पैसा झाला मोठा!

वजन-मापाची, लांबी- रुंदीची, अंतराची कोष्टके प्राथमिक शाळेत पाठ करावी लागत त्यावेळेस कंटाळा यायचा. इंच फूटांपासून, यार्ड ,फर्लांग ते मैल ह्यांची कोष्टके पाठ करण्यापेक्षा मैलो न् मैल चालणे बरे वाटायचे. आपल्याकडे एक मैला नंतर दोन मैल हे अंतर सुद्धा कोष्टकात होते. दोन मैल म्हणजे एक कोस. एका मैलापेक्षा जास्त अंतर कोसात सांगितले जात असे. खेड्यात पलीकडचे गाव ,”अहो हे काय चार कोसावर तर आहे!” असे म्हणत.

काय गंमत आहे पाहा. पैशा नाण्यांची कोष्टके पाठ करताना मात्र मजा वाटायची. माणसाला लहानपणापासून पैशाचे आकर्षण आहे हेच खरे. आम्हा लहान मुलांना पैशाचे महत्व माहित नव्हते. पण पैसे खुळखुळायला मजा येत असे. सुट्या पैशांची नाणी बाजूला करत चवड रचणे हा एक वेगळाच विरंगुळा असे. नोकरीत फिरतीवर असताना भुसावळ मेडिकल स्टोअर्समध्ये रात्री दुकान बंद केले की बरेच वेळा गप्पा मारत, मालक बाळासाहेब आचार्यांच्या बरोबर नाण्यांची; रूपये, दोन रुपये, पाच रुपयांच्या नाण्यांची चवड करत त्यांचा गल्ला मोजत असे. आचार्य विनोदी बोलायचे. त्यांच्यामुळे माझे कोमट विनोदही कढत व्हायचे. पण ह्या हसण्या खिदळण्यामुळे नाणी व चवड पुन्हा मोजायला लागायची! पण बाळासाहेब हुशार. नोटा मात्र ते स्वत: मोजत !


बाजारात शिरताना, कापडाची पथारी पसरून पैशाची, एक आण्याची, चवल्यांची (दोन आण्यांचे नाणे) , पावल्यांच्या (चार आण्यांचे एक नाणे, अधेली ( आठ आण्यांचे नाणे) आणि रुपयांच्या नाण्यांच्या चवडी रचून चिल्लर देण्याचा व्यवसाय करणारे दिसले की आता बाजारात आलो हे समजायचे. नाण्यांच्या त्या चवडी व बाजूला नाण्यांच्या सरमिसळीचा ढिगारा मागे वळून वळून पाहात पुढे जात असू.

‘पैशांची चवड’ घेऊन बसलेले तीन चार जण पाहिले की मनात यायचे, “इतके पैसे! हे उघड्यावर घेऊन कसे बसतात? “ आम्हाला पैसे मुठीत घाम येईपर्यंत घट्ट धरून तरी ठेवायचे किंवा चड्डीच्या खिशात तळाशी खोल दडवून ठेवायचे येव्हढेच माहित होते. दुसरा प्रश्न पडायचा की हे एव्हढे पैशेवाले लोक आणि रस्त्यावर पथारी पसरून का बसलेत? आणि ह्यांचा अवतार इतका साधा कसा? ह्या व अशा सगळ्या प्रश्नांना श्यामने एकाच प्रश्नाने वाचा फोडली. त्याने वडिलांना विचारले की,” हे आपला पैसा का विकतात? आणि दुसरे लोक तो कशाने विकत घेतात? “ अण्णांनी आम्हाला समजेल असे थोडक्यात सांगितले की,”ही माणसे,ज्यांना सुटे पैसे, मोड हवी असते त्यांची ती मोठी नाणी, नोटा घेऊन त्याबदली सुटे पैसे देतात. त्याबद्दल ते थोडे पैसे कापून घेतात; म्हणजे पैसे कमी देतात.”

आज रस्त्यांवर पैशांच्या नीटनेटक्या रचलेल्या चवडी व तो व्यवहार करणारी ती लहान माणसे दिसत नाहीत. ती आता गगनचुंबी इमारतीतील काचेच्या चकाचक ॲाफिसातून डॅालर्स, पाउंड, युरो,येनच्या खरेदी विक्रीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतात !

पैशाची मोजणी पै ह्या एकाक्षरी लहान नाण्याने होई. तीन पै मिळून एक पैसा होई! पण पै हे नाणे बंद झाले होते. दोन पैशांचा एक ढब्बू होत असे. हे तांब्याचे मोठे नाणेही एक दोनदाच पाहिल्याचे लक्षात आहे. तेही बंदच झाले होते. पण त्या ऐवजी ब्रिटिश सरकारने दोन पैशाचे एक लहानसे चौकोनी नाणे काढले होते. तेही लवकरच बंद झाले! पै वरून चिं. वि. जोशींच्या लहानपणी त्यांनी केलेल्या विनोदाची आठवण येते.. ते आपल्या वडिलांबरोबर जात असता म्हणाले, “बाबा,तो पहा एक पैसा येतोय.” चिंवि काय म्हणत होते ते वडिलांना समजेना. . त्यांनी विचारले,” अरे कुठाय पैसा?” “तो काय,समोरून पै काका आणि त्यांची दोन मुले येताहेत. तीन पै एक पैसा!”


महायुद्धाचे ढग येऊ लागले तसे पैशाच्या नाण्यांच्या जोडीनेच व्यवहारात नोटांची चलती सुरु झाली. नोटा होत्याच पण सामान्यांच्या वाट्याला कमी येत. पगारदार नोकर, व्यापारी लोकांत, बॅंकात, नोटांची उठबस जास्त होती.नाण्यांचे आकार कमी होऊ लागले. रुपयातली चांदी एकदम कमी झाली. इतर नाण्यातील स्टेनलेस एकदम वाढले. पैशाची तर फार नाटके झाली. पहिल्या प्रथम तांबडा पण साधा एक पैसा असूनही त्याचा आकार नेटका होता. तो निम्याने कमी झाला.
युद्ध सुरू झाल्यावर तर त्याला मध्यभागी भोक पाडले! त्याला भोकाळी पैसा नाव पडले. त्याकाळची जुनी मंडळी पैशाचे हे हाल पाहून नेहमीची शेरेबाजी करू लागली. “चिंतामणराव! काही खरं नाही आता. ”कलियुग आलं हो कलियुग!काय काय पाहावं लागणार आहे आणखीन! पांडुरंगा तुलाच माहित!” हे केवळ एका पैशाचा आकार कमी झाला व हे कमी झाले म्हणून की त्याचा कोथळाच बाहेर काढला त्यामुळे ही थेट कलियुगापर्यंत नेणारी नेहमीची पराकोटीची शेरेबाजी!

पण लोकही इतके डोकेबाज की स्टोव्ह रिपेर करणाऱ्यांनी त्याच्या पंपाच्या दट्ट्यात वॅाशर म्हणून; सायकल दुरुस्ती करणाऱ्यांनी, लहान यंत्रे दुरुस्त करणाऱ्यांनी तो पैसा वॅाशर, चकती म्हणून वापर करायला सुरुवात केली. काही पेंटर लोकांनी कल्हई करून पाट्यांच्या अक्षरात, बॅार्डरच्या नक्षीत,तर बायकांनी लहान मुलींच्या परकराच्या घेराला कल्हई केलेला व साधा पैसा वापरून फॅशन करायला सुरुवात केली. बऱ्याच हौशी पोरांनी तांबड्या करदोट्यात तो ओवून गळ्यात घातला. तर पैलवान लोक काळ्या दोऱ्यात ओवून दंडात ताईत म्हणून बांधू लागले! पैशाचे व्यवहारातील हे असले चलनवलन पाहून, पैशाचे अवमूल्यन आहे का मूल्यवर्धन आहे ते अर्थशास्त्र्यांनाही समजेनासे झाले!

चार पैसे एक आणा, दोन आण्यांची एक चवली. चार आण्यांची एक पावली किंवा सोळा आण्यांचा एक रुपया होतो हे कोष्टक न पाठ करताही शाळकरी मुलांनाही माहित असे. आजही अनेकांना,पैसा जवळ नसला तरी, पैशाचे कोष्टक मात्र तोंडपाठ असते. अनेक गरीबांना फक्त कोष्टकच येत असते.

रुपया म्हणताना तो,”चांगला एक बंदा रुपया,” किंवा “खणखणीत एक रुपया दिला की त्याला !”असे जोर देऊनच म्हटले जाई. रुपया हे नाणे खरेच मोठे होते. चांदीचा रुपयाही पाहिला व हातात घेतल्याचे आजही अनेकांच्या लक्षात असणार ह्यात शंका नाही. कुणी आपली वस्तु किंवा बाजू खरी व भक्कम असल्याची ग्वाही,”अहो आमचे नाणे खणखणीत आहे!” तसेच लग्नाच्या स्थळा संबंधात मुलाची किंवा मुलीची ग्वाही देताना, “अहो आमचा मुलगा-मुलगी म्हणजे खणखणीत बंदा रुपया आहे!” असे अभिमानाने सांगितले जाई!

चांदीचे रुपये ह्या हातातून त्या हातावर ओघळत नेताना होणारा आवाज आजही ऐकू येतो ! आजही कधी चार पैसे खिशात खुळखुळतात तेव्हा जगाचा राजा झाल्याचा आनंद होतो.

नाहीतरी पैशाचाच आवाज सर्वात गोड असतो म्हणा!


बेलमॉंट

1 thought on “पैसा झाला मोठा!

  1. अतुल सोनक

    ओघवत्या खुमासदार शैलीत लिहिले आहे, वाचून खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. सारं जग इथून तिथून सारखं च असतं म्हणा. पैसा हाच सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे असे U. G. Krishnamurti ही म्हणायचे.

    सुधीर चा मित्र अजय देशकरच्या (माझा मामेभाऊ) मार्फत ही लिंक मिळाली.
    मी खूप वर्षांपूर्वी सुधीर ला भेटल्याचे आठवते.
    धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *