वि
ही
री
ती
ल
पा णी
बेलमॅान्ट
विहीर दिसली की तिच्यात डोकावून पाहण्याचा मोह कुणाला होत नाही? लहानपणी तर प्रत्येक जण विहीरीच्या भिंतीवर ओणवे होऊन, पाय उचलून, वाकून वाकून खोल पाण्याकडे पाहात असतो.
विहीर ! खोल, आणि दिवसाही आतून थोडेसे उन झेलणारी; किंचित अंधारी, काळोखी अशी वाटणारी! त्यामुळे विहीरीत पाहिले की, “ रात्र काळी बिलवर काळी । गळामुखी माझी काळी हो माय” असा विहिरीत सर्व काही थोडा प्रकाश मिसळलेला काळोख दाटलाय असे वाटायचे.
विहीर म्हटले की मी माझ्या डोळ्यासमोर येते ती मी पाहिलेली पहिली विहीर- खारी विहीर! सात की नऊ बुरुजी गढीसारख्या ( मी लहान असल्यामुळे तितके बुरुज होते की नव्हते हे पाहिल्याचेही आठवत नाही. दोन तीन पाहिल्याचे आठवते. तेही ढासळत आलेले) आमच्या आजीच्या मोठ्या वाड्यातील विहीर लहान कशी असेल ? खारी विहीरही प्रचंड वाड्याला शोभेल अशीच होती.
तिची प्रत्येक पायरी उतरताना कमरेला भरजरी शेला, त्यात जांभळ्या मखमलीच्या म्यानात तेजतरार तलवार लटकावलेली, दोन्ही बाजूला उभे असलेल्या मानकऱ्यांचा मुजरा घेत उतरतो आहे, असे त्या अर्ध्या चड्डीसदऱ्याच्या, मनगटाने नाक पुसण्याच्या वयातही वाटत असे. पायऱ्या उतरून कमानी खालच्या पाण्याजवळच्या पायरीवर उभे राहिले की मात्र त्या मोठ्या चौकोनी विहीरीतले ते शांत,पसरलेले पाणी पाहून जीव घाबरा घुबरा होत असे. पोहायचे नसतानाही छातीवर दडपण येई! पण हे सुरवातीचे पाच दहा क्षणच! तोपर्यंत वरच्या उंच कठड्यावरून धाडकन मुटका मारून चारी बाजूला उंच उडवलेले जोरदार पाणी तितक्याच वेगाने स्वत:भोवती फिरत गोल पसरत गेलेले असे. पाण्यावर पांढऱ्या काळसर फेसांची गोल गोल वर्तुळे फिरू लागली असत.बराच वेळ बुडबुडे दिसत. हळूच एक डोके वर येत असे. पाण्यातच उभे राहून हाताने केस मागे सरकवत,मान हलवून पाण्याचे थेंब उडवत,आवाज न करता हात मारत आईचे कुणी चुलत मामा, काका,भाऊ पोहत पलीकडे गेलेलेही असे.
लहान असल्यामुळे डोळेही लहान. डोळ्यांना सगळे काही मोठेच दिसायचे. त्यात भर म्हणजे बालपणातले कुतुहल, आश्चर्य व थक्क होण्याची सवय. सर्व काही विस्फारलेल्या डोळ्यांनीच पाहावे लागे. त्यामुळे खाऱ्या विहीरी सारखी मोठी विहीर जास्तच मोठी दिसायची. प्रत्येक वस्तु मोठी वाटायची. त्यानंतर आजीच्या गावी पुन्हा जाणे झाले नाही. आज तो बुरुजी वाडाही आहे का नाही माहित नाही.. विहीरही असेल नसेल. असली तरी कशा अवस्थेत असेल कुणास ठाऊक. झाडा ढगांच्या सावल्यांनी ‘झांकळोनि जळ काळिमा पसरलेला’ असेल. पण आजही कधीऽ तरी स्वप्नात ती ‘खारी विहीर’ येते. कारण नसता उत्सुकतेने क्षणभर छातीचे ठोके वाढतात. पण लगेच समोर पसरलेल्या पाण्याच्या गारव्याने स्वप्नातही धीर येतो.
विहीरीचा विषय निघाला आहे तर आजही आमच्या गावात पूर्वीपासून असलेल्या दोन विहीरी लक्षात येतात. एक डाळिंबाचे आड. म्हणताना तिचे डाळिंब्याचे आड व्हायचे. दुसरी म्हणजे नव्या पेठेतली गंगा विहीर. ही तेव्हाही बंदच असायची. डाळिंबाचे आड लहान विहीरच म्हणायची. ती काही वर्षे तरी रोजच्या वरकामासाठी वापरात होती. आज तीही नाही. बऱ्याच गावातील विहीरींप्रमाणे, आमच्या ह्या दोन विहीरींचाही पत्ता सांगण्यासाठी तरी मोठा उपयोग होत असे!
पण अंगावर काटा आणणाऱ्या एका विहीरीचा उल्लेख केला नाही तर गावाचेही वर्णन पूर्ण होणार नाही. ती म्हणजे ऐतिहासिक किल्यातली ‘बाळंतीणीची विहीर’ ! नावापासूनच रहस्यमय भयपटातील “ कॅुंईऽकर्रऽऽ किर्रऽऽकॅ किं ऽऽईऽ करत किंचितच उघडणाऱ्या दरवाजाची व त्यातून फिकट पिवळसर किंवा निळसर प्रकाशाच्या रेघेची व पडद्यामागील थरकाप वाढवणाऱ्या संगीताची” आठवण येऊन आपण खुर्चीच्या अगदी काठावर येऊन बसतो! आणि त्या विहीरीच्या एकाच गोष्टीच्या झालेल्या अनेक चित्तथरारक रूपांच्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता वाढते! ह्याला म्हणायचे ‘नावात काय नाही’?
खाऱ्या विहीरीच्या अगदी उलट अशी एक विहीर आमच्या गावात होती. दीनवाणी! जणू दुर्दैवाच्या दशावतारात सापडलेली. वारदाच्या कोर्टासारख्या राजेशाही इमारतीच्या मागे पसरलेल्या आवारातील एका भागात ती होती. त्यावेळीही ती ‘होती’ म्हणावी अशीच होती. भोवताली काटेरी झुडपे; त्यावर चढलेल्या रानवेलीं मधून ती जेमतेम दिसायची. मोठ्या ओबड धोबड झालेल्या गोलाकार खड्ड्याला विहीर का म्हणायचे तर आजूबाजूचे अनुभवी लोक विहीर म्हणायचे म्हणून. विहीरी भोवती दगड विटांचे तुकडे पडलेले. कधी काळी असलेल्या तिच्या भिंतीच्या तुकड्यांचे एक दोन अवशेष कलंडून उभे होते. पाला पाचोळा केर कचरा आणि शेवाळ्यांमधून हिरव्या पाण्याचे चार दोन पसरट दिसत. निर्जन भागातली, जणू वाळीत टाकलेली ती विहीर होती. आमच्या सारखी लहान पोरे, दुसरे काही उद्योग नसले तर कधी तरी एकदा त्या काट्याकुट्यांतून उड्या मारत,दगड विटावर पाय ठेवून आत डोकावल्यासारखे पाहून परत येत असू. स्वत:ला थोडे भेदरवून घेत,गप्प होऊन परत मागे फिरत असू.
काही वर्षांनी तिथले कोर्ट गेले. महापालिका आली. मागच्या मोकळ्या जागेत बांधकाम झाले. त्यात नावापुरती राहिलेली ही ‘विहीर’ नाहीशी झाली.
पण विहीरींचा खरा उपभोग व उपयोग आम्ही भावंडे, मित्र, लहान मुले-मुली व तरुण उन्हाळ्याच्या सुटीत पोहण्यासाठी करून घेत असू. गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील विहीर ही त्यासाठीच होती. गोपाळरावही दिलदार माणूस. दरवर्षी त्यांनी आमच्यासारख्या लहानांना आणि मोठ्या मुलांनाही पोहायला शिकवले. अशी बरीच वर्षे! कुणाकडूनही एक पैसा न घेता! ॲकडमी, स्पोर्ट जिम, हेल्थ क्लब, रेक्रिएशन स्किल्स अशापैकी एकही नाव किंवा जलतरण विद्या मंडळ, केंद्र, तरंगिणी, तरणतारण, असलीही नावे न ठेवता ते फक्त जो येईल त्याला पोहायला शिकवीत असत. बरं विहीर म्हणायची खरी पण तशी लहान वाटायची.
गोपाळरावांच्या विहीरीत उतरायला पायऱ्या होत्या. पायऱ्या नेहमीच्या नाहीत. विहीरीच्या एका गोलाईच्या भिंतीतून एकेक हैदर आडवा बाहेर आलेला. एका खाली एक हैदर होता. त्यांमधील अंतर लहानांसाठी जास्त होते. कारण दोन हैदरमध्ये काही नव्हते. दोन दातामधला एक एक दात पडल्यावर राहिलेले दात दिसावेत सल्या पायऱ्या! पण कुणाच्या तरी मदतीने लहान मुले विहीरीत येत. तरीही त्या दगडी पायऱ्या उतरत येताना सिनेमातील आलिशान बंगल्याच्या आतील वळणदार जिन्यावरून गाऊन घातलेला व तोंडात सिगरेट धरून उतरणाऱ्या अशोककुमारची आठवण यायची. गोलाकारावरून खाली उतरताना पहिल्या तीन चार पायऱ्या काही वाटत नसे. पण जसे खाली खाली यावे तेव्हा काळ्या विवरात शिरत आहोत किंवा अंधाऱ्या गाभाऱ्यात चाललो आहोत असे वाटायचे. पाण्याच्या भीतीत ही भीती मिसळा मग लक्षात येईल की पोहायची भीती का वाटते. पण काही तरूण मुले एकापाठोपाठ धाडकन उड्या तरी किंवा मुटका मारून एन्ट्री घेत. पण नंतर अशा नाट्यमय पण पाण्यात असणाऱ्या व उडी घेणाऱ्या दोघांनाही धोकादायक एन्ट्रीला गोपाळरावांनी बंदी घातली.
पहिले काही दिवस प्रत्येकाच्या कुवतीनुसार स्वत: आणलेले डालडाचे पाच-दहा पौडी डबे पाठीला बांधून पाण्यातल्या पायऱ्यांपाशीच डुबक डुबुक करावे लागे. माझ्यासारख्या, दंड दालचिनी एव्हढे आणि गोळा मिरीएव्हढा,पाय ज्येष्ठमधाच्या काड्या, अशा ‘गब्रु सॅंन्डोला’ डबा बांधण्या ऐवजी मलाच डब्याला बांधावे लागे. म्हणून गोपाळराव म्हणत,” अरे ह्याचा डबा सोडा. हा कसला बुडतोय! “ मग माझ्याकडे पाहात म्हणायचे,” पाण्यांत राहा. वर हवेत तरंगायचं नाऽही!”
पण हे डबा प्रकरण फार तर एक दोन दिवस चाले. त्यानंतर लगेच गोपाळरावांचे पोहण्याच्या बिगरीतील पोरांसाठी पायरीला धरून “ हात मार पाय मार”चे लेफ्ट राईट् सुरू होई. त्या नंतर मुलांच्या पोटाखाली ते हात ठेवल्यासारखा करत पाण्यांतून “हात मार पाय मार” करत फिरवायचे. त्यांनी मध्येच हात कधी काढला हे पोराला एक दोन गटांगळ्या खाल्यावरच समजे.त्यांची पुढची पायरी म्हणजे ते मुलांच्या हनुवटीला बोटांनी वर उचलून ते पाण्यातून त्याच्याकडे पाहात मागे मागे जात. पोराला आपण पाण्यात असूनही हात पाय मारत अर्धी फेरी मारली हे समजतही नसे. कारण तेव्हढ्यात गोपाळराव दुसऱ्या पोराकडे “ए हात मार पाय हलव” करत गेलेले असायचे! आम्हा सगळ्यांना, न शिकताच आम्ही पोहू लागलो असा भ्रम व्हायचा. ह्यामुळेच गोपाळराव व त्यांची विहीर तिथे पोहायला शिकलेल्या सर्वांच्या आठवणीत असते!
गोपाळराव केळकरांच्या वाड्यात दुपारचे तीन तास तर सहज निघून जात. ज्यांचे नंबर लागायचे असतील ते पत्त्याचा डाव मांडून बसायचे; ज्यांचे पोहणे झाले असे तेही दुसरीकडे खेळत बसत. वसंता आणि भालू , दत्ता,बंडू सारखी किंवा आमचे थोरले भाऊ नाना, मुकुंद, अरूणआणि मधू हे मात्र पाण्यात आवाज न करता निरनिराळे हात मारत चकरा घेत असत. मध्येच कासवासारखे पाण्याच्या आतून पोहत.त्यांना त्यांच्या कौशल्याचे हे पारितोषिक असे. मग तीन सव्वा तीन वाजता तिथल्याच अंगणात वाळलेले, किंवा आंबट ओले कपडे खांद्यावर टाकून मजेत घरी यायचो!
एकदा पोहायला आल्यावर मग काय! आज वारदाच्या बागेतल्या विहिरीत तर परवा गुलाबचंदशेठच्या पंख्याच्या विहीरीत, तर कधी गणेशराम मुरलीधर यांच्या बागेतील विहीरीत पोहण्याच्या मोहिमेवर निघायचो. मोहिमेवर का म्हणायचे तर ह्या तीन विहीरी शहराच्या तीन दिशेला होत्या. ह्या मोठ्या धनवान माणसांचे मोठेपण की ते आमच्या सारख्या मुलांना त्यांच्या खाजगी विहीरीत पोहायला उदार मनाने परवानगी देत. पण आम्हीही तिथे कधी गडबड धिंगाणा केला नाही. पंख्याची विहीर म्हणजे दुरुनही दिसणारी तिची पवनचक्की असलेली विहीर! तिथली नारळाची उंच झाडे व आंबा चिक्कू पेरूंची व तऱ्हतऱ्हेंच्या फुलांचीही झाडे असलेली सुंदर बाग ह्यामुळे पंख्याची विहीर शोभिवंत होती! तिच्या पाण्यावर ही फळाफुलांची बाग बहरलेली असे.
थोडा भाजीपालाहू पंख्याची विहीर काढत असे. वारदाच्या बागेतील विहीर ही त्यांची उपवनासारखी बाग ताजी तवानी ठेवायची व जवळच असलेल्या शेतालाही पाणी पुरवत असावी. तशीच गणेशरामचीही विहीर. ह्या तिन्ही विहीरी खऱ्या विहीरी वाटायच्या. ह्या तीन विहीरी शहराच्या तीन टोकाला असल्यामुळे चालत जाणे किंवा सायकलवरून जाणेही रोज कधीच जमत नसे.त्यामुळे संपूर्ण सुट्टीत फार तर एक दोन वेळा प्रत्येक विहीरीत पोहणे होत असेल. पण जितके होई ते उत्साहाला भरतीच आणत असे.
गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील बेतशीर विहीर म्हणजे अनेकांची पोहण्याची Alma Mater च होती! त्यांच्या वाड्यातील लोकांच्या धुण्या भांड्यांसाठी ती वापरली जाई. पिण्याच्या पाण्यासाठी शहरात नळाने पाणी पुरवठा होतच असे. ह्या सर्व विहीरींनी आम्हाला पाण्याचे वेगळे, गंभीर तितकेच खेळकर रूप दाखवले. भव्य, देखण्या,खाऱ्या विहीरीकडे,मी दोन तीन दिवस जवळून फक्त एकटक नजरेने समोर पसरलेले पाणी पाहत असेन.किती वर्षे उलटून गेली.पण ती माझ्या डोळ्यांच्याही लक्षात राहिली आहे.
पुढे बरेच जणांनी आधुनिक स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचे सुख उपभोगले. पण ह्या चार विहीरींच्या पाण्यातील गंभीरतेची, भयोत्सुकतेची, मध्येच घाबरलेल्या नवशिक्यांच्या चित्कारांची, त्यांची गंमत करणाऱ्यांच्या हसण्या खिदळण्याची, उड्या आणि मुटक्यांनी सपकन चौफेर उडवलेल्या उंच फवाऱ्यांची, ‘गावच्या पाण्यात’ पोहण्याच्या आठवणी ते विसरले नसतील. कसे विसरतील? त्या आठवणी म्हणजे भाग्यानेच लाभावी अशी आमच्या गावच्या पाण्याची चव होती!