बेलमाॅन्ट
परळी वैजनाथ गावात नागा नावाचा ब्राम्हण आपल्या कुटुंबासह राहात होता. गावाबाहेरच तो एका झोपडीत राहात असे.पुढची मागची मोकळी जागा रोज शेणाने सारवली जायची. शेणसड्यांनी शिंपली जायची. झोपडी आतून बाहेरून स्वच्छ असायची. सदाफुली,गुलबक्षी कोरांटीची तीन चार फुलझाडे त्या झोपडीला शोभा आणीत. गावात आणि आजूबाजूच्या दोन तीन वस्त्यांमध्ये भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. रोज रात्री गावातल्या देवळात हरिरसगुण गात कीर्तन करायचा. नागाच्या रसाळ कीर्तनाला लोकही गर्दी करीत. झोपण्या अगोदर घरातील सगळे मिळून थोडा वेळ भजन करून झोपी जायचे.
सगळ्यांशी मिळून मिसळून आणि कोणाच्याही ना अध्यात ना मध्यात असे त्याचे वागणे होते. सर्वांशी नेहमी शांतपणे गोड बोलायचा. इतकेच नव्हे तर गायी वासरेही नागा चालला की त्याला खेटून चालत. तो दिसला की धावत येत. मान हलवून गळ्यातली घंटा वाजवत आम्ही आलो आहोत सांगत. मध्येच हलकीशी ढुशी देत. काही नाही तर त्याला खेटून शांत उभी राहायची. नागाही गायी बैलांच्या वासरांच्या पाठीवर हात फिरवत किंवा त्यांच्या मानेचे पोळ हाताने घासून पुढे जाई. नागा जसा जगाचा मित्रच होता. सगळेजण त्याला जगमित्र नागा म्हणत. थोडक्यात, गावात नागा ब्राम्हणाला कोणीही वाईट म्हणत नसे.
एखाद्याचा चांगुलपणा हाच काहीजणांसाठी त्याचा हेवा द्वेष करण्याचे कारण ठरते. गावातले लोक नागाचा आदर करतात त्याच्याविषयी चार चांगले शब्द काढतात ह्याचाच दुस्वास करणारे, त्यावरून नागाचा विनाकारण द्वेष करणारे तीन चार लोक होतेच. असे लोक सर्व ठिकाणी असतात म्हणा.
एकदा रात्री नामा कीर्तन आटोपून गावा बाहेरच्या आपल्या झोपडीत आला. सगळेजण रोजचे भजन करून झोपले. त्या रात्री नागाच्या वाईटावर असलेल्या लोकांनी नागाच्या झोपडीवर पेटते बोळे फेकून झोपडी पेटवून दिली. ज्वाळा वर जाऊ लागल्या तसे ते दुष्ट गावात निघून गेले. दुरून झोपडी पेटल्याचे पाहात झोपून गेली. इकडे नागाला आणि त्याच्या बायकोला जाग आली. मुलांना पांघरूणात गुंडाळून जवळ घेऊन बसली. नागाने विठोबाचा धावा सुरु केला. सामान्य नागाला देवाशिवाय कोण आधार असणार?
म्हणे धाव आता रुक्मिणीकांता। दीनबंधो अनाथनाथा। तुजवाचोनि आम्हाल रक्षिता। कोण असे ये समयी।।
भक्ताने केलेल्या तळमळीच्या हाकेला आपले सुदर्शन चक्र हाती घेऊन देव धावून आला. च्क्रपाणीने कमाल केली. आगीचे लोळ वरच्यावर उठून हवेतच विझून जात. खाली त्याची ठिणगी नाही. निखाराही नाही,कोळसाही नाही! मग राख तरी कुठे असणार? गावातल्या लोकांना दुरून आगीच्या ज्वाळा दिसल्या. गावात गडबड उडाली. “ जगमित्र नागाच्या खोपटाला आग लागली.” “ लागली का लावली?” “ हे त्यांचेच काम असणार!” अशा चर्चा चालू होत्या. लोक हळहळत होते. तशा पहाटे पहाटेच नागाच्या झोपडीकडे आले. नागा आणि त्याची बायको बसलेली. मुलं पांघरुणात गुंडाळून झोपवलेली होती. नागाचे भजन चालूच होते. बायकोच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते.
नागा आणि त्याचे कुटुंब जिवंत आहे हे पाहून लोकांना आनंद झाला. आश्चर्यही वाटले. वर वर उठत चाललेल्या भडकलेल्या आगीचे लोळच्या लोळ त्यांनी पाहिले होते. पण इथे झोपडीत अंगणात धुमसती राख नाही, निखारे नाहीत की कोळसे नाहीत;जळलेले काटे कुटक्या काही नाही! नागाच्या विठ्ठ्लाच्या तीव्र भक्तीची प्रचिती त्यांना प्रत्यक्षच पाहायला मिळाली. विठोबाने आग वरच्यावर झेलली. एकही लोळ खाली येऊ दिलाच नाही. आग वरच्यावर विरघळून गेली.
हे आश्चर्य पाहून नागाच आपला विठोबा ह्या साध्या भोळ्या भावनेने ते नागाला नमस्कार करू लागले.जमलेल्या सगळ्या लोकांनी जगमित्र नागाबरोबरीने “ पुंडलिक वरदाSS हाSSरी विठ्ठल ! पंढरीनाथ महाराज की जSSय!” अशी हरिनामाची गर्जना केली.
गावकऱ्यांनी नंतर विचार केला की आपण नागाला थोडी शेतजमीन द्यावी. तसे ठरवूनच ते नागाकडे जमले. त्यांनी आपला विचार त्याला सांगितला. त्याच्या नावे कागदपत्र तयार करून आणले होते. ते त्याला दाखवून पुढे म्हणाले की ह्याचे सर्व उत्पन्न तुझे. सगळे ऐकून नागा म्हणाला,” मला भिक्षुकाला जमीनजुमला कशाला हवा? गावातल्या
घरांतून उदार भिक्षा मिळते. त्यात आमचं भागते.
शेतीभातीच्या भानगडीत मला पाडू नका. अहो,पांडुरंग आपले रक्षण करतो. परवा झोपडी जळाली. तुम्ही पाहिलेच की आम्हाला पांडुरंगाने एव्हढीशीही झळ लागू दिली का? पांडुरंग आपल्याला सांभाळतो ह्याची ह्यापेक्षा दुसरी खात्री काय पाहिजे?” नागाने इतके सांगूनही गावकरी ऐकेनात. त्यावर गावकरी म्हणाले,” आम्ही जमीन तुझ्या नावाने करणार. गाव कसेल जमीन. जे पिकेल त्यातले तुला पाहिजे तितके घेत जा.बाकी राहिल ते आम्ही गावाच्या उत्सवा-गावजेवणाच्या खर्चासाठी लावू. कागदपत्रावर गावकऱ्यांच्या सह्या झाल्या. जगमित्र नामा हे सगळे तटस्थपणे पाहात होता. गावकऱ्यांचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तो कुटुंबाच्या पोटापाण्याला लागेल तेव्हढेच दरवर्षी घेई. दिवस असे नेहमीसारखेच चालले होते.
गावात एक यवन नविन हवालदार बदलून आला.हेही काही दिवस चांगले जात होते. पण गावात नव्या साहेबापुढे गोंडा घोळणारे लोक असतात. जगमित्राचा विनाकारण दुस्वास करणारे लोकही तेच करू लागले. एके दिवशी हवालदाराच्या काय मनात आले ते कळेना. त्याने नागाला आपल्या कचेरीत बोलावले. नागाला कचेरीत बोलावले हे कळल्यावर गावचे लोक काही वजनदार लोकांना बरोबर घेऊन कचेरीत आले.
“ नागा तू दुसऱ्या काही लोकांची जमीन हडपून उत्पन्न खातोस असे हुजुराच्या कानावर गेले. त्यांनी तुझी जमीन जप्त करण्याचा हुकुम मला दिलाय. इतकी वर्षे खाल्लंस उत्पन्न आता काही मिळणार नाही.” त्यावर गावातल्या लोकांनी सगळी खरी परिस्थिती हवालदाराला सांगितली.” अहो गावकऱ्यांनीच सह्या-अंगठे करून नागाच्या नावावर खुषीने करून दिलीय. हे कागदपत्र पाहा.” म्हणत कागदही काढले. इतकेच काय त्यांनी नागाचे चांगले गुणही सांगितले. नागा सज्जन आहे. तो कुणाची दिडकी घेणार नाही तिथे तो दुसऱ्याची जमीन कशाला हडप करेल? सगळे सांगून झाले; पण तिकडे दुर्लक्ष करून तो हवालदार घुश्शाने म्हणाला,” ते काही मला सांगू नका, काही दाखवू नका.जमीन जप्त झाली आहे. तिथे आता कुणीच जायचे नाही” हे ऐकल्यावर नागा जगमित्र आहे हेच सहन न होणारे ते चार दोन लोक हातावर टाळी देत एकमेकांत बोलू लागले,” नागाची दिवाळी संपली की रे!”
सुनावणी नाही काही कुणाची बाजू ऐकली नाही आणि नागाची जमीन लगेच जप्तही झली! नामा गप्पच होता इतका वेळ. पण तो आता म्हणाला,” हवालदार मित्रा, जमीन माझी नव्हती आणि नाहीच.पण गावकऱ्यांनी आपल्याच जमीनीतला तुकडा वाटा काढून ती फक्त माझ्या नावावर केली. जप्त केलेली तुम्ही जमीन माझी नाही,गावाची केली. हा अन्याय गावावर का? अहो गावच्या लोकांचे मित्र व्हा. त्यांची जमीन परत करा.” नागाचे बोलणे ऐकून त्या यवन हवालदाराचा घुस्सा आणखीच वाढला. तो कातावून म्हणाला, “ओ नागा, हे काय मित्रा मित्रा चालवलंय मघापासून? तुला लोक जगमित्र म्हणतात म्हणून तू मलाही मित्रा मित्रा कराय लागलास का? तमीजसे बोल, काय?” हवालदाराच्या मनात, नागाला लोक प्रेमादराने जगमित्र म्हणतात त्याचा हेवा वाटत होता! ती मळमळ बाहेर आली! नागा काही बोलला नाही हवालदाराला. त्याच्याकडे तो शांतपणे पाहात उभा होता.गावकरीच पुन्हा पुन्हा त्याची व आपली बाजू मांडू लागले.
अखेर हवालदाराला काय वाटले कुणास ठाऊक? तो नागाकडे आणि गाववाल्यांकडे पाहून नागाला म्हणाला,”नागा,माझ्या मुलीचे लगीन है. तिच्या देवकासाठी आमच्या घरात वाघ लागतो. तो घेऊन ये. नाही तरी तू जगमित्र म्हणवून घेतोस. अरे गावची गाईगुरं वासरं कुणाचेही अंग चाटतील; नजदिक येऊन राहतील. त्यात काय विशेष मोठे आहे. जगमित्र असशीलच तर वाघ घेऊन ये. मला मित्र मित्र म्हणत होतास. मी तुला एक सवलत देतो. बघ,मित्रासाठी वाघ घेऊन ये. हां पण आज संध्याकाळ पर्यंत आणला पाहिजे वाघ! वाघ आण जमीन घेऊन जा. !”
ही जगावेगळी,जीव घेणारी सवलत ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. मनातून सर्वच घाबरून गेले. नागा शांत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, “हवालदार तुला मी चांगल्या भावनेनेच मित्रा म्हणालो होतो. आता तुझ्या लेकीच्या लग्नात देवदेवकासाठी पाहिजे म्हणतोस तर प्रयत्न करतो. पण मला आता माझं काही खरं नाही असे वाटायला लागले आहे.. पण पुन्हा सांगतो ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांनी प्रेमाने ती माझ्या नावे करून दिली. पण वाघ तर मलाच आणला पाहिजे. बघतो.”
नंतर तो आपल्याशी मनात बोलू लागला, जमीन मी मागितली नव्हती. ह्या उपाधीत मला गुंतवू नका अशी गावाची विनवणी करत होतो. पण गावाच्या प्रेमापुढे माझे काही चालेना. माझ्या जवळ पांडुरंगाची आळवणी करत त्याच्याकडे भीक मागण्या शिवाय आता दुसरे काय आहे. विठ्लाच्या भरवशावर आल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे. इतका विचार केल्यावर तो हवालदाराला व गावकऱ्यांना नमस्कार करून तिथूनच तडक रानाकडे निघाला.
आगीचे संकट झोपल्यावर आले होते. हे तर जागेपणी डोळे पांढरे करणारे संकट नागा ब्राम्हणावर आले होते. नागा जंगलात आला. विठोबाची मनापासून तळमळीने, अतिशय तीव्रतेने आळवणी करू लागला. “जय जय अनाथबंधो करूणाकरा। भक्तवत्सला कृपासागरा। पतितपावना विश्वंभरा। दीनोद्धारा रुक्मिणीवरा,पांडुरंगा, माझी तुला करुणा येऊ दे रे दयाघना! कृपा कर ! आता उशीर नको मायबापा! धाव पाव विठाई माऊली, लवकर ये. हवालदार माझा मित्र जाण। त्याच्या कन्येचे आहे लग्न । वाघाचे दैवत प्रतिष्ठे कारण । पाहिजे सत्य तयासि।।त्याच्या कार्यास ह्या समयी पांडुरंगा विठ्ठला तू धावून ये. तू नाही आलास तर तुझ्या पायाशी माझा हा देह लगेच ठेवीन. विठठ्ला गोविंदा अशावेळी तू नाही आलास तर मी जगून तरी काय उपयोग? “
नागाची ती अार्ततेने अनन्यभावाने केलेली विनवणी ऐकून एका मोठ्या वाघाचे रूप घेऊन चक्रपाणी पंढरीनाथ तात्काळ प्रकट झाले.
एक मोठी डरकाळी फोडून वाघरूपी विठ्ठलाने नागास विचारले,” अरे नागा, तुला कोण त्रास दतोय? दाखव तो मला.एका घासात त्याला खाऊन टाकीन!” हे ऐकल्यावर नागा वाघापुढे हात जोडून म्हणाला ,” महाराज! हवालदार माझा मित्र झालाय. त्याच्याकडे मंगल कार्य आहे. म्हणून तुम्हाला मी प्रार्थना करून बोलावले केशवराजा,इथे आज हिरण्यकश्यपु नाही. आणि मी प्रल्हादा एव्हढा महान भक्त नाही. तरी नरहरी श्यामराजाच्या उग्र संतापाची आवश्यकता नाही. पांडुरंगा तुमचे रोजचे सौम्य रूप पाहिजे. अहो त्या यवन हवालदाराच्या मुलीच्या लग्नासाठी आपण चालले आहोत.” त्यावर महाव्याघ्ररूप पुंडलिकवरदायी हरिनारायण नागाला बोलले, “ते ठीक आहे. हरकत नाही. मला घरून ठेवू आणि तू चल. पण जे दुष्ट असतील त्यांना गमजा दाखवतोच ते तू पाहा.”
नागाने आपले उपरणे वाघोबा झालेल्या विठोबाच्या गळ्यात बांधले. एक टोक धरून तो गावाकडे आला. नागाबरोबर मोठा वाघही येतोय हे पाहून गावचे लोक घाबरून आोरडत घराकडे पळत सुटले. घाबरून पळत सुटलेल्या एकेकांची विशेषत: नागाचा अकारण द्वेष करणारी मंडळींची तर भलतीच फजिती होऊ लागली. पळता पळता धोतरात पाय अडकून पडले, तर वाघ कुठे आहे हे मागे वळून पाहताना पुढच्या खाचखळग्यात काही धडपडले. तर काहींची भीतीने गाळण उडून पळताना धोतरे फिटू लागली. वाघाला पाहून घाबरलेली पोरे पळताना तशाही अवस्थेत, मोठ्या माणसांची पळता भुई थोडी झाली हे पाहून, एकमेकांत ओरडून बोलू लागली. “ अरे शिरप्या! त्या गणपतरावाचं मुंडासं उडून चाललय बघ!” “ अरे मुंडाशाचं काय बघतोस त्या जालिंदरमामाचं धोतर गळून पडतेय त्ये बघ!” “ पळ, पळ,पळा “ ओरडत गावातले लोक ऱ्घरात जाऊन कवाडे बंद करून बसली. तेव्हढ्यात “ नागा झाला तरी त्याने वाघाला घेऊन येणे ठीक केले नाही म्हणत वेशीचा प्रचंड दरवाजा बंद करून टाकला.
केशवराज महाव्याघ्र वेशीपाशी आले. आणि त्याने आपली फक्त शेपटी जमीनीवर अशी आपटली की मोठ्या आसुडाचा फाट ऱ्फटाक्क् असा कडाडून आवाज आला! तसा एक धुळीचा मोठा लोट गावावर पसरला! वेशी आतले लोक दचकले. पाठोपाठ ‘प्रलयजलधिनादंकल्पकृत वन्हिवक्त्रम’ अशी नरहरी शामराज, नरसिंहासारखी डरकाळी फोडली. त्या गगनभेदी आवाजानेच वेशीचा दरवाजा तीन ठिकाणी तुटून फळ्या चिरफळ्या होऊन धाडकन खाली पडला. त्या फळ्या चिरफळ्या तुडवत राजेशाही थाटात महाव्याघ्र केशवराज एकेका पावलाने दहा दहा भूकंपाचे हादरे देत आत शिरला!
तो आवाज ऐकून अनेक गर्भगळित होऊन जिथे होते तिथेच मटकन बसले. मोठे बाप्येही दारा आडून फटीतून खिडक्या किलकिल्या करून त्या महाव्याघ्राचे रूप न्याहळीत बसले. बायांनी तर ‘राम राम’ ‘ रामकृष्ण हरीचा’ जप थांबवलाच नव्हता.
“ अरे हे नागाच आहे आपला?” कसला भारी वाघ घेऊन आलाय? भ्रम आहे सगळा!” “ अहो हा जादूटोणा आहे!” “जादूटोणा आहे ना मग घरात का लपून राहिले सकाळचा लोटा घेवून तुमी?” आं? बाहिर जाऊन वाघाच्या नको नागाच्या पाठीवर हात फिरवून ये, जा की.” हे सवाल जवाब चालूच होते. जाणती म्हणवणारी माणसे,”जगमित्राने भक्तीच्या बळावर देवालाच आणले आहे.अहो नाहीतर कोणता वाघ गळ्यात पंचा बांधू देईल?” पण हे सांगताना ह्या सर्व सज्जनांच्या कवळ्या थाड थाड आपटत होत्या.भीतीने सर्वात जास्त तेच काकडले होते. खिडक्यांची अर्धीच फळी किलकिली करून तोतरं बोलू लागले होते! दुसरा एक सांगत होता, “ अहो पंडीत, तो वाघच आहे. नागाने हवालदाराला खाऊन टाकण्यासाठीच आणलाय.” वाघ असो की विठोबा लोकांचे तर्क कुतर्क थांबत नसतात.
नागा मात्र लोकांना ओरडून सांगत होता,” लोकांनो घाबरू नका. हा वाघ कोणालाही काही करणार नाही. मी ह्याला कबूल केल्याप्रमाणे हवालदाराला द्यायला चाललोय.” इतके ऐकल्यावर लोकांनी आपली दारे खिडक्या थोड्या जास्त उघडल्या. इतकेच केले!
नागा वाघाला घेऊन पुढे गेला ह्याची खात्री झाल्यावर बरेच लोक तिकडे निघाले. एरव्ही घरात गावात वाघिणी असलेल्या बाया, राम राम म्हणत, पोराबाळांना छातीशी पोटाशी, मिठीत जवळ घेऊन स्वत:च्या तोंडात पदराचा चुरगळ घेऊन बसल्या होत्या त्या ‘वाघिणी’ही पाठोपाठ निघाल्या.
हवालदाराच्या गल्लीत, नागा वाघ घेऊन आलाय हे पोराटोरांच्या मोठ्या कालव्यावरून सगळ्यांना समजले. घरांची दारे कवाडे पटापट बंद झाली. हवालदारही घाबरून घरात लपून बसला. नागाला आपण जगमित्रावरून म्हणालो काय, त्याची हेटाळणी काय केली,आपण त्याला वाघ आणण्याची अट घालून मोठी ‘सवलत’ दिल्याचे नाटक काय केले ते आठवून हवालदाराने हंबरडा फोडायचेच बाकी राहिले होते. पण गळा काढून रडण्याचे काम त्याच्या बायकामुलांनी अगोदरच जोरजोरात सुरु केले होते!
“ हवालदार मित्रा म्हणू का हुजुर म्हणू! तू सांगितल्याप्रमाणे वाघ आणलाय. बाहेर येऊन पाहा.” नागा इतके म्हणतोय तोच वाघविठोबा नागाला हिसडा मारून हवालदाराच्या अंगणात मोठी डरकाळी फोडून उभा राहिला. फाड् फाट्ट् शेपटी आपटली आणि गुरगुरत एक फेरी मारून उभा राहिला. हे ऐकून घराघरातला गोंधळ आणखीच वाढला. काही जणांची दातखीळ बसली. हवालदाराच्या घरात पुन्हा एकच आकांत झाला. नागा पुन्हा हवालदाराला म्हणाला,” तुझ्या मुलीचे देवक बसवायचे त्यासाठी वाघ आलाय. ये बाहेर ये तो आता तुझाच आहे. “ नागा बोलला की लगेच वाघाने धडकी भरवणारी डरकाळी फोडली. नागाचे बोलणे ऐकून जागचा उठलेला हवालदार डरकाळी ऐकून खालीच कोसळला! गारठून गप्प झालेली गल्लीही आता रडू ओरडू लागली.
नागा वाघाजवळ जाऊन म्हणाला,” तुम्ही मला वाचवलेत. माझे रक्षण केले. मुख्य म्हणजे माझी गरीबाची पत राखलीत. हा हवालदार त्याच्या मुलीच्या मंगलासाठी तुम्हाला घेऊन या म्हणाला. शांत व्हा. तुमचा मूळ प्रेमळ कृपाळूपणा धरा.” इतके विठोबाला सांगून त्याच्या पाठीवर नागा हात फिरवित थांबला.
हवालदाराच्या घरातून बायको त्याला सांगत होती ते बाहेर ऐकू येत होते. “ अहो आपल्या बालबच्चांसाठी तरी बाहेर जा. तुमचे काय वय झालं आहे, होणारच आहे. बिमार पडून तरी तुम्ही जाणारच.पोरांची सब जिंदगी पडलीय अजून. आपल्या बेटीसाठीच आणलाय म्हणतो तो वाघ.जा, बाहेर जा. आम्हाला तरी वाचवा.” ते ऐकून नागाही म्हणाला,” हवालदार तू एकटाच नाही तुम्ही सगळे या. तुम्ही सगळे आबाद राहाल. या, हा वाघदेव तुम्हाला काही करणार नाही. असा वाघ कुणालाच पाहायला मिळत नसतो. हेच महिपतीबुवांच्या शब्दांत नागा म्हणतो,” जे चंद्राहूनि शीतळ बहुत। जे अमृतासीही जीववित। ते दृष्टीसी देखोनि दैवत ।भयभीत मनी का होता। नाना योग याग करिता ऋषी। लवकरी प्राप्त नव्हे तयांसी। प्राप्त नव्हते ज्याचे चरण । ते दैवत दृष्टीसी देखोन । तुम्ही का लपून बैसावे।। “
हवालदार दरवाजा हळूच उघडून भीत भीत बाहेर आला. नागाला हात जोडून करूणा भाकित बोलता झाला,” आता कृपा करूनि मजवर। वाचवी सत्वर दयाळा।” मी तुझ्याशी आकसाने वागलो. त्याचे आज मला तात्काळ फळ मिळाले. तुला जगमित्र का म्हणतात त्या मागचे सत्यही कळले. ह्या वाघाने ते समजावून दिले.तू वाघ आणून दाखवलास. आम्हा घरातल्या सगळ्यांना तुझ्यामुळे दैवताचे दर्शन घडले. माझ्या मुलीचे देवक जगमित्र नागा तुझ्यामुळेच साक्षात “देवप्रतिष्ठे”ने आज झाले.”
हवालदार आणि त्याच्या घरातील सगळी मंडळी जगमित्र नागा आणि वाघासमोर हात जोडून होती!
वाघाला घेऊन जाताना नागा हवालदाराला म्हणाला, “मी जगमित्र आहे की नाही मला ठाऊक नाही. पण तुझ्यामुळे माझे दैवत मला भेटले. तू मात्र माझा मित्र झालास. वाघ आणून दे जमीन परत करतोस म्हणाला होतास.ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांना परत दे.” नागाच्या प्रत्येक बोलाला हवालदार हात जोडून मान खाली घालून हो हो म्हणत होता.
जमलेले सर्व लोकआमचा नागा खरा जगमित्र आहे असे पुन्हा पुन्हा म्हणू लागले.
नागा आपल्या जीवीच्या जीवाला, विठूरायाला घेऊन पुन्हा अरण्यात गेला. तिथे दाट झाडीत पंढरीच्या परब्रम्हाने, संतांच्या सावळ्या विठूरायाने, शंख चक्र गदाधारी चतुर्भुज रुपात आपल्या भक्ताला दर्शन दिले. नागा त्या अभूतपूर्व, अद्भुताहूनि अद्भूत,आणि डोळ्यांनाही अमृताहूनी गोड अशा सगुण साकार भगवंताकडे डोळे भरून पाहात असतानाच पांडुरंगाने त्याला प्रेमाने आलिंगन देऊन ‘आपणासरिखे केले तात्काळ!”