तसा मी धर्मकार्यातला. मी तरुण धर्मोपदेशक होतो तेव्हा वॉशिग्टन राज्यातील टॅकोमा येथे असलेल्या प्युगेट साऊंड युनिव्हर्सिटीत काम करीत होतो. तिथे माझ्या इतर कामाबरोबर, पहिल्या शतकातील उपासना पद्धतीचा अभ्यासक्रमही शिकवत असे.त्या वेळी एका बाईने मला धार्मिक उपासना आणि रोजचे अन्न व इतर खाद्य पदार्थ अशा पुस्तकाचे परीक्षण व त्यावरील काही अहवाल वाचायला दिले. आम्ही वर्गात त्यावर चर्चा करीत असता त्यावर आधारित एक अभ्यासक्रमच तयार केला. नंतर तो अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची फार गर्दी झाली. तो एक विद्यार्थीप्रिय अभ्यासक्रम झाला. मला स्वयंपाक, खाद्य पदार्थ करण्याची मुळातच आवड असल्यामुळे त्यातूनच पुढे मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी लोकांना जेवण पुरवण्याचा उपक्रम सुरू केला. जेवणाबरोबरच हळू हळू इतर खाद्य पदार्थ देऊ लागलो. खाण्याचे सर्व पदार्थ आणि जेवण मोजक्या वस्तू वापरून केल्या असत. तेल तूपही मर्यादित प्रमाणात वापरून हल्ली आपण “हेल्दी” म्हणतो तसे आणि कोणत्याही चोखंदळ खवैय्यालाही आवडतील असे असत.आमच्या ह्या खाण्या जेवणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
काही दिवसांनी मी ते काम सोडले आणि स्वत:चे पाक कला शिकवण्याचा वर्ग सुरू केला. वर्ग कसला, पुढे ती शाळाच झाली. आम्ही नुकतेच घर घेतले होते. त्याचे कर्ज फेडायचे म्हणून मी कामाला वाहून घेतले होते. माझा आत्मविश्वास दांडगा होता. मी करेन त्या कामात मला यशच मिळणार ही माझी खात्री असे. त्यामुळे मला ‘ग’ची बाधा झाली त्यात नवल नाही. शिवाय मी किती काम करतो. माझे काम किती चांगले, मी म्हणून हे सगळे होतेय अशा रुबाबात मी वावरत होतो. ह्या शाळेबरोबरच आता मी स्वैपाकाला लागणाऱ्या भांड्यांचे आणि वस्तुंचे दुकानही जवळच टाकले.तेही चांगले चालू लागले
पीबीएस मधील माझ्या ओळखीच्या निर्मात्याने त्यांच्या टाकोमा या स्थानिक केंद्रासाठी एखादा कार्यक्रम करशील का असे विचारले. ह्या केंद्राचे कार्यक्रम एका गल्लीतही पोचत नाहीत असे मी चेष्टेने म्हणत असे. खरेही होते ते. स्थानिक म्हटल्यावर असे कितीसे लोक ते पाहणार? ही हकिकत १९७३ सालची आहे.त्या काळी एखादा कार्यक्रम एकाच वेळी सर्व मोठ्या वाहिन्यांवर दाखवायचा म्हणजे एक तर कार्यक्रम गाजलेला दर्जेदार आणि लोकप्रिय असायला हवा. आणि तसा तो असला तरी त्याला नऊ आठवडे लागायचे. हे असू दे. मी हो म्हणालो कारण हा माझा मित्र होता आणि त्याला कार्यक्रमाची गरज होती.
आठवड्यातून एकदा मी स्वत:ची सगळी सामुग्री,पदार्थासाठी लागणाऱ्या वस्तू,स्वैपाकाची भांडी आणि मदतनीस घेऊन स्टुडिओ मध्ये जात असे. अर्ध्या तासाचा हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा प्रसारित होई. मी आणि माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाककलेचे पुस्तकही छापून घेतले. त्याचे ढिगारे माझ्या घरातल्या तळघरात रचून ठेवले होते.देवाने माझी ही शाळा, दुकान आणि टीव्हीवरचा ह्या कार्यक्रमातून, धार्मिक कामातील लोकांना भेटण्याचा जो भाग आहे, त्याचा हा वेगळा मार्ग दाखवला. इतके काम असूनही मी प्रत्येक कामातल्या बारिक सारिक गोष्टींची अगदी काटेकोरपणे नोंद ठेवत असे.
माझा टाकोमाच्या पीबीएसवरील कार्यक्रम इतका यशस्वी झाला की थोड्याच वर्षांनी शिकागोच्या पीबीएसच्या मुख्य केंद्राने अमेरिकेतील त्यांच्या सर्व पीबीएस वाहिन्यांवरून माझे कार्यक्रम प्रसारित करण्याचे ठरवले. कार्यक्रमांची मालिकाच करण्याचे ठरवले.
माझे शिकागोला कार्यक्रम चित्रित करण्यासाठी वारंवार जाणे होउ लागले. थोड्याच महिन्यात पुढच्या सीझनसाठी चित्रिकरणाची तारीखही नक्की झाली. माझ्यासाठी ही फार चांगली गोष्ट होती. मलाही नवीन कामाची गरज होती. कारण माझी शाळा, दुकान आता तितकेसे चालत नव्हते. जवळ जवळ बंद पडण्याच्या मार्गवर होते. कारण स्पर्धा वाढली होती. कोपऱ्या कोपऱ्यावर माझ्या शाळे सारखे क्लासेस आणि दुकानेही निघाली होती! अखेर १९८२ मध्ये मी दुकान आणि शाळाही विकून टाकली.
सगळ्यांची देणी चुकवणे भाग होते. बिलं घेऊन बसलो. एकेक करत बिले चुकती केली. पण अजून मोठ्या रकमांची बिले राहिली होती.त्यांची बेरीज केली. इतकी कामे, इतके कष्ट करूनही मी अजून ७०,००० डॉलर्स देणे बाकी होते!
देवाची कृपा म्हणून शिकागोचे काम अजून माझ्या हातात होते. कामचालू झाले की दोन आठवड्यात मला पैसे मिळू लागतील. आता कामाला घाबरायचे नाही. माझी बायको मला किती वेळा सांगायची,”अहो थोडे दमा धीराने घ्या. तुमच्या हृदयाची तरी काळजी घ्या. हे काय चालले आहे? दिवस रात्र काम,काम!”
तिची ही काळजी खरी होती. मी पंधरा वर्षाचा होतो तेव्हा मला श्वास घ्यायला फार त्रास होउ लागला. डॉक्टरांनी हृदयाची एक झडप बदलायला सांगितले होते. पण त्या काळी हे ऑपरेशन सर्रास सगळीकडे होत नव्हते. त्यामुळे माझ्या हृदयाची झडप अजूनही बदलली नव्हती. १९८२च्या उन्हाळ्यात एका रात्री मला फारच त्रास झाला. मला शिकागोला जायचे होते. पण मला श्वासही घेता येत नव्हता. मला ताबडतोब दवाखान्यात दाखल व्हावे लागले. ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार होती. त्याच दिवशी शिकागोला चित्रिकरण सुरू व्हायचे होते. पण आता कसचे काय!. बायकोने पीबीएसच्या लोकांना माझी हालत कळवली.
डॉ. स्वावेजनी स्पष्टपणे तीन शक्यता सांगितल्या. ऑपरेशन यशस्वी होईल, होणार नाही, अथवा मी फक्त जिवंत असेन. अंथरुणात लोळा गोळा होउन पडेन. ऑपरेशनच्या आधीची रात्र मी कधीही विसरणार नाही. आतापर्यंत मी, सारखा मी आणि माझे काम, मी कसा मोठा प्रसिद्ध होत चाललोय, अजून हे करायचे आहे, नंतर हे करणार आहे ह्यातच मश्गुल होतो. थोडक्यात मी,मी, आणि मी.मी मला विसरत नव्हतो. माझ्याशिवाय मला काही दिसत नव्हते.
मी ४२ वर्षाचा होतो. काही काम नसलेला, एक कुटुंब पोसायची जबाबदारी आणि डोक्यावर ७०,००० डॉलर्सच्या कर्जाचा बोजा येऊन पडलेला.माझी देवावर श्रद्धा होती. पण अंथरुणात लोळागोळा होउन पडायचे ही कल्पनाच हादरून सोडणारी होती. आणि मी काही करू शकत नव्हतो. माणसावर संकट आले, जीवाचे बरे वाईट होणार ही भिती समोर उभी राहिल्यावर त्याला देवाशिवाय कुणाची आठवण होणार? मीही त्याचीच प्रार्थना केली. करुणा भाकली. “देवा आता तूच माझा आधार. जे काही होणार ते तुझ्या कृपेनेच होणार. देवा माझे कर्ज तुझेच आणि माझा जीवही आता तुझाच. तूच मला सांभाळ”. झोप लागली की नाही तेही समजले नाही.
ऑपरेशन पार पडले. मी जागा झालो तेव्हा मी जिवंत आहे, विचारही करू शकतोय हे समजल्यावर मला केव्हढा आनंद झाला त्याची माझ्याशिवाय कुणाला कल्पना येईल?
माझी तब्येत जशी सुधारू लागली तसा मी निर्भर होत चाललो. मनाची अस्वस्थता आणि अस्थिरता कमी होतेय असे वाटू लागले. फार नाही तरी बराचसा निर्धास्त होतोय असे माझे मलाच वाटू लागले. तरीही ७०,००० डॉलर्सच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे त्याची चिंता होतीच.
एके दिवशी अनपेक्षितपणे फिल डोनह्युच्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण आले. त्याच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाने कुणाला आनंद होणार नाही? काय होईल ते सांगता येत नाही आणि असावे म्हणून मी माझ्या पुस्तकाच्या काही प्रति बरोबर घेतल्या. पुस्तक पाहिल्यावर फिलने विचारले,”केवढ्याला विकायचे हे?” एका प्रतीला मला ३.७५ डॉलर्स खर्च आला होता. मी म्हणालो,” ४.७५ डॉलर्सला विकत होतो.” जाहिराती सुरू होण्या अगोदर तीन वेळा,”हेच ते गाजलेले पुस्तक! आणि हे त्याचे प्रसिद्ध लेखक! असे फिलने नेहमीच्या मोठ्या उत्साहाने लोकांना दाखवत सांगितले.तसेच ते कुठून मागवायचे तेही तीन वेळा दाखवले! कार्यक्रम संपल्यावर निर्मात्यांपैकी एकीने विचारले,”पुरेशा प्रति आहेत ना?” “पुरेशा? चांगल्या पाच हजार पडून आहेत घरी.” मी थोडे हसून आणि काहीश्या हताशपणे म्हणालो असेन. ते ऐकल्यावर तिचा विश्वासच बसेना.त्यावर झालेला तिचा चेहरा मी अजूनही विसरलो नाही. ती म्हणाली,”कठिण दिसतंय एकंदरीत.”
आणि खरेच कठिण झाले मला ऑर्डरी पुरवता पुरवता ! त्या काळी देशातल्या सर्व वाहिन्यांवर कार्यक्रम प्रक्षेपित व्हायला नऊ आठवडे लागत. आणि त्या नऊ आठवड्यांच्या काळात मी खूप प्रति विकल्या. खूप म्हणजे किती खूप? ४०,००० प्रति!
इतके झाल्यावर मला शिकागोच्या पीबीएसच्या प्रमुखाकडून “तुमची नवी मालिका केव्हा सुरू करायची?” असा फोन आला. मी थोडाच नाही म्हणणार होतो?
आता तुम्हीच गणित करा. त्या ४०००० प्रतींना मला नफा झालेल्या १.७५ डॉलर्सने गुणा. सत्तर हजार डॉलर्स झाले! मला कर्ज तेव्हढेच होते. माझ्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर खाली उतरला.पण त्याहूनही देवाच्या कृपेचा मोठा मुकुट माझ्या डोक्यावर चढला !
[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]