रेडवूड सिटी
मराठी शाळेत असल्यापासून दिवाळीची सुट्टी लागली की दिवाळी सुरु झाल्यासारखे वाटायचे. शाळेला सुट्टी म्हणजे दिवाळी!
मुलांची दिवाळी नरक चतुर्दशी पासून सुरु व्हायची. त्या अगोदरचे दोनतीन दिवसही दिवाळीचे असतात म्हणे. पण vआमचे मात्र ते दोन दिवस फटाके कोणते घ्यायचे —भुंगे, ऍटम बॉम्ब, सुतळीबॉम्ब, तोटे –ह्याचे दिवाळीतले नाही तरी हवेतले किल्ले बांधण्यात किंवा वासूनानाला आकाशदिवा करण्याची हुक्की आली तर त्यासाठी आयत्या वेळेच्या भाषणाची तयारी करण्याइतकी धावपळ, तारांबळ उडायची !
शेवटी फटाके सालाबादप्रमाणे तेच ! आमचे सगळ्यात ‘डेंजरस ‘ फटाके कोणते तर लवंगी फटाक्यांची माळ ! टिकल्यांच्या डब्या ( ह्यांचीच काय कोणत्याही ‘आयटम ‘ची संख्या विचारू नका ) , रंगीत काड्यापेट्या, फुलबाज्या (रंगीत उशिरा आल्या), रंगीत फुलबाजा येईपर्यंत विजेच्या दिव्याचा आणि फुलबाज्यांचा एकच रंग — पिवळा!
ऍटम बॉम्ब,भुंगे आकाशात उडणारे बाण, तोटे असले ‘लई डेंजर बेs ‘ फटाके हजरत खानच्या, जुन्या गिरणीतील हब्बूच्या चाळीतील माझ्यापेक्षाही लहान मुले बिनदिक्कत उडवत असत ! तेही कोणी वडीलधारी मंडळी त्यांच्यावर देखरेख करत नसताना ! आणि आम्ही? आम्ही फक्त धीटपणे (लांबून)पाहत असू .
पुढच्या वर्षी वडिलांच्या मागे लागून कसेबसे आकाशात जाणारे बाण आणले. ते बाटलीत ठेवून उडवण्याच्या पद्धतीचा शोध आम्हाला लागला नव्हता. आम्ही eco friendly पद्धतीने मातीच्या लहान ढिगाऱ्यात ठेवून ते उडवले. आम्ही उत्सुकतेने आकाशाकडे डोळे लावून पाहू लागलो ! आणि इकडे ते दोन बाण सररररss sसस्सस्ससरर्रsssss करत रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या धोतरात गेले ! आमचे पहिलेच ‘Dangerous’ फटाके त्या वर्षाचे “item”बॉम्ब ठरले! पण खरा आनंद ह्याचा झाला की हजरतखान, हब्बू , जुन्या गिरणीच्या, मरीस्वामीच्या चाळीतली मुलेही आम्हाला ओळख देऊ लागली ! काही तर दोस्तही झाले !
आमच्या “राम”बाणांनी त्या दोघा तिघांची जी त्रेधा तिरपीट उडवून दिली त्यामुळे लिगाडे चाळीतली, गोगटे, नागवंशी चाळीतल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या हसण्याच्या आवाजामुळे त्या वर्षी फटाक्यांचे आवाजही चार दिवस कुणाला ऐकू येत नव्हते !
दिवाळीचे चार पाच दिवस संपतात. पण फराळाचे पदार्थ, कुणाची तरी थोडीशीही का होईना दारू आणि सुट्टीतले दिवसही शिल्लक असतात. ते दिवसही आम्ही लहान मुले दिवाळीच्याच आनंदात घालवत असू. फटाके उडवण्याचेही वेळापत्रक असते. ते सुद्धा लहान मुलांनीच तयार केलेले आहे ! खास दिवाळीच्या दिवसातही ते कमीअधिक प्रमाणात पाळले जाते.
सकाळी आंघोळीच्या वेळी आणि फराळ झाल्यानंतरच्या काळापर्यंत सर्व आवाजी फटाक्यांचा अंमल चालू असतो. तोफा मशीनगनसारखे आवाजांच्या फैरी चालू असतात. दुपारची जेवणे झाली आहेत. वडिलमाणसे डुलकी घेत पडली आहेत.ह्या वेळी लहान पोरे टिकल्या वाजवत बसतात. तर काही लवंगी माळ सुटी करून अधून मधून एक एक लवंगी उडवत आवाज काढतात. एखादा धीट तोटा उडवतो. त्यातलेही एखादे दुसरे लहान मूल रंगीत काड्या ओढत त्याचा रंग पाहात बसले असते. टिकल्यांच्या डब्या बहुतेक वेळा दुपारच्या सत्रात संपत येत असतात. एखादीच लवंगी माळही उडून, आवाज काढून गप्प होत असते.
एवढ्या काळात दोन तीन वेळा तरी पोरे घरात जाऊन फराळाचे डबे उघडून तोंडात बकाणे भरून पुन्हा हातात मावेल तेव्हढा चिवडा/ शेव /शंकरपाळ्या/चकली, हाताला लागेल तो पदार्थ घेऊन पळत येत. कुणीतरी आत जाऊन आपटबार घेऊन येते. काही नाही, फटकन पायरीवर ती लहानशी छडी आपटली कि झकास आवाज येई. आबासाहेब नाहीतर अण्णा दरडावयाचे. थोडा वेळ मुले गप्प होत. पण तेव्हढ्यापुरतेच.(आता आपटबार मिळत नसावेत.) लगेच टिकल्यांचे फटाफट आवाज सुरु. कुणी शौकीन फुलबाजीही लावायचा. तिचा चटचट आवाजही दुपारी गोड वाटायचा. बऱ्यापैकी मुलांजवळ टिकल्या उडवायचे लहानसे पत्र्याचे पिस्तूल असायचे. पण त्याला बंदुकच म्हणायचे. पण खरी गंमत एकावर एक अशी टिकल्यांची चवड रचून बत्त्याने किंवा साध्या दगडाने ठोकून त्या उडवायच्या ! अरे काय तो ठठो आवाज !
तोट्याच्या आवाजालाही लाजवेल असा ! (कारण आमच्याकडे तोटे नसत नां !) मग कुणीही ओरडॊ आरडो फिकीर नै !दुपारी उडवण्याची म्हणण्यापेक्षा खेळण्या-बघण्याची दारू म्हणजे साप! सापाच्या वड्या पेटवल्या की त्यातून भराभर साप वर येत असे! आवाज नाही की उजेड नाही! नुसती गंमत बघणे. दुपारचा दुसरा उद्योग म्हणजे न उडालेले फटाके शोधायचे आणि ते जपून ठेवायचे. त्यात अर्धवट फेकून दिलेल्या फुलबाज्या, लवंगी फटाके, अर्धवट उडालेल्या भुंग्याच्या डब्या.
अंधाराला सुरवात झाली की दारात अंगणात पणत्या, आकाशदिवे लागलेले असायचे. मग तोटे, मध्येच एखादा ऍटम बॉम्ब आपला दरारा स्थापना करत. पण रात्र ह्या आवाजी फटाक्यांची असली तरी खरा मान झाडांना, भुईचक्रे आणि सुदर्शन चक्रांचा ! डोळ्यांना सुख देणाऱ्या शोभेच्या दारूचा ! त्याच बरोबर बाणांचा ताणाहि असे. सुssssईईई आवाज करत वर जाणारे भुंगेही आपले अस्तित्व राखून असत. ह्या गर्दीत लहान मुले आपल्या फुलबाज्यांची आतषबाजी दिमाखाने दाखवतात. हवेत फुलबाज्यांनी नक्षी काढायची किंवा अक्षरे लिहायची! झाडे/कुंड्या उडवण्यासाठी अजून थोडा वेळ असायचा. कारण थोरल्या बहिणी आणि त्यांचे मिस्टर यायचे असतात. ती मंडळी आली की झाडे लावायची! ताटकळणे हा सुध्दा या वेळापत्रकाचा आनंदाचा भाग असतो. ते येई पर्यंत फुलबाज्या, रंगीत काड्या filler असत. झाडे लावताना भोवताली डोळे विस्फारून आम्ही उभे असू. झाडांची कारंजी उडायला लागली की हसत मागे पळत यायचे. चेहरे रंगीत प्रकाशात न्हाऊन निघायचे.मध्येच कुठेतरी हजारी, पंचहजारी फटाक्यांच्या माळा अखंड आणि प्रचंड आवाज करत उडतच राहतात!
रात्र शांत होते. पहाट होते ती धडाम धाड या आवाजानेच. हे वेळापत्रक अखंड चालू आहे. पण दिवाळीचे दिवस संपले कि दारूचा साठा बहुतेक संपलेला असे. कुणापाशी थोडा किंचित असे.आमच्या श्यामकडे नक्की असे. रंगीत काडी पेटी,(ती संपल्यावर घरातली नेहमीची काडेपेटी असतेच!) एखाद दुसरी टिकल्यांची डबी, एक दोन फुलबाज्या, सापाच्या गोळ्यांचा डबा. एकेक करत काढायचा हळूच! शिवाय दुपारी गोळा करून ठेवलेली बेजमी असेच.
मग लवंगी सुटे फटाके उडव, किंवा त्याला वात नसेल तर मुडपून ती पणती वर धरून तिचा भुस्स्स आवाज आणि किंचित प्रकाशाचा आनंद घेत तशा त्या लवंगा उडवायच्या! त्याला आम्ही फुसनळ्या किंवा फुसके फटाके म्हणायचो. शशी भुंग्याच्या डब्यातली दारू एका कागदावर काढायचा.त्याची पुडी करताना त्यात एखादी वात अडकवायचा. आणि पेटवून द्यायचा. आम्हीं सगळे थोडे दूर जायचो. कधी मोठा आवाज, तर कधी आवाज होत होत ती पुडी गरकन गोल फिरायची. टिकल्या तोंडी लावायला असायच्याच. टिकल्या फरशीवर झटकन ओढून फोडायच्या! ह्याला कौशल्य लागायचे. पण ते सगळ्यांकडे असल्यामुळे कुणाचे कौतुक नसे. पण भुंग्याची करामत शशीनेच करावी ! बरेच वेळा डबीत हे सर्व घालून तो भुंगे वरही उंच उडवत असे. काय आनंद होता तो! बंदुका वगैरे नसलेली मुले ओळंब्यासारखे एक यंत्र करायचे. साधी दोरी. तिच्या तळाशी एक जाड आणि जड लोखंडी लहान चकती. त्यावर टिकली/ल्या ठेवायच्या. वरून आणखी एक तशीच जाड आणि जड चकती सोडायची. मग ती दोरी दगडावर जोरात आपटायची! अरे, काय सॉलिड आवाज यायचा! टिकल्या फुटल्या असे वाटायचेच नाही !
दिवाळीच्या अनेकांच्या अनेक व्याख्या आहेत. पण आमची दिवाळीची व्याख्या म्हणजे फक्त फटाके,फराळआणि शाळेला पंधरा दिवसांची सुट्टी! ही दिवाळी !
सुट्टी संपून शाळेला जाताना हाताला फटाक्यांचा आणि मनाला दिवाळीच्या आठवणींचा सुवास अजूनही असायचा !
दिवाळी ‘ Happy ‘ नव्हती की तिच्या ‘ हार्दिक शुभेच्छाही ‘ नव्हत्या ! दिवाळी सर्वांसाठी दिवाळीच होती !