फुलेच फुले

 रेडवुड सिटी

फुलेच फुले 

परवा, कोल्हापूरहून निघणाऱ्या ‘ लोकमत’ आवृत्तीतील पळसाच्या फुलांचा सुंदर फोटो असलेला आणि त्या झाडाच्या गुधर्माविषयीचा एक चांगला लेख वाचायला मिळाला. 

बरेच वर्षांनी चित्रात का होईना पळसाची फुले पाहायला मिळाली. नोकरीतल्या फिरतीत ही लाल अग्निफुलांच्या ज्योतींनी बहरलेली झाडे पहायचे भाग्य लाभत होते. त्याला ज्वाळासारखी दाहक उपमा दिली असली तरी उन्हाळ्यात ती फार नेत्रसुखदायी होती. ती फुले पाहताना उन्हाळ्याचा रखरखीतपणा एकदम कमी होऊन तांबड्या रंगाचा गारवा जाणवायचा. आधीच उन्हाचा ताप, झळा आणि त्यातच बसमधल्या गर्दीमुळे वाढणारा घाम,प्रवाशांच्या चढ-उतारीची गडबड-गोंधळ, बडबडीची गडबड ही सर्व त्या रंगीत लाल फुलांमुळे कानामागे पडायचे. तहान लागली वाटत होती तीही भागलेली असायची ! साधारणत: गारवा हा हिरवा म्हटला जातो. पण पळसाची तांबडी फुलेही त्या त्या क्षणी थंड वाटत. अजिंठ्याच्या डोंगरकड्यावरून, चाळिसगाव-कन्नड घाटातून किंवा कधी सिन्नर तर लळिंगच्या डोंगराजवळून जाताना, तसेच यवतमाळच्या जंगलातून अकोल्याकडे येताना ह्या विस्तवाच्या फुलांचे सुभग दर्शन होई!  पळसाच्या तांबड्या फुलांचे हे आयते सर्वांसाठी भरवलेले प्रदर्शन पहायला मिळे!

ह्या तांबड्या लाल पळाशफुलांच्या जोडीनेच एका पिवळ्या फुलांनी लकडलेल्या झाडांची आठवण झाली. झाडांची म्हणायचे खरे पण ती फुले त्यावर लकडली होती म्हणून झाडे म्हणायची इतकेच. नाहीतर त्या पिवळ्या सोन्याच्या तितक्याच शांत पण तजेलदार, झळाळीत फुलांनीच आपल्या शोभेसाठी असावीत म्हणून उदार मनाने ठेवलेल्या चारदोन दिसणाऱ्या पानांच्या फांद्यामुळे त्यांना झाडे म्हणायची. त्या पिवळ्याधमक फुलांच्या घोसात कुणाचे लक्ष जाणार झाडाकडे? 

नगरला जाताना थोडे गावाबाहेरच पीडब्ल्यूडीच्या साहेबांच्या मुख्य आॅफिसच्या दहाबारा दगडी बैठ्या इमारती होत्या. आवार मोठे. त्या इमारतींच्या आसपास बाहेरील कुंपणाच्या भिंतीलगत  बहाव्याची म्हणजे कॅशियाची बरीच झाडे होती. ( कॅशिया म्हणजेच बहावा की निराळी ते नक्की माहित नाही) ती फुलली की सगळीकडे सोनेरी प्रकाश पडल्याचा भास व्हायचा. सूर्य ढगाआड गेलेला असला तरीही! सर्व आवार त्या फुलांच्या प्रकाशातच वावरत असायचे. काय ते पिवळे घोस! भरघोस हा शब्द त्यांच्यासाठीच किंवा त्या फुलांच्या घोसांनीच स्वत:साठी केला वाटावे असे ते लकडलेले असायचे! बरे, विशेष चमकदार वगैरे काही नव्हते. पण त्यांची ताजी टवटवीच उल्हसिता होती! 

फुलांचे झुबके त्यांच्या वजनाने खाली झुकलेले. वाऱ्यासंगे किंचित डोलणारे, जसे तरुणीच्या कानातील आभूषणांची मोहक आणि आकर्षक हालचाल वाटावी असे ते दृश्य दिसे. बाजारपेठेतील सोन्याचे दुकानदार भाजी फळांसारखे आपल्या पाट्या टोपल्या सोन्यांनी भरून बसलेत की काय असा तो पिवळा त्या आवारात व रस्याच्या कडेलाही बहरला होता! बालकवींनी पाहिले असते तर सुवर्ण चंपकाऐवजी तितक्याच आनंदाने ‘ सुवर्ण कॅशिया फुलला विपिनी ‘ म्हणाले असते!  

सोने पिवळे, ‘पिवळे पिवळे ऊन्ह कोवळे ‘ किंवा हळदीसारखा पिवळा हे फक्त त्या फुलांच्या घोसांचा पिवळा रंग लक्षात यावा एव्हढ्यासाठी. पण तो पिवळा किती व कसा,त्याच्या छटा शब्दात सांगणे कठिणच आहे. हे कॅशिया किंवा बहाव्याच्या फुलांचे रम्य दृश्य नगरला जाताना – तिथून घरी परतताना दिसायचे. 

हा पहिला बहर पाहिला त्या आनंदाच्या भरात मी घरी मुलांनाही ह्याचे पत्र लिहिले होते. त्यात,ओघात, संत निळोबारायांनी केलेल्या ज्ञानेश्वरांच्या आरतीतील   ‘सुवर्णपिंपळ असुमाय’ चाही उल्लेख होता. त्याच पत्राची नक्कल करून मी उत्साहाच्या भरात पीडब्ल्यूच्या मुख्य अभियंत्यानांही ते पाठवले होते! त्या साहेबांना मी त्यांच्या आवारातील हे फुलांचे सौदर्य नजरेस आणून दिले असे मला वाटले. त्यांच्या कार्यालयाने ही झाडे लावून दिलेल्या आनंदाबद्दल आभारही मानले. पण त्यांनी कुठला कोण वेडा माणूस म्हणत माझे नाव पत्ता ठाण्याच्या आणि येरवड्याच्या हाॅस्पिटलला कळवला असेल!  

पिवळ्या कॅशियावरून आणखी एका अविस्मरणीय पिवळ्या फुलांनी बहरलेल्या हजारो रांगांची आठवण झाली. ती सांगतो आणि हा पिवळ्या फुलांचा प्रसन्न रंगीत चष्मा बाजूला ठेवतो.

तो काळ सूर्यफुलांच्या लागवडीचा प्रारंभाचा  होता. करडई शेंगादाणे तीळ यांचे पिक वाढत नव्हते आणि त्यांचे भावही परवडणारे नव्हते. व तेलाचाही  त्या प्रमाणात भरपूर उतारा नसे. रशियाकडून सूर्यफुलांच्या तेलाची महति कळली. आपल्याकडेही त्याची शेती सुरु झाली.कुणाच्या बागेत एखाद दुसरे झाड दिसणाऱ्या सुर्यफुलांची आता राने बहरू लागली. 

माझ्या फिरतीत बीड जिल्ह्यातील तेलगावला गेल्यावर तिथे दुतर्फा सूर्यफुलांची मोठी पदके पाहिली! प्रथमच येव्हढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पिवळ्या पाकळ्यांच्या सहस्रकिरणांचे तेजोवलय मिरवित, ऐटीत उभे असलेल्या टपोऱ्या काळ्या डोळ्यांची ती फुले पाहिल्यावर थक्क झालो होतो. चौफेर,नजर फिरवावी तिकडे ही सोन्याची तळहाता एव्हढी मोठी पदके उन्हात हसत पाहताहेत असा भास होत होता! एकदा वाटले प्रभाशंकर कवडी इथे येऊन ह्या फुलांना डोळे देऊन गेले की काय? 

हे प्रभाशंकर कवडी कोण ? चित्रकार. त्यांची चित्रे किशोर मासिकात बरीच वर्षे त्यातील कथा लेख सजवत होती. इतर काही प्रसिद्ध मासिकात, काही जाहिरातीतही ते चित्रे काढीत. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे डोळे. ते मोठे टपोरे आणि गोल असत. बुबुळांच्या ह्या एकमेव आकार आणि ठसठशीतपणावरून व चेहऱ्यांच्या गोलाईवरून हे कवडींचे चित्र पटकन ध्यानात येई. सूर्यफुलांचाही मध्यगोल तसाच ठसठशीत आणि एकदम स्पष्ट नजरेत भरणारा! 

एका ओळीत उभे राहिलेल्या सूर्यफुलांच्या रांगाच्या रांगा हासुद्धा एक वेगळाच अपूर्व देखावा होता. आजूबाजूला काही नाही. घरेही तशी दूरच होती. सुर्यफुलांच्या शेकडो हजारो खड्या सैनिकांनी घातलेल्या वेढ्यात मी एकटा. बरोबर ड्रायव्हर. पाहातच राहिलो आम्ही! वरून एखादे विमान येत नव्हते; ते असते तर हिचकाॅकच्या North By Northwest ची आठवण झाली असती! 

1 thought on “फुलेच फुले

  1. Mrunmayee Kulkarni

    Wow! what a colorful article. I have always loved Cassia(Indian Laburnum) since my childhood and such a wonderful description of that took me back to those times. Keep the articles coming!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *