इच्छाकांक्षाची बदलती क्षितिजे

मॅरिएटा

Laughter is timeless Imagination is ageless Dreams are forever. -Walt Disney


माझ्या इच्छांची सुरुवात केव्हा व कशापासून झाली ते सांगता येणार नाही. पण…..


आमच्या शाळेत इतर सर्व शाळेप्रमाणे काही चांगले व काही मारकुटे मास्तर होते. दोन्ही प्रकारचे मास्तर पाहून – खरं सांगायचं तर मारकुटे मास्तर पाहून– ‘मी मास्तर होणार असे ठरवले. सडपातळ असूनही मास्तर म्हटले की मुलांना बदडता येते. छडी नसली तर फुटपट्टीने मारताही येते हे लक्षात आल्यामुळे मास्तर होण्य्याच्या इच्छेला महत्वाकांक्षेचे रूप येऊ लागले. बहुधा इथपासूनच माझ्या इच्छाकांक्षेची थैली भरायला सुरुवात झाली असावी.


पण हे काही महिने टिकले असेल. कारण ….


आमच्या घराससमोरच पोलिस लाईन होती. त्यामुळे दिवसातून बरेच वेळा पोलिसांची ये जा चालूच असे. त्यांचा खळीचा खाकी ड्रेस, बिल्ल्याचे बकल पासून , पॅालिशने कमरेचा पट्टा, डोक्यावरची निळी व तिच्या बाजूने गेलेली पिवळ्या पट्टीची लकेर , साखळीला अडकवलेली पितळी शिट्टी आणि पायातल्या जाड जूड चपल किंवा बुटापर्यंत सर्व काही चकाचक इतमाम पाहून मलाच काय आमच्या वर्गातल्या सर्वच मुलांची पोलिस व्हावे ती इच्छाकांक्षा होती. ह्यातली मोठी गंमत अशी की चोर-शिपायाचा खेळ खेळताना मात्र मी आणि सर्व मुलं चोर होण्यासाठी धडपडत असू !


घरी कोणी बाहेरचे आले व मुलांशी काय बोलायचे असा नेहमीच प्रश्न पडलेल्या पाहुण्यांनी, “ बाळ ! – बहुतेक सर्व पाहुणे लहान मुलांना ह्या एकाच नावाने ओळखत – तू मोठा झाल्यावर कोण होणार “ असे विचारल्यावर, मी अटेंन्शन पवित्र्यात छाती पुढे काढून उभा राहात असे. पाहुण्यांकडे न पाहता सरळ भिंतीकडे पाहात “ मी पोलिस होणार” असे मोठ्या आवाजात उत्तर देत असे.


मागे एकदा आलेल्या ह्याच पाहुण्यांना “ मी मास्तर होणार” असे सांगितले असणार. पाहुण्यांची स्मरणशक्ती चांगली असावी . “ मी पोलिस होणार “ हे ऐकून त्यांनी हसत विचारले,” बाळ तू तर मागच्या खेपेला मास्तर होणार म्हणाला होतास. त्याचे काय झाले? ” मी म्हणालो, “आता उन्हाळ्याची भरपूर सुट्टी आहे. .” हे ऐकून पाहुणे मोठ्याने हसले. पण गोष्टींतील पाहुण्यांप्रमाणे त्यांनी बक्षिस दिले नाही.


पोलिस व्हायचे तर सराव म्हणून, येणाऱ्या जाणाऱ्या पोलिसांना मी पवित्र्यात उभा राहून ,” पोलिस सलाम” म्हणत सलाम ठोकत असे. गंमत बघा, ‘मोठेपणी पोलिस होणार’ म्हणणारा मी आणि माझ्याबरोबरीची मुले, चोर-शिपाई खेळताना मात्रअगदी खटपट करून चोर होत असू!


पोलिसही काही महिनेच इच्छाकांक्षेच्या “चौकीच्या खजिन्यात” होते. कारणही तसेच घडले. सुट्टीत आलेल्या मावशीला व भावाबहिणीला पोचवायला स्टेशनवर गेलो होतो. गाडी यायला अजून थोडा अवकाश होता. फलाटावरची निरनिराळ्या लोकांची गडबड पाहात मी व भाऊ फिरत होतो. किती प्रवासी! त्यांना सोडायला आलेले, चहाच्या स्टॅाल पाशी असलेले. प्रत्येक खांबा वरची जाहिरात वाचून पाहात फिरत होतो. हे पाहणे संपेपर्यंत गाडी येण्याची घंटा झाली. धडधड करत येणारी गाडी इंजिनाच्या दिव्यामुळे दिसत नसे. पण वेग कमी करत फलाटात शिरु लागली; इंजिनाच्या दरवाजात दांडीला धरून पिकॅप घातलेला ड्रायव्हर दिसला की त्याची ऐट अधिकार पाहून ठरवले की आपण इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. त्याने इंजिनाची शिट्टी वाजवली की फलाटावर रेंगाळणारे सगळे प्रवासी डब्यात जाऊन बसतात हे पाहिल्यावर त्याच्या अधिकाराची व मोठेपणाची खात्रीच पटायची. आगगाडीचा इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. नक्की झाले.


इच्छाआकांक्षेचे इंजिन चालूच होते. ते दिवस दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीच्या वर्षादोन वर्षांचे असतील. आमच्या पाच नंबर शाळे समोरच्या.रस्त्यावरून मिलिटरीचे रणगाडे मोटारी जात. ते पाहात बराच वेळ ऊभे राहात असू. मोटारीच्या मागच्या बाजूला उभे असलेले किंवा रणगाड्याच्या टपातून बाहेर पाहणारा लालबुंद टॅामी आणि आपले सैनिक दिसले की ओळीत उभे असलेले सगळी पोरं त्यांना कडक सलाम ठोकत असू. लालगोरा टॅामी आमच्याकडे हसत पाहून हात हलवत. ते पाहून आम्हा सर्वांची मान ताठ होत असे. मास्तर, पोलिस, इंजिन ड्रायव्हर मागे पडले. ठरले ! मी सैनिक होणार. युद्धात लढणार. रणगाड्याच्या टपातून शत्रूवर पाळत ठेवून, धडाऽऽडधूम्मऽ तोफा उडवणार. बंदुक घेऊन पुढे सरकतो आहे हीच स्वप्ने पडू लागली. चला ! चला, थैलीत नवी भर पडली. ……


गावात सर्कस आली. शाळकरी मुलांत उत्साह आला. सर्कसचा अवाढव्य तंबू बांधायला सुरुवात झाली. त्या दिवसापासून सर्कशीच्या मैदानावर आम्ही दोस्त मंडळी रोज मैदानात जात असू. (अवाढव्य तंबू, त्याचे तितकेच जाड दोर. ते ताणत चारी दिशेने कामगार मोठ्याने होईऽऽ य्या खैचो हुईंऽऽय्या खैंचो ओरडून जोश भरत मागे मागे जाऊ लागले. त्याच बरोबर मधले दोन मोठे खांब बरेच कामगार एकाच वेळी वरती नेत उभे करू लागले. जसे जसे दोर ओढले जात आणि ते दोन खांब सरळ ताठ होत गेले तेव्हा तंबूचे जाड जूड कापड फुगत फुगत आकाशभर पसरले) सर्कशीचा शिकारखाना पाहायला फार थोडे पैसे पडत. त्यामुळे सकाळी बरीच मुले वाघ सिंह, उत्तम घोडे, प्रचंड हत्ती पाहायला जात. सर्कशीतील खेळाडूंच्या वेगवेळ्या कसरती पाहताना , जोकरच्या गंमती पाहून हसताना,सर्कसचा खेळ संपू नये असे वाटायचे. सर्कसच्या बॅन्डमुळे तर ह्या आनंदाला आणखी बहर येई!


सर्कसचा बॅन्ड सुरु झाला. दोरीच्या शिडीवरून सरसर चढत कसरतपटू सर्कसच्या छता पासून लोंबते झोके पाच सहा वेळा हलवत. मग एका क्षणी ते पकडून त्यावरून झोके घेत घेत दोन्ही बाजूचे कसरतपटू मध्यभागी जवळ येत. त्याच क्षणी ‘हाय हुपला’म्हणत टाळी वाजवून आपला झोका सोडून दुसऱ्याचा पकडत. आणि नेमक्या त्याच क्षणी बॅन्डची मोठी झांज दणक्यात वादायची. ह्यावेळी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके थांबत. आमची छाती धडधडत असे. तरीही बॅन्डच्या ठोक्या क्षणी तंबूत टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. कसरतपटू आपला खेळ झाल्यावर खालच्या जाळ्यांत उलट्या सुलट्या कोलांट्या घेत रडत. क्षणार्धात मांजराीसारखे पायावर उभे राहत. पन्हा टाळ्या!


जोकरही हसवून सोडत. त्यांना कसे विसरू? आम्ही किती वेळ श्वास रोखून सर्कस पाहात होतो. तुमच्या लक्षात आले असेलच की मोठा झाल्यावर मी कोण होणार ते!


सिनेमाच्या पडद्यावरची गंमत पाहात असतानाच पाठीमागून येणाऱ्या प्रकाश झोताकडेही लक्ष जायचेच. प्रकाशाचे झोत पडद्यावरील माणसांना हातवारे करायला लावतात.पळायला लावते , गाणे म्हणायला लावतात.नाचायला, हसायला लावतात. प्रकाश झोत खाली वर एका बाजूला, दोन्ही बाजूला हलत उडत असताना सिनेमा दिसत असे. कोण हे करत असेल? हा प्रश्न पडायचा. मध्यंतरात उभा राहून पाठीमागे असलेल्या त्या चार सहा अगदी लहान जादुई चौकोन खिडक्यांकडे पाहात असे. ह्यातील रहस्य शोधलेच पाहिजे.


एके दिवशी तो रहस्यभेद झाला. त्या दिवसांत सिनेमा चालू असताना थिएटरची फाटके बंद करत नसत. एकदा सहज पुढच्या सिनेमाची पोस्टर्स फोटो पहायला चित्रा टॅाकीजमध्ये गेलो होतो. आणि ती रहस्यमय खोली दिसली !
दोन मोठी मशिन्स होती. मशीनच्या पाठीच्या उंचवट्यांवर फिल्म गुंडाळलेले मोठे रीळ होते. एक माणूस कधी दुसऱ्या खिडकीतून पडद्याकडे पाही. मशिनच्या काही खटक्यांची, बटनांची हालचाल करे. दोन पायऱ्या खाली उतरून एका टेबलावर एक रिकामे मोठे रीळ व दुसरे भरलेले रीळ होते. तो एक बटण दाबून ती रिळे चालू करी. भरलेले रिळ दुसरे रिकामे रीळ भरून टाके. पटकन ते रिळ घेऊन एका मऱ्शिनच्या रिकाम्या उंचवट्यावर खटकन बसवे. मग दुसऱ्या मशिनच्या लहान खिडकीतून सिनेमा पाहात आरामात बसे.


अरे! पडद्यावरील माणसांना खेळवणारा हा जादुगार ! इतका मोठा महत्वाचा माणूस किती साधा! त्याला ॲापरेटर म्हणतात हे वरच्या वर्गातील मुलांनी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली. केव्हढी मोठी जबाबदारी तो पेलत होता ! उगीच नाही त्याला रोज सिनेमा पाहायला मिळत! तेही फुकटात. मला त्याचा का हेवा वाटू नये? त्या क्षणी माझ्या आकांक्षेतील मागील पानावरच्या सर्व इच्छा पुसल्या गेल्या. दुसरे काही ठरवण्यासारखे, होण्यासारखे नव्हतेच. माझ्या आकांक्षे पुढे गगनही ठेंगणे झाले होते. मोठा झाल्यावर सिनेमाचा ॲापरेटर मी होणार ! मी नसलो तर लोकांना सिनेमा कसा दिसणार?


माझ्या माझ्या इच्छकांक्षेच्या थैलीत सिनेमाचा ॲापरेटर जाऊन बसला!


जादू कोणत्या लहान मुलाला आवडत नाही? शाळेत जादूचे प्रयोग झाले. प्रत्येक जादू आश्चर्याने तोंडात बोट घालूनच पाहात होतो. मग काय जादूशिवाय दुसरे काही सुचेना. नंतर कुणी वडीलधाऱ्या माणसाने सांगितले की जादू म्हणजे ‘हात की सफाई’ , हातचलाखी असते. कोणत्याही चलाखीशी माझा कधी संबंध आला नव्हता त्यामुळे आणि त्यासाठी रोज सराव करावा लागतो हे समजल्यावर, जादुगाराचे स्वप्न माझ्या थैलीतून कधी खाली पडले ते समजलेही नाही.

सर्वजण लहानपणापासून क्रिकेट खेळतात. मी व माझ्या बरोबरीची मुले जे काही हाताला बॅट सारखे मिळेल आणि चेंडूसारखे दिसेल त्यानिशी क्रिकेट खेळत असू. आमचे क्रिकेट गल्ली बोळात, किंवा कुणाच्या घराच्या अंणात चाले. जेव्हा पार्कवर मोठ्या संघांचे सामने पाहायला जात असे तेव्हा पांढरे शुभ्र सदरे आणि विजारी , कुणाच्या टीमची तांबडी,निळी,किंवा हिरव्या रंगाची काऊंटी कॅप पाहिल्यावर आणि फलंदाज जेव्हा पायाला पॅडस् बांधून,हातातले ग्लोव्हज् घालत, चहूबाजूला पाहात रुबाबात येई तेव्हा; आणि जर पहिल्याच बॅालला बॅाऊन्ड्री मारली किंवा त्याची दांडी उडाली तर दोन्ही वेळा टाळ्या वाजवतानाच मोठेपणी काय व्हायचे ते निश्चित झाले.


उत्तम क्रिकेटपटूच व्हायचे. मग आपण पार्क मैदानावरील मध्यवर्ती पिचच्या मॅटवर बॅटिंग करू, किंवा गोलंदाजीही करत हॅटट्रिकही करू अशी स्वप्ने पाहायला लागलो. तशी [शेखमहंमदी] स्वप्नेही पडू लागली.प्रत्येक मॅचमध्ये माझे शतक झळकू लागले. विकेटसही घेऊ लागलो. आकांक्षा रंगीत होण्यासाठी स्वप्नाइतकी दुसरी अदभूत दुनिया नाही !
इच्छाकांक्षेच्या थैलीत मी पहिल्या दर्जाचा क्रिकेटर होऊनही गेलो.


हायस्कूलच्या टीममध्ये मला घेतले नाही. निवड करणारे सर चांगले होते. त्यांनी तीन चार वेळा संधी दिली. एकाही संधीचे मी सोने करू शकलो नाही. सोन्याचे लोखंड करणारा परिस ठरलो मी.


कॅालेजमध्ये मात्र तिसऱ्या चौथ्या वर्षी क्रिकेट टीममध्ये मी होतो. आंतरमहाविद्यालयीन सामन्यातील पहिले तीन चार सामने संघातून रीतसर खेळाडू ह्या दर्जाने खेळलो. पण हे सोडल्यास नंतरच्या सामन्यात नेहमी राखीव खेळाडूची सन्माननीय लोकलमधली चौथी सीटच मिळायची !


काही असो, कॅालेजच्या टीममध्ये होतो, त्यामुळे पार्क मैदानातील मुख्य खेळपट्टीवर खेळायला मिळाले.लहानपणी पार्कवर होणारे सामने पाहूनच क्रिकेटर होण्याची तीव्र इच्छा कॅालेजमध्ये पुरी झाली.


हायस्कूलच्या अखेरच्या दोन वर्षांपासून आणि त्यानंतर पुढेही किती तरी वर्षे सिनेमातला हिरो होण्याचे मनांत होते. हिरो होण्याचे स्वप्न, किंचित का होईना,नंतर काही वर्षांनी पुरे झाले असे म्हणता येईल.


प्रथा-परंपरेतील ‘कॅालेज संपल्यावर नोकरी ‘ हे सरळ साधे वाक्य नियम – सायन्समध्ये ज्याला लॅा म्हणतात- आहे. तो नियम माझ्याकडून पाळला गेला.

नोकरीच्या गावातील जिमखान्याच्या दोन तीन नाटकात नायकाची भूमिका मिळाली. पण गंमत अशी की नाटके नायिका प्रधान होती. त्यामुळे खमंग,तिखट, चिमटे काढणारे उपहासात्मक, टाळ्या घेणारे संवाद तिच्या वाट्याला. आणि मी सतत बचावात्मक बोलणारा ! नायक!


संवाद किंवा रंगमंचावर नाट्यपूर्ण प्रवेश -(एन्ट्री)- नसली तरी आता हिरो म्हटल्यावर नायिकेच्या जवळ जाणे, तितक्याच जवळकीने तिच्याशी बोलणे ह्याला वाव नाटककाराने दिला होता. पण त्या वेळी सरकारी वटहुकुम नसतानाही दिग्दर्शकाने आम्हा दोघांना ‘सोशल डिस्टन्स’ पाळायला लावले होते! हिरोसाठी किंवा नायिकेसाठी असलेले कोणतेही सवलतीचे हक्क नव्हते ! त्यामुळे माझ्यासाठी ती नाटके म्हणजे पोथीचे पारायण झाले!
काही का असेना नंतर दोन एकांकिका केल्या. त्यातही नायक होतो. एकांकिका विनोदी होत्या. त्यात बऱ्यापैकी चमकलो. पण त्यामध्ये नायिका नव्हती!


रंगमंचावर आलो. वावरलो. पडदा पडल्यावर का होईना टाळ्या मिळाल्या. तोही प्रथेचा भाग होता हे उशीरा लक्षात येत असे. . इतके असूनही नाटकात काम करण्याचा, प्रेक्षक आपल्याकडे पाहताहेत, बाहेर ओळख देतात ह्याचा आनंद लुटला.
लहानपणी, शाळा कॅालेजात असताना, नंतर नोकरी, व्यवसायाच्या काळातही अशा इच्छा आकांक्षा सर्वांच्या असतात. त्यातील अनेकांच्या काही इच्छा आकांक्षा पूर्णही होत असतील.


वयानुसार बदलत जाणारी ही स्वप्ने गोष्टीतील शेखमहंमदच्या हवेतील मनोऱ्यांप्रमाणे असतात. वयाचा तो तो काळ सोनेरी करत असतात. अलिबाबा सारखे, त्या प्रचंड गुहेपाशी जाऊन ‘तिळा दार उघड’ म्हटल्यावर प्रचंड आवाज करीत उघडणारी ती शिळा, गुहा, त्यातला खजिना वगैरे रोमांचक, रंजक गोष्ट ऐकल्यावर किंवा कथेवरचे सिनेमे पाहिल्यावर कोणाला अलिबाबा व्हावेसे वाटणार नाही?


मला आणि दोस्तांना मारुती व्हावेसे वाटे. राम किंवा लव-कुशा सारखी बाणांतून अग्नी अस्त्र, त्याला उत्तर म्हणून पाण्याचा वर्षाव करणारे वरुणास्त्र तर त्यालाही प्रत्युत्तर वायु अस्त्र सोडावे अशी इच्छा आकांक्षाच नव्हे तर ती झाडाच्या फांदीचे किंवा बांबूच्या कांडीचे धनुष्य व खराट्याच्या काडीचे बाण करून खेळत प्रत्यक्षात आणत असू. फरक इतकाच की फक्त अस्त्रांची नावे मोठ्याने म्हणत आवेशाने बाण सोडत असू. आजही मुलांना सुपरमॅन स्पायडरमॅन व्हावे असे वाटत असणारच.


स्टंटपट पाहताना त्यातील धडाकेबाज ‘ काम करनार’ जॅान कॅावस व्हावे असे वाटायचे. त्यानंतर राजकपूर देव आनंद दिलीप कुमार आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सौदर्यवतींना पाहून हिरो व्हावे असे वाटणे ओघानेच आले. ‘गन्स ॲाफ नव्हरोन’, ग्रेट इस्केप, ‘पॅटन’ असे इंग्रजी सिनेमा पाहून वैमानिक, शूर योद्धा व्हावे असे का वाटणार नाही. प्रत्येकात अशा प्रकट म्हणा, सुप्त म्हणा इच्छाकांक्षेची स्वप्ने असतातच….. …. एका उत्तम कवींची इच्छाकांक्षा म्हणते ‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे ‘ ! तर कविश्रेष्ठांच्या प्रतिभेतील, रामाला पाहण्यासाठी आतुर झालेली सीताही आपली इच्छाकांक्षा, “ मनोरथा चल त्या नगरीला। भूलोकीच्या अमरावतीला“ ह्या ओळीतून व्यक्त करते! मग लहानपणी सर्वांनाच मोठेपणी आपण कोणी ना कोणी व्हावे असे वाटते ह्यात काहीच आश्चर्य नाही ….. …… त्याशिवाय का जेम्स थर्बर ह्या प्रख्यात लेखकाचा ‘वॅाल्टर मिट्टी’ वाचला किंवा त्याच कथेचा झालेला सिनेमा (प्र.भूमिकेत डॅनी के) पाहिल्यावर; त्याचा ‘ सब कुछ पु. ल. देशपांडे’ अशी सार्थ जाहिरात केलेला, पुलंनी केलेल्या अस्सल मराठी रुपांतरातील ‘गुळाचा गणपती’ (त्यातील मुख्य भूमिका नारबा-पुल.) पाहिल्यावर, स्वप्नाळू डॅा.वॅाल्टर मिटी किंवा पुलंचा नारबा ही सर्व थोर माणसेही आपल्याच कुळातली आहेत हे समजले तेव्हा किती आनंद होतो! आपणही त्यांच्या इतके मोठे होतो !


पन्नाशी आणि त्यापुढील वाटचालीत, बदलत्या काळामुळे, करीत असलेल्या व्यवसायात, लहान मोठ्या व्यापारात टिकून राहणे, नोकरीत बढती मिळवणे, किंवा आतापर्यंत करीत असलेले काम सोडून निराळेच काही करण्याचा प्रसंग आला तर त्यासाठी करावा लागणारा खटाटोप महत्वाकांक्षेचे रूप घेतो. नवे ज्ञान, नवे तंत्र, नवे मंत्र, नवा कॅम्प्युटर आत्मसात करण्यासाठी ‘हा सर्टिफिकेटचा’, ‘त्या डिप्लोमाचा’ अभ्यास करणे; त्यासाठी क्लासेस लावणे; पास झालेच पाहिजे ही सुद्धा हळू हळू महत्वाकांक्षा होत जाते. आजचा कॅाम्प्युटर शिक्षित होण्याची महत्वाकांक्षा धरून आपली योग्यता आणि आवश्यकता वाढवू लागतो. दृढनिश्चयाला तीव्र इच्छेची जोड देऊन त्याला ध्येय गाठल्याचे समाधान मिळते. काळानुरुप बदलले पाहिजे हे समजल्यावर स्पर्धेत टिकून राहण्यापासून ते अव्वल नंबर गाठण्या पर्यंत महत्वकांक्षेची दालने विस्तारत जातात.


मोठे झाल्यावर आपल्याला “ मी हा होणार,तो होणार, ते करणार” ह्या लहानपणाच्या इच्छा फुलपाखरी स्वप्ने वाटू लागतात. जगाच्या व्यावहारिक स्पर्धेत टिकून राहणे किंवा असलेल्या स्थानावर पाय रोवून उभे राहणेहीच एक महत्वाकांक्षा बनते. येव्हढ्यासाठीच लुई कॅरोल म्हणतो : Remember we have to run fast to stay where we are. असे जरी असले तरीही बालपणीची, तारुण्यातली स्वप्ने ही महत्वाकांक्षेची बाळरुपेच असतात. इच्छाकांक्षा बदलत गेल्या तरी कित्येकांची स्वप्ने, त्यांनी त्यात रस घेऊन ‘आवडीचे काम’ ह्या भावनेने केलेल्या सतत प्रयत्नांमुळे ती प्रत्यक्षांत येतात !


केवळ बहिणीचे बूट आपल्या हातून हरवले ह्याची फक्त खंत न बाळगता निरनिराळे मार्ग शोधत, काही झाले तरी बहिणीला मी बूट देणारच ह्या तीव्र इच्छेपोटी, तो शाळकरी भाऊ किती धडपतो ह्याचे उत्तम चित्रण Children of Heaven ह्या अप्रतिम इराणी चित्रपटात रंगवले आहे. ते पाहण्यासारखेआहे.


आंतर शालेय स्पर्धेत भाऊ धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. कारण? तिसऱ्या नंबर येणाऱ्याला बुटाचा जोड बक्षिस मिळणार असतो. भाऊ तिसरा नंबरच मिळवायचा ह्या जिद्दीने शर्यतीत पळतो. विजयी क्रमांकाची नावे जाहीर होतात. तिसऱ्या क्रमांकावर दुसराच आलेला असतो. निकाल जाहीर झाल्यावर त्याची शाळा मैदान डोक्यावर घेते. भाऊ पहिल्या क्रमांकाने विजयी झाला असतो. पण भाऊ खिन्न, निराश होऊन घरी येतो. बहिण वाट पाहात असते. पण ऱ्भावाचा चेहरा पाहिल्यावर तीही काही बोलत नाही.


पहिला क्रमांक पटकावूनही बहिणीला बूट देऊ शकलो नाही हीच खंत. भावाने उच्च यश मिळवूनही त्याला इच्छा पूर्तीचा आनंद नाही! पण नंतर दोघानांही बूट मिळतात हे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होतो. इच्छाकांक्षेची झालेली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते भाऊ बहिण किती कष्ट सोसतात ते पाहिल्यावर आपणही मनात त्यांना यश मिळो हीच प्रार्थना करत राहतो.


इच्छाकांक्षा माणसाला काय असावे, काय व्हावे,हे सांगत असतात. आणि तो त्यात स्वत:ला पाहू लागतो. त्याला आपण जो व्हावे असे वाटत असते तसे आपण झालोच आहोत ह्या कल्पनेत तो वावरत असतो. महत्वाकांक्षा, ती पूर्ण होण्यासाठी माणसाला सर्व ते प्रयत्न करण्याची उर्मी उर्जा व प्रेरणा देत असते. एक प्रकारे ते त्याचे ध्येय होते. ते गाठण्यासाठी ध्यास घेऊन ते गाठतोच. सुरुवातीला स्वप्न असले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो.

आतापर्यंतच्या वाटचालीत, रोज बदलणाऱ्या आणि न गवसणाऱ्या इच्छा आकाक्षांची क्षितीजे लांबून का असेना पण मी सुद्धा पाहिली. ह्यापेक्षा दुसरे मोठे समाधान ते काय?


नाही क्षितिज गवसले पण वाटचाल कशी सोनेरी स्वप्नांची झाली.


मुक्कामाला पोचण्याच्या आनंदापेक्षा, झालेला प्रवास हा नेहमीच रोमांचक असतो !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *