Monthly Archives: September 2019

झाडे वाचवा आरे वाचवा ! कार-शेड हटवा आरे वाचवा!

मुंबई

मुंबईच्या मेट्रो ट्रेनचा तिसरा टप्पा करण्यास सुरवात झाली. त्यासाठी कार शेड करण्यासाठी २७०० झाडे तोडायला सुरुवात झाली. गेला एक महिना दर शनिवारी आणि रविवारी ‘झाडे वाचवा आरे वाचवा ‘ कार शेड हटवा ‘ अशा अनेक घोषणा देत हातात लहान फलक घेऊन तरुण मुले मुली कार्यकर्ते रस्त्याच्या एका बाजूला लांबलचक रांग करून उभी असतात. ह्या मध्ये काही
एनजीओज्, बरेच वैयक्तिक, काही राष्ट्र सेवा दलाचे(अजून सेवा दल जिवंत आहे हे पाहून आश्चर्यच वाटले!) काही तरुण मंडळांचे असे निरनिराळ्या गटाची तरुण मंडळी भाग घेतात. हिंदी इंग्रजी मराठीत घोषणा चालू असतात.

हे निदर्शन ११.००-३० पासून सुरु होते. दोन पर्यंत संपते.
गेले दोन तीन शनिवार रविवार मी आणि स्मिता जाऊ जाऊ म्हणत होतो. पण कुठे करतात निदर्शने, किती वाजता ही काहीही माहिती कुठेही सहजासहजी मिळत नव्हती. फक्त एखाद्या-एखाद्याच-चॅनेलवर फक्त शनिवारी रनिवारी हे आंदोलन असते असे सांगितले होते. हल्ली चळवळ्यांनाही वाटते की कुठेतरी सोशल मिडियावर टाकले की भरपूर प्रसिद्धी होते. भ्रम आहे.जाऊ दे. कल्याणीने शोधून वेळा सांगितल्या. बरे झाले नाही तर आम्ही सहाला उठून जाणार होतो. आरामात दहाला निघालो. ११.०० वाजता पोचलो.

फारशी मंडळी दिसत नव्हती. उगी २०-२५ इकडे तिकडे दिसली. पण पोलिसांच्या गाड्या, निदर्शकांना पकडून लांब दूर सोडून देण्यासाठी जाळीची मोठी गाडी हे सगळे पाहिल्यावर मला विशेष स्फुरण आले. तो लाठी हल्ला, ती आरडा ओरड, निदर्शनाच्या घोषणा,पोलिसांची फळी मोडण्यासाठीची निदर्शकांची रेटारेटी. त्यासाठी “इन्किलाब इन्किलाब! नही हटेंगे नही हटेंगे” घोषणा मध्येंच पोलिस धक्काबुक्की करत माझी मानगुट पकडून मला ढकलत मोटारीत कोंबताहेत, चॅनेलवाल्यांचे सगळे कॅमेरे माझ्यावर,त्यांची गडबड आणि बडबड हे सर्व दृश्य वारंवार डोळ्यांसमोर आणू लागलो. त्याची मनातल्या मनात दोन वेळा ‘रंगीत’ तालीमही झाली. आज हुतात्मा व्हायची केव्हढी मोठी संधी मिळाली ह्या हौतात्म्याच्या स्वप्नांत दंग होऊन, ती’अमर रहे’ ची मिरवणुक;माझ्यावर पडणारे हारांचे ढीग त्यामुळे चेहरा कुणाचा दिसतच नव्हता. मीच का हा हुतात्मा ही शंकाही आली. लगेच मी तिथेच करायचे श्रद्धांजलीचे भाषणही करु लागलो. हे सर्व स्वगतच चालले होते.प्रत्यक्षात फौजदार-पोलिसांना मी म्हणत होतो,” आमच्या पेक्षा तुमचीच संख्या जास्त दिसतेय साहेब! चॅनेलवर पोलिसांचीच निदर्शने अशी बातमी दाखवतील!” तोही हसला आणि म्हणाला,” येऊ द्या, तशी बातमीही येऊ द्या, तुम्हीच द्या!”

लवकरच अनेक जण पुटुपुटु करत कुठून कुठून येऊ लागले. रांग लांब लांब लांब होत चालली. मला आणि स्मिताला कुणी एक एक फ्लेक्सी दिला. तो रस्त्यावरील रहदारीला दाखवत, देणाऱ्याच्या मागोमाग घोषणा पूर्ण करत ओरडत होतो. ‘Save Aarey Save Mumbai’
‘कार शेड हटाव झाडे बचाव;’बचाव बचाव आरे बचाव;’ ‘आरे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची!’ ‘हटवा रे हटवा कार शेड हटवा,वाचवा रे वाचवा आरे वाचवा!’ (ही माझी), ‘जाॅनी जाॅनी येस पप्प…’ वापरून कुणी केलेली चांगली घोषणा; ह्या घोषणाबाजीतच काही तरूण मंडळी मोठा डफ वाजवत त्यांच्या कला पथकाची गाणी म्हणत होती. आणखीही बऱ्याच घोषणा चालूच होत्या. सगळीकडे तरुणांचा उत्साह दिसत होता. माझ्या एव्हढी नाही पण म्हातारी म्हणावीत असे दोघे तिघेच असतील.

आरे रस्ता म्हणजे दुतर्फा सुंदर झाडी असलेला! पूर्वी सिनेमाच्या गाण्यांचे शूटिंग होत असे ती आरे मिल्क काॅलनीची सुंदर बाग आणखी पुढे होती.,रस्ता अरुंद. त्यावरूनच बसेस मोटारी रिक्षा दुचाकी वाहनांची गर्दी. रविवार असल्यामुळे तर खूपच. त्यामुळे जातानाचे लोक परतताना बस मधून,मोटारीतून मलाच हात दाखवत thumsup करत जाऊ लागले असे वाटू लागले.बरेच लोक मला ओळखू लागलेत! ह्या भ्रमात मी घोषणाही जोरात देऊ लागलो.!

मधून मधून मी पाणी पीत होतो. चांगली दिड दोन किलोमीटर लांबीची रांग झाली होती. माझ्यासमोर एक पोलिस होता. त्याला मी म्हणालो, “असं काही तरी तुम्ही रोज पाहात असाल. मनात हसत असाल. काय ओरडताहेत उगीच. काही फरक पडणार नाही!” तो न बोलता फक्त हसला. सर्व काही शांततापूर्ण वातावरणात, गाणी म्हणत मध्येच जोशाने तर कधी नेहमीच्या आवाजात घोषणा चालू होत्या. उत्साह यावा म्हणून त्याच घोषणा चाल बदलून म्हणत. त्यामुळे पुन्हा आवाज जोरदार निघत!

स्मिताने थोडा वेळ रस्त्याच्या पलीकडे जाऊन Record for the posterity असावे म्हणून फोटो काढले. पण तिचा नाही आला फोटो. मला खरंच सुचले नाही! मी त्या अति सौम्य,साध्या वरणासारख्या निदर्शनात घोषणा देण्यातच रमलो होतो.

स्मिताच्या प्रोत्साहनामुळे माझा कालचा रविवार म्हणजे ‘पल भर के लिये तो आंदोलन करें,झूटा ही सही!’ के नाम झाला! झूटा ही नव्हते पण शांततामय होते.

Secret Life of Dr. Walter Mitty सारखा मी तेव्हढ्यातही रस्त्याच्या कडेची पांढरी लक्ष्मण रेखा ओलांडून मुठी वळवून; पोलिसांची नजर चुकवून; पळत पळत रस्त्याच्या मध्यभागी जाऊन “ नही हटेंगे नही हटेंगे” “नही चलेगी नही चलेगी कार शेडकी तानाशाही”, “आली रे आली जनता आली कारशेड खल्लास केली” अशा घोषणा देतोय; मी गेलेला पाहून इतरही रस्त्यामध्ये येताहेत, आॅलिव्ह ग्रीनची जाळीची हेल्मेट घालून अंगभर असणाऱ्या ढाली पुढे घेऊन पोलिसांची फलटण हवेत बंदुकी उडवत माझ्याच दिशेने येत आहे ह्या स्वप्नरंजनात स्वत:चे समाधान करून घेत होतो.प्रत्यक्षात मी समोरच्या पोलिसाच्या-तो पाठमोरा असूनही- धाकाने,रस्त्या कडेच्या खड्यात उभा होतो. खंबीरपणे पाय रोवून. काय समजलात मला!

१:३०-४५ वाजत आले. स्मिता म्हणाली,”बाबा,जाऊ या.” जिथे आम्ही सुरवातीला येऊन थांबलो होतो तिथे गेलो. पाण्याची बाटली घेतली. पाणी प्यालो. आरे काॅलनीतच होतो.त्यामुळे तिथे आरेचे ताकही मिळाले.

मी माझ्या शेजारी असलेल्या निदर्शकांचा निरोप घेत पुढे निघालो. रिक्षाने १७ किमिचे अंतर पार करून घरी आलो.
तर आता निदर्शनाचे स्मिताने काढलेले फोटो पहा.

हिशोबातील खर्चिक लेख

शीव

ता.११ सप्टेंबर २०१९ पासूनचा खर्च:-
रु. २०.०० किल्ली बनवून घेतली.
रु. ७.०० चहा.
ता.१२ सप्टेंबर २०१९
रु.२४०.००दाराच्या अंगच्या व कडीकोयंड्याच्या कुलुपाच्या किल्ल्या बनवून घेतल्या.
रु. ३०.०० ताक
रु. १९०.०० चाॅकलेट्स मेलडी आणि किसमि – १०० चाॅकलेटांची दोन पाकिटे!
रु. १०.०० पार्ले ग्लुको बिस्किट्स
रु. ४०.०० किल्यासाठी- दोन key chains
ता. १३ सप्टेंबर २०१९


रु. २८:०० दोन समोसे आणि एक चहा(८रु.) बनारस दुग्धालयात.हे दुकान सायन स्टेशनकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. बरेच वेळा त्यावरून जातो पण कधीही जावेसे वाटले नाही. पण आजची परिस्थितीच निराळी होती. दरवाज्याच्या अंगच्या कुलपाची (latch key) एक जास्तीची किल्ली बनवून घ्यायचे काम परवा पासून चालू आहे. एक किल्ली ती काय! जणू काही ‘बंद अकलका दरवाजे का तालेकी’ किल्लीच ती.


काल माझ्याकडे तशी एकच किल्ली होती. त्याबरहुकुम बनविण्यासाठी ती देणे भागच होते.पण मग मी घरात कसा जाणार? ह्यावर उपाय म्हणून स्मिता तिची किल्ली ठेवून गेली होती. काल दुपारी जास्तीची बनवून घेतलेली व मूळची अशा दोन्ही किल्या घेऊन आलो. पण नविन करून घेतलेली किल्ली कुलपातच जाईना.पुन्हा आज किल्लीवाल्याकडे जाणे आले.गेलो. तर तो आपली सर्व हत्यारे व display (!) साठी दोन तीन तारांना अडकवून लावलेल्या जुन्या पुराण्या व गंजलेल्या किल्ल्यांचे ते गबाळ गुंडाळून, मोटरसायकलवरून निघण्याच्या तयारीतच होता.बरे झाले ती चालू झाली नाही. मी गेलो. त्याने म्हटले तुमची नेहमीची किल्ली व जी दुरुस्त करायची ती अशा दोन्ही किल्ल्या द्या. मी गडबडीत मोठ्या आत्मविश्वासाने त्याला दिल्या.

घरी आलो. तर लॅच की नव्हती. दोन्ही खिसे उलटे सुलटे करून पाहिले. स्मिताने ठेवलेली किल्ली मी घरातच विसरलो होतो तर ती खिशात कुठून मिळणार? माणूसच मी. प्रथम, आता काय करायचे? ह्या विचारात आणि काळजीत पडलो. मग म्हणालो,” स्मिता येईपर्यंत फक्त आठ तासांचाच प्रश्न आहे. काढू या इकडे तिकडे फिरत. बागेत बाकावर बसू.मध्येच त्यावर आडवे पडू. जवळ रुपम टाॅकीज आहे तिथे सिनेमे पाहू, लागोपाठ दोन.(पण ते दोन्ही रद्दी होते.) पाण्याची बाटली विकत घेऊ.” खिशात पैसे होते ना! अलिकडे भूक लागली आहे जोरात, असे होत नाही. पण आता मात्र लगेच काही तरी खाऊन घेऊ हा विचार आला. निरिक्षण:- संकटात खूप भूक लागते. वर लिहिलेल्या बनारसी दुग्धालयात जाऊन न आवडणारे सामोसे खाल्ले.


स्मिताला आणि कल्याणीला फोन करुन सांगावे व त्यांनाही काळजीत टाकावे हा एक सुविचारही आला.पण जवळ फोनही नव्हते. नंबरही लक्षात नाहीत. हाॅटेलातून बाहेर पडल्यावर लक्षात आले,”अरे त्या चावीवाल्याकडून आपली किल्ली आणावी. घरात जाऊन जास्तीची किल्ली घ्यावी व ही किल्ली त्याला पुन्हा आणून द्यावी. अरे व्वा! अशा बिकट प्रसंगी, कधी नाही ते, हे मला सुचले ह्यावर मीच माझ्यावर किती तरी वेळ खूष झालो ! ह्या खुषीत बराच वेळ गेला. मग काय! ढांगा टाकत तिथे पोचलो तर चावीवाला आपले सर्व गबाळे आवरून नमाज पढायला गेला होता! आज शुक्रवार आहे विसरलो होतो. गेले तीन दिवस मला तिथे तिन्ही त्रिकाळ पाहून मला चावीवाल्याचा नविन ॲप्रेंटिस समजू लागलेला रसवाला म्हणाला,”बाबा, नादिरके पास काम सिखते हो का?अच्छा है काम. कभी भी खुदका पेट खुद भरना अच्छा रहेता.चाबीवाला येईल;थांबा इथे.” हे सगळे, मी डोळ्यांसकट चेहऱ्याचे उदगार चिन्ह करून ऐकून घेतले.


जनकल्याण बॅंकेच्या रखवालदाराच्या खुर्चीवर बसलो.पण बॅंकेचे गिऱ्हाईक आल्यावर चुकुन मीच उभा राहायचो. हे लक्षात आल्यावर नंतर तिथेच बाजूच्या अरुंद कट्ट्यावर बसलो. रखवालदाराची असली तरी खुर्ची आपल्या नशिबात नाही हे पुन्हा लक्षात आले. तास दीड तास वाट पाहात बसलो. रसवाल्याची किती विक्री झाली हे पाहात त्याच्या गल्ल्याचा अंदाज घेत वेळ काढत होतो. अखेर तो किल्लीवाला आला.त्याच्या कडून किल्ली घेतली.घरी आलो. कुलुप उघडून घरात आल्यावर घर म्हणजे Home Sweet Home हे जाणवले. दुपारी चार साडेचारला जेवलो. सहा वाजता पुन्हा त्याला किल्ली द्यायला गेलो पण जाताना दरवाजाचे अंगचे कुलुप लागू नये ह्याची दक्षता घेऊन निघालो. किल्ली देऊन परत आलो. साधे कडीचे कुलुप उघडून घरात आलो!!! हुश्श! हे तुम्ही म्हणायचे.


ता. १४ सप्टेंबर २०१९
रु. १०.०० केळी ३
रु. ३५.०० पार्लेची नवीन चाॅकलेट कुकीज्- मिलानो.
रु. २५.०० सिताफळे, फक्त दोन तीही लहान.
रु. १२.०० अमूलची बिस्किटे.
रविवार ता. १५ सप्टें २०१९ – अखेर आज किल्ली बनवून घेण्याच्या रामायणाचे पारायण संपले. (गदिमांनी ळ चे घननीळा लडिवाळा हिंदोळा वगैरे ळ चे चार शब्द लिहून गाणे लिहिले तर किती कौतुक केले डाॅ. करंबेळकरांनी सुंदर लेख लिहून. मी वर बाणातला ण वापरून सलग तीन शब्द त्यातला एक तर ण वापरून एक जोडाक्षरही लिहिले ! ह. ना. आपटे म्हणतात तसे’पण लक्षात कोण घेतो?!’ मला तर सुखाची किल्ली मिळाल्याचा आनंद झाला! रोज कमीत कमी दोन चार हेलपाटे घातले असतील. असे चार दिवस हेलपाटे घालत होतो.काल तर सोसायटीचा रखवालदार म्हणाला “ आजोबा, शतपावली किती वेळा घालता. तीही इतका वेळ?” मी काय उत्तर देणार. नुसते हसलो. हसणे व माझा चेहरा दोन्ही केविलवाणा झाला असणार. कारण तो लगेच म्हणाला,” नाही तसे काही नाही सहज विचारले!” कुलपाच्या किल्लीसाठी इतके हेलपाटे तर यशाची गुरुकिल्ली सापडायला जन्म-मरणाचे किती खेटे घालायला लागतील! ! असो.


तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडला असेल; गेले चार दिवस किल्ली पुराण चालू आहे माझे. असो. “असो असो लिहिता,म्हणता आणि पुन्हा दहा वाक्ये लिहतात तुम्ही “ असे तुम्ही म्हणाल. पण खरेच आता असो.चला एकदाचे अखेरचे ‘असो’ लिहून झाले! अ……


रविवार १५ सप्टें २०१९
रु. १५.०० एव्हरेडी बॅटरी सेल्
सोमवार ता.१६ सप्टें२०१९ माझा जमा नसलेला हिशोब चालूच आहे !

हिशेबनीस- सदाशिव पं. कामतकर

वृद्ध कलाकार- वास्तवात आणि भूमिकेतही !

आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये अवतार किशन हनगल ह्यांचा १९१४ साली जन्म झाला. अवतार किशन वगैरे नावावरून काही बोध होणार नाही.,ए. के हनगल म्हटल्यावर लगेच लक्षात येईल. हिंदी सिनेमात शाळा मास्तर,प्रोफेसर, डाॅक्टर, कर्नल, शंभूनाथ, रामशरण किंवा रहिमचाचा अशा सर्वसामान्य नावाच्या व माणसाच्या भूमिका हातखंडा उत्तम करणारे ए.के. हनगल ह्यानी स्वातंत्र्य लढ्यात मोठा भाग घेतला. बरेच वेळा ते तुरुंगातही गेले. पोलिसांच्या लाठ्या दंडुकेही पुष्कळ खाल्ल्या.
भगतसिंगाना तुरुंगात टाकले तो दिवस व त्यांना फाशी दिली तो दिवस त्यांना कायम आठवत असे. भगतसिंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यातून ते साम्यवादी विचारांकडे वळले. जालियनवालाबागचे हत्याकांड आणि भगतसिंगला फाशी दिली त्या दिवशी पठाण (North West Frontier मधील) आणि पंजाब रडत होता अशी आठवण ते सांगत.


कराचीत असतांना त्यांच्या ब्रिटीश विरोधी स्वातंत्र्य चळवळीतील कामामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगात डांबले होते.फाळणी झाल्यावर ते हिंदुस्थानात आले.,
ते पूर्वीच शिवणकाम शिकले होते. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते रंगभूमीवर काम करीत होते. १९४९ साली मुंबईत आल्यावर प्रथम ते शिंपी कामच करू लागले. त्याचबरोबर IPTA ह्या संस्थेच्या नाटकात भूमिका करू लागले.वर्तमानपत्रांतही काम करू लागले.


१९६७साली त्यांनी शशधर मुखर्जीच्या ‘शागीर्द सिनेमात मध्ये काम केले. वयाच्या पन्नाशीत सिनेमात आले. आयुष्याची माध्यान्ह उलटता उलटता सिनेमात आले. वयाला अनुरुप भूमिका मिळाल्या आणि त्या ते करू लागले. जागृती,आंधी,नमक हराम, मेरे अपने, गुड्डी, बावर्ची, आनंद, तिसरी कसम (राजकपूरच्या थोरल्या भावाची भूमिका), गरम हवा, सत्यम शिवम सुंदरम् अशा एकूण २२७ सिनेमात त्यांनी काम केले होते. राजेश खन्नाच्या १६ चित्रपटात त्यांनी त्याच्या बरोबर काम केले होते. शोले मधला त्यांच्या इमामसाबचा”इतना सन्नाटा क्यों है” हा संवाद अनेकांच्या लक्षात असेल. अर्थातच तो “कितनेऽ आदमी थे” इतका गाजलेला नाही. पण बऱ्याच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला असेल. त्यांचा अखेर अखेरीचा सिनेमा अमीर खानचा ‘लगान’.


त्यांच्या दत्तुभाऊ, गजानन देसाई, मि. जोशी, सिंधी शिक्षक, इमाम साब, शंभूकाका अशा सामान्य नावांच्या सर्वसाधारण भूमिकेपेक्षा अगदी वेगळी भूमिका त्यांनी “शौकीन” ह्या सिनेमात रंगवली होती. त्यांच्या परिचित प्रतिमेपेक्षा अगदी निराळी होती. त्या सिनेमात अशोक कुमार, प्रख्यात बंगाली नट उत्तमकुमार सारखे नट होते. पण लोकांच्या लक्षात एके हनगलनी रंगवलेला स्त्रीलंपट म्हातारा लक्षात राहिला.


एकदा दिल्लीत हनगल पंचतारांकित हाॅटेलमध्ये कुठल्याश्या पार्टीला गेले होते. हनगलना आपल्या मित्राकडे जायचे होते. त्यांना तिकडे सोडण्यासाठी सोबत वीस बावीस वर्षाच्या तरुणीला जायला सांगितले होते. पण त्या मुलीने मॅनेजरला हळूच सांगितले,” मी जाणार नाही. मी ह्यांचा “शौकीन” पाहिला आहे!” मग दुसऱ्या पुरुषाला पाठवावे लागले!


बाळासाहेब ठाकरेंनी हनगलवर ते देशविरोधी आहेत असा आरोप केला होता. बहुतेक ही १९९२-९३ ची घटना असावी. कारण काय तर ते पाकिस्तानच्या काॅन्सल जनरलने आयोजित केलेल्या त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला हजर होते. प्रत्येक देशाची वकिलात किंवा काॅन्सल जनरल आपल्या कार्यालयात आपल्या देशाचे स्वातंत्र्यदिन साजरे करतात.तसेच पाकिस्तानची वकिलातही करते. त्यात विशेष काही नाही. हनगलांवर मग ‘बाॅलिवुडनेही अघोषित बहिष्कार घातला होता. वर्ष दोन वर्षे कुणीही त्यांना काम देईना. शिवसेनेच्या धाकामुळे हनगल काम करीत असलेले सिनेमेही थिएटरमधून हळूच काढून घेतले जाऊ लागले. तरी बरे हनगल काही धर्मेंद्र, सलमान खान,आमिर खान,शाहरुख खानसारखे स्टार नव्हते. त्यांना आर्थिक झळ तर बसलीच. हनगल श्रीमंत कधीच नव्हते. तशात हा बहिष्कार. IPTAची नाटकेही अशी कितीशी चालत असणार? हनगल पाकिस्तानच्या काॅन्सलमध्ये त्यादिवशी व्हिसाच्या कामासाठी गेले होते! आपल्या सियालकोट ह्या मूळगावी जाण्यासाठी! नंतर बाळासाहेबांनी,” मी एकेंवर कसलीही बंदी घातली नव्हती” असे जाहीर केल्यावर त्यांना पुन्हा कामे मिळू लागली.


ए.के. हनगल इप्टामध्ये काम करीत असता त्यांच्याबरोबर बलराज साहनी, कैफी आझमी सारखी मंडळीही होती.एकेंनी संजीवकुमारला इप्टामध्ये नाटकात भूमिका मिळवून दिल्या.हीआणि सयाजी शिंदे राजकपूर आणि इतर बरेच नट वा नट्या अतिशय सहज वाटेल असा उत्तम अभिनय करत व संवाद म्हणत त्याचे कारण ते प्रथम रंगभूमीवरचे कसलेले कलाकार होते.


ए. के. हनगल एकदा एका शिष्टमंडळा बरोबर रशियाच्या दौऱ्यावरून परत येत असता त्यांचे विमान तांत्रिक अडचणींमुळे पाकिस्तानातील विमानतळावर उतरावे लागले. तिथे हनगलांना पाहिल्यावर अनेक पाकिस्तानी त्यांच्या भोवती जमले. ते हिंदी सिनेमा, नट नट्या, गाणी,संगीत आणि संगीतकार ह्यांच्याविषयी इतके विचारू, बोलू लागले की हनगलांना दम खायलाही वेळ मिळत नव्हता. ते पुढे सांगतात की तिथे जमलेल्या पाकिस्तानी लोकांना त्यांचा राष्ट्राध्यक्ष महम्मद झिया हुल हक त्याच दिवशी विमान अपघातात ठार झाला ह्याचेही त्यांना भान राहिले नाही! जणू ते आजुबाजूचे जग, सर्व काही विसरून गेले होते!


ए.के हनगल पं नेहरूंचे नातेवाईक होते. हनगलची आई आणि पं नेहरूंची पत्नी कमला नेहरू ह्या चुलत/ मामे किंवा मावस किंवा आते बहिणी होत्या.
ए. के. हनगल ह्यांचे अखेरची काही वर्षे हलाख्याची गेली.२००५ साली त्यांनी अमोल पालेकरच्या सिनेमात काम केले. त्या अगोदर सात आठ महिने आजारपणामुळे घराबाहेर पडले नव्हते. पण सिनेमात कॅमेऱ्यापुढे उभे राहिले की तब्येतीची पर्वा न करता त्यांच्यातील नट बाहेर येई.
त्यांचा मुलगा विजय हा बाॅलीवुड मध्ये कॅमेरामन होता. पण त्यालाही काम मिळेनासे झाले. हनगलांच्या औषधपाण्याचा खर्च परवडत नव्हता. मुलगा विजय हा ७५ वर्षाचा.त्यालाही पाठीचे दुखणे.कुणाला काम नाही. पैसे नाहीत. राज ठाकरेंनी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोडी मदत केली. वर्तमानपत्रातून हनगलांच्या परिस्थितीची बातमी आली.त्यावेळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही मदत केली.


ए. के. हनगल ह्यांना पद्मभूषण देऊन सरकारनेही गौरवले.
२०१२ साली मधुबाला-एक इश्क और जुनुन ह्या TV मालिकेत काम करायला ९७ वर्षाचे ए. के. हनगल व्हील चेअरवरून आले. त्यांना स्वत:लाही आपण काम करू शकू ह्याची खात्री नव्हती. पण “अॅक्शन टेक …” हे ऐकले आणि ए.के. हनगल पुन्हा नट झाले!
आपणा सर्व मराठी लोकांना हनगलांविषयी विशेष आस्था,जवळीक वाटावी व आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला होता! हे त्यांनी, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना देशविरोधी म्हटल्यावर काही वर्षांनी सांगितले!


नऊ-दहा वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या काही कामगार संघटना व पुण्यातील इतर अन्य श्रमिक संघटनांनी ए. के. हनगलांचा सत्कार समारंभ केला. त्या समारंभास मीही गेलो होतो.(आणखी एक कारण म्हणजे समारंभाचे अध्यक्ष माझ्या ओळखीचे औरंगाबादचे डाॅ. भालचंद्र कानगो हे होते. त्यानांही भेटता आले.) लालबुंद गोऱ्या वर्णाच्या ह्या पंजाबी वृद्ध कलाकाराने छोटेसे पण चांगले भाषण केले.


ए. के. हनगलांना ‘ह्या जगण्यावर’ खूप प्रेम होते. दीर्घायुषी असावे असे वाटत असे. सांताक्रुझला एका सामान्य फ्लॅटमध्ये मुलाबरोबर राहात होते. खूप वर्षे जगावे ही त्यांची इच्छा पुरी झाली. २०१२ साली त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्डाचे नूतनीकरण करून घेतले होते. सिनेसृष्टीत पन्नाशी उलटल्यावर येऊन बहुसंख्य भूमिका म्हाताऱ्याच्याच करणारा हा दीर्घायुषी वास्तवात व भूमिकेतीही ‘वृद्ध कलावंत’ २०१२ साली वयाच्या ९८ व्या वर्षी जगाच्या रंगभूमीवरून पडद्याआड गेला!