वेगळी पुस्तके

बेलमाॅन्ट

आज रेडवुडसिटी लायब्ररीतील ‘माणूस ग्रंथालयात’ गेलो होतो. पंधरा दिवसांपूर्वी नाव नोंदवले होते. तीन मानवी पुस्तके निवडायला सांगितली होती. मी माझी आवड निवड कळवली. पण एकच वाचायला मिळेल बाकीची दोन आधीच कुणी तरी घेतली होती असे कळले. मी ठीक आहे असे मनात म्हणालो. त्यातही नेहमी प्रमाणे तिसऱ्या पसंतीचेच मिळाले होते.


ह्या पुस्तकांच्या यादीत वेगवेगळ्या विषयांवरचे मानवी ग्रंथ होते! यादी पाहा. आंधळा, व्यसनमुक्त बाप लेक, सुधारलेला गुंड, स्वप्ने पाहणारा!, संगणक शास्त्रज्ञ,पोलिस आॅफिसर, लिंगबदल झालेली व्यक्ति व आणखी काही दोन तीन पुस्तके होती.

परिक्षेत कोणत्याही पेपरात, एकही सोपा प्रश्न माझ्या वाट्याला न येणाऱ्या मला इथेही अवघड पुस्तकच वाचावे लागणार होते. लक्षात आलं असेलच की मला संगणक शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचायचे होते!

विषय समजल्यापासूनच धडधड सुरू झाली होती. मी काय वाचणार आणि मला काय समजणार?! सतीशला विचारायचो काय विचारू, काय बोलायचे वगैरे प्रश्न चालू होते माझे. नंतर लक्षात आले की सोनिया, तिच्या वर्गातील दुसरी मुले त्यांच्या project साठी काही जणांच्या मुलाखती घेतात ते किती अवघड असते! पण ती किती व्यवस्थित घेते. मी दहा बारा दिवस नुसता विचार न करताही घामेघुम होत असे. आणि आज सतीशने रेडवुडसिटी लायब्रीपाशी सोडले तेव्हा मी लगेच पळत घरी जायला गाडीत बसणार होतो. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेल्या आई बापाचा हात पोरगं सोडतच नाही; वर्गात जात नाही तसे माझे झाले होते. ‘ बाबा काही पुस्तक वाचायला जाणार नाहीत’हे सतीशला समजले असावे.

मी गाडीतून उतरल्याबरोबर त्याने इकडे तिकडे न पाहता फक्त All the Best पुटपुटत गाडी लगेच भरधाव नेली. मी रडकुंडीला येऊन गाडीमागे दोन पावले पळत गेलो.पण त्याने गाडी थांबवली नाही. मी त्यालाच आत पाठवणार होतो. पण मलाच आत जावेलागले. तिथे पोचणारा मीच पहिला होतो. अजून अर्धा एक तास होता. नेहमीप्रमाणे प्रथम तिथल्या दुकानात गेलो. नव्यासारखी दिसणारी, काही नवी, काही जुनी झालेली निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके पाहात थोडा वेळ घालवला.

रिडिंग हाॅल मध्ये जाऊन तिथे दिसेल ते पुस्तक वाचायचे ठरवले होते. पण पहिल्याच झटक्यात AIQ हे Nick Polson & James Scott ह्यांचे पुस्तक हाताला लागले! एकदम भरून आले. ‘केव्हढी कृपा’
‘चमत्कार चमत्कार तो हाच!’ ‘ह्यामागे काही तरी योजना असली पाहिजे’ ह्या भाबड्या बावळट विचारांच्या ढगांत फिरून आलो.महाराजांनी पेपर तर फोडलाच आणि वर मला हे AIQ चे गाईडही दिले!

पुस्तक वाचायच्या आधी परिक्षणे अभिप्राय तरी वाचावेत म्हणून मलपृष्ठ वाचू लागलो.पहिलाच अभिप्राय न्यूयाॅर्क टाईम्सचा. तो म्हणत होता, “लेखकांनी इतक्या हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे की ते सदाशिव कामतकरांनाही समजेल! आम्हाला तर शंका आहे की त्यांच्यासाठीच ते लिहिले आहे! “ थक्क झालो! हे वाचल्यावर ट्रम्प, न्यूयाॅर्क टाईम्स वाॅशिंग्टन पोस्ट ह्यांना fake news म्हणणार नाही. पण मला आताच प्रश्न पडला की,न्यूयाॅर्क टाईम्सचे सोडून देऊ,त्यांना मी माहितच आहे; पण रेडवुड लायब्ररीला कसे समजले की मी वाचक आहे ते? थोडे डोके खाजवल्यावर लक्षात आले. “अरे शाळेत असतांना तू जसे गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये मला घ्याना मला घ्या ना बे; बॅटिंग बोलिंगही करतो ना मी. वाटल्यास फिल्डिंगही करीन. अशी दोन दिवस भुणभुण लावत त्या टीमभोवती फिरायचास? तसेच ह्या लायब्ररीलाही तू एकदा नाही तीन वेळा कळवलेस मी पुस्तक वाचायला येईन म्हणून!”

परीक्षेच्या हाॅल मध्ये जाण्यापूर्वी बहुतेक सगळेच अभ्यासावर शेवटचा हात फिरवितच आत जातात तसेच झाले की हे! असे म्हणत पुस्तक उधडले. वाचायला लागलो. भाताच्या प्रत्येक घासाला खडा लागावा किंवा भाकरीच्या पिठात खर आल्यामुळे भाकरीचा घासही वाळूची भाकरी खातोय की काय असे वाटावे तसे पहिल्या वाक्यापासून होऊ लागले. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळायला घ्यावा किंवा ‘देवा तुझे किती सुंदर… ‘ ह्या कवितेच्यापुढे मजल न गेलेल्या माझ्या सारख्याने मर्ढेकर, पु. शि. रेगे किंवा ग्रेस ह्यांच्या कविताचे रसग्रहण करण्यासारखे किंवा अनुष्टुभ, अबक मधील कवितांचा अर्थ समजून घेण्यासारखेच हे काम आहे हे समजून आले. पुस्तक जागेवर उलटे ठेऊन वरच्या हाॅलमध्ये गेलो.

नेहमीप्रमाणे मीच पहिला वाचक. इतर वाचक कोणीही नव्हते. त्यामुळे मला पाहून Jenny Barnes ला खरंच ‘Happy to see you’ झाले. तिने मला नाव न विचारता माझे “सुंदर ते ध्यान” पाहूनच माझ्या नावापुढे मी आल्याची खूण केली. आत घेऊन गेली व माझे टेबल दाखवले. माझे पुस्तक आले नव्हते. हळू हळू इतर वाचक आणि पुस्तके येऊ लागली. त्या अगोदर व्यसनमुक्त बाप लेका ऐवजी माय लेक(मुलगा)आले होते.त्यांच्याशी बोललो. तेव्हढेच Warm up !

बार्न्सने एक छापील पत्रक दिले होते. वैयक्तिक खाजगी माहिती विचारू नये; हरकत नसेलतर विचारा/ सांगा. बोलण्यापेक्षा बोलते करा, ऐका; नमुन्यादाखल काय विचारणे चांगले वगैरे सर्व सूचना त्यात होत्या. मला पुष्कळ धीर येऊ लागला. वेळ झाली. सगळी पुस्तके आली वाचक आले. आपापल्या टेबला वर गेले. पेपर वीस मिनिटांचा. १५व्या मिनिटाला पूर्व सूचनेची घंटा होईल हे सांगून झाले. आणि सुर करा असे जेनी बार्न्स म्हणाली. माझी दातखीळ बसली! बरे झाले,शास्त्रज्ञ बाईनेच स्वत:ची “ हाय्! मी एमिली!” कसे काय आहात?”विचारत माझ्या घामाच्या धारांना बांध घालायचा प्रयत्न केला. नुकतेच वाचलेले शीर्षकच AIQ म्हणून उत्तर दिले. घाबरल्यावर आवाज मोठा होतो हे आजच लक्षात आले. कारण त्या हाॅलमध्ये माझ्या AIQ चे तीन वेळा प्रतिध्वनी घुमले! सगळ्या वाचकांनी पुस्तके पटापट बंद केली व काय झाले असा चेहरा करून एमिली बाईंकडे सहानुभुतीने पाहू लागले.त्यांना काय माहित असे अजून बरेच वेळा होणार आहे ते! पण एमिली बाई प्रसंगावधानी. त्यांनी तोच धागा पकडून “ ह्या गोष्टींची सुरवात १७५० पासून झाली. १९२० साली नेव्हीतील अॅडमिरल बाईंनी ह्यावर बरेच काम केले होते. मी मग काही संबंध नसताना algorithms हे संध्येतील नाव घ्यावे तसे म्हणून लगेच आठवून आठवून step by step..असे काही तरी पुटपुटलो.म्हणजे मला वाटले मी पुटपुटलो; पण माझा घुमलेला आवाज ऐकून लगेच इतर वाचकांनी आणि नवल म्हणजे पुस्तकांनीही माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने रागाने पाहात लायब्ररीत शांतता पाळायची असते त्याची आठवण करून दिली. एमिली बाईंबरोबर माझाही उत्साह वाढू लागला असावा. मग रोबाॅट्सही चर्चेत आले.

ह्या बाई संगणक शास्त्रात डाॅक्टरेट आहेत. पण गंमत अशी की त्या ह्या शास्त्राकडे वळल्या त्यामागे त्यांची पहिली व आजही असलेली भाषेविषयीची आवड. त्यांना चार पाच भाषा तरी येतात. विशेष म्हणजे लॅटिन जास्त चांगली येते. म्हणजे आपल्या कडील संस्कृत तज्ञ. भाषेतील व्याकरण, शब्दोच्चार त्यातील उच्चारांचे टप्पे किंवा तुकडे. शब्दरचना व होणारे वाक्य; पिरॅमिडच्या शिखरावर शब्द व त्या खाली, खाली तो तयार होण्यासाठी त्यातील अक्षरे त्यांचे होणारे उच्चार ह्यांची बांधणी करत करत शब्द होतो. तसेच वाक्यही. तेच मी प्रोग्रॅमिंगमध्ये करते असे उदाहरणे देऊन सांगितले. त्या इंजिनिअर नसूनही संगणक शास्त्रज्ञ झाल्या. त्यांनी मला alexa, siri संबंधात थोडक्यात सांगितले.पहिल्या अर्ध्या मिनिटातच माझ्या आकलनशक्तीचीही व स्तराची त्यांना कल्पना आली असावी. त्यांच्या टेबलाकडे मी व जातांना त्या स्वेटर विणत होत्या. शेवटी शेवटी मी त्यांना तसे सांगितले. त्यावर त्या लगेच हसत म्हणाल्या knitting सुद्धा प्रोग्रॅमिंगच आहे. विणायचा स्वेटर घेउन लगेच त्यांनी दोन उलट एक सुलट पुन्हा एक उलट…टाके सुईवर घेत त्याही कशा algorithmic स्टेप्स आहेत ते मला प्रत्येक स्टेप घेऊन सांगू लागल्या. घंटा होऊन गेली होती. ‘पेपर’ वाचून (सोडवून) झाला होता. वेळ संपत आला. सगळ्यांच्या उठण्याच्या निघायच्या हालचाली सुरु झाल्या. माझेही वाचन संपले होते.

हा मुलाखतीचा किंवा प्रश्नोत्तरांचा प्रकार नाही. ह्यात वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या नेहमीच्या पठडीतील लोकांपेक्षा वेगळ्या, आपल्याला ज्यांच्याविषयी, ज्यांच्या पेशा कामा विषयी फारशी माहिती नसते कुतुहल असते अशांची भेट. त्यांनाही मुख्य प्रवाहात इतरेजनांच्या सहवासात आणून संवाद साधण्याचा हा एक वेगळा सामाजिक कार्याचा प्रकार आहे.दोन वाक्यात सांगायचे तर तुम्हीही आम्हीच आहात. आणि व आम्हीही तुम्हीच आहात. हे जाणून घ्यायचा हा वेगळा एका अर्थी उद्बोधक आणि सुंदर सामाजिक उपक्रम आहे.

उपक्रमाला नावही (ज्या स्थळी हा आयोजित केला त्याचाही त्यात थोडा वाटा असेल ) वेगळे व लक्षवेधी आहे . Human Library. Civit ह्या संस्थेने केलेला उपक्रम आहे.

मी सर्वेक्षणात सहसा भाग घेत नाही. पण अखेरीला मी त्यांचा फाॅर्म भरून दिला. नविन पुस्तके सुचवा मध्ये मी weatherman(Meteorologist) fire fighter first responders सुचवले.

मला हा नविन अनुभव होता. समोरासमोर अनोळखी व्यक्तीशी (इंग्रजीतून!) संभाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. वेळ चांगला गेला व कारणी लागला असे वाटले.

मी लिहिलेले ‘हे पुस्तक’ वाचनीय वाटेल की नाही ही शंका आहे. कारण सर्वेक्षणातील “तुम्हाला ‘पुस्तक’ व्हायला आवडेल का?” हा प्रश्न मी सोडून दिला!

संपता संपता, AIQ ची मी दोन चार पाने वाचली त्यावरून हे पुस्तक उत्तम आणि वाचावे असे आहे इतके सुचवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *