Wen Morgan and Linda

“हे कोण करतेय? कुणाचा उद्योग आहे कुणास ठाऊक? पण हे रोज चालू आहे. बाजारातून सामान घेऊन स्वैपाकघराता येता येता वेन मॉर्गन चिडून म्हणत होता. शेगडीवर काही करत असलेल्या त्याच्या बायकोने म्हणजे लिंडाने विचारले,”काय झाले? कोण काय करतेय?” “अगं कोणीतरी चावटपणा करतोय. आपल्या केरकचऱ्याचे प्लास्टिकचे पिप नेमके आपल्या बेडरूमच्या खिडकीखाली आणून ठेवतो. रोज. ही कसली थट्टा?”
“रोज मी ते पिप नेहमीच्या जागी ठेवतो आणि मी पुन्हा येऊन पाहतो तर ते पुन्हा त्या खिडकीखालीच आणून ठेवलेले!””ठेवू दे ना त्याने काय एव्हढे होते ?” “एक दोनदा झाले तर मीही समजू शकतो. पण आज आठ दहा दिवस मी पाहतोय हेच चालले आहे. मी पहिल्या जागी ठेवायचे रोज आणि काही वेळातच ते पुन्हा कुणीतरी बेडरूमच्या खिडकीखाली ठेवतोय. त्रास देण्याचाच प्रकार आहे. किंवा भांडण उकरून काढायचे असेल. पण एकदा समोर येऊन कर म्हणावे, कोण असेल तो .”
” मलाही तुझे पटतेय. पण तरीही मला वाटते, इतके संतापून जाण्यासारखी फार मोठी गोष्ट नाही.” “हो. इतकी मोठी बाब नाही. पण मला हा सगळा मूर्खपाणा चाललाय असे वाटते.”
का आताही तसेच केलय का कुणी?” हो ना. मी बाजारात जाण्यापूर्वी ते पिप नेहमीच्या जागी ठेवून गेलो होतो. थोडा वेळ थांबलोही, कोणी येतेय का पाहायला. कोणी दिसले नाही. आता हातात पिशव्या होत्या म्हणून तिकडे पाहिलेही नाही मी. तसाच घरात आलोय.” “हरकत नाही. तुझा त्या निमित्ताने व्यायाम तरी होतोय थोडा!” लिंडा हसत त्याला म्हणाली. “बरं, मला थोडी कॉफी दे. मग मी जाऊन बघतो पुन्हा.”
वेनची कॉफी पिऊन झाली. बायको म्हणाली, “तुला वेळ होईल तेव्हा आपल्या बेबीच्या खिडकीचे गज घट्ट बसवशील का? ती खिडकीकडे फार जायला लागलीय सध्या, बरं का! महा दांडगोबा होत चाललीय!” लिंडा कौतुकाने संगत होती.
” अरे !” वेन एकदम मोठ्याने म्हणाला. “अगं तू मला हे आधी सांगितले नाहीस! बाहेर जाण्याआधी मी बेबीला पाळण्यातून खाली काढले होते खेळायला. बाजारात जाताना ती खिडकीही उघडी ठेवून गेलो होतो मी.!” वेन माडीवर पळत पळत जाताना ओरडतच गेला.
त्याची बायकोही त्याच्यामागे पळत गेली. खिडकीचे गज निसटून गेले होते. आणि खोलीत मुलगी नव्हती! लिंडा मटकन खालीच बसली. खिडकीतून खाली बघताना वेनच्या छातीत प्रचंड धडधड होत होती. मोठा सुस्कारा म्हणा आवाज काढत म्हणा, तोंडापुढे नमस्कारासारखा हात धरून विस्फारलेल्या डोळ्यांनी तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पाहात होता. खालून आपल्या लहान मुलीचा आवाज ऐकू येत होता. आपल्या मुलाचा आवाज कोणता बाप ओळखणार नाही?
वेन मॉर्गनला ‘चिडवण्यासाठी,’ ‘थट्टा करण्यासाठी,’किंवा ‘भांडण उकरून काढण्यासाठी’ बेडरूमच्या खिडकीखाली पुन्हा ‘कुणीतरी’ नेऊन ठेवलेल्या पिपातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लिंडा आणि वेनचा जीव की प्राण अशी ती लहान मुलगी हात पाय हलवत इकडे तिकडे बघत होती !

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *