लोणंदचा मुक्काम आटोपून आम्ही सकाळी निघालो. आज आमच्यापैकी एकदम
तीन वारकरी कमी झाले होते. त्यांची उणीव जाणवत होती. यापुढे इथून
ते थेट पंढरपूरपर्यंत मला आवताडेंची सततची सोबत होती.
आम्ही दोघे, आमच्यातील इतरांच्या मानाने, वारीच्या मुख्य रस्त्याला लवकर
लागायचो.
मजल दरमजल करीत दीड एक तास चाललो की पंधरा मिनिटांपासून ते अर्धा
तासपर्यंत आणि दुपारी उन चढू लागले की तास दीड तास विश्रांते घेत ह्या
आषाढी यात्रेतील आमची वाटचाल व्हायची.
अशीच वाटचाल करत “चांदोबाच्या लिंबा”पर्यंत आलो. इथे माऊलीचा
दुपारचा विसावा असतो. सर्व दिंड्या, वारकरीही विसावा घेतात आज आम्हीही
सर्वजण एकत्र थांबलो. कारण इथे वारीतील पहिले उभे रिंगण होणार होते.
“चांदोबाचा लिंब” या नावापासूनच कुतुहल सुरू होते. या ठिकाणीच का
चांदोबा भागून इथल्या लिंबाच्या झाडामागे लपत होता; हेच का ते लिंबोणीचे
करवंदी झाड? दूरवर पाहिले मामाचा चिरेबंदी वाडा दिसतो का? वारीतील
काही जणांना विचारले पण कुणालाच ह्या ठिकाणाला हे नाव कसे पडले याची
माहिती नव्हती.पण त्या गोड बाल/लोक काव्या इतकेच हे नावही गोड आहे हे खरे.
रस्त्याच्या दुतर्फा फारशी झाडी नव्हतीच. लांब लांब अंतरावर एखाद दुसरे
झाड उभे होते.
बरेच वेळा वर्तमानपत्रात “चांदोबाचा लिंब” येथे उभे रिंगण झाले, तसेच
“माळशिरस येथील सदाशिव नगरच्या साखर कारखान्याच्या मैदानात वारीतील
पहिले गोल रिंगण” असे वाचत असे. त्याची चित्रेही पाहिली होती. त्यामुळे उभे
रिंगण पाहण्याची उत्सुकता होती.त्यासाठी आमच्या तंबूतील आम्ही बहुतेक
सर्वजण थांबलो.
माऊलीची पालखी जेथे विसावली होती तिथपासून ते समोर -रस्त्याच्या
दुतर्फा मैल दीड मैल पर्यंत सर्व दिंड्या, टाळकरी-मृदुंगवाले, दिंडीकर
वारकऱ्यांसह शिस्तीत उभ्या राहिल्या.
इतर आमच्या सारखे सर्व वारकरी त्या दिंड्यांच्या पाठीमाग गर्दीने उभे
होते; पण त्यांच्यात अंतर ठेवून खचाखच गर्दीने उभे होते. काही उत्साही
वारकरी झाडांवर तर काही खूप मागे पण उंच पाण्याच्या टाकीवर, तर काही
जिथे जिथे उंच ठिकाण मिळेल तिथे बसले,उभे राहिले होते.सर्व रस्ता मात्र पूर्ण
मोकळा होता.
आम्ही काही वेळ तीन चार रांगांच्या मागे होतो. टाळ-मृदुंगाचे ठेकेदार आवाज,
भजना-अभंगाचे सूर फक्त ऐकू येत होते.
पालखीच्या दिशेने जाणे तर अशक्य,इतकी गर्दी. आम्ही मग विरुद्ध दिशेने जाऊन
शक्यतो रस्त्याजवळच्या रांगेत शिरण्याचा प्रयत्न करू लागलो. असे करत,करत
म्हणजेच घुसखोरी करत एका दिंडीच्या मागे आलो.पुरातून नदी पोहून आल्याचा
आनंद झाला. आमच्या भाग्याने आमच्या समोरील दिंडीचे वारकरी फार
चांगले होते. अभंग म्हणत टाळ वाजवताना ते दोन्ही बाजूला हलत डोलत,
त्यावेळी आमच्यापैकी काहींना ते त्यांच्या अधे मधे उभे राहू देत होते, डोके
काढू देत.आता दोन्ही बाजूच्या दिंड्या आपली निशाणे पताका नाचवत उभ्या
जागी मागे पुढे होत, दोन्ही बाजूला झुकत,झुलत टाळ मृदुंगाच्या गजरात
हरिनाम गर्जत होते. त्यावेळी त्या भजनी वारकऱ्यांची एक मोठी लाट पसरत
चाललीय असा भास व्हायचा.
सुदैवाने माझ्या समोरचा वारकरी उंच नव्हता.म्हातारा होता.शांत होता.
मला आणि माझ्या बाजूला उभ्या असलेल्या दोघा तिघांना रस्ता स्पष्ट दिसत
होता.
थोड्याच वेळात माऊलीच्या रथापुढचा घोडेस्वार हळू हळू येऊ लागला.
समोरचे भाविकजन घोड्याच्या कपाळाला हात लावून नमस्कार करण्यासाठी
पुढे सरसावत. माऊलीचा तो स्वार अनेकांचे समाधान करण्यासाठी घोड्याची
मान डौलात हलवत, कधी ह्या बाजूला तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोलवत
घोडा नेऊ लागला. तो थेट रिंगणाची हद्द संपेपर्यंत गेला. मग घोडा उलटा
फिरवून लगेच माऊलीच्या रथाकडे वेगाने दौडत गेला. स्वाराचा घोडा
भरधाव वेगाने पळताना पाहणे हे खरंच काही तरी दुर्लभ पहायला
मिळाल्याचा आनंद होता.
थोड्या वेळातच तो घोडेस्वार पुन्हा वेगाने दौडत आला आणि मग काय विचारता!
वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण त्या घोडेस्वाराच्या
मागून तितक्याच वेगाने माऊलीचा घोडा धावत येत होता.
रिंगणाच्या शेवटच्या टोकापर्यंत थेट दौडत जाऊन माऊलीच घोडा पुन्हा
माघारी भरधाव वेगाने पळत आला. सर्वच गोष्टी टिपेल्या गेल्या.”माऊली,
माऊली”चा जयघोष सुरू झाला तो घोडा माऊलीच्या पालखी समोर पुढचे
पाय टेकून मान खाली झुकवून नमस्कार करेपर्यंत चालूच होता.
रिंगण संपले. दिंड्या आपापल्या क्रमाने जागी जाऊन उभ्या राही पर्यंत,
माऊलीचा घोडा गेला त्या रस्त्यावरची माती सोने समजून वारकरी कपाळाला
लावू लागले.टाळ-मृदुंगही वाढत्या वेगाने वाजत होते. उभ्या रिंगणाचा
आनंद, दिंडीकर मंडळी आणि त्यांच्यामुळे सर्व वारकरी, त्या सूरांनी आणि
ठेक्यांनी,तो लुटत होती.
हा पहिला नवीन अनुभव घॆऊन आमची पावले पंढरीच्या वाटेवर असलेल्या
तरडगावाकडे निघाली. आम्ही तरडगावला दुपारी ३.०० वाजता पोहोचलो.पेट्रोल
पंपाशेजारी आमची राहण्याची व्यवस्था होती.
पेट्रोल पंप काही येता यॆईना. मुक्कामाचे ठिकाण जसे जवळ येते तसा थकवा
जास्त वाढतो. आम्ही दोघांनी एका मळ्यात, पाण्याचा पाईप धो धो चालू होता
तिथे गार सावलीत विसावा घेतला. नंतर ३-४ कि.मी. आणखी चालून गेल्यानंतर
तो नामांकित पेट्रोल पंप दिसला. आता त्यापुढे आमच्या दिंडीची पालं
गाठायची. असे होत होत आम्ही तरडगावापासून थोडे पुढे असलेल्या आमच्या
तळावर आलो.