आईडा आणि हॅरी

अर्नॉल्ड फाइन ‘ ज्युईश प्रेस’चे संपादक होते. त्यांना एक पत्र आले. अगदी वेगळ्या प्रकारचे पत्र होते. एका वाचकाचे असूनही ते वाचकांच्या पत्रव्यवहारातले नव्हते. पत्रात तिने लिहिले होते,”मी तुमचे सदर नेहमी आवडीने वाचते. केवळ भाषा शैली चांगली म्हणूनच नव्हे तर लिखाणातील भावनेचा ओलावा आणि त्यातून प्रतित होणारी सहृदयता यामुळे ते मला जास्त आवडते. तुम्ही मला मदत करू शकाल म्हणून मी हे पत्र लिहित आहे.”

“माझे वय आज ऐशी वर्षांचे आहे. मी विधवा आहे. पण मी अजूनही माझे पहिले प्रेम आणि माझ्या पहिल्या प्रियकराला विसरू शकत नाही. मी सतरा वर्षाची होते तेव्हा माझे आणि हॅरीचे प्रेम जमले. ते अजूनही तितकेच टवटवीत आहे. हॅरी त्यावेळी तेवीस वर्षाचा होता. आम्ही दोघेही एकमेकांचे जीव की प्राण होतो आणि आहोतही. वेड्यासारखे आम्ही एकमेकाच्या प्रेमात होतो.”
“पण माझ्या आई वडिलांना आमचे प्रेम पसंत नव्हते. माझे आई वडील श्रीमंत आणि समाजातील बडे प्रस्थ ; अमेरिकन जर्मन. हॅरीचे आई वडील नुकतेच पूर्व युरोपियन देशातून आलेले. माझ्या आई वडलांनी आमचे प्रेम सफळ होउ नये म्हणून जे जे करता येईल ते सर्व केले.”
“ते मला वर्षभर युरोपात घेऊन गेले. मी जेव्हा परत आले तेव्हा हॅरी या जगातून नाहीसा झाल्यासारखाच होता. तो कुठे निघून गेला होता कोणालाही माहित नव्हते. त्याने आपला पत्ता कोणाकडेही दिला नव्हता. कुठे जातो हे पण कोणालाही ठाऊक नव्हते. मी सगळीकडे कसून तपास केला. पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. ”
“काही वर्षानंतर माझे लग्न झाले. मला नवरा अतिशय चांगला मिळाला. सुस्वभावी, उमद्या मनाचा. सर्वच बाबतीत तो उत्तम माणूस होता. आमचा दोघांचा साठ वर्षाचा संसार फार आनंदाचा झाला. आमचे आयुष्य सुखाचे गेले. तो मागच्या वर्षी वारला.”
हे सगळे होउनही मी हॅरीला विसरत नव्हते. आजही त्याची मला आठवण येते. त्याचे काय झाले असेल ? तो कुठे असेल? तो जिवंत असेल काय? ह्या विचारांनी सैरभैर होते.”
“मला जाणीव आहे की मी अंधारात बाण मारते आहे. पण जर हॅरीला शोधून माझी आणि त्याची भेट घडवून आणेल तर ते तुम्हीच करू शकाल. मि.फाईन, तुम्हाला अनेक कामे आहेत. वेळ नसतो. पण शक्य असेल तर हॅरीचा ठावठिकाणा आपण शोधून काढा ही माझी तुम्हाला विनंती आहे.”
“मी क्राऊन मॅनॉर नर्सिंग होममध्ये असते. हे लॉन्ग बीच येथे आहे. हॅरीचा जुना पत्ता असलेले एक पाकिट तेव्हढे माझ्याकडे आहे. त्याचा काही उपयोग झाला तर पहा. ते सोबत पाठवत आहे. तुमच्या उत्तराची वाट पाहाते आहे. आपली, आईडा ब्राऊन”
पत्र वाचल्यावर फाईन थोडा वेळ स्तब्ध बसले. त्यांना फार कामे होती. कामात बुडून गेलेले असत.संपादक होतेच शिवाय ते एका शाळेत विशेष शिक्षकही होते. त्यात वर्तमानपत्राच्या इतर अनेक कामांची भर होतीच. पण ते पत्र अंत:करण हेलावणारे होते. त्यांनी आईडाला मदत करायचे ठरवले. आपला व्यावसायिक अनुभव आणि संबंध पूर्ण कसोटीला लावून ते रोज इडाच्या कामाला लागले.पण मनात धाकधुक होतीच, हॅरी जगात नसेल तर ते आईडाला कसे सांगायचे? .एक दोन महिन्यांनी ॲर्नॉल्ड फाईन प्रवास करून थकले होते तरी ते लगेच लाँग बीचला क्राऊन मॅनॉर नर्सिंग होममध्ये गेले. प्रथम ते सहाव्या मजल्यावर गेले. वयस्कर पण तडफदार वाटणाऱ्या, डोळ्यांत विनोदीवृत्तीची आणि मिस्किलपणाची झाक असलेल्या गृहस्थाच्या खांद्याभोवती हात टाकत त्याला घेऊन ते लिफ्टमध्ये घेऊन गेले. दोघेही तिसऱ्या मजल्यावर आले. तिथे आईडा वाट पाहात होती.
“हॅ…री?”आईडा भावनावेगाने किंचित कापऱ्या आवाजात म्हणाली. “अरे!.. अरे! कोण?…आई..डा.! तो चाचरत म्हणाला.
दोघांनाही इतके दिवस माहित नव्हते की ते एकाच नर्सिंग होममध्ये राहत आहेत!
एक दोन महिन्याने ॲर्नॉल्ड फाईन, मॅनॉर नर्सिंगमध्ये पुन्हा आले. ह्या खेपेस ते आईडा आणि हॅरीच्या लग्नाला आले होते. हे लग्न होण्यास साठ वर्षे वाट पहावी लागली!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

हिरो

लोकलमध्ये गर्दी होती. तरीही आपल्या पुढच्या पाच सहा रांगांच्या पलीकडे एक पुरुष आणि बाई एकमेकांशी भांडताहेत, वादावादी चालली आहे हे टॉमी हॉइटने पाहिले. असेल त्यांच्यातली किरकोळ बोलाचाली म्हणून इतर अनेक प्रवाशांप्रमाणे त्यानेही दुर्लक्ष केले. पण नंतर त्याला ती बाई त्या माणसाला जोराजोरात ढकलते आहे आणि तो माणूस तिच्या गळ्याला धरून ओढतोय, बाईचा आवाजही वाढला आहे हे पाहिल्यावर मात्र टॉमीला राहवेना.

तो लोकांना बाजूला सारत तिकडे जाऊ लागला. तो माणूस त्या तरुणीच्या गळ्यातली साखळीओढतोय हिसडा मारतोय हे पाहिल्या बरोबर तो लोकांना धक्के मारत, बाजूला ढकलत पुढे गेला.
सगळे प्रवासी गारठून थिजून गेल्यासारखे बसले होते. एकही हरीचा लाल पुढे आला नव्हता. टॉमी मात्र बाईच्या मदतीला धावून चालला होता. ती बाई अजूनही त्या पुरुषाशी झगडत होती. “मी तो बदमाश साखळी घेऊन पळून जाण्या अगोदर तिथे पोचले पाहिजे” तो मनात म्हणत पुढे सरकत होता. टॉमी जवळ जवळ पोचलाच होता पण तेव्हढ्यात त्या बदमाशाने साखळी खेचून काढली होती. गाडी स्टेशनवर पोचली.फलाटावर उडी मारून तो माणूस पळालाही. “धावा! पकडा त्याला! माझी साखळी घेऊन तो पळाला! पकडा धावा! असे ती तरुणी ओरडायला लागली. टॉमीने त्या तरुणीकडे पाहिले. सुंदर होती. सोनेरी केसाची निळसर डोळ्यांची ती तरुणी सुंदर होती. मुलगी सुंदर, आणि तिच्या केसामुळे आणि निळसर डोळ्यांमुळे कुणाच्या लक्षात राहणार नाही? तरुण टॉमी तरी तिला कसा विसरणार होता? टॉमी दरवाजातून उडी मारत त्या चोराचा पाठलाग करू लागला. टॉमीने शेवटी त्या चोराला गाठलेच. त्याच्या हातातली साखळी ओढून घेतली. पण त्या गडबडीत तो चोर निसटून जोरात पळाला. आणि गर्दीत दिसेनासा झाला.”निदान त्या मुलीची साखळी तरी परत मिळाली.’ टॉमीने स्वत:चे समाधान केले.
टॉमी स्वप्नात असल्यासारखा विचार करत होता. मी विजयी मुद्रेने हसत तिची साखळी दिल्यावर ती काय म्हणेल? कशी बघेल माझ्याकडे? पण तो लागलीच भानावर आला. तो गाडीकडे जायला निघाला. ती गाडी निघूनही गेली होती. ” मी त्या चोराचा पाठलाग करत होतो तरीही कुणी गाडी थांबवली नाही? लोकांनी मी उडी मारली,पाठलाग करत होतो ते पाहिले नसावे? त्या मुलीलाही माहित नव्हते की मी तीची साखळी परत मिळवण्याच्या धडपडीत होतो? शक्य आहे कुणालाच माहित नसावे.”हेच विचार त्याच्या मनात होते. एक नक्की, मुलीला खूष करून आपले “इम्प्रेशन”मारावे म्हणून काही त्याने आपला जीव धोक्यात घतला नव्हता. त्या वेळेस अशा लुटारूना पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले पाहिजे, त्याला अगोदर पकडले पाहिजे ह्याच विचाराने त्याने ह्यात उडी घेतली होती.
टॉमी एकदम निरुत्साही झाला. मी धाडस दाखवले, माझा जीव धोक्यात घातला त्याची कुणालाही खबर नव्हती ह्याचे त्याला आश्चर्य वाटत होते. “आता पुढे काय करायचे?” ह्या विचारात तो होता. जर त्या मुलीने मला उडी मारून त्या चोराचा पाठलाग करतोय हे पाहिले असेल किंवा कुणी तिला सांगितले असेल तर ती माझे आभार मानायला इथेच येईल. काय झाले कसे पकडले त्या चोराला, विचारायला येईल. हा विचार करून तो वाट पाहत थांबला. एक तास होउन गेला तरी ती आली नाही. त्याची खात्री झाली की त्या मुलीला मध्ये रामायण काय घडले त्याची काही कल्पना नसणार. आपले धाडस, शौर्य, कारणी लागले नाहीअशी खंत करत तो निघाला. “ह्या साखळीचे मी काय करू? पोलिसांना देऊ? पण तिला आपली साखळी मिळाली आहे हे जर माहित नाही तर ती पोलिसाकडे जाईल कशाला? नाही हे काही खरे नाही..” टॉमीच्या मनात विचारचक्र चालू होते. त्याने ती साखळी आपल्याजवळच ठेवली.
जेव्हा केव्हा ती साखळी त्याच्या हाताला लागे तेव्हा तो चित्रपट ‘फ्लॅश बॅकने’ डोळ्यांसमोर चालू व्हायचा ! पण फार तर सहा सात महिने चालले. नंतर तो आपला पराक्रम विसरल्यासारखा झाला. पण तीन वर्षे उलटून गेली तरी त्याच्या दिलाची ‘डिंग डाँग’ ‘सपनो की राणी’ त्याच्या मनातली चांदणी मात्र विसरू शकला नव्हता. गेल्या तीन वर्षात त्याला ती कुठेही दिसली नाही !
तो मॅनहॅटनच्या मधल्या भागातील एका बारमध्ये गेलाअसता बारच्या उंच स्टुलावर ती बसलेली दिसली. तिच्या जवळ जाऊन त्याने एकदम लोकल गाडीतल्या त्या घटनेची अगदी थोडक्यात आठवण करून दिली. आणि नाट्यपूर्ण पद्धतीने तिची साखळी तिच्यासमोर धरली. ती डोळे विस्फारून आश्चर्याने पाहू लागली. साखळी हातात घेत ती त्याचे आभार कसे मानावेत ते न सुचून आपल्या निळसर डोळ्यांनी टक लावून त्याच्याकडे पाहात राहिली .
क्षणभराने ती म्हणाली “ही साखळी म्हणजे माझा जीव की प्राण आहे.त्यामुळेच मी त्याला ती काढू देत नव्हते. आकांताने भांडत होते. बाकीचे सर्व सोडून दिले तरी ही साखळी माझ्या आजीची आहे. तिने ती मला कौतुकाने दिली होती… माझ्या आजीची ही आठवण आहे.” असे म्हणत तिने ती साखळी आपल्या डोळ्यांना लावून तिचा मुका घेत गळ्यात घातली.
तिने त्यानंतर सगळी हकिकत सांगितली त्यावरून त्या स्टेशनच्या फलाटावर त्याने केलेला तर्कच खरा ठरला. गाडीतल्या लोकांना आणि तिलाही त्याने केव्हा उडी मारून चोराचा पाठलाग सुरू केला काही दिसले नव्हते,माहित नव्हते !.
तिने त्याच्याकडे डोळे किंचित झुकवून, “तुला मी काय देऊ म्हणजे तुझी मी उतराई होईन?” असे विचारल्यावर ” आज तर भेटायचेच पण त्यानंतरही रोज भेटायचे. बस्स, इतकेच पुरे मला!”
हे ऐकून दोघेही खळखळून हसले.
त्यांचे लग्न होउन पाच वर्षे झाली आहेत. न्यूयॉर्कच्या एका रेडीओ स्टेशनवर व्हॅलेंटाइन डे निमित्त झालेल्या कर्यक्रमात टॉमीने त्यांची प्रेमकहाणी सांगितली. योगायोगाची ही हकिकत सांगताना तो म्हणाला ,”तिला तिची साखळी मिळाली पण ‘रत्न’ मलाच मिळाले” !

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

…मित्र जीवाचा खरा

त्या सगळ्यांत ते फार लहान आणि अगदी अशक्त पिल्लू होते. अशक्त म्हणजे अशक्त. दुसरा शब्द नव्हता त्याच्यासाठी.आपल्या पायांवरही धड उभे राहू शकत नव्हते. एका कोपऱ्यात बिचकून उभे असल्यासारखे होते. “हूं, तू नाही ते घेणार ते. मी तुला त्याचीच ही चार भावंडे दाखवतो. ती बघ. कशी उड्या मारताहेत!” बिल मला जवळकीच्या नात्याने म्हणाला.

पण माझी नजर त्याच्यावरून हलत नव्हती. त्याचा चेरा मलूल होता. तेही माझ्याकडे पाहात होते.मी आणखी जवळ गेलो. चेहऱ्यावर गोडवा होता त्याच्या. ” त्याचे नाव काय आहे?” मी बिलला विचारले. “हे बघ जॉनी, बिल सुस्कारा टाकून म्हणाला,”मी तुझ्या वडिलांचा चांगला मित्र आहे. तुलाही माहित आहे. मी म्हणेन हे पिल्लू घेऊ नकोस. त्यापेक्षा दुसरे कोणतेही घे. ती सशक्त आणि उत्तम आहेत. आवडेल ते घे. मला नाही वाटत हे फार दिवस काढेल म्हणून” म्हणजे माझ्यासारखेच आहे की. मीही जगतो का वाचतो असेच सगळ्यांना परवा परवापर्यंत वाटत होते.मी मनात माझ्याशी म्हणत होतो.
मागच्या वर्षी मी तेरा वर्षाचा झालो. मला ल्युकेमिआ झाल्याचे स्पष्ट झाले. सगळ्यांनी माझी आशा सोडून दिली होती. पण मी त्यातून बाहेर आलो. पण किती अशक्त आणि बारीक झालो मी. तेव्हढ्यात ते पिल्लू माझ्या जवळ येऊन माझा हात चाटू लागले ते मला समजलेही नाही. मोठ्या आशेने ते माझ्याकडे बघत होते.
“अर्, काय करतेय हे पिल्लू? तला मी कधीही कुणापाशी जवळ गेलेले पाहिले नाही. आणि आज तर लाडात येऊन तुझा हात चाटायला लागलेय!” बिल आश्चर्याने बोलत होता. तोच पुढे म्हणाला “मला वाटते त्याला तू आवडला आहेस.” “आमच्या दोघात काहीतरी साम्य दिसले असेल.” मी म्हणालो. आम्ही दोघेही बारिकराव, खारिकराव! मी हे मोठ्याने कसे म्हणेन?
“त्याचे नाव काय आही?” मी पुन्हा बिलला विचारले. “मिरॅकल,” बिल खिन्नपणे म्हणाला.”कारण अजूनही ते जिवंत आहे! जन्मल्यावर सुरवातीला बरेच दिवस हे पिल्लू फर आजारी होते.” “मी हेच पिल्लू घेणार.”मी जाहीर केल्याप्रमाणे म्हणालो. बिलने मोठ्या मायेने आणि कळजीपोटी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटले,” जॉनी, मला तुला दुखवावेसे वाटत नाही आणि तुला द्:खी झालेले मला पाहवणार नाही. तू त्याला घरी नेलेस आणि मिरॅकल गेला तर ! नुकताच तू फार मोठ्या जीवावरच्या संकटातून बाहेर पडला आहेस. आणि तुला लळा लावून मिरॅकल गेला तर? माझं ऐक. खरेच दुसरे कोणतेही घे तू ! ”
पण मिरॅकलला घेऊनच मी घरी आलो.
काही वर्षे गेल्यावर बाह्य रूप किती फसवे असते ते मिरॅकलने सिद्ध केले. जातिवंत पैदाशीचा असल्यामुळे त्याचा बांधाही भरला. माझ्यासारखाच चिवट पण जास्त काटक झाला. आम्ही एकमेकांपासून, कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्यायचे ते शिकलो. मिरॅकल आणि मी एक अभेद्य जोडी झालो होतो. मेनमधल्या एका लहानशा गावातल्या रस्त्यावरून तो मला शाळेत सोडवायला यायचा. पुन्हा घरी परतायचा. संध्याकाळी बरोबर पाचच्या ठोक्याला तो शाळेच्या फाटकापाशी माझी वाट पहात उभा असे. त्याच्याबरोबर घरी येतानाचा आनंद औरच असे.”
मी अणि मिरॅकल कायमचे जानी दोस्त झालो होतो. दिवस काही थांबत नसतात. मला कॉलेजच्या शिक्षणासाठी बोस्टनला जावे लागणार होते. तिथल्या प्रख्यात युनिव्हर्सिटीत मला शिष्यवृत्ती मिळाली होती. चांगले कॉलेज मिळाले, शिष्यवृत्ती मिळाली याचा आनंद होता पण मिरॅकलला सोडून जावे लागणार ह्याचेही दु:ख होते. वसतीगृहात पाळीव प्राण्यांना बरोबर राहण्याची परवानगी नव्हती. काय करणार? मिरॅकल मला सोडून कसा राहिल याची मला काळजी वाटत होती. मीसुद्धा त्याच्याशिवाय राहीन का असेही मला आतून वाटत होते. पण आई वडिलांनी आणि घरातल्या सगळ्यांनी “अरे, तू इकडे प्रत्येक मोठ्या सुट्ट्टीत येशीलच. त्या वेळी तू आणि मिरॅकल सतत बरोबरच राहणार की. ह्यासाठी शिक्षण सोडणार का?” असे सांगून माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
मी बोस्टनला जाण्यासाठी निघालो. आई वडिलांना,बहिण भावंडाना सोडून जाणे जीवावर येत होते आणि त्याही पेक्षा मिरॅकलला सोडून जाताना डोळ्यातले पाणी खळत नव्हते.
कॉलेज सुरू झाले. मी रमू लागलो. पण मिरॅकलची आठवण येतच होती. आणि एके दिवशी आईने ती बातमी सांगितली. ती ऐकल्यावर माझ्या तोंडून शब्द फुटेना. मिरॅकल नाहीसा झाला होता. मी गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी तो घरातून बाहेर पडला तो घरी परत आलाच नाही. घरच्यांनी सगळीकडे दिवसरात्र शोधले. रोज निरनिराळ्या दिशेने एकेकजण जात असे. पण मिरॅकल काही दिसला नाही. गावातले लोकही शोधाशोध करत होते पण कुणालाही तो आढळला नाही. मी रोज घरी फोन करून विचारायचो मिरॅकल सापडला का? घरी आला का? पण प्रत्येक वेळी आए बाबा भाऊ रडवेले होउन “नाही” म्हणत. गावतलया लोकांपैकी कुणालाही तो गावात किंवा आजुबाजूच्या गावात दिसला नाही. माझा भाऊ बहिण कितीतरी दिवस शाळेत संध्याकाळी पाच वाजता जाऊन उभे राहात. पण मिरॅकल तिथेही कधी आला नाही. शेवटी आई फोनवरून म्हणाली “जॉनी , मन घट्ट करायला हवे. मिरॅकल या जगात नसेलही.” मी मनात म्हणत असे, अरे माझ्या मित्रा आपण कायमचे एकत्र राहू असे मी म्हणत असे. आणि तू असा मध्येच मला सोडून गेलास? खोलीतल्या माझ्या मित्रालाही मिरॅकल आणि मी एकमेकाला किती जीव लावून होतो ते माहित
होते. माझा घरी फोन झाला की तोही मिरॅकलची चौकशी करायचा पण माझा पडलेला चेहरा पाहिला की पुढे बोलायचा नाही.
तरीही मी रोज घरी फोन करत असे. आई बाबा म्हणायचे,” अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस. अशी संधी तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मन शांत ठेव.” ते तरी मला दुसरे काय सांगणार? मित्र मला त्यांच्या बरोबर खेळायला, सहलीला ओढून नेत असत. मन रमायचे. पण मिरॅकल काही मनातून आणि डोळ्यांपुढून जात नव्हता.
मी आता घरी फोन करणेच बंद करून टाकले. घरचा येत असे. पण मी मिरॅकलची चौकशी करत नव्हतो. नाताळच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी गेल्यावर मात्र मी मिरॅकलला शोधायला बाहेर पडे. गावातल्या लोकांना निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. पण ते माझ्यावर चिडता नसत. म्हणत, किती महिने झाले आम्ही त्याला इथे पाहिले नाही. आई म्हणायची,”जॉनी वस्तुस्थितीला सामोरे गेले पाहिजे. मिरॅकल ह्या जगात नसणार.” मी काहीच बोलत नसे.
एक वर्ष उलटले. मी आणि माझा मित्र अंथरुणार पडून गप्पा मारत होतो . बोलता बोलता ” अरे आवाज कसला येतोय?” असे माझा मित्र म्हणाला.मी म्हणालो,” कसला आवाज? मला नाही ऐकू आला.” “दरवाज्यावर ओरखडल्यासारखे वाटले. ऐक, येतोय?” मी ताडकन उठलो. दरवाज्याकडे पळालो. दरवाजा उघडल्याबरोबर त्याने माझ्या छातीवर पाय टेकवून तो माझे गाल चाटायला लागला!
कूं कूं करत तो माझ्याकडेसारखा बघत राहिला. मी खाली वाकून त्याच्यासमोर बसलो. तो माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे पाहात राहिलो. पहिल्या दिवशी जसा तो मलूल चेहऱ्याने अजीजीने प्रेमाने माझ्याकडे पाहात होता तसेच आजही पाहात होता. माझ्या डोळ्यातले पाणी संपेना. तो आपले शेपूट सारखा हलवीत होता. माझे हात चाटत होता.
काय दुर्दशा झाली होती त्याची. सगळे अंग खरचटलेले, रक्ताने माखलेले. अंगावरची केसाची मखमल नाहीशी झालेली. हाडे बरगड्या वर आलेल्या. मिरॅकलचा नुसता सापळा राहिला होता. पण मिरॅकल परत आला होता !
माझ्या मित्राने विचारले, “वर्षापूर्वी मेनमध्ये हरवलेला हा तुझा कुत्रा? तो कसा असेल? मेनपासून शेकडो मैल,इतक्या दूरवरच्या बोस्टनला कसा पोचला तो? बोस्टनमध्येही त्याला आपले कॉलेज ही खोली कशी सापडली? कसं शक्य आहे हे?” “काहीही शक्य असते”मी पुटपुटलो. ” अरे, हा चमत्कार म्हणायचा की काय?”
मी मिरॅकलला थोपटत म्हणालो,” ‘हा चमत्कार’ आहे.”

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

नऊ आठवडे

तसा मी धर्मकार्यातला. मी तरुण धर्मोपदेशक होतो तेव्हा वॉशिग्टन राज्यातील टॅकोमा येथे असलेल्या प्युगेट साऊंड युनिव्हर्सिटीत काम करीत होतो. तिथे माझ्या इतर कामाबरोबर, पहिल्या शतकातील उपासना पद्धतीचा अभ्यासक्रमही शिकवत असे.त्या वेळी एका बाईने मला धार्मिक उपासना आणि रोजचे अन्न व इतर खाद्य पदार्थ अशा पुस्तकाचे परीक्षण व त्यावरील काही अहवाल वाचायला दिले. आम्ही वर्गात त्यावर चर्चा करीत असता त्यावर आधारित एक अभ्यासक्रमच तयार केला. नंतर तो अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची फार गर्दी झाली. तो एक विद्यार्थीप्रिय अभ्यासक्रम झाला. मला स्वयंपाक, खाद्य पदार्थ करण्याची मुळातच आवड असल्यामुळे त्यातूनच पुढे मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी लोकांना जेवण पुरवण्याचा उपक्रम सुरू केला. जेवणाबरोबरच हळू हळू इतर खाद्य पदार्थ देऊ लागलो. खाण्याचे सर्व पदार्थ आणि जेवण मोजक्या वस्तू वापरून केल्या असत. तेल तूपही मर्यादित प्रमाणात वापरून हल्ली आपण “हेल्दी” म्हणतो तसे आणि कोणत्याही चोखंदळ खवैय्यालाही आवडतील असे असत.आमच्या ह्या खाण्या जेवणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

काही दिवसांनी मी ते काम सोडले आणि स्वत:चे पाक कला शिकवण्याचा वर्ग सुरू केला. वर्ग कसला, पुढे ती शाळाच झाली. आम्ही नुकतेच घर घेतले होते. त्याचे कर्ज फेडायचे म्हणून मी कामाला वाहून घेतले होते. माझा आत्मविश्वास दांडगा होता. मी करेन त्या कामात मला यशच मिळणार ही माझी खात्री असे. त्यामुळे मला ‘ग’ची बाधा झाली त्यात नवल नाही. शिवाय मी किती काम करतो. माझे काम किती चांगले, मी म्हणून हे सगळे होतेय अशा रुबाबात मी वावरत होतो. ह्या शाळेबरोबरच आता मी स्वैपाकाला लागणाऱ्या भांड्यांचे आणि वस्तुंचे दुकानही जवळच टाकले.तेही चांगले चालू लागले
पीबीएस मधील माझ्या ओळखीच्या निर्मात्याने त्यांच्या टाकोमा या स्थानिक केंद्रासाठी एखादा कार्यक्रम करशील का असे विचारले. ह्या केंद्राचे कार्यक्रम एका गल्लीतही पोचत नाहीत असे मी चेष्टेने म्हणत असे. खरेही होते ते. स्थानिक म्हटल्यावर असे कितीसे लोक ते पाहणार? ही हकिकत १९७३ सालची आहे.त्या काळी एखादा कार्यक्रम एकाच वेळी सर्व मोठ्या वाहिन्यांवर दाखवायचा म्हणजे एक तर कार्यक्रम गाजलेला दर्जेदार आणि लोकप्रिय असायला हवा. आणि तसा तो असला तरी त्याला नऊ आठवडे लागायचे. हे असू दे. मी हो म्हणालो कारण हा माझा मित्र होता आणि त्याला कार्यक्रमाची गरज होती.
आठवड्यातून एकदा मी स्वत:ची सगळी सामुग्री,पदार्थासाठी लागणाऱ्या वस्तू,स्वैपाकाची भांडी आणि मदतनीस घेऊन स्टुडिओ मध्ये जात असे. अर्ध्या तासाचा हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा प्रसारित होई. मी आणि माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाककलेचे पुस्तकही छापून घेतले. त्याचे ढिगारे माझ्या घरातल्या तळघरात रचून ठेवले होते.देवाने माझी ही शाळा, दुकान आणि टीव्हीवरचा ह्या कार्यक्रमातून, धार्मिक कामातील लोकांना भेटण्याचा जो भाग आहे, त्याचा हा वेगळा मार्ग दाखवला. इतके काम असूनही मी प्रत्येक कामातल्या बारिक सारिक गोष्टींची अगदी काटेकोरपणे नोंद ठेवत असे.
माझा टाकोमाच्या पीबीएसवरील कार्यक्रम इतका यशस्वी झाला की थोड्याच वर्षांनी शिकागोच्या पीबीएसच्या मुख्य केंद्राने अमेरिकेतील त्यांच्या सर्व पीबीएस वाहिन्यांवरून माझे कार्यक्रम प्रसारित करण्याचे ठरवले. कार्यक्रमांची मालिकाच करण्याचे ठरवले.
माझे शिकागोला कार्यक्रम चित्रित करण्यासाठी वारंवार जाणे होउ लागले. थोड्याच महिन्यात पुढच्या सीझनसाठी चित्रिकरणाची तारीखही नक्की झाली. माझ्यासाठी ही फार चांगली गोष्ट होती. मलाही नवीन कामाची गरज होती. कारण माझी शाळा, दुकान आता तितकेसे चालत नव्हते. जवळ जवळ बंद पडण्याच्या मार्गवर होते. कारण स्पर्धा वाढली होती. कोपऱ्या कोपऱ्यावर माझ्या शाळे सारखे क्लासेस आणि दुकानेही निघाली होती! अखेर १९८२ मध्ये मी दुकान आणि शाळाही विकून टाकली.
सगळ्यांची देणी चुकवणे भाग होते. बिलं घेऊन बसलो. एकेक करत बिले चुकती केली. पण अजून मोठ्या रकमांची बिले राहिली होती.त्यांची बेरीज केली. इतकी कामे, इतके कष्ट करूनही मी अजून ७०,००० डॉलर्स देणे बाकी होते!
देवाची कृपा म्हणून शिकागोचे काम अजून माझ्या हातात होते. कामचालू झाले की दोन आठवड्यात मला पैसे मिळू लागतील. आता कामाला घाबरायचे नाही. माझी बायको मला किती वेळा सांगायची,”अहो थोडे दमा धीराने घ्या. तुमच्या हृदयाची तरी काळजी घ्या. हे काय चालले आहे? दिवस रात्र काम,काम!”
तिची ही काळजी खरी होती. मी पंधरा वर्षाचा होतो तेव्हा मला श्वास घ्यायला फार त्रास होउ लागला. डॉक्टरांनी हृदयाची एक झडप बदलायला सांगितले होते. पण त्या काळी हे ऑपरेशन सर्रास सगळीकडे होत नव्हते. त्यामुळे माझ्या हृदयाची झडप अजूनही बदलली नव्हती. १९८२च्या उन्हाळ्यात एका रात्री मला फारच त्रास झाला. मला शिकागोला जायचे होते. पण मला श्वासही घेता येत नव्हता. मला ताबडतोब दवाखान्यात दाखल व्हावे लागले. ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार होती. त्याच दिवशी शिकागोला चित्रिकरण सुरू व्हायचे होते. पण आता कसचे काय!. बायकोने पीबीएसच्या लोकांना माझी हालत कळवली.
डॉ. स्वावेजनी स्पष्टपणे तीन शक्यता सांगितल्या. ऑपरेशन यशस्वी होईल, होणार नाही, अथवा मी फक्त जिवंत असेन. अंथरुणात लोळा गोळा होउन पडेन. ऑपरेशनच्या आधीची रात्र मी कधीही विसरणार नाही. आतापर्यंत मी, सारखा मी आणि माझे काम, मी कसा मोठा प्रसिद्ध होत चाललोय, अजून हे करायचे आहे, नंतर हे करणार आहे ह्यातच मश्गुल होतो. थोडक्यात मी,मी, आणि मी.मी मला विसरत नव्हतो. माझ्याशिवाय मला काही दिसत नव्हते.
मी ४२ वर्षाचा होतो. काही काम नसलेला, एक कुटुंब पोसायची जबाबदारी आणि डोक्यावर ७०,००० डॉलर्सच्या कर्जाचा बोजा येऊन पडलेला.माझी देवावर श्रद्धा होती. पण अंथरुणात लोळागोळा होउन पडायचे ही कल्पनाच हादरून सोडणारी होती. आणि मी काही करू शकत नव्हतो. माणसावर संकट आले, जीवाचे बरे वाईट होणार ही भिती समोर उभी राहिल्यावर त्याला देवाशिवाय कुणाची आठवण होणार? मीही त्याचीच प्रार्थना केली. करुणा भाकली. “देवा आता तूच माझा आधार. जे काही होणार ते तुझ्या कृपेनेच होणार. देवा माझे कर्ज तुझेच आणि माझा जीवही आता तुझाच. तूच मला सांभाळ”. झोप लागली की नाही तेही समजले नाही.
ऑपरेशन पार पडले. मी जागा झालो तेव्हा मी जिवंत आहे, विचारही करू शकतोय हे समजल्यावर मला केव्हढा आनंद झाला त्याची माझ्याशिवाय कुणाला कल्पना येईल?
माझी तब्येत जशी सुधारू लागली तसा मी निर्भर होत चाललो. मनाची अस्वस्थता आणि अस्थिरता कमी होतेय असे वाटू लागले. फार नाही तरी बराचसा निर्धास्त होतोय असे माझे मलाच वाटू लागले. तरीही ७०,००० डॉलर्सच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे त्याची चिंता होतीच.
एके दिवशी अनपेक्षितपणे फिल डोनह्युच्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण आले. त्याच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाने कुणाला आनंद होणार नाही? काय होईल ते सांगता येत नाही आणि असावे म्हणून मी माझ्या पुस्तकाच्या काही प्रति बरोबर घेतल्या. पुस्तक पाहिल्यावर फिलने विचारले,”केवढ्याला विकायचे हे?” एका प्रतीला मला ३.७५ डॉलर्स खर्च आला होता. मी म्हणालो,” ४.७५ डॉलर्सला विकत होतो.” जाहिराती सुरू होण्या अगोदर तीन वेळा,”हेच ते गाजलेले पुस्तक! आणि हे त्याचे प्रसिद्ध लेखक! असे फिलने नेहमीच्या मोठ्या उत्साहाने लोकांना दाखवत सांगितले.तसेच ते कुठून मागवायचे तेही तीन वेळा दाखवले! कार्यक्रम संपल्यावर निर्मात्यांपैकी एकीने विचारले,”पुरेशा प्रति आहेत ना?” “पुरेशा? चांगल्या पाच हजार पडून आहेत घरी.” मी थोडे हसून आणि काहीश्या हताशपणे म्हणालो असेन. ते ऐकल्यावर तिचा विश्वासच बसेना.त्यावर झालेला तिचा चेहरा मी अजूनही विसरलो नाही. ती म्हणाली,”कठिण दिसतंय एकंदरीत.”
आणि खरेच कठिण झाले मला ऑर्डरी पुरवता पुरवता ! त्या काळी देशातल्या सर्व वाहिन्यांवर कार्यक्रम प्रक्षेपित व्हायला नऊ आठवडे लागत. आणि त्या नऊ आठवड्यांच्या काळात मी खूप प्रति विकल्या. खूप म्हणजे किती खूप? ४०,००० प्रति!
इतके झाल्यावर मला शिकागोच्या पीबीएसच्या प्रमुखाकडून “तुमची नवी मालिका केव्हा सुरू करायची?” असा फोन आला. मी थोडाच नाही म्हणणार होतो?
आता तुम्हीच गणित करा. त्या ४०००० प्रतींना मला नफा झालेल्या १.७५ डॉलर्सने गुणा. सत्तर हजार डॉलर्स झाले! मला कर्ज तेव्हढेच होते. माझ्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर खाली उतरला.पण त्याहूनही देवाच्या कृपेचा मोठा मुकुट माझ्या डोक्यावर चढला !

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

फोन

वेनने आपले पोहण्याचे कपडे घेतले, झटकन दरवाज्याकडे जात आईला म्हणाला,”आई मी मित्राकडे चाललो.” त्याच्यासमोर एकदम येऊन ती उभी राहिली आणि म्हणाली,”हां, हां थांब एक मिनिट;” त्याने डोळ्यावर ओढून घेतलेली टोपी वर सरकावत त्याच्याकडे रोखून पाहात म्हणाली,” परत केव्हा येणार आहेस ते अगोदर सांग.” वेनला काही आश्चर्य वाटले नाही. हे रोजचेच होते त्याच्यासाठी. “उद्या रात्री,” म्हणत तो जायला निघाला. पण आई तशी सोडणार नव्हती. त्याच्याकडे बोट रोखून म्हणाली,”काही झाले तरी उद्या दुपारी तू मला फोन केलाच पाहिजेस. न विसरता.लक्षात ठेव.” पण लगेच त्याच्या डोक्यावरून पाठीवर हात फिरवत तिने एक कागदाचा कपटा त्याला दिला.त्यावर मित्राचा फोन नंबर लिहायला लावला.

वेनची आई,पॅटने तो कागद ऑफिसमध्ये जाताना नेण्यासाठी टेबलावर ठेवला.कारण तिला वेन फोन करेलच याची खात्री नव्हती.

ऑफिसमध्ये पॅट आपल्या मुलाच्या फोनची वाट प्हात होती, दुपारचे बारा वाजून गेले, एक वाजला तरी वेनचा फोन नाही म्हटल्यावर पॅट काळजीत पडली. थोडा वेळ म्हणत म्हणत शेवटी आपली पर्स उघडून तो कागद ती काढायला गेली. पण कागद सापडेना. घरीच राहिला वाटतं असे पुटपुटत ती स्वत:वरच चिडली. करणार काय आता? आईला राहवेल कसे, मुलगा कुठे असेल काय करत असेल ह्याची काळजी तिला लागली होती. ऑफिस सोडून जाता येत नव्हते. बरे वेनची चौकशी तरी कुठे आणि कुणाकडे करायची हाही प्रश्नच होता.डोळे मिटून बसली. नंबर आठवायचा प्रयत्न करू लागली. त्या नंबरमधले काही आकडे लक्षात आल्यासारखे वाटले, पण… बाकीचे अगदी पुसट आठवल्यासारखे वाटले. काही हे खरे नव्हते. पण हे असे करून नंबर फोन लागेल का? बघू या तर खरे म्हणत जसे आठवतील तसे ती आकडे फिरवू लागली. दोनदा फोन वाजल्यावर एका माणसाने फोन उचलला.

“हॅलो,”भीत भीतच पॅट बोलू लागली,”तिथे वेन ब्राऊन आहे का?” कोण? वेन ब्राऊन? मला बघू दे हं. एक मिनिट.वेन ब्राऊन.. वेन… ब्राऊन..” पॅटला वाटले फोन बंद करावा. तितक्यात तो माणूस बोलू लागला,”वेन ब्राऊन म्हणून कोणी आल्याचे लक्षात येत नाही.” पॅटने त्याचे आभार मानले, आणि चुकीचा नंबर लागला असेल म्हणत फोन खाली ठेवणार तेव्हढ्यात त्या माणसाने वेनचे वय काय ते विचारले. ती, काय विचित्र माणूस आहे ,हा काय प्रश्न झाला विचारण्याचा असे मनात म्हणाली पण तिने,”सोळा वर्षाचा,” असे सांगूनही टाकले. तो माणूस काही करू शकत नाही म्हणत दोघांनीही फोन बंद केला.

वेनची आई समोरचे काम करू लागली. डोक्यात मात्र वेन कुठे असेल याचीच काळजी करत होती. दोन तीन तासांनी तिचा सहकारी कुणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याने फोन पॅटला,” तुझा फोन” म्हणत दिला. फोन कानाला लावल्याबरोबर तिचा जीव भांड्यात पडला.पलीकडून वेनच बोलत होता. “आई, दाताच्या डॉक्टरकडे फोन कारायचा हे तुला कसे माहित झाले?” पॅटला स्मजेना. ती म्हणाली ” तू काय बोलतोस ते मला समजत नाही. मध्येच दाताचा डॉक्टर कुठून काढलास तू?”

मग वेन तिला मोठे आश्चर्य झाल्यासारख्या आवाजात सांगू लागला,”मी त्या डॉक्टरांच्या दखान्यातून बोलतो आहे. माझ्या मित्राचे दाताचे काही काम होते. त्याच्याबरोबर मी इथे आलो. आल्यावर मित्राने त्याच्या डॉक्टरांशी ओळख करून दिली. “डॉक्टर हा माझा मित्र वेन ब्राऊन.” ते ऐकल्यावर डॉक्टर लगेच म्हणाले,”अगोदर तुझ्या आईला फोन कर. ती काळजीत आहे तुझ्या. तिचा फोन आला होता. लगेच कर.” “आई, मला पहिल्यांदा वाटले ते माझी गंमत करताहेत. पण जेव्हा ते पुन्हा म्हणाले की तुझा फोन आला होता तेव्हा मी केला. पण हा नंबर तुला कसा माहीत झाला? मी दाताच्या डॉक्टरांकडे येणार हे तुला कुणी सांगितले ?”

आई काय सांगणार? अंदाज धक्क्याने केलेला एका ‘राँग नंबर’ वर केलेला तो फोन! कोणत्या योगायोगाने तो त्याच दातांच्या डॉक्टरांचा निघाला म्हणून सांगणार? ! वेनची आई फक्त डोळे पुसत होती.

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

Wen Morgan and Linda

“हे कोण करतेय? कुणाचा उद्योग आहे कुणास ठाऊक? पण हे रोज चालू आहे. बाजारातून सामान घेऊन स्वैपाकघराता येता येता वेन मॉर्गन चिडून म्हणत होता. शेगडीवर काही करत असलेल्या त्याच्या बायकोने म्हणजे लिंडाने विचारले,”काय झाले? कोण काय करतेय?” “अगं कोणीतरी चावटपणा करतोय. आपल्या केरकचऱ्याचे प्लास्टिकचे पिप नेमके आपल्या बेडरूमच्या खिडकीखाली आणून ठेवतो. रोज. ही कसली थट्टा?”
“रोज मी ते पिप नेहमीच्या जागी ठेवतो आणि मी पुन्हा येऊन पाहतो तर ते पुन्हा त्या खिडकीखालीच आणून ठेवलेले!””ठेवू दे ना त्याने काय एव्हढे होते ?” “एक दोनदा झाले तर मीही समजू शकतो. पण आज आठ दहा दिवस मी पाहतोय हेच चालले आहे. मी पहिल्या जागी ठेवायचे रोज आणि काही वेळातच ते पुन्हा कुणीतरी बेडरूमच्या खिडकीखाली ठेवतोय. त्रास देण्याचाच प्रकार आहे. किंवा भांडण उकरून काढायचे असेल. पण एकदा समोर येऊन कर म्हणावे, कोण असेल तो .”
” मलाही तुझे पटतेय. पण तरीही मला वाटते, इतके संतापून जाण्यासारखी फार मोठी गोष्ट नाही.” “हो. इतकी मोठी बाब नाही. पण मला हा सगळा मूर्खपाणा चाललाय असे वाटते.”
का आताही तसेच केलय का कुणी?” हो ना. मी बाजारात जाण्यापूर्वी ते पिप नेहमीच्या जागी ठेवून गेलो होतो. थोडा वेळ थांबलोही, कोणी येतेय का पाहायला. कोणी दिसले नाही. आता हातात पिशव्या होत्या म्हणून तिकडे पाहिलेही नाही मी. तसाच घरात आलोय.” “हरकत नाही. तुझा त्या निमित्ताने व्यायाम तरी होतोय थोडा!” लिंडा हसत त्याला म्हणाली. “बरं, मला थोडी कॉफी दे. मग मी जाऊन बघतो पुन्हा.”
वेनची कॉफी पिऊन झाली. बायको म्हणाली, “तुला वेळ होईल तेव्हा आपल्या बेबीच्या खिडकीचे गज घट्ट बसवशील का? ती खिडकीकडे फार जायला लागलीय सध्या, बरं का! महा दांडगोबा होत चाललीय!” लिंडा कौतुकाने संगत होती.
” अरे !” वेन एकदम मोठ्याने म्हणाला. “अगं तू मला हे आधी सांगितले नाहीस! बाहेर जाण्याआधी मी बेबीला पाळण्यातून खाली काढले होते खेळायला. बाजारात जाताना ती खिडकीही उघडी ठेवून गेलो होतो मी.!” वेन माडीवर पळत पळत जाताना ओरडतच गेला.
त्याची बायकोही त्याच्यामागे पळत गेली. खिडकीचे गज निसटून गेले होते. आणि खोलीत मुलगी नव्हती! लिंडा मटकन खालीच बसली. खिडकीतून खाली बघताना वेनच्या छातीत प्रचंड धडधड होत होती. मोठा सुस्कारा म्हणा आवाज काढत म्हणा, तोंडापुढे नमस्कारासारखा हात धरून विस्फारलेल्या डोळ्यांनी तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पाहात होता. खालून आपल्या लहान मुलीचा आवाज ऐकू येत होता. आपल्या मुलाचा आवाज कोणता बाप ओळखणार नाही?
वेन मॉर्गनला ‘चिडवण्यासाठी,’ ‘थट्टा करण्यासाठी,’किंवा ‘भांडण उकरून काढण्यासाठी’ बेडरूमच्या खिडकीखाली पुन्हा ‘कुणीतरी’ नेऊन ठेवलेल्या पिपातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लिंडा आणि वेनचा जीव की प्राण अशी ती लहान मुलगी हात पाय हलवत इकडे तिकडे बघत होती !

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

लिंडा कार्लाईल

ऊन उतरले होते. सूर्य मावळायला थोडा अवकाश होता. सावल्या लांबत होत्या. हा देखावा डिसेंबरमधील होता. म्हणजे ऊन असले काय आणि नसले काय, बरेच ढगाळ होते. बर्फ पडत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाचे डोंगर झाले होते. रस्त्याच्या बाजूची बरीच घरे दिसतही नव्हती एव्हढा बर्फच बर्फ दोन्ही बाजूला झाला होता.त्यामुळे शाळेकडे जाणारा मैल दीड मैलाचा रस्ता जास्तच अरुंद झाला होता. लिंडाच्या ओहायो मधल्या लहानशा गावाचे हे तीस वर्षापूर्वीचे चित्र आहे.

कमरेच्या पट्ट्यात फ्लूट खोवून सतरा वर्षाची लिंडा बर्फातून चालली होती. बॅन्डचा सराव सुरू झाला असेल या काळजीने भरभर जायचा प्रयत्न करीत होती. पण ते अशक्य होते. ती आपल्याच नादात चालली होती. तिच्या बाजूने एक भला दांडगा कुत्राही चालतोय तिकडे तिचे लक्षही नव्हते.आपल्या कंबरेला काय घासतेय पाहण्यासाठी तिने बाजूला पाहिले तर तो राक्षसी कुत्रा! तिला खेटून चाला होता कारण रस्ताच इतका अरुंद होता. ती त्याच्याकडे रागाने, घाबरून, बाजूला होत मोठ्याने ओरडली. जा, जा, जा इथून असे ओरडली. कुत्र्ऱ्यावर काहीही परिणाम झाला नाही. तो तिच्या बाजूने चालतच राहिला. तिने थोडा वेग वाढवला, त्यानेही वाढवला. शेवटी दुर्लक्ष केले. येऊ दे म्हणत चालत राहिली. किंचित वळणावर बर्फाच्या प्रचंड ढिगाऱ्यामागून एकदम एक धटिंगण आला आणि लिंडाच्या अंगावर येऊ लागला. तो माणूस तिच्या अंगचटीला येऊ लागला तसे ती ओरडू लागली.माणूस काही हटेना. त्या थंडीतही लिंडाला घाम फुटला. ती त्याला ढकलू लागली. पण उपयोग होईना. तो माणूस एकदम जोरात किंचाळला. त्या कुत्र्ऱ्याच्या प्रचंड धूडाने त्याच्यावर झेप घेतली होती. खाली लोळवले आणि त्याच्या पिंडरीचा कडकडून चावा घेतला होता. कशीबशी सुटका करून घेऊन तो गुंड पळाला.
लिंडाची छाती धडधडत होती. तोंडावर हात ठेवून मुसमुसत होती. कुत्र्ऱ्याकडे किती कृतज्ञतेने ती पाहात होती. दोघेही आता जोडीने निघाले. लिंडाने आपला हात त्याच्या पाठीवरच ठेवला होता. तिच्या कमरेपेक्षाही उंच असललेला तो कुत्रा शाळेपर्यंत आला.
शाळेचे मुख्य फाटक बंद होते. लिंडा मागच्या बाजूने निघाली. कुत्राही तिच्या सोबत निघाला. तिने मागचा दरवाजा जोराने खडखडावला . बँडमधल्या एका मुलीने दरवाजा उघडला. लिंडाचा चेहरा, एकंदर अवतार पाहून तिने लिंडाला काय झाले म्हणून विचारले. लिंडा घडलेले सांगू लागली आणि म्हणाली,” ह्या कुत्र्ऱ्याने मला वाचवले. माझ्या मागेच उभा आहे, तो पाहा,” असे म्हणत त्या दोघी मागे पाहू लागल्या.
तिथे कोणीही नव्हते!

आईचे ऐकले आणि…

कुठे लांब जरी जायचे असले तरी मी कधी टॅक्सी करत नाही. सप्टेंबर १९९७ मधील त्या दिवशी मात्र मल टॅक्सी कराणे भागच पडले. कारण त्या दिवशी मॅनहॅटनम्ध्ये इतका मुसळधार पाऊस पडत होता,सांगता सोय नाही. सारखा मुसळधार पाऊस कोसळत होता.मी छत्री रेनकोट काहीच बरोबर घेतले नव्हते.टॅक्सी करण्याशिवाय इलाज नव्हता.इंटरव्ह्युला जाताना असे ओलेचिंब आणि पाण्याने निथळत जाणे कसे शक्य आहे. टॅक्सीत बसले. मला तो सोन्याचा तोडा दिसला! उचलून घेण्याचा मोह आवरता आला नाही. नुसते सोन्याचे कडे नव्हते. हिरे जडीत चमचम करणारा तो गोठ होता. हिरेही अस्सल आणि सोने तर अतिशय शुद्ध.मी काही रत्नपारखी किंवा सराफ नव्हते तरी कुणालाही तो खरा आहे इतके नक्कीच समजले असते.

असा भारी आणि मौल्यवान दागिना मला हवा हवासा वाटत होता.पण आम्ही दोघेही’नुकतेच’होतो. लग्न’ इतक्यातच’ होणार होते,होणाऱ्या नवऱ्याला साधी नोकरी का होईना’नुकतीच’ लागली होती आणि मी नोकरीसाठी मुलाखतीला ‘नुकतीच’ निघाले होते. असला दागिना आम्ही केव्हा घेऊ शकणार होतो. किती वर्षे काढावी लागणार होती कुणास ठाऊक. माझ्या अगोदर बसलेल्या कुणा बाईचा निसटून पडला असला पाहिजे. मला तो फारच आवडला होता. तरीही मी ड्रायव्हरला, सांगायचे ठरवले. “अहो,हे पाहा “इतके मोठ्याने म्हणाल्याबरोबर ड्रायव्हरने मधले पार्टिशन बाजूला करून ,” काय पाहा म्हणालात?” असे विचारले. माझा विचार बदलला आणि मी “काही नाही,हा पाऊस पाहा, थांबतच नाही” असे म्हणत होते.

मी त्याला तो इतका भारी अलंकार दाखवला असता तर तो त्याने कशावरून त्या बाईला दिला असता? किंवा पोलिसात जमा केला असता ह्याची काय खात्री? त्याला का तो मिळाव? शिवाय ज्युडीच्या भावाचा साखरपुडा येता शनिवारी आहे. ज्युडीची आई तर नेहमी दागिन्याने मढलेली असते. त्या दिवशी तर ती निथळत असेल्! एकदा तरी तिने मला असा झगमगणारा,अस्सल दागिना घातलेली बघावे असे मला वाटत होते. हा गोठ पाहिल्यावर ती दिपूनच जाईल!
मी तो गोठ माझ्या पर्समध्ये टाकला! मी जे केले त्याचा मला खंत ना खेद होता. माझे मनही मला खात नव्हते. मी काही चूक केलीय अपराध केलाय असेही वाटत नव्हते.शहरातल्या सत्तर लाख लोकांतून मी त्या दागिन्याच्या मालकाला कुठे आणि कसे शोधणार?

पण घरी आल्यावर आईला तो दागिना दाखवून सांगितल्यावर ती रागाने लालबुंद झाली. काय म्हणावे मला हे तिला सुचेना. पण गप्प झाली. आणि अतिशय खिन्न होउन, कठोरपणे ती म्हणाली,” तुझ्या वागण्याने मला काय झाले ते तुला समजणार नाही. धक्काच बसलाय म्ह्टले तरी ते तुला कळणार नाही. मला वाटत होते की माझ्या मुलांना मी चांगले वळण लावलेय. प्रमाणिकपणे वागावे. दुसऱ्याचे काहीही आपण घेऊ नये. जे आपले नाही त्याच्याकडे ढुंकुनही पाहू नये; मग ती वस्तु घेणे तर लांबच राहिले; ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या असे मला वाटत होते. आणि तुम्हीही तसे वागत असाल असे वाटत होते. आज माझा भ्रमनिरास झाला. अगं तू हे असं करूच कसं शकलीस?”

“आई, मी तो टॅक्सी ड्रायव्हरला दिला असता तर त्यानेच हडपला असता. मग मी काय करणार होते?” “अगं तो त्या टॅक्सीच्या कंपनीत नेऊन द्यायचा होतास.किंवा टॅक्सी आणि लिमोझिन कमिशनरच्या ऑफिसमध्ये नेऊन द्यायचास. त्यांनी दागिन्याच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना परत केला असता. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता जाऊन परत करून ये.”
” आई, मी फक्त ज्युडीच्या भावाच्या साखरपुड्या दिवशी घालून जाते आणि लगेच तो नेऊन देते. नक्की. खरं आई.” “आत्ताच्या आत्ता.” आई प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली.

क्वीन्स हॉलम्ध्ये साखरपुड्याला जाताना माझी मनस्थिती कशी होती ते सांगता येणार नाही. जुडीच्या घरातल्या सगळ्याजणी दगिन्यांनी नटून थटून येणार . मी तो गोठ घातला असता आज तर मीही जरा ताठ मानेने आले असते. असे काही तरी विचार डोक्यात घेऊन मी आले. मी जुडी, तिचा भाऊ अणि त्याची वाग्दत्त वधू यांना जाऊन भेटले.छान मोकळेपणाने गप्पा मारल्या. आम्ही हसलो, खिदळलो. पण ज्युडीच्या आईकडे मात्र केवळ औपचारिकपणे गेले आणि तिला भेटण्यासाठी मी हात पुढे केला. राणीच्या रुबाबात आणि डौलाने तिने हात पुढे केला.मी तिचा हात हातात घेतला. त्याच वेळी मी तो शाही आणि अप्रतिम गोठ तिच्या हातात पाहिला!

तोच तो, हिऱ्यांने जडवलेला सोन्याचा, मला टॅक्सीत मिळालेला गोठ! पण मला पुन्हा शंका आली. मी ज्युडीला बाजूला घेऊन तिच्या हातातला गोठ किती सुरेख आहे असे म्हणाले. कुठून, केव्हा घेतला? असे हळूच कौतुकाने विचारले. जुडी मोठ्या अभिमानाने सांगू लागली,”अगं हा असा एकच गोठ आहे. माझ्या आईच्या मैत्रिणीच्या सराफाने खास तिच्यासाठी घडवून दिला आहे. हा असा एकच एक तोडा आहे. आईला तो फार आवडतो. मागच्या आठवड्यात एका टॅक्सीत ती, तो विसरली. तेव्हापासून तिचे मन थाऱ्यावर नव्हते. कशातच ती लक्ष देईना. तिने त्याची आशाच सोडून दिली होती. पण बरे झाले देवा! कुणीतरी प्रामाणिकपणे हा गोठ कमिशनरच्या ऑफिसमध्ये नेऊन दिला म्हणून आम्हाला तो परत मिळाला. तो आज घालायला नसता तर तिचे काय झाले असते ते आम्हालाच माहित. त्या प्रामाणिक माणसामुळे आज आम्ही आनंदात आहोत! त्याचा खरा मोठेपणा!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

एक चूक…

स्वत:च्या उद्योगातून रिचर्ड फ्लेमिंग निवृत्त झाले होते. ते कामाची कागदपत्रे चाळत होते. तेव्हढ्यात फोन आला. “मि. फ्लेमिंग?” एका स्त्रीने सौम्य आणि मृदु आवाजात विचारले; पुढे म्हणाली,” मी डॉक्टर ब्राऊन यांची सेक्रेटरी लॉरेन बोलतेय. उद्या तुमची डॉक्टरांकडे अपॉइंटमेन्ट आहे त्याची आठवण करून देण्यासाठी आणि तुम्ही येणार याची खात्री करून घेण्यासाठी फोन केला””माझी उद्या अपॉइंटमेंट? डॉक्टर ब्रॉऊनकडे? आपल्या बायकोकडे पाहात फ्लेमिंग म्हणाले. “काय आहे? कुणाचा फोन आहे?”बायकोने अगदी हळू आवाजात विचारले. फोन थोडा बाजूला धरून,गोंधळून गेलेले फ्लेमिंग बायकोला विचारत होते,” मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती? विसरलो की काय?”

डॉक्टर ब्राऊनकडे सहा महिन्यापूर्वी ते गेले होते. सगळ्या तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी सगळे ठीक आहे. काळजीचे कारण नाही असेही सांगितले होते. पण सहा महिन्यानंतर पुन्हा भेटा असे ते काही म्हणाल्याचे आठवत नव्हते. ते त्या सेक्रेटरीला म्हणाले, ” दोन मिनिट हां,प्लीझ !” इतके म्हणत ते आपली डायरी काढून उद्याची अपॉइंटमेंट आहे का पाहत होते. दिसली नाही. “नाही, लिहिलेली नाही. मला अल्झामेअर होतोय की काय?असे ते बायकोला हळूच म्हणत होते. ” माझी अपॉइंटमेन्ट खरीच आहे, नक्की?” त्यांनी सेक्रेटरीला विचारले. “तुम्हीच रिचर्ड फ्लेमिंग ना?” त्या बाईच्या आवाजात आता थोडा त्रागा आणि करडेपणा होता. “हो, अर्थात मीच रिचर्ड फ्लेमिंग.” फ्लेमिंगनी नरमाईने सांगितले. “हे बघा फ्लेमिंग, माझ्याकडे तुमची नऊ वाजताची अपॉइंटमेंट लिहून ठेवलेली आहे.” “लॉरेन, खरं सांगायचे म्हणजे, अशी अपॉइंटमेंट घेतल्याचे मला तरी आठवत नाही,” कबूली दिल्यासारखे ते बोलत होते.” हे बघा मि. फ्लेमिंग,” तिच्या आवाजातला पहिला गोडवा अणि सौम्यपणा कुठच्या कुठे गेला होता, ती मोठ्या आवाजात बोलत होती, “न्यूयॉर्कमध्ये ज्या डॉक्टरांकडे पेशंटची गर्दी असते आणि महिना महिना अगोदर नंबर लावावा लागतो अशा प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टरांपैकी डॉ.ब्राऊन आहेत. माझ्याकडे बरेच पेशंट त्यांचा नंबर कधी लागेल याची वाट पाहत आहेत. तुम्हाला उद्या यायचे नसेल तर तसे आताच मला सांगा. इथे खूप गर्दी आहे. ताबडतोब सांगा. वेळ नाही.” “काय करू? बायकोला ते विचारत होते. अपॉइंटमेंट असेल तर जा.” बायको तरी दुसरे काय सांगणार? ” बराय, मी उद्या येतो,” रिचरड फ्लेमिंग अखेर कबूल झाले.”ठीक आहे, उद्या या तुम्ही. बऱ्याच चाचण्या कराव्या लागतील, तुम्हाला माहितच आहे. काळजी नका करू. आराम करा आज.” बाईच्या आवाजात पुन्हा व्यावसायिक गोडवा आला होता.
पण रिचर्ड फ्लेमिंगचे चित्त काही ताळ्यावर नव्हते. दिवसभर ते आपण अपॉइंटमेंट कशी विसरलो, हे अल्झायमरचेच लक्षण असणार, आपल्या एका मित्राला असेच होत होते आणि परवा त्याचे तेच निदान झाले हे त्यांना माहित होते. काहीही व्हावे पण तो अल्झायमर नको असे ते स्वत:शीच प्रार्थना केलासारखे बोलत होते. उद्या डॉक्टरांना हेही विचारून घेऊ असे त्यांनी ठरवले.
दुसरे दिवशी सकाळपासून त्यांच्या बऱ्याच चाचण्या आणि तपासण्या झाल्या. रिचर्डच्या मनात, हे झाले की डॉ. ब्राऊनना अल्झामेअरचे विचारायचे हेच होते. त्यांचे सगळे रिपोर्ट्स डॉ. ब्राऊन वाचत होते, बऱ्याच विचारात असल्यासारखे ते दिसत होते. काही वेळाने ते रिचर्ड फ्लेमिंगकडे आले आणि एकदम म्हणाले,”अगदी वेळेवर आलात तुम्ही मि.फ्लेमिंग. तुमचे नशीब चांगले की आज तुमची अपॉइंटमेंट होती ते ! तुमच्या रिपोर्ट्स वरून तुम्हाला लवकरात लवकर हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल. तुमचे रिपोर्ट्स मी तज्ञ सर्जनकडे पाठवतो. ते तुम्हाला नक्की दिवस सांगतील. पण बरे झाले तुम्ही आज आलात ते,नाही तर फार गंभीर परिस्थिती झाली असती.”
डॉक्टरांचे आणि रिचर्ड फ्लेमिंगचे बोलणे चालले असताना बाहेर ऑफिसमध्ये सेक्रेटरीच्या टेबलापाशी एकाजण तावातावाने,” रिचर्ड फ्लेमिंग आधीच आत डॉक्टरांच्या खोलीत आहे अस्ं कसे काय म्हणता? अहो,हा मी रिचर्ड फ्लेमिंग हा तुमच्या समोर आहे.” सांगत होता. शेजारी उभी असलेली नर्स्, तिला आपण हळू बोलतोय असे वाटत होते,ती म्हणत होती,”हल्ली डॉक्टरांकडे नंबर लावण्यासाठी लोक काय काय सोंग्ं करतील नेम नाही.” पण ते त्या माणसाने ऐकले असावे. तो लगेच उसळून, आपल्या खिशातून एक एक करत कागदपत्रे काढत म्हणाला, ” हे पहा माझे ड्रायव्हिंग लायसन्स, ही माझी क्रेडिट कार्डं,”असे चिडून म्हणत ते सगळे पुरावे त्याने टेबलावर टाकले. “पाहा, ह्या पेक्षा, मीच रिचर्ड फ्लेमिंग आहे ह्याचा दुसरा पुरावा काय पाहिजे?” “आणखी हे पाहा, तुम्हीच मला दिलेले तुमचे अपॉइंटमेंटचे हे कार्ड, बोला आता! आत कोण रिचर्ड फ्लेमिंग म्हणून घुसला आहे ते पाहा”
सेक्रेटरीने आपल्या कपाटातून काही फाईली काढल्या. आणि तिला रिचर्ड फ्लेमिंग नावाच्या दोन फाईली दिसल्या. एक रिचर्ड होता मॅनहॅटनचा. तोच संतापाने बाहेर ओरडत होता.
दुसरा रिचर्ड फ्लेमिंग ब्रुकलिनचा. तो आत डॉक्टरांकडे होता. त्याच्या गंभीर हृदयविकाराचे निदान आताच झाले होते !
सेक्रेटरीने चुकीने ब्रुकलीनच्या फ्लेमिंगला फोन करून आठवण करून दिली ! पण तिच्या त्या एका चुकीने, चुकीच्या असू दे पण आवश्यक होते त्या रिचर्ड फ्लेमिंगचे रोगनिदान वेळेवर झाले. त्याचे प्राण वाचले!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

एक चूक…

स्वत:च्या उद्योगातून रिचर्ड फ्लेमिंग निवृत्त झाले होते. ते कामाची कागदपत्रे चाळत होते. तेव्हढ्यात फोन आला. “मि. फ्लेमिंग?” एका स्त्रीने सौम्य आणि मृदु आवाजात विचारले; पुढे म्हणाली,” मी डॉक्टर ब्राऊन यांची सेक्रेटरी लॉरेन बोलतेय. उद्या तुमची डॉक्टरांकडे अपॉइंटमेन्ट आहे त्याची आठवण करून देण्यासाठी आणि तुम्ही येणार याची खात्री करून घेण्यासाठी फोन केला””माझी उद्या अपॉइंटमेंट? डॉक्टर ब्रॉऊनकडे? आपल्या बायकोकडे पाहात फ्लेमिंग म्हणाले. “काय आहे? कुणाचा फोन आहे?”बायकोने अगदी हळू आवाजात विचारले. फोन थोडा बाजूला धरून,गोंधळून गेलेले फ्लेमिंग बायकोला विचारत होते,” मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती? विसरलो की काय?”

डॉक्टर ब्राऊनकडे सहा महिन्यापूर्वी ते गेले होते. सगळ्या तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी सगळे ठीक आहे. काळजीचे कारण नाही असेही सांगितले होते. पण सहा महिन्यानंतर पुन्हा भेटा असे ते काही म्हणाल्याचे आठवत नव्हते. ते त्या सेक्रेटरीला म्हणाले, ” दोन मिनिट हां,प्लीझ !” इतके म्हणत ते आपली डायरी काढून उद्याची अपॉइंटमेंट आहे का पाहत होते. दिसली नाही. “नाही, लिहिलेली नाही. मला अल्झामेअर होतोय की काय?असे ते बायकोला हळूच म्हणत होते. ” माझी अपॉइंटमेन्ट खरीच आहे, नक्की?” त्यांनी सेक्रेटरीला विचारले. “तुम्हीच रिचर्ड फ्लेमिंग ना?” त्या बाईच्या आवाजात आता थोडा त्रागा आणि करडेपणा होता. “हो, अर्थात मीच रिचर्ड फ्लेमिंग.” फ्लेमिंगनी नरमाईने सांगितले. “हे बघा फ्लेमिंग, माझ्याकडे तुमची नऊ वाजताची अपॉइंटमेंट लिहून ठेवलेली आहे.” “लॉरेन, खरं सांगायचे म्हणजे, अशी अपॉइंटमेंट घेतल्याचे मला तरी आठवत नाही,” कबूली दिल्यासारखे ते बोलत होते.” हे बघा मि. फ्लेमिंग,” तिच्या आवाजातला पहिला गोडवा अणि सौम्यपणा कुठच्या कुठे गेला होता, ती मोठ्या आवाजात बोलत होती, “न्यूयॉर्कमध्ये ज्या डॉक्टरांकडे पेशंटची गर्दी असते आणि महिना महिना अगोदर नंबर लावावा लागतो अशा प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टरांपैकी डॉ.ब्राऊन आहेत. माझ्याकडे बरेच पेशंट त्यांचा नंबर कधी लागेल याची वाट पाहत आहेत. तुम्हाला उद्या यायचे नसेल तर तसे आताच मला सांगा. इथे खूप गर्दी आहे. ताबडतोब सांगा. वेळ नाही.” “काय करू? बायकोला ते विचारत होते. अपॉइंटमेंट असेल तर जा.” बायको तरी दुसरे काय सांगणार? ” बराय, मी उद्या येतो,” रिचरड फ्लेमिंग अखेर कबूल झाले.”ठीक आहे, उद्या या तुम्ही. बऱ्याच चाचण्या कराव्या लागतील, तुम्हाला माहितच आहे. काळजी नका करू. आराम करा आज.” बाईच्या आवाजात पुन्हा व्यावसायिक गोडवा आला होता.
पण रिचर्ड फ्लेमिंगचे चित्त काही ताळ्यावर नव्हते. दिवसभर ते आपण अपॉइंटमेंट कशी विसरलो, हे अल्झायमरचेच लक्षण असणार, आपल्या एका मित्राला असेच होत होते आणि परवा त्याचे तेच निदान झाले हे त्यांना माहित होते. काहीही व्हावे पण तो अल्झायमर नको असे ते स्वत:शीच प्रार्थना केलासारखे बोलत होते. उद्या डॉक्टरांना हेही विचारून घेऊ असे त्यांनी ठरवले.

दुसरे दिवशी सकाळपासून त्यांच्या बऱ्याच चाचण्या आणि तपासण्या झाल्या. रिचर्डच्या मनात, हे झाले की डॉ. ब्राऊनना अल्झामेअरचे विचारायचे हेच होते. त्यांचे सगळे रिपोर्ट्स डॉ. ब्राऊन वाचत होते, बऱ्याच विचारात असल्यासारखे ते दिसत होते. काही वेळाने ते रिचर्ड फ्लेमिंगकडे आले आणि एकदम म्हणाले,”अगदी वेळेवर आलात तुम्ही मि.फ्लेमिंग. तुमचे नशीब चांगले की आज तुमची अपॉइंटमेंट होती ते ! तुमच्या रिपोर्ट्स वरून तुम्हाला लवकरात लवकर हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल. तुमचे रिपोर्ट्स मी तज्ञ सर्जनकडे पाठवतो. ते तुम्हाला नक्की दिवस सांगतील. पण बरे झाले तुम्ही आज आलात ते,नाही तर फार गंभीर परिस्थिती झाली असती.”

डॉक्टरांचे आणि रिचर्ड फ्लेमिंगचे बोलणे चालले असताना बाहेर ऑफिसमध्ये सेक्रेटरीच्या टेबलापाशी एकाजण तावातावाने,” रिचर्ड फ्लेमिंग आधीच आत डॉक्टरांच्या खोलीत आहे अस्ं कसे काय म्हणता? अहो,हा मी रिचर्ड फ्लेमिंग हा तुमच्या समोर आहे.” सांगत होता. शेजारी उभी असलेली नर्स्, तिला आपण हळू बोलतोय असे वाटत होते,ती म्हणत होती,”हल्ली डॉक्टरांकडे नंबर लावण्यासाठी लोक काय काय सोंग्ं करतील नेम नाही.” पण ते त्या माणसाने ऐकले असावे. तो लगेच उसळून, आपल्या खिशातून एक एक करत कागदपत्रे काढत म्हणाला, ” हे पहा माझे ड्रायव्हिंग लायसन्स, ही माझी क्रेडिट कार्डं,”असे चिडून म्हणत ते सगळे पुरावे त्याने टेबलावर टाकले. “पाहा, ह्या पेक्षा, मीच रिचर्ड फ्लेमिंग आहे ह्याचा दुसरा पुरावा काय पाहिजे?” “आणखी हे पाहा, तुम्हीच मला दिलेले तुमचे अपॉइंटमेंटचे हे कार्ड, बोला आता! आत कोण रिचर्ड फ्लेमिंग म्हणून घुसला आहे ते पाहा”

सेक्रेटरीने आपल्या कपाटातून काही फाईली काढल्या. आणि तिला रिचर्ड फ्लेमिंग नावाच्या दोन फाईली दिसल्या. एक रिचर्ड होता मॅनहॅटनचा. तोच संतापाने बाहेर ओरडत होता.
दुसरा रिचर्ड फ्लेमिंग ब्रुकलिनचा. तो आत डॉक्टरांकडे होता. त्याच्या गंभीर हृदयविकाराचे निदान आताच झाले होते!

सेक्रेटरीने चुकीने ब्रुकलीनच्या फ्लेमिंगला फोन करून आठवण करून दिली ! पण तिच्या त्या एका चुकीने, चुकीच्या असू दे पण आवश्यक होते त्या रिचर्ड फ्लेमिंगचे रोगनिदान वेळेवर झाले. त्याचे प्राण वाचले!