Libraries

बाळपणापासून पुस्तके, वाचन ह्याचे बाळकडू आम्हा बहिण भावंडानांच नव्हे तर आमच्या बरोबरीच्या अनेकांना प्यायला मिळाले.त्यामुळे पुस्तके ओळखीची झाली होती.वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके वाचण्याचीआवड अमच्या घरातूनच पोसली गेली. जणू पुस्तकांचे घरच! त्याबरोबरीने ही आवड आमच्या गावच्या जनरल लायब्ररीने जोपासली, वाढवली. हायस्कूल मधील लायब्ररीत, त्या अकरा वर्षांच्या काळात फार थोडा वेळ गेलो असेन. पण जेव्हा एखादे शिक्षक गैरहजर असतील तर त्या वर्गाच्या मॅानिटरने लायब्ररीत जाऊन गोष्टींची निदान चाळीस एक तरी पुस्तके आणावीत. आणि ती आम्ही वाचावीत; अशी मोठी चांगली ‘वाचनीय’ पद्धत आमच्या हायस्कूल मध्ये होती. त्यामुळे स्वाध्याय मालेतील अनेक चांगल्या गोष्टींची पुस्तके, साने गुरुजींची, ना. धों. ताम्हणकरांची, पुस्तके वाचायला मिळत असत. त्यामुळे पुस्तकाविषयीची गोडी वाढत गेली.

त्यानंतर कॅालेजची भव्य लायब्ररी व तिथे बसून अभ्यासाला लागणारी किंवा इतरही चांगली प्रख्यात पुस्तके वाचण्याची सोय होती. कॅालेजच्या लायब्ररीतील ‘अभ्यास लायब्ररी’ चा विभाग रात्रीही उघडी असे! केव्हढी सोय होती ही अनेक विद्यार्थ्यांसाठी! हॅास्टेलच्या मुलांना ह्याचा खरा फायदा होत असे.
त्यानंतर औरंगाबादचे बळवंत वाचनालय, पुण्याचे नगरवाचन मंदिर, दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालय ह्या वाचनालयांनीही चांगली, चांगली पुस्तके वाचायला देऊन वाचनाचे खूप लाड केले. आमचे सर्वच दिवस पुस्तकांचे दिवस झाल्यासारखे सरकत होते.

मनांत कुठेतरी जाऊन पडलेले हे विचार आताच वर येण्याचे कारण काय? तर निमित्त सतीशने WhatsApp वर पाठवलेली ब्रिटिश लायब्ररीचा व्हिडिओ! तो पाहिल्यावर पुन्हा पुस्तकांच्या ‘विश्वात्मके देवा’च्या जगात गेल्याचा अनुभव आला.

मी थक्क झालो ही लायब्ररी व तिथे चालणारे काम पाहून. प्रकाशित होणारे एकूण एक पुस्तके , किंबहुना जे काही प्रसिद्ध होते ते सर्व काही – मासिके, वर्तमानपत्रे, जाहिराती, जतन करीत आहे हे ऐकून व पाहिल्यावर किती मोठे व ऐतिहासिक महत्वाचे कार्य ही लायब्ररी करीत आहे ह्याची थोडी फार कल्पना आली. त्या लायब्ररीची- ब्रिटिश लायब्ररीची अत्याधुनिक उत्तुंग इमारत तिथली सर्व कामे यंत्रमानव – Robots करीत असलेले पाहिल्यावर माझ्यासारखा सामान्य वाचक थक्क ,विस्मयचकित ,अचंबित होणार नाही तर काय! इंग्लंड हा देश तसा टिचभर , त्या लहानशा देशात , लंडनसारख्या गर्दीने गजबजाट झालेल्या महानगरात एव्हढी जागा मिळणे अशक्यच. त्यामुळे त्याच्या आजुबाजुच्या गावातील जमीनीवर ही प्रचंड ज्ञानवास्तु उभी केली आहे.

कोणत्याही गावाचे,राज्याचे, किंवा देशाचे खरे वैभव तिथली ग्रंथसंग्रहालये व शिक्षणसंस्था ह्याच असतात. ह्या व्हिडिओखाली असलेल्या कॅामेन्टसही वाचनीय आहेत. त्याही वाचाव्यात.

ही लायब्ररी पाहिल्यावर व तेथील बहुतेक सर्व काम रोबॅाटस् करतात वगैरे विस्मय चकित करणारी यंत्रणा पाहिल्यावर मला आमच्या वाचनाच्या गावातली जनरल लायब्ररी , बेलमॅान्टची लायब्ररी , मॅरिएटातली माउन्टन व्ह्यू लायब्ररी,दिसेनाशा होऊन , अंधुक पुसट होऊ लागल्या. पण संत ज्ञानेश्वरांनी मला पुन्हा जमीनीवर आणले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “ चालायचे म्हणजे फक्त राजहंसानेच डौलदार चालायचे? त्याचे चालणे पाहिल्यावर इतर किडा मुंगीनी – काई चालू नाई?”ही ओवी लक्षांत आल्यावर, मी पाहिलेल्या , तिथे जाऊन वाचन केलेल्या आमच्या गावचे ज्ञानपीठच अशी जनरल लायब्ररी, कॅालेजची त्यावेळी मोठी भव्य वाटणारी लायब्ररी, बेलमॅान्ट, सॅन कार्लोस, रेडवुडसिटी,रेडवुड शोअर्स, मॅरिएटातील माउन्टन व्ह्यू, ह्या लायब्ररींसकट सर्व लहान मोठ्या लायब्ररी पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या.

ब्रिटिश लायब्ररीशी संबंध, सतीश बंगलोरला असतांना आला. तिथे काढलेल्या कार्डाचा फायदा पुण्याला आल्यावर झाला. कारण त्यावेळी पुण्यातील ब्रिटिश लायब्ररीमध्ये नवीन सभासद घेणे थांबले होते. पण बंगलोरच्या कार्डामुळे मी नवा सभासद मानला गेलो नाही. ह्या लायब्ररीचा फायदा मी घेतलाच पण माझी नात मृण्मयीनेही घेतला!

‘आमच्या वाचनाचे गावात ’ असतांना पुणे विद्यापीठाची लायब्ररी, भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थेची, नगर वाचन मंदिर ही नावे एकत होतो. त्यांत ब्रिटिश लायब्ररीचे नांवही पुढे असे. तिथले सभासदत्व मिळणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात होती. त्या ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झाल्यामुळे मनातल्या मनांत माझी कॅालर ताठ होत असे.

सांगायची गंमत म्हणजे तिचे ग्रंथपाल हे आमच्या नागवंशी चाळीत राहाणाऱ्या डॅा. जोशी ह्यांचे भाऊ किंवा त्यांचे थोरले चिरंजीव असावेत. म्हणजे आमच्या बरोबरीचे विष्णु जोशी ,मन्या जोशी ह्यांचे सगळ्यांत मोठे भाऊ किंवा काका -विठ्ठल जोशी हे होते! पण ते निवृत्त झाल्यावर, त्यांच्या निवृत्तीची बातमी वाचल्यावर हे कळले !


बघा! एका जागतिक प्रसिद्ध लायब्ररीच्या ‘ लिंक’मुळे पुस्तकांच्या व लहान मोठ्या वाचनालयांच्या ‘आठवणींच्या कड्यांची एक लांबलचक साखळी ‘ होत गेली ! हा लाभही नसे थोडका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *