खरी गोष्ट अशी की……. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा सासवडला
दोन दिवसांचा मुक्काम असतो. आषाढी एकादशीला पंढरपूरात माऊलीबरोबर गेलो
तरी विठ्ठलाचे दर्शन दोन दोन दिवस थांबूनही नीट मिळत नाही ही वस्तुस्थिती
आहे; आणि अनेक वारकऱ्यांचा तसाच अनुभवही आहे. पांडुरंगाचे थोडे
निवांतपणे दर्शन घ्यावे आणि पुन्हा सासवडला मुक्कामाला यायचे. दुसरे दिवशी
पुन्हा माऊलीबरोबर पंढरीच्या वारीला निघायचे असा आमचा बेत होता.
आम्ही सासवडहून संध्याकाळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो.
आमच्या महिला मंडळाने चांगली भजने, भक्तीगीते म्हटली. आवाजात एखादी
उणीव काढता आली असती पण म्हणण्यातला भाव फार चांगला होता. आमचा
प्रवास ह्या हरिनामाच्या संकीर्तनात फार लवकर झाल्यासारखा वाटला.
पंढरपुरात पोहचल्यावर नामदेवाच्या पायरीवर डोके ठेवले आणि आम्ही
विठोबाच्या दर्शनासाठी बारीत उभे राहिलो.वर्षभर विठोबाच्या दर्शनासाठी
रांगा लागलेल्या असतात. पण आम्ही त्या दिवशी मोठ्या भाग्याचे! आम्हाला
अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागले नाही.
गर्दी नव्हती. दर्शनासाठी मोठ्या रांगाही नव्हत्या. तरीही बडवे
मंडळी सवयीनुसार दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला पांडुरंगापुढून क्षणात
पुढे ढकलतच होते!
आम्ही आता गाभाऱ्यात आलो होतो. त्यामुळे, नामदेवाचे हट्ट पुरवणारा,
भक्तांच्या काजा त्यांच्या संकटकाळात धावून जाणारा, सर्व संतांचे
परब्रम्ह अशा त्या सावळ्या पांडुरंगाचे आम्हाला दर्शन होत होते. गाभाऱ्यात
असलेले रांगेतील आम्ही, ते सावळ्या तेजाचे, कटेवरी हात ठेवून भक्तांसाठी
तिष्ठत उभ्या असलेल्या, महाराष्ट्राचे साक्षात लोकदैवत असलेल्या विठोबाचे
रूप तिथूनही डोळ्यात साठवत होतो.
आज माझे दैव विशेष बलवत्तर असावे. मी विठोबाच्या समोर उभा होतो.
कपाळावर चंदनाच्या उटीत बुक्क्याचा ठसठशीत ठिपका असलेला टिळा,
डोक्यावर चमचमणारा मुकुट, गळ्यात भरगच्च ताजा वैजयंती हार,
मोरपंखी असा सुंदर निळा पोषाख घातलेला, कमरेला लाल पट्टा,
खांद्यावरून गेलेल्या तांबूस पिवळ्या शेल्याचा भरजरी पट्टा, झळाळणारा
पितांबर नेसलेला तो पांडुरंग पुन्हा जवळून पाहिला. त्याच्या समचरणावर
दोन तीनदा डोके ठेवले! इतके मनसोक्त दर्शन मी घेतले तरी बडव्यांनी मला
पुढे ढकलले नाही! पंढरीनाथ महाराज की जय म्हणत मी पुढे सरकलो. हे मी
इतरांना सांगितल्यावर माझ्या या अप्रूप भाग्याचे कौतूक, हेवा न करता
“तुम्ही पैसे पेटीत न टाकता विठ्ठलाच्या पायाशी ठेवले होते” असे व्यावहारिक
सत्य सांगितल्यावर माझे ते भाग्याचे, दैवाचे विचार जमिनीवर आले!
मतितार्थ इतकच की ज्यासाठी हट्टाहास केला होता तो पांडुरंगाने
पुरवला. अगदी आषाढी एकादशीला नाही तर आगाऊ वर्दी न देता आम्ही
एकदम त्याच्या देवळात धडकलो होतो. हजार वर्षे सारा मराठी मुलुख, मराठी
संतांची मांदियाळी ज्याची उत्कटतेने भक्ती करते, त्या विठोबाचे आम्हाला इतके
निवांत दर्शन झाले, ह्याचा आनंद फार मोठा होता.
ह्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊली, संतश्रेष्ठ
तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर तसेच इतर अनेक संतांच्या
पालख्यांबरोबर ह्या सर्व संतांचे असंख्य वारकरी भक्त निघाले आहेत,त्या
लक्षावधी वारकऱ्यांबरोबर आपणही जात आहोत ह्याचे समाधान किती होते ते
शब्दात कसे सांगता यॆईल?
आम्ही पारंपारिक पद्धतीत थोडी सोयीची तडजोड केली इतकेच.