दिसणारा देव

रेडवुड सिटी

आमच्या आजोबांना आम्ही बाबा म्हणत असू. बाबा महिन्यातून एकदा आत्याकडे जात असत. त्यावेळी त्यांचा पोशाख पाहण्यासारखा असे. धोतर जाडसर असायचे. पण स्वच्छ धुतलेले, पांढरे शुभ्र. तसाच सदरा आणि डोक्याला पांढरा रुमाल, म्हणजे फेटा.उपरणे असायचे की नाही आठवत नाही. बाराबंदी असायची तर सदऱ्यावर कधी जाकीट. आणि ते टांग्यातून जात असत. टांग्यातून जायला मिळते म्हणून मीही जात असे. बाबांनी एरव्ही चालताना काठी वापरल्याचे आठवत नाही. पण बाहेर जाताना ती बरोबर घेत. एक म्हणजे रुबाब वाढे. शिवाय टांग्याच्या मागे कधी कुत्री पळत येत. त्यांना हटवायला काठी उपयोगी पडे!

भाद्रपदात पक्षपंधरवडा असतो. त्यावेळी आणि त्यांच्या आई वडिलांच्या श्राद्धाच्या तिथी अगोदरही ते बाजारात जात. बहुधा  कुणाची तरी तिथी उन्हाळ्यात असे. त्यामुळे बेत आंब्याच्या रसाचा असे. टांगा करूनच जात. मग काय आमचीही मजा असे. ते बाजार -किराणा भाजी- मोठ्या झोळ्यातून आणत.आंबेही झोळी भरून आणत. तिथे बाजारात नमुना म्हणून रस पुष्कळ पोटात जाई. ती एक निराळीच मजा ! कधी बाजारातूनच आत्याकडे जात. तिथे काफी होई. काफी असेच म्हणत बहुतेक सगळेजण. काफी अगदी गोड पाहिजे असे त्यांना. तशी झाली की समाधानाने ते,”छान केली होतीस. गुळचाट झाली होती.”अशी करणाऱ्याला शाबासकी देत.

बाबांचा असाच पोशाख दसऱ्याला शिलंगणाला पार्कवर जाताना असे.सगळा पोशाख नविन असे.आम्हा सगळ्यांना प्रश्न पडे हे कधी सटीसहामासी दिसणारे कपडे इतर वेळी कुठे गायब ह्वायचे ? कारण घरात त्यांचा पोशाख एकदम वेगळा म्हणजे हेच का ते बाबा? असा प्रश्न पडावा असा असायचा. पंचासारखे धोतर, ते गुडघ्याच्या किंचित खाली इतक्याच लांबीचे! त्यावर कुठला तरी सदरा. कधी त्यावर तसलेच जाकीट.पण सगळे धुतलेले तरी धुवट मळकट वाटत. पण आमचे तिकडे कधी फारसे लक्षही नसे म्हणा.

बाबा आम्हाला,लहर आली,की भीती दाखवत.बहुतेक वेळा ते पुढच्या दाराच्या मधल्या पायरीवर बसलेले असत. ते आपले डोळे वर नेत, तोंड उघडे ठेवून डोके किंचित मागे नेत. भुवया वर गेलेल्या. बुबुळे वयामुळे धुरकट पांढरट झालेली. उघड्या तोंडात वरच्या बाजूच्या दोन्ही कडेला एखाद दुसरा लांबट पिवळसर दात, खालच्या बाजूचेही एक दोनच दात,तेही अंतरावर.त्यांचे असे रूप पाहिले की आम्ही घाबरत तर असूच पण हसत हसत ,” बाबा पुन्हा एकदा! पुन्हा एकदा भीती दाखवा” म्हणत त्यांच्या पाठीमागे लागत असू! त्या घाबरण्यातही केव्हढा आनंद असे.

बाबा श्रावणी करत. त्यावेळी आमचे नातेवाईक तर येतच पण एक दोन शेजारी येत. दोन चार भटजीही असत.श्रावणीत जानवी बदलतआणि  किंचित शेणही खायला लागे. श्रावणी विषयी इतकीच माहिती होती आम्हाला. तो भाग आला की ते काडीच्या टोकाला लागलेले इतकेसे असले तरी ते कसे टाळायचे हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात असे! तरी बरे हा प्रसंग माझ्यावर एकदा दोनदा आला असावा. कारण मुंज झाली नव्हती तोपर्यंत फक्त प्रेक्षकाचेच काम असे!प्रेक्षक म्हणूनही माझ्या आठवणीत श्रावणी हा प्रकार एक दोनदाच झाल्याचे आठवते. कारण बाबाही थकलेहोते. त्यांनी श्रावणी बंद करून टाकली. ती कायमची बंद झाली.

बाबा सगळ्यांसाठी जानवी स्वत: करत. त्यासाठी कापसाची टकळी घेऊन तिचे सूत भिंगरी फिरवत ते काढायचे. भिंगरी फिरवताना घसरु नये म्हणून थोडी रांगोळी असलेल्या वाटीत ती धरून ते एका हातातली कापसाची टकळी वर नेत नेत दुसऱ्या हाताने भिंगरी फिरवत तिला सूत गुंडाळत पुन्हा तो हात हळू खाली आणीत. हे असे खाली-वर किती वेळ चालत असे! आणि किती दिवस! त्यानंतर ते सूत एका बाजूने बाबा धरत; दुसऱ्या बाजूने अक्का धरायची.(अक्का म्हणजे आजी.) आणि त्या सुताला पाण्याचा हात लावून पिळा देत. मग त्याची जानवी बाबा करीत! त्यातही बरेच दिवस जात असावेत. पण जानव्याचे सूत म्हणजे दोरी वाटावी इतके जाडअसे! दणकट आणि टिकाऊ! पण जानवी तयार होई पर्यंतचे दृश्य पाहण्यासारखे असायचे.ह्या दरवाजाला बाबा ऊभे; तिकडे त्या दरवाजापाशी अक्का. कधी दमली तर भिंतीपाशी असलेल्या काॅटवर बसायची. बाबा फार कमी बोलत. पण अक्का बोलत असायची. पण बाबा ते कधी ऐकत असतील असे वाटत नव्हते. ते आपल्या जानव्याच्या कारागिरीत दंग असल्याचे दाखवत.

अचानक बाबांची आठवण का झाली ? गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे हे माहित होते. परवा त्यातील काही शब्दांचा अर्थ व त्यातून होणारे सुर्याच्या गुणकार्याविषयीचे वर्णनात्मक शब्द पाहात होतो. आणि  मागे माईने बोलता बोलता,  बाबा संध्याकाळी सूर्याला नमस्कार करताना आपल्याला काय सांगत, ते सांगितलेले आठवले!

बाबा नेहमी प्रमाणे पायरीवर बसलेले असत. रोज संध्याकाळी सूर्य मावळताना ते नमस्कार करीत. ते आम्हाला म्हणत, अरे ह्याला नमस्कार करा! हा दिसणारा देव आहे! नमस्कार करा”

दिसणारा देव ! सूर्याचे फक्त दोन शब्दांत इतके नेमके  सुंदर आणि यथार्थ वर्णन मी कुठे वाचले नाही की ऐकलेही नाही.

सूर्य, दिसणारा देव, म्हणून बाबांची आठवण झाली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *