गावातले लोक मजा पाह्यला आले. त्यापैकी काही जणावर डाफरत पोलिसांनी त्यांनाही नांगरायला खणायला जुंपले. गावात बातमी पसरलीच होती. तक्रार करणाराही चार जणांना घेऊन आला होता. सगळे जण”म्हादबा, त्याचे पोरगे किती साळसूद आहेत पण हे सगळं वरून कीर्तन आणि आतून तमाशाच आहे हे पटलं ना आता?” अशी चर्चा करत होते. म्हादबाला शिव्या शाप देणेही चालूच होते. पोलिस जाऊद्या. दांडकी हाणून थेरड्याला गावा बाहेर करू असे ठरवत होते. दिवस वर येऊनही बराच वेळ गेला होता. कट्टे काही सापडले नाहीत. तक्रार करणारा आणि त्याचे चार सहा डावे उजवे हात पोलिसांना अजून खणा,अजून खणा,नांगरा म्हणत होते. “अहो दादा काय बोलताय? इतकं खणून झालंआता. आणखी खणून काय पाझर तलाव करायचाय का इथं ? आं?“

गर्दी पांगू लागली. म्हादबा डोक्याला हात लावून मान गुडघ्यात घालून बसला होता. तोपर्यंत गावातल्या कुणीतरी पोलिसांना चहा आणि वडापाव आणला होता. मजूर इकडे तिकडे गेले.
पोलिसांनी “कट्टा वगैरे काही मिळाले नाही आणि इतर केलेल्या सगळ्या गोष्टीचा” पंचनामा केला. दोन तीन लोकांच्या सह्या घेतल्या. म्हादबाच्या बखोटीला धरून उभे केले. त्याच्या दोन खोल्यात जाऊन सगळी उलथा पालथ केली. काही मिळाले नाही. त्याचा राग येऊन पोलिसांनी म्हादबाला गालफडात एक जोरदार थप्पड आणि पुन्हा एक कंबरेत लाथ घातली. त्याला धरून मोटारीत ढकलले.बरोबर आणलेल्या मजुरांना घेऊन पोलिस जिल्हा ठाण्यावर आले. तिथे म्हादबाला सोडले. पोलिस गेले. म्हादबाची चौकशी केली.पुन्हा त्याला तुरुंगात घेऊन गेले. पोराची आणि म्हादबाची भेट झाली.पोलिस होतेच बाजूला. म्हादबा पोराला म्हणाला, “ल्येका आज लई लाथा बुक्क्या खाल्या तुझ्या पायी. आता किती दिस राहीन रं सांगता येत न्हाई.अरं घर उस्कटून टाकलं. पोरा आपल्या सगळ्या तुकड्याचा कोपरा नं कोपरा नांगरून खणून काढला रं ह्यांनी.”

म्हादबाचा मुलगा हसत हसत म्हणाला, “तात्या! तुरुंगातून मी तुला दुसरी काय मदत करणार? जमली तेव्हढी केली !”

सदाशिव पं. कामतकर

(एका अति अति लघुबोधकथेच्या मध्य कल्पनेच्याआधारे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *