वृद्ध कलाकार- वास्तवात आणि भूमिकेतही !

आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये अवतार किशन हनगल ह्यांचा १९१४ साली जन्म झाला. अवतार किशन वगैरे नावावरून काही बोध होणार नाही.,ए. के हनगल म्हटल्यावर लगेच लक्षात येईल. हिंदी सिनेमात शाळा मास्तर,प्रोफेसर, डाॅक्टर, कर्नल, शंभूनाथ, रामशरण किंवा रहिमचाचा अशा सर्वसामान्य नावाच्या व माणसाच्या भूमिका हातखंडा उत्तम करणारे ए.के. हनगल ह्यानी स्वातंत्र्य लढ्यात मोठा भाग घेतला. बरेच वेळा ते तुरुंगातही गेले. पोलिसांच्या लाठ्या दंडुकेही पुष्कळ खाल्ल्या.
भगतसिंगाना तुरुंगात टाकले तो दिवस व त्यांना फाशी दिली तो दिवस त्यांना कायम आठवत असे. भगतसिंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यातून ते साम्यवादी विचारांकडे वळले. जालियनवालाबागचे हत्याकांड आणि भगतसिंगला फाशी दिली त्या दिवशी पठाण (North West Frontier मधील) आणि पंजाब रडत होता अशी आठवण ते सांगत.


कराचीत असतांना त्यांच्या ब्रिटीश विरोधी स्वातंत्र्य चळवळीतील कामामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगात डांबले होते.फाळणी झाल्यावर ते हिंदुस्थानात आले.,
ते पूर्वीच शिवणकाम शिकले होते. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते रंगभूमीवर काम करीत होते. १९४९ साली मुंबईत आल्यावर प्रथम ते शिंपी कामच करू लागले. त्याचबरोबर IPTA ह्या संस्थेच्या नाटकात भूमिका करू लागले.वर्तमानपत्रांतही काम करू लागले.


१९६७साली त्यांनी शशधर मुखर्जीच्या ‘शागीर्द सिनेमात मध्ये काम केले. वयाच्या पन्नाशीत सिनेमात आले. आयुष्याची माध्यान्ह उलटता उलटता सिनेमात आले. वयाला अनुरुप भूमिका मिळाल्या आणि त्या ते करू लागले. जागृती,आंधी,नमक हराम, मेरे अपने, गुड्डी, बावर्ची, आनंद, तिसरी कसम (राजकपूरच्या थोरल्या भावाची भूमिका), गरम हवा, सत्यम शिवम सुंदरम् अशा एकूण २२७ सिनेमात त्यांनी काम केले होते. राजेश खन्नाच्या १६ चित्रपटात त्यांनी त्याच्या बरोबर काम केले होते. शोले मधला त्यांच्या इमामसाबचा”इतना सन्नाटा क्यों है” हा संवाद अनेकांच्या लक्षात असेल. अर्थातच तो “कितनेऽ आदमी थे” इतका गाजलेला नाही. पण बऱ्याच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला असेल. त्यांचा अखेर अखेरीचा सिनेमा अमीर खानचा ‘लगान’.


त्यांच्या दत्तुभाऊ, गजानन देसाई, मि. जोशी, सिंधी शिक्षक, इमाम साब, शंभूकाका अशा सामान्य नावांच्या सर्वसाधारण भूमिकेपेक्षा अगदी वेगळी भूमिका त्यांनी “शौकीन” ह्या सिनेमात रंगवली होती. त्यांच्या परिचित प्रतिमेपेक्षा अगदी निराळी होती. त्या सिनेमात अशोक कुमार, प्रख्यात बंगाली नट उत्तमकुमार सारखे नट होते. पण लोकांच्या लक्षात एके हनगलनी रंगवलेला स्त्रीलंपट म्हातारा लक्षात राहिला.


एकदा दिल्लीत हनगल पंचतारांकित हाॅटेलमध्ये कुठल्याश्या पार्टीला गेले होते. हनगलना आपल्या मित्राकडे जायचे होते. त्यांना तिकडे सोडण्यासाठी सोबत वीस बावीस वर्षाच्या तरुणीला जायला सांगितले होते. पण त्या मुलीने मॅनेजरला हळूच सांगितले,” मी जाणार नाही. मी ह्यांचा “शौकीन” पाहिला आहे!” मग दुसऱ्या पुरुषाला पाठवावे लागले!


बाळासाहेब ठाकरेंनी हनगलवर ते देशविरोधी आहेत असा आरोप केला होता. बहुतेक ही १९९२-९३ ची घटना असावी. कारण काय तर ते पाकिस्तानच्या काॅन्सल जनरलने आयोजित केलेल्या त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला हजर होते. प्रत्येक देशाची वकिलात किंवा काॅन्सल जनरल आपल्या कार्यालयात आपल्या देशाचे स्वातंत्र्यदिन साजरे करतात.तसेच पाकिस्तानची वकिलातही करते. त्यात विशेष काही नाही. हनगलांवर मग ‘बाॅलिवुडनेही अघोषित बहिष्कार घातला होता. वर्ष दोन वर्षे कुणीही त्यांना काम देईना. शिवसेनेच्या धाकामुळे हनगल काम करीत असलेले सिनेमेही थिएटरमधून हळूच काढून घेतले जाऊ लागले. तरी बरे हनगल काही धर्मेंद्र, सलमान खान,आमिर खान,शाहरुख खानसारखे स्टार नव्हते. त्यांना आर्थिक झळ तर बसलीच. हनगल श्रीमंत कधीच नव्हते. तशात हा बहिष्कार. IPTAची नाटकेही अशी कितीशी चालत असणार? हनगल पाकिस्तानच्या काॅन्सलमध्ये त्यादिवशी व्हिसाच्या कामासाठी गेले होते! आपल्या सियालकोट ह्या मूळगावी जाण्यासाठी! नंतर बाळासाहेबांनी,” मी एकेंवर कसलीही बंदी घातली नव्हती” असे जाहीर केल्यावर त्यांना पुन्हा कामे मिळू लागली.


ए.के. हनगल इप्टामध्ये काम करीत असता त्यांच्याबरोबर बलराज साहनी, कैफी आझमी सारखी मंडळीही होती.एकेंनी संजीवकुमारला इप्टामध्ये नाटकात भूमिका मिळवून दिल्या.हीआणि सयाजी शिंदे राजकपूर आणि इतर बरेच नट वा नट्या अतिशय सहज वाटेल असा उत्तम अभिनय करत व संवाद म्हणत त्याचे कारण ते प्रथम रंगभूमीवरचे कसलेले कलाकार होते.


ए. के. हनगल एकदा एका शिष्टमंडळा बरोबर रशियाच्या दौऱ्यावरून परत येत असता त्यांचे विमान तांत्रिक अडचणींमुळे पाकिस्तानातील विमानतळावर उतरावे लागले. तिथे हनगलांना पाहिल्यावर अनेक पाकिस्तानी त्यांच्या भोवती जमले. ते हिंदी सिनेमा, नट नट्या, गाणी,संगीत आणि संगीतकार ह्यांच्याविषयी इतके विचारू, बोलू लागले की हनगलांना दम खायलाही वेळ मिळत नव्हता. ते पुढे सांगतात की तिथे जमलेल्या पाकिस्तानी लोकांना त्यांचा राष्ट्राध्यक्ष महम्मद झिया हुल हक त्याच दिवशी विमान अपघातात ठार झाला ह्याचेही त्यांना भान राहिले नाही! जणू ते आजुबाजूचे जग, सर्व काही विसरून गेले होते!


ए.के हनगल पं नेहरूंचे नातेवाईक होते. हनगलची आई आणि पं नेहरूंची पत्नी कमला नेहरू ह्या चुलत/ मामे किंवा मावस किंवा आते बहिणी होत्या.
ए. के. हनगल ह्यांचे अखेरची काही वर्षे हलाख्याची गेली.२००५ साली त्यांनी अमोल पालेकरच्या सिनेमात काम केले. त्या अगोदर सात आठ महिने आजारपणामुळे घराबाहेर पडले नव्हते. पण सिनेमात कॅमेऱ्यापुढे उभे राहिले की तब्येतीची पर्वा न करता त्यांच्यातील नट बाहेर येई.
त्यांचा मुलगा विजय हा बाॅलीवुड मध्ये कॅमेरामन होता. पण त्यालाही काम मिळेनासे झाले. हनगलांच्या औषधपाण्याचा खर्च परवडत नव्हता. मुलगा विजय हा ७५ वर्षाचा.त्यालाही पाठीचे दुखणे.कुणाला काम नाही. पैसे नाहीत. राज ठाकरेंनी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोडी मदत केली. वर्तमानपत्रातून हनगलांच्या परिस्थितीची बातमी आली.त्यावेळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही मदत केली.


ए. के. हनगल ह्यांना पद्मभूषण देऊन सरकारनेही गौरवले.
२०१२ साली मधुबाला-एक इश्क और जुनुन ह्या TV मालिकेत काम करायला ९७ वर्षाचे ए. के. हनगल व्हील चेअरवरून आले. त्यांना स्वत:लाही आपण काम करू शकू ह्याची खात्री नव्हती. पण “अॅक्शन टेक …” हे ऐकले आणि ए.के. हनगल पुन्हा नट झाले!
आपणा सर्व मराठी लोकांना हनगलांविषयी विशेष आस्था,जवळीक वाटावी व आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला होता! हे त्यांनी, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना देशविरोधी म्हटल्यावर काही वर्षांनी सांगितले!


नऊ-दहा वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या काही कामगार संघटना व पुण्यातील इतर अन्य श्रमिक संघटनांनी ए. के. हनगलांचा सत्कार समारंभ केला. त्या समारंभास मीही गेलो होतो.(आणखी एक कारण म्हणजे समारंभाचे अध्यक्ष माझ्या ओळखीचे औरंगाबादचे डाॅ. भालचंद्र कानगो हे होते. त्यानांही भेटता आले.) लालबुंद गोऱ्या वर्णाच्या ह्या पंजाबी वृद्ध कलाकाराने छोटेसे पण चांगले भाषण केले.


ए. के. हनगलांना ‘ह्या जगण्यावर’ खूप प्रेम होते. दीर्घायुषी असावे असे वाटत असे. सांताक्रुझला एका सामान्य फ्लॅटमध्ये मुलाबरोबर राहात होते. खूप वर्षे जगावे ही त्यांची इच्छा पुरी झाली. २०१२ साली त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्डाचे नूतनीकरण करून घेतले होते. सिनेसृष्टीत पन्नाशी उलटल्यावर येऊन बहुसंख्य भूमिका म्हाताऱ्याच्याच करणारा हा दीर्घायुषी वास्तवात व भूमिकेतीही ‘वृद्ध कलावंत’ २०१२ साली वयाच्या ९८ व्या वर्षी जगाच्या रंगभूमीवरून पडद्याआड गेला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *