सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची. आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.
फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घ्यायची. हापिंग करत चार चाकं पुढे गेल्यावर समजायचे की अरे मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो.

सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊन आलो होतो. टाॅलस्टाॅयच्या निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता.बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद व्हायचे. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.
त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. आता गोन्यल कडून घ्यायची.

सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर,” हरकत नाही म्हणाले;पुढे बघू “.

सायकल दुरुस्तीचीही अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा एक कार्यक्रमच असायचा आमच्यासाठी. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत, टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी तिचा प्रत्येक भाग दाबत दाबत पाहत जायची.

आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!
आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर तो निराशेने पाणी झटकायचा. आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा.

ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा.पाहातच राहत असू आम्ही. तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा.

वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितलेले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरती झलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड!

पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच,असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते.

दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा. साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे.

आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित,सालंकृत सायकल पहायला मिळण्यासाठी सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच !

माझा मित्र बंडूने चौडेअण्णांच्या दुकानातून नवी कोरी सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा एव्हढा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herstz होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच मडगार्ड आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची.

आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.

फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या स्वस्तिक किंवा साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घेतले. हापिंग करत चार चाकं पुढे गेलो तर मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो. सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊनआलो होतो. टाॅलस्टाॅयच्या,निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता. बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद झाले. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.

त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. गोन्यल कडून घेतली. सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर हरकत नाही म्हणाले.पुढे बघू .

सायकल दुरुस्तीची अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा आम्हाला एक कार्यक्रमच असायचा. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी भागश: दाबत दाबत पाहत जायची. आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!

आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर निराशेने पाणी झटकायचा, आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा. ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा. ममपाहातच राहत असू आम्ही.

तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा. वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरतीझलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड! पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते. दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा.

साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे. आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित, सालंकृत सायकल पहायला मिळायला सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच!

माझा मित्र बंडूने नवीन सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herst होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

 

शेक्सपिअर आणि लंडन

रेडवुड सिटी

शेक्सपिअरचाच काळ म्हटले तर सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ते सतराव्या शतकाचे दुसरे शतक असे म्हणता येते. त्या अगोदरच्या शतकापासून इंग्लंड,  

रोगराई, अनेक प्रकारचे आजार, देवी,प्लेग आणि साथीच्या रोगांसारख्या अनेक संकटांनी त्रस्त आणि  ग्रस्त झाले होते. खुद्द इंग्लंडच्या राणीला, शेक्सपिअर जन्मायच्या आधी दोनच वर्षे, देवी आल्या होत्या.आणि शेक्सपिअरच्या जन्मावेळीही ह्या साथींची लागण होतीच.त्यातच लंडनमध्ये बरेच वेळा प्रचंड आगींचेही मधून मधून थैमान चालू असे.ह्याचा परिणाम असा की जन्म नोंदींपेक्षा मृत्युच्या नोंदीच जास्त होत्या ! 

काही रोग त्या काळीच असतात तसेच विशिष्ट प्रदेशापुरतेच मर्यादित असतात. त्या आजारांचे निदानही होऊ शकत नाही. तसाच एक आजार म्हणजे English Sweat !  हा कसलीही  पुर्वचिन्हे न दाखवता तात्काळ यायचा आणि मृत्युही तडकाफडकी यायचा! ह्या आजाराने कित्येक हजार लोक गेले असतील! नशीब असे की त्यानंतर हा आजार पुन्हा कधीही आला नाही. तसाच दुसरा आजार, त्याचेही निदानच करता येत नसे. म्हणून त्याचे नाव ‘नविन आजार ‘. ह्या आजाराने १५५६ ते १५५९ या चार पाच वर्षांत कितीतरी हजारो लोकांचे बळी घेतले असतील! ह्या आजाराचेही संकट पुन्हा आले नाही. पण प्लेग मात्र वारंवार तोंड वर काढत होता. शेक्सपिअरच्या जन्मानंतर तीनच महिन्यांनी त्याच्या गावी साथ आली होती.गावातील दोनशे लोकांचा बळी घेतला. त्या साथीत शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्ड-अपाॅन – एव्हन मधीलच नाही तर जवळपास लंडन व इतरत्र लहान मुलांच्या लोकसंख्येपैकी दोन तृतियांश बालकांचा मृत्यु झाला! 

लंडन हे तर ह्या सर्व गोष्टींचे केंद्र होते म्हणायला हरकत नाही. हे आजार आणि साथी तर होतच पण बंदर असल्यामुळे खलाशी कुठून कुठून येत. ते आपल्याबरोबर गुप्तरोगासह इतरही रोग आणीत व ते लंडनमध्ये पसरत. लंडनमध्ये प्रचंड आगीही लागत.तरीही इ.स.पंधराशे साली लंडनची असलेली पन्नास हजार लोकसंख्या वाढत वाढत सोळाशी साली ती चौपट म्हणजे सुमारे दोन लाख झाली होती. ह्याचे कारण म्हणजे लंडनच्या आजूबाजूच्या परगण्यांतून पोटापाण्याच्या शोधात लोकांचे लोंढे येत. महाराष्ट्राला तर हा अनुभव आजही भोगायला मिळतो.तसेच इंग्लंड प्राॅटेस्टंट असल्यामुळे युरोपमधील इतर देशात ज्यांचा धार्मिक छळ होत असे तेही लोक लंडनमध्येच धडकत. हे सर्व कमी की काय म्हणून त्यात दुष्काळ पडे. १५५५ आणि १५५६ ही दोन वर्षे सतत दुष्काळाची गेली. बेकारी दारिद्रय ह्यात वाढ झाली. 

अशी परिस्थिती असतानाही लंडनमधील नाट्यगृहे व इतर करमणुकीचे खेळ करणारी थेटरे मात्र रिकामी नसत ! लोक परिस्थितीला तोंड देत पुढे जात असतात. काळ आपल्याला अनुकुल करून घेण्याची माणसाची धडपड असते. आणि करमणुक करून घेणे, मनोरंजनाची साधने शोधणे ह्यामध्ये माणूस कोणत्याही काळात कल्पकच राहिला आहे. नाटक हे करमणुकीचे प्रमुख आकर्षण व नाट्यगृहे केंद्रस्थानी होती. 

लंडन तर मोठे शहर. टाॅवर आॅफ लंडन आणि सेंट पाॅलचे कॅथेड्रलच्या भोवतालून जाणारी मोठी तटबंदी लंडनभोवती होती. त्या तटबंदीच्या आतील ४४८ एकरावर लंडन वसले होते. शेक्सपिअरच्या वेळचे लंडन तसे लहानच म्हणायचे. दक्षिणोत्तर दोन मैल आणि पूर्वं-पश्चिम अंतर तीन मैल! तरीही संपूर्ण युरोपमध्ये त्यावेळी नेपल्स आणि पॅरिस ही दोनच शहरे लंडनपेक्षा मोठी होती. लंडनच्या भोवती असणाऱ्या तटबंदीचे काही अवशेष आजही दिसतात.आपल्याकडे औरंगाबाद मधील पैठण गेट,भडकल गेट किंवा सोलापूरातील बाळी वेस,विजापूर वेस या वेशींच्या नावांवरून गावाच्या जुन्या सरहद्दी समजतात तशा लंडनच्या तटबंदीची आठवण बिशप गेट, न्यू गेट अशा वेशींच्या रूपाने आजही जपलीआहे.

वारंवार येणाऱ्या प्लेगच्या व इतर अनेक रोगांच्या साथीमुळे,सरदार,दरकदार,अमीर उमरावांनी आपले महाल, वाडे लंडन बाहेर बांधले होते. राजवाडा आणि ह्या सर्व इमारती रिचमंड,ग्रीनविच,हॅ्म्टन कोर्ट ह्या गावात होती.

वारंवार उदभवणाऱ्या साथीचे रोग,प्लेग, दुष्काळ, मोठ्या शहरात पोट भरण्यासाठी करावी लागणारी कमालीची धडपड ह्या परिस्थितीमुळे लोकांची आयुर्मर्यादा ३५ वर्षेच होती. गरीबांच्या वस्तीत तर ती उणीपुरी फक्त पंचवीस वर्षे इतकीच होती! 

लंडनमधील अरुंद रस्त्यांची आणि गल्ली बोळांची आज कल्पनाही करता येणार नाही. काही मोजके मुख्य रस्ते सोडले तर सर्व रस्ते फारच अरुंद होते.घरेही एकमेकांना चिकटलेली. त्यांची छपरेही एकमेकांच्या घरांना चिकटलेली असत! घाटाचा रस्ता किती बाकदार वळणा वळणांचा होता ह्या अतिशयोक्तीच्या गोष्टीतील, तिथून जाणाऱ्या आगगाडीचा इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड एकमेकांशी हस्तांदोलन करीत,तसे अशा इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहणारे बोलता बोलता दुसऱ्यांच्या घरात जात! 

कचरा सांडपाण्याची विल्हेवाट लावणे जिकीरीचे होते. लंडनचा आढावा घेणारा,लंडन शहराचा इतिहासकार जाॅन स्टो म्हणतो,” मेलेली कितीतरी कुत्री- मांजरे त्या खड्डयात टाकलेली असत. त्यावरूनच त्या खड्यांचे नाव HoundsDitches पडले. 

अशा घरांच्या वस्तीतच श्रीमंत आणि गरीबही शेजारी राहात असत. लंडन ब्रिज जवळच्या डाॅऊगेटच्या भिकार वस्तीतील आपल्या घरात राहणारा कादंबरीकार विद्वान राॅबर्ट ग्रीनची अखेर झाली. राॅबर्ट ग्रीनचे हे घर, इंग्लंडचा त्यावेळचा प्रसिद्ध दर्यावर्दी, धनाढ्य फ्रान्सिस ड्रेकच्या घरापासून चार घरे सोडूनच होते! अशीही वेगळी समानता त्यावेळी होती ! 

रायगडाचे सर्व दरवाजे रात्री नऊच्या तोफेला बंद होत. त्याप्रमाणे लंडनच्या सर्व वेशींचे दरवाजे संध्याकाळी सात वाजता बंद होत. कोणालाही तटबंदी बाहेरून आत येण्यास आणि बाहेर पडण्यास बंदी होती. पण कायदा तिथे पळवाट आणि जिथे अंमलबजावणी तिथे ढिलाई येतेच. 

तटबंदीच्या बाहेरच नाट्यगृहे. आणि इतर करमणुकीच्या खेळांची व कार्यक्रमाची थेटरे होती. ते सर्व खेळ सात आणि त्यानंतरही बऱ्याच वेळाने सुटत. त्या प्रेक्षकांना अडवले जात नसावे. तटबंदीच्या आतील,गावातील सर्व हाॅटेले खाणावळी दारुचे गुत्ते सात वाजताच बंद करावे लागत. पण इथेही कायदा काटेकोरपणे पाळला जात नसावा किंवा पोलिसांना लोक जुमानत नसावेत. कारण नाटकात आणि इतर खेळातही रात्री बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची टर उडवलेली असे. शेक्सपिअरनेही आपल्या Much Ado About Nothing  मध्ये डाॅगबेरी ह्या पात्रातून पोलिसांची चेष्टाच केली आहे. 

लंडनच्या प्रशस्त चौकात बारा एकरात उभे असलेल्या सेंट पाॅल चर्चची अवस्था अस्ताव्यस्त म्हणावी की अत्यवस्थ असा प्रश्न पडतो. काही वेळेला वाटते की हे चर्च वगैरे नसून सगळा ‘ या या घर आपलेच आहे, ऱ्निवांत हात पाय पसरा, पसार व्हा,पंगती उठवा,पतंगी उडवा काहीही करा’ अशी त्यावेळी तिथे रोज स्थिती होती.

तिथे काय नव्हते? स्मशानही होते आणि बाजारही भरलेला असे.ह्यापूर्वीच्या शतकात छापील पुस्तके घेणे ही चैनीची,श्रीमंतांची बाब होती. पण छपाई यंत्रे वाढली, कागदही भरपूर मिळू लागला. त्यामुळे पुस्तकेही भराभर बाहेर येऊ लागली. बऱ्यापैकी माणूसही पुस्तके घेऊ शकत होता. त्यामुळे बाजारात पुस्तकांची,कागद आणि इतर स्टेशनरीचे दुकानदार दुकाने मांडत असत. एलिझाबेथ राणीच्या काळात सात हजाराहून पुस्तके प्रकाशित झाली होती! ह्या कॅथड्रेलच्या आतली परिस्थितीही फारशी निराळी नव्हती. त्याच्या आतल्या विशाल भागात तर अतिशय गोंधळ, गडबड, गजबजाट आणि निरनिराळे आवाजच आवाजांचे राज्य होते. आतही बाजार भरलेला! सुताराची लाकडी वस्तूंची, लोकांना पत्रे, सरकारी कागदपत्रे, अनेक प्रकारचे अर्ज लिहून देणाऱ्या ‘ लेखनिकांच्या’ टपऱ्या, वकीलांचे लहान दुकानांसारखी कार्यालये, आणि इतर कारागिर, कामगारांच्या टपऱ्या, मालाची नेआण करणारे. तसेच इतर निरनिराळे व्यवसाय करणारेही  बसलेले असत. त्यातच दारुडे, रिकामटेकडे इथे तिथे पसरलेले असत! काहीजणांनी तर तिथेच,जिथे तिथे लघवी केंद्र म्हणूनही कॅथेड्रलचा वापर केला असे!   

चर्चच्या मार्गिकेमध्ये अनेक लहान मुले चेंडू, चेंडूफळीचे खेळ खेळत असत. चर्चच्या लोकांना त्या मुलांना हुसकावून लावणे हेच काम आहे असे  वाटावे इतपत पोरे गर्दी करत.त्यातच आवारात अनेक लोक शेकोट्या पेटवून स्वत:ला उबदार ठेवण्याचा उद्योग करत. जिकडे तिकडे धूरच धुर! चर्चच्या आतही हा धूर पसरलेला असे! ह्या सगळ्या गलक्यात पाद्र्याचे प्रवचन चालू असे. चर्चमधल्या भक्तांना काय ऐकू येत असेल ते तेच जाणोत.एक पिढी उलटून गेल्यावर सेंट पाॅलच्या कॅथड्रेल मध्ये आलेला जाॅन एव्हलिन लिहितो,” मी त्या भव्य आणि प्रशस्त चर्चमध्ये जायचो तेव्हा तिथे पसरलेल्या धुरामुळे फादर दिसतही नसे आणि तेथील प्रचंड कोलाहलामुळे तो काय उपदेश करतोय तेही ऐकू येत नसे!” 

ह्या चर्चचा आणखी एक व्यवहारी उपयोग लंडनचे लोक करीत. ते चर्च अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग होता की नाही हे सांगता येणार नाही. पण पलिकडे असलेल्या रस्त्यावर जायला लोक ‘ जवळचा मार्ग’ short cut म्हणून रोजच सर्रास वापर करीत! त्याला एक कारण म्हणजे लंडनला केव्हाही पडणारा पाऊस. पाऊस पडायला लागला की आडोशासाठी येणारी रहदारी तशीच चर्चमधून थेट पलीकडच्या रस्त्यावर जात असे. लोक पाऊस पडू लागला की कोणत्याही बंदिस्त जागेत आडोसा गाठण्यासाठी धावत पळत निघत. ह्या तारांबळ उडवणाऱ्या घाई गर्दीमागे लंडनचे पावसाळी हवामान आणि दुसरे नुकतीच फ्रान्समधून आलेली काॅलरची फॅशन! ही काॅलर मानेभोवती असणे हे केवळ फॅशनचेच नव्हे तर प्रतिष्ठेचे लक्षण होऊ लागले होते. काॅलर तरी कशी? कापडी फितींच्या(laces)फुलांच्या मोठ्या पाकळ्यांचे आकर्षक पद्धतीने लावलेले थर.माणसाकडे पाहिले तर जणू मोठ्या फुलातून डोके उमलले आहे असे वाटावे.ही काॅलर लेसची आणि खळ लावलेलीअसे. पावसात भिजली की कोमेजून जायची. पाकळ्या पंख मिटून पसरून पडायच्या. त्यामुळे ती वापरणाऱ्याचाही रुबाब कमी होऊन त्याचाही चेहरा मलूल होऊन जायचा ! शिवाय त्या काळी कपड्यांचे रंगही कच्चे होते. बहुतेक रंग पाण्याने ओघळायचे. सर्व कपड्यांवर ते पसरायचे. ही दुसरी भीती! त्यामुळे पाऊस पडू लागला की सगळीकडे आपली शान जाऊ नये म्हणून एकच धावपळ आणि गडबड उडायची. मग ‘सेंट पाॅल’ शिवाय कोण आश्रय देणार? 

ह्या फॅशनेबल काॅलरचे नाव समजल्यावर मला पुलंच्या ‘ अपूर्वाई’ मधला संवाद आठवला! पुलंना पिकॅडलीला जायचे होते. किलबर्न स्टेशनवरच्या तिकीट खिडकीतल्या बुवाला ते पिकॅडलीची तिकीटे मागतात. पुलं काय म्हणतात ते पुलंच्या शुद्ध तुपातील इंग्रजी उच्चारांमुळे त्या बुवाला काही केल्या समजेना. तो त्याच्या उच्चारात ,” मे ग्याॅ फाऊन” म्हणाला असे पुल सांगतात. पुलं अखेर चिडून त्याला आपल्या खणखणीत इंग्रजीत ” टू टिकेटस् आॅफ द ट्यूब रेल्वे फाॅर पिकॅडली” असे स्पष्टआवाजात सुनावतात. तरी तो प्रश्नार्थक मुद्रेनेच पाहात राहतो. अखेर पुल कागदावर इंग्रजीत “दोन पिकॅडली” असे लिहूनच त्याला देतात. तो बिचारा लागलीच “ओSS! यू मीन फिख्व्याड्ली!” असे म्हणून पटकन तिकिटे देतो. लक्षात आले असेल की फ्रान्समधून आलेल्या ह्या नविन पद्धतीच्या वर्तुळाकार गेंदेदार काॅलरला पिकॅडली म्हणत! 

पण ह्या पिकॅडलीचे स्पेलिंग Piccadills, pecadills, pickadailles, picardillas, अशा निरनिराळ्या २० तऱ्हेच्या “स्पेलिंग”मधून लिहिले जात असे ! अखेर Piccadilly असे लिहिण्याची पद्धत रुढ झाली. 

प्रारंभीचा piccadill शब्द शेक्सपिअरच्या काळातच १६०७ साली थाॅमस डेकरने लिहिलेल्या ‘नाॅर्थवर्ड हो’ ह्या नाटकात पहिल्यांदा आढळतो.नंतर काही काळाने ट्रॅफलगार स्क्वेअर जवळच एक मोठी इमारत Piccadilly Hall नावाने सर्रास ओळखली जाऊ लागली; कारण इमारतीच्या मालकाचा ह्या आधुनिक स्टार्च केलेल्या पाकळ्या पाकळ्यांच्या गोल काॅलर तयार करून विकण्याचा मोठा व्यापार होता.त्या व्यवसायाच्या कमाईतूनच त्याने ही इमारत बांधली होती. म्हणून साहजिकच ती Piccadilly Hall नावानेच ओळखली जाऊ लागली. हाईड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याचे Piccadilly नावही या हाॅलवरुनच पडले आहे. त्या काॅलरवरून नाही. 

पंधराव्या – सोळाव्या शतकात आज लोक खात नाहीत ते करकोचे, हंस, लांब मानेचे बगळ्यांसारखे पक्षी खात असत. गरीबांचे जेवण साधेअसे. जाडा भरडा पाव आणि चीझ्. हेच दोन पदार्थ त्यांच्या जेवणात असत. त्यात बदल नसे. ज्यांना हेही परवडत नसे ते फक्त भाजीपाल्यावर गुजराण करीत. 

बटाटा हा त्या काळी ब्रिटनला अगदी नविन होता. त्याची पाने दुसऱ्या काही विषारी वनस्पतींसारखी दिसत असल्यामुळेही बटाटा खायला कोणी धजत नसे. इंग्लंडमध्ये बटाटा खाण्यास सुरवात व्हायला अठरावे शतक उजाडावे लागले!  आपल्याकडेही सुरवातीस बटाटा आणि टोमॅटोकडे संशयानेच पाहिले जात असे.टोमॅटो तर मास मटनाशीच जोडला गेला होता ! 

काहीही असो पण गोड मात्र इंग्रजांना खूप आवडत असे. 

गरीब असो,मध्यम किंवा श्रीमंत असो सर्वांमध्ये साखर खाण्याचे प्रमाण प्रचंडापेक्षाही प्रचंड होते! साखर घातली नाही असा एकही पदार्थ त्यांनी शिल्लक ठेवला नव्हता. साखरेच्या तावडीतून मास-मच्छीमटण,अंडी हे मांसाहारी पदार्थही सुटले नव्हते. बरे, प्रत्येक वेळी, प्रत्येक पदार्थात साखर घालताना ‘अापला हात जगन्नाथ’ ह्या मापानेच घातली जात होती. दारूतही ती अशीच ओतली जाई. कोण किती साखर खातात त्यावर प्रतिष्ठा आधारली होती. साखर खाऊन कित्येकांचे दात काळे पडले होते.ज्यांचे तितकेसे काळे नसत ते कमीपणा येऊ नये म्हणून दातांना काळा रंग लावत! आपल्या मराठीतले “काळं कर तुझं तोंड”, ” त्याने तिथून तोंड काळे केले ” हे वाक्प्रचार तिकडे हे सन्मानादर्शक समजले गेले असते! 

आज साखरेवर पुर्णपणे नसला तरी बहिष्काराची फिकट सावली पडलीय असे वाटते. साखर म्हटली की “नको नको”, “अगदी कमी” हेच ऐकायला येते. कालाय तस्मै नम: म्हणावे का विज्ञानाची प्रगती म्हणायचे.

हे साखर खाण्याचे झाले. पण ‘पिण्या’चेही प्रमाण तितकेच होते. बिअर अतोनात प्याली जात होती. जीवनात हसणे, चांगल्या गोष्टींचा उपभोग घेणे करमणुकीचे कार्यक्रम पाहणे म्हणजे पाप समजणारे कडक सोवळ्याचे कर्मठ puritans पंथीय लोकही बिअरवर मात्र तुटून पडत! असे सांगतात की ह्या प्युरिटनांच्या म्होरक्याला जेव्हा न्यू इंग्लंडला आणले तेव्हा त्याच्या जहाजात चाळीस हजार लिटर बिअरशिवाय इतर दुसरे काही नव्हते! चर्च,मठात प्रत्येकाला दिवसाला चार लिटर बिअर मिळायची! 

तंबाखूच्या कथेवर तर विश्वास बसणार नाही इतकी ती थक्क करणारी आहे. तंबाखूच त्या काळी ‘व्यसनमुक्त’ होती! शेक्सपिअर लंडनला आला आणि पाठोपाठ तंबाखू एकवर्षाने आली. सुरवातीला ती एक चैनीची वस्तुच होती.पण शतकाच्या शेवटी ती गोरगरीबांचीही झाली. तंबाखूचा इतका प्रसार झाला की लंडनमध्ये तंबाखू आणि तिच्या पदार्थांची सात हजार दुकाने झाली होती! 

तंबाखू केवळ शौक म्हणून खाण्यासाठीच वापरली जात नसे. रोग प्रतिबंधकारक, बऱ्याच रोगांवर उपचार म्हणूनही ती वापरली जात असे.त्यामध्ये गुप्तरोगांचाही समावेश असायचा.अर्धशिशी,तोंडाची दुर्गंधी आणि त्याहीपेक्षा लंडनला सळो की पळो करून हजारो लोकांना मृत्युमुखी धाडणाऱ्या प्लेगसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून नियमाने तंबाखू खाल्ली जात असे. तंबाखूचा शुभसंस्कार लहान मुलांवरही करत असत. इटनसारख्या शाळेत आज तंबाखू खाल्ली नाही म्हणून विद्यार्थ्यांना बदडून काढत! आपल्याकडेही तंबाखूची मिश्री अजूनही दात घासण्यासाठी खेड्यापाड्यात वापरत असतील.  पूर्वी तर शहरातही बरेच लोक तंबाखूने दाताला,तल्लीन होऊन,मालिश करत बसत ! 

विज्ञानाच्या दाराची कवाडे उघडू लागली तशी आज तंबाखूचे प्रस्थ जवळपास नाहीसेच झाले. 

शेक्सपिअरच्या आधी आणि त्याच्या काळातही समाज अनेक लहानमोठ्या स्तरांत विभागला होता. अर्थात सर्वात उच्चपदी राजाच होता. त्यानंतर येणाऱ्या सरदार, उमराव,जहागिरदार लष्करी अधिकारी आणि त्यानंतर उच्च स्थानवरचे धर्माधिकारी आणि नंतर वर्णी लागायची ती प्रतिष्ठितांची. ह्या सर्वांच्या खाली नंतर नागरिक. त्यातही प्रथम श्रीमंत जसे व्यापारी आणि त्या खाली मध्यम वर्ग. 

शेतकरी व सर्वांत खाली सामान्य कारागिर व त्यांच्याही खाली मजूर असायचा. वर जे सामाजिक थर सांगितले त्यातही अंतर्गत पायऱ्या होत्याच.थोडक्यांत फळ्याआणि चिरफळ्या अनेक होत्या. 

कोणी काय व कोणता पोशाख घालायचा, पेहराव काय कसा करायचा, कोणत्या प्रकारचे कापड व तेही कोणत्या वस्त्रासाठी वापरायचे ह्याचेही नियम होते! ज्याचे वार्षिक उत्पन्वीस पौड अाहे त्याला सॅटिनच्या कापडाचे जाकिटासारखे (Doublet) वापरायला परवानगी होती. पण सॅटिनचा gown पायघोळ अंगरखा किंवा कोटासारखे वस्त्र वापरता येत नसे. ज्याचे उत्पन्न शंभर पौडांपेक्षा जास्त असेल त्याला सर्व कपडे सॅटिनचे वापरायला मुभा होती. पण आतले जाकिटासारखे doublet फक्त मखमलचे वापरायला परवानगी होती. वरच्या पोशाखात मात्र मखमलीचा वापर करण्यास बंदी होती! मात्र निळ्या रंगाचे किंवा गडद जांभळट तांबड्या रंगाच्या मखमलीचे जाकिट वापरायला त्याला बंदी होती. कारण ह्या रंगाची मखमल फक्त ‘सर’ किताब असलेल्या शूर सरदारांसाठी व त्यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाच्या सरदारांनाच वापरण्याचे अधिकार होते.  ह्यापेक्षाही चक्रावून टाकणारी मर्यादा-प्रतिबंध म्हणजे पोषाखातील एखाद्या विशिष्ठ वस्त्र प्रावरणासाठी किती कापड वापरायचे व त्याला किती दुमडून किती चुण्या असल्या पाहिजेत ह्याचेही निर्बंध होते!  हे निर्बंध असण्यामागे ह्या कापडाची आयात होत असे. त्यामुळे खूप पैसा बाहेरदेशी जात असे. त्यावर काही प्रमाणात बंधने घालावीत ह्यासाठी हे नियम असावेत असे काही तज्ञांचे मत आहे. 

राजे आणि त्यांचे अमर्याद अधिकार किती असू शकतात  ह्याची कल्पना ह्यावरून आणि कोणी काय, किती खावे ह्या सूचना वाचल्यावरही समजून येते. 

कुणाच्या जेवणात किती पदार्थ असावेत किंवा एकूण वाढप किती वेळा व्हावे ह्याचे नियमही सामाजिक, राजकीय स्थानावर ठरलेले होते. जसे चर्चच्या कार्डिनलला जेवणात नऊ पदार्थ किंवा नऊ वेळा वाढप करण्याची परवानगी होती. गरीबाला व त्याने कुणाला जेवायला बोलावले तर फक्त दोन पदार्थ आणि सूपची परवानगी होती. इंग्लडने पोपची सत्ता झुगारून दिल्यानंतर शुक्रवारी मास खाण्यावरची बंदी उठली. 

कायदा सुव्यवस्था व स्वच्छतेसंबंधीचे कायदेकानू कडक होते. खेडेगावाच्या पातळीवरही कुणाची बदके रस्त्यावर हिंडताना आढळली तर दंड होत असे. गाई घोड्याची शेण-लीद रस्त्यावरच नव्हे,कडेला जरी दिसली तरी दंड होत असे. ह्या शिक्षेतून शेक्सपिअरच्या बापाचीही सुटका झाली नाही. हेन्री स्ट्रीटवर सार्वजनिक ठिकाणी अशी घाण केल्याबद्दल त्याला एक शिलिंग दंड ठोठावला होता. त्या काळी एक शिलिंग ही मोठी रक्कम होती. ह्या शिक्षा प्लेग व इतर रोगराई पसरु नये यासाठी आवश्यकच होत्या. 

पुस्तकांचा प्रसार आणि खप वाढला होता. नाटकांना लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. व राज्यकर्त्यांचा उदार आश्रय लाभला होता. स्पेन विरुद्धचे युद्ध जिंकल्यामुळे लोकांत उत्साह होता. काव्य नाटके आणि एकूण साहित्यालाच चांगले दिवस आले होते. जगात आजही काव्यात्मक भाषा, प्रभावी संवाद, अत्यंत कमी व नेमक्या शब्दांत प्रसंग त्याची वेळ व पात्रे कोण हे शब्दातून डोळ्यांसमोर उभे करणारा,मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरिक्षण,नाट्यपूर्ण प्रसंग आणि हॅम्लेट,आॅथेल्लो, आयागो, ज्युलिेएट, यासारख्या पात्रांची अजरामर स्वगते, सुखात्मिका आणि शोकांतिका ह्या दोन्ही तऱ्हेची,आजही गाजत असलेली नाटके लिहून दिगंत कीर्ति मिळवणारा; आपल्या चतुरस्त्र प्रतिभेच्या बळावर लोकांचे आणि राजघराण्यातील परिवाराचे मन जिंकणारा; स्व कर्तृत्वावर राजाकडून आपल्यासाठी अभिमानाने मिरवावयाचे मानचिन्ह मिळवणारा; 

लंडनपासून शंभर मैलावर असलेल्या लहानशा स्ट्रॅटफर्ड- अपाॅन- एव्हन गावातील शेक्स्पिअरचे ह्याच काळात लंडनला आगमन झाले. इथेच त्याचा उत्कर्षही  झाला. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाचे नावही ठळकपणे जगाच्या नकाशावर आणले! 

[बिल ब्रायसनचे शेक्सपिअरवरील पुस्तक व काही जमवलेल्या माहितीच्या आधारे.] 

फुलेच फुले

 रेडवुड सिटी

फुलेच फुले 

परवा, कोल्हापूरहून निघणाऱ्या ‘ लोकमत’ आवृत्तीतील पळसाच्या फुलांचा सुंदर फोटो असलेला आणि त्या झाडाच्या गुधर्माविषयीचा एक चांगला लेख वाचायला मिळाला. 

बरेच वर्षांनी चित्रात का होईना पळसाची फुले पाहायला मिळाली. नोकरीतल्या फिरतीत ही लाल अग्निफुलांच्या ज्योतींनी बहरलेली झाडे पहायचे भाग्य लाभत होते. त्याला ज्वाळासारखी दाहक उपमा दिली असली तरी उन्हाळ्यात ती फार नेत्रसुखदायी होती. ती फुले पाहताना उन्हाळ्याचा रखरखीतपणा एकदम कमी होऊन तांबड्या रंगाचा गारवा जाणवायचा. आधीच उन्हाचा ताप, झळा आणि त्यातच बसमधल्या गर्दीमुळे वाढणारा घाम,प्रवाशांच्या चढ-उतारीची गडबड-गोंधळ, बडबडीची गडबड ही सर्व त्या रंगीत लाल फुलांमुळे कानामागे पडायचे. तहान लागली वाटत होती तीही भागलेली असायची ! साधारणत: गारवा हा हिरवा म्हटला जातो. पण पळसाची तांबडी फुलेही त्या त्या क्षणी थंड वाटत. अजिंठ्याच्या डोंगरकड्यावरून, चाळिसगाव-कन्नड घाटातून किंवा कधी सिन्नर तर लळिंगच्या डोंगराजवळून जाताना, तसेच यवतमाळच्या जंगलातून अकोल्याकडे येताना ह्या विस्तवाच्या फुलांचे सुभग दर्शन होई!  पळसाच्या तांबड्या फुलांचे हे आयते सर्वांसाठी भरवलेले प्रदर्शन पहायला मिळे!

ह्या तांबड्या लाल पळाशफुलांच्या जोडीनेच एका पिवळ्या फुलांनी लकडलेल्या झाडांची आठवण झाली. झाडांची म्हणायचे खरे पण ती फुले त्यावर लकडली होती म्हणून झाडे म्हणायची इतकेच. नाहीतर त्या पिवळ्या सोन्याच्या तितक्याच शांत पण तजेलदार, झळाळीत फुलांनीच आपल्या शोभेसाठी असावीत म्हणून उदार मनाने ठेवलेल्या चारदोन दिसणाऱ्या पानांच्या फांद्यामुळे त्यांना झाडे म्हणायची. त्या पिवळ्याधमक फुलांच्या घोसात कुणाचे लक्ष जाणार झाडाकडे? 

नगरला जाताना थोडे गावाबाहेरच पीडब्ल्यूडीच्या साहेबांच्या मुख्य आॅफिसच्या दहाबारा दगडी बैठ्या इमारती होत्या. आवार मोठे. त्या इमारतींच्या आसपास बाहेरील कुंपणाच्या भिंतीलगत  बहाव्याची म्हणजे कॅशियाची बरीच झाडे होती. ( कॅशिया म्हणजेच बहावा की निराळी ते नक्की माहित नाही) ती फुलली की सगळीकडे सोनेरी प्रकाश पडल्याचा भास व्हायचा. सूर्य ढगाआड गेलेला असला तरीही! सर्व आवार त्या फुलांच्या प्रकाशातच वावरत असायचे. काय ते पिवळे घोस! भरघोस हा शब्द त्यांच्यासाठीच किंवा त्या फुलांच्या घोसांनीच स्वत:साठी केला वाटावे असे ते लकडलेले असायचे! बरे, विशेष चमकदार वगैरे काही नव्हते. पण त्यांची ताजी टवटवीच उल्हसिता होती! 

फुलांचे झुबके त्यांच्या वजनाने खाली झुकलेले. वाऱ्यासंगे किंचित डोलणारे, जसे तरुणीच्या कानातील आभूषणांची मोहक आणि आकर्षक हालचाल वाटावी असे ते दृश्य दिसे. बाजारपेठेतील सोन्याचे दुकानदार भाजी फळांसारखे आपल्या पाट्या टोपल्या सोन्यांनी भरून बसलेत की काय असा तो पिवळा त्या आवारात व रस्याच्या कडेलाही बहरला होता! बालकवींनी पाहिले असते तर सुवर्ण चंपकाऐवजी तितक्याच आनंदाने ‘ सुवर्ण कॅशिया फुलला विपिनी ‘ म्हणाले असते!  

सोने पिवळे, ‘पिवळे पिवळे ऊन्ह कोवळे ‘ किंवा हळदीसारखा पिवळा हे फक्त त्या फुलांच्या घोसांचा पिवळा रंग लक्षात यावा एव्हढ्यासाठी. पण तो पिवळा किती व कसा,त्याच्या छटा शब्दात सांगणे कठिणच आहे. हे कॅशिया किंवा बहाव्याच्या फुलांचे रम्य दृश्य नगरला जाताना – तिथून घरी परतताना दिसायचे. 

हा पहिला बहर पाहिला त्या आनंदाच्या भरात मी घरी मुलांनाही ह्याचे पत्र लिहिले होते. त्यात,ओघात, संत निळोबारायांनी केलेल्या ज्ञानेश्वरांच्या आरतीतील   ‘सुवर्णपिंपळ असुमाय’ चाही उल्लेख होता. त्याच पत्राची नक्कल करून मी उत्साहाच्या भरात पीडब्ल्यूच्या मुख्य अभियंत्यानांही ते पाठवले होते! त्या साहेबांना मी त्यांच्या आवारातील हे फुलांचे सौदर्य नजरेस आणून दिले असे मला वाटले. त्यांच्या कार्यालयाने ही झाडे लावून दिलेल्या आनंदाबद्दल आभारही मानले. पण त्यांनी कुठला कोण वेडा माणूस म्हणत माझे नाव पत्ता ठाण्याच्या आणि येरवड्याच्या हाॅस्पिटलला कळवला असेल!  

पिवळ्या कॅशियावरून आणखी एका अविस्मरणीय पिवळ्या फुलांनी बहरलेल्या हजारो रांगांची आठवण झाली. ती सांगतो आणि हा पिवळ्या फुलांचा प्रसन्न रंगीत चष्मा बाजूला ठेवतो.

तो काळ सूर्यफुलांच्या लागवडीचा प्रारंभाचा  होता. करडई शेंगादाणे तीळ यांचे पिक वाढत नव्हते आणि त्यांचे भावही परवडणारे नव्हते. व तेलाचाही  त्या प्रमाणात भरपूर उतारा नसे. रशियाकडून सूर्यफुलांच्या तेलाची महति कळली. आपल्याकडेही त्याची शेती सुरु झाली.कुणाच्या बागेत एखाद दुसरे झाड दिसणाऱ्या सुर्यफुलांची आता राने बहरू लागली. 

माझ्या फिरतीत बीड जिल्ह्यातील तेलगावला गेल्यावर तिथे दुतर्फा सूर्यफुलांची मोठी पदके पाहिली! प्रथमच येव्हढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पिवळ्या पाकळ्यांच्या सहस्रकिरणांचे तेजोवलय मिरवित, ऐटीत उभे असलेल्या टपोऱ्या काळ्या डोळ्यांची ती फुले पाहिल्यावर थक्क झालो होतो. चौफेर,नजर फिरवावी तिकडे ही सोन्याची तळहाता एव्हढी मोठी पदके उन्हात हसत पाहताहेत असा भास होत होता! एकदा वाटले प्रभाशंकर कवडी इथे येऊन ह्या फुलांना डोळे देऊन गेले की काय? 

हे प्रभाशंकर कवडी कोण ? चित्रकार. त्यांची चित्रे किशोर मासिकात बरीच वर्षे त्यातील कथा लेख सजवत होती. इतर काही प्रसिद्ध मासिकात, काही जाहिरातीतही ते चित्रे काढीत. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे डोळे. ते मोठे टपोरे आणि गोल असत. बुबुळांच्या ह्या एकमेव आकार आणि ठसठशीतपणावरून व चेहऱ्यांच्या गोलाईवरून हे कवडींचे चित्र पटकन ध्यानात येई. सूर्यफुलांचाही मध्यगोल तसाच ठसठशीत आणि एकदम स्पष्ट नजरेत भरणारा! 

एका ओळीत उभे राहिलेल्या सूर्यफुलांच्या रांगाच्या रांगा हासुद्धा एक वेगळाच अपूर्व देखावा होता. आजूबाजूला काही नाही. घरेही तशी दूरच होती. सुर्यफुलांच्या शेकडो हजारो खड्या सैनिकांनी घातलेल्या वेढ्यात मी एकटा. बरोबर ड्रायव्हर. पाहातच राहिलो आम्ही! वरून एखादे विमान येत नव्हते; ते असते तर हिचकाॅकच्या North By Northwest ची आठवण झाली असती! 

महाशिवरात्रीचा उपवास

रेडवुड सिटी

जलदीची एक मैत्रिण अवंती दामले ही खेळाडूंच्या आहाराची तज्ञ आहे.तिने एक चांगला आहार, सबंध दिवसात क्रमाने आठ वेळा घ्यायचा अशा आठ ‘मील्सचा ‘ सांगितला आहे. ती मील्स वाचल्यावर……

“महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा आषाढी- कार्तिकी

सारख्या मोठ्या एकदशीचा उपवास असो…..

आणि ह्या प्रत्येक वाट्याबरोबर( वाटा, शिधा म्हणजेच ‘मील्स’ बरोबरीने) आपली दोन वेळा साधी भगर, तीन वेळा भगरेची खिचडी, ती नामांकित शेंगाचा कूट पेरलेली साखरेची चव आणि सहज म्हणून फिरवलेला लिंबाचा रस अशी बटाट्याची ढीगभर भाजी, निराळी साखर न घालावी लागणारी सावळ्या-गुलाबी रंगाचा रताळ्याच्या खिसाची टेकडी, आणि वाळकाच्या कोशिंबिरी शिवाय चव कशी येणार म्हणून तिही हवीच की; हे सर्व बसवायचे, त्याशिवाय चार म्हणत चाळीस खजुराच्या बिया म्हणजे बिया काढून उमलवलेले दोन रात्री तुपात भिजवलेले म्हणण्यापेक्षा थबथलेले चविष्ट खजूर; शेंगादाण्याची खसखस लावून केलेली ताकातली गरमा गरम आमटीची,मधून मधून म्हणायचे पण वारंवार भुरकुन मजा घेत तर कधी सढळ हाताने पुन्हा ताटात आलेल्या भगरीला तिने आंघोळ घालत मजा लुटायची; ह्यातही ती आमटी, नुकत्याच बाजारात आलेल्या ओल्या भुईमुगाच्या शेंगादाण्याची असली तर ती आनंदाने ठो ठो करतच प्यावी!

पण ओल्या शेंगांच्या ह्या आमटीमध्येही एक पाठभेद आहेच. बरेच जण त्या ओल्या शेंगा तशाच वाटून कुटुन मिक्सरून आमटी करतात. वेळ वाचतो पण चवीतही बचत होते. त्याऐवजी ते शेंगादाणे, त्यातील ओलेपणाचा जीवनरस पूर्ण जाऊ न देण्याइतपत हलकेच,बहुतेक शेंगांवर एकदोन, दृष्ट लागू नये म्हणून, गालबोटे उमटली न उमटली अशा भाजून घ्याव्यात.मग निश्चयाने सगळा मोह आवरून त्यांच्याकडे न पाहता कुटायवाटायमिक्सरुन घ्याव्यात. पण इतका निग्रह करूनही स्वत:ने, आणि इतरांनीही त्या मुठ मुठ घेतलेल्या असतातच. मग बाजारात पुन्हा पुन्हा एक दोन हेलपाटे घातल्याशिवाय प्रत्येकाला किमान सहा-सात वाट्या ती अमृतमधुर आमटी पिण्याचे भाग्य लाभत नाही. पण उपास घडणार म्हटल्यावर इतके तरी कष्ट घ्यावे लागणारच! आम्हाला ठीक होते. फाटक जवळच होते. आणि प्रत्येक हेलपाट्याला एक भाऊ होता.”

“मग एकादशी असली म्हणून काय झाले? दुपारी चार वाजता साबुदाण्याचे वडे डझन अर्धा डझन खाल्ले नाहीत तर उपास मोडेतो या धसक्याने, ते खायचे. बरे कुणी आग्रहही करत नाही म्हटल्यावर स्वत:च मोकळेपणाने ते आणखी दोन तीन फस्त करायचे”.

“रात्री बेताचे हलके म्हणून ताटाऐवजी मोठी ताटली शिगोशिग भरून,शुद्ध तुपातली उपासाचे लोणचे आणि वाटी सापडत नाही म्हणून वाडगाभर कवड्या दह्याच्य साथीने साबुदाण्याची खिचडी चवीचवीने दोन तीवेळा ती ताटली भर भरून खायची. रात्री झोपताना पोटात काहीतरी थंड जावे म्हणून दह्यादुधात भिजवलेल्या ‘ खारकांच्या सुमनमालां’ची मधुर आणि हविहवीशी वाटणारी खीर पोटच नव्हे तर आत्मारामही गार पडावा इतकी रिचवणे आवश्यकच असायचे.मग तेव्हढ्यात अरे इतके लंधन करूनही केळी खाल्ली नाहीत तर तो उपवास कसला ह्याची आठवण होते. मग कुरकुरत का होईना सहा सात लठलठ् केळी रिचवून नाईलाजाने झोपायचे. ”

“हे सगळे साधायचे म्हणजे अवंतीबाईंच्या आग्रहाचा मान ठेवून त्याची सगळी ‘मील्स’ ह्या माझ्या उपासाच्या नित्यनेमात बसवावी लागणारच.नाही म्हणून कसे चालेल! नव्या जुन्यांचा संगम करून निदान उपवास तरी करावाच. ”

“पण त्यामध्ये एक लहानसा बदल करावा म्हणतोय. त्यांच्या बऱ्याच मील्समध्ये, उदा. बदाम दोन अंजीर एक असे प्रमाण दिले आहे. ते बहुधा त्यांचे दामले आडनाव सिद्ध करण्यीसाठी असावे. साधारणत: मुठभर, एक दोन मुठी आणि डझन अर्धा डझन हे प्रमाण मला जास्त योग्य वाटते! ते वापरूनच त्यांच्या आरोग्यदायी ‘मील्स’सह उपवास करणार आहे. “

भगवद् गीता अ. १५ वा श्लोक १८, १९ आणि २० वा

रेडवुड सिटी 

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तम: ।

अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित: पुरुषोतम: ।।१८।।

मी क्षराच्याही पलीकडचा आणि अक्षरपुरुषाहूनही उत्तम पुरुष आहे. ह्या लोकीच्या सर्व व्यवहारात आणि वेदांमध्येही मी पुरुषोत्तम म्हणून प्रख्यात आहे. ।।१८।।

मी क्षर आणि अक्षरपुरुषापेक्षाही केवळ वेगळा नसून वेदोपनिषदातील संज्ञा वापरायची तर क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांहूनही निरुपाधिक असलेला उर्ध्वतमच आहे. म्हणजे आकलन होण्यासाठी कठिण आहे.ह्या आणि इतर लोकींच्या सर्व पुरुषांहून मी श्रेष्ठ आहे हे तर निराळे सांगायला नको. 

यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् । 

स सर्वविदभजति मां सर्वभावेन भारत ।।१८ ।।

ज्याने सर्व मोह दूर सारून माझी उपासना केली व मला जाणून घेतले तो ज्ञानी होऊन सद्भावपूर्वक मलाच भजतो.।।१८।।

ह्या श्लोकात ज्ञान झालेला ज्ञानसाधक भक्त सर्वत्र सच्चिदानंदालाच पाहतो, मी ब्रम्हरुप झालो असेही त्याला ज्ञान होते. तरीही तो संपूर्णपणे परब्रम्ह रूपात लीन झाला, त्याचे द्वैताचे भान पूर्णपणे लोपले असे म्हणता येत नाही. महत्वाचा जो भाग ‘मद्रूप’ होण्यास अजून किंचित का होईना राहिले आहे. जसे सूर्योदयाची चाहूल लागली आहे. आकाशात झुंजुमंजूचे रंग आले आहेत, केवळ सुर्योदयाचाच अवकाश आहे, अशी त्या साधकाची स्थिती आहे. त्यासाठी ज्ञानोत्तर भक्तीची आवश्यकता सांगितली व मोहाचा इतकाही अंश नको असे म्हटले आहे. असे सर्व मोह दूर सारून (इथे  ‘मला आत्मज्ञान झाले’ हा अहंभावाचा मोह) भक्ती करणारा ‘मद्रुप’ होतो असे भगवंत म्हणतात. 

त्या मद्रुप ज्ञानी भक्ताचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली 

…….। मज पुरुषोत्तमाते धनंजया।

जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे।।५५९।।

मला ज्ञानसुर्याच्या प्रकाशाने जाणल्यावर सगळे जग तो एकरुपाने पाहतो. सर्वांभूती परमेश्वरच पाहतो. मनात द्वैत भावनेचा अंशही नसतो. असे झाले की तोही मीच होतो. आकाशाने आकाशाला मिठीत घ्यावे तसे. 

ह्या श्लोकात मोह दूर सारून असे का म्हटले तर सर्व वासनांचा त्याग हा खरा संन्यास. ह्या अध्यायात विरक्ति वैराग्य दृढ व्हावे असे म्हटले आहे. त्याचाच हा पुनरोच्चार आहे. तसेच पुढच्या अध्यायात आसुरी संपत्तीचे वर्णन येणार आहे. आसुरी संपत्ती म्हणजे मोहांचा खजिनाच. त्याचे हे सुतोवाच असावे. मोहांचा त्याग केल्याशिवाय परमार्थात प्रवेश नाही! 

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।

एतदबुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत  ।।२० ।।

हे अर्जुना हे गुह्यातले गूढतम शास्त्र मी तुला सांगितले. हे नीट समजून घेतल्याने मनुष्य बुद्ध म्हणजे बुद्धिवान, जाणता आणि कृतकृत्य होईल.।।२०।।

भगवान म्हणतात, अशा तऱ्हेने क्षराक्षर पुरुषांना बाजूस सारून जो मी पुरुषोत्तम त्याची भक्ति करून तू मद्रूप हो. 

हा श्लोक पंधराव्या अध्यायाचा फलश्रुतीचा आहे. 

ह्या अध्यायात गीतेच्या तत्वज्ञानाचे सार आहे. त्यामुळे समारोप करताना ते गीतेचेही वैशिष्ठ्य सांगतात. 

सावचि बोलाचे नव्हे हे शास्त्र।पै संसारु जिणेते हे शस्त्र।

आत्मा अवतरविते मंत्रे। अक्षरे इये ।।५७०।।

हे गीता शास्त्र केवळ बोलण्या वाचण्याचा उपदेश नाही. त्यात सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसार जिंकण्याचे शस्त्रच आहे.( म्हणजे, गीतेत सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसारातील अडीअडचणी, संकटांवर मात करता येईल.) गीतेतील अक्षर न् अक्षर आत्म्याचे दर्शन घडवून देणारे मंत्रच आहेत.।।५७०।

माणसाने आपली चौकस बुद्धि, जिज्ञासा जर नेहमी जागृत ठेवली तर आपले ज्ञान वाढत राहते आणि ताजेही राहते. हा ज्ञानमार्गच आहे. आपली कामे लक्ष लावून मनलावून केली, आवडीचे न आवडणारे असा भेद न करता प्रत्येक काम आवडीचेच समजून ते आवडीने (Love’s Labour) ,आणि निस्वार्थीपणे केले ; आणि ते मलाच नव्हे तर सगळ्यांच्याच उपयोगी व्हावे ह्या भावनेने करणे, तर हा कर्मयोगच होईल; व्यवहारात अनावश्यक  अहंकार न दाखवता, नम्रतेने बोलणे चालणे केले, (पण तेहीअनाठायी न होऊ देता) तर ते भक्तीमार्गाचेच एक रूप होईल. 

परि हे बोलो काय गीता। जे हे माझी उन्मेषलता।

जाणे तो समस्ता। मोहा मुके।। ५८३।।

सेविली अमृत सरिता। रोग दवडूनि पंडुसुता।

अमरपणा उचितां। देऊनि घाली।।५८४।।

तैसी गीता हे जाणितलिया। काय विस्मयो मोह जावया।

परी आत्मज्ञानाने आपणपयां। मिळिजे येथ।।५८५।।

फार काय सांगू पार्था !  माझी ही ज्ञानलता गीता जो जाणून घेईल तो सर्वप्रकारच्या मोहातून मुक्त होईल व मद्रुप होऊन मला पावेल. माझ्या गीतारुपी अमृताचे जो सेवन करील तो फक्त रोगमुक्तच न होता अमरत्व पावेल. मग गीता यथार्थ जाणून घेतल्यावर त्याचा मोह दूर होईल ह्यात नवल नाही. तो आत्मज्ञानी होऊन मलाच येऊन मिळेल! ।।५८३-५८५।।

आचार्य विनोबा यांनी केलेल्या,  पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या,पुरुषोत्तम योगाचे थोडक्यात आणि अचूक वर्णनाने आपण समारोप करू या. विनोबा म्हणतात, मत्सर अहंकार वगैरे दोषरहित बुद्धीने केलेल्या साधनेने,आत्मज्ञान प्राप्त होण्यात सर्वच कर्मांची समाप्ति होते.( काही करण्याचे राहात नाही). म्हणून ह्याला परमपुरुषार्थ म्हणतात. “आत्मज्ञानाची पूर्णावस्था म्हणजे पुरुषोत्तम योग !”

।। गुरुमहाराज की जय!।।

भगवद् गीता अ. १५वा, श्लोक १७वा

रेडवुड सिटी 

पंधराव्या श्लोकाच्या अखेरीस क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही पुरुषापेक्षाही श्रेष्ठ अशा उत्तम पुरुषाची ओळख पुढच्या श्लोकात आहे असे म्हटले होते. तो श्लोक आता वाचायला घेऊ या. 

उत्तम: पुरुषस्त्वन्य: परमात्मेत्युदाहृत:।

यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर:।।१७।।

 क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांहून वेगळा आणि उत्तम असा हा पुरुष आहे. त्याला परमात्मा म्हणतात. हा त्रैलोक्यात भरलेला आहे. तो अव्यय( कधीही कमी न होणारा म्हणजेच परिपूर्ण, नित्य) हा ईश्वर तिन्ही लोकांचे पोषण करतो. ।।१७।।

ह्या श्लोकात हा उत्तम पुरुष क्षराक्षरापेक्षा निराळा आहे याचे दोन तीन विशेष सांगितले आहेत. ते म्हणजे हा सर्वत्र भरलेला आहे. तो आहे. आणि आहे तसाच आहे. त्याचा व्यय होत नाही. शाश्वत आहे. तो सर्व विश्वाचा पोषक आहे. 

आपण ह्या परमात्म्याची महत्ता आतापर्यंतच्या सर्व अध्यायातून जाणून घेतली आहे. ती त्याच्या महत्वाच्या वैशिष्ठ्यातून माहिती करून घेतली आहेत. ह्या श्लोकातही त्यातील तीन वैशिष्ठ्ये आली आहेत.

परमात्म्याचे  ‘ एकोऽहं बहुस्याम’ या स्फुरणातून हे (स्फुरण हीच मूळ प्रकृति) अव्यक्त/ परा प्रकृतीत साम्यावस्थेत-समवाय- असलेल्या पृथ्वि आप तेज वायु आकाश आणि मन बुद्धि अहंकार हया आठही भागातून  (अपरा प्रकृति होउन) जड भूतमात्र नाना रुपनामात्मक भूतांची टाकसाळ उघडली. ही जड सृष्टी निर्माण झाली. उत्पत्ति संहाराचे चक्र सुरु झाले. पण अंती सर्व काही पुन्हा या अव्यक्तात (साम्यावस्थेतच) लीन होतात. हे ढोबळ मानाने लक्षात ठेवले म्हणजे क्षर व अक्षर पुरूष समजायला सोपे होते. कारण अपरा व परा प्रकृतींची लक्षणेच त्यांच्यात आहेत. मग पुरुष असे का म्हटले तर ह्या अध्यायात तत्वज्ञानच सांगायचे असल्यामुळे वेदान्ती  सर्वांमध्ये चैतन्य पाहतात. त्यामुळे इथे क्षरपुरुष व अक्षर पुरुष असे म्हटले आहे.( ही नावे सुद्धा अपरा प्रकृति व परा प्रकृतींच्या लक्षणांवरूनच दिली आहेत. हे आतापर्यंतच्या १६ श्लोकांवरून विशेषत: १६ व्या श्लोकाद्वारे ध्यानात आलेआहे.)  परमात्मा नावाचा पुरुषोत्तम श्रेष्ठ आहे हे लगेच लक्षात येते. 

परमात्मा नावाच्या उत्तम पुरुषाचे क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व कसे आहे हे विविध मुद्द्यांवरूनआणखी स्पष्ट होईल. विपरित ज्ञानाच्या- म्हणजे खोट्यालाच खरे भासवणारे (सर्प-दोरी न्याय) जे ज्ञान- त्याच्या जागृति आणि स्वप्न ह्या दोन अवस्था ज्या अज्ञानत्वात  लुप्त होतात आणि जेव्हा ज्ञान होते तेव्हा हे अज्ञान त्या ज्ञानात लोपते .पण अंती ज्ञानही जिथे लीन होते, तो पुरुषोत्तम होय. ( आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्ञानही लुप्त होते. कारण आत्मज्ञानी त्या परमात्म्याशीच एकरूप झालेला असतो.) 

ज्ञानेश्वर माऊली हेच उपमा दृष्टांतातून पटवून देतात. 

पै ग्रासूनि आपुली मर्यादा। एक करीत नदीनदां।

उठी क्लपांती उदावादा। एकार्णवाचा।।५३३।।

तैसे स्वप्न ना सुषुप्ती। ना जागरची गोठी आथी।

जैसी गिळीली दिवोराती। प्रळय तेजें।।५३४।।

ऐसे आथि जे काही। ते तो उत्तम पुरुष पाही।

जे परमात्मा इहीं। बोलिजे नामी ।।५३६।।

नदी नद्या सर्व आपल्यात सामावून घेऊन त्या सर्व तोआपणच होऊन  अमर्याद होतो. आणि कल्पांतात  तर ह्या प्रळयात सर्वांचा विलय होऊन सर्वत्र एकच एक महाप्रळय सागर होतो; प्रळयाग्नीचे सर्वग्रासक महातेज दिवसरात्र सर्वच गिळून टाकते तसे इथे स्वप्न ना सुषुप्ति इतकेच काय जागृताचीही गोष्ट नाही. आत्मज्ञान्यांना ह्याचे ज्ञान, साक्षात्कार झाल्यावर त्यांच्या स्थितीचे, तिथे ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ही त्रिपुटीही राहात नाही असे वर्णन केले जाते. म्हणजे ते सर्व काही ज्यात लीन होते, असे जे काही आहे, त्या उत्तम  पुरुषाला परमात्मा म्हणून ओळखले जाते!  मग आहे- नाहीअसे काहीच कळत नाही म्हणजेच सर्व द्वैताद्वैतही ज्यात लोप पावते असा जो स्वयंसिद्ध आहे तो उत्तम पुरुष म्हणजेच परमात्मा. ह्याला कोणतेही अभिधान देता येत नाही. आपल्या आकलनासाठी ह्या अध्यायाच्या आतापर्यंतच्या संदर्भात थोडक्यात सांगायचे तर तो व्यक्त-अव्यक्ताच्याही पलीकडे आहे. 

केवळ जीवात्म्याच्या सापेक्षतेतून त्याला परमात्मा म्हणायचे.तो अनिर्वाच्य आहे हेच खरे.त्याचे ज्ञान करून त्याचा प्रत्यक्षानुभव घेणे ही खरी साधना होय. 

त्याची प्राप्ती करून घेण्याच्या उपासना मार्गांचे विवेचन गीतेने आतापर्यंतच्या सर्व अध्यायात केले आहे. 

ध्यानयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या चारी आत्मज्ञान करूनघेण्याच्या मार्गांची चर्चा मागील सर्व अध्यायातून झाली आहे. त्यातून ह्या तारी मार्गांचा समन्वय साधला आहे. सामान्यांसाठी प्रपंचातून वेळ काढून,  निष्ठापूर्वक श्रवण, भजन, कीर्तन, नामस्मरण, ह्यातून भगवंताशी सतत अनुसंधानात राहणे व शक्य असल्यास संतांच्या ग्रंथांचा अभ्यास, हे करावे. निष्ठा तळमळ वाढत जाईल तशी पुढची पायरी चढण्याची तयारी होईल. असा परमार्थाचा सोपान चढत राहणे हे आपल्या हाती आहे. ह्याने कल्याणच साधेल असे संत स्ंगतात. 

ह्या अध्यायात केवळ तत्वज्ञानाचीच चर्चा आहे. परमात्मा सर्वत्र आहे, त्याचे अमरत्व, जीवात्मा हा त्याचाच अंश आहे, सर्वांमध्ये तोच कसा भरून आहे, तो (इतर कुणाकडूनही) प्रकाशित होणारा नाही तर तोच सर्व प्रकाशक आहे, तो नियम्य नसून तोच त्रैलोक्याचा नियामक आहे गोष्टी ह्या अध्यायात आल्या अाहेत. अशा पुरुषोत्तमाला कोण भजणार नाही? जे ह्याचे हे स्वरूप जाणून घेण्यास केवळ उत्सुक नसून आतुर आहेत, ह्याला प्राप्त करून घेण्याची तीव्र तळमळ आहे असे पारमार्थिक ह्यालाच भजतात. 

पंधरावा अध्याय हा गीतेच्या शिकवणुकीचे सार  असलेल्या तत्वज्ञानाचा मानला जातो. त्या दृष्टीनेही सोळावा आणि सतरावा हे दोन्ही श्लोक महत्वाचे वाटतात. 

ह्या अध्यायात परमात्मा हा सगुण- निर्गुण, व्यक्त-अव्यक्त ह्यांच्याही पलीकडे आहे हे स्पष्ट केले आहे. तो प्रकाश देणाऱ्यांचाही प्रकाशक आहे. दिसत नाही म्हणून तो नाही असे अजिबात नाही. तो सर्वात आहे, पण तो दृश्य नाही. फुलातील सुगंध डोळ्यांना दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाही असे म्हणतो का? परमात्मा हा चराचरात प्राणीमात्रांत भरलेला आहे.पण तो दिसण्यापेक्षा अनुभवण्याचा विषय आहे. तो कसा अनुभवायचा त्या साठी गीतेने चार मार्गांचा परमार्थाचा प्रवास सांगितला आहे. ते चार मार्ग पुन्हा सांगण्याती आवश्यकता नाही. त्या त्या मार्गाचा अधिकारी होऊन हा परमेश्वर अनुभवता येतो हे गीतेने स्ंगितले आहे. 

 आपल्या नामदेवांनी, जनाबाईंनी, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी, एकनाथ, तुकाराम रामदास आणि इतर अनेक मराठी संतमहात्म्यांनी याची आपल्याला शपथपुर्वक खात्री दिली आहे. 

हा विचार बाळगून आपण ह्यानंतरचे श्लोक अभ्यासूया. 

पसायदान

रेडवुड सिटी

पसायदान

ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेले ‘ पसायदान ‘हे अलौकिक, अभूतूपूर्व, आणि अदभुत आहे. त्यातील उपमा, दृष्टांत,रूपक ह्या भाषालंकार, काव्यगुण किंवा भाषागुणांशी पसायदानाच्या अलौकिकत्वाशी किंवा अभूतपूर्वतेशी संबंध नाही. कारण नऊ हजार ते दहा हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी त्यांनी सलग काही दिवस किंवा महिने सांगितली ती ज्ञानेश्वरी हाच एक, भाषेचाच नव्हे तर ज्ञानाचाच एक मौल्यवान अलंकार आहे. धनाढ्य श्रीमंतापासून पार गरीबालाही हा दागिना सहज धारण करता येतो! अशा ज्ञानेश्वरीचेच पसायदान हे मधुर परिपक्व फळ आहे. त्यामुळे त्यातील काव्यात्मकतेमुळे ते अलौकिक झाले आहे असे अजिबात नाही. तर त्यांनी मागितलेले कृपाप्रसादाचे दानच खरोखर जगावेगळे आहे. पसायदानातील एकेक ओवी वाचताना ह्याचा प्रत्यय येतो. आजपर्यंत विश्वातील सर्वांच्या भल्यासाठी मोठ्या मनाने अशी प्रार्थना केली नव्हती.

पसायदानाच्या अभूतपूर्व वेगळेपणाचे रहस्य ज्ञानदेवांच्या चरित्रात आणि चारित्र्यात आहे. कारण त्यांचे जीवनही इतर असंख्यांसारखे सुरळीत एका चाकोरीतील नव्हते.

धर्मशास्त्रात, संन्याशाने संन्यासाश्रमाचा त्याग करून पुन्हा गृहस्थाश्रमी होऊन पुन्हा मुलाबाळांसह प्रपंच करण्याची घटना विठ्ठलपंतांच्या घटनेआधी झाली नसावी. धर्मशास्त्रात पूर्वी कधी न घडलेल्या दोषावर निर्णय नसणार. त्यामुळे ह्यावर काय निर्णय घ्यावा हे त्यावेळच्या धर्मशास्त्री पंडिताना प्रश्न पडला असावा. त्यांच्याजवळ शास्त्रानुसार उत्तर नव्हते. तोडगा नव्हता. विठ्ठलपंतांच्या कुटुंबाला वाळीत टाकलेआणि त्यानंतर त्यांना पराकोटीचे देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले! म्हणजे मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. आई-वडील गेल्यावर, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना रोजचे जगणेही समाजाने अवघड करून टाकले होते. धर्मशास्त्राच्या आधाराने त्यांना शुद्ध करून पुन्हा ब्राम्हण्याची दीक्षा देण्यासही नकार दिला.

निवृत्तीनाथांच्यामुळे ज्ञानदेव व इतर भावंडे आत्मज्ञानाच्या उच्च पदावर आरुढ झाली होती.

निवृत्तिनाथांना शुद्धिपत्र, पुन्हा दीक्षा द्या म्हणणे हे काहीच पसंत नव्हते. आपल्याला त्याची काहीच आवश्यकता नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ते ह्या सर्वाच्या पलीकडे पोचले होते. पण ज्ञानेश्वरांना सामाजिक घडी मोडायची नव्हती. त्यांचे म्हणणे आपण हे मानले नाही तर सामान्य लोकही त्याकाळच्या पद्धति झुगारून देतील. आपल्यामुळे समाज विस्कळित होईल असे काही करु नये असे त्यांचे म्हणणे होते.

ज्ञानेश्वरांनी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या,छळ करणाऱ्या धर्ममार्तंडाच्या विरुद्ध किंवा समाजातील कुणा विरुद्ध कधीही, एकही कठोर,वावगा,अपशब्द काढला नाही. इतकेच काय त्यांच्या कोणत्याही ग्रंथात किंवा ओव्या- अभंगात एकही वाईट,अपशब्द आढळत नाही.काढायचाच म्हणून अगदी भिंग घेऊन शोधून पाहिले तर ज्ञानेश्वरीत अडाणी या अर्थी गावढा हा एक शब्द सापडतो, असे ह. भ.प. गुरुवर्य मामासाहेब सोनोपंत दांडेकरांनी म्हटले आहे.ज्ञानेश्वरांमध्ये सत्वगुणाचा परमोच्च उत्कर्ष झालेला होता. ते सात्विकतेची मूर्तीच होती.ज्ञानेश्वरांनी कोणालाही उपदेश केला नाही. आयुष्यभर फक्त जे जे चांगलेआहे ; उदात्त उन्नत उत्तम आहे तेच त्यांनी नेहमी लोकांसमोर ठेवले.आपल्या वाणीने आणि आचरणाने फक्त चांगले तेच लोकांसमोर ठेवल्याने समाजात बदल होऊ शकतो त्याचे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे ग्रंथ- विशेषत: ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ- होत. मग, निर्मळ निरपेक्ष आणि लोकांचे निरंतर कल्याण चिंतणारे ज्ञानेश्वर स्वत: पसायदानात प्रकट होतात ह्यात आश्चर्य ते काय? चित्रामध्ये चित्रकाराचे, गायन-वादनात त्या त्या कलावंतांचे, साहित्यात लेखकाचे प्रतिबिंब उमटलेले असते असे म्हणतात. पसायदानात स्वत: अलौकिकत्व झालेले ज्ञानेश्वरच त्यात आहेत!

आता पसायदान वाचायला, म्हणायला सुरवात करु या.

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे।।१।।

(विश्वात्मक= विश्वात सर्वत्र भरून राहिलेला, परमात्मा; तोष= समाधान, संतोष, तृप्ती ह्यामुळे आनंदित प्रसन्न होणे. पसायदान= प्रसादाचे दान; वाग्यज्ञे= वाणीरूप यज्ञाने; प्रवचन-सत्र, व्याख्यानमाला यामधून केलेला वाचिक यज्ञ, ज्ञानयज्ञ. )

ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर तिच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी ही प्रार्थना केली आहे. त्यांनी त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानेश्वरी पद्यातून म्हणजेच ओव्यांतून अखंड ओघाने सांगितली. तीही थोड्या थोडक्या नव्हे तर सुमारे नऊ ते दहाहजार ओव्यांतून सांगितली. त्यांचा तो वाग्यज्ञच होता.यज्ञ फार मोठ्या समुदायाच्या हितासाठी केला जात असे. ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांनाही संस्कृतात अडकून पडलेले ज्ञान मिळावे म्हणून ते ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहून मराठीत आणले. हे लोकोपयोगी यज्ञकार्य होते. वाणीरुपाने व्याख्यानातून केलेला ज्ञानेश्वरांचा हा यज्ञ होता. म्हणून त्यांनी इथे वाग्यज्ञ असा उल्लेख केलाआहे.

आपल्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देवाला संतोष व्हावा आणि त्याने प्रसन्न होऊन आपल्याला वर द्यावा अशी प्रारंभी विनंती करतात. ज्ञानेश्वर, राम किंवा त्यांचा आवडता विठोबा किंवा ते स्वत: योगी असल्यामुळे शंकराचीही प्रार्थना करु शकले असते. पण ज्या अनंत, अमर्याद, अव्यक्त परमात्म्याचे त्यांना आपले गुरु निवृत्तिनाथांच्या आशिर्वादाने प्रत्यक्ष ज्ञान-दर्शन झाले होते त्या ब्रम्हांडस्वरूप विश्वात्मक देवाचीच प्रार्थना करून, आपल्या वाग्यज्ञाने संतोष पावलेल्या विश्वात्मकाकडे त्यांनी प्रसादाचे दान मागितले आहे. अशा तऱ्हेने पहिल्या चरणापासूनच पसायदानाच्या भव्यतेचे वैशिष्ठ्य जाणवते.

आपण पसायदानातील पुढच्या ओव्या वाचत जाऊ तसे त्यांनी मागितलेले दान किती महान, जगावेगळे आणि थोर मनाचे निदर्शक आहे ह्याची खात्री पटत जाते. विश्वातील सर्वांच्या सर्वांगिण कल्याणासाठी त्यांनी हे दान मागितले. केवळ कुणाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी अथवा धनसंपदेसाठी ह्या दानाची मागणी नाही. सामान्य सुखांचा त्यात अंतर्भाव आहेच पण सगळ्या लोकांच्या मनात सदविचार, सदभावना निर्माण होऊन सर्व सदाचारी होवोत, सर्वजण एकमेकांचे मित्रच होऊन राहोत, ही उदात्त मागणी त्यात आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे हे निराळेपण आहे.

यावरून ध्यानात येऊ लागते की आत्मज्ञानी ज्ञानेश्वरांनी थेट तिन्ही लोकांत सर्वत्र भरून राहिलेल्या विश्वव्यापी परमात्म्याचीच प्रार्थना का केली. ज्ञानेश्वरांनी स्वत:साठी किंवा भावंडांसाठी काहीही न मागता एकूण सर्व मानवांचे सर्व काही चांगले व्हावे; त्यांच्या शाश्वत कल्याणासाठी प्रार्थना केली. बरे इतक्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याजवळ काय केशर कस्तुरी मागायची? देव मोठा, प्रसाद मागणाराही तितकाच मोठा. मग मागितलेले दानही तेव्हढेच भव्य दिव्य असणार! देणाऱ्याचा मोठेपणा सिद्ध करणारेच, सर्व प्राणीमात्रांच्यासाठी मागितलेले हे दान आहे! हे वेगळेपणही अभूतपूर्वच ह्यात शंका नाही.

माऊली पुढे म्हणतात, असे दान दे गा देवा की ज्या योगे

जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे पडो। मैत्र जीवांचे।।२।।

(खळ=दुष्ट,दुर्जन; व्यंकटी= वाकडेपणा, मनाचा वाईटपणा, दुष्टता; रती = गोडी,सुख,प्रेम; भूतां= भूत म्हणजे माणसे, लोक, प्राणिमात्र; म्हणून भूतां म्हणजे लोकांत, लोकांमध्ये एकमेकांविषयी)

ज्यांच्या मनात, स्वभावात वाकडेपणा आहे, जे दुष्ट असतील, त्यामुळे त्यांच्या आचरणातही दुराचार आहे, अशांचा त्यांच्यातील ह्या वाईट प्रवृत्तींचा, कुविचारांचा नाश होऊन त्यांना सदबुद्धी देऊन त्यांना सत्कर्मे करण्याची गोडी लागो. ती गोडी सतत वाढत राहो. सर्वांमध्ये सामंजस्य वाढीला लागून सकलजन एकमेकांचे मित्र होवोत. परस्परांविषयीची प्रेमाची भावना केवळ माणसां माणसांतच नव्हे तर ते आणि सर्व प्राणीमात्रही एकमेकांशी सामंजस्याने राहोत असा त्यात मोठा आशय आहे.

आपले हित अहित कशात आहे हे न कळणाऱ्यांच्या बाबतीत ते काय प्रार्थना करतात पहा,

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात ।।३।।

(दुरित= पाप,पातक; इथे अज्ञान, अज्ञानामुळे किंवा अज्ञानाचा अंध:कार असाही अर्थ अभिप्रेत आहे. तिमिर = अंधार. पाहो=प्रकाश, सूर्याचा प्रकाश लाभो; स्वधर्माचा सूर्योदय होवो.)

आपल्या हिताचे काय आणि आपले नुकसान कशात आहे हे कळत नसल्याने ज्यांच्याकडून कुकर्मे होत असतात, किंवा पापाचरण झाले त्यांच्या मनातील हा पातकांचा अंधार, अज्ञानाचा अंधार दूर कर, त्यानांच नव्हे तर सर्वांना, आपापल्या वाट्याला आलेले स्वाभाविक कर्म, कर्तव्य करण्याची म्हणजेच प्रत्येकाचा जो सहजधर्मआहे ते कर्म नेकीने करण्याची work is worship ह्या निष्ठेने करण्याची बुद्धी दे. म्हणजेच त्यांच्यामध्ये स्वधर्मकर्म (कर्तव्यकर्म) करण्याचा सूर्य उगवू दे. विद्यार्थ्यांना अभ्यास करून विद्याधन मिळवण्याची; तरुणांना आपल्या उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या धंदा, व्यवसाय, नोकरी प्रामाणिकपणे करून स्वकष्टावर पोट भरण्याची प्रवृत्ति जागृत राहू दे; गृहस्थाश्रमीला कुटुंबाचे योग्य मार्गाने पालन पोषण करण्याची; सत्ताधीशांना, अधिकाऱ्यांना आपले पद ही लोकसेवा करण्याची तसेच जास्तीत जास्त लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले करण्याची संधी आहे, अशी बुद्धि झाली म्हणजेच सर्वांमध्ये स्वधर्माचा सूर्योदय झाला. ह्या स्वधर्मकर्माच्या सूर्यप्रकाशामुळे इतर वाईट गुणांचा, वाईटाचा अंधार आपोआपच नाहीसा होईल. असे झाले की जो ज्या इष्ट वस्तुची इच्छा करेल त्याही पूर्ण होतील.असे व्हावे आणि ज्याला जे जे हवे ते प्राप्त होवो हा सर्वांच्या आवडीचा कृपाप्रसाद ज्ञानेश्वर माऊली आपल्यासाठी परमेश्वराकडे मागतात.

आतापर्यंतच्या ओव्यातून ज्ञानेश्वरांनी जी प्रार्थना केली ती सफळ आणि सुकर होण्यासाठी ते कोणती इच्छा व्यक्त करतात, आणि काय घडावे असे त्यांना वाटते ते पुढील दोन तीन ओव्यात सुंदर शब्दात विश्वात्मके देवाजवळ मागतात. आणि त्या वाचल्या की ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या प्रार्थनेची उंची, उदात्तता वाढतच आहे ह्याचा अनुभव येतो.

वर्षत सकळ मंगळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी। भेटतू भूतां ।।४।।

(वर्षणे= वर्षाव करणे/ होणे; पाण्याचा वर्षाव होणे; जशा पावसाच्या धारा पडतात; मांदियाळी= मोठा समुदाय,गर्दी,किंवा थवा,समाज. अनवरत= सतत,अखंड,निरंतर, सातत्याने. )

ते म्हणतात, हे विश्वात्मका, सर्व मंगल करणारे,सर्व चराचरातील सर्व प्राणीमात्रांवर मांगल्याचा वर्षाव करणारे, सर्वांचे चांगले करणाऱ्या ईश्वरनिष्ठ सज्जन सत्पुरुषांचा मोठा समुदाय या भूमंडळावर सातत्याने अखंड, निरंतर येत राहावा आणि आम्हा सर्वांना त्यांचा कायम सहवास लाभावा. अशा ईश्वरनिष्ठांची आमच्या पृथ्वीवर सतत गर्दी होऊ दे.
ह्या ईश्वरनिष्ठ सज्जनांचे इतके काय महत्व आहे म्हणून माऊली ते सतत अखंडितपणे येत राहोत असे मागणे मागतात? कारण जे जे काही सत् आहे त्यांचे ते दूत आहेत म्हणून त्यांनी ह्या आमच्या पृथ्वीतळी यावे अशी माऊलींची इच्छा आहे. ईश्वरनिष्ठांचे बहारदार वर्णन ज्ञानेश्वर महाराज पुढील दोन ओव्यात करतात.

चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गाव।
बोलते जे आर्णव । पीयूषाचे।।५।।

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु।।६।।

(चला किंवा काही प्रतीत चलां असेही येते= चालत्या, चालणाऱ्या. आरव= अरण्य, वृक्षराजी. चिंतामणि= चिंतिलेले- जे इष्ट,योग्य असेल- ते प्राप्त करून देणारे स्वर्गीय रत्न; आर्णव= समुद्र, सागर; पीयुष=अमृत, लांछन= दोष, डाग, कलंक).

ज्ञानदेव म्हणतात, हे सत्पुरुष चालत्या-बोलत्या, जिवंत कल्पतरुंची उपवने, उद्यानेच आहेत. त्यांच्या सावलीत बसले की सर्वांच्या मनातील इच्छा अनायासे पूर्ण होतात. ते जिथे वसती करतात ते चिंतामणीचे म्हणजे ते ते गाव चिंतामुक्तांचे गाव होऊन जाते. तेथील लोक जे काही इष्ट,चांगले चिंततील ते त्याना प्राप्त होऊन भूतळावरील सर्व लोकांच्या सर्व चिंता ह्या ईश्वरनिष्ठांच्या मुक्कामी दूर होतात. अशा ईश्वरनिष्ठांच्या सहवासाने, ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागितलेले, जो जे वांछिल ते त्याला का मिळणार नाही?

त्यांच्या बोलण्याचे काय वर्णन करावे? त्यांचा प्रत्येक बोल अमृताचाच असतो. ते जे सांगतात, बोलतात ते अमृतच हे खरे, ते अमृताइतके मधुर हेही खरे पण हे जास्त खरे की त्यांचे बोलणे हे सर्वांना संजीवक होते! सर्वांचे जीवन पुन्हा उजळून टाकणारे असे त्यांचे बोल असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचे शब्द अमृताचा सागरच आहे! ज्ञानेश्वरांच्या ईश्वरनिष्ठांचे सर्व व्यवहार,आचरण सत् आणि शुद्ध असते. हे सत्पुरूष म्हणजे कोणताही डाग, ठिपका किंवा दोष नसलेले चंद्र आहेत. एव्हढा धवल शीतल चंद्र पण त्या चंद्रावरही डाग असतो. पण हे सज्जन पूर्णपणे निष्कलंक आहेत. सूर्य प्रकाश देतो त्याचबरोबर त्याचा दाहक तापही सर्व चराचराला होतो. पण हे ईश्वरनिष्ठ सर्वांना फक्त प्रकाश देणारेअसे तापहीन सूर्य आहेत. हे संत-सत्पुरुष, सज्जन,सदासर्वदा, सर्वकाळी आमचे आप्तच होवोत.

पुन्हा सांगायचे तर, हे ईश्वरनिष्ठ सत्पुरुष आमच्या भूमंडळी सतत येत राहोत, ते आमचे जवळच्या आप्तासारखेच होऊन त्यांनी आमच्या समवेत राहावे. आम्हाला त्यांचा सत्संग सदैव लाभो, हा प्रसाद ज्ञानेश्वर महाराज मागतात. असा निरंतर सत्संग लाभल्यावर, ज्ञानेशेवर माऊली आपल्या सदिच्छापूर्ण मागणीची उंची आणखी वाढवताना म्हणतात,

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिन्ही लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ।। ७।।

(किंबहुना = फार काय, इतकेच नव्हे या पेक्षा; आदिपुरुखी=आदिअनादि असा पुरुष; परमात्मा.)

ईश्वर निष्ठांचा निरंतर सत्संग लाभल्यावर, इतकेच नव्हे तर, सर्वव्यापी आदिपुरुषाचे अखंड भजन,उपासना करून तिन्ही लोकांतील सर्व लोक पूर्ण सुखी होवोत; असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते पुढे म्हणतात,

आणिग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्टविजये । होआवे जी।।८।।

(दृष्टादृष्ट= दिसणारे आणि न दिसणारे, इह व परलोक.)

ह्या ग्रंथात उपदेश केलेल्या शिकवणुकीचे पालन करून त्याप्रमाणे सदविचार, सदभावाने आणि सदाचरणाने जे वागतील ते ह्या दृश्य जगात आणि अव्यक्त लोकातही विजयी होवोत. त्यांचे इहलोकी आणि परलोकीचे जीवनही कृतकृत्यतेचे होवो. ही अपूर्व प्रार्थना ऐकल्यावर,

तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।९।।

[विश्वेशरावो= ह्या ओवीत हे पद ज्ञानेश्वरांनी आपले थोरले भाऊ आणि गुरू निवृत्तिनाथांना उद्देशून वापरले आहे. अव्यक्त विश्वात्मकाचे निवृत्तिनाथ हे व्यक्त,सगुण, साकार स्वरूप आहे हा ज्ञानेश्वरांचा दृढ विश्वास होता. (दान) पसावो=दानाचा प्रसाद प्राप्त होईल; पसायदान होईल) ]

ही प्रार्थना ऐकल्यावर विश्वेशरावो निवृत्तिनाथांनी अत्यंत संतोषाने, ज्ञानदेवाला तथास्तु, तसेच होईल, तुझी पसायदानाची प्रार्थना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला. तो ऐकून, सर्व त्रैलोक्य सुखी होणार ह्या विचाराने ज्ञानदेव धन्य झाले. सुखी झाले.

दिसणारा देव

रेडवुड सिटी

आमच्या आजोबांना आम्ही बाबा म्हणत असू. बाबा महिन्यातून एकदा आत्याकडे जात असत. त्यावेळी त्यांचा पोशाख पाहण्यासारखा असे. धोतर जाडसर असायचे. पण स्वच्छ धुतलेले, पांढरे शुभ्र. तसाच सदरा आणि डोक्याला पांढरा रुमाल, म्हणजे फेटा.उपरणे असायचे की नाही आठवत नाही. बाराबंदी असायची तर सदऱ्यावर कधी जाकीट. आणि ते टांग्यातून जात असत. टांग्यातून जायला मिळते म्हणून मीही जात असे. बाबांनी एरव्ही चालताना काठी वापरल्याचे आठवत नाही. पण बाहेर जाताना ती बरोबर घेत. एक म्हणजे रुबाब वाढे. शिवाय टांग्याच्या मागे कधी कुत्री पळत येत. त्यांना हटवायला काठी उपयोगी पडे!

भाद्रपदात पक्षपंधरवडा असतो. त्यावेळी आणि त्यांच्या आई वडिलांच्या श्राद्धाच्या तिथी अगोदरही ते बाजारात जात. बहुधा  कुणाची तरी तिथी उन्हाळ्यात असे. त्यामुळे बेत आंब्याच्या रसाचा असे. टांगा करूनच जात. मग काय आमचीही मजा असे. ते बाजार -किराणा भाजी- मोठ्या झोळ्यातून आणत.आंबेही झोळी भरून आणत. तिथे बाजारात नमुना म्हणून रस पुष्कळ पोटात जाई. ती एक निराळीच मजा ! कधी बाजारातूनच आत्याकडे जात. तिथे काफी होई. काफी असेच म्हणत बहुतेक सगळेजण. काफी अगदी गोड पाहिजे असे त्यांना. तशी झाली की समाधानाने ते,”छान केली होतीस. गुळचाट झाली होती.”अशी करणाऱ्याला शाबासकी देत.

बाबांचा असाच पोशाख दसऱ्याला शिलंगणाला पार्कवर जाताना असे.सगळा पोशाख नविन असे.आम्हा सगळ्यांना प्रश्न पडे हे कधी सटीसहामासी दिसणारे कपडे इतर वेळी कुठे गायब ह्वायचे ? कारण घरात त्यांचा पोशाख एकदम वेगळा म्हणजे हेच का ते बाबा? असा प्रश्न पडावा असा असायचा. पंचासारखे धोतर, ते गुडघ्याच्या किंचित खाली इतक्याच लांबीचे! त्यावर कुठला तरी सदरा. कधी त्यावर तसलेच जाकीट.पण सगळे धुतलेले तरी धुवट मळकट वाटत. पण आमचे तिकडे कधी फारसे लक्षही नसे म्हणा.

बाबा आम्हाला,लहर आली,की भीती दाखवत.बहुतेक वेळा ते पुढच्या दाराच्या मधल्या पायरीवर बसलेले असत. ते आपले डोळे वर नेत, तोंड उघडे ठेवून डोके किंचित मागे नेत. भुवया वर गेलेल्या. बुबुळे वयामुळे धुरकट पांढरट झालेली. उघड्या तोंडात वरच्या बाजूच्या दोन्ही कडेला एखाद दुसरा लांबट पिवळसर दात, खालच्या बाजूचेही एक दोनच दात,तेही अंतरावर.त्यांचे असे रूप पाहिले की आम्ही घाबरत तर असूच पण हसत हसत ,” बाबा पुन्हा एकदा! पुन्हा एकदा भीती दाखवा” म्हणत त्यांच्या पाठीमागे लागत असू! त्या घाबरण्यातही केव्हढा आनंद असे.

बाबा श्रावणी करत. त्यावेळी आमचे नातेवाईक तर येतच पण एक दोन शेजारी येत. दोन चार भटजीही असत.श्रावणीत जानवी बदलतआणि  किंचित शेणही खायला लागे. श्रावणी विषयी इतकीच माहिती होती आम्हाला. तो भाग आला की ते काडीच्या टोकाला लागलेले इतकेसे असले तरी ते कसे टाळायचे हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात असे! तरी बरे हा प्रसंग माझ्यावर एकदा दोनदा आला असावा. कारण मुंज झाली नव्हती तोपर्यंत फक्त प्रेक्षकाचेच काम असे!प्रेक्षक म्हणूनही माझ्या आठवणीत श्रावणी हा प्रकार एक दोनदाच झाल्याचे आठवते. कारण बाबाही थकलेहोते. त्यांनी श्रावणी बंद करून टाकली. ती कायमची बंद झाली.

बाबा सगळ्यांसाठी जानवी स्वत: करत. त्यासाठी कापसाची टकळी घेऊन तिचे सूत भिंगरी फिरवत ते काढायचे. भिंगरी फिरवताना घसरु नये म्हणून थोडी रांगोळी असलेल्या वाटीत ती धरून ते एका हातातली कापसाची टकळी वर नेत नेत दुसऱ्या हाताने भिंगरी फिरवत तिला सूत गुंडाळत पुन्हा तो हात हळू खाली आणीत. हे असे खाली-वर किती वेळ चालत असे! आणि किती दिवस! त्यानंतर ते सूत एका बाजूने बाबा धरत; दुसऱ्या बाजूने अक्का धरायची.(अक्का म्हणजे आजी.) आणि त्या सुताला पाण्याचा हात लावून पिळा देत. मग त्याची जानवी बाबा करीत! त्यातही बरेच दिवस जात असावेत. पण जानव्याचे सूत म्हणजे दोरी वाटावी इतके जाडअसे! दणकट आणि टिकाऊ! पण जानवी तयार होई पर्यंतचे दृश्य पाहण्यासारखे असायचे.ह्या दरवाजाला बाबा ऊभे; तिकडे त्या दरवाजापाशी अक्का. कधी दमली तर भिंतीपाशी असलेल्या काॅटवर बसायची. बाबा फार कमी बोलत. पण अक्का बोलत असायची. पण बाबा ते कधी ऐकत असतील असे वाटत नव्हते. ते आपल्या जानव्याच्या कारागिरीत दंग असल्याचे दाखवत.

अचानक बाबांची आठवण का झाली ? गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे हे माहित होते. परवा त्यातील काही शब्दांचा अर्थ व त्यातून होणारे सुर्याच्या गुणकार्याविषयीचे वर्णनात्मक शब्द पाहात होतो. आणि  मागे माईने बोलता बोलता,  बाबा संध्याकाळी सूर्याला नमस्कार करताना आपल्याला काय सांगत, ते सांगितलेले आठवले!

बाबा नेहमी प्रमाणे पायरीवर बसलेले असत. रोज संध्याकाळी सूर्य मावळताना ते नमस्कार करीत. ते आम्हाला म्हणत, अरे ह्याला नमस्कार करा! हा दिसणारा देव आहे! नमस्कार करा”

दिसणारा देव ! सूर्याचे फक्त दोन शब्दांत इतके नेमके  सुंदर आणि यथार्थ वर्णन मी कुठे वाचले नाही की ऐकलेही नाही.

सूर्य, दिसणारा देव, म्हणून बाबांची आठवण झाली!

ती. अण्णांच्या काही आठवणी

रेडवुड सिटी ता.१५ डिसेंबर २०१७

काल  १४ डिसेंबर रोजी गदिमांच्या सुनेने त्यांच्या अखेरच्या दिवसाची साद्यंत हकीकत लिहिलेला हृदयस्पर्शी लेख वाचल्यावर ‘फार मोठा माणूस’ हेच मी मनात म्हणालो.त्याच वेळी चंदूने त्याची गदिमांशी झालेल्या भेटीची हकीकत, किती उत्साहाने सांगितली होती, तिचीही आठवण झाली.

गदिमा विधानपरिषेदेत सभासद होते. तिथे चंदूची आणि त्यांची भेट झाली. चंदूने त्यांना आपली ‘पावसांच्या थेंबांची वाजंत्री पानापानांवर वाजते’ही कविता वाचून दाखवली. ती ऐकल्यावर ते प्रसिद्ध कवियत्री शांताबाई शेळकेंना हाक मारून म्हणाले, “अहो इकडे बघा, काय सुंदर कविता लिहिलिय ह्याने” , असे म्हणून कवितेतील दोन तीन ओळीही त्यांनीस्वत: वाचून दाखवल्या त्यांना!

गदिमांची रसिकता आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उमदेपणाची जाणीव होते!

ह्यावरून मला आमच्या ती. अण्णांची आठवण झाली. तेही त्यावेळचे प्रख्यात साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककारआणि महाराष्ट्र-गीताचे कवि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि मराठी कवितेला रोमॅंटिसिझमचे वळण देणारे रविकिरण मंडळाचे अध्वर्यु, संस्थापक कविवर्य माघव ज्युलियन( प्रेमस्वरुप आई, वाघ बच्छे फाकडे भ्रांत तुम्हा का पडे असे विचारुन मराठी माणसाला पुन्हा जागवणारे, मराठी असे आमुची मायबोली… तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू असे मायमराठील वचन देणारे कविश्रेष्ठ) यांच्या आठवणी अण्णा सांगत.

अण्णा काॅलेजात असताना-फर्ग्युसन,लाॅ काॅलेज-त्यांच्या कविता मासिक मनोरंजन यशवंत मध्ये येत असाव्यात. प्रा. डाॅ माधवराव पटवर्धन म्हणजेच कवि माधव ज्युलियन,रविकिरण मंडळात इतरांना अण्णांची ओळख करून देताना “आमचे तरुण कविमित्र” असाच उल्लेख करीत असे अण्णा सांगत. रविकिरण मंडळातील कवि गिरीश, यशवंत आणि ग. त्र्यं माडखोलकर यांची आणि अण्णांची चांगली ओळख होती.

ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक व “तीन शहाणे”हे चांगले प्रसिद्धीला आले होते.त्यामुळे त्यांची आणि श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली असावी. नाटक मंडळींत किंवा इतर मोठ्या लोकांकडे जातांना काही वेळेला ते अण्णांनाही बरोबर घेऊन जात. तिथे ते स्वत: गादीवर तक्क्याला टेकून आरामात बसत.अण्णा त्यांचा मान राखून सतरंजीवर बसत. लगेच कोल्हटकर गादीवर हात थापटत अण्णांना म्हणायचे,” अहो कामतकर, इकडे या, अहो आपण नाटककार आहोत, इथे बसा ,”असेम्हणत ते त्याच्या शेजारी अण्णांना बसवून घेत,

ह्या आठवणी सांगताना अण्णा म्हणायचे, ह्या लोकांचा केवळ माझ्यावरचा लोभच नाही तर तितकाच त्यांच्या मनाचा मोठेपणाही होता!”

अण्णा फर्ग्युसनमध्ये असताना त्यांनी ‘वसतीगृहात’ नावाचे विनोदी प्रहसन लिहिले होते. त्याचे आमंत्रण स्वीकारताना  साहित्यसम्राट न.चि. केळकरांनी स्पष्ट केले होते की मी फार तर दहा मिनिटासाठी येईन. प्रयोगाला ते आले. फर्ग्युसनचे ॲम्फी थिएटर गच्च भरले होते. न. चि. केळकरआले. प्रयोगाच्या सुरवातीपासूनच हशा टाळ्या सुरु झाल्या. पुढे पुढ तर मुलांनी थिएटर डोक्यावर घेतले. साहित्यसम्राट प्रयोग संपेपर्यंत थांबले होते हे सांगायला नको. प्रयोगाच्या अखेरीस केलेल्या भाषणात त्यांनी,”मी निमंत्रण स्वीकारताना फक्त दहा मिनिटेच थांबेन हे स्पष्ट केले होते पण प्रयोग पाहायला लागलो आणिवगैरे ….” ह्याचा आवर्जून उल्लेख केला व प्रहसानाच्या लेखकाची प्रशंसाही केली! केसरीचे संपादक, नाटककार, इतिहासकार, व महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या व्यक्तींकडून कौतुक होणे ही काॅलेजमधील तरुणाला किती अभिमानास्पद असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो.

अण्णा ही आठवणसांगत ती माझ्या जन्मापूर्वीची आहे.मला वाटते त्यावेळेस वासुनानाचाही जन्म झाला नसेल. अण्णा आबासाहेब ती.बाबा वगैरे रिठ्याच्या वाडायात राहात होते. हा वाडा शुभराय महाराजांच्या मठाच्याही पुढे शनीचे देऊळ, गद्रेंच्या वाड्याच्या जवळपास आहे. आता तिथे रिठ्याची झाडे आहेत की नाहीत कुणास ठाऊक.

रविकिरण मंडळाच्या सप्तर्षींपैकी व महाराष्ट्रातही लोकप्रिय असलेले कवि गिरीश यांचे अापल्याकडे येणे होत असे. कवि गिरीश म्हणजे ‘ रायगडाला जाग येते, वेड्याचे घर उन्हात, सूर्याची पिलेअशा नाटकांचे लेखक वसंत कानेटकरांचे वडील. कवि गिरीश सांगलीच्या विलिंग्डन काॅलेजात प्राध्यापक होते. ते आले की काव्यशास्त्रविनोदाला साहजिकच बहर येई.गिरीश त्यांच्या कविता म्हणत असत. ते खऱ्या अर्थाने काव्यगायन असे. ते कविता चालीवर छान म्हणत, असे अण्णा सांगत. कधी तरी अण्णा गिरीशांची नक्कल करत ” गेले तुझ्यावर जडून, रामा मन गेले तुझ्यावर जडून” ‘ ही शूर्पणखा रामाला आपले प्रेम उघड करून सांगतेय ती कविता म्हणत. गिरीशांची ही कविता सर्व रसिक गुणगुणत असत! पुढे ह्या कवितेच्याच चालीवर अनेक कविता झाल्या. त्या कवितांची चाल/वृत्त दर्शवताना कवि ‘चाल- गेले तुझ्यावर मन जडून’ असाच उल्लेख करत!

आचार्य अत्रे आमच्या घरी आले तेव्हा बरेच लोक जमले होते. आचार्य अत्रे घरात येण्याआधी लोकांनी नारळ ओवाळून तो फोडला! त्यांचा मोठा आदर केला. ही आठवण आई-अण्णा दोघेही सांगत. ही हकीकत मी नुकताच जन्मलो त्यावेळची, म्हणूनही त्या संदर्भात आई सांगत असावी.

गडकरी किंवा आचार्य अत्रे यांच्या इतके चिं. वि जोशी गडगडाटी हसवत नसतील. पण ते वाचकांना हसवत ठेवीत हे नि:संशय! आमच्याउन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांच्यामुळे सतत हसण्यात गेल्या. सुट्टी कधी उन्हाळ्याची वाटतच  नसे! चिमणराव, गुंड्याभाऊ आणि त्यांचा आवडता सोटा, चिमणरावांची मुलं मोरु राघू आणि मैना, बाजाची पेटी आणि आपल्या पोपटाच्या पिंजऱ्यासहितआलेली व पेटी वाजवत वाजवत नाट्यगीते म्हणणाऱ्या स्वैपाकीण काकू , तसेच चि.विं चे ओसाडवाडीचे देव; भली मोठी लोखंडी ट्रंक भरून चिमणरावांसाठी ‘ इस्टेट  ‘ ठेवणारे त्यांचे दत्तक वडील कोण विसरेल? तर हे प्रख्यात विनोदी लेखक चिं. वि. जोशीही आमच्या घरी अण्णांना भेटायला  येत असत.उन्हाळ्याच्या सुट्टीत ते येत.एक दोन रविवारी त्यांचे येणे होत असेल. आम्हाला विनोदी लेखक म्हणजे सारखे हसणारे, हसवणारेअसतात असे वाटायचे. पण चिं.वि.जोशी शांत आणि गंभीर मुद्रेचे होते. अण्णांचे आणि त्यांचे बोलणे चालू असे. आम्ही मध्येच मधल्या खोलीतून डोकावून पाहून जात असू.

सोलापूरला १९४१/४२ साली मराठी साहित्य संमेलन झाले त्याचे वि. स. खांडेकर हे अध्यक्ष होते. त्या आघीपासून नाटककार कवि लेखक म्हणून साहित्यवर्तुळात अण्णांची ओळख होती.त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णा असतील अशी बऱ्याच जणांची अपेक्षा होती. त्यामध्ये खांडेकरही असावेत. पण ते पद अण्णांना मिळाले नाही. तेअसो. पुढे जेव्हा वि. स. खांडेकरांना  ज्ञानपीठ पारितोषिकचा सर्वोच्च सन्मान लाभला तेव्हा होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण पत्र अण्णांना आले होते. सोलापुरात फक्त एकट्या अण्णांनाच हे आमंत्रण होते ! ह्याचा मात्र अणांना अभिमान वाटला, आणि खांडेकरांनी आठवण ठेवली याचा आनंदही ते व्यक्त करीत.

तर अण्णांमुळे आमच्या घरचे वातावरण असे साहित्यिक असायचे !