१९१९ साल असावे. माझ्या आजोबांचे शिक्षण नुकतेच संपले असावे किंवा संपण्याच्या बेतात असावे. अजून त्यांना कुठे काम मिळत नव्हते आणि त्यात लग्नही झालेले. त्यांच्या आईचे झेकोस्लोवाकियातील कोसाइव्ह गावात एक दुकान होते. आईच्याच दुकानात ते काही काम करत असत. पण आई तरी असा कितीसा पगार देऊ शकणार? दुकानावर दोन घरे पोट भरू शकत नव्हती. नाईलाजाने आईने,” तू आता काहीतरी स्वतंत्र काम बघ, बाबा ” असे सांगितले.
आजोबांनाही स्वत:च्या पायावर उभे राहावे असे वाटतच होते. आपल्यापाशी धडाडी आणि धंदा करण्याची आवडही आहे हे त्यांना माहित होते. त्या दृष्टीने कोणता व्यवसाय करायचा आणि सध्या कोणत्या धंद्यात वाव आहे याची त्यांनी चाचपणी सुरू केली.
पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते. झेकोस्लोव्हाकियात अन्नधान्य आणि जवळपास सर्वच गोष्टींचा फार तुटवडा पडला होता. कातड्याच्या वस्तूंचे तर अतिशय दुर्भिक्ष्य होते. चांगले आणि टिकाऊ बूट मिळणे दुरापास्त होते. गरजेपोटी लोक जाड पुठ्ठ्याचे आणि जाड कागद भरलेले बूट वापरत होते. लोक तरी काय करणार? मिळेल ते वापरत होते.
माझ्या आजोबांच्या लक्षात आले, हीच वेळ आहे ह्या धंद्यात उतरण्याची. त्याकाळी फार मोठी रक्कम वाटावी असे ५००० क्रोनिनचे कर्ज त्यांनी काढले. ते एका मोठ्या शहरात गेले. तिथे बुटांच्या ठोक व्यापाऱ्यांकडे अनेक खेटे घातले. अखेर त्यांच्या मनासारखा व्यवहार झाला. त्यांना मिलिटरीचे दणकट आणि टिकाऊ बूट मिळाले होते. दगदग झाली खरी पण आपले काम फत्ते झाले ह्या समाधानात ते घरी परत आले. लोक बुटांवर आधाश्यासारखी झडप घालतील आणि आपला माल हातोहात खपेल याची त्यांना खात्री होती.
आजोबांचा चेहरा कसा झाला असेल? तो कल्पनेनेही माझ्या डोळ्यांसमोर येतो. मोठ्या उत्साहाने त्यांनी मोटारीतली खोकी उघडून सगळ्यांना दाखवायला सुरवात केली. आणि त्यांचा चेहरा इतका रडवेला झाला की ते आता केव्हाही मोठ्याने रडायला सुरवात करतील!
ते वर्णन करत होते त्या मिलिटरीच्या टिकाऊ आणि दणकट बुटांच्या पाचशे जोड्या ऐवजी तिथे फक्त एक हजार उजव्या पायाचेच बूट होते! काय झाले असेल आजोबांच्या मनात त्यावेळी! कर्ज काढून केलेल्या पहिल्याच व्यवहारात असा जबरदस्त फटका!
आजोबा, हृदयाला पीळ पडेल असे हुंदके देत देत खाली मान घालून तोंड दाबून रडत होते. उजव्या पायाच्या एक हजार बुटांची रांग त्यांच्याकडे छद्मीपणाने बघत हसत होती ! डाव्या पायाचा एकही बूट त्यात नव्हता. हे बूट कवडी किमतीचे नव्हते. मित्रांकडून, नातेवाईकांकडून शेजाऱ्यांकडून ओळखीच्या लोकांकडून काढलेले मोठे कर्ज आता कसे फेडायचे हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. आपल्या बायकोमुलाचे पोट कसे भरायचे, लोकांना तोंड दाखावायलाही आता जागा नाही असे विचार त्यांच्या मनात एकापाठोपाठ एक येऊ लागले.
” ताबडतोब शहरात जा. त्या व्यापाऱ्याला गाठ आणि त्याच्याकडून पैसे वसूल कर. सोडू नकोस त्याला आता,” असे सगळेजण त्यांना सांगू लागले.
माझे आजोबा पुन्हा त्या मोठ्या शहरात गेले. त्या व्यापाऱ्याला गाठायला गेले तर काय! त्याचा पत्ता नाही. इतर एकाही व्यापाऱ्याला त्याची काहीही माहिती नव्हती. माझे आजोबा सगळ्या शहरात भटक भटक भटकले पण त्या भामट्याचा त्यांना कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अगदी निराश, हताश होउन ते माघारी आले.
आजोबा काही दिवस उदास होउन खिन्न बसायचे. एके दिवशी आजी त्यांना म्हणाली, ” अहो असे बसून कसे चालेल? त्या सदगृहस्थाकडे तरी जाऊन या. सगळे त्यांचे नाव घेतात. सत्पुरुष आहे म्हणे. काहीतरी उपाय सांगेल. जा तरी एकदा त्यांच्याकडे.” त्यांनी आजीचे ऐकले. त्या सत्पुरुषाकडे गेले. तिथे गेल्यावर आजोबांना एकदम रडेच फुटले. थोडे शांत झाल्यावर त्यांनी आपली सगळी कर्मकहाणी सांगितली. प्रथम ते साधुपुरुष काही बोलले नाहीत. पण त्यांना आजोबांच्या सरळपणाची, धडपडीची जाणीव झाली असावी. ते त्यांना दयार्द्र बुद्धीने इतकेच म्हणाले,” हे बघ मुला, देवाची मनापासून करुणा भाक. अत्यंत तळमळीने त्याची प्रार्थना कर. सध्या तरी मला इतकेच सांगता येते.” त्या साधुपुरुषाच्या शब्दांतून दया ओसंडत होती असे आजोबांना वाटले.
आजोबा देवळात गेले आणि प्रार्थना करू लागले. त्यांना दुसरे काही सुचेनासे झाले. जवळपास त्यांनी स्वत:ला कोंडूनच घेतले. किती दिवस ते देवळात जात असतील सांगता येत नाही. जायचे, प्रार्थना करायला बसले की डोळ्यांतून अश्रू ओघळायचे. प्रार्थना चालूच असायची. आपल्या भोवती काय चालले आहे, कोण आले, गेले ते त्यांच्या ध्यानीही नसायचे. त्यांना पाहून इतर भाविकही अगदी आवाज न करता जात असत.
आपले झालेले नुकसान आणि सर्वनाश ह्या विचारातून ते बाहेर आले असतील का नाही ते माहित नाही. पण प्रार्थना करताना इतर कशाचेही भान नसायचे हे खरे; नाहीतर एक नवखा माणूस आला आणि एका कोपऱ्यात जाऊन हुंदके देतोय हे त्यांना ऐकू आले असते. पण बराच वेळ त्यांना काहीच ऐकू आले नाही. नंतर मात्र तो माणूस मोठ्यानी हुंदके देत रडू लागला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्या माणसाला ते ओळखत नव्हते. पण त्याचे ते रडणे ऐकून मात्र त्यांना राहवेना. देवळात ते एकटेच होते. ते उठले आणि त्याच्या जवळ गेले. आपण काय मदत करू शकणार त्याला असेच त्यांना मनात वाटत होते. पण आजोबांनी त्याला शांत करत त्याची विचारपूस केली. त्याला काही मदत हवी का असे विचारले. त्यावर तो माणूस रडक्या आवाजातच म्हणाला,” मला कोणीही मदत करू शकणार नाही. अहो मी फार मोठे कर्ज काढून धंद्यात ओतले हो! पण माझे दुर्दैव असे की त्या चोर व्यापाऱ्याने मला साफ गंडवले. सपशेल बुडवले. मला वाटत होते की मी मिलिटरी बुटाचे पाचशे जोड विकत घेतले. पण पाहतो तो काय?
सगळ्या खोक्यांत फक्त डाव्या पायाचे एक हजार बूट निघाले !” इतके सांगून भकास नजरेने तो माझ्या आजोबांकडे पाहात राहिला. रडून रडून दोघांचेही डोळे लाल झाले होते. पण आजोबांच्या डोळ्यांत मात्र आनंदाचे अश्रू दिसू लागले. ते त्या माणसाला म्हणाले, ” माझ्या दोस्ता, तुझ्यासाठी एक आनंदाची खबर आहे .”
माझे आजोबा आणि नव्याने झालेल्या मित्राने भागीदारीत बुटांचा व्यवसाय सुरू केला. ते दोघे जोडीदार झाले. बुटांच्या जोडांसारखी त्यांचीही जोडी छान जमली.
पुढे माझे आजोबा, ॲरोन लेझर, हे नामांकित उद्योजक झाले. खूप श्रीमंतही झाले. झेकोस्लोव्हाकियाच्या आर्थिक जगातही त्यांनी मोठ्या मानाचे स्थान मिळवले!
[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]