वेनने आपले पोहण्याचे कपडे घेतले, झटकन दरवाज्याकडे जात आईला म्हणाला,”आई मी मित्राकडे चाललो.” त्याच्यासमोर एकदम येऊन ती उभी राहिली आणि म्हणाली,”हां, हां थांब एक मिनिट;” त्याने डोळ्यावर ओढून घेतलेली टोपी वर सरकावत त्याच्याकडे रोखून पाहात म्हणाली,” परत केव्हा येणार आहेस ते अगोदर सांग.” वेनला काही आश्चर्य वाटले नाही. हे रोजचेच होते त्याच्यासाठी. “उद्या रात्री,” म्हणत तो जायला निघाला. पण आई तशी सोडणार नव्हती. त्याच्याकडे बोट रोखून म्हणाली,”काही झाले तरी उद्या दुपारी तू मला फोन केलाच पाहिजेस. न विसरता.लक्षात ठेव.” पण लगेच त्याच्या डोक्यावरून पाठीवर हात फिरवत तिने एक कागदाचा कपटा त्याला दिला.त्यावर मित्राचा फोन नंबर लिहायला लावला.
वेनची आई,पॅटने तो कागद ऑफिसमध्ये जाताना नेण्यासाठी टेबलावर ठेवला.कारण तिला वेन फोन करेलच याची खात्री नव्हती.
ऑफिसमध्ये पॅट आपल्या मुलाच्या फोनची वाट प्हात होती, दुपारचे बारा वाजून गेले, एक वाजला तरी वेनचा फोन नाही म्हटल्यावर पॅट काळजीत पडली. थोडा वेळ म्हणत म्हणत शेवटी आपली पर्स उघडून तो कागद ती काढायला गेली. पण कागद सापडेना. घरीच राहिला वाटतं असे पुटपुटत ती स्वत:वरच चिडली. करणार काय आता? आईला राहवेल कसे, मुलगा कुठे असेल काय करत असेल ह्याची काळजी तिला लागली होती. ऑफिस सोडून जाता येत नव्हते. बरे वेनची चौकशी तरी कुठे आणि कुणाकडे करायची हाही प्रश्नच होता.डोळे मिटून बसली. नंबर आठवायचा प्रयत्न करू लागली. त्या नंबरमधले काही आकडे लक्षात आल्यासारखे वाटले, पण… बाकीचे अगदी पुसट आठवल्यासारखे वाटले. काही हे खरे नव्हते. पण हे असे करून नंबर फोन लागेल का? बघू या तर खरे म्हणत जसे आठवतील तसे ती आकडे फिरवू लागली. दोनदा फोन वाजल्यावर एका माणसाने फोन उचलला.
“हॅलो,”भीत भीतच पॅट बोलू लागली,”तिथे वेन ब्राऊन आहे का?” कोण? वेन ब्राऊन? मला बघू दे हं. एक मिनिट.वेन ब्राऊन.. वेन… ब्राऊन..” पॅटला वाटले फोन बंद करावा. तितक्यात तो माणूस बोलू लागला,”वेन ब्राऊन म्हणून कोणी आल्याचे लक्षात येत नाही.” पॅटने त्याचे आभार मानले, आणि चुकीचा नंबर लागला असेल म्हणत फोन खाली ठेवणार तेव्हढ्यात त्या माणसाने वेनचे वय काय ते विचारले. ती, काय विचित्र माणूस आहे ,हा काय प्रश्न झाला विचारण्याचा असे मनात म्हणाली पण तिने,”सोळा वर्षाचा,” असे सांगूनही टाकले. तो माणूस काही करू शकत नाही म्हणत दोघांनीही फोन बंद केला.
वेनची आई समोरचे काम करू लागली. डोक्यात मात्र वेन कुठे असेल याचीच काळजी करत होती. दोन तीन तासांनी तिचा सहकारी कुणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याने फोन पॅटला,” तुझा फोन” म्हणत दिला. फोन कानाला लावल्याबरोबर तिचा जीव भांड्यात पडला.पलीकडून वेनच बोलत होता. “आई, दाताच्या डॉक्टरकडे फोन कारायचा हे तुला कसे माहित झाले?” पॅटला स्मजेना. ती म्हणाली ” तू काय बोलतोस ते मला समजत नाही. मध्येच दाताचा डॉक्टर कुठून काढलास तू?”
मग वेन तिला मोठे आश्चर्य झाल्यासारख्या आवाजात सांगू लागला,”मी त्या डॉक्टरांच्या दखान्यातून बोलतो आहे. माझ्या मित्राचे दाताचे काही काम होते. त्याच्याबरोबर मी इथे आलो. आल्यावर मित्राने त्याच्या डॉक्टरांशी ओळख करून दिली. “डॉक्टर हा माझा मित्र वेन ब्राऊन.” ते ऐकल्यावर डॉक्टर लगेच म्हणाले,”अगोदर तुझ्या आईला फोन कर. ती काळजीत आहे तुझ्या. तिचा फोन आला होता. लगेच कर.” “आई, मला पहिल्यांदा वाटले ते माझी गंमत करताहेत. पण जेव्हा ते पुन्हा म्हणाले की तुझा फोन आला होता तेव्हा मी केला. पण हा नंबर तुला कसा माहीत झाला? मी दाताच्या डॉक्टरांकडे येणार हे तुला कुणी सांगितले ?”
आई काय सांगणार? अंदाज धक्क्याने केलेला एका ‘राँग नंबर’ वर केलेला तो फोन! कोणत्या योगायोगाने तो त्याच दातांच्या डॉक्टरांचा निघाला म्हणून सांगणार? ! वेनची आई फक्त डोळे पुसत होती.
[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]