संत चोखामेळा

बेलमाॅन्ट

भक्तांच्या कथा ऐकताना फार बरे वाटते. अनेक वेळा त्या कथांमध्ये तर्कसंगती नसते, तर्कशुद्धताही नसते. पण माणसाच्या मनाला त्या वेगळ्याप्रकारे सुखावत जातात. त्यामागे, आपल्याला नेहमीच्या धबडग्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि तेही अद्भुत घडावे असे वाटत असते. रोजच्या जगण्यात तसे काही होत नसते आणि होणारही नाही हे माहित असते. आणि म्हणूनच ते घडावे अशी आपण अपेक्षा, कल्पना करीत राहतो. नेमके भक्तांच्या, संतांच्या कथा आपली ही साधी इच्छा पुरी करतात.

पण संतकवि महिपतिबुवा आपल्याला त्या कथा ऐकताना सांगतात की “ भक्तकथा ऐकता सुख । अंतरी विवेक ठसावे।। त्या कथांचे सुख अनुभवत असता आपण योग्य-अयोग्य, हित-अहित, चांगले आणि वाईट ह्यातील भेद ओळखण्याची बुद्धी ठेवावी. आणि त्याच बरोबर महिपतिबुवांनी भक्तकथेला अत्यंत गोड शब्दांत दिलेली नेमकी आणि समर्पक उपमाही लक्षात राहण्यासारखी आहे. ते भक्तकथेला “ शांतीवृक्षाचे अमृतफळ” म्हणतात! दोन अतिशय हव्याश्या अनुभवांचा संगम त्यांनी घडवला आहे!

आपण आज ‘उस डोंगा परि रस नव्हे डोंगा’हे सांगणाऱ्या संत चोखा मेळ्याच्या आयुष्यात त्याच्यावर गुदरलेल्या काही प्रसंगांच्या गोष्टी ऐकूया.

एकादशीसाठी सकळ संतांबरोबर चोखामेळाही आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाला. पंढरपुराला आल्यावर पांडुरंगाचे देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले तरी चोखा त्या सावळ्या परब्रम्हाच्या प्रेमात अडकून पडला. बायकोला म्हणाला आपण आता इथेच पंढरपुरीच राहायचे.

कुणाचे बोल नकोत ऐकायला म्हणून चंद्रभागेतच पण दूर लांब जाऊन आंघोळ करून तो रोज महाद्वाराशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून व हृदयात साठवून लोटांगण घालीत असे.

शूद्राला त्या काळी कोण देवळात जाऊ देत असेल! पण चोखामेळ्याने विठ्ठलाचे महाद्वाराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेणेही ढुढ्ढाचार्यांच्या डोळ्यांत खुपत होते. ते त्याला हिणवून टोमणा मारत “ अरे पांडुरंगाला तुला दर्शन द्यायचे असते तर तुला त्यानेच आत राऊळात नेले नसते का? उगीच रोज उगीच शिणतोस? आणि आमच्या वाटेत मधी मधी येतोस?” हां. शेवटचा प्रश्नच त्यांना सतावत होता! पुढे उपमा दृष्टांतांतून तत्वज्ञान सांगत त्याच्यावर छाप पडावी म्हणून बोलत. “अरे अल्पायुषी, आयुष्यहीन रानोरानी मारे भटकला तरी त्याला कल्पतरु भेटेल का? तसाच देवळात असूनही तुझ्यासार…तुला हा जगजेठी दिसणार नाही. व्यर्थ का दुरून श्रीमुख न दिसणाऱ्या विठ्ठलाला दंडवत घालतोस चोख्या?” ह्यावर आमचा अडाणी चोखा मेळा त्या कर्मठ बडव्यांना, आचार्यांना लीनतेने म्हणायचा,” माझे मायबाप हो, पांडुरंगाने मला देवळात नेऊन दर्शन द्यावे एव्हढे मोठे भूषण कशा करता पाहिजे ! अहो लक्षावधी कोसावरून सूर्य इथल्या तळ्यातील कमळाला फुलवतो; तसा दुरूनही पांडुरंग माझं रक्षण करतो. चोखा ढुढ्ढचार्यांच्याच शब्दांत माप घालतांना म्हणतो,” दोन लक्ष गावे निशापती। चकोरावरी अत्यंत प्रीती। तेवी अनाथनाथ कृपामूर्ती । माझा सांभाळ करीतसे।। इथेच न थांबता चोखोबा पुढे आणखी एका मात्रेचा वळसा त्यांना चाटवत सांगतो, कासवी कशी दुरून केवळ प्रेमळ नजरेने पाहात आपल्या पिलांना वाढवत सांभाळ करते तसे, मायबाप हो! विठोबाही माझ्याकडे इतक्या दुरून कृपादृष्टीने पाहतो!” चोखा मेळा त्यांना आता शेवटच्या मात्रेचे चाटण चाखवत विचारतो,” महाराज हो! चोवीस तास त्याच्याजवळ असले आणि मनात पांडुरंगाविषयी प्रेम भक्ती नसली इतकेच काय त्याचा विचारही मनात नसला तर त्याच्या जवळ राहण्याचा काय फायदा? चोख्याचे हा नम्र टोला खाऊन लाजलेली ती सर्व पंडीत मंडळी चला चला, लवकर निघा म्हणत लगबगीने काढता पाय घेत.

एके रात्री चोख्याच्या घरी अचानक पंढरीनाथ आले. ते गडबडून गेलेल्या चोखामेळ्याला म्हणाले,”चोखा चल; मी आताच तुला माझ्या राऊळात नेतो.” आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले. विठोबाने चोखोबाला आपुल्या ‘जीवीचे निजगुज’ बोलून दाखवले. “ अरे चोखा! रोज सकाळी मी तुला महाद्वारा बाहेर उभा असलेला पाहात असतो.,तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते; ठसका लागतो! तुझ्या आवणीनेच हे होते.” हे ऐकून चोखा काय बोलणार? त्याचे डोळे भरून आले! विठोबाचे पाय धरत तो इतकेच बोलू शकला,” विठ्ठ्ला मायबापा, तूच खरा आम्हा अनाथांचा नाथ आहेस!”

बाहेरच बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू आला. त्याने पांडुरंगाचा आवाज ओळखला नाही(त्यात आश्चर्य कसले?) पण चोखामेळ्याचा आवाज नात्र ओळखला. दाराला कडी कोयंडा कुलुप घातलेले असतानाही हा चोखोबा गाभाऱ्यात शिरला ही बातमी त्याने धावत पळत जाऊन इतर बडवे मंडळींना सांगितली. सगळे जमले.कलुप काढून आत गेले तर खरंच तिथे विठ्ठल मूर्तीपाशी हात जोडून चोखामेळा पुटपुटत असलेला दिसला. मग काय विचारता! “ कुलुप कसे काढलेस? आत कसा शिरलास? दरवाजे बंद करतानाच तू आत होतास का? अनेक प्रश्न धडाधड विचारत होते सर्वजण.

चोखा मेळा हात जोडून दीनवाणे सारखे इतकेच म्हणत होता,” अहो माझा काही गुन्हा नाही. मला स्वता पांडुरंगानीच हात धरून आत आणले. खरं त्येच सांगतोय मी. मला जाऊ द्या. दया करा माझ्यावर” असे म्हणत चोखामेळा जाऊ लागला. पण त्याला सगळ्या वरिष्ठांनी दरडावून सांगितले,”चोख्या आता जा. पण इथे पंढरपुरात राहायचे नाही. तू राहिलास इथे तर तू सांगतोस तसे पांडुरंग तुला देवळात घेऊन येईल रोज. विठ्ठ्लाला तुझा विटाळ नको. काय? पुन्हा इकडे यायचे नाही, लक्षात ठेव!” अशी त्याला तंबी दिली.

विठ्ठलाला तुझा विटाळ नको हे ऐकल्यावर मात्र चोखा थबकला; आणि म्हणाला,” महाराज मी पंढरीनाथाला बाटवले असे म्हणू नका हो.अहो शूद्राने आणि ब्राम्हणाने दोघांनीही गंगेत स्नान केले तर गंगेला कसे काय दूषण येते? गंगा कशी अपवित्र होईल? अहो दुर्जनाच्या अंगाला वारा लागला तर वारा दुष्ट होतो का? त्याला कसला दोष लागेल? पांडुरंगालाही सर्व जाती सारख्याच आहेत!तो आहे तसाच आहे!”

चोख्याचे हे बिनतोड विचार ऐकल्यावर तर पुजारी मंडळी अधिकच खवळली. आणि म्हणाले,” चोख्या,आम्हाला ब्रम्हज्ञान शिकवू नकोस. चल निघ इथून.” चोखा हिरमुसला आणि घरी परतला.विठ्ठलालाच आपला उबग आला की काय असे मनाला विचारत घरी परतला.

दुसरे दिवशी आपला प्रपंच पसारा होता तेव्हढा घेऊन नदीपल्याड राहायला लागला. कुठेही असला, राहिला तरी ऱ्भक्त हरिभजनाशिवाय कसा राहील? रोज पांडुरंगाची आठवण काढत तो हरिनामसंकीर्तनात राहू लागला. नंतर काही दिवसांनी विठोबाच्या देवळाला सन्मुख होईल अशी एक दीपमाळ त्याने बांधली.

एके दिवशी दुपारी लिंबाच्या झाडाखाली चोखोबा जेवायला बसला असता अचानक पांडुरंग आले! चोखोबाचा आनंद काय वर्णावा! बायकोला हे सांगितले. तिचीही धांदल उडाली. विठ्ठल आपल्याइथं जेवणार म्हणल्यावर दिवाळीही फिकी झाली की! चिवडा लाडू कुठुन असणार पण भाकरी आमटी दह्याचे गाडगे आणू ठेवू लागली. दोघे जेवायला बसले. देवा भक्ताच्या गोष्टी चालू होत्या. आणि जेवणही. तिकडून पंढरीचा पुजारी तिथे आला. आणि चोखोबा जेवतोय बायको वाढतेय हे तो पाहात होता. वाढताना चोखामेळ्याच्या बायकोच्या हातून दही सांडले असावे. कारण चोखा म्हणाला ,” अगं सावकाश. आज पंढरीनाथ महाराज जेवताहेत आपल्याकडे. आणि तू त्यांच्या भरजरी पितांबरावर दही सांडलेस की! जरा बेताने!” चोखा म्हणत होता. काही वेळाने झाडाकडे पाहात वर बसलेल्या कावळ्याला चोखोबा म्हणतो,” काकबा, हे काय करता? लिंबोळ्या नीट खा. खाली भगवंताच्या पानात टाकू नका.” म्हणत त्याने जवळ पडलेली निंबोळी उचलून फेकून दिली. हे ऐकून पुजारी कातावला. पितांबरावर दही सांडले काय म्हणतोय? कावळ्याला लिंबोळ्या अर्घवट खाऊन टाकू नको काय म्हणतोय! काय चाललेय काय हे सगळे त्याचे थेर? मला पाहून हा मुद्दाम मला खिजवण्यासाठीच करतोय.दुसरं काय?! “ असे स्वत:शी म्हणत तो पुढे झाला आणि चोखामेळ्याच्या अंगावर ओरडून म्हणाला,” काय रे चोख्या, हे काय पाखंडाचे थोतांड चालवले आहेस? कुठला विठोबाआणि त्याचा पितांबर? कावळ्याशीही काय बोलतोस!” असे म्हणत संतापाने पुढे होऊन चोखामेळ्याला एक सणसणीत मुस्काडात ठेवून दिली! चोख्याचा गाल चांगलाच फुगला होता. चोखा गालावर हात ठेवून कळवळत मागे कलंडला. त्याच्यावर आणखीनच दरडावत, “ ही नाटकं बंद कर.” असा दम देत पुजारी नदी पार करून विठ्ठल मंदिरात आला. गाभाऱ्यात गेला. तो हतबुद्धच झाला. दुसरे दोन तीन पुजारी होते तेही गप्प गप्प होते!

विठोबाच्या मूर्तीचा दगडी गाल सुजून चांगलाच फुगला होता. आणि विठोबाच्या पितांबरावर दही सांडलेलेही दिसले! ते पाहून पुजारी घाबरला. उलट पावली चोखामेळ्याकडे गेला. इतर ब्राम्हण व मजारी बडवेही त्याच्या मागोमाग निघाली. चोखामेळ्यासमोर तो पुजारी साष्टांग नमस्कार घालत म्हणाला,” चोखोबा (आता चोख्या म्हणाला नाही!) मला क्षमा करा. तुमच्या भक्तीभावाची मी कुचेष्टा केली. तुम्ही माझ्याबरोबर देवळात चला. विठोबाची समजुत घाला. मला वाचवा!”

चोखा म्हणाला, “ ममाझी जागा देवळाबाहेर ! आता तर तुम्ही गावाबाहेर काढले मला. विठोबा माझं काय ऐकणार! तुम्ही ब्रम्हज्ञानी माणसं. मी साधा शुद्रातला शूद्र. विठोबा माझं काय ऐकणार? “
पुजारी आणि आता इतर ब्रम्हवृंदही गयावया करू लागले. चोखोबा तयार झाला.

गाभाऱ्यात गेल्यावर विठोबाचा तो इतका सुजलेला गाल, की एक डोळाही दिसेना असा बारीक झाला होता. आपल्या पांडुरंगाचे असे श्रीमुख पाहून चोखोबा विठोबाच्या पायावर डोके ठेवून मुसमुसून रडू लागला. मनात सारखे घोकत होता,” पांडुरंगा, विठ्ठला मायबापा! अरे मी कोण कुठला.क्षुल्लक क्षुद्र माणूस.माझे घाव तुम्ही झेलले. माझ्यावरचे तडाखे तुम्ही खाल्ले, सोसले!
करूणाकरा, विठ्ला म्हणत त्याने पांडुरंगाच्या गालावरून आपला हात हळुवारपणे फिरवला. विठ्ठ्लाचा सुजलेला गाल पूर्ववत झाला. त्याचे सावळे सुंदर रूप पुन्हा नेहमीसारखे साजिरे गोजिरे मनोहर झाले!

चोखोबा बरोबर इतर सर्व मंडळी जय जय रामकृष्ण हरी ह्या भजनाचा घोष तल्लीनतेने करू लागले व नंतर त्यांच्या सुरांत आपलेही सूर मिसळून आपणही ‘पुंडलिक वरदाऽ हाऽऽरी विठ्ठल ! श्रीपंढरीनाऽऽथ महाराऽऽज की जय।। चा जय जयकार करू या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *