माझी वारी: मजल दरमजल

रात्री मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही सर्वजण भेटलो. चंद्रपूरची मंडळी आली होती.डॉ. अंदनकर भेटले.  किती वर्षांनी भेटलो ह्याचा हिशोब विसरून आम्ही भेटल्याचा आनंद घेतला.

सर्वजण भल्या पहाटे उठलो. ज्ञानेश्वरमाऊलीची पालखी सकाळी  सहा-साडेसहाला पंढरपूरला जाण्यासाठी निघणार होती. आम्ही पहाटे ५.४५ वाजता निघालो. लहान मोठ्या गल्ली बोळातून, रस्त्यांवरून, चहूकडून वारकऱ्यांचे लोंढे येत होते. पताका, निशाणे उंचावत दिंड्याही येत होत्या आणि मुख्य रस्त्याला लागणाऱ्या चौकात धडकत होत्या.

नादब्रम्ह काय असते; भजना अभंगांचा टिपेचा सूर, जय जयरामकृष्ण हरी, ज्ञानोब्बामाऊली तुकाराम हे सर्व कसे मनातून उमटत
येते; उत्साह, उल्हास, उत्कंठा किती अपरंपार असते याचा अनुभव येत होता.

कालच डोळे भरून पाहिलेला माऊलीच्या पालखीचा रथ केव्हा आपल्यात येतो याची आजही हजारो वारकऱ्यांत तितकीच उत्कंठा
होती. १८-२० दिवस आपल्या सोबत माऊली आहे की माऊली सोबत आपण आहोत हे द्वैत नकळत विरघळून जाते याचे प्रत्यंतर आजपासूनच येत होते.

आळंदी ते पुणे हा माझ्या पायांना ओळखीचा रस्ता.काही विसाव्याच्या ठिकाणी थांबत, संध्याकाळी पाच वाजता आम्ही पुण्याला इंजिनीअरींग कॉलेजच्या चौकात आलो.माऊलीची पालखी अजून खूप मागे होती.

चौकातून मी सर्वांचा निरोप घेतला. आमची इतर मंडळी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेली.मी घरी निघालो.ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या येणार असल्यामुळे मुख्य रस्ते इतर सर्व वाहनांना बंद होते. त्यामुळे घरी पोचायला मला २.३० तास लागले.

ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा आणि अर्थातच सर्व वारकऱ्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम होता.
११ जुलै रोजी सकाळी सहा वाजताच चि.श्री. श्रीकांत आणि चि.सौ. स्मिता, आम्ही सर्वजण पुण्यातून जिथून निघणार होतो तिथे मला सोडवायला आले होते. सर्वांच्या ओळखी झाल्या. मी आता एकटा नाही, ह्याची खात्री पटल्यामुळे स्मिताईचा जीव भांड्यात पडला
असणार. ती आता निर्धास्त झाली हे तिच्या चेहऱ्यावरूनच मला कळत होते. पण तरीही माझ्या पायाचे दुखणे, लंगडणे हे ध्यानात असल्यामुळे ती मला,”बाबा, पायाचा त्रास हॊऊ लागला की परत या. आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. स्वत:ला जपा.” असे म्हणालीच. माझ्या “काळजीवाहू सरकारची” ही मुख्यमंत्री! लेकीची माया, ती का अशी लपून राहणार?

आम्हा सर्वांना हडपसरच्या दिशेने सोडून ते दोघे घरी परतली.

हडपसरच्या थोडे अगोदरच आम्ही वारीच्या जनसागरात विलीन झालो.

चला! “पुंडलीक वरदा हारी विठ्ठल!” “श्रीज्ञानदेव तुकाराम!” “श्री पंढरीनाथमहाराज की जय” “गुरुमहाराज की जय!” असे थोडे मोठ्याने
(मध्यमवर्गीय शहरी पांढरपेशा असे किती मोठ्याने म्हणणार?) म्हणत म्हणत आमची पायी वाटचाल सुरू झाली. माऊलीच्या पालखीच्या विसाव्याची ठिकाणे माहिती करून घेतली होतीच. आमची दिंडी विसाव्याच्या ठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी कुठे
थांबणार याची माहिती अगोदरच एका तक्त्याद्वारे आम्हाला दिली होती.

प्रथम आम्ही सर्व मंडळी एकमेकांच्या सोबतीने, मग आपोआप काही वेळाने ३/४-५/६ जणांच्या गटा-गटाने चालत होतो. बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांची भजने, टाळमृदुंगाच्या साथीने दिंडीतील वारकरी म्हणत असलेले अभंग ऐकत आमची वाटचाल सोपी होत होती.

दिवे घाट लागला. चढण सुरू झाली. दुपारचे उन चांगलेच तापले होते. वडकी नाल्याची जेवणाची विश्रांती आटोपून बरेच वारकरी पुढे निघाले होते. पण टळटळीत दुपार.एकादशीचा फराळ असला तरी त्याचीही थोडी सुस्ती अंगावर येणारच. त्यातून घाटातील अवघड चढण.पाणी पीत पीत,भजने म्हणत, टाळ मृदुंग वाजवत वारी घाट चढत होती. पण ह्या सगळ्या गोष्टीतच सुस्ती शिरली होती. आवाज वर चढत नव्हते, टाळ मृदुंगात सकाळचा उत्साही नाद नव्हता. वारीचा वेग कमी झाला होता.

दोन अडीच लाखांची ती लोकगंगा वळणे घेत हळू हळू वर चढत चढत अखेर माथ्या जवळ यॆऊ लागली. यानंतर पठार की मग सासवड असे कितीसे दूर ह्या भावनेने वारीला पुन्हा वेग आला. पावले भराभर पडू लागली. टाळ जोरात वाजू लागले. मृदुंगही खणखणीत बोलू लागले.

घाट चढून जाताना जसे आम्ही थोडे पुढे निघालो तेव्हा माझी आणि बरोबर असणाऱ्या सोबत्यांची चुकामुक झाली. आम्हाला एकमेकांचा ठावठिकाणा समजेना. त्याचे असे झाले………….

……. वाटेत सुनील सिद्धमशेट्टीवारांचा डॉक्टरांना फोन आला. फोनवरचे बोलणे आजूबाजूच्या आवाजांमुळे त्यांना नीट ऐकू यॆईना. त्यांनी फोन मला दिला. वारकऱ्यांच्या रांगांतून मी रस्त्याच्या कडेला आलो. “आपल्या गाड्या, घाट संपल्याबरोबर उजव्या बाजूला थांबल्या आहेत. तिथे सर्वांनी थांबायचे आहे.” मी हा निरोप डॉक्टरांना सांगावा म्हणून वारीकडे पाहू लागलो तर डॉक्टर दिसेनात. इतरही कोणी दिसेनात. थोडा वेळ वारकऱ्यांच्या गर्दीतून पुढे पहात, थोडे पुढे चालत जा, पुन्हा मागे या असे झाले तरी डॉक्टर दिसेनात की इतर सोबतीही दिसेनात. डॉक्टरांचा मोबाईल माझ्याकडे आणि निरोपही माझ्यापाशीच राहिला. काय करावे?

चला, पुढे जावे, वाटेत भेटतील आपल्यापैकी कुणीतरी. पण कसचे काय! मी पुढे जात राहिलो. पुढे, पुढे, आणि पुढेच. तरी वाटेत इकडे तिकडे आपली मंडळी दिसतात का ते पहात चाललो होतो. कोणीच दिसेना. मी बराच पुढे आलो असेन. घाटही चढून पार केला. उजव्या बाजूला आमच्या गाड्याही दिसल्या नाहीत. एका मागून एक वारकऱ्यांच्या लाटा येतच होत्या. सर्व दिंड्यांच्या ट्रक-टेंपोही
वर्दळीने जात होत्या. सासवड ४ कि.मी. असा मैलाचा दगडही मी वाचला. वाटेत एके ठिकाणी फराळाचे वाटप चालले होते.वाटप करत होते त्यांच्यापैकी एकाला डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवलेले फोन नंबर पहायला सांगितले. एक ओळखीचे नाव “सुनील” आल्यावर तो नंबर लावायला सांगितला. पण तो नंबर काही लागत नव्हता.

डॉक्टरांचा फोन माझ्याजवळ राहिल्यामुळे तेही मला फोन करू शकत नव्हते.

मला चालत राहण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता. आता सासवड २ कि.मी. अंतरावरच होते.एका मोठ्या ढाब्यापाशी थांबलो. समोर रस्त्याच्या पलीकडे पाणी पुरवठ्याची मोठी उंच टाकी होती. आपल्यापैकी कोणीतरी भेटेल असे वाटत होते. इतक्यात अचानक फोन वाजू लागला. डॉक्टरच बोलत होते. त्यांना मी कुठे आहे ते ढाबा आणि टाकीच्या खुणा देऊन सांगितले. आपली एक गाडी येत
आहे त्यात बसा असा निरोप मिळाला. चला! सर्व भेटणार हे ऐकून बरे वाटले.

हे इतके सर्व होईपर्यंत हजारो वारकरी, रथापुढच्या अनेक दिंड्या अवघड घाट पार करून आल्याचा आपला आनंद टाळ-मृदुंगाच्या खणखणीत पण मधुर सुरा-तालावर दाखवत होते. ह्या ताला-नादाच्या उधाणाला कशाची उपमा देणार आणि कोणत्या शब्दांत त्याचे वर्णन करणार?

अर्ध्या तासानी आमची गाडी आली. सोबत्यांची पुन्हा भेट झाली. आम्ही थोड्याच वेळात सासवडला पोचलो.गावात प्रवेश करण्यापूर्वी स्वागताच्या मोठमोठ्या कमानी होत्या. मोठे व्यासपीठ होते. प्रवेशद्वारापाशी नगराध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे स्वागत करणार होते.

पालखीचे असे “सहर्ष स्वागत”सोहळे प्रत्येक लहान सहान गावात होतच होते. आळंदीहून निघाल्यापासून माऊलीची पालखी पंढरपूरला पोहचेपर्यंत माऊलीबरोबर असल्यामुळे सर्व वारकऱ्यांना ह्या अशा “सहर्ष स्वागताच्या” कमानीतून मानाने जायला मिळणार होते.

आमचा चौदा जणांचा गट आता पंढरपूरला जाणार होता. संधाकाळी ५.३० वाजता आम्ही निघालोही पंढरपूरला!

आमची पायी वारी इथेच संपली काय? विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारीतून हा “जवळचा रस्ता” आम्ही काढला की काय? का वारीची ही संक्षिप्त आवृत्ती काढली? असे प्रश्न कुणालाही पडले असणार. पण तसे काही नव्हते.आम्ही आमच्या पायी वारीला असे काही जवळचे फाटे फोडले नव्हते. खरी गोष्ट अशी की………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *