म्हैपतचे किराणा मालाचे लहानसे दुकान होते. दुकान लहान आणि झोपडपट्टीच्या भागातले. त्याच्याकडे येणारी गिऱ्हाइके सुद्धा त्याच्यासारखीच! म्हैपत रोज घंटी सोडून दोन्ही मडगार्ड खडखडऽ वाजणाऱ्या, चारी दिशेने गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेल व चेनचे चाक कुंईंऽकुईंऽखटक् खटक् करणाऱ्या खडार्डम स्टाप सायकलवरून यायचा.
त्याची गिऱ्हाईकेही चालत चालतच यायची. कोणी दोन्ही पायांनी लंगडा असला तरी बूट पाॅलिशमधल्या डेव्हिड सारखा एकच कुबडी घेत पण दुप्पट लंगडत येई, तर लहान पोरं चड्डी नसल्यामुळे बापाचा किंवा थोरल्याचा मोठा सदरा घालून, पोरी डोक्याला सटी सा महिन्यात तेल लागलेले आपले झिंज्यापकाडीचे केस मिरवत, तर बायाबापड्या रोजच तेच दंड घातलेले लुगडे किंवा पातळ लेवून येत, बोळक्या तोंडाचे म्हातारे दाढी करणे परवडत नसल्यामुळे अनायासे वाढलेल्या दाढीने गालाचे खड्डे बुजवून येत, तर रशीद मामू धेलेका गूड उधार घ्यायला यायचा ते मात्र दाढीला मेंदी लावून!
गंगव्वा आजी छातीच्या फासळ्यावर गळ्यातले चांदीचे काळपट लिंग आदळत, तर बाबूची भारदस्त आई आपलेच वजन कसे बसे उचलत तीन महिन्याच्या उधारीतील फक्त एक आणा देऊन तांबड्या मिरच्या,मीठ आणि दोन कांद्याची तीन आण्याची नविन उधारी करून जाई, बौद्धवाड्यातले लोक येत,सुताइतकी जाड मेणबत्ती, नीळीची पूड घेऊन जात. ही गिऱ्हाइकं. स्कोडा जाऊ द्या मोडीत गेलेल्या मारुती ८०० मधून येणारे गिऱ्हाइक कुठून येणार? हां! आला तर झोपडपट्टीच्या व लहान लहान टपरींच्या वसुलीसाठी फटफटीवरून गाॅगल लावलेला रम्या यायचा. पण त्याला दिलेल्या सिगरेटच्या पाकिटाचे पैसे मागायला म्हैपतची काय छाती होती!
आता सांगा ह्याच्याकडे स्कोडात बसून येणारे कुणी गिऱ्हाइक कसे येईल? आणि म्हैपतीला त्याची गरजही नसे.
तो सकाळी आपली ‘खड खड खडा्र्ड’ प्रख्यात सायकल बाजूच्या बोळात ठेवत असे. दुकान उघडून करायची तेव्हढी झाडलोट करून विठोबाच्या तसबिरीला उदबत्ती दाखवून नमस्कार करून गिऱ्हाइकाची वाट बघत बसे. थोड्या वेळाने रस्ता झाडणारी,खराट्यापेक्षाही बारीक असलेली अक्की येई. कधीमधी खोकत, अर्धशिशीच्या डोकेदुखीमुळे बिब्याच्या फुल्यांनी रंगवलेल्या भुवया कपाळ दाबत रस्ता झाडायची. म्हैपत तिला हाक मारून कधी ज्येष्ठमधीच्या तुकड्या बरोबर काथाचा लहान खडा चघळायला देई. कधी लवंग तर कधी खडीसाखरेचा तुकडा देई. अक्की ते तुकडेकपाळाला लावून मानेनेच नमस्कार करून तोंडात टाकायची. काम चालू करायची. आलाच कधी ह्या वस्तीत तर कुणाची मनिआॅर्डर घेऊन पोस्टमन येत असे.
तो पत्ता विचारायला म्हैपत शिवाय कुणाकडे जाणार? त्याच्याच फळीवर बसणार. मग म्हैपत समोरून जाणाऱ्या पोराला अरे,” त्या लिंबेराव पोतराजाला पाठव रे दुकानात. पोस्टमनभाऊ आलेत म्हणावं; आन हां चाबूक नको आणू म्हणावं. काय? जा सांग.” तो यायचा. अंगठा द्यायचा. म्हैपत साक्षीदार म्हणून सही करायचा. दहा रुपये पाहून हरखलेला पोतराजा निघाला की म्हैपत त्याला,” अरे माझी उधारी कधी देणार? द्यायची विसरू नको बाबा.” इतकंच म्हणायचा. पोस्टमनला सुपारीचे लहान पाकिट द्यायचा.
पोस्टमनही ती लहान पुडी तिथेच फाडून त्यातले चार सुगंधी तुकडे चघळत कागद फेकून निघून जायचा. म्हैपतचे मग च्याची पत्ती, साखर, काडी पेटी, एक बिडी बंडल हिरवा दोरा, निरमाची लहान वडी, लाईफबाॅय, शेंगादाणे, मसुरची लाल डाळ,गोडबोले सातारी जर्द्याचा तोटा, कुणाला गाय छाप जर्दाच पाहिजे तर कुणाला अंमळनेरचा पटेल जर्दाच चालत असे पण हे सगळे पटापटा देणे सुरु होई. दिलेल्याचे पैसे घ्यायचे उरलेली चिल्लर मोड द्यायची;उधाऱ्याची उधारी लिहायची; लिहिताना “आता उधारी मिळणार नाय बघ.ही शेवटची!” असा रोजचा दम द्यायचा. म्हैपतचा दम फुसका हे गिऱ्हाइकालाही माहित असते. तो फक्त मान हलवत जायचा. ह्याचा अर्थ म्हैपतचा दिवस सुरू झाला.
पण म्हैपतचा एक कायदा होता. तो जर्दा तंबाखू सिगारेट कुणालाही कधीही उधार देत नसे. असं का विचारले तर म्हणायचा तेव्हढीच कमी खातात हो; कमी ओढतात रोख द्यायचे म्हटल्यावर! मग बिडी बंडल का देतो उधार? ह्यावर तो सांगेल,” अवो, बिडी ती केव्हढी! तिच्यात तंबाखू निम्मीच असते. आन बिडी ओढणारा किंवा ओढणारी बी जास्त करून गरीबच असतात.कितेकदा अर्धीच ओढून बंडलात ठेवतात!” म्हैपतचे हे इतकेच आर्थिक,नैतिक व सामाजिक तत्वज्ञान!
थोड्या वेळाने वेळाने झोपडपट्टीतून कोणी दोन माणसे साधु बनून शहरात फेरी मारायला निघायचे. त्यांना म्हैपती,” ए चंगू मंगू! माझे पैसे केव्वा देणार?” निघाले चिमटा वाजवत!”ते दोघे हसत पण केविलवाणे तोंड करत,काय म्हैपतभाऊ असली पैली भोनी करतो कायरे ? आधीच आम्हाला लोक हडत हुडुत करतात. मोटारवाले तर आमाला पाहिले की काचा वर करतात.,एक दोघे ट्रकवाले, रिक्षावाले काही द्येतात.पन काऽय रया नाही राहिली. सगळी नावं घेतो ज्या त्या वस्तीत, सोसायटीत. अलख निरंजन! बम् भोले नाथ!गुरूद्येव द्त्त! अवधूत चिंतन… ! घसा दुखतो. अान तू हे उधारीचे काढले.” असे म्हणत सटकतात.
म्हैपत दुपारी आपला डबा खायला बसणार ह्याचा सुगावा कोपऱ्यावरच्या एका पायावर उभे राहून काही न बोलता भिक मागणाऱ्या ‘ हटयोगी’ मौनी भिकाऱ्याला आणि पलिकडच्या मोरपिसाच्या झाडूवाल्या फकिराला कसा काय लागतो ते म्हैपतलाही समजले नाही. अर्धा डबा झाला की हटयोगी दोन्ही ढांगा भराभर टाकत आणि फकीर झाडू खाकोटीला मारत, क्या म्हैपतबाबा म्हणत आलाच. म्हैपतही डोळ्यांनीच या म्हणत डब्यातले जितके देता येईल तेव्हढे दोघांना देत असे. दिस संपला. रात्रीचे अकरा वाजता दुकान बंद करून गल्ला रेक्सिनच्या पाकिटात, पाकीट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी सायकलच्या गर्रकन चारी दिशेला फिरणाऱ्या हॅन्डवेललाअडकवत म्हैपत सायकलवर टांग मारून मडगार्ड खड खड खाडार्ड खड वाजवत,चेन व चाक कुईं कुईं खटक् करत घरी जाई.बायका पोरांची चौकशी करून अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिया दारी’ हा अभंग व सुंदर ते ध्यान’ भजन झाले की ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत हात जोडत झोपी जायचा.
एके रात्री म्हैपतीच्या स्वप्नांत विठोबा आला. आला तो डोक्यावर किरीट, तुळशी हार घातलेला, कानात मकर कुंडले, कंठी कौस्तुभ मणि विराजत असलेला मुक्तफळांचा कंठा घातलेला, झळाळता पिवळा पितांबर नेसलेला, अशा भरजरी रूपातच! विठोबाचे ते रूप पाहून म्हैपत इतर सर्व काही विसरला. विठोबा म्हणाला, “म्हैपत तुला भेटायला मी उद्या येणार आहे.” “म्हणजे मला दर्शन देणार?” माहित असलेले मोठे शब्द वापरून म्हैपत विठोबावर इम्प्रेशन मारत होता. विठोबा फक्त त्यालाच जमेल आणि शोभणारे मधुर हसत, न बोलता फक्त मानेने हो म्हणाला आणि गायब झाला. सकाळ झाली म्हैपत उठला पण विठोबाला आपण नमस्कारही करायचा विसरलो ह्या चुटपुटीने सारखा हळहळत होता.
म्हैपत आज त्याच खड खड खडार्ड आणि कुंईं कुंईं खटक् करणाऱ्या सायकल वरून येत होता. पण विठोबा भेटणार त्यामुळे त्याला आज ते आवाज ऐकूच आले नाहीत. हिरव्या रॅलेवरून येतोय ह्या थाटात दुकानापाशी आला. सायकल बाजूच्या बोळात ठेवली. रोजचा दिवस सुरू झाला.
पण आज रस्ता झाडायला अक्की आली नव्हती. तिच्या ऐवजी दुसरीच कुणी बदली आली होती. थोडा वेळ म्हैपत विचारांत होता. पण पांडुरंगाला उदबत्ती ओवाळण्यात त्याचा वेळ गेला. मग रस्याकडे पाहात असता ती बदलीबाई आली. विचारू लागली, “म्हैपतशेठ तुमीच का?” म्हैपतचा शेठ झाल्याने तो कोड्यात पडला. पण तो हो म्हणाल्यावर ती बाई म्हणाली, “शेठ अक्की लै बिमार हाये फार. डाॅक्टरकडे नेले पायजे तिला. पर… “ म्हैपतला समजले.त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला मेंदीबाबा रशिदमामू दिसला. “ओ मामू जरा दुकानाकडे ध्यान दे. मी आलोच.” अरे मै क्या ध्यान देणार? कुणी आलं गिऱ्हाईक तर?” “काडी पेटी बिडी बंडल साबुन अस दे . दुसरं काही देऊ नको.”इतके सांगून तो त्या बाई बरोबर अक्कीच्या झोपडीकडे गेला.
तिथलं चित्र पाहिल्यावर म्हैपतला आपण कुठं आलो ते समजेना. पण गटारी, ओघळ,शेवाळ, घाण चुकवत टपरीजवळ आला. अक्की शुद्ध नसल्यासारखी बोलत होती. म्हैपत दुसऱ्या बाई बरोबर डाॅक्टरकडे गेला. दादा बाबा करून डाॅक्टरला आणला. त्याने अक्कीला तपासले. दोन इंजेक्शने दिली. गोळ्या लिहून दिल्या. म्हैपत झपाट्याने दुकानाकडे गेला.औषधे आणली. दोन फळं घेतली. सर्व त्या बाईजवळ दिले. आणि म्हणाला. बाई आज तुम्ही तिच्याजवळ थांबा.मी तुमच्या मुकादमाला सांगतो.” म्हैपत दुकानात आला. मेंदीवाल्या मामूने विकलेल्या वस्तुचे पैसे त्याला दिले. आणि रशिद मामू गेला.
दिवस सुरू झाला होताच. रोखीची कमी,उधारी जास्तीची अशी रोजची विक्री सुरू झाली. तेव्हढ्यांत नरसू तेलगी एक पाय खुरडत खुरडत पोराला घेऊन आला. “ म्हैपतबाबा, हे माझा नातू. तेन्ला कारखान्यात बोलावलंय. पैसे नाहीत. कारखान्यात जायाला. रिक्षा लागंल, लांब हाये म्हनतो फार. आणि बघ, चहा पाव खायलाही काही लागतील. आज येव्ढी वेळ भागव. नोकरी लागली तर तुझे पैसे दुपटीने देईन”. म्हैपतने पैसे काढून त्या पोराला दिले. नरसू तेलगी आणि नातू म्हैपतला हात जोडून गेले. म्हैपतचे हात चालत होते. वस्तु देत होता. उधारी लिहित होता. कुणी रोख दिले ते घेत होता. पण आज काही झाले तरी एक आण्याचा आवळा देऊन चार आणे उधारीचा कोहळा घेऊन जाणाऱी बाबुची आई आली तर तिला उधारी द्यायचीच नाही असं तिला येताना पाहूनच त्याने ठरवले.
बाबुची आई आली. नेहमीच्या हळू आवाजात बोलून तिने दोन आणे दिले.आणि नविन वस्तु मागितल्या.म्हैपत ढिम्म बसला. पण तिने गयावया केल्यावर उधारी दिलीच! म्हैपत स्वप्न, विठोबा विसरला होता. पण आता लक्षात आले. अरे इतका वेळ झाला. पण विठोबा काही आला नाही. चुटपुट लागली. “नमस्कार करायचा विसरलो. विठोबा रागावला असेल. पण त्याला समजू ने का मी गांगरून गेलतो.” असे पुटपुटत गिऱ्हाइकी करत होता. मध्येच मोठ्या रस्त्याकडे पाहायचा, विठोबा तिकडून येईल म्हणून! मोठ्या रस्त्यावरून रोजची ट्रक बस रिक्षा मोटारी जातच होत्या. ती रहदारी तेव्हढी दिसली!
दुपार झाली. डबा खायची वेळ झाली. अर्धा डबा खाऊन झाला.तेव्हढ्यात एक कुत्रा आला. काटकुळा. मागचा एक पाय न टेकता चालत होता. कुत्रा रोज कधी दिसत नव्हता. पण म्हैपत खात होता, कुत्रा पाहात होता. म्हैपतने एक पोळी त्याला दिली. कुत्र्याने शेपटी हलवली. पोळी घेऊन गेला. ‘हटयोगी’ दोन्ही ढांगा टाकत व फकीर पंखा खाकोटीला मारत दोघेही आले. म्हैपतीने त्यांना रोजच्या प्रमाणे आपल्या डब्यातले खायला दिले. फकीर दुवा देत आणि ‘हटयोगी’ एक हात उचलून नमस्कार करत गेला. दुकान सुरू झाले. लिंगायत गंगव्वा आली ती रडतच. काय झालं असे विचारताच ती जास्तच रडू लागली.मग पुन्हा विचारल्यावर,” काय सांगायचं म्हैपतभाऊ!” म्हणत गावाकडे तिचे वडील वारल्याचे तिने सांगितले. म्हैपतने न बोलता पेटीतल्या थोड्या नोटा काढून दिल्यावर ती आपले हाडं आणि शिराच राहिलेले दोन्ही हात जोडून म्हैपतच्या पेटीवर डोके टेकून स्फुंदत स्फुंदत रडत काही तरी बोलली. पुन्हा पुन्हा हात जोडून ती माघारी गेली. दिवस संपत आला. रात्र झाली. अकरा वाजले. आज काही गल्ला नव्हताच. काय जो होता तो रेक्सिनच्या पाकिटात, पाकिट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी चारी दिशेला गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेलला अडकवून सायकलवर टांग मारून खड खड खाडार्ड खड वाजवत, कुंईं कुंईं खटक् करत घरी आला.
बायका पोराची चौकशी केली.अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिये दारी’ हा अभंग आणि ‘सुंदर ते ध्यान’ हे भजन म्हणून ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत पडला. आणि आज विठ्ठलाने फसवले. भेटायला येतो,दर्शन देतो असे मधाचे बोट लावून गेला पण आला नाही! जाऊ द्या. तो देव आहे. आपण काही देव नाही. असं म्हणत झोपी गेला. स्वप्नात पुन्हा विठोबा आला. त्याला काही बोलू न देता म्हैपत एकदम बोलू लागला, “विठ्ठला,पांडुरंगा मला फशिवलस आज. येतो म्हणालास पण तू काही आला नाहीस. काल तुला नमस्कार करायचा विसरलो म्हणून आला नसशील. आता आधी मी नमस्कार करतो तुला”असे एका दमात म्हणत म्हैपतने पांडुरंगाला दंडवत घातले.पांडुरंग नेहमीप्रमाणे त्यालाच जमणारे व शोभून दिसणारे मधुर हसला. म्हणाला, “म्हैपत,मी तीन चार वेळा येऊन गेलो.” “ तीन चार वेळा? अरे एकदाही दिसला नाहीस तू मला विठ्ठला!आणि तीन चार वेळा काय म्हणतोस तू?” “ म्हैपतबाबा, अरे अरे अक्की आजारी आहे हे सांगणारी बाई आणि अक्कीच्या रूपाने, नरसू तेलगी आणि त्याचा नातू, रोज न दिसणारा कुत्रा, लिंगायत गंगव्वा आणि आणखी किती किती रूपानी मी तुला दर्शन देणार? “ हे ऐकल्यावर म्हैपतचा गळा दाटून आला. आपोआप हात जोडले गेले. विठोबा पुढे म्हणाला, “ खरं सांगू म्हैपत ! अरे त्या सगळ्यांच्या डोळ्यांनी मीही तुलाच पाहात असतो! अरे तूही माझा विठोबाच ! पांडुरंगच असे म्हणाल्यावर म्हैपतच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. त्याबरोबर त्याच्याही तोंडावर विठ्ठलालाच जमणारे आणि शोभून दिसणारे मधुर हसू उमटू लागले! म्हैपत आणि स्वत: पांडुरंग “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ‘ भजन केव्हा म्हणू लागले ते दोघांच्याही लक्षात आले नाही!
जय जय रामकृष्ण हरी।जय जय जय रामकृष्ण हरी!