रेडवूड सिटी
Sebastien Japrisol सेबॅस्टियन जप्रिसॉल (१९३१ – २००३ )
सेबॅस्टियनचे खरे नाव Jean Baptiste Rossi . हा १९३१ साली जन्मला .( ह्याच वर्षी आणखी एक यशस्वी लेखक जॉन Le Carre जन्मला. ह्याची The Spy Who came from Cold ही कादंबरी प्रख्यात आहे. शिवाय आणखी The Constant Gardener, The Little Drummer Girl ह्या सुद्धा खूप गाजल्या.) ह्याला फ्रान्सचा ग्रॅहम ग्रीन मानले जाते. ग्रॅहम ग्रीन हा सुद्धा आघाडीचा कादंबरीकार होता.
सेबॅस्टियन सतरा वर्षाचा होता तेव्हा त्याची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली होती ! अर्थात तो फ्रेंचमध्येच लिहीत असे. इंग्रजीत भाषांतरित झालेल्या त्याच्या दोन कादंबऱ्या भन्नाट आहेत. एक आहे, The Sleeping Car Murders आणि दुसरी म्हणजे A Very Long Engagement .
स्लीपिंग मर्डर्स ही नेहमीच्या पठडीतली गोष्ट आहे. साधी पण मनाची पकड घेणारी आहे. पॅरिसच्या स्टेशनमध्ये शयनायान गाडी येते. एका डब्यातली स्त्री प्रवासी मेलेली असते. पोलीस येतात. चौकशी आणि तपासणी सुरु होते. घटना साधीच असावी असे चौकशी करत असताना पोलिसांचा कयास असतो. त्या स्त्रीबरोबर असणाऱ्या प्रवाशांचा तपास सुरु होतो. पण हाती काहीच लागत नाही. कारण ज्या ज्या प्रवाशांचा शोध घेतला तेव्हा तो किंवा ती प्रवासी मेलेलेच आढळत ! रहस्य दाट होत जाते. गूढ वाढतच जाते. काहीतरी भयंकर आणि भयानक घडले आहे हे पोलिसांना जाणवू लागते. विशेषतः त्या डब्यातील दोघांना. एक तरुणी आणि सतरा वर्षाचा मुलगा. त्या मुलाचे मन त्या तरुण बाईवर जडले असते. बाईचेही मन त्या मुलात गुंतले आहे का नाही ते समजण्यास मार्ग नाही.
पोलीस जसे खोलात जाऊन चौकशी करू लागले तसे त्या बाईच्या भोवतीचे पाश घट्ट होत चालले. बाई फार घाबरून गेली असते. त्या मुलाने आपल्या बाजूने पोलिसांना काही सांगावे असे तिला वाटत असते. पोलिसांनाही वाटते की हा मुलगा काही सांगेल तर ह्या गुंतागुंतीच्या भयानक प्रकरणावर बराच प्रकाश पडेल. बाईला वाटते हा मुलगा तिच्याविषयी काहीच कसे बोलत नाही ! पोलिसांना आश्चर्य आणि बाईला वाईट वाटत असते. ती बाई त्याला विनवणी करते. पण तो तिला कसलीही मदत करायला तयार नसतो. का ? ते त्या बाईलाही समजत नाही . तिलाही का ते माहित नसते. गुप्तहेरांनाही समजत नाही. आणि वाचकांनाही ! पण एकदम क्षणात वाचकांच्या लक्षात येते आणि ह्या प्रेमकथेवर वाचक बेहद्द फिदा होतात !