दरवाजा हिरवा!

रेडवूड सिटी

कल्पना करा, नुकतेच जेवण झाले आहे. सिगारेट ओढायची तल्लफ आली. रमत गमत प्यावी म्हणून ब्रॉडवेवरून चालत निघाला आहात.

सिगरेटच्या हलक्याशा झुरक्याबरोबर डोक्यात विचारही चालू झाले आहेत. कालच पाहिलेले करुणरसपूर्ण नाटक आणि त्या अगोदर रविवारी पाहिलेला विनोदी फार्स समोर आले. त्यावरून “आयुष्य म्हणजे काय गंमत आहे नाही ?'” इथपासून ते नाटकातली नायिका सुंदर का फार्समधल्या नायिकेची, धमाल उडवून देणारी, खट्याळ तितकीच देखणी, मैत्रीण जास्त सुंदर? तिथपर्यंत येऊन ते दोन सुंदर चेहरेच डोळ्यासमोर येऊ लागतात. आणि तेव्हढ्यात शेजारून कोणीतरी अचानक तुमचा हात पकडतो ! तुम्ही चमकून तिकडे पाहतात तोच ती समोर पाहतच फक्त “चौकटीमधला त्रिकोण” हे दोनच गूढ शब्द म्हणत एक चुरगळलेला कागद तुमच्या हातात कोंबते ! झटकन पुढच्या गर्दीत मिसळूनही जाते.

हे काय घडले हा प्रश्न तुम्हाला पडायच्या आत ती मागे वळून पहाते. ती फार घाबरुन, तुमच्याही पाठीमागे पाहत असते ! काय कराल अशा वेळी? काही करणार नाही. आपण बहुतेक सारेजण काही करणार नाही. कशाला या भानगडीत पडा म्हणत हळू हळू रस्त्याच्या एका कडेला जाऊन तो कागद कुठेतरी फेकून द्याल. कुणी आपल्याला पहिले तर नाहीना ही आणखी एक काळजी लागलेली असते. आतून थोडे घाबरलेलेही असणार तुम्ही. काही करणारे धाडसी थोडे असतात. ते अशा प्रसंगाची वाट पाहत असतात. तरीही त्यातले थोडेच पुढे जाऊन तो कागद हळूच वाचून कागदात सांगितले असेल त्याचा पाठपुरावा करतील. यासाठी मुळात धाडसी वृत्तीच पाहिजे. त्यातला थरार उत्कंठा आणि धोका पत्करायची खरी तयारी पाहिजे.

मोठ्या शहरात, महानगरात असे प्रसंग केव्हाही येऊ शकतात. महानगरात अशी कितीतरी आव्हाने आपली वाट पाहत असतात. काही कारण नसताना आपण सहज त्या इमारतीकडे पाहतो, एका खिडकीतून लहान मुलाचा रडवेला चेहरा दिसतो. आपण सरळ पुढे जातो. विचार करतो त्याचा. पण तितकाच. शांत गल्लीतून जात असता एक किंकाळी किंवा कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येतो. “चला, लवकर पुढे; कशात अडकायला नको.” असे मनात म्हणत सटकतो. नेहमीच्या रस्त्यावर, पण टॅक्सीवाला आज बोलता बोलता आतल्या बाजुला सोडतो. जुन्या वाड्याचा भला मोठा दरवाजा बंद असतो. हळूच तो किलकिला होतो. एक रुमाल फडफडत येऊन जवळ पडतो. आपण फक्त इकडे तिकडे पाहतो. तोपर्यंत दरवाजा हळूच बंद होतो! घाम पुसत, टॅक्सीवाल्यावर चरफडत झपाझप ढांगा टाकत मुख्य रस्त्याला लागतो. अशा प्रसंगांचे गूढ उकलण्याची यत्किंचितही मनाची उभारी आपण दाखवत नाही. तिथून पळण्यात आपली बुद्धी वाकबगार असते! फार थोडे लोक धाडस करून त्याच्या मागे लागतात. ‘काय होईल ते होवो, बघू याच ‘असे म्हणत स्वतःला ते त्यात झोकून देतात ! काही दिवसानंतर त्यांचे चित्त थरारक,जागच्या जागी खिळवून ठेवणारे अनुभव, आपण चवीने ऐकतो नाहीतर वाचतो. बस्स इतकेच !

याला अपवाद म्हणजे रुडाल्फ स्टाईनर ! रुडाल्फ पियानोच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. उत्तम व्यक्तिमत्वाचा.राहणीही रुबाबदार. हा पठ्ठ्या खरा धाडसी. बरेच वेळा असे काही घडेल म्हणूनच तो बाहेर फिरायला पडतो.एक दोनदा त्यात त्याला रहस्य वगैरे न सापडता त्यालाच गुन्हेगारांच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून घ्यावी लागली ! भारी घड्याळ आणि बऱ्यापैकी रक्कम गमवावी लागली. तरी त्याचा उत्साह मात्र कमी झाला नाही.

आज संध्याकाळीही फिरत फिरत तो गावात, जुन्या भागात आला होता. रस्त्यावर घरी परतणाऱ्यांची आणि ‘आज हॉटेलात जेऊ’
म्हणणाऱ्यांची वर्दळ बरीच होती. थंडीमुळे दात एकमेकांवर आपटतात तसा आवाज एका शोकेस मधून ऐकू येऊ लागला. तो हॉटेलकडे पाहू लागला. पण दुसऱ्यांदा पाहिल्यावर पुढच्या इमारतीच्या दरवाजावर दाताच्या दवाखान्याची पती दिसली. तो हसला. तेथील दातांची कवळी वाजत होती.

इमारतीखालीच एक सहा फुटापेक्षा थोडा जास्तच उंच निग्रो उभा होता. त्याचा पोशाख काय विचारता ! लाल भडक कोट. खाली पिवळी जर्द विजार. आणि डोक्यावर लष्करी टोपी! लोक पाहून,जे घेतील असे वाटायचे, त्यांना दाताच्या डॉक्टरचे कार्ड देत होता.
रुडाल्फ या रस्त्याने बरेच वेळा येत असे. पण तो या निग्रोकडून कार्ड काही घेत नसे. त्याला टाळूनच जात असे म्हणाना. पण आज त्या आफ्रीकनने त्याच्या हातात सफाईने कार्ड दिलेच! त्याची हुशारी पाहून रुडाल्फ त्याच्याकडे पाहून थोडेसे हसला. क्षण दोन क्षण तिथे थांबला.

दहाबारा पावले चालून आल्यावर त्याने ते कार्ड पाहायचे म्हणून पाहिले. आणि चमकला. कार्ड उलटून पाहिले. पुन्हा पुन्हा पाहिले. कार्डाची एक बाजू कोरी होती. एका बाजूवर शाईने फक्त दोन शब्द लिहिले होते. ” दरवाजा हिरवा “, बाकी काही नाही; एव्हढेच. रुडाल्फने काहीजणांनी फेकून दिलेली दुसरी दोन कार्डे उचलून पहिली. ती दाताच्या डॉक्टरांची होती. डॉक्टरच्या कामाची जाहिरात होती. दोन्ही बाजूला छापलेली.

पियानो सेल्समन साहसी रुडाल्फ पुढच्या कोपऱ्यावर जाऊन थांबला. विचार करू लागला. त्याने रस्ता ओलांडला. एक चौक पुढे गेला. आणि पुन्हा रस्ता ओलांडून उलट्या दिशेने आला. निग्रोकडे न लक्ष देता त्याने दिलेले कार्ड घेतले आणि पुढे निघाला. थोडे अंतर जाऊन ते कार्ड पहिले. तसेच कार्ड. तेच हस्ताक्षर. आणि तेच शब्द! “दरवाजा हिरवा” ! आजूबाजूला तीन चार कार्डे लोकांनी फेकून दिली होती. रुडाल्फने ती सर्व पहिली. ती सर्व दाताच्या दवाखान्याचीच होती!

आता मात्र रुडाल्फला स्वस्थ बसवेना. तो पुन्हा दातांची कवळी वाजत असलेल्या शोकेसपाशी उभा असलेल्या निग्रोच्या दिशेनेच गेला. तो निग्रो काहीजणांना कार्ड अदबीने देत होता. पण या खेपेला निग्रोने त्याला कार्ड दिले नाही. दिले नाहीच पण तो त्याच्याकडे ” तुही तसलाच रे.धाडस नाही ” अशा नजरेने पाहतोय असे वाटले. त्याचे असे पाहणे रुडाल्फला लागले. आपल्यात ‘ते धाडस ‘ नाही म्हणतोय काय हा! त्या दोन शब्दात काय रहस्य दडले असेल ते असो पण त्या निग्रोने आपल्यालाच दोन्हीही वेळा निवडले आणि ते कार्ड दिले. आणि आपण इथेच फिरतोय हे पाहून तो आपली निर्भत्सना केल्यासारखे हसला; रुडाल्फच्या हे जिव्हारी लागले.

रहदारीपासून तो जरा दूर उभा राहून अशी इमारत कोणती याचा अंदाज घेऊ लागला. त्याचे लक्ष एका पाच मजली इमारतीकडे गेले. तळमजल्यावर एक रेस्टॉरंट होते. हीच ती इमारत असणार असे त्याला वाटले.

जवळपास सगळा पहिला मजला बंद होता. लोकरी कपडे, फरच्या वस्तू कपडे ह्यान्चे ते मोठे दुकान असावे. दुसऱ्या मजल्यावर दाताच्या
डॉक्टरची निऑन पाटी चमकत होती. दुसऱ्या अनेक व्यवसायांच्या पाट्या तिथे लागल्या होत्या. त्यांच्याही वरच्या मजल्यांवर वर खिडक्यांना पदे दिसत होते. उघड्या खिडक्यांतून दुधाच्या बाटल्या वगैरे वस्तु वरून लोक राहत असावेत असे वाटत होते. विचार करून रुडाल्फ जिने चढत चढत वर जाऊ लागला. एका मजल्यावर जिन्याच्या तोंडाशी थांबला. मार्गिकेत फक्त दोन दिवे होते. एक लांब उजव्या बाजूला आणि दुसरा डाव्या हाताला. प्रकाश अगदी मंद होता. डाव्या हाताला पाहिले.त्याला हिरवे दार दिसले! थोडा थबकला. जाऊ का नको असे करत उभा राहिला. पण लगेच त्या निग्रो माणसाचे अपमानकारक हसणे आठवले.

तो पुढे गेला. दारावर थाप मारली. दारावरची थाप आणि दरवाजा उघडे पर्यंतचा काळ ही खरी धाडसाची कसोटी असते! आत काय असेल ! काहीही असू शकते. बदमाश आपले सापळे लावून तयारीत असतील. प्रेमात पडलेली तरुणी सुटका करून घेण्याच्या तयारीत असेल ! कुणी मरूनही पडलेलं असेल. विचार न करता उडी घेतलेल्या माणसाच्या वाट्याला काहीही येऊ शकेल ! आतून काहीतरी काहींतरी हालचाल ऐकू आली. एका विशीतल्या मुलीने दरवाजा हळूच उघडला. तिचा तोल जातोय असे वाटत होते. दरवाज्यावरचा हात घसरत खाली आला. ती खाली पडणार तेव्हढ्यात रुडाल्फने पुढे होऊन तिला धरले. उचलून एका जुन्या कोचावर ठेवले. दरवाजा लावून घेतला. तिच्या चेहऱ्या सारख्याच फिकट मलूल प्रकाशात त्याने खोली पाहिली. नीट ठेवली होती. पण गरिबी झाकत नव्हती

रुडाल्फने इकडे तिकडे पहिले पण काही दिसले नाही. शेवटी आपल्या हॅटने तो तिला वारा घालू लागला. वाऱ्याने नाही तरी हॅटची कड तिच्या नाकाला लागल्याने तिने आपले डोळे उघडले. डोळे फार सुंदर होते तिचे. जागी झाली म्हटल्यावर ती सुंदरही आहे आहे हे त्याच्या लक्षात आले. आपण आतापर्यन्त केलेल्या अनेक धाडसी गोष्टींचे सार्थक झाल्यासारखे रुडाल्फला वाटले. वाटायलाच पाहिजे. तरुणांसाठी कोणत्याही पराक्रमाचे पारितोषिक सुंदर स्त्री आपली होणे हेच असते !

मुलगी शांतपणे त्याच्याकडे पहात होती. ती हसली. “चक्कर येऊन पडले ना मी ?” तिने विचारले. रुडाल्फने मान हलवली. “कुणाला येणार नाही?” ती म्हणत होती. तीन तीन दिवस पोटात अन्न नसल्यावर दुसरे काय होणार?” ती असे म्हणल्यावर रुडाल्फ घाई घाईने म्हणाला,” थांब, मी आलोच.” जाताना त्याने तिथलेच थोडे पाणी तिला अगोदर दिले.

हिरव्या दरवाजातून तो जिन्यावरून दोन तीन पायऱ्या चुकवतच खाली गेला. पंधरा वीस मिनिटांनी पाव लोणी चीझ कॉफी पाय केक थोडे कोल्ड मीटचे काप दूध घेऊन आला. एका टेबलावर त्याने सगळ्या वस्तू ठेवल्या.

“तीन तीन दिवस खायचं नाही ! हा कसलं वेडेपणा?” रुडाल्फ म्हणाला. ” उपाशी राहण्याची कुणाला हौस असते का ?” ती मुलगी विचारात होती. रुडाल्फला आपली चूक समजून आली. त्याने कॉफीसाठी कप कुठं आहे असे विचारल्यावर ती, खिडकीपाशी शेल्फवर, म्हणाली. “चला आता आपण खाऊन घेऊ “असे रुडाल्फने म्हटले. पण त्या अगोदरच ती मुलगी कोल्ड कट्स खात होती. तिच्या हातातला तो तुकडा काढून घेत तो म्हणाला,” अं हं . अगोदर थोडे दूध पी. त्याबरोबर तुला पाहिजे तर केक खा; नाहीतर ब्रेड, चीझ काहीही खा. हे कटस,पाय उद्यासाठी ठेव.म्हणजे जड जाणार नाही.” त्याने तिला दूध ओतून दिले. त्यानंतर ती भराभर खाऊ लागली. रुडाल्फ कॉफी पीत तिच्याकडे पाहत होता. ती किती उपाशी आहे हे लक्षात येत होते. त्यानंतर तिने कॉफी घेतली. चेहऱ्यावर थोडी कळा व तरतरीही आली. ते पाहून रुडाल्फलाहि बरे वाटले.

तिने आपली स्थिती कशी आहे ते सांगितले. महानगरातल्या अनेक लोकांच्या कथा एकसारख्याच असतात हे त्याला जाणवले. गरिबी. स्थिर काम नाही. रोज काम मिळेल याची शाश्वती नाही. मिळाले तर पगार अत्यंत कमी. दोन वेळचे भागणेहि कठीण. पण तिच्या तोंडून त्या हालअपेष्टा ऐकताना आपण होमरचे महाकाव्य ऐकतोय असे वाटत होते. तारुण्यात सगळे आवाज, स्वर,मधुरच लागतात कानाला !

“या सर्वातून तुला जावे लागले ! विचारही सहन होत नाही.” तो उदगारला. ” खरचं काही काही दिवस फार भयंकर वाटतात.” मुलगी म्हणाली. “तुझे कुणी नातेवाईक, मित्र मैत्रिणीअसतील की? रुडाल्फने विचारले. ” कोSsणी नाही !” चेहरा टाकून ती म्हणत होती. ते ऐकल्यावर तितक्याच उदासपणे,”मीही एकटाच आहे!” “खरंच?” ती काहीशा उत्सुकतेने म्हणाली. रुडाल्फला त्यातली तिची भावना कळली.

थोड्या वेळातच त्या मुलीच्या पापण्या मिटू लागल्या. “मला झोप येतेय. पण मला खूप बरं वाटतंय.” ती असे म्हणल्यावर रुडाल्फ म्हणाला,” तर मी आता निघतो. जाऊ ना? पुन्हा काही त्रास होणार नाही ना ? रात्री छान झोप. काळजी करू नकोस. उद्या चांगलं बरं वाटेल तुला.” रुडाल्फ मोठ्या आस्थेने बोलला. त्याचे प्रेमही स्पष्ट जाणवत होते. त्याने आपला हात पुढे केला. तिने तो हातात घेतला. थोडा वेळ ती त्याचा हात धरूनच होती. मग त्याच्याकडे पाहत “गुड नाईट ” म्हणाली. पण तिचे डोळे त्याला काहीतरी विचारत होते. रुडाल्फला समजले. तो लगेच म्हणाला,” हो, मी उद्या येईन नक्की. कशी आहेस तेहि मला समजेल. आता माझ्यापासून तुझी सुटका नाही !” तो असे म्हणल्यावर दोघेही हसली.

दरवाजा उघडून तो जाणार तेव्हा तिने विचारले ,” विचारायचे राहूनच गेले की. पण नेमक्या माझ्याच दारावर तू कसे ठकठक केलेस?” काय उत्तर द्यावे ते समजेना त्याला. क्षणात “हे कार्ड दुसऱ्या कुणाच्या हातात पडले असते तर? ह्या विचारात तो पडला. तिला कार्डविषयी काही न सांगता तो म्हणाला,” ह्याच इमारतीत आमचा एक पियानो दुरुस्त करणारा राहतो. मी मजला चुकलो आणि तुझ्या दारावर थाप मारली.” जाताना त्याला तो हिरवा दरवाजा लावायला सुद्धा वेळ लागला. कारण दोघेही एकमेकांकडे पाहत होते. जिन्याकडे आला तरी तिचा हसरा चेहराच त्याच्या समोर होता.

जिन्याजवळ आल्यावर तो तिथे थबकला. आणि कुतूहलाने आजूबाजूला पाहू लागला. तो त्या मार्गिकेमधून पुढे पाहत पाहत जाऊ लागला. पुन्हा उलटे फिरून विरुध्द्व बाजूला चालत गेला. वरच्या मजल्यावरही गेला. आणि तो चक्रावून गेला. तिथले सगळे दरवाजे हिरवे होते ! दरवाजे हिरवे ! अलिबाबाची मर्जिना येऊन रंगवून गेली की काय? हा विचारही चमकून गेला.

रुडाल्फ रस्त्यावर आला. तो आफ्रिकन अजून तिथेच होता. आपल्या हातातली “ती ” दोन्ही कार्डे त्याच्यासमोर धरत रुडाल्फ त्याला विचारता होता,” ही कार्डे तू मला का दिलीस? आणि कसली आहेत ही कार्डे? ” जाब विचारावा तसे तो विचारत होता. तो निग्रो सरळपणे हसत हसत म्हणाला,” साहेब, ते तिकडे आहे.” त्याने रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला हात दाखवला. “तुम्ही इकडच्या उलट्या बाजूला गेलात. पण मला वाटते तुम्हाला उशीर झाला आहे. पहिला अंक संपलाही असणार ! ” रुडाल्फने निग्रोने दाखवलेल्या इमारतीकड़े पाहिले. नाट्यगृहावरची इलेक्ट्रिकची पाटी मोठ्या ऐटीत झळाळत रुडाल्फला म्हणत होती “दरवाजा हिरवा” !

“साहेब, नाटक एकदम फर्स्ट क्लास आहे, एव्हढे मात्र मी सांगतो “, निग्रो माणूस रुडाल्फला सांगत होता. एजंटने मला नाटकाची ही कार्डे वाटायला दिली. तो मला म्हणाला डॉक्टरांच्या कार्डाबरोबर ही सुध्दा दे. मला एक डॉलरही दिला त्यासाठी.” तुम्हाला डॉक्टरचे कार्ड हवे का? देतो.” तो निग्रो रुडाल्फला सगळे मोकळेपणाने सांगत होता.

रुडाल्फ शिट्टी वाजवतच निघाला. शिट्टी वाजवत उद्याच्या भेटीची चित्रे रंगवत, स्वप्नांच्या धुंदीत रुडाल्फ घरात शिरला.
किंचित धाडसाचेही किती सुंदर आणि गोड बक्षीस रुडाल्फला मिळाले!

O’henri च्या Green Door या कथेचे हे स्वैर भाषांतर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *