भय इथले वाटत नाही!

कोलंबस डे.
मॅरिएटा.

कितीही मोठ्याने आक्रोश केला, जीवाच्या आकांताने किंकाळे फोडली, जोर जोराने हात पाय हलविले तरी कोणालाही ऐकू जाणार नाही. कुणाला दिसणारही नाही.चिटपाखरू मदतीला येणार नाही. अशा भयानक परिस्थितीत ६७ वर्षाचा रे क्लेमबॅक सापडला होता.

हवाई बेटावरून सकाळी आपल्या लहानशा सेसना–१८२ या एक-इंजिनी विमानातून ऑस्ट्रेलियाकडे आपल्या घरी जाण्यासाठी रे क्लेमबॅकने उड्डाण केले.हा पंधरा तासांचा हवाई प्रवास. तोही पॅसिफिक महासागरावरून. विमानात एकटा. ६०० मैल पार केले. आणि विमान गिरक्या घेऊ लागले. रे क्लेमबॅकने कसे बसे जीव रक्षक जाकिट घातले. गिरक्या घेत विमान खाली अथांग पसरलेल्या महासागरात कोसळले. विमानाचे तुकडे झाले!

सभोवार अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर. कोठेही पाहिले तरी फक्त पाणी, पाणी आणि पाणी. आणि पाण्याला टेकलेले आकाश. आकाशात सूर्य आणि पाण्यावर त्याचा चमचमणारा प्रकाश. वर आभाळ आणि सभोवताली समुद्र. दुसरे कुणीही नाही. नाही म्हणायला आजूबाजूनी धडकी भरवणारे शार्क मासे मात्र सळसळत्त जात होते. जीवाचा थरकाप उडवणारा त्यांचा पहारा जीव मुठीत धरून पहायचा. पण तेही पुतळ्यासारखे स्तब्ध राहून.

आरडा ओरडा करून फायदा नाही. उलट शार्क मासे कुणी लहान प्राणी समजून लचके तोडतील. आणि केला आरडा ओरडा; हालवले हात पाय जोरजोरात, तरी कुणाला दिसणार! समुद्रात पडलेला माणूस म्हणजे केवळ एक लहान ठिपका. क्षुद्र, क्षुल्लक ठिपका.

वरती आकाश. भोवती पाणी. बाकी काही नाही. क्षितिजाकडे पहायचे. लाट आली की नम्र व्हायचे किंवा तिच्यावर स्वार व्हायचे. शांत रहायचे. अगदी शांत. कसलाही आकांत नको की हळवेपणा नको.मदत यॆईल. मदत येणारच. इतक्यात कोणीतरी यॆईलच. शांत. शांत. सारे काही शांत.

ओरडायचे? आरोळी मारायची का किंकाळी फोडायचे? कोण ऐकणार? फक्त शार्क. ते येतील. गट्टम करतील चहा बरोबरच्या बिस्किटासारखे.

हे सर्व अनुभवी रे क्लेमबॅकला माहित होते. त्याने एकट्याने गेली तीस बत्तीस वर्षे ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटे हा हवाई प्रवास २२० वेळा केलाय! विमानातून खालचा पॅसिफिक महासागर १५-१५ तास पाहिला आहे. शांत. सारे कसे शांत. पाणी आणि आकाश. अथांग पसरलेले पाणी. अगदी एकटे. आपणही तसेच एकटे. एकटेपणा. निर्जन एकांत. हे सर्व त्याने अनुभवले आहे. क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्याची शांतता प्रचंड दडपण आणते. १९९९ साली असेच एकदा विमान कोसळून पाण्यात पडण्याचा अनुभवही गाठीशी होता. पण त्यावेळेस बरोबर एक सोबती तरी होता. आज ४-५ ऑक्टोबर २००४ रोजी मात्र रे क्लेमबॅक एकटा होता.

विमान कोसळून रे खाली पडला तेव्हा एका लाटेवर आदळून आपण खाली गेलो इतकेच त्याला आता आठवत होते. चार चार फुटांच्या लाटांमधून तर कधी लाटांवर तरंगत तो खंबीरपणे पाण्यात होता. लाटांशी खेळत झुंजत डोके शांत ठेवून तो वाट पहात होता. हवाईहून निघताना त्याच्या जोडीनेच दुसरे एक सेसना-१८२ विमान निघाले होते.त्या विमानाने क्लेमबॅकचे विमान कोसळल्याचे पाहिले होते. तीन साडे तीन तास त्या विमानाने घिरट्या घालत ह्या अपघाताचा ठाव ठिकाणा सांगत संदेश पाठवले होते.

मदत यॆईलच असे स्वत:ला बजावत पॅसिफिक महासागरातला रे क्लेमबॅक नावाचा तो लहानसा ठिपका तग धरत होता. मदत यॆईपर्यंत जिवंत राहणे भाग होते….. लाटा येतच होत्या…जातही होत्या.

नावाने प्रशांत असला तरी पाण्याची जीवघेणी भेदकता, आपल्या पाण्याचे पाश आवळण्याची प्रचंड शक्ती ह्या महासागरात आहे. त्याची घन गंभीरता, एकाकी शांतताच जीवघेणी आहे. ही भयाण शांतताच पसरत पसरत लाटांत मिसळून पाश आवळत होती. पाण्यात पडून किती वेळ झाला त्याचे ह्या मानवी ठिपक्याला भानही नव्हते. मदत येणार, यॆईलच, कोणीतरी वाचवेल ह्याचा जप मनात चाला होता.

क्लेमबॅकचा तांबूस चेहरा, निळसर हॊऊ लागला. उन्हाच्या तडाख्याने कातडी भाजून अलवार झाली.जाकीट मानेशी घासून घासून मान चांगलीच खरवडून निघाली होती. साडेसात तास झाले होते.अमेरिकेच्या सागरी रक्षक दलाला बातमी मिळाली. त्यांनी लगेच एक विमान पाठवले. पहिल्या प्रथम त्या विमानाला पाण्यात काहीच दिसेना. काही वेळाने पाण्याशी झगडत असलेला रे क्लेमबॅक हा लहान ठिपका दिसला. विमानातून एक लहा तराफा टाकला. लॉस एंजल्सहून निघालेल्या पी ऍंड ओ कंपनीच्या बोटीला त्यांनी संदेश पाठवला. आणि ते विमान निघून गेले. रे आता त्या लहानशा तराफ्याला धरून वाट पहात बसला.

साडे दहा तासानी ते जीवदायिनी जहाज आले. दमल्या भागल्या रे ला त्यांनी, “कसा आहेस? फार जखमी झालायस का” असे विचारले. “जखमा नाहीत. खूप थकलोय.” रे नी सांगितले. जहाजावरच्या लोकांनी त्याला अलगद बोटीवर उचलून घेतले.

साडे सतरा तास निर्जन समुद्रात एकाकी धडपडणारा रे क्लेमबॅक बोटीवर आल्या आल्या खाली कोसळला

साडे सतरा तासांच्या जलदिव्यातून सुखरूप सुटका झाल्याचा आनंद त्याला झालाच पण ३०-३२ वर्षे सेसना सारख्या लहान विमानातून २२० वेळा एकट्याने प्रवास करणाऱ्या धाडसी रे क्लेमबॅक्ने “हा एकट्याने पॅसिफिक महासागरावरचा प्रवास अखेरचाच” असे जाहीर केले.

आपल्या मनाविरुद्ध, नाईलाजानेच त्याने हा निर्णय घेतला असणार. गेल्या तीस बत्तीस वर्षांच्या ह्या हवाई उड्डाणाचा प्रत्येक वेळेचा अनुभव अद्भुत, आणि अपूर्व आनंदाचाच होता.

पॅसिफिक महासागराची अद्भुत गूढरम्यता, तिथली अफाट पसरलेली एकाकी शांतता, गूढरम्य वातावरण, त्या सगळ्यांचे मानसिक दडपण हे सर्व धाडसी आणि साहसी मनाला खेचून घेणारे मोहमयी आकर्षण आहे. परवाच्या प्रचंड मानसिक थकवा आणणाऱ्या अनुभवानेच रे क्लेमबॅकने हा निर्णय घेतला असावा.

खंबीर मन, शांत, स्थिरबुद्धी आणि बळकट शरीराचा रे क्लेमबॅक खरा पराक्रमी पवनपुत्र!

*******************************************

गेबी केनार्ड ह्या ६० वर्षाच्या धाडसी ऑस्ट्रेलियन महिलेनेही अशाच विमानातून एकटीने जगाला प्रदक्षणा घालण्याचा पराक्रम केला आहे. असा विक्रमी प्रवास करणारी गेबी ही पहिली ऑस्ट्रेलियन स्त्री आहे.

बेन फ्लिन ह्या ऑस्ट्रेलियन वैमानिकानेही २००२ साली असा विक्रम केला आहे.

पॅसिफिक महासागराच्या विलक्षण गूढरम्य वातावरणाचा अनुभव ह्या सर्वांनी घेतला आहे.त्याचा प्रभावही तितकाच अद्भुत आहे. तिथल्या इतका एकाकीपणा कुठेच वाटत नाही असे त्या सर्वांचे म्हणणे आहे. पण त्या हवाई प्रवासाचे आव्हान आणि आकर्षणही तितकेच आहे ह्या विषयी कुणाचेही दुमत नाही.

परवाच्या ४-५ ऑक्टोबरला रे क्लेमबॅकच्या सुदैवाने त्याला दोन गोष्टी अनुकूल होत्या. एक म्हणजे शार्क माशांचे त्याच्याकडे अजिबात ल्क्ष गेले नाही. त्या दिवशी वारा पडलेला होता. ताशी ११ मैल वेगाने वारा वाहात होता. असे जरी असले तरी रिचर्ड हच ह्या तज्ञ अभ्यासकाच्या मते रे क्लेमबॅकचे निश्चयी मन, दृढ विश्वास , बळकट शरीर आणि त्याची स्थितप्रज्ञता ह्याचेच सर्वाधिक महत्व आहे.

काही असो, ६७ वर्षांच्या साहसी रे क्लेमबॅकचा परवाचा अनुभव, त्याने दाखवलेले अश्क्यप्राय धैर्य, त्याने सतत ३०-३२ वर्षे एकट्याने लहान विमानातून पॅसिफिक महासागरावरून २२० वेळा केलेल्या हवाई भ्रमणगाथे इतकेच अभूतपूर्व आहे!

{[एक गोष्ट जाणवली का? मलाही पहिल्यांदा ती लक्षात आली नव्हती. धाडसी दर्यावर्दी कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला त्याच तारखेला-त्याच कोलंबस दिनाच्या दिवशी-११ ऑक्टोबरला- साहसी पराक्रमी रे क्लेमबॅकची ही धैर्यगाथा माझ्या हातून लिहून पूर्ण झाली! सहजासहजी हे घडून आले.]}
__________________________________________________________________________________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *