अमेरिकन मी होणार ! झालोच!

रेडवुड सिटी

१९५६ साली बी.एस्सीची परिक्षा दिली. पास होईन का नाही हीच धागधुग होती. मला आणि माझ्या प्रोफेसरांनाही. काहींना तर खात्री होती; मी पास होणार नाही ह्याची. पण अखेर पास झालो. त्यानंतर कानाला खडा लावला की झाली-दिली ही परीक्षा शेवटची.

नोकरीसाठी अर्ज करायला सुरवात केली. काळ बेकारीचा होता. सर्वच अर्जांना होकार आले नाहीत. पत्रिका पाहूनच मुलगी नापसंत ठरावी तसे अर्जाच्या पहिल्या फेरीतच मी गारद व्हायचो. पण दोन तीन ठिकाणी माझ्यासाठी मुलाखतीतूनच नोकरीच्या पायघड्या घातल्या होत्या. पण मी त्यांना नकार देत होतो.हे झाले. पण माझा निश्चय मी पाळला होता. ज्या नोकऱ्यांसाठी अगोदर लेखी परीक्षा असे तिथे मी कधी गेलो नाही. पण नंतरचे कलेक्टर,परराष्ट्र अधिकारी,वन अधिकारी (कांन्झरव्हेटर) , मुख्याधिकारी पाहिल्यावर आपणही ह्या परीक्षा द्यायला हरकत नव्हती असे वाटले. आता निवृत्त होऊनही किती तरी-पंचवीस-वर्ष झाली.
पण परवा मात्र मला तोंडी व अंशात्मक लेखी परीक्षा माझा नियम मोडून द्यावी लागली. तरी बरं लेखी परीक्षा एका ओळीची होती.

इतर वाचन चालू असले तरी परीक्षेच्या पुस्तकांचे म्हणजे गाईड्सचे माझे वाचन कधीच बंद पडले होते. त्यामुळे अमेरिकन नागरिकत्वासाठी पूर्व तयारीसाठी एक पुस्तक होते ते वाचायला सुरवात केली. बरं हे पाठ्यपुस्तक माझ्यासाठीच तयार केले असावे. कारण प्रश्नांची उत्तरे लगेच त्या खालीच दिली होती. मग मी का ते वाचणार नाही? हे इतके चांगले गाईड परिक्षकानेच दिल्याच्या आनंदात त्यातली शंभर प्रश्नोत्तरे मी दिवसातून एकदा रोज वाचू लागलो. देवाचा नित्यनेम इतक्या मनापासून केला असता तर रोज दहा वेळा,देवाने प्रत्यक्ष दर्शन दिले असते!

बरं नुसते मी स्वत: वाचून स्वस्थ बसणाऱा विद्यार्थी नव्हतो. रोज मी घरातील कुणाला तरी पकडायचो व त्या पुस्तकातील प्रश्न मला विचारून त्यांना मी माझी परीक्षा घेणे भाग पाडू लागलो. प्रथम सगळेजण सौजन्य म्हणून बळी पडले माझ्या विनंतीवजा हट्टाला. पण नंतर प्रत्येक जण मी त्या पुस्तकात बोट घालून हाका मारत येताना दिसलो की काही तरी निमित्त काढून कुठेतरी गायब होत. मला टाळण्यासाठी सर्वांनी तीन तीनदा आंघोळी करायला सुरवात केली. जणू जुलाब होताहेत म्हणून पटापट संडासात जाऊन दडून बसू लागले. घरात सगळ्या वस्तु असल्या तरी दिवसातून चार पाच वेळा बाजारात जात. काही नाही तरी दातकोरणीच्या काड्यासाठी जाऊ लागले. तास न् तास बाहेरच असत. कामाला गेलेले तर तीन तीन चार चार दिवस आॅफिसातच राहात. शाळा काॅलेजात जाणारे सुद्धा आज हा क्लास आहे,त्याचा तो क्लास आहे हे निमित्त सांगून हाॅस्टेलात कुणाच्या तरी खोलीत पडून राहात. टेनिसच्या क्लासचे, आज आमची स्पर्धा आहे, अंतिम सामना आहे असे सांगून बारा बारा तास तो सामना खेळत! विम्बल्डन वगैरेच्या अनेक खेळाडूंचे वेळेचे विक्रम त्यांनी मोडीत काढले. अशावेळी माझा मीच प्रश्न वाचून पुस्तक बंद करून उत्तरे देऊ लागलो. कुणी सापडलाच चुकुन माकून तर मी त्याच्याकडून माझी शंभर प्रश्नांची तीन वेळा उजळणी करून घ्यायला लावत असे ! कुणाशी बोलणे म्हणजे ती प्रश्नोत्तरेच मी म्हणत असे. त्यामुळे माझ्या वाऱ्यालाही कोणी उभे राहिनासे झाले. बरं इथे अमेरिकेतच असल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याला अशी काही विनंती करण्याचीही सोय नाही. स्वावलंबन हाच उपाय मी चालू ठेवला. तरीही दया येऊन, अखेरच्या काही दिवसात माझ्या तिन्ही नातींनी व मुलाने मला पुष्कळच मदत केली.

परीक्षेचा दिवस आला. पहिले आश्चर्य घडले.नातीने लावलेला गजर होण्या आत मी पहाटे पाच वाजता उठलो. कित्येक वर्षांनी,पहाट कशाला म्हणतात आणि ती कशी असते ह्या प्रश्नांच्या उत्तरानेच दिवस सुरु झाला!
“नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तासच आधी येणे” अशी तंबी परीक्षेच्या आमंत्रण-पत्रातच दिली होती. पण सावधगिरी म्हणून आम्ही बरेच आधी पोचलो होतो. त्यामुळे धावपट्टीवरील गर्दीमुळे नेमके आपलेच विमान त्या तळा भोवती दिवसभर घिरट्या घालते त्याप्रमाणे आम्हीही रस्ते ओलांडत एका हाॅटेलात काॅफी पित वेळ काढत बसलो. योग्य वेळी दरवाजापाशी दोन तीन जणांच्या रांगेत उभे राहिलो. चेहरा हसतमुख ठेवा ही सगळ्यांची सूचना मी काटेकोरपणे पाळत होतो. द्वारपालाकडे तो शतजन्मीचा दोस्त आहे ह्या भावनेने मी त्याच्याकडे पाहून हसत होतो. तो एकदा माझ्या कडे व पासपोर्टमधील फोटोकडे वारंवार पाहून ‘ तो हाच का कोण येडपट आहे’ ह्या नजरेने माझ्याकडे पाहात होता. काय झाले कुणास ठाऊक! तो”कामाटकार “ Isn’t it? “म्हणत हसू लागला. मी तर हसतच होतोआता सतीशही हसत हसत हो म्हणाल्यावर त्याने आनंदाने दार उघडून आम्हाला आत सोडले.
अमेरिकेत सर्व तपशील एकदम अचूक ठेवतात व कळवतात, त्याचा प्रत्यय येत होता. माझ्यापत्रात A काउंटर सांगितलेच होते. तिथे ठळकपणे तो काउंटर दिसत होता. माझे नाव गाव विचारले. फोटो काढला. पुढे वळून Aवेटिंग हाॅल मध्ये थांबायला सांगितले.

आता परिक्षेच्या हाॅलमध्ये आल्यासारखे वाटायला लागले. माझ्यासह आणखी दोघे तिघे होते. फक्त मीच ताणतणावात होतो. हातात पासपोर्ट आणि एकदोन पुरावे धरून होतो. हात पाय बोटे काहीही थरथरत नव्हती. पण शंभर अधिक उठल्याबरोबरचे पहाट म्हणजे काय? ती कशी असते ह्या दोन अशा एकूण एकऱ्शे दोन उत्तरांचा जप चालू होता. पूर्वी उजळणी म्हणत होतो. पण वयामुळे आपोआप आध्यात्मिक झाल्यामुळे ‘जप’ म्हणालो. अध्यात्म संपले व आतून माझी परीक्षा घेणारी बाईच ओठ,तोंड वेडे वाकडे करत ‘शॅढॅसिव’? म्हणत माझ्याकडे पाहात आली!
आत जाऊ लागलो. सतीश “काही टेन्शन घेऊ नका बाबा,all the best”वगैरे म्हणाला. मी मान हलवून आत गेलो.
बोलवायला आलेली बाईच परीक्षक होती. माझी जन्म तारीख,मी राहतो तो घरचा पत्ता विचारला. सांगितला. अगोदर इंग्रजी वाचनाची परीक्षा घेतली. माझी! तुम्हालाही प्रश्न पडला असणार इतका वाचणारा मी,माझी वाचनाची परिक्षा?माझी? काय करणार मी तरी. डोळ्यांच्या डाॅक्टरांकडे तक्त्यात असतात तेव्हढ्या ढब्बू अक्षरांतील तीन वाक्ये पुढे ठेवली.मी माझ्या स्पष्ट शब्दोच्चारात पहिले वाक्य खणखणीतआवाजात वाचून दाखवले. सिनेटर किती असतात असे ते प्रश्नार्थक वाक्य होते. ते मी त्याच प्रश्नार्थक भावाने,प्रश्नार्थक आवाजात त्या बाईंकडे पाहात वाचले. तेही टेबलावर पुढे झुकून. बाई गांगरल्या. आणि घाबरत त्यांनीच ,”One Hundred” असे बरोब्बर उत्तर दिले! मी सुद्धा बावरलो. बरोबर या अर्थी मी फक्त मान हलवली!आता पुढचा प्रश्न मी काय विचारणार म्हणून बाईच सावरून बसल्या! माझी वाचनाची परीक्षा संपली,एका वाक्यात!
नंतर मला इंग्रजी लिहिता येते का ह्याची चाचणी झाली.

बाईं सांगतील ते मी लिहायचे अशी ती चाचणी होती. बाईंनी There are one hundred senators हे मगाचे उत्तरच मला लिहायला सांगितले.सोप्पे !असे म्हणत मी ते सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिले. झाली लिहिण्याची परीक्षा. अरे ही तर एका वाक्यांचीच परीक्षा दिसतेय असे वाटलें. बाईं मला इंग्रजी समजते का ह्याचीपरीक्षा दहा प्रश्नांच्या उत्तरांवरून ठरवणार होत्या. त्यातही त्यांनी विचारलेल्या पहिल्या सहा प्रश्नांची उत्तरे मी जर बरोबर दिली तर ती परीक्षा तिथेच संपणार होती. म्हणजे मी इंग्रजीत हुषार हे नक्की होणार होते. मनात म्हणालो मी तर शंभर उत्तरांचा अभ्यास पक्का करून आलोय. विचारा कसेही उलट सुलट, कोणत्याही क्रमाने. माझ्या इथल्या दोन आणि पुण्याच्या एका नातीने ‘सारेग रेगम गरेमग गरमा गरम’ अशा प्रचंड उलथापालथी करून माझी तयारी करवून घेतली आहे. पहिलाच प्रश्न,” राष्ट्रगीताचे बोल काय आहेत?” हा होता. तिघींनीही हा प्रश्न मला नेहमी शेवटी विचारला होता. माझ्या अभ्यासाची सांगता त्या राष्ट्रगीताच्या प्रश्नाने करीत. त्यामुळे पहिला प्रश्न हा असणारच नाही या खात्रीने क्षणभर वाचा बंद पडून गप्प होतो. पण जाऊ द्या बाईंनी परीक्षेची सुरवात राष्ट्रगीताने केली अशी मीच माझी समजूत घालून उत्तर बरोबर दिले. चला,”कोन बनेगा नागरिक?”स्पर्धेतील पहिला एक हजाराचा प्रश्न मी सोडवला.

मग ‘झेंड्यावर तेराच पट्टे का आहेत’ हा प्रश्न विचारला. त्याचे खरे उत्तर ‘ कारण झेंड्यावर तेव्हढीच जागा होती’ हे आहे.पण मी मात्र अभ्यास केलेले उत्तरच दिले.त्यानंतर दोन तीन प्रश्नांचीही उत्तरे बरोबर दिल्यावर What is the rule of the law ? ह्या प्रश्नाला तर मी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेतील भाषणाच्या स्टाईलने बुबळे वर करून छताकडे पाहात उत्तर देऊ लागलो. उत्तर सविस्तर देत होतो. बुबळे अजूनही छताकडेच लागलेली. माझी ती खेचर मुद्रा पाहून रामदेवबाबाही खुष होऊन त्यांचा तो प्रख्यात कायम मिटलेलाच एक डोळा पुन्हा मारत,दाढीतून कौतुकाने माझ्याकडे हसत पाहात राहिले असते. पण ह्या बाई मात्र माझे ते भेसूर रूप पाहून ‘नऊशे अकराला’फोन करताना जी स्थिती होते तशी होऊन धडधडत्या छातीवर हात ठेवून पुढचा प्रश्न विचारु लागल्या. पण अनुभवाने त्या शाहाण्या न होता गडबडीत त्यांनी नको तो पुढचा प्रश्न विचारला. तो होता “११ सप्टेंबर २००१ रोजी काय घडले? “ अमेरिकन नागरिक होण्याअगोदरच देशभक्तीचाही मी सराव करत असल्यामुळे मी त्या भयंकर घटनेचे नाट्यपूर्ण आवाजात साभिनय उत्तर देऊ लागलो. डोळे मोठे करत,संपूर्ण देशाला धक्का बसल्याचा अभिनय करत, टेबलावर पुढे झुकून प्रत्येक शब्दावर कमी जास्त जोर देत गंभीर आवाजात चढ उतार करत, बाईंकडे पाहात, “ Terrorists attacked United States of America!” असे सांगू लागलो.तशा प्रत्येक शब्दानिशी बाई बसल्या जागीच आपली फिरती खुर्ची एकदम मागे लोटत भिंतीवर आ-द-ळ-णा—र होत्या.पण तेव्हढ्यात माझे ते ऐतिहासिक नाट्यपूर्ण उत्तर संपल्यामुळे त्या आदळल्या नाहीत! खैर माझी. नाही तर माझी त्याच दिवशी अमेरिकेतून हकालपट्टी झाली असती!

अशा रीतीने पहिली साही उत्तरे बरोबर दिल्यामुळे परीक्षक बाईंचे पुढचे श्रम व भीतीही नाहीशी झाली.
त्यानंतर मी भरलेल्या अर्जाची, त्यातली माहिती व माझ्याकडून येणाऱ्या उत्तरात तफावत नाही याची पडताळणी सुरु झाली. तीही बरोबर ठरली. मग, तुम्हाला शपविधीला हजर राहण्याचे पत्र येईल तेव्हा ग्रीन कार्ड न विसरता घेऊन या. ते नसेल तर परत पाठवले जाईल किंवा तशा अर्थाचे काही तरी सांगितले. माझे तिकडे लक्ष नव्हते.आणि एक छापील पत्र मला काही खुणा करून दिले. आपल्याकडील म्हणजे माझ्या पद्धतीप्रमाणे मी त्या Pinjalinan बाईंना मला नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहेना? तुम्हाला काय वाटते? वगैरे प्रश्न विचारले. त्यावर त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या म्हणाल्या,”ते पत्र दिले ना तुम्हाला आता,ते वाचा.त्यात Congratulations म्हटलेय की.”

कागदपत्रे व ते पत्र सावरत बाहेर आलो. सतीशने दोन तीनदा “बाबा कसा झाला इंटरव्ह्यू” म्हणून विचारले,पण मी अजूनही अध्यात्माच्याच गुंगीत असल्यामुळे उरलेल्या ९४ उत्तरांचाच जप करीत होतो! तेव्हढ्यात सुधीरचा फोन आला.त्याने माझे अभिनंदन केले. सतीशने त्याला त्या आॅफिसातूनच कळवले असावे. मी सतीशला काही सांगणार तोपर्यंत आम्ही घरापाशी आलोही होतो!

वारीच्या सुरवातीचा अभंग

वारीला पुन्हा एकदा जायचे असे गेली दहा वर्षे म्हणत असतो. पण जमत नाही. तशी मागच्या दोन तीन वर्षात एक-दोन तुकड्या तुकड्यांच्या वाऱ्या झाल्या तेव्हढ्याच.

काल पुण्यात पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा देवळात ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज मुक्कामाला होते. निदान त्याच्या पादुकांचे तरी दर्शन घ्यावे म्हणून जुन्या पु्ण्यात गेलो.

बस मधून जातानांच वारकरी दिसत होते. काही बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसलेले. तर दुकानांच्या समोरील मोकळ्या जागेत जशी जागा मिळेल तिथे अनेकजण दाटीवाटीने आरामात होते. पुण्याच्या मुक्कामात घेऊ असे ठरवून आलेले वारकरी घोळक्याने चालले होते.

प्लास्टिकची इरली, चपला, बूट,बांगड्या,कानातले डूल, माळा,करदोडे, गोफ, नाड्या, टोप्या, सदरे,कपडे, खजूर राजगिऱ्याचे लाडू, वड्या, आलेपाक,डाळे चुरमुरे, माळा, टाळ, फुगे,खेळणी, आणि काय काय आणि किती सांगावे! इतकेच काय शहरात कधी रस्त्यावर न दिसणारी न्हावी मंडळीही आपल्या आयुधानिशी वारकऱ्यांना टवटवीत करीत होती, ह्या गडबडीतच लोकांनी पादुकांच्या दर्शनासाठी लावलेल्या रांगा वळणे घेत वाढतच होत्या.ही रांग इथे संपली म्हणून उभा राहिलो तर “माऊली मागं मागं” ऐकत ऐकत मी मागे जाऊ लागलो तर माझ्या मागचे हे “मागे मागेचे”पालुपद संपेचना! मी जिथून निघालो होतो त्या बस स्टाॅपपाशीच परत आलो!

अनुभवी लोकांनी ह्याचे कारण सांगितले. आदल्या रात्री जोरदार पाऊस झाला होता. तेव्हा पालख्व्या गावात आल्या आल्या दर्शनाला येणारी ती सगळी गर्दी आज आली होती. दिंड्यांबरोबरच आता जवळपासच्या उपनगरातून वारीला जाणारे हजारो वारकरीही येतच होते.

टाळ मृदुंगाचे दणदणीतआवाज नव्हते. पण आपल्या वाद्यांची वारकरी देखभाल करत होते. टाळांचा आवाज मधून मधून यायचा. मृदुंगावर बोटेही अधून मधून टण टण् उमटत होती. हे सर्व बेतानेच चालले होते.पण कोपऱ्या कोपऱ्या वरची तरुण युवा मंडळं लाऊडस्पीकरवरून भाविकांचे स्वागत करत होते. काही तरुण मंडळी भक्तांना वारकरी बंधू-भगिनींना प्रसाद घेण्याचा आग्रह करत होते. त्या जोडीनेच “रांगेने या, रांगेने या असे ओरडतही होते.

गंध लावणारे तर बरेच म्हणजे बरेच होते. मलाच तीन चार वेळातरी गंधखुणांचे शिक्के लावून घ्यायला लागले! डोक्यावर काॅऊंटी कॅप आणि कपाळावर हे वारीचे रजिस्टर्ड पोष्टाच्या गंधाचे शिक्के! बरेच जण येता जाता माझ्याकडे “ काय सुंदर त्ये ध्येनं” पुटपुटत बघत जात. बरं ते पुसण्याची सोय नाही. कपाळ रिकामे दिसले की ती
‘U-ट्युब’ उमटलीच भाळी!मी भाविक झालो तरी चिल्लर-मोड किती बाळगणार!

वारीला जायला मिळणार नाही हे नक्की असले तरी जुन्या पुण्यात निवडुंग्या विठोबा आणि पालखी/ पासोड्या विठोबाच्या राज्यात आल्यावर वारीच्या कपडेपटात,रंगपटात, ग्रीनरुममध्ये आल्यासारखे वाटत होते. नाही वारी तरी,तीन चार तास वारीच्या प्रत्यक्ष प्रयोगाची संपूर्ण रंगीत तालीम जुन्या पुण्याच्या भव्य स्टेजवर पाहिल्याचे समाधान मिळाले.

ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि तुकोबारायाच्या दोन्ही पादुकांचे दर्शन काही झाले नाही. पंढरपुरला जाऊनही लाखो वारकरी कळसालाच हात जोडून परत येतात तसे बाहेर ठेवलेल्या रिकाम्या पालख्यांनाच हात लावून रिकाम्या हाताने परत निघालो. मंडईत दगडूशेठ-दत्ताच्या देवळाच्या बाजूला लहान मोठी हलवायांची दुकानं आहेत.जिलबीचे ‘खंबीर’ (भिजवलेले तयार पीठ-Readymix),चहा,मिठाई मिळणाऱ्या दुकानात बसलो.@एक प्लेट गरम जिलबी खाल्ली. मस्त आणि स्वस्तही. चहासुद्धा प्यालो. तोही अप्रतिम! लक्ष्मीरोडवर गेलो.तिथे वारकऱ्यांप्रमाणे मीही खरेदी करु लागलो.

शनिपारावर बस पकडली. कारण बाजीराव रोडचा काही भाग आणि मंडईकडे येणारे रस्ते तुडुंब रहदारीमुळे वाहनांसाठी बंद केले होते काही वेळ. बसेस येत नव्हत्या. डेक्कनवर आलो आणि कोथरुड डेपोची बस पकडून घरी आलो. बराच वेळ गेला होता.पादुकांच्या दर्शनला जाऊन आल्याच्या गंधाच्या खुणा पुसट झाल्या होत्या. त्यामुळे माझ्याकडे संशयास्पद भाविक म्हणूनही कुणी पाहिले नाही.

आषाढी वारी संपतच आली. आणि मी वारीच्या सुरवातीच्या दिवसाच्या फेरफटक्याचे वर्णन अगदी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ च्या थाटात लिहितोय!

मधुमालतीचा रोमॅंटिक वेल

चुनाभट्टी/शीव

आताच बाहेर फिरून आलो. लो. टिळक हाॅस्पिटलपर्यंत गेलो होतो. परतताना वाटेत मधुमालतीच्या फुलांचा वेल एका सोसायटीच्या भिंतीवर किंचित पसरलेला दिसला. तरूणीच्या केसांच्या बटा चेहऱ्यावरून महिरपीने उतरतात तशा त्याच्या नाजूक फांद्या भिंतीवरून कलंडून बाहेर आल्या होत्या. पहिल्या प्रथमच पाहात होतो इथे हा वेल. किंवा तो नाजूक पांढऱ्या व गुलाबी फुलांनी नुकताच फुलत असल्यामुळेही लक्ष गेले असेल.

फुले फार छान दिसतात. थोडी मोठी झाल्यावर त्यांचापांढरा व गुलाबी रंग फार सुरेख दिसतो.,सुरवातीला हया दोन्ही रंगाची फुले वेगवेगळी असतात. पण त्यांचे घोस होऊ लागले की ती एकामेकांना अगदी खेटून असतात. संपूर्ण वेल फुलांनी बहरून जातो.

आमच्या हरिभाई शाळेचे मोठे पोर्च्र त्यावरील गच्चीवरून येणाऱ्या मधुमालतीच्या बहरलेल्या वेलांनी सुशोभित होत असे. डफरीन चौकातल्या गुंजोटीकरांच्या बंगल्याच्या फाटकाच्या कमानीवर तसेच पूर्वी किल्ल्यासमोरील चव्हाणांच्या दोन्ही आवळ्या जावळ्या सुंदर बंगल्यांच्या वरच्या मजल्यावरील व्हऱ्यांड्याच्या फिकट पोपटी कमानीवरही हे फुलांनी बहरलेले वेल असायचे. आमच्या काकूंच्या बंगल्यातही काही काळ होते नंतर पुन्हा शोभानेही फाटकांच्या खांबावर येतील असे वाढवले होते.

मधुमालती हे नावही त्या नावाच्या तरुणीं इतकेच संदर व, काव्यमय आहे. म्हणूनही तो वेल,ती फुले पाहणाऱ्याला मोहित करून टाकत असावीत! फुलाच्या मधुमालती या जोडनावात अनेकांना रेमियो ज्युलिएट. लैला मजनू, शिरीन् फरहाद, हीर रांझा, उषा अनिरुद्ध या अजरामर प्रणयी जोडप्यांच्या अमर प्रितीचा सुगंधही जाणवत असेल. कारणे काहीही असोत आधी म्हटल्याप्रमाणे मधुमालतीची नाजूक सुंदर आणि हळुवार सुगंधी फुले कुणाला मोहित करणार नाहीत?

वर्षभराच्या साठवणी!

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत. एप्रिल लागणार म्हणले की वर्षाचा गहू भरण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यांमघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, हा सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी, सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळतही असेल.किंवा अकोल्यालाही काली मूंछ तांदूळ मिळत असेल.

तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

परपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत होत गेली- ही शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं, अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी तरी ? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून, दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा, तेव्हा हुश्श वाटायचे.

त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेतही पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो,त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपले अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, तशाच काही छद्मी आणि कावेबाजपणे हसणाऱ्या केशरी मिरच्या तर काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकत फिरायचे. प्रत्येकाचे हातरुमाल मोंढ्याच्या किंवा मार्केटच्या बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे “बाळा जो जो रे,”स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,”चिमणी पाखरं”,माहेरची साडी”हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे येव्हढे “शोककारी दु:खकारी” होऊन पाच किलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत.

त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल,आणली मड्डम ! अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छय्यम छय्यम नको, किंचित कुरळ्या,काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घ्या” म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य, डाळी भरणे, तिखट, मीठ करणे , शिकेकई कुटणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

साठवण वर्षाची

चुनाभट्टी /शीव

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत किंवा धान्यही भरून ठेवत नाहीत.एप्रिल लागणार म्हटले किंवा पाडवा झाल्यावर वर्षाचा गहू, ज्वारी आणण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यामघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, तो सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळत असेल.किंवा अकोल्याला काली मूंछ तांदूळ मिळतही असेल. तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

प्रपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत. गव्हा-ज्वारीची शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं,अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा.
त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेत पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपला अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकतफिरायचे. प्रत्येकाचे रुमाल बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे बाळा जो जो रे, स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी, चिमणी पाखरं,माहेरची साडी हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे “शोककारी दु:खकारी” होऊन पाचकिलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत. त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल, आणली मड्डम अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छल्लम छ्ल्लम नको, किंचित कुरळ्या, खळ पडलेल्या गालांची, काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घे ”म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य डाळी तिखट मीठ भरणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

ते हृदय कसे आईचे

चुनाभट्टी/शीव

जगातील पहिली working woman आई होय. ह्या कामकरी-कष्टकरी आईचे विविध रुपात दर्शन होत असते. शेतात, निंदणी खुरपणी वेचणी कापणी करणारी, उन्हात रस्त्यावर झारीने गरम डांबर ओतणारी, पुर्वी कापड गिरण्यांतही काम करणारी, बांधकामाच्या ठिकाणी तर हमखास दिसणारी, भाजीपाला विकणारी, डोक्यावर ‘कपबशा बरण्याब्बाई’ म्हणत दुपारी फिरणारी बोहारीण आणि तशीच घरात काेणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली आपली आई ! मॅक्झिम गाॅर्कीने त्या बाईचा सन्मान The Mother ह्या कादंबरीने केला.

गेल्या १९३०-४० सालापासून कनिष्ठ मध्यम वर्गातील व मध्यम वर्गातील कमी अधिक शिकलेल्या आया घराबाहेर पडून कारखान्यात आॅफिसात काम करू लागल्या.आणि सत्तरीच्या दशकापासून तर जास्तच प्रमाणात चांगल्या शिकलेल्या बायका मुली नोकरी करु लागल्या आणि “वर्किंग वुमन”चे नाव होऊ लागले. आज बहुसंख्य आया-बाया, स्त्रिया स्वतंत्र अर्थार्जन करु लागल्यामुळेWorking Woman भोवती एक वलय निर्माण झाले आहे. आणि त्यात काही गैरही नाही. कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, दिवसभर मुलांना सांभाळण्याची त्यांची करमणुक करण्याच्या सोयी निर्माण झाल्या आहेत. त्या आवश्यकच आहेत.आणखीही सोयी होणे आवश्यकचआहे. पण अशा सोयी कामगार आया स्वत:च करत आणि आजही करताहेत. कामाच्या ठिकाणीच झाडाखाली, दोन्ही फांद्यामध्ये झोळीचाच “हॅमाॅक” करून, तर कुठे टाकीच्या सावलीत पोतं अंथरून पाळणाघर त्या आया आपल्या लेकरांसाठी आजही करतात. दोन्ही स्थानाठिकाणी, सर्वजणी आयाच आहेत ही महत्वाची समान गोष्ट आहे. आईची मायाममता सारखीच आहे. “ते हृदय कसे आईचे”हेच त्यातले खरेआहे!
जगात कशातही,कोणत्याही- सर्वांचे शेवटचे आशास्थान त्या न्यायातही- गोष्टीत समानता नाही. आहे ती फक्त ‘आई’पणात! मग ती आई घरातली असो की आॅफिसातली!

आंब्याच्या दिवसात घरोघरी आमरस होतोच. आंबे पिळून झाले की पातेल्यातली रसभरीत झालेली एक एक कोय चांगली पिळून दुसऱ्या पातेल्यात टाकली जायची. मग त्या कोयी दुधापाण्यात पुन्हा कोळून रसाच्या पातेल्यात तो रस ओतायचा. रस तयार ह्यायचा. पण त्यात एक गंमत असे. सर्व कोयी कोळल्या नसत. एक कोय अगोदरपासूनच त्या रसात असे. विचारले तर ‘शास्त्र म्हणून” ठेवायची असते असे म्हणत. जेवताना प्रत्येकजण रस मस्त”व्हडी अप्पाS”म्हणत ओरपून ओरपून तर मध्येच पोळीच्या मध्यस्थीशिवाय थेट वाटी तोंडाला लावूनच रिकामी करत असे.’आता पुरेSs’ स्थिती झाली की सर्व “मातृभक्त श्याम”,आई किंवा बहिणी पुन्हा रस वाढायला लागली तर “ नको नको आईला राहू दे की म्हणत वाटीभरून घ्यायचे! जेवणं संपून इकडे तिकडे करून झाल्यावर पुन्हा स्वैपाघरात आल्यावर आई जेवायला बसलेली असे. आणि त्या पातेल्यात रसातळाला गेलेल्या चमचा दोन चमचे रसाच्या ठिपक्यातली कोय आई कोळून तो रस वाटीत घेताना दिसायचे!
त्या कोयीचे हे शास्त्र होते तर! प्रत्येक घरातील आयांचे हेच त्या ‘रसातील कोयीचे वेदोपनिषद’ असते. निळ्या पिवळ्या प्लास्टिकने झाकलेल्या पत्र्याच्या छपरात, पत्र्याच्या किंवा सिमेटच्या पत्र्यांच्या चाळीतील घरातल्या आयांचेही ‘भाकरीच्या कोराचे’ असेल, ‘वशाट चे‘ ‘कालवणाचे ‘ चे असेल पण तेही “रसात ठेवलेल्या एका कोयीचे’च शास्त्र असते!

“दया, प्रेम आणि वात्सल्य ही क्षमेची नेहमीची तीन मंदिेरे आहेत,” असे आ. विनोबा भावे म्हणतात. दयेसंबंधी सांगायला नको. प्रेमात प्रेमिकांना एकमेकांचे दोष दिसत नाहीत. मित्र तर दोषासकट आपल्या मित्राचा स्वीकार करतो. तर वात्सल्य आपल्या मुलाचे दोष पोटात घालून त्याच्यावर निरपेक्ष मायाच माया करत असते. हे तिन्ही गुण फक्त एका आईतच एकवटले आहेत!

काॅलेजात असताना रिडर्स डायजेस्टमध्ये वाचलेले एक अवतरण आठवले. “God cannot be everywhere at the same moment so he created Mother!”

(मातृदिनाच्या निमित्ताने)

कैरीची चटणी

पुणे

घ्या आता! कैरीची चटणीही पाककृति झाली! कशाला केव्हा महत्व येईल ते सांगता येत नाही. कैरीचीच का कोणतीही चटणी कुणालाही करता येते. त्यासाठी साहित्य, कृति, लागणारा वेळ, त्यातल्या वजनमापांचा पसारा आणि घोळ आणि येव्हढ्या साहित्यात किती जण खातील ( आणि ती खाल्ल्या नंतर ICU मध्येच भेटतील), हासगळा प्रपंच करायला कुणी सांगितलं होतं ह्यांना किंवा हिला? अरे, रोज कोण गावजेवण घालतंय काय इथं? आं?

सगळी कथा सांगून झाल्यावर वर पुन्हा ओलं खोबरं आवडत नसेल तर साधे म्हणजे नेहमीचे म्हणजे वाळलेले म्हणजेच सुके खोबरेही चालेल इतके खुलासेवार सांगतात. साखरे ऐवजी गूळ सुद्धा हरकत नाही. तो नसलातर खांडसरी साखर आणि तीही नसली तर खडी साखर घ्यावी. पण देवळात देतात ती डिझायईनर्स खडीसाखर नको; म्हणजेच जाड मोरस साखरे सारख्या दिसणाऱ्या, अंगठीतल्या चौकोनी खड्यासारखी दिसणारी नको तर साधारणत: मिरवणुकीत,मोर्च्यावर, किंवा मैत्रीपूर्ण लढतीत दगडफेक करण्यासाठीही वापरता येतील असे खडे गोटे असणारी खडी साखर घ्यावी. पण तो खडा एकदम दण्णकन चटणीत काय कोणत्याच पाककृतीत टाकू नये. तो घरात खलबत्ता असल्यास व तो कशाला म्हणतात ते माहित असल्यास त्या खलबत्त्यात कुटून मग घालावी. मिक्सरमधूनही फोडता येते पण साधारणत: त्यासाठी चारपाच शेजारणींचे मिक्सर अगोदरच मागून घ्यावेत. चालेल त्यांनी नाके मुरडली तरी. कारण ते चारपाच मिक्सर त्या खडासाखरेने एकदम ‘खडाSSर्डम स्टाप् ‘ करत तोडून मोडून फोडले तरी आपला मिक्सर सुरक्षित राहतो हे न विसरता त्यांच्या नाक मुरडण्याकडे निगरगट्टपणे दुर्लक्ष करावे. व निगरगट्टपणा तुम्हाला काही बाहेरून आणावा लागत नाही. तो तुमच्याकडे जन्मजातच असतो. म्हणूनच तुम्ही त्यांना “ Sorry हं “हे किती गोड अभिनय करून म्हणायचे त्याचा सराव करायला सुरवात करा.(इंग्रजी किSSत्ती कि्त्ती उपयोगी आहेनां?) तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्याही चालतील. पण त्या लवंगी असल्या तर बेतानेच घ्या. मध्यम तिखट असतील तर मध्यम संख्येनेच(?) घ्या! अगदीच आळणी असतील तर मुठी दोन मुठी घ्याव्यात.परवा एकीने तिखटाच्या गोड मिरच्या किती घ्याव्यात असे त्या पाककर्तीला विचारले होते!!
तसेच हे तिखट, हिरव्या मिरच्या आवडत नसतील त्यांनी तांबड्या मिरच्या वापरायलाही हरकत नाही अशी सवलतही दिली जाते. पण पुन्हा त्या शक्यतो बेडगीच्या किंवा नंदुरबार-दोंडाईचे इथल्या असाव्यात अशा प्रेमळ दमबाजीच्या अटी असतातच. आणि त्या नसतील तर मग मेक्सिकन वापरायची स्वदेशी परवानगीही दिली जाते. पण कदापी ढब्बू मिरची घेऊ नये. कारण चटणीचा उद्देशच नाहीसा होतो, हेही सांगतात.

ह्या पर्यायांमध्ये तेलाची तर फार मोठी भूमिका असते. आता आता तेलाचे दोन तीनच प्रकार होते. खायचे आणि दिव्याचे. ऐपतदार असेल तर डोक्याला लावायचे. इतक्या तेलांत पिढ्या न् पिढ्या जात असत, जगत असत. आता अपरिहार्य आहे म्हणून अनेक प्रकार आले हे खरे. पण पाकृतीत हे बहुतेक सगळे दिले जातात. शुद्धिकरण केलेले, घाण्याचे पण त्यातही पुन्हा बैलाच्या घाण्याचे. त्यातील व्याकरण किंवा गणित जाणणारे पुन्हा “बैलाचे व लाकडी घाण्याचेच” वापरावे असे पर्याय कटाक्षाने देतात. त्यापाठोपाठ नेहमीचे शेंगदाण्याचे, हृदयविकाराच्या खवय्यांसाठी करडीच्या तेलाचा पर्याय हरकत नाही अशी परवानगी दिली जाते. आता संपर्क, सहवास वाढल्यामुळे सरसों का तेल, शुद्ध नारळाचे तेल अशी अखिल भारतीय तेलेही सुचवली जातात. तीही कर्नाटकी कडबूच्या किंवा उकडीच्या मोदकांच्या पाककृतीत! मोहरीच्या( सरसोंका तेल) तेलातील पुरणाचे कडबू किंवा उकडीचे मोदक ही किती चित्तथरारक पाककृती असेल ह्या कल्पनेनेच भीतीचा काटा उभाराहतो! एका नव प्रायोगिक पाककर्तीने शेवयाच्या खिरीला सरसों की तेलातील लसणाची फोडणी सुचवली होती. व नेहमीच्या हिंगा एैवजी हिरा हिंगच घ्यावा पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगितले होते. नंतर बातमी आली होती की ही कृति तिने तिच्या “सास भी बहुत खाती थी“ ह्या सिरियल मधील सासूला खाऊ घातली होती ! सिरियल बंद पडलीच पण ही पाककृति सध्या तुफान व्हायरल झाली आहे.

हे झाले साखर-गुळ, तिखट-हिरव्या मिरच्या, तेले या द्वंद्व समासांचे. असेच त्यातील प्रत्येक घटकाला म्हणजे शेंगदाण्यांऐवजी तीळ, कारळांऐवजी जवसही, चिंचेऐवजी आवडत असेल तर आमसूल आणि पुढे पुढे तर ह्याच चालीवर गोड पाककृतीत, काळ्या मनुका ऐवजी बेदाणे त्याऐवजी खिसमिसही चालेल, खसखस नसेल तर राजगिरा, जायफळ नसेल तर जर्दाळू (आतल्या बीया सकट?), बदाम नसतील तर शेंगादाणे ; हाच पर्याय काजूसाठीही असतो. बडिशेपे ऐवजी जिरे, बरं ते नसतील तर शहाजिरे, विड्याची पाने नसतील तर वडाचीही चालतील, खारिक नसेल तर खजूर, सुके अंजीर नसतील तर वांगीही(!) पण ती चांगली जांभळी बघून व जमल्यास वाळवून घ्यावीत( मग पदार्थ केव्हा करायचा होSs!) हे माना वेळावत किंवा तो डोक्यावरची मापाची नसलेली पांढरी ‘जिरेटोपी’ हलवत सुचवतात. परवा तर मक्याच्या चिवड्याच्या पाककृतीत मक्याचे पोहे नसतील तर अंड्याची टरफले घ्यायला हरकत नाही असे म्हटले. पण त्याच बरोबर ती टरफले गावरानी कोंबडीच्या अंड्याची असावीत किंवा ती नसतील तर बदकांची किंवा बदामी रंगाच्या अंड्याची घ्यावीत असे सुचवले होते! शाकाहाऱ्यांसाठी, शाकाहारी अंड्याची टरफले हे ओघाने आलेच.

अरे, आम्हाला काय पाहिजे असेल ते आमचे आम्हाला नीट सुखाने चार घास खाऊ द्या की रे बाबांनो!

बरं,पण त्या कैरीच्या चटणीचे काय झाले?

कार्ल मार्क्सच्या जन्म द्विशताब्दिनिमित्त

पुणे

कार्ल मार्क्स ( ५ मे १८१८-  १४ मार्च १८८२ )

आपल्या तत्वज्ञानाने जगावर कायमचा ठसा उमटवणारा कार्ल मार्क्स ह्याचीआज जन्म द्विशताब्दी. प्रख्यात नाटककार लेखक आॅस्कर वाईल्ड म्हणतो, “An idea that’s not dangerous is unworthy of being called an idea at all.” कुण्या एखाद्या विचारवंताला हे विधान सर्वथैव लागू होईल तर ते कार्ल मार्क्सलाच!

मार्क्स हा मुळत: तत्वज्ञ, अभ्यासक आणि विचारी होता. त्याच्या खळबळजनक व वेगळ्या विचारांनी प्रभावित विसाव्या शतकात झालेले जसे अनेक होते तितकाच मोठा गैरसमज त्याला भविष्यकाळातील क्रांतीचा अग्रदूत मानणाऱ्यांनी निर्माण केला. बाहेर त्याने मांडलेल्या सिद्धांतावर चर्चा वादविवाद इतर विद्वान करत असताना मार्कस् आपला बराच वेळ ब्रिटीश म्युझियममध्ये प्राचीन काळातील तत्वज्ञ व त्या काळचे अर्थतज्ञ ह्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यात घालवत असे. शंभर वर्षानंतरही मार्क्सचा विचार ‘मार्क्सिझम’ ह्या शब्दाशीच निगडित केला जातो. त्याला सामाजिक आर्थिक क्रांतीचा द्रष्टा,प्रेषित बनवणाऱ्यांनी त्याच्यातील तत्वज्ञाकडे दुर्लक्ष करून मार्क्सिस्टम्हणवून घेणाऱ्या एन्गल्स, लेनिन,स्टालिन,माओ,कॅस्ट्रो ह्यांनी आपल्या क्रांतीला व जुलमी दहशतीच्या कारभारासाठी सोयिस्कर तो अर्थ लावून त्याचा वापर केला. मार्क्स हा माणसाच्या स्वातंत्र्याच्या,स्वत:चे भवितव्य स्वत:च घडवणाऱ्या मूलभूत प्रवत्तीवर विश्वास ठेवणारा होता. (सामाजिक स्थितीचा विचार करता तो कामगार कष्टकऱ्यांचाही त्यात मुख्यत्वे समावेश करतो;माणूसच स्वत: आपले भविष्य घडवतो;विशेषत:कामगार आणि कष्टकरी.) कामगार स्वत: त्याचा सर्वतोपरी उद्धार, जोखडांतून मुक्ती करुन घेऊ शकतो ह्यावर मार्क्सचा विश्वास होता.पण त्याच बरोबर त्याच्यावर हेगेलच्या एकच एक अशा सर्वंकष सामाजिक बदलाच्या वैश्विक नियमाचाही प्रभाव होता. ह्या बदलाचे,परिवर्तनाचे रुपांतर,मला वाटते, वर सांगितलेल्या पुढाऱ्यांनी त्यांच्या क्रांतीत केले.

कोणत्याही विचाराचे, तत्वाचे किंवा तत्वज्ञानाचा विचार करणारे आपल्या दृष्टिकोनातून ते मांडतात. पूर्णपणे वैज्ञानिक असलेल्या उत्क्रांतिवादाचे स्पष्टीकरण शतकानुशतके निरनिराळ्या विद्याशाखांनी आपले अर्थ लावून केले. इतकेच काय विज्ञानाशी संबंध नसलेल्या हिटलर सारख्यांनी Survival of the Fittest चा अशास्त्रीय संबंध लावून तो आपल्या राजवटीसाठी वापरला, तिथे इतिहासाच्या तत्वज्ञानातूनही हिंसक क्रांति व जुलमी हुकुमशाहीचे समर्थन होते ह्यात आश्चर्य ते काय !

व्हाॅल्टेअरने,” जे तुम्हाला,त्यांचे भ्रामक विचार हेच तात्विक सिद्धांत व तेच सत्य आहे ह्याची खात्री करून देतात तेच तुमच्याकडून समाज- घातक गोष्टी सहज करवून घेतात;” असे म्हटलेय ते आजच्या काळातही किती स्पष्टपणे लागू आहे ते पहा! ह्यामध्ये मार्क्सवादाचे समर्थन नाही अथवा टीकाही नाही. पण कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा प्रभाव कायम राहणारा आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मार्क्सला डावलून कोणत्याही काळात सामाजिक आर्थिक आणि पर्यायाने राजकारणावर विचारविमर्श होऊ शकत नाही. त्याचे दास कॅपिटाॅल हे वाचायला आणि अभ्यासण्यासाठी अतिशय किचकट क्लिष्ट आहे. पण तो तितक्याच बारकाईने वाचावा व अभ्यास करावा हे अनेकजण सांगतात. जगातील इतर देशांतील वाचकांची, विचारवंतांची माहिती नाही. आणि आपल्याकडीलही सर्वांची माहिती नाही. पण मानवेंद्रनाथ राॅय व काॅ.श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी मात्र त्याचा चांगला, पूर्ण व सखोल अभ्यास केला होता ही माहिती आहे.

जेव्हा रशियात कम्युनिझम मोडकळीस आला तेव्हाही मार्क्सवादाचा हा पाडाव आहे असे लोक म्हणत असताना मी म्हणत होतो की हा मार्कसच्या तत्वज्ञानाचा पराभव नाही पण ज्यांनी तो त्यांच्या पद्धतीने अमलात आणला त्या हुकुमशहांचा पाडाव आहे असे म्हणालो होतो. तत्वज्ञान, विचार नष्ट होत नाहीत. ते विपरितरीत्या अमलात आणणारे पराभूत होतात, असे म्हटले होते. तशा अर्थाचे पत्रही मी म.टा.मध्ये लिहिले होते. असो. The Hindu मध्ये रामन जहाबेगलू (Ramin Jahanbegalu) यांचा कार्ल मार्क्सवरील लेख वाचला त्यावर, व जे ह्यात जे काही विसंगत वाटणारे आहे ते माझे, असे हे ज्ञान अज्ञान मिश्रित टिपण आहे.

 

खरा शेक्सपिअर कोण?

रेडवुड सिटी

शेक्सपिअरविषयी तोंड भरभरून लिहिले जाते; आणि इतके बोलले लिहिले गेल्यावरही शेक्सपिअरची नाटके त्यांनी लिहिलीच नाहीत ; दुसऱ्याच कुणीतरी ती लिहिली आहेत, असे म्हणणारे अनेक संशोधक समीक्षक लेखक आहेत. त्याच्यावर जितके गौरवपर लिहिले जाते तसे “शेक्सपिअर” हा दुसराच कोणीतरी असावा ही शंकाही कायम व्यक्त केली जाते. इतके रामायण ऐकल्यावर रामाची सीता कोण? असा प्रश्न विचारणाऱ्यांइतके हे टीकाकार अनभिज्ञ नाहीत. खरा “शेक्सपिअर” कोण असावा असे वाटणारे अंदाजे पन्नास उमेदवार तरी ‘बाशिंग’ बांधलेले आढळतात. पण त्यापैकी अनेक जणांच्या पात्रतेबद्दल लगेच आक्षेप घेता येतात त्यामुळे ते बहुसंख्य आपोआप स्वयंवर मंडपातून बाहेर जातात!

शेक्सपिअरची नाटके ही शेक्सपिरने लिहिलीच नाहीत असे ठामपणे सांगणारी थोडी थोडकी नाही तर पाचहजारांच्यावर पुस्तके आहेत! शेक्सपिअरची नाटके वाचल्यावर कायदा , वैद्यकीय ज्ञान, राजकीय बाबी, मुत्सद्दीपणा, कोर्टातील कामकाज, ल्ष्करी घडामोडी, ह्या व इतर अनेक गोष्टींचे ज्ञान असलेल्या माणसाने, विविध क्षेत्रातील तज्ञाने लिहिली असावीत ही खात्री वाटते. पण एकच व्यक्ति इतक्या निरनिराळ्या व परस्परांत फारसा संबंध नसलेल्या विषयात तज्ञ असणे शक्य नाही हेही माहित असते. त्यातूनच पुढे कुणा एका लेखकाने ही नाटके लिहिली नसावीतहा विचार बळावतो.त्या दृष्टीनेही हे संभाव्य लेखक कोण ह्यावर तर्कवितर्क होऊन पुस्तके लिहिली गेली आहेत. शेक्सपिअर हा लेखक नसावा ही शंका येण्यामागे आणखी एक मोठे महत्वाचे व व्यवहारात नेहमीच्या समजांवर आधारलेले कारणही असावे. ते म्हणजे शेक्सपिअर हा खेडेगावात वाढलेला, तिथेच शिकलेला ही पार्श्वभूमी असलेला. बरे जग पाहिलेला, किंवा ह्या अगोदर लिखाण केलेला,साहित्य प्रसिद्ध झालेला किंवा साहित्यिक वर्तुळात माहित असलेला असाही तो नव्हता. केंब्रिज किंवा आॅक्सफर्ड मध्ये शिकलेला तर नव्हताच नव्हता. नेहमीच्या वापरातील शब्द वापरायचा तर असा गावंढळ माणूस इतक्या तोलामोलाची एक दोन नाही तर ३६-३७ नाटके नाटके लिहिलच कसा? असा अनेक संशोधकाचा संशय आणि मत आहे. कुणा एका बुद्धिमान आणि प्रतिभेची देणगी असलेल्या माणसाचे हे कर्तृत्व असले पाहिजे. राजकीय, सामाजिक कारणांमुळे त्याने आपली नाटके शेक्सपिअरच्या नावाने लिहिली असावीत असे ठाम मत असणारेही आहेत. शेक्सपिअर हा रंगभूमीवर नट म्हणूनही सर्वांना माहित होता. त्याचा साहित्याशी म्हणायचा तर तेव्हढा एक संबंध दाखवता येतो.

अमेरिकेतील पीबीएस ह्या प्रतिष्ठित व विश्वसनीय अशा वाहिनीने १९९६ साली ह्या प्रश्नावर एक तासाचा लघुपट काढला होता. त्यात शेक्सपिअरची समजली जाणारी नाटके शेक्सपिअरची नाहीत हा निष्कर्ष निघतो असे सुचवले आहे. न्यूयाॅर्क टाईम्स्, हार्पर्स मॅगझिन ह्यांनीही हा संशय प्रकट करण्यासाठी पुष्कळ रकाने खर्च केले आहेत. स्मिथ्सोनियन सारख्या मोठ्या संस्थेनेही २००२ साली “शेक्सिअरचा लेखक कोण?” हा मोठा परिसंवाद आयोजित केला होता. पण शेक्सपिअरविरुद्ध लिहिणाऱ्या, आपली मते हिरिरीने मांडणाऱ्या सर्वांचे पुरावे हे तकलादू, परस्परविरोधी आहेत.धूर्तपणणे लोकांच्या भावनेशी खेळण्याची ही एक विद्वत्तापूर्ण पद्धत आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे असा शेक्सपिअरच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आरोप आहे.

Concordia Univ. आॅरेगन मधील प्रा. डॅनियल राईट हार्पर्स मॅगझिनमधील लेखात म्हणतात, “ शेक्सपिअर हा फारसा शिक्षित नव्हता, लोकर आणि धान्याचा दुकानदार होता.आणि साहित्यिक जगताशीच नाही तर एखाद्या वाड•मय मंडळाशीही संबंधित नव्हता.”पण ही काल्पनिक विधाने आहेत” अशी ह्या आक्षेपांची बोळवण केली जाते. आणि ह्या प्रत्युत्तरात तथ्य आहे. शेक्सपिअर हा स्वत: व्यापारी किंवा दुकानदार नव्हता. त्याचे वडील नगरपरिषदेचे महापौर होते. त्याचे गाव लहान असेल पण महत्वाचे, लोकर व कातड्यांचा व्यापार व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे ते गाव होते. त्याने, शिक्षण त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे पुरेसे आठ वर्षे घेतले होते. हां, त्याला कोणतेही महाविद्यालयीन शिक्षण नव्हते इतके मात्र म्हणता येईल.

History Today हे विद्वानांत व वाचकांतही मान्यता मिळालेले दर्जेदार पुस्तक आहे. त्यामध्ये लेखक विल्यम डी. रुबिन्स्टाईनने लिहिले आहे की,” त्यावेळच्या सर्वमान्य कागदपत्रांत शेक्सपिअरचे नाव आढळत नाही की तो एखाद्या पुस्तकाचा कर्ता, लेखक असाही कोठे उल्लेख दिसत नाही.” ह्या म्हणण्यात थोडेफार तथ्य आहे. पण त्याच्या साॅनेटची एक पुस्तिका प्रकाशित झाली होती. तसेच नाटकांच्या छपाईच्या गर्दीच्या काळात त्याच्या काही नाटकांची quarter books प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली. त्यावर शेक्सपिअरचे कर्ता म्हणून नाव छापले होते हे शेक्सपिअरचे समर्थक दाखवतात. पण त्याही पेक्षा एलिझाबेथ राणीच्या आणि किंग जेम्सच्या काळी राजवाड्यात शेक्सपिरची कंपनी आपली नाटके करत असे. जेम्सच्या काळी तर त्याच्या नाटकांचे राजांसाठी १८७ प्रयोग झाले होते. राजवाड्याच्या दप्तरांत ह्यांची नोंद होत असे. त्या अधिकृत नोंदणींच्या कागदपत्रात विशेषत: १६०४ आणि १६०५ साली शेक्सपिअरच्या नाटकाची नावे व लेखक ह्या कलमात विल्यम शेक्सपिअर असे उल्लेख स्पष्टआढळतात. हे असो; पण शेक्सपिअर विरोधी लेखक, नाटककार ,राॅबर्ट ग्रीन ह्याने आपल्या Groat’s-Worth of Wit ह्या पुस्तकात प्रथम अप्रत्यक्षपणे केवळ एक नट पण नाटककार स्वत:ला नाटककार म्हणवून घेतो असा शेक्सपिअरला टोला मारला आहे ,पण नंतर त्याने तसे म्हटले ही माझी चूक होती असे म्हणत तो एक चांगला नाटककार आहे असेही म्हटले. शेक्सपिअ- तज्ञ, विद्वान जोनथन बेट काय म्हणतो तेही ध्यानात घ्यावे लागेल. तो म्हणतो, “शेक्सपिअरचा मृत्यु होऊन दोनशे वर्षे उलटून जाईपर्यंत शेक्सपिअर हा नाटककार लेखक नव्हता असे कोणीही म्हटले नाही की लिहिलेही नाही!”

शेक्सपिअर हा लेखक किंवा नाटककारही नव्हता असे प्रथम १७८५ साली इंग्लंडमधील वाॅर्विकशायरच्या रेव्हरंड जेम्स विल्माॅटने मत मांडले होते. पण ते कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. १८५० च्या काळापासून अमेरिकेची डेलिया बेकन हिने शेक्सपिअर हा नाटककार नव्हता ह्यावर संशोधन चालू केले होते. शेक्सपिअर हा त्याच्या नाटकांचा लेखक नसून, खरा लेखक सर फ्रान्सिस बेकन आहे असे खळबळजनक विधान ठामपणे करणारी अमेरिकन बाई, डेलिया बेकनला ते श्रेय जाते. तिच्या ह्या मताला राल्फ वुल्डो इमर्सन, वाॅल्ट व्हिटमन, एडगर अॅलन पो, नॅथनियल हाॅथर्न, मार्क ट्वेन, हेलन केलर ह्यासारख्या अमेरिकेतील नामवंत लेखक, कथालेखक,कवि, तत्वज्ञांचा पाठिंबा मिळत गेला. ती १८५३साली इंग्लंडमध्ये ह्या विषयावर संशोधन करायला गेली. जाताना इमर्सनने तिला इंग्लंड मधील लेखक तत्वज्ञ इतिहासकार थाॅमस कार्लाईलला तिची शिफारस करणारे आपले ओळखपत्र दिले होते. कार्लाईलने तिची राहण्याची वगैरे सोय करून दिली शिवाय इंग्लंडमधील विद्वानांची ओळख करून देतो अशीही तयारी दाखवली होती. तिने दोन वर्षे राहून फ्रान्सिस बेकनने ज्या ज्या ठिकाणी काळ व्यतित केला, तिथे जाऊन,राहून अभ्यास केला. पाचवर्षानंतर १८५७ साली ती अमेरिकेत परतली. त्याच वर्षी तिने आपला The philosophy of the Plays of Shakespeare Unfolded हा ६७५ पानांचा भलामोठा ग्रंथ प्रसिद्ध केले. वाचायला अत्यंत कंळवाणाआणि किचकट असे हे पुस्तक आहे. ह्या ६७५ पानात तिने एकदाही शेक्सपिअरच्या नाटकांच्या लेखका संबंधात फ्रान्सिस बेकनचा स्पष्ट उल्लेख केला नाही. पण वाचकांना संदर्भा संदर्भाने बेकन हा त्या नाटकांचा लेखक असावा असा निष्कर्ष काढता येतो.

खरा लेखक कोण किंवा कोणी तीनचारजणांनी मिळून लिहिले ह्या विषयी भाषाशास्त्राचे तज्ञ, भाषाशैलीचे विश्लेषक ह्यांचेही संशोधन चालू होते. ह्यांमध्ये आणखी तज्ञांची भर पडली म्हणजे गुप्त लिपी, भाषा वापरली आहे का ह्याचा अभ्यास सुरू झाला. युद्धात शत्रूचे गुप्तलिपीतील संदेश-पद्धती उघड करणारे तज्ञ असतात. तसे ह्या कामी तेही ह्यात उतरले. Ignatius Donnellyने जी पद्धत वापरून more low or shak’st-spur never writ a word (“शेक्सपिअरने हेलिहिले नसून मार्लोने लिहिला”) असे उघड केले त्याला, रेव्हरंड निकोल्सनने डाॅनेलीचीच पद्धत वापरून “master Will-I-am shak’st -spurr” (विल्यम शेक्सपिअरने लिहिले असे सिद्ध करून, प्रत्युत्तर दिले !

पण प्रसिद्ध तत्वज्ञ, राजकारणी,मुत्सद्दी शास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, सर फ्रान्सिस बेकनने ही नाटके लिहिली नाहीत त्यासाठीचा पुरावा म्हणजे बेकनला नाटके आणि तसले करमणुकीचे प्रकार अजिबात आवडत नव्हते. त्याने आपल्या अनेक निबंधात नाटके आणि तसले साहित्य म्हणजे बौद्धिक सवंगपणा व हीन अभिरुचीचे निदर्शक साहित्य प्रकार आहेत अशी खरमरीत टीका केली आहे !

१९१८ मध्ये गेटशेड (इंग्लंड) येथील शाळेतील शिक्षक जे. थाॅमस लूनीने पडद्याआडचा खरा शेक्सपिअर म्हणजे Earl of Oxford Edward de Vere हा असल्याचे आपल्या Shakespeare Identified ह्या पुस्तकात मांडले. अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर असण्यासाठी योग्य उमेदवार होता. शिकलेला, हुषार, तसेच कवि आणि नाटककार म्हणूनही ओळखला जात असे. पण वस्तुस्थिती अशी आहे की शेक्सपिअरची कविता,नाटके म्हणून आजही जी ओळखली जातात त्याच्या पासंगालाही ह्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या कविता नाटके पुरणार नाहीत ! पण त्याची जमेची बाजू म्हणजे त्याने खूप प्रवास केला होता.पुष्कळ जग पाहिले होते. त्याला इटालियन चांगले येत होते. अर्ल असल्यामुळे दरबारी रीतिरिवाज, आणि राजकारणाची उत्तम माहिती होती. या शिवाय बराच काळ तो राणी एलिझाबेथच्या मर्जीतलाही होता.

पण अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हाच शेक्सपिअरचा खरा शेक्सपिअर असण्याबाबत एक महत्वाची शंका आहे. शेक्सपिअरच्या सर्व नाटकांतून धीरगंभीरपणा, खेळकर विनोद, सहृदयता, स्वभावाचा शांत आणि स्थिरपणा तसेच सामान्य व्यवहारी शहाणपण हे जाणवत असते. ह्या सर्व स्वभावविशेषांच्या विरुद्ध अर्ल आॅफ आॅक्सफर्ड होता ! तो उतावळा, शीघ्रकोपी, उद्दाम बेजबाबदार आणि हिंसा करायलाही मागेपुढे न पाहणारा होता. सतरा वर्षाचा असताना त्याने आपल्या घरगड्याला ठार मारले होते. पण अर्ल असल्यामुळे आणि राजदरबारात वजन असल्यामुळे तो सुटला. अशा स्वभाव प्रवृत्तीचा असलेल्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डने आपणच शेक्स्पिअरचे खरे लेखक आहोत ही बाब गुप्त का ठेवली ह्यावर मात्र जे.थाॅमस लूनीने कोणतेही कारण किंवा पुरावा दिला नाही.

वरील कारणांशिवाय आणखी एक बाब अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या विरुद्ध जाते. त्याच्याच आश्रयाखाली एक नाटक कंपनी होती. त्याच कंपनीला त्याने आपली नाटके का दिली नाहीत? ‘लाॅर्ड चेम्बरलेनस् मेन’ह्या शेक्सपिअर काम करत असलेल्या कंपनीला का द्यावीत? त्याचेही उत्तर लूनी आपल्या पुस्तकात देत नाही. (मला वाटते की आपल्याच कंपनीला त्याने ती दिली असती तर त्या नाटकात व्यक्त झालेली राजकीय बाजू ह्यानेच मांडली व हा त्या मतांचा पुरस्कार करतो हे राज्यकर्त्यांना लक्षात येणे सोपे गेले असते!) पण ह्यापेक्षाही अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर नाही ह्याचा पटण्यासारखा आणखी एक पुरावा म्हणजे हा अर्ल १६०४सालीच मरण पावला होता. आणि शेक्सपिअरची The Tempest , Macbeth इतरही काही नाटके त्या नंतरची आहेत! ह्यावर आॅक्सफर्डवादी म्हणतात की ही नाटके त्याने आपल्या मृत्यु अगोदरच लिहून ठेवली असावीत. किंवा त्या पुस्तकांवर प्रयोगाच्या तारखा चुकीच्या असाव्यात. ही नाटके आॅक्सफर्डच्या अर्लचा मृत्यु होण्यापूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. ह्या युक्तिवादात थोडे तथ्य आहे. कारण त्या काळी स्पर्धेमुळे प्रयोग लावण्याची जेव्हढी तातडी असे, तेव्हढीच घाई नव्यानेच व झपाट्याने पुढे येत असलेल्या छपाई व प्रकाशनाच्या व्यवसायाला quarter पुस्तके छापून ती लवकरात लवकर प्रसिदध करण्याची घाईसुद्धा तितकीच असे!

दोन्ही बाजूचे म्हणणे काही असो, सर फ्रान्सिस बेकन हाच शेक्सपिअरचा खरा लेखक असावा ह्या मताला जसा थोरामोठ्यांचा पाठिंबा मिळाला तसे Earl of Oxford हाच शेक्सपिअरचा पडद्यामागील खरा लेखक होता असे म्हणणाऱ्यांत नोबेल पारितोषिक विजेता जाॅन गाॅल्सवर्दी, मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राॅईड, प्रख्यात अमेरिकन शेक्सपिरियन नट आॅर्सन वेल्स आणि डेरेक जेकब अशा थोरामोठ्या व्यक्तींनीही आॅक्सफर्डला शेक्सपिअर म्हणून उचलून धरले.

ह्या दोन मोठ्या व्यक्तींच्या पाठोपाठ ‘खरा शेक्सपिअर हाच’ म्हणून शेक्सपिअरचा समकालीन प्रसिद्ध नाटककार ख्रिस्टोफर मार्लोचे नाव पुढे येते.पण त्याच्या नावाला फार कुणाचा पाठिंबा मिळाला नाही.

त्यानंतर एक जबरदस्त आणि अनुरुप नाव समोर आले ते म्हणजे मेरी सिडनी, Countess of Pembroke,
हिचे. ही खरी शेक्सपिअर असली पाहिजे अशी चर्चा सुरु झाली. मेरी सिडनीवादी संशोधकांचा युक्तिवाद असा की शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह First Folio हा अर्ल आॅफ पेम्ब्रोक आणि माॅन्टगोमरी ह्यांना अर्पण करण्यात आला आहे. हे दोघेही काउन्टेस मेरी सिडनीची मुले! ह्या काऊन्टेसचे घर जमीनजुमला मिळकत स्ट्रॅटफर्ड येथेच म्हणजे शेक्सपिअरच्या गावीच होती! वरील दोन गोष्टींमुळे ती शेक्सपिअर असण्याची दाट शक्यता आहे असे मानले जाते. तिची बाजू आणखी भक्कम करतात ते मुद्देही लक्षात घ्यावे लागतील असेच आहेत. ती चांगली शिकलेली, विद्वान आणि सुंदर होती. तिचा भाऊसुद्धा कवि होता. तसेच तिचे काका राॅबर्ट डड्ले हेसुद्धा अर्ल होते. साहित्यिकांत तिच्या चांगल्या ओळखी होत्या.Edmund Spenser सारख्या कवीने आपली कविताही तिला अर्पण केली आहे. पण साहित्याची आवड असूनही तिचे स्वत:चे असे काहीही साहित्यिक लेखन नाही. त्यामुळेही तिचे नाव नंतर ह्या स्पर्धेतून मागे पडले.

एक मतप्रवाह असा आहे की शेक्सपिअर, कायदा, राजदरबार व राजकारण, न्यायालयीन कामकाज,वैद्यक आणि इतर अनेक लहान मोठ्या क्षेत्राचे इतके चौफेर ज्ञान असलेला एकच चतुरस्त्र माणुस असणे शक्य नाही. चार पाच प्रतिभावान, तज्ञ, जाणकारांनी मिळून ती नाटके लिहिली असण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यासाठी अनेक नावे समोर येतात. Countess of Pembroke उर्फ मेरी सिडनी, तिचा भाऊ सर फिलिप सिडनी, सर फ्रन्सिस बेकन, सर वाॅल्टर रॅले. पण ह्या मताला आणि नावांना पुष्टी देणारा पुरावा मिळत नाही. शिवाय इतक्या व्यक्ति ह्यामध्ये गोवल्या असतील तर ही माणसे इतकी वर्षे हे गुपित कसे राखू शकतील? अशक्य.

शेक्सपिअर हा नाटककार होता की नाही? शेक्सपिअरच्या नावाने ही नाटके लिहिणारा खरा लेखक कोण? ह्या प्रश्नाचे संशोधन करणारी व आपापले “खरा शेक्सपिअर “कोण हे सांगणाऱ्या पाच हजाराच्या वर पुस्तकातून सुमारे पन्नास नावे समोर येतात. त्या पुस्तकातील मते, प्रमेये, शंका, चर्चा यामध्ये एक ठळक व समान विचार असा की, शेक्सपिअरची शिक्षणासहित एकूण पार्श्वभूमी पाहिली आणि त्याची व्यक्ति म्हणून अशी फारशी माहितीही आढळत नाही, त्यावरून शेक्सपिअर येव्हढा बुद्धिमान व इतका प्रतिभशाली असणे शक्य नाही ! त्यामुळे ही उत्कृष्ठ नाटके त्याने लिहिलीच नसावीत. ह्या मतांतूनच किंवा शिक्षण, शहरे, खेडेगाव ह्या संबंधातील पूर्वग्रहातून त्याच्याविषयी हे संशयाचे मोहोळ उठले असावे.

शेक्सपिअर हा अशिक्षित, गावंढळ नव्हता. अगदी सामान्य घरातलाही नव्हता. त्याच्या वडलांचा व्यापार-व्यवसाय होता. आपला स्वभाव, व्यवहार कुशलता, बुद्धिचातुर्य, ह्यामुळे लोकांचा पाठिंबा असलेली ती व्यक्ति होती. गावचे ते नगराध्यक्ष होते. म्हणजे शेक्सपिअर गावात प्रतिष्ठा असलेल्या घरातील होता. आणि असा काही निसर्ग-नियम किंवा कोणी राज्यकर्त्याने कायद्याने बनवलेला नियम आहे की लेखक, साहित्यिक, व्यापारी, उद्योजक किंवा कलावंत होण्यासाठी उच्च शिक्षण आणि किंवा थोरा मोठ्यांचे घराणेच हवे ! पाश्चात्य देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातीलही बऱ्याच प्रतिभावंत लेखक कवींची नावे वाचल्यावर कोणत्याही कलेसाठी आणि त्यात नामवंत प्रख्यात होण्यासाठी उच्चच काय फारसे शिक्षण हवे असे बंधन नाही.सर्जनशीलतेला ह्या अटी लागू होत नाहीत!

सर्वकालीन श्रेष्ठ मानले जाणारे रशियन कादंबरीकार फ्योडोर दोस्ताव्हस्की, मॅक्झिम गाॅर्की कोणत्या काॅलेजात गेले होते.? गाॅर्कील् तर शाळा माहितही नव्हती. आजही त्यांची Crime and Punishment, Brothers Karamazov किंवाMy Childhood, My University Days, ही पुस्तके व Mother ह्या कादंबऱ्या वाचल्या जातात; अभ्यासल्या जातात. पोर्च्युगीज लेखक होझे सेरामागो( Saramago) ह्याला गरीबीमुळे मध्येच शाळा सोडावी लागली. तो यंत्र-दुरुस्तीचे काम शिकला. कामंही करु लागला. पण खरी आवड लिहिण्याची होती. लिहित राहिला. त्याच्या बऱ्याच कादंबऱ्यामुळे त्याचे परदेशातही नाव झाले; त्या वाचकप्रियही झाल्या, आणि १९९६ साली त्याला वाड.मयाचे नोबेल पारितोषिकही मिळाले! ह्या लेखकांसारखे आमचे श्रेष्ठ कवि, शाहिर, कादंबरीकार नारायण सुर्वे, शाहिर अण्णाभाऊ साठे ह्यांनी शाळेचा उंबरा पाहिला असेल नसेल पण तेही उघड्या जगाच्या बिनभिंतीच्या विद्यापीठातच शिकले. आधुनिक वाल्मिकी, प्रतिभावान कवि, चित्रपटकथा लेखक, श्रेष्ठ गीतकार, गदिमाआणि त्यांचे तितकेच उत्तम कथाकार, बनगरवाडी सारखी जागतिक दर्ज्याची कादंबरी लिहिणारे, माणदेशी माणसं सारखी अस्सल देशी लेणे ठरलेली,शब्दसामर्थ्याने सामान्यांना असामान्य बनवणारे भाऊ, व्यंकटेश माडगूळकर ह्यांनी हायस्कूल पाहिलेही नाही! लक्ष्मीबाई टिळक लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मुळाक्षरे लिहायला शिकल्या. त्यातूनच “स्मृतिचित्रे” सारखे आठवणीवजा अजरामर आत्मचरित्र निर्माण झाले. कितीजणांची नावे घ्यायची, आपल्या कडील किंवा परदेशातील प्रतिभावंतांची! उच्च शिक्षण नाही, खेडेगावातला म्हणून शेक्सपिअची नाटके त्याची नव्हेतच ह्या आक्षेपाला तसा काहीही अर्थ नाही.

शेक्सपिअरची बालपणापासून ते१८-२० वर्षे ज्या लहान गावात गेली ते अनुभव, ते दिवस, त्याच्या नाटकातही दिसतात. जोनाथन बेटने Cymbeline नाटकातील उदघृत कलेले शेक्सपिअरचे दोन ओळीचे काव्य पहा- “Golden lads and girls all must/ As chimney sweepers, come to dust ,” ह्या ओळींना आणखी वजन येते जेव्हा आपल्या लक्षात येते की वाॅर्विकशायरमध्ये सोळाव्या शतकात डॅंडलियनचे फुल येताना त्याला golden lad म्हणतआणि त्याच्या बिया इतस्तत: पसरणारा तो धुराडे स्वच्छ करणारा असतो. हे संदर्भ कोण वापरेल.? खेड्यात वाढलेला की राजवाड्यात, दरबारातच ज्याचा वावर असलेला? तसेच जेव्हा फाॅलस्टाफ ( सर जाॅन फाॅलस्टाफ ही व्यक्तिरेखा Henry IV part 1 आणि २मध्ये आहे.) आपल्याविषयी, as a boy I was small enough to creep into any alderman’s thumb ring” सांगतो तेव्हा हा अतिशयोक्त दृष्टान्त कुणाल सुचेल? एखाद्या सरदाराच्या मुलाला का ज्याचे वडीलच नगरपरिषदेचे (alderman) सभासद, उपमहापौर, महापौर होते त्या शेक्सपिअरला? शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्डमध्ये मेंढ्यांची लोकर व कातडे ह्यांचा बाजार भरत असे. त्या पासून निरनिराळ्या वस्तु बनविण्याचा उद्योगही तिथे चालत असे. त्यामुळे त्याला ह्या वस्तूंची, त्या कशा बनवतात त्याची स्वाभाविकच माहिती होती. त्याच्या नाटकात बरेच वेळा Skin greasy fells, ( मेंढ्याच्या लोकरी चा थर, त्या खालची कातडी, त्याचा अातील थर,) neat’s oil ( कातडे कमावण्यासाठी, मऊ पडावे ह्यासाठी चरबीपासून केलेले तेल; जुना मूळ अर्थ गाय, जनावरे) चर्मकाराच्या बोलण्यात येणारे शब्द येतात.आणि त्याला हेसुद्धा माहित होते की lute string(तंतू वाद्य व त्याच्या तारा) ह्या गाईच्या आतड्यांपासून करतात तर bow string घोड्याच्या केसाचे असतात! त्याचे वडीलही कातड्याचे हातमोजे पायमोजे वगैरे वस्तू तयार करण्यात वाकबगार होते. अशा तऱ्हेने त्याचे स्ट्रॅटफर्ड गाव ह्या ना त्या रुपात त्याच्या अनेक नाटकात डोकावत असते. सुखवस्तु शहरी पांढरपेशांना हे जमेल का? इथे आपल्याला व्यंकटेश, आणि गदिमा किंवा नारायण सुर्वे ह्यांच्या लिखाणाची आठवण येते.

सर्व रसिक वाचकांना, नाटकवेड्या प्रेक्षकांना, शेक्सपिअरच्या किंवा त्याच्या नाटकांच्या चाहत्यांना शेक्सपिअर कोण होता, तो खरा होता की दुसराच कोणी लेखक होता ह्यापेक्षा त्याच्या हॅम्लेट, रोमियो ज्युलिएट काॅमेडी आॅफ एरर्स, आॅथेल्लो अाणि इतर गाजलेली नाटके पाहण्यात, वाचण्यात, त्यातील खलनायक इयागो(Iago) जेव्हा माणसाचे गुण सद्गुणाविषयी बोलतो, A Virtue ! a fig ! ‘Tis in ourselves that we are thus or thus. Bodies are our gardens, to which our wills are gardeners…. If the balance of our lives had not one scale of reason to poise another of sensuality the blood and baseness of our natures would conduct us to most preposterous conclusions; but we have reason to cool our raging motions,..” अशी स्वगते ऐकताना हे खलनायकाचे विचार? असे वाटू लागते. त्याने दिलेली, “Some are born great,
some achieve greatness , and some have greatness thrust upon them !” किंवा जगातल्या सर्व प्रेमिकांचा अनुभव सांगणारे सार , The course of true love never did run smooth !” अशा रुढ केलेल्या सुभाषितांसारख्या वाक्यांचा रसास्वाद घेण्यात खरा आनंद आहे. आणि तो आनंद अक्षय टिकणारा आहे.
शेक्सपिअरसंबंधी झालेले इतके वाद चर्चा वाचल्यावर आपण सामान्य वाचक आणि त्याचे चाहते त्याच्याप्रमाणेच अखेर “जग ही एक रंगभूमीच आहे. ज्याला जी भूमिका मिळाली त्याला ती करावी लागते” काही श्रेष्ठ नटांना कधी दुहेरी भूमिका करण्याचीही संधी मिळते तसे शेक्सपिअरचे झाले असावे. काय सांगावे!

ज्युलियेट म्हणते त्याप्रमाणे “ नावात काय आहे? गुलाबाला दुसऱ्या कोणत्याही नावाने ओळखले तरी त्याचा मधुर सुगंध तोच असतो!” शेक्सपिअर कोणत्याही नावाने ओळखला गेला तरी त्याच्या नाटकातील प्रतिभा- सामर्थ्य, भाषासौदर्य, त्याचे भाषा प्रभुत्व, प्रभावी संवाद, काव्य, मानवी स्वभावाचे सत्य याची मोहिनी रसिकांवर निरंतर चिरकाल राहिल!

खरा शेक्सपिअर कोण?

रेडवुड सिटी

शेक्सिअरविषयी इतके तोंड भरभरून लिहिले जाते, त्याच्याविषयी इतके बोलले लिहिले गेल्यावरही शेक्सपिअरची नाटके त्यांनी लिहिलीच नाहीत ;
दुसऱ्याच कुणीतरी ती लिहिली आहेत, असे म्हणणारे अनेक संशोधक समीक्षक लेखक आहेत. त्याच्यावर जितके गौरवपर लिहिले जाते तसे “शेक्सपिअर” हा दुसराच कोणीतरी असावा ही शंकाही कायम व्यक्त केली जाते. इतके रामायण ऐकल्यावर रामाची सीता कोण? असा प्रश्न विचारणाऱ्यांइतके हे टीकाकार अनभिज्ञ नाहीत. खरा “शेक्सपिअर” कोण असावा असे वाटणारे अंदाजे पन्नास उमेदवार तरी ‘बाशिंग’ बांधलेले आढळतात. पण त्यापैकी अनेक जणांच्या पात्रतेबद्दल लगेच आक्षेप घेता येतात त्यामुळे ते बहुसंख्य आपोआप स्वयंवर मंडपातून बाहेर जातात!

शेक्सपिअरची नाटके ही शेक्सपिरने लिहिलीच नाहीत असे ठामपणे सांगणारी थोडी थोडकी नाही तर पाचहजारांच्यावर पुस्तके आहेत! शेक्सपिअरची नाटके वाचल्यावर कायदा , वैद्यकीय ज्ञान, राजकीय बाबी, मुत्सद्दीपणा, कोर्टातील कामकाज, ल्ष्करी घडामोडी, ह्या व इतर अनेक गोष्टींचे ज्ञान असलेल्या माणसाने, विविध क्षेत्रातील तज्ञाने लिहिली असावीत ही खात्री वाटते. पण एकच व्यक्ति इतक्या निरनिराळ्या व परस्परांत फारसा संबंध नसलेल्या विषयात तज्ञ असणे शक्य नाही हेही माहित असते. त्यातूनच पुढे कुणा एका लेखकाने ही नाटके लिहिली नसावीतहा विचार बळावतो.त्या दृष्टीनेही हे संभाव्य लेखक कोण ह्यावर तर्कवितर्क होऊन पुस्तके लिहिली गेली आहेत. शेक्सपिअर हा लेखक नसावा ही शंका येण्यामागे आणखी एक मोठे महत्वाचे व व्यवहारात नेहमीच्या समजांवर आधारलेले कारणही असावे. ते म्हणजे शेक्सपिअर हा खेडेगावात वाढलेला, तिथेच शिकलेला ही पार्श्वभूमी असलेला. बरे जग पाहिलेला, किंवा ह्या अगोदर लिखाण केलेला,साहित्य प्रसिद्ध झालेला किंवा साहित्यिक वर्तुळात माहित असलेला असाही तो नव्हता. केंब्रिज किंवा आॅक्सफर्ड मध्ये शिकलेला तर नव्हताच नव्हता. नेहमीच्या वापरातील शब्द वापरायचा तर असा गावंढळ माणूस इतक्या तोलामोलाची एक दोन नाही तर ३६-३७ नाटके नाटके लिहिलच कसा? असा अनेक संशोधकाचा संशय आणि मत आहे. कुणा एका बुद्धिमान आणि प्रतिभेची देणगी असलेल्या माणसाचे हे कर्तृत्व असले पाहिजे. राजकीय, सामाजिक कारणांमुळे त्याने आपली नाटके शेक्सपिअरच्या नावाने लिहिली असावीत असे ठाम मत असणारेही आहेत. शेक्सपिअर हा रंगभूमीवर नट म्हणूनही सर्वांना माहित होता. त्याचा साहित्याशी म्हणायचा तर तेव्हढा एक संबंध दाखवता येतो.

अमेरिकेतील पीबीएस ह्या प्रतिष्ठित व विश्वसनीय अशा वाहिनीने १९९६ साली ह्या प्रश्नावर एक तासाचा लघुपट काढला होता. त्यात शेक्सपिअरची समजली जाणारी नाटके शेक्सपिअरची नाहीत हा निष्कर्ष निघतो असे सुचवले आहे. न्यूयाॅर्क टाईम्स्, हार्पर्स मॅगझिन ह्यांनीही हा संशय प्रकट करण्यासाठी पुष्कळ रकाने खर्च केले आहेत. स्मिथ्सोनियन सारख्या मोठ्या संस्थेनेही २००२ साली “शेक्सिअरचा लेखक कोण?” हा मोठा परिसंवाद आयोजित केला होता. पण शेक्सपिअरविरुद्ध लिहिणाऱ्या, आपली मते हिरिरीने मांडणाऱ्या सर्वांचे पुरावे हे तकलादू, परस्परविरोधी आहेत.धूर्तपणणे लोकांच्या भावनेशी खेळण्याची ही एक विद्वत्तापूर्ण पद्धत आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे असा शेक्सपिअरच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आरोप आहे.

Concordia Uni. आॅरेगन मधील प्रां.डॅनियल राईट हार्पर्स मॅगझिनमधील लेखात म्हणतात, “ शेक्सपिअर हा एक फारसा शिक्षित नव्हता, लोकर आणि धान्य्च दुकानदार आणि साहित्यिक जगताशीच नाही तर एखाद्या वाड•मय मंडळाशीही संबंधित नव्हता.”पण ही काल्पनिक विधाने आहेत” अशी ह्या आक्षेपांची बोळवण केली जाते. आणि ह्या प्रत्युत्तरात तथ्य आहे. शेक्सपिअर हा दुकानदार व्यापारी नव्हता. चांगल्या घरातला होता. वडिल नगरपरिषदेचे महापौर होते. त्याचे गाव लहान असेल पण महत्वाचे, लोकर व कातड्यांचा व्यापार व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे ते गाव होते. शिक्षण त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे पुरेसे आठ वर्षे घेतले होते. हां, महाविद्यालयीन कोणतेही शिक्षण नव्हते इतके मात्र म्हणता येईल.

History Today हे विद्वानांत व वाचकांतही मान्यता मिळालेले दर्जेदार पुस्तक आहे. त्यामध्ये लेखक विल्यम डी. रुबिन्स्टाईनने लिहिले आहे की,” त्यावेळच्या सर्वमान्य कागदपत्रांत शेक्सपिअरचे नाव आढळत नाही की तो एखाद्या पुस्तकाचा कर्ता, लेखक असाही कोठे उल्लेख दिसत नाही.” ह्या म्हणण्यात थोडेफार तथ्य आहे. पण त्याच्या साॅनेटची एक पुस्तिका प्रकाशित झाली होती. तसेच नाटकांच्या घाई गर्दीच्या त्याच्या काही नाटकांची quarter books प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली. त्यावर शेक्सपिअरचे कर्ता म्हणून नाव छापले होते; शेक्सपिअरचे समर्थक दाखवतात. पण त्याही पेक्षा एलिझाबेथ राणीच्या आणि किंग जेम्सच्या काळी राजवाड्यात शेक्सपिरची कंपनी आपली नाटके करत असे. जेम्सच्या काळी तर त्याच्या नाटकांचे राजांसाठी १८७ प्रयोग झाले होते. राजवाड्याच्या दप्तरांत ह्यांची नोंद होत असे. त्या अधिकृत नोंदणींच्या कागदपत्रात विशेषत: १६०४ आणि १६०५ साली शेक्सपिअरच्या नाटकाचीन नावे व लेखक विल्यम शेक्सपिअर असे उल्लेख स्पष्टआढळतात. हे असो, पण शेक्सपिअरचा विरोधी, लेखक, नाटककार ,राॅबर्ट ग्रीन त्याने आपल्या Groat’s-Worth of Wit ह्या पुस्तकातप्रथम शेक्सपिअरची केवळ एक नट पण नाटककार स्वत:ला नाटककार म्हणवून घेतो असा शेक्सपिअरला टोला मारला आहे ,पण नंतर त्याने तसे म्हटले ही माझी चूक होती असे म्हणत तो एक चांगला नाटककार आहे असेही म्हटले आहे. शेक्सपिअरचा तज्ञ, विद्वान जोनथन बेट काय म्हणतो तेही ध्यानात घ्यावे लागेल. तो म्हणतो, “शेक्सपिअरचा मृत्यु होऊन दोनशे वर्षे उलटून जाईपर्यंत शेक्सपिअर हा नाटककार लेखक नव्हता असे कोणीही म्हटले नाही की लिहिलेही नाही!”

शेक्सपिअर हा लेखक किंवा नाटककार नव्हता असे प्रथम १७८५ साली इंग्लंडमधील वाॅर्विकशायरच्या रेव्हरंड जेम्स विल्माॅटने मत मांडले होते. पण ते कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. सुमारे १८४५ते ५० ह्या दरम्यानच्या काळापासून अमेरिकेची डेलिया बेकन हिने शेक्सपिअर हा नाटककार नव्हता ह्यावर संशोधन चालू केले होते. शेक्सपिअर हा त्याच्या नाटकांचा लेखक नसून, खरा लेखक सर फ्रान्सिस बेकन आहे असे खळबळजनक विधान ठामपणे करणारी अमेरिकन बाई डेलिया बेकनला ते श्रेय जाते. तिच्या ह्या मताला राल्फ वुल्डो इमर्सन, वाॅल्ट व्हिटमन, एडगर अॅलन पो, नॅथनियल हाॅथर्न, मार्क ट्वेन, हेलन केलर ह्यासारख्या अमेरिकेतील नामवंत लेखक, कथालेखक,कवि, तत्वज्ञांचा पाठिंबा मिळत गेला. ती १८५३साली इंग्लंडमध्ये ह्यविषयावर संशोधन करायला गेली. जाताना इमर्सनने तिला इंग्लंड मधील लेखक तत्वज्ञ इतिहासकार थाॅमस कार्लाईलला तिची शिफारस करणारे आपले ओळखपत्र दिले होते. कार्लाईलने तिची राहण्याची वगैरे सोय करून दिली शिवाय इंग्लंडमधील विद्वानांची ओळख करून देतो अशीही तयारी दाखवली होती. तिने दोन वर्षे राहून फ्रान्सिस बेकनने ज्या ज्या ठिकाणी काळ व्यतित केला, तिथे जाऊन,राहून अभ्यास केला. पाचवर्षानंतर १८५७ साली ती अमेरिकेत परतली. त्याच वर्षी तिने आपला The philosophy of the Plays of Shakespeare Unfolded हा ६७५ पानांचा भलामोठा ग्रंथ प्रसिद्ध केले. वाचायला अत्यंत कंळवाणाआणि किचकट असे हे पुस्तक आहे. ह्या ६७५ पानात तिने एकदाही शेक्सपिअरच्या नाटकांच्या लेखका संबंधात फ्रान्सिस बेकनचा स्पष्ट उल्लेख केला नाही. पण वर उल्लेखिलेल्या नामवंतांचा तिला पाठिंबा मिळत गेला. पण वाचकांना संदर्भा संदर्भाने बेकन हा त्या नाटकांचा लेखक असावा असा निष्कर्ष काढता येतो.

खरा लेखक कोण किंवा कोणी तीनचारजणांनी मिळून लिहिले ह्या विषयी भाषाशास्त्राचे तज्ञ, भाषाशैलीचे विश्लेषक ह्यांचेही संशोधन चालू होते. ह्यांमध्ये आणखी तज्ञांची भर पडली म्हणजे गुप्त लिपी, भाषा वापरली आहे का ह्याचा अभ्यास सुरू झाला. युद्धात शत्रूचे गुप्तलिपीतील संदेश-पद्धती उघड करणारे तज्ञ असतात. तसे ह्या कामी तेही ह्यात उतरले. Ignatius Donnellyने जी पद्धत वापरून more low or shak’st-spur never writ a word (“शेक्सपिअरने हेलिहिले नसून मार्लोने लिहिला”) असे उघड केले त्याला, रेव्हरंड निकोल्सनने डाॅनेलीचीच पद्धत वापरून “master Will-I-am shak’st -spurr” (विल्यम शेक्सपिअरने लिहिले असे सिद्ध करून, प्रत्युत्तर दिले !

पण प्रसिद्ध तत्वज्ञ, राजकारणी,मुत्सद्दी शास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, सर फ्रान्सिस बेकनने ही नाटके लिहिली नाहीत त्यासाठीचा पुरावा म्हणजे बेकनला नाटके आणि तसले करमणुकीचे प्रकार अजिबात आवडत नव्हते. त्याने आपल्या अनेक निबंधात नाटके आणि तसले साहित्य म्हणजे बौद्धिक सवंगपणा व हीन अभिरुचीचे निदर्शक साहित्य प्रकार आहेत अशी खरमरीत टीका केली आहे !

१९१८ मध्ये गेटशेड (इंग्लंड) येथील शाळेतील शिक्षक जे. थाॅमस लूनीने पडद्याआडचा खरा शेक्सपिअर म्हणजे Earl of Oxford म्हणजेच Edward de Vere हा असल्याचे आपल्या Shakespeare Identified ह्या पुस्तकात मांडले. अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर असण्यासाठी योग्य उमेदवार होता. शिकलेला, हुषार, तसेच कवि आणि नाटककार म्हणूनही ओळखला जात असे. पण वस्तुस्थिती अशी आहे की शेक्सपिअरची कविता,नाटके म्हणून आजही जी ओळखली जातात त्याच्या पासंगालाही ह्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या कविता नाटके पुरणार नाहीत ! पण त्याची जमेची बाजू म्हणजे त्याने जग पुष्कळच पाहिले होते. खूप प्रवास केला होता. त्याला इटालियन चांगले येत होते. अर्ल असल्यामुळे दरबारी रीतिरिवाज, आणि राजकारणाची उत्तम माहिती होती. या शिवाय बराच काळ राणी एलिझाबेथच्या मर्जीतलाही होता.

अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हाच शेक्सपिअरचा खरा शेक्सपिअर असण्याबाबत आणखी एक महत्वाची बाब आहे. शेक्सपिअरच्या सर्व नाटकांतून धीरगंभीरपणा, खेळकर विनोद, सहृदयता, स्वभावातीस शांत आणि स्थिरपणा तसेच सामान्य व्यवहारी शहाणपण हे जाणवत असते. ह्या सर्व स्वभावविशेषांच्या विरुद्ध अर्ल आॅफ आॅक्सफर्ड होता ! तो उतावळा, शीघ्रकोपी, उद्दाम बेजबाबदार आणि हिंसा करायलाही मागेपुढे न पाहणारा होता. सतरा वर्षाचा असताना त्याने आपल्या घरगड्याला ठार मारले होते. पण अर्ल असल्यानुळे आणि राजदरबारात वजन असल्यामुळे तो सुटला. अशा स्वभावाचा असलेल्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डने आपणच शेक्स्पिअरचे खरे लेखक आहोत ही बाब गुप्त का ठेवली ह्यावर मात्र जे.थाॅमस लूनीने कोणतेही कारण किंवा पुरावा दिला नाही.

वरील कारणांशिवाय आणखी एक बाब अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या विरुद्ध जाते. त्याच्याच आश्रयाखाली एक नाटक कंपनी होती. त्याच कंपनीला त्याने आपली नाटके का दिली नाहीत? ‘लाॅर्ड चेम्बरलेनस् मेन’ह्या शेक्सपिअर काम करत असलेल्या कंपनीला का द्यावीत? त्याचेही उत्तर लूनी आपल्या पुस्तकात देत नाही. (मला वाटते की त्याने आपल्याच कंपनीला त्याने ती दिली असती तर त्या नाटकात व्यक्त झालेली राजकीय बाजू ह्यानेच मांडली व हा त्या मतांचा पुरस्कार करतो हे राज्यकर्त्यांना लक्षात येणे सोपे गेले असते! शिवाय जर शेक्पसपिअरच्या नावाखाली त्याने ती लिहिली असतील तर शेक्सपिअरच्या कंपनीला ती प्रयोगासाठी देणे हे जास्त सयुक्तिक आहे.) ह्यापेक्षाही अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर नाही ह्याचा पटण्यासारखा आणखी एक पुरावा म्हणजे हा अर्ल १६०४सालीच मरण पावला होता. आणि शेक्सपिअरची उदा.The Tempest , Macbeth इ. बरीच नाटके त्या नंतरची आहेत! ह्यावर आॅक्सफर्डवादी म्हणतात की ही नाटके त्याने आपल्या मृत्यु अगोदरच लिहून ठेवली असावीत. किंवा त्या पुस्तकांवर प्रयोगाच्या तारखा चुकीच्या असाव्यात. ही नाटके हा आॅक्सफर्डचा अर्ल मृत होण्यापूर्वीही झाली असण्याची शक्यता आहे. ह्या युक्तिवादात तथ्य आहे. कारण त्या काळी स्पर्धेमुळे प्रयोग लावण्याची जेव्हढी तातडी असे, तेव्हढीच घाई नव्यानेच व झपाट्याने पुढे येत असलेल्या छपाई व प्रकाशनाच्या व्यवसायाला quarter पुस्तके छापून ती लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची घाईसुद्धा तितकीच असे!

दोन्ही बाजूंचे म्हणणे काही असो, सर फ्रान्सिस बेकन हाच शेक्सपिअरचा खरा लेखक असावा ह्या मताला जसा थोरामोठ्यांचा पाठिंबा मिळाला तसे Earl of Oxford हाच शेक्सपिअरचा पडद्यामागील खरा लेखक होता असे म्हणणाऱ्यांत नोबेल पारितोषिक विजेता प्रख्यात कादंबरीकार व नाटककार गाॅल्सवर्दी, मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राॅईड, प्रख्यात अमेरिकन शेक्सपिरियन नट आॅर्सन वेल्स आणि डेरेक जेकब अशा थोरामोठ्या व्यक्तींनीही आॅक्सफर्डला शेक्सपिअर म्हणून उचलून धरले.

ह्या दोन मोठ्या व्यक्तींच्या पाठोपाठ ‘खरा शेक्सपिअर हाच’ म्हणून शेक्सपिअरचा समकालीन प्रसिद्ध नाटककार ख्रिस्टोफर मार्लोचे नाव पुढे येते.पण त्याच्या नावाला फार कुणाचा पाठिंबा मिळाला नाही.

त्यानंतर एक जबरदस्त आणि अनुरुप नाव समोर आले ते म्हणजे मेरी सिडनी, Countess of Pembroke,
हिचे. ही खरी शेक्सपिअर असली पाहिजे अशी चर्चा सुरु झाली. मेरी सिडनीवादी संशोधकांचा युक्तिवाद असा की शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह First Folio हा अर्ल आॅफ पेम्ब्राॅक आणि माॅन्टगोमरी ह्यांना अर्पण करण्यात आला आहे. हे दोघेही काउन्टेस मेरी सिडनीची मुले! ह्या काऊन्टेसचे घर जमीनजुमला मिळकत स्ट्रॅटफर्ड येथेच म्हणजे शेक्सपिअरच्या गावीच होती! वरील दोन गोष्टींमुळे ती शेक्सपिअर असण्याची दाट शक्यता आहे असे मानले जाते. तिची बाजू आणखी भक्कम करणारे मुद्देही लक्षात घ्यावे लागतील असेच आहेत. ती चांगली शिकलेली, विद्वान आणि सुंदर होती. तिचा भाऊसुद्धा कवि होता. तसेच तिचे काका राॅबर्ट डड्ले हेसुद्धा अर्ल होते. साहित्यिकांत तिच्या चांगल्या ओळखी होत्या.Edmund Spenser सारख्या कवीने आपली कविताही तिला अर्पण केली आहे. पण साहित्याची आवड असूनही तिचे स्वत:चे असे काहीही साहित्यिक लेखन नाही. त्यामुळेही तिचे नाव नंतर ह्या स्पर्धेतून मागे पडले.

एक मतप्रवाह असा आहे की शेक्सपिअर, कायदा, राजदरबार व राजकारण, न्यायालयीन कामकाज,वैद्यक आणि इतर अनेक लहान मोठ्या क्षेत्राचे इतके चौफेर ज्ञान असलेला एकच चतुरस्त्र माणुस असणे शक्य नाही. चार पाच प्रतिभावान, तज्ञ, जाणकारांनी मिळून ती नाटके लिहिली असण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यासाठी अनेक नावे समोर येतात. Countess of Pembroke उर्फ मेरी सिडनी, तिचा भाऊ सर फिलिप सिडनी, सर फ्रन्सिस बेकन, सर वाॅल्टर रॅले. पण ह्या मताला आणि नावांना पुष्टी देणारा पुरावा मिळत नाही. शिवाय इतक्या व्यक्ति ह्यामध्ये गोवल्या असतील तर ही माणसे इतकी वर्षे हे गुपित कसे राखू शकतील? अशक्य.

शेक्सपिअर हा नाटककार होता की नाही? शेक्सपिअरच्या नावाने ही नाटके लिहिणारा खरा लेखक कोण? ह्या प्रश्नाचे संशोधन करणारी व आपापले “खरा शेक्सपिअर “कोण हे सांगणाऱ्या पाच हजाराच्या वर पुस्तकातून सुमारे पन्नास नावे समोर येतात. त्या पुस्तकातील मते, प्रमेये, शंका, चर्चा यामध्ये एक ठळक व समान विचार असा की, शेक्सपिअरची शिक्षणासहित एकूण पार्श्वभूमी पाहिली आणि त्याची व्यक्ति म्हणून अशी फारशी माहितीही आढळत नाही, त्यावरून शेक्सपिअर येव्हढा बुद्धिमान व इतका प्रतिभशाली असणे शक्य नाही ! त्यामुळे ही उत्कृष्ठ नाटके त्याने लिहिलीच नसावीत. ह्या मतांतूनच किंवा शिक्षण, शहरे, खेडेगाव ह्या संबंधातील पूर्वग्रहातून त्याच्याविषयी हे संशयाचे मोहोळ उठले असावे.

शेक्सपिअर हा अशिक्षित, गावंढळ नव्हता. अगदी सामान्य घरातलाही नव्हता. त्याच्या वडलांचा व्यापार-व्यवसाय होता. आपला स्वभाव, व्यवहार कुशलता, बुद्धिचातुर्य, ह्यामुळे लोकांचा पाठिंबा असलेली ती व्यक्ति होती. गावचे ते नगराध्यक्ष होते. म्हणजे शेक्सपिअर गावात प्रतिष्ठा असलेल्या घरातील होता. आणि असा काही निसर्ग-नियम किंवा कोणी राज्यकर्त्याने कायद्याने बनवलेला नियम आहे की लेखक, साहित्यिक, व्यापारी, उद्योजक किंवा कलावंत होण्यासाठी उच्च शिक्षण आणि किंवा थोरा मोठ्यांचे घराणेच हवे ! पाश्चात्य देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातीलही बऱ्याच प्रतिभावंत लेखक कवींची नावे वाचल्यावर कोणत्याही कलेसाठी आणि त्यात नामवंत प्रख्यात होण्यासाठी उच्चच काय फारसे शिक्षण हवे असे बंधन नाही.सर्जनशीलतेला अशा कोणत्ह्यायाही अटी लागू होत नाहीत!

सर्वकालीन श्रेष्ठ मानले जाणारे रशियन कादंबरीकार फ्योडोर दोस्ताव्हस्की, मॅक्झिम गाॅर्की कोणत्या काॅलेजात गेले होते.? गाॅर्कीला तर शाळा माहितही नव्हती. आजही त्यांच्या Crime and Punishment, Brothers Karamazov किंवाMy Childhood, My University Days, ही पुस्तके व Mother ह्या कादंबऱ्या वाचल्या जातात; अभ्यासल्या जातात. पोर्च्युगीज लेखक होझे सेरामागो( Saramago) ह्याला गरीबीमुळे मध्येच शाळा सोडावी लागली. तो यंत्र-दुरुस्तीचे काम शिकला. कामंही करु लागला. पण खरी आवड लिहिण्याची होती. लिहित राहिला. त्याच्या बऱ्याच कादंबऱ्यामुळे त्याचे परदेशातही नाव झाले; त्या वाचकप्रियही झाल्या, आणि १९९६ साली त्याला वाड.मयाचे नोबेल पारितोषिकही मिळाले! ह्या लेखकांसारखे आमचे श्रेष्ठ कवि, शाहिर, कादंबरीकार नारायण सुर्वे, शाहिर अण्णाभाऊ साठे ह्यांनी शाळेचा उंबरा पाहिला असेल नसेल पण तेही उघड्या जगाच्या बिनभिंतीच्या विद्यापीठातच शिकले. आधुनिक वाल्मिकी, प्रतिभावान कवि, चित्रपटकथा लेखक, श्रेष्ठ गीतकार, गदिमाआणि त्यांचे तितकेच उत्तम कथाकार, बनगरवाडी सारखी जागतिक दर्ज्याची कादंबरी लिहिणारे, माणदेशी माणसं सारखी अस्सल देशी लेणे ठरलेली,शब्दसामर्थ्याने सामान्यांना असामान्य बनवणारे भाऊ, व्यंकटेश माडगूळकर ह्यांनी हायस्कूल पाहिलेही नाही! लक्ष्मीबाई टिळक लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मुळाक्षरे लिहायला शिकल्या. त्यातूनच “स्मृतिचित्रे” सारखे आठवणीवजा अजरामर आत्मचरित्र निर्माण झाले. कितीजणांची नावे घ्यायची, आपल्या कडील किंवा परदेशातील प्रतिभावंतांची! उच्च शिक्षण नाही, खेडेगावातला म्हणून शेक्सपिअची नाटके त्याची नव्हेतच ह्या आक्षेपाला तसा काहीही अर्थ नाही.

शेक्सपिअरची बालपणापासून ते१८-२० वर्षे ज्या लहान गावात गेली ते अनुभव, ते दिवस, त्याच्या नाटकातही दिसतात. जोनाथन बेटने Cymbeline नाटकातील उदघृत कलेले शेक्सपिअरचे दोन ओळीचे काव्य पहा- “Golden lads and girls all must/ As chimney sweepers, come to dust ,” ह्या ओळींना आणखी वजन येते जेव्हा आपल्या लक्षात येते की वाॅर्विकशायरमध्ये सोळाव्या शतकात डॅंडलियनचे फुल येताना त्याला golden lad म्हणतआणि त्याच्या बिया इतस्तत: पसरणारा तो धुराडे स्वच्छ करणारा असतो. हे संदर्भ कोण वापरेल.? खेड्यात वाढलेला की राजवाड्यात, दरबारातच ज्याचा वावर असलेला? तसेच जेव्हा फाॅलस्टाफ ( सर जाॅन फाॅलस्टाफ ही व्यक्तिरेखा Henry IV part 1 आणि २मध्ये आहे.) आपल्याविषयी, as a boy I was small enough to creep into any alderman’s thumb ring” सांगतो तेव्हा हा अतिशयोक्त दृष्टान्त कुणाला सुचेल? एखाद्या सरदाराच्या मुलाला का ज्याचे वडीलच नगरपरिषदेचे (alderman) सभासद, उपमहापौर, महापौर होते त्या शेक्सपिअरला? शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्डमध्ये मेंढ्यांची लोकर व कातडे ह्यांचा बाजार भरत असे. त्या पासून निरनिराळ्या वस्तु बनविण्याचा उद्योगही तिथे चालत असे. त्यामुळे त्याला ह्या वस्तूंची, त्या कशा बनवतात त्याची स्वाभाविकच माहिती होती. त्याच्या नाटकात बरेच वेळा Skin greasy fells, ( मेंढ्याच्या लोकरी चा थर, त्या खालची कातडी, त्याचा अातील थर,) neat’s oil ( कातडे कमावण्यासाठी, मऊ पडावे ह्यासाठी चरबीपासून केलेले तेल; जुना मूळ अर्थ गाय, जनावरे) हे चर्मकाराच्या बोलण्यात येणारे शब्द येतात.आणि त्याला हेसुद्धा माहित होते की lute string(तंतू वाद्य व त्याच्या तारा) ह्या गाईच्या आतड्यांपासून करतात तर bow string घोड्याच्या केसाचे असतात! त्याचे वडीलही कातड्याचे हातमोजे पायमोजे वगैरे वस्तू तयार करण्यात वाकबगार होते. अशा तऱ्हेने त्याचे स्ट्रॅटफर्ड गाव ह्या ना त्या रुपात त्याच्या अनेक नाटकात डोकावत असते. सुखवस्तु शहरी पांढरपेशांना हे जमेल का? इथे आपल्याला व्यंकटेश, आणि गदिमा किंवा नारायण सुर्वे ह्यांच्या लिखाणाची आठवण येते.

सर्व रसिक वाचकांना, नाटकवेड्या प्रेक्षकांना, शेक्सपिअरच्या किंवा त्याच्या नाटकांच्या चाहत्यांना शेक्सपिअर कोण होता, तो खरा होता की दुसराच कोणी लेखक होता ह्यापेक्षा त्याच्या हॅम्लेट, रोमियो ज्युलिएट काॅमेडी आॅफ एरर्स, आॅथेल्लो अाणि इतर गाजलेली नाटके पाहण्यात, वाचण्यात, त्यातील खलनायक इयागो(Iago) जेव्हा माणसाचे गुण सद्गुणाविषयी बोलतो, A Virtue ! a fig ! ‘Tis in ourselves that we are thus or thus. Bodies are our gardens, to which our wills are gardeners…. If the balance of our lives had not one scale of reason to poise another of sensuality the blood and baseness of our natures would conduct us to most preposterous conclusions; but we have reason to cool our raging motions,..” अशी स्वगते ऐकताना ह्या खलनायकाच्या मतावरही विचार कराव लागतो ! शेक्सपिअरची आपल्याला देणगी असलेली ,“Some are born great,some achieve greatness, and some have greatness thrust upon them !” किंवा जगातल्या सर्व प्रेमिकांचा अनुभव सांगणारे सार , The course of true love never did run smooth !” अशा रुढ केलेल्या सुभाषितांसारख्या वाक्यांचा रसास्वाद घेण्यात खरा आनंद आहे. आणि त्याचा आनंद अक्षय टिकणारा आहे.

शेक्सपिअरसंबंधी झालेले इतके वाद प्रतिवाद वाचल्यावर आपण सामान्य वाचक आणि त्याचे चाहते त्याच्याप्रमाणेच अखेर “जग ही एक रंगभूमीच आहे. ज्याला जी भूमिका मिळाली त्याला ती करावी लागते” काही श्रेष्ठ नटांना कधी दुहेरी भूमिका करण्याचीही संधी मिळते तसे शेक्सपिअरचे झाले असावे, इतकेच म्हणू शकतो.

ज्युलियेट रोमियोविषयी म्हणते त्याप्रमाणे “ नावात काय आहे? गुलाबाला दुसऱ्या कोणत्याही नावाने ओळखले तरी त्याचा मधुर सुगंध तोच असतो!” तसा शेक्सपिअरही कोणत्याही नावाने ओळखला गेला तरी त्याच्या नाटकातील प्रतिभेचा विलास, भाषासौदर्य, त्याचे भाषा प्रभुत्व, प्रभावी संवाद, काव्य, विविध मानवी स्वभावाचे सत्य दर्शन यांचीच मोहिनी रसिकांवर निरंतर आणि चिरकाल राहिल!